डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सत्यशोधक : 50 हजार प्रेक्षकांनी बघितलेले

मराठी माणूस हा नाटकवेडा आहे. वैचारिक-सामाजिक आशयाची राजकीय नाटके मराठीत फार कमी आहेत. मराठी अभिरुची संपन्न करणारे ज्येष्ठ नाटककार गो.पु.देशपांडे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर ‘सत्यशोधक’ हे नाटक लिहिले आहे.

प्रतिभावंत दिग्दर्शक अतुल पेठे यांनी या नाटकाचा प्रयोग पुणे मनपा सफाई कामगारांच्या समर्थ अभिनयातून उभा केला आहे. या नाटकाचे देशभरात अवघ्या साडेसहा महिन्यांत 65 प्रयोग झाले आहेत. आजवर 50 हजार प्रेक्षकांनी हे नाटक बघितले आहे. सामाजिक- राजकीय नाटकाला मिळालेला हा प्रतिसाद हा एक उत्साहवर्धक विक्रमच होय.

महात्मा जोतीराव फुले यांच्यासारख्या महापुरुषाचे संघर्षमय जीवनकार्य हा कोणत्याही नाटककारासाठी एक आव्हानात्मक विषय असतो. नाटककाराची प्रतिभा, पिंड आणि विचारधारा यांच्यानुसार तो त्या महापुरुषाचा आपल्यापरीने शोध घ्यायचा प्रयत्न करतो.

1950 साली महात्मा फुले यांच्यावर शंकरराव मोरे यांनी पहिले नाटक लिहिले. त्यानंतर अरुण मिरजकर यांच्यापर्यंत दहाबारा नाटके आली. 1990 साली जोतीरावांची स्मृतिशताब्दी होती. शाम बेनेगल यांनी पं.नेहरूंच्या पुस्तकावर आधारित ‘भारत एक खोज’ नावाची मालिका दूरदर्शनवर सादर केली होती. त्यात त्यांनी एक एपिसोड जोतीरावांच्या जीवनावर केला होता. तो त्यांनी ख्यातनाम नाटककार गो.पु.देशपांडे यांच्याकडून लिहून घेतला होता.

पुढे गोपुंनी जोतीरावांवर ‘सत्यशोधक’ हे नाटक लिहिले. ते दिल्लीतील ‘जननाट्य मंच’ या सफदर हाश्मींच्या ग्रुपने 1992 मध्ये सादर केले. त्याचे हिंदी भाषांतर चंद्रकांत पाटील यांनी केले होते. 1993 मध्ये कोल्हापूरच्या प्रत्यय या संस्थेने हे मराठी नाटक महाराष्ट्रात सादर केले. ते मी तेव्हा पाहिलेले होते. त्याचे फारसे प्रयोग होऊ शकले नाहीत.

2011 साली प्रतिभावंत दिग्दर्शक अतुल पेठे यांनी हे नाटक पुन्हा बसवले. या नाटकाद्वारे मुख्य प्रवाहामध्ये म.फुल्यांना पोचविण्यासाठी पेठे यांनी आपल्या आयुष्यातील एक वर्ष स्वत:च्या खिशाला खार लावून विनामूल्य काम केले.

पेठे यांनी या नाटकाच्या दिग्दर्शनातून मराठी रंगभूमीची उंची वाढवणारे एक विलक्षण नाट्यशिल्प निर्माण केले आहे. हे नाटक ज्यांनी ज्यांनी पाहिले ते झपाटून गेले. ते सत्यशोधक कधीही विसरू शकत नाहीत. नाटकाची निर्मिती करणारी पुणे मनपा कामगार युनियन, सफाई कामगारांसाठी गेली अनेक वर्षे झटत आहे. मुक्ता मनोहर या नाटकाच्या निर्मात्या आहेत.

अतुल पेठे म्हणतात, ‘कचरा कोंडी’ या माहितीपटामुळे कचरा उचलणाऱ्या कामगारांचे जगणे मी जवळून बघितले होते. त्यातून माझी आणि या कामगारांची घट्ट मैत्री जुळली. या श्रमिकांमध्ये कलेचे विलक्षण गुण आहेत. त्यांच्या गायन आणि वादनाने मला हे नाटक करायला उद्युक्त केले.

ज्योतीराव आणि सावित्रीबाई यांच्या आचार- विचारांचा आजच्या काळात अर्थ लावण्याचा प्रयत्न या नाटकात आहे. नाटकाचा बाज हा सत्यशोधकी जलशाचा असून गाणी, नृत्य आणि नाट्याद्वारे जोतीरावांचा जीवनपट कलात्मकरीत्या उलगडण्याचा यातला प्रयत्न प्रेक्षकांना हलवून सोडतो.

हे नाटक मी अनेक वेळा बघितलेले आहे. ते अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे नाटक आहे. अतुल पेठे यांनी रंगावृत्ती गोळीबंद करून एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलेली आहे. हजारो लोकांना विचार करायला लावणारे, अस्वस्थ करणारे, अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू काढणारे हे नाटक म्हणजे फुले-आंबेडकरी चळवळीला ताकद देणारे आजचे श्रेष्ट नाटक आहे.

ज्या लोकांनी आयुष्यात कधीही नाटकात काम केलेले नव्हते अशा सफाई कामगारांना नाटकात घेऊन आठ महिने अहोरात्र राबून पेठेंनी रंगमंचावर समर्थपणे व सफाईने हे नाटक उभे केले आहे.

जोतीरावांचे वडील गोविंदराव फुले, शाहीर, कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे, जोतीरावांचे पूर्वज शेटीबा फुले, विष्णुशास्त्री चिपळूणकर, डॉ.घोले, न्या.रानडे आदींच्या भूमिका करणाऱ्या कलाकारांनी कमाल केलेली आहे.

खास उल्लेख करायला हवा तो शाहीर सदशिव भिसे, डॉ.दीपक मांडे, पर्ण पेठे आणि ओंकार गोवर्धन यांचा. पर्णने या नाटकात सावित्रीबार्इंची भूमिका अत्यंत तळमळीने साकारली आहे. जोतीरावांच्या भूमिकेतील ओंकार गोवर्धन यांचा अभिनय साक्षात जोतीरावांचे सगळे पदर चिमटीत पकडून प्रेक्षकांपुढे जिवंत करणारा आहे. हे सगळे भूमिका जगले आहेत.

त्या व्यक्तींशी आपली कडकडून भेट घडवून आणण्याचे काम हे रंगकर्मी करतात. त्यांना सगळ्या टीमची उत्तम साथ मिळालेली आहे. शेखर जाधव, भीमराव बनसोडे, ब्रह्मानंद देशमुख, संतोष पवार यांचे संगीत आणि प्रदीप वैद्य यांची प्रकाशयोजना दोन तास आपल्याला खिळवून ठेवते.

या नाटकाचे 8 जानेवारीपासून गेल्या सात महिन्यांत 65 प्रयोग झालेले आहेत. आजवर सुमारे 50 हजार लोकांनी हे नाटक बघितले आहे. पहिल्या प्रयोगाला डॉ.श्रीराम लागू, डॉ.बाबा आढाव, यांच्यासारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.

डॉ.लागू हे नाटक बघून अत्यंत प्रभावित झाले होते. त्यांचे सगळे आयुष्य नाटकात गेलेले. परखड बोलण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. ते म्हणाले अतिशय उत्तम नाटक आज मला बघायला मिळाले. अप्रतिम प्रयोग. मी अगदी भारावून गेलो आहे.

आजवर हे नाटक बघणारांमध्ये फुल्यांवरील अनेक अधिकारी विद्वान, जाणते रंगकर्मी, सामाजिक चळवळींचे नेते, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांचा समावेश आहे. ते सारेच या नाटकाने असेच भारावून जातात.

या नाटकातून पैसे कमावणे हा निर्मात्यांचा किंवा पेठेंचा हेतू नाही. आजवर मोफत, अल्पदरात किंवा चॅरिटी शो करून त्यांनी फुले-आंबेडकरी चळवळीतील अनेक संस्थांना लाखो रुपयांची मदत या नाटकातून मिळवून दिलेली आहे. कामगार युनियनने कृतज्ञतेपोटी काही रक्कम पेठ्यांना प्रवासखर्चासाठी दिली. तीही त्यांनी सफाई कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तिथल्यातिथे देणगी म्हणून देऊन टाकली.

मी या नाटकाच्या निर्मितिप्रक्रियेत सुरुवातीपासून आहे. पेठेंनी सावित्रीबार्इंच्या रोलसाठी अन्य अभिनेत्रींची निवड केलेली होती. तिघीजणींना त्यांच्या व्यक्तिगत अडचणींमुळे तालमी केल्यानंतरही नाटक सोडावे लागले. शेवटी प्रयोगाचा दिवस जवळ येऊन ठेपल्यानंतर पर्णने स्वत:हून ही भूमिका मी करीन पण नाटक झालेच पाहिजे असे कर्तव्यबुद्धीने सांगितले आणि ताकदीने साक्षात सावित्रीबाई साकार केल्या.

गोपुंच्या सत्यशोधकची संहिता पुस्तकरूपाने 1996 मध्ये ‘साकेत प्रकाशना’ने प्रकाशित केलेली आहे. अतुल पेठे यांनी उभे केलेले सत्यशोधक जनमनाची पकड घेऊ लागल्यानंतर या पुस्तकाची दुसरी आवृत्ती लोकवाङ्‌मय गृहाने अलीकडेच प्रकाशित केली आहे.

हे नाटक वाचण्यातही मोठी प्रेरक शक्ती आहे. मात्र प्रयोग पाहण्यातली ऊर्जा अफाट आहे. आयुष्य समृद्ध करणारा तो अनुभव आहे. हा प्रयोग बघण्याची संधी कोणीही सोडता कामा नये.

महात्मा फुल्यांच्या जडणघडणीत बुद्ध, अश्वघोष, येशू, प्रेषित महंद पैगंबर, कबीर, तुकाराम, टामस पेन आणि मिशनरी अशा अनेकांचा वाटा होता. त्यांच्या प्रतिभेचे आणि द्रष्टेपणाचे सगळे पदर उलगडवून दाखवणे हे अतिशय अवघड काम आहे.

जोतीरावांचे पूर्वज शेटीबा हे कटगुण साताऱ्याचे. गावच्या अत्याचारी कुलकर्ण्यांचा त्यांच्या हातून खून होतो. ते गाव सोडतात. आधी खानवडी, सासवड आणि नंतर पुण्याला येतात.

ब्राह्मण मित्राच्या लग्नातील अपमानाने जोतीरावांच्या आयुष्याला वेगळे वळण लागले. भारतीय कामगार चळवळीला जन्म देणारे जोतीरावांचे सहकारी ना.मे.लोखंडे यांनी मुंबईत उभ्या केलेल्या ताकदवान कामगार चळवळीपर्यंत जोतीराव-सावित्रीबार्इंचा जीवनप्रवास कलात्मकरीत्या हे नाटक उभे करते.

जोतीराव स्वत: मराठीतले पहिले आधुनिक नाटककार आहेत. त्यांनी 1854 साली तृतीय रत्न हे नाटक लिहिलेले आहे. हे नाटक पेठेंनी स्वखर्चाने ब्रेल लिपीत प्रकाशित केलेले आहे. सत्यशोधक, हे नाटक म्हणजे जोतीरावांचे समग्र चरित्र नव्हे. एका मोठ्या माणसाचे अल्पसे दर्शन घडवण्याचा त्यामागे इरादा आहे. फुले पति-पत्नीच्या गौरीशंकराएवढ्या कामाचे टेकडीवजा दर्शन घडवणारा हा एक सत्यशोधक जलसा आहे, असे स्पष्ट आणि स्वच्छ निवेदन नाटकाच्या सुरुवातीलाच केलेले आहे.

फुलेविश्व फार अर्थपूर्ण आणि व्यामिश्र आहे. त्याचा अल्पसा प्रदेश दाखवण्याचा प्रयत्न हे नाटक करते. हे मूलत: राजकीय नाटक आहे. कामगारांना जोडीला घेऊन, त्यांच्यातले लोक घेऊन एका क्रांतिकारक आणि भारतातील पहिल्या परिवर्तनवाद्याची कहाणी सांगावी ह्यापरते सुख ते काय? अशी भावना गो.पु.देशपांडे यांनी व्यक्त केलेली आहे.

लेखक, दिग्दर्शक, निर्माता हे जर मिशनरी वृतीचे असतील आणि सोबतची सगळी टीम त्यांनी या विचाराने भारून टाकली असेल तरच सत्यशोधकसारखा मराठी माणसाला श्रीमंत करणारा एक सार्वकालिक नाट्यानुभव जन्माला येतो.

हजारो भाषणे आणि अनेक पुस्तके यांनी जे जोतीराव-सावित्रीबाई जनसामान्यांपर्यंत पोचणार नाहीत ते या नाटकाने आजवर 50 हजार लोकांपर्यंत पोचविले आहेत. त्यासाठी आपण गोपु, पेठे, मनोहर आणि टीमचे कृतज्ञ असले पाहिजे.

Tags: अतुल पेठे गो.पु.देशपांडे सत्यशोधक सावित्रीबाई फुले जोतीराव फुले Atul Pethe G.P. Deshpande Satyashodhak Savitribai Phule Jotirao Phule weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

हरी नरके
harinarke@gmail.com

मराठी लेखक, संशोधक, वक्ते. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे अध्यासन प्राध्यापक,  महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके