डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

धार्मिक माणसे आपल्या गृहितकांना त्रिकालाबाधित सत्य समजतात आणि आपल्यापेक्षा वेगळी गृहितके निवडणाऱ्यांना पाखंडी! पाखंडीपणा (blasphemy) कठोर शिक्षेस पात्र असतो. प्रचलित धर्म खरा नाही असे मानले, यासाठी येशूला सुळावर चढवले जाते; न्यूटनचे म्हणणे खरे नाही, असे म्हटल्याने आइन्स्टाइनला शिक्षा होत नाही. वैज्ञानिक आणि धार्मिक यांच्या स्वयंसिद्ध- तत्त्वाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनांतील या फरकामुळे विज्ञान सत्याच्या अधिकाधिक जवळ जात राहिले. धर्म अपरिवर्तनीय म्हणजेच, शेकडो वर्षांपूर्वी जेथे होता तेथेच राहिला. पण जसजशी विज्ञानाची उत्तरे धर्माच्या उत्तरापेक्षा अधिक समर्पक ठरू लागली, तसतसा धर्माचा प्रभाव कमी होत गेला आणि विज्ञानाचा वाढला.

प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी ‘धर्म हे एक मुदत संपलेले औषध आहे,’ असे विधान नुकतेच केले. डाव्यांचा धर्मविरोध त्यांच्या आर्थिक तत्त्वज्ञानाचाच भाग आहे. उजव्यांमध्येही धर्म न मानणारे आहेत. विज्ञान आणि धर्म यांची लढाई तर कित्येक शतके जुनी आहे. असे असूनही माणसाच्या जीवनातील धर्माचा पगडा कमी होत नाही. त्यामुळे, धर्म का निर्माण झाले आणि का टिकले याची कारणे शोधणे जरुरीचे ठरते.

धर्मांच्या इतिहासात थोडे डोकावून पाहिले, तर त्यांची निर्मिती मुख्यत्वे दोन उद्देशांतून झालेली दिसते : एक- समाजधारणेच्या उद्देशातून आणि दुसरी- आत्मशोधाच्या उद्देशातून. पहिल्यात दिशाहीन लोकांना संघटित करून एक कृतिशील समाज निर्माण करणे, हा उद्देश होता. या धर्मांना संस्थापक आहेत. माणसाचे आदर्श आचरण कसे असावे, हे सांगणारे धर्मग्रंथ आहेत. आणि अर्थात अनुयायांना एकत्र ठेवण्यासाठी संघटना पण आहेत. आजच्या काळातील कोणत्याही राजकीय अथवा सामाजिक संघटनांसारख्याच या धार्मिक संघटना आहेत. दोन्हींत फरक फक्त संघटनेची शिस्त राखण्याच्या उपायांच्यात आहे. 

सामाजिक व राजकीय संघटना आपल्या सभासदांना चांगल्या वागणुकीसाठी पुरस्कार आणि नियम भंग केल्यास शिक्षा देतात. धार्मिक संघटना समाजाच्या नियमनासाठी या उपायाबरोबरच परलोकातील शिक्षेची भीती घालतात आणि इथल्या चांगल्या वागणुकीच्या बदल्यात मृत्यूनंतर अनंतपट सुखाचे प्रलोभन दाखवतात. त्यासाठी त्या स्वर्ग आणि नरक यांसारख्या कल्पना निर्माण करतात. नरकातील यातनांची आणि स्वर्गातील सुखोपभोगांची वर्णने वाचली तर, अनेक धर्मांचा नैतिकतेचा दावा व्यापक अर्थाने विवादास्पद ठरावा. पण त्या वेळच्या समाजधुरीणांनी समाज नीतिमान राहावा, या चांगल्या हेतूनेच हे सारे केले असावे.

आजच्या युगात समाजाच्या कल्याणाचे, नियमनाचे आणि त्याची नीतिमत्ता टिकवण्याचे काम शासनसंस्थेकडे असते. लोकशिक्षण, प्रशासन, पोलीस आणि न्यायसंस्था यांच्यामार्फत ते पार पाडले जाते. त्यासाठी लागणारी यंत्रणा शासनसंस्थेकडे असते. हे काम जिथे प्रामाणिकपणे, न्याय- अन्यायाची योग्य जाणीव ठेवून आणि तत्परतेने पार पडते; तिथे धर्माचा रोजच्या व्यवहारातील प्रभाव बराच कमी झालेला आढळतो. पण तरीही धर्माचे अस्तित्व उरतेच. उपयोग नसेल, तर कोणतीही संस्था फार काळ टिकत नाही. समाजधारणेचे काम शासनसंस्था करत असतानाही धर्म टिकला आहे त्या अर्थी त्याचा उपयोग आहे, हे मान्य करणे अपरिहार्य ठरते.

माणसाला धर्माची आवश्यकता का भासते, हे जाणून घेण्यासाठी धर्माच्या दुसऱ्या उद्देशाचा विचार करावा लागतो. या उद्देशातून निर्माण झालेल्या धर्मांच्या संस्थापकांनीही समाजाचा विचार केला; पण तो त्यांचा मूळ हेतू नव्हता. ‘बुडतसे जग, देखवेना डोळा’ या कळवळ्यातून ते समाजाजवळ गेले. भारतातील धर्मप्रवर्तकांसमोर त्यांच्या कबिल्यांच्या उद्धाराचा प्रश्न नव्हता किंवा त्यांना स्वत:ला भौतिक सुखाची लालसा नव्हती.

वर्धमान महावीर, सिध्दार्थ  गौतम, द्वारकाधीश श्रीकृष्ण हे राजे होते. आत्म्याच्या शोधासाठी संसार सोडणाऱ्या याज्ञवल्क्याने जनकराजाच्या पंडितसभेत हजारो सुवर्णालंकृत गाई जिंकल्या होत्या. म्हणजे तो प्रकांड पंडितच नव्हता, आर्थिकदृष्ट्याही संपन्न होता. ज्यांच्या समोर सर्व भौतिक सुखे हात जोडून उभी होती ते, ही सारी सुखे लाथाडून कशाच्या शोधात वनात गेले?- या प्रश्नाचे नि:संदिग्ध उत्तर स्वतः याज्ञवल्क्यानेच दिले आहे : स्वत:ला जाणून घेण्यासाठी. सर्व भौतिक सुखे पायाशी लोळण घेत असतानाही ही सारी माणसे समाधानी नव्हती. स्वत:ला चिरंतन शांतीची प्राप्ती कशी होईल याच्या ती शोधात होती. यापैकी कोणीही स्वत:ला (श्रीकृष्ण सोडता) धर्म-संस्थापक म्हटले नाही.(श्रीकृष्णाची गोष्ट पूर्णत: वेगळी आहे.)

यातून मग दुसरा प्रश्न उपस्थित होतो. याज्ञवल्क्याने जो शाश्वत शांतीचा मार्ग शोधला, त्याचाच अवलंब महावीरांनी का केला नाही? महावीरांचाच उपाय बुद्धांनी का स्वीकारला नाही? प्रत्येकाने त्याच त्या गोष्टीचा स्वत:च शोध घेण्याचे काय कारण होते? महाभारतात युधिष्ठिराने याचेही उत्तर दिले आहे. यक्षाने जेव्हा युधिष्ठिराला प्रश्न विचारला ‘कोऽ पंथ:?’ (धर्माचरणाचा मार्ग कोणता?) तेव्हा युधिष्ठिराने उत्तर दिले आहे : श्रुतिर्विभिन्ना स्मृत्यश्च भिन्ना:।

नैको मुनिर्यस्य वच: प्रमाणम्‌।‌।

धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायाम्‌।

महाजनो येन गत: स पंथ:।‌।

वेद अनेक आहेत. स्मृती अनेक आहेत. ज्याचे वचन प्रमाण मानावे, असा कोणी एकच एक मुनी नाही. धर्माचे तत्त्व गुहेत लपलेले आहे. सर्व मोठ्या लोकांनी ते याच मार्गांनी जाणून घेतले आहे. येथे गुहेचा अर्थ मी लक्षणेने घेतो. गुहा ही ध्यान करण्याची जागा. धर्माचे तत्त्व गुहेत लपलेले आहे याचा अर्थ- चिंतन, मनन, ध्यान करून जे स्वत:ला प्रतीत होईल, तो धर्म.

पण ध्यान करण्यासाठी गुहेत जाण्याचीही आवश्यकता नाही. तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे, ‘ठायीच बैसोनी’ एकचित्त करूनही ते सत्‌ तत्त्व समजून घेता येते. आणि ते स्वत:च समजून घ्यावे लागते, हेही त्यांनी आपल्या नेहमीच्या रोकठोक भाषेत सांगितले आहे :

सत्यासत्यालागी मन केले ग्वाही।

मानियले नाही, लोकमता।।

म्हणजे युधिष्ठिराने सामान्य नियम सांगितला; तुकारामांनी स्वत:चे उदाहरण दिले.

प्रत्येकाला धर्माचा शोध स्वत:च का करावा लागतो; हे जाणून घेण्यासाठी ज्ञानाचे स्वरुप कसे असते आणि ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे लागते, हे समजून घ्यावे लागेल. विज्ञान आणि धर्म हे आज जरी एकमेकांच्या विरोधात ठाकलेले दिसत असले, तरी त्या दोघांच्या समोरचे प्रश्न आणि त्या प्रश्नांचे उत्तर मिळविण्याची त्यांची पद्धत सुरुवातीला तरी सारखीच होती. फरक नंतर पडत गेले.

मुख्यत्वे दोन प्रकारचे प्रश्न होते : कुतूहलातून निर्माण झालेले आणि भौतिक सुखाच्या इच्छेतून निर्माण झालेले. उदाहरणार्थ- ऋग्वेदातील नारदीय सूक्तात- ही सृष्टी कशी अस्तित्वात आली, का अस्तित्वात आली, अशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत. सर्व धर्मांत सृष्टीच्या उत्पत्तीची कारणे शोधण्याचा प्रयत्न आहे. विज्ञानही अशाच प्रश्नांची उत्तरे शोधत समृद्ध झाले आहे. दुसऱ्या प्रकारचे प्रश्न भौतिक गरजासंबंधी होते : वाऱ्यावादळापासून कसे वाचू, रोगराई कशी नष्ट होईल, अन्न-वस्त्र- निवारा कसा मिळेल, पाऊस वेळेला पडून अन्नधान्य भरपूर कसे पिकेल, प्रजा कशी वाढेल, इत्यादी.

विज्ञान आणि धर्म यांची उत्तरे मिळविण्याची पद्धतही सुरवातीला समान होती, कारण ज्ञान मिळविण्याची पद्धत ठरलेली आहे. ज्ञान मिळविण्याच्या प्रक्रियेत तीन घटक काम करत असतात : ज्ञानेन्द्रिये, भाषा आणि तर्कशास्त्र. आपण ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून माहिती गोळा करतो, गोळा केलेल्या माहितीवरून काही नियम मांडतो. त्या नियमावरून काही निष्कर्ष काढतो. ही कामे भाषेच्या माध्यमातून होतात. नियम मांडण्यासाठी आणि त्यातून निष्कर्ष काढण्यासाठी तर्कशास्त्राचा वापर करतो. पण ज्ञानेंद्रिये, नैसर्गिक भाषा आणि तर्कशास्त्र या प्रत्येकाला स्वत:च्या मर्यादा असतात. आपण ज्ञानाच्या वस्तुनिष्ठतेचा दावा वरचेवर करत असतो; पण वरीलपैकी प्रत्येक घटकाचा उपयोग करताना वस्तुनिष्ठतेशी तडजोड करावी लागते.

ज्ञानेंद्रियांमार्फत जे ज्ञान होते, ते तुलनेतूनच होते. तिखट पदार्थ खाऊन चहा घेतल्यास तो गोड लागतो; तोच चहा चमचाभर साखर खाऊन प्याल्यास सपक वाटतो. कारण जीभ चहाच्या गोडीची तुलना पूर्वी जिभेवर असलेल्या गोडीशी करत असते. हा केवळ वादासाठी वाद करण्याचा (अकॅडेमिक) प्रश्न नाही. थंड पाण्यातून उचलून गरम पाण्यात बेडूक टाकला, तर तो टुणकन्‌ उडी मारून बाहेर येतो. पण त्याला जर थंड पाण्यात टाकून पाणी हळूहळू गरम  करायला सुरवात केली, तर तो पाणी कितीही तापवले तरी, मरून जातो; पण बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही. कारण प्रत्येक क्षणी तो पूर्वीच्या क्षणाच्या तापमानाशी तुलना करतो. आणि तो फरक ‘तसा फारसा विचारात घेण्याएवढा’ नसतो.

सर्वच ज्ञानेन्द्रियांबाबत असे होते. म्हणजे दोन व्यक्तींच्या डोळ्यासमोर एकच दृश्य असते; पण त्या एकच गोष्ट पाहत नसतात. एकाच गाण्याचा आस्वाद घेत असतात; पण एकच गाणे ऐकत नसतात. एकाच अन्नावर ताव मारत असतात; पण एकाच चवीने खात नसतात. इंद्रियगम्य ज्ञान हा अनुभव असतो. अनुभव ही व्यक्तिगत गोष्ट असते. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला तो जसाच्या तसा देऊ शकत नाही. अनुभवाचे शब्दांतून वर्णन करता येते; पण त्याला मर्यादा असतात.

भाषा स्वभावत:च (instrinsically) ढोबळ (rough) आणि अस्पष्ट (fuzzy) असतात. ढोबळतेमुळे ज्ञान अंशा- अंशांनी कळते. अस्पष्टतेमुळे विरोधाभास निर्माण होतात. हाही केवळ ‘अकॅडेमिक’ प्रश्न नाही. हा प्रश्न हाताळण्यासाठी गणित, संगणक नव्या तर्कशास्त्रात नवीन शाखा निर्माण झाल्या आहेत आणि आजही त्यांत नवनवीन संशोधन होत आहे.

आता तर्कशास्त्राच्या मर्यादांचा विचार करू. तर्कशास्त्र विचारांतील सुसंगतीचा विचार करते; सत्याचा नाही! सत्य सुसंगत असते म्हणून ते शोधण्यासाठी तर्काचा उपयोग होऊ शकतो, इतकेच. पण असत्यही सुसंगत असू शकते. (म्हणून तर वकिलांचे फावते.) निरीक्षण आणि कार्य- कारणभाव या दोन खांबांवर तर्कशास्त्र उभे असते. माहितीचे संकलन आणि निरीक्षण या गोष्टींचा उपयोग ठोकताळे किंवा नियम बनविण्यासाठी केला जातो. या गोष्टीही व्यक्तिगत अनुभवाच्या असल्याने त्यांच्या वस्तुनिष्ठतेला मर्यादा पडतात. पण निरीक्षणावरून सामान्य नियम शोधून काढण्याचा दुसरा मार्ग माणसाला उपलब्ध नाही.

माहीत असलेल्या नियमावरून निष्कर्ष किंवा दुसरा नियम काढण्यासाठी कार्य-कारणभावाचा उपयोग करतात. कार्य- कारणभावाचा उपयोग करून विश्वासार्ह निष्कर्ष मिळतात; पण त्यालाही मर्यादा पडतात. उदाहरणार्थ, धूर आहे तिथे अग्नी आहे, हे विधान घ्या. म्हणजे अग्नीच्या अस्तित्वाची खात्री धूर देतो. पण आपण पाहतो तो धूरच आहे (पाण्याची वाफ नाही) याची खात्री कोण देणार? कोणी म्हणेल- तो धूर आहे, कारण त्यात कार्बनमोनॉक्साइड आहे. पण लगेच, हा कार्बनमोनॉक्साइडच आहे हे कशावरून असा प्रश्न विचारता येतो. अशा प्रकारे कार्य-कारणांची न संपणारी मालिका तयार होते. या न संपणाऱ्या मालिकेचा मागोवा  घेणे आपल्यासारख्या मर्त्य मानवाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असते. यावर तडजोड म्हणून कार्य-कारणांच्या साखळीतील ज्या विधानाबाबत सर्वसामान्यपणे फारसा वाद होणार नाही, असे एक विधान आपण सत्य म्हणून स्वीकारतो. हे ‘सत्य’ बहुमत आजमावून स्वीकारलेले असते. म्हणजे ज्याला आम्ही वस्तुनिष्ठ ज्ञान म्हणतो, ते बहुसंख्य व्यक्तींचे व्यक्तिनिष्ठ ज्ञानच असते.

महाभारतातील वर दिलेल्या श्लोकात ‘स्मृत्यश्च भिन्ना:’ (स्मृती अनेक आहेत) या वाक्याला ‘तर्क: अप्रतिष्ठित:’ (तर्काला भक्कम पाया नसतो) असा पाठभेद आहे, याचे कारण हेच आहे. अशा प्रकारे स्वीकारलेल्या विधानाला आपण स्वयंसिद्ध (self evident) विधान म्हणू या. एकापरीने ‘स्वयंसिद्ध’ हे ‘असिद्ध’ या शब्दाचे सुशोभीकरण (euphemism) म्हणता येईल. हा स्वीकार एक असहायता, एक मजबुरी असते. ज्या कारणासाठी स्वयंसिद्ध विधान स्वीकारावे लागते, त्याच कारणासाठी त्या विधानात वापरलेल्या शब्दांना ‘प्राथमिक संज्ञा’ (primitive terms) मानावे लागते. त्यांची निर्दोष व्याख्या करता येत नाही.

दुसऱ्या शब्दांत- ज्या संज्ञांना नेमकी व्याख्या नाही आणि (म्हणून त्या संज्ञा वापरून तयार केलेल्या) ज्या विधानांना नेमका अर्थ नाही, ज्याच्या सत्यासत्यतेबाबत संपूर्ण खात्री देत येत नाही- अशा विधानापासून सुरवात करून, आपण आपल्या ज्ञानाचे इमले रचायला सुरवात करतो. हे विज्ञान, गणित, धर्म, इत्यादी सर्वच क्षेत्रांत घडते. वैज्ञानिक स्वयंसिद्ध विधानाला गृहितक किंवा हायपोथेसिस म्हणतो. विज्ञान आणि गणिताच्या प्रत्येक शाखेची सुरुवात अशा प्राथमिक संज्ञा आणि गृहितके यांनी होते. उदाहरणार्थ- भूमितीत बिंदू, रेषा या प्राथमिक संज्ञा असतात; तर दोन बिंदूंतून एकच एक सरळ रेषा जाते, हे गृहितक असते. धार्मिक माणसाच्या दृष्टीने ईश्वर किंवा ब्रह्म या प्राथमिक संज्ञा आहेत. त्यांचे ‘नेति नेति’ असेच वर्णन केले जाते, कारण त्यांची व्याख्या करता येत नाही. ईश्वर आहे, हे तो स्वयंसिद्ध विधान मानतो. यालाच तो श्रद्धा असे नाव देतो.

ज्ञानेश्वरांनी ईश्वराला ‘ओम नमोजी आद्या (=Primitive), जय जय स्वसंवेद्या’ (=Self evident) असे संबोधलेले आहे. पण अशा प्रकारे धर्म आणि विज्ञान दोन्हींचा प्रवास एकाच बिंदूपासून सुरू झाला तरी त्यांच्या वाटा लगेच बदलतात. आणि हे सारे स्वयंसिद्ध विधानाकडे पाहण्याच्या दोघांच्या दृष्टिकोनांतील फरकामुळे घडते. विज्ञानाने जी स्तिमित करणारी प्रगती केली आहे, त्याचे रहस्य विज्ञानाच्या गृहितक वापरण्याच्या पद्धतीत आहे. जे गृहितक भूतकाळात घडलेल्या घटनांचे जास्तीत जास्त स्पष्टीकरण देते आणि भविष्यात घडणाऱ्या घटनांचे जास्तीत जास्त अचूक अंदाज वर्तवते, ते गृहितक ग्राह्य मानले जाते. अर्थात तरीही एकच एक गृहितक सर्वच तज्ज्ञ ग्राह्य मानतील, असेही नसते. तज्ज्ञांत मतभेद असू शकतात. वैज्ञानिक तथाकथित स्वयंसिद्ध तत्त्व हे तात्पुरते गृहितक (working hypothesis) आहे, असे मानतो; प्रयोगशाळेत प्रयोग करताना किंवा प्रत्यक्षात निरीक्षण करताना त्यात जर चूक आढळली तर त्या गृहितकाचा त्याग करतो- तफावत (error) आढळली तर त्यात जरूर त्या सुधारणा करतो. मग हे गृहितक सुचवणारी व्यक्ती कितीही मोठी असो. मला या क्षणी जे ज्ञान आहे त्याप्रमाणे हे सत्य आहे; नवी माहिती उपलब्ध झाल्यास माझे मत बदलू शकते, अशी शास्त्रज्ञाची भूमिका असते.

 धर्मही प्राथमिक संज्ञेपासून आणि ‘स्वयंसिद्ध- तत्त्वा’पासूनच सुरवात करतो. शब्दप्रामाण्य, आप्त-वाक्य, आतला आवाज, साक्षात्कार, अतीन्द्रिय ज्ञान इत्यादींचा प्रत्यक्षात अर्थ ‘स्वयंसिद्ध तत्त्व’ एवढाच असतो. पण, वैज्ञानिक जसे आपले गृहितक तात्पुरते मानतो आणि अनुभवाशी ते मेळ खात नसेल तर त्यात जरूर ते बदल करतो, तसे धार्मिक माणूस करत नाही. श्रद्धेच्या विपरीत घडले, तर धार्मिक मनुष्य आपली श्रद्धाच कमी पडली असे मानतो आणि देवाला दोष न देता, अधिक श्रद्धाळू होतो. किंबहुना, जे तर्काच्या विपरीत आहे त्यावर ते तर्कविपरीत आहे म्हणूनच विश्वास ठेवणे, हीच खऱ्या श्रद्धेची कसोटी आहे, असे टरटुलियन हा धर्मोपदेशक म्हणतो.

धार्मिक माणसे आपल्या गृहितकांना त्रिकालाबाधित सत्य समजतात आणि आपल्यापेक्षा वेगळी गृहितके निवडणाऱ्यांना पाखंडी! पाखंडीपणा (blasphemy) कठोर शिक्षेस पात्र असतो. प्रचलित धर्म खरा नाही असे मानले, यासाठी येशूला सुळावर चढवले जाते; न्यूटनचे म्हणणे खरे नाही, असे म्हटल्याने आइन्स्टाइनला शिक्षा होत नाही.

वैज्ञानिक आणि धार्मिक यांच्या स्वयंसिद्ध-तत्त्वाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनांतील या फरकामुळे विज्ञान सत्याच्या अधिकाधिक जवळ जात राहिले. धर्म अपरिवर्तनीय म्हणजेच, शेकडो वर्षांपूर्वी जेथे होता तेथेच राहिला. पण जसजशी विज्ञानाची उत्तरे धर्माच्या उत्तरापेक्षा अधिक समर्पक ठरू लागली, तसतसा धर्माचा प्रभाव कमी होत गेला आणि विज्ञानाचा वाढला. आज राहू-केतूमुळे ग्रहणे  होतात असे मानणाऱ्यांचे किंवा मुलाचा कॉलरा बरा व्हावा म्हणून डॉक्टरकडे न जाता मरीआईची प्रार्थना करणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे.

शिक्षणाच्या प्रसारामुळे भविष्यकाळात या क्षेत्रातून धर्माचे समूळ उच्चाटन होईल, यात शंका घ्यायचे कारण नाही. पण माणसापुढे अन्य दोन प्रकारचे प्रश्न असतात, ज्यांची उत्तरे विज्ञानाकडे नाहीत. एक- विशिष्ट परिस्थितीत कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय, हा. दुसरा- मला माझ्या कामात यश कसे मिळेल, हा. यांपैकी पहिला प्रश्न एका मर्यादेपर्यंत एकीकडे नीतीशी जुळला आहे, दुसरीकडे व्यक्तीच्या वैचारिक जडण-घडणीशी. नीतीच्या संदर्भात विज्ञान उदासीन असते, आणि वैचारिक जडण-घडण ही व्यक्तिगत बाब असते. भारतीय युद्धापूर्वी अर्जुनाला पडलेला प्रश्न या कोटीतला होता.

अर्जुनाचा विरोध हिंसेला नव्हता. खांडववन नष्ट करताना त्याला कोणताही नैतिक प्रश्न पडल्याचे दिसत नाही. युद्धाच्या भयानक परिणामांच्या अर्जुनाने केलेल्या वर्णनाकडे श्रीकृष्णाने गीतेत पूर्ण दुर्लक्ष केले आहे. कारण कृष्णाच्या मते, अर्जुन युद्ध टाळण्यासाठी सबबी सांगत होता. अर्जुनाने अनेक युद्धे केली होती, त्या वेळी त्याला हे प्रश्न पडले नव्हते. आत्ताच का पडले? कारण आता युद्ध जिंकण्यासाठी ज्या लोकांना मारायला हवे होते, ते सारे त्याचे आप्त होते. त्यांतले कित्येक त्याला पूज्य होते आणि युद्धात त्याच्या बाजूने जे मरायला तयार होते, ते त्याला प्रिय होते. अर्जुनाची खरी समस्या होती : आपल्यावरील अन्यायाचे तर निवारण झाले पाहिजे (तसे त्याने द्रौपदीला आश्वासन दिले होते), पण त्यासाठी आप्तवधाचे पातक माथी घेणे नको होते; प्रिय जनांचा मृत्यू पाहणे नको होते. हे कसे जमवायचे?

हस्तिनापूरच्या राजपुत्राला ज्या प्रकारचा प्रश्न पडला होता, त्याच प्रकारचा प्रश्न डेन्मार्कच्या राजपुत्रालाही पडला होता : हे योग्य की ते योग्य? एक युद्धात विजयी झाला, दुसऱ्याने आत्महत्या केली. असे प्रश्न ज्याची सदसद्‌विवेकबुद्धी जागी असते, त्यांनाच पडतात. भारतीय युद्धामध्ये अनेकांना आपल्या आप्त-स्वकीयांना मारावे लागणार होते, पण अर्जुनाला पडलेला प्रश्न त्यांना पडल्याचे दिसत नाही. जेव्हा जमदग्नीने आपल्या मुलांना आईची- रेणुकेची- हत्या करण्यास सांगितले, तेव्हाही हॅम्लेटप्रमाणे मातृद्रोह की पितृद्रोह हा प्रश्न होताच. पण जमदग्नीच्या मुलांचा निर्णय ठाम होता; परशुराम पित्याच्या बाजूला होता, त्याचे भाऊ मातेच्या बाजूने. मात्र हॅम्लेट किंकर्तव्यमूढ होता. ही स्थिती माणसाला विनाशाकडे घेऊन जाते : संशयात्मा विनश्यति। हॅम्लेटचे तेच झाले. श्रीकृष्णामुळे अर्जुन वाचला.

जेव्हा कर्तव्य आणि अकर्तव्य, न्याय्य आणि अन्याय्य, योग्य आणि अयोग्य, चांगले आणि वाईट यांच्या सीमारेषा पुसट झाल्याचे वाटते; तेव्हा माणूस निर्णय घेण्याचे टाळू पाहतो. पण ती स्थिती माणसाला आत्मघाताकडे घेऊन जाते. अशीच परिस्थिती अंगीकृत कार्यात सफलता मिळेल की नाही, यासंबंधी विचार करायला सुरवात केली की होते. गीतेच्या म्हणण्यानुसार, यशापयश पाच घटकांवर अवलंबून असते : अधिष्ठान, कर्ता, उपलब्ध साधने, उपसलेले कष्ट आणि शेवटी नशीब (गीता 18.14). काही घटक माणसाच्या नियंत्रणाबाहेर असतात, ते नशिबात मोडतात. त्यामुळे सफलतेची आपल्याला 80 टक्क्यांपेक्षा अधिक खात्री कधीच असत नाही पण आपल्याला तर 100 टक्के खात्री हवी असते. कित्येकदा माणसाला काही ज्ञात कारण नसता अनामिक हुरहूर वाटते.

वरील परिस्थितीत माणसाचे मानसिक संतुलन ढळू लागते. ते ढळू न देण्याचे काम धर्म करू शकतो. त्या दृष्टीनेही धर्माला अफूची गोळी म्हणण्याचा मोह होऊ शकतो. (अर्थात, मार्क्स वेगळ्या अर्थाने म्हणतो.) पण, अधिक विचार करता श्रीकृष्णाला (किंवा महाभारतकाराला) वेगळे काही म्हणायचे असावे. हा केवळ मानसोपचार नाही. योग्य निर्णय स्थिर-बुद्धीच घेऊ शकते. कठीण परिस्थितीत बुद्धी ढळू न देण्याला धर्म मदत करतो. मन अस्थिर करणारी परिस्थिती असताना प्रज्ञा स्थिर कशी ठेवायची? यावर गीतेत सांगितलेला प्रथमोपचार आहे ‘कृष्णार्पणता’. माणूस मुख्यत्वे घाबरतो जबाबदारी घ्यायला. जेव्हा जबादारी दुसऱ्यावर असते, तेव्हा रुखरुख बरीच कमी होते. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो : तू जे- जे करतोस, भोगतोस, त्यागतोस, दान देतोस, ज्याच्यासाठी आटापिटा करतोस; ते सर्व मला अर्पण कर. (गीता 9.27) त्यामुळे चांगल्या-वाईटाची जबाबदारी तुझ्यावर राहणार नाही (गीता 9.28). अन्य धर्मांची भूमिका प्रथमदर्शनी तरी याहून वेगळी वाटत नाही. इस्लाम (सलम = शरण जाणे) अल्लाला शरण जायला सांगतो. बुद्धाचे तीन शरण सर्वज्ञात आहेत.

ही भूमिका आणि दैववाद यात फरक आहे. येथे नशिबात असेल तसे होईल, अशी भावना नाही. येथे देवावर यश देण्याची जबाबदारीही टाकलेली नाही; शुभाशुभाची, पाप-  पुण्याची जबाबदारी टाकली आहे. श्रद्धा (परमेश्वराचे गृहितक) नेमके हेच काम करते. काम स्वत:लाच करायचे असते. अगोदर उल्लेखिलेल्या क्षेत्रात विज्ञानाची गृहितके परमेश्वराच्या गृहितकापेक्षा अधिक स्वीकारार्ह ठरतात. या क्षेत्रात मात्र ईश्वराला प्रतिस्पर्धी गृहितक अस्तित्वातच नसते, त्यामुळे परमेश्वरावर भार टाकून माणूस काम करत राहतो. पण कामाचे फल देवावर सोपवणे, याचा अर्थ फलाच्या आशेत गुंतून न पडणे.

गीता एके ठिकाणी म्हणते की, निसर्गनियमाप्रमाणे गोष्टी घडत असतात. (गीता 3.27) त्यामुळे प्रयत्न करत राहणे एवढेच माणसाच्या हातात राहते. कर्मावर तुमचा अधिकार आहे, पण फलावर नाही. कर्म केल्यावर काही तरी फल हे मिळणारच. पण ते नेमकी तुम्ही अपेक्षा कराल तसेच असेल, असे नाही. कारण फल हे पाच गोष्टींवर अवलंबून असते आणि त्यात दैव हीही एक गोष्ट आहे. त्यामुळे अमुक कामाचे मला अमुक फल मिळाले पाहिजे, असे अधिकारपूर्वक सांगू शकत नाही. आणि याचा अर्थ ज्याला कळला, तो कर्मबंधनातून (कर्मातून नव्हे) मुक्त होतो. म्हणजे देवावर भार टाकण्याचा (भक्तियोगाचा) व्यवहारात अर्थ फलाशेचा त्याग (कर्मयोग) असाच होतो. आणि याची परिणती यथाकाल ज्ञानयोगात होते.

उपनिषदावर भाष्य करताना सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात : The characteristic genius of the Indian mind is not to shake the beliefs of the common man but to lead them by stages to the understanding of the deeper philosophical meaning behind their beliefs. भारतीय मनाच्या या वैशिष्ट्यामुळेच ‘धम्मं सरणं गच्छमि।’ म्हणणारे तथागत बुद्ध ‘अत्त दीपो भव।’ -स्वत:च स्वत:चा दिवा होस्वत: च स्वत:चा मार्गदर्शक हो, असाच शेवटी भिक्खू आनंदाला उपदेश करतात. आणि ‘भज गोविंदम्‌ भज गोपालम्‌।’ असा उपदेश करणारे आचार्य ‘परापूजे’त सांगतात :

संचार: पदयो: प्रदक्षणविधि: स्तोत्राणि सर्वा गिरा

यद्‌ यद्‌ कर्म करोमि तत्‌ तत्‌ अखिलं शंभो तवाराधनम्‌।

परापूजेतील काव्यशैली ही अत्यंत मोहक आहे. ते एक उत्कृष्ट ‘साँनेट’ आहे. शेक्सपिअरच्याही अगोदर आठशे वर्षे लिहिलेले! ते दहा श्लोकांचे आहे. आचार्य पहिल्या नऊ श्लोकांत विचारतात : मी चिदानंदस्वरूप झाल्यावर पूजेचा विधी कोणता? मीच परमेश्वररूप झाल्यावर पूजा कुणी कुणाची करायची? शिवाय जो निर्मल आहे, त्याला स्नान काय घालायचे? जो सर्वांचा आधार, त्याला आसन कसे देणार? पहिल्या नऊ श्लोकांत अशाच प्रकारचे प्रश्न आहेत आणि दहाव्या श्लोकात (जो वर उद्‌धृत केला आहे) ते या सर्व प्रश्नांचे उत्तर देतात : मी चालत असतो तेव्हा, हे शंभो, तुला प्रदक्षिणाच घालत असतो. जेव्हा बोलत असतो, तेव्हा तुझे स्तोत्रच गात असतो. मी जे-जे करतो, ती तुझी आराधनाच असते.

‘धर्ममार्तंड’ जनतेस ‘धम्मं सरणं गच्छमि।’ सांगतात, ‘भज गोविंदमं भज गोपालम्‌।’ सांगतात. कदाचित, ते अधिक सोपे आहे म्हणून असेल. कदाचित, त्यामध्ये त्यांचा स्वार्थही दडला असेल. पण आमच्या समाजहितैषी विचारवंतांनी ‘अत्त दीपो भव।’चा अर्थ लोकांना समजावून देणे आवश्यक आहे; ‘यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम्‌।’ हे समजावून सांगणे जरूर आहे. गुलजार यांच्याप्रमाणे सिनेव्यवसायात नाव कमावलेले श्रीराम लागू यांनी ‘देवाला रिटायर केले पाहिजे’ अशी मागणी केली आहे. बुद्धांनी आनंदाला केलेला उपदेश किंवा आदिशंकराचार्यांनी सांगितलेली परापूजा म्हणजे देवाला गोल्डन शेक-हॅन्ड देऊन व्हॉलंटरी रिटायरमेंट घेण्यास सांगणेच आहे.

‘ईश्वर आहे’ ह्या गृहितकापासून सुरवात करून आपण येथपर्यंत आलो. ‘ईश्वर अस्तित्वात नाही’ किंवा ‘ईश्वर आहे की नाही, हे सांगता येत नाही’ यांपैकी एक गृहितक मानूनही सुसंगत सैद्धांतिक रचना करणे शक्य आहे. नैतिक जीवन जगण्यासाठी परमेश्वराच्या गृहितकाची आवश्यकता नाही. असे जीवन कदाचित अधिक नीतिमानही असेल, कारण ते नरकाच्या भीतीवर वा स्वर्गाच्या प्रलोभनावर अवलंबून नाही. उरला प्रश्न कठीण प्रसंगी मन:शांती टिकविण्याचा. ती छंद जोपासून, गरजूंना मदत करून, लोकसंग्रह करून किंवा पर्यटनातूनही मिळवता येईल. जसजसे मेंदूसंबंधीचे ज्ञान आणि वैद्यकीय शास्त्र प्रगत होईल, तसतसा आध्यात्मिक आनंद आणि मन:शांती औषधाद्वारेही मिळवता येईल. त्या दिशेने वाटचाल सुरू झालीच आहे. त्या वेळी प्रत्येक माणसासमोर पर्याय असेल- आध्यात्मिक आनंद हरिभजनातून मिळवायचा की औषधी गोळीतून! अर्थात, या औषधाची मात्र ‘एक्सपायरी डेट’ आवर्जून पाहावी लागेल.

Tags: विज्ञान ईश्वर समाज धर्म हरिहर कुंभोजकर धर्म आणि विज्ञान मर्मभेद Science God society Riligion Harihar Kumbhojkar Dharm Aani Vidnyan Marmbhed weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Milind KHANDERAO Shikalwad- 15 Mar 2021

    अतिशय छान माहिती.

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके