डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ज्ञानमार्गी : शर्मिला रेगे

बाईंनी आंतरजातीय विवाह केलेला होता. बाई हाडाच्या शिक्षिका, वक्ता आणि लेखिका अन्‌ मजबूत समाजशास्त्रज्ञ! सच्च्या अकादमीशियन. शास्त्रशुद्ध अभ्यासात बार्इंची चूक काढणे केवळ अशक्यच. सामाजिक चळवळींवर बाईंची अपार माया. दलित लेखिकांच्या संमेलनात प्रत्येकीच्या स्वागतात आणि मैत्रीत बाई त्यांच्या सखी-आप्तच झालेल्या.

 

48 वर्षे हे काही जाण्याचे वय नाही. प्रा. शर्मिला रेगे फारच अकाली गेल्या. जबरदस्त चटका लावून गेल्या. बाई मोठ्या धीराच्या. कॅन्सरने शरीर पोखरले तरी आजाराशी शेवटपर्यंत झुंजत राहिल्या. सदैव हसत-खेळत, कामात, लेखनात व्यग्र राहिल्या. कधीही भेटल्या की अत्यंत जिव्हाळ्याने बोलायच्या. अभिजात नम्रता, ऋजुता, सौजन्यशीलता आणि ज्ञानमग्नता ही शर्मिलाताईंची खरी ओळख! सतत हसतमुख आणि स्वागतशील. शर्मिला रेगे म्हणजे अहोरात्र ज्ञाननिर्मिती करण्यात बुडून गेलेली विदुषी. एक मिशनरी झील असलेली शिक्षिका.

दलित स्त्रीवादाचे सिद्धांतन, दलित स्त्रीवादी भूमिदृष्टी यांच्या तात्त्विक मांडणीचा मजबूत पाया त्यांनी घातला. विद्यापीठीय अभ्यासात हा विषय यावा, यासाठी त्या झटल्या. देशातील अनेक विद्यापीठांत तो त्यांच्यामुळे शिकवला जाऊ लागला. त्यांनीच तो ऐरणीवर आणून देशभर पोचवला.

पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या लहान मुला-मुलींसाठी त्यांनी विद्यापीठाला पाळणाघर सुरू करायला लावले. त्याची निगुतीने काळजी घेतली. ते उत्तमरीत्या सांभाळले.

त्या समाजशास्त्राच्या एम. ए., एम. फिल. पीएच. डी. होत्या. त्यांनी आपले पीएच.डी.चे संशोधन ‘फ्रॉ ए मेनस्ट्रीम सोशिओलोजी टू ए जेंडर सेंसेटिव्ह सोशिओलोजी’ या विषयावर केलेले होते. त्यांचे रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टोमोनिज, सोशिओलोजी ऑफ जेंडर : दि चलेंज ऑफ फेमिनिस्ट सोशिओलॉजिकल नॉलेज हे ग्रंथ विद्वतमान्य ठरले होते. त्यांच्या दलित महिलाविषयक संशोधनाच्या गौरवार्थ त्यांना चेन्नई येथील राष्ट्रीय पातळीवरील माल्कम आदिशेषय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. त्यांनी पुणे विद्यापीठात आणि त्याआधी विविध महाविद्यालयांत तसेच आय.आय.टी.पवई येथे विविध पदांवर अध्यापनाचे सुारे 23 वर्षे काम केले. त्यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1964चा

पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात त्या प्राध्यापक आणि प्रमुख होत्या. हा विषय त्यांच्या अपार जिव्हाळ्याचा आणि आवडीचा होता. विभागात त्या रमल्या होत्या. सावित्रीबाई आणि महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर बाईंची अपार निष्ठा. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक प्रा. विद्युत भागवत निवृत्त झाल्यावर त्या केंद्राची उभारणी करण्यात त्यांच्यासोबत सदैव पुढे असलेल्या शर्मिलाताईंनी काय करावे? मला वाटत नाही, त्यांनी जे काही केले तसे उदाहरण संपूर्ण देशात दुसरे असेल म्हणून! त्यांनी त्या पदासाठी आपल्या प्राध्यापकपदाच्या पगारावर पाणी सोडले, पदाचा राजीनामा दिला आणि त्या चक्क डिमोशन-पदावनती स्वीकारून रीडरसंचालक बनल्या. तळमळ आणि बांधिलकी असल्याशिवाय आपल्या दरमहाच्या हजारो रुपयांच्या वेतनावर कोण सहजासहजी असे पाणी सोडील? विद्यापीठीय वर्तुळात मला तरी असे दुसरे उदाहरण माहीत नाही.

जेएनयूचे प्रो. विवेककुमार यांना बाईंनी व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते. त्यांची ओळख करून देताना प्रास्ताविकात त्यांच्या फुले-आंबेडकरी आकलनावर बाई भरभरून बोलल्या. अशी दाद कोण देतो? ज्याचे मन मोठे आणि निर्मळ असते, तोच. शर्मिलातार्इंनी दुसऱ्याला दाद देताना कधीही हात आखडता घेतला नाही. विदुषी असूनही त्यांच्यात एवढा जिंदादिलपणा कुठून आला असावा?

जातिनिर्मूलनाचा विषय निघाला की, उठता-बसता उच्चवर्णीयांचा उद्धार करण्याची फॅशन आजकाल जोरात आहे. विशेषत: ब्राह्मणांना चार-दोन शिव्या हासडल्याशिवाय ह्या  विषयावर बोलताच येत नाही, अशी बहुतेकांची ठाम समजूत आहे. अर्थात तिथून सुरुवात करायची आणि पुढे तिथेच बैलाच्या घाण्यासारखे फिरत राहायचे, शेवटही तिथेच करायचा, असे आजचे सामाजिक वास्तव आहे. रेगेताई सारस्वत ब्राह्मण होत्या. त्यांनी अनुसूचित जाती-जमाती, भटके-विमुक्त आणि ओबीसी मुलामुलींना स्वत:च्या पगारातून जेवढी आर्थिक मदत केली तेवढी संपूर्ण विद्यापीठातील आणखी कोणीही केली नसेल. भटक्या- विमुक्त चळवळीतील लेखक प्रा. वैजनाथ कळसे यांना रत्नागिरीच्या त्यांच्या महाविद्यालयातून जातीय आकसातून निलंबित केले गेले. त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा सगळा भार बार्इंनी उचलला. अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील. ही कळकळ कुठून येते?

बाईंनी आंतरजातीय विवाह केलेला होता. बाई हाडाच्या शिक्षिका, वक्ता आणि लेखिका अन्‌ मजबूत समाजशास्त्रज्ञ! सच्च्या अकादमीशियन. शास्त्रशुद्ध अभ्यासात बाईंची चूक काढणे केवळ अशक्यच. सामाजिक चळवळींवर बाईंची अपार माया. दलित लेखिकांच्या संमेलनात प्रत्येकीच्या स्वागतात आणि मैत्रीत बाई त्यांच्या सखी-आप्तच झालेल्या. उर्मिला पवार, प्रज्ञा दया पवार, हिरा बनसोड, हिरा पवार साऱ्यांना बार्इंचे असे अचानक जाणे चटका लावणारे. समकालीन स्त्रीवादाचा ज्ञानकोश म्हणजे शर्मिला. स्त्रीवादावर भक्कम मांड असूनही किंचितही पुरुषद्वेष्टी नसलेली, बहीणपणा आणि भाऊपणाचे प्रतीक असलेली शर्मिला! त्या माझ्या मित्र-तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक होत्या.

एन.सी.ई.आर.टी.ने त्यांचे 21 जानेवारी 2009ला सावित्रीबाई फुले मेोरियल लेक्चर या मालिकेत व्याख्यान ठेवले होते. त्या ‘एज्युकेशन ॲज तृतीय रत्न : टूवर्ड्‌स फुले- आंबेडकराईट फेमिनिस्ट पेडागॉजिकल प्रॅक्टीस’ या विषयावर छान बोलल्या.त्यांचे भाषण अभ्यासपूर्ण आणि तळमळीचे होते. एन.सी.ई.आर.टी. प्रथेप्रमाणे त्याचे पुस्तक प्रकाशित करणार होते. संस्थेने त्या पुस्तकात समाविष्ट करण्यासाठी त्यांना सावित्रीबाईंचे चरित्र लिहायला सांगितले. त्यांचा सावित्रीबार्इंवर खूप व्यासंग होता. तरीही त्या माझ्याकडे आल्या. म्हणाल्या- सर, हे चरित्र तुम्ही लिहा. मी संकोचून गेलो. त्या विद्यापीठात मला सिनिअर होत्या. मी हे प्रथेला सोडून असल्याचे सांगताच त्या म्हणाल्या- या विषयातील तुमचा अधिकार मला माहीत आहे. मी तुमची कोणतीही सबब ऐकून घेणार नाही. मी लिहिलेल्या सावित्रीबाईंच्या चरित्रासह त्यांचे हे पुस्तक एन.सी.ई.आर.टी.ने प्रकाशित केले. अशा रीतीने मला त्यांनी सहलेखक करून घेतले.

स्वत:ची जात सोडून बाहेर पडणे, ही फार कठीण गोष्ट. खूपच मोजक्या लोकांना हे जमले. देशातील डीकास्ट झालेल्या विनायकराव कुलकर्णी, प्रा. राम बापट, प्रा. गं. बा. सरदार, भा. ल. भोळे या ज्ञानवंतांच्या अभिमानास्पद मालिकेत त्यांच्या पंक्तीत बसणाऱ्या शर्मिलाताई अशा अचानक जाव्यात, हा निसर्गाचा फार मोठा अन्याय आहे. आज माझ्या नात्यातले, खूप जवळचे कुणी तरी गेल्याची उदासी मनात साकळून आलीय.

सावित्रीबाईंच्या या लेकीला, त्यांचा वारसा पुढे चालवणाऱ्या शर्मिलाताईंना अखेरचा निरोप देताना डोळ्यांत आज आसवं आहेत. स्त्रीवाद आणि जातिव्यवस्था यांची मूलभूत मांडणी करणाऱ्या या ज्ञानमार्गी विदुषीला मानाचा मुजरा. सामाजिक समतेचा आणि स्त्रीवादाचा अस्सल उद्‌गार असणाऱ्या शर्मिलाताईंना शोकग्रस्त मनाने विनम्र आदरांजली!

Tags: हरी नरके शर्मिला रेगे ज्ञानमार्गी harī narakē Śarmilā rēgē Jñānamārgī weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

हरी नरके
harinarke@gmail.com

मराठी लेखक, संशोधक, वक्ते. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे अध्यासन प्राध्यापक,  महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके