डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आज भारत संक्रमणाच्या स्थितीत आहे. अर्थात आजही काही मंडळी गांधीजींच्या प्रभावाखाली स्वयंपूर्ण ग्रामराज्याची मागणी करतात. काही नेहरूजींच्या प्रेमामुळे  शासनाच्या मालकीचे मोठे औद्योगिक प्रकल्प आणि त्यासाठी शासनाचा आर्थिक क्षेत्रात वाढता हस्तक्षेप स्वीकारून समाजवादाकडे ओढले जातात. कधी आंधळ्या राष्ट्रवाद्यांना सांभाळून घेण्यासाठी राजकारण्यांना स्वदेशीचा  पुकारा करावा लागतो. कधी आंतराष्ट्रीय दबावाखाली आपण ग्लोबलायझेशन स्वीकारतो, तर कधी निवडून येण्यासाठी खैरात वाटतो. या सगळ्या प्रकारात अर्थशास्त्र हे शास्त्र आहे, विसरून जातो. कोणत्याही शास्त्राचे काही नियम असतात. अर्थशास्त्र हे भौतिकशास्त्राइतके परिपूर्ण नाही, हे खरे आहे. तरीही त्याचे नियम पाळले नाहीत, तर त्याची किंमत द्यावीच लागते आणि मग साऱ्या देशाला गंभीर परिणामाला सामोरे जावे लागते.

‘सुईच्या नेढ्यातून उंट जाईल, पण स्वर्गाच्या दारातून धनवान जाऊ शकणार नाही’, असे बायबल सांगते. ‘पैसे मिळवणे पाप आहे‘ असा उपदेश धर्माचार्य करतात, तर  ‘सगळे पैसेवाले चोर आहेत,’ असे धर्माला अफू मानणारे सांगतात. त्यातच माणसाची राहणी साधी व विचारसरणी उच्च असावी, ऋण काढून सण साजरा करू नये, अंथरूण बघून पाय पसरावेत, लुळ्या-पांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरिबी बरी- असल्या उपदेशावर महाराष्ट्रातील मध्यमवर्गपोसलेला. त्यामुळे ‘स्वार्थातून सर्वार्थाकडे’ हे पुस्तक एखाद्या स्वामीजींचा निवृत्तिपर आध्यमिक प्रवचनांचा संग्रह असावा, असे सकृत्‌दर्शनी वाटण्याची शक्यता आहे. या पुस्तकाचा परमार्थाशी अर्था-अर्थी काहीही संबंध नाही,  त्याचा संबंध अर्थाशी म्हणजे पैशांशी आहे. हे पुस्तक वाचल्यावर वरील मध्यमवर्गीय विचार वास्तवापासून किती दूर आहेत, हेच कळून येईल. चार्ल्स व्हीलनच्या ‘नेकेड इकॉनॉमिक्स’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे. लेखक अमेरिकेतील नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठात अध्यापन करतात आणि लंडनच्या ‘इकॉनॉमिस्ट’साठी लेख लिहीत असतात. अशा प्रकारे लेखक-पत्रकार व प्राध्यापक दोन्ही असल्याने पुस्तक माहितीपूर्ण आणि सुबोध झाले आहे. मूळ पुस्तक 2002 मध्ये प्रसिद्ध झाले. या  पुस्तकाची, आत्तापर्यंत जगातल्या बावीस भाषांमध्ये भाषांतरे झाली होती. नुकतेच डॉ.अजय ब्रह्मनाळकरांनी मराठीत तेविसाव्या भाषेत भाषांतर केले. या पुस्तकातले अर्थशास्त्र ‘नेकेड’ म्हणजे उघडे-नागडे  का? तर, ‘हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम्‌।’ भौतिक सत्याचे मुख सत्तेचे ठेकेदार सुवर्णपात्राने झाकून टाकतात. हे सुवर्णपात्र कधी अध्यात्माचे असते, तर कधी कुठल्या ‘इझम’ असते आणि कधी कधी तर चक्क मानवतेचे नाव सांगत येते. हे सोन्याचे झाकण फेकून देऊन अर्थशास्त्रीय सत्याचे उघडे-नागडे रूप लोकांच्या समोर मांडण्याचे काम लेखक करतो. अर्थशास्त्राच्या पुस्तकातील दोन ओळींमध्ये दडलेली, सामान्य वाचकाला सहज वाचता न येणारी अदृश्य ओळ या पुस्तकात अतिशय सोप्या भाषेत वाचून दाखवण्याचे काम केले आहे. अर्थकारण आणि राजकारण यांचा जवळचा संबंध आहे. जी.ए. कुलकर्ण्यांच्या कथेतील ‘विदूषक’ एके ठिकाणी म्हणतो, ‘राजकारण आणि महाभारत यामध्ये एक अत्यंत लक्षणीय अंतर आहे... राजकारणात धर्मराज वस्त्रहरण करून सत्य स्वरूप दाखवण्याचा प्रयत्न करतात, तर सत्ताधारी दु:शासन भरजरी वस्त्रे टाकून डोळे दिपवीत स्वतःची लाज राखतात.’ चार्ल्स व्हीलन येथे धर्मराजाची भूमिका बजावतात.

ऐंशीच्या दशकाच्या अंतापर्यंत आपण समाजवाद, लोककल्याणकारी राज्य इत्यादी शब्दांच्या ‘भरजरी वस्त्रा’च्या आवरणाखाली केवळ भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आणि दारिद्य्रच जोपासत राहिलो. हा अपघात नव्हता. आमचे सुरुवातीचे शीर्षस्थ नेते शुद्ध चारित्र्याचे होते, त्यागी होते, प्रामाणिक होते. पण माणसाच्या स्खलनशीलतेचा विचार त्यांनी पुरेसा केला नव्हता. परिणामी, रोजचा खर्च भागवण्यासाठी सोने गहाण ठेवण्याची वेळ देशावर आली होती. नव्वदीच्या दशकात आंतरराष्ट्रीय दबावाखाली आम्हाला समाजवादाचा बुरखा फेकून देऊन वास्तवाला सामोरे जावे लागले. ते आवरण दूर करण्यामागची अर्थशास्त्रीय भूमिका काय होती, सोव्हिएत युनियनचे विघटन का झाले, चीनने माओला दुरूनच नमस्कार का केला.-या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल  हे पुस्तक वाचल्याने होते. या पुस्तकातले अर्थशास्त्र आणखीही एका अर्थाने नग्न आहे. अर्थशास्त्रीय सिद्धांत खूपदा तक्ते, आकृत्या, आलेख, कोष्टके, समीकरणे इत्यादींनी झाकलेले असतात. सिद्धांत नेमक्या शब्दांत सांगण्यासाठी तसे करणे आवश्यक असते. पण हाच नेमकेपणा बऱ्याच वेळा, सामान्य वाचकाच्या बाबतीत विचार समजण्याच्या आड येतो. म्हणून ही आवरणे काढून टाकून, या पुस्तकात, सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत आजूबाजूला रोज घडणाऱ्या गोष्टींचे विश्लेषण केले आहे. डॉ.ब्रह्मनाळकर धन्वंतरी आहेत, अर्थशास्त्रातले डॉक्टरेट नाहीत, तरीही ते या पुस्तकाच्या प्रेमात पडले आणि त्यांना त्याचे भाषांतर करावेसे वाटले, हा या पुस्तकाच्या सुबोधतेचा पुरावा.

पुस्तकाच्या चारशे पानांत विकासाचे अर्थशास्त्र, व्यापार आणि जागतिकीकरण, आंतरराष्ट्रीय अर्थकारण, रिझर्व्ह बँक, आर्थिक प्रगतीचे निकष, संघटित सौदाशक्ती, मानवी भांडवल, माहितीचे अर्थशास्त्र, शासन आणि अर्थव्यवस्थेचे नाते, इत्यादी आपल्या रोजच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या पण आपण अनभिज्ञ असलेल्या अर्थशास्त्राच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी तेरा प्रकरणे आहेत. पुस्तकाच्या सुरुवातीला अनुवादकाचे मनोगत आणि मूळ लेखकाची प्रस्तावना आहे. दोन्हीही स्वतंत्र लेख म्हणून वाचनीय आहेत. प्रकरणाच्या सुरुवातीला उणीपुरी पानभर होईल अशी अनुवादकाची प्रस्तावना पुस्तकाचे वैशिष्ट्य ठरावे. त्यामुळे जिज्ञासू पण काहीशा अनभिज्ञ वाचकांना विषय समजणे सोपे होते. शिवाय या प्रस्तावनेमुळे मराठी वाचक अमेरिकन लेखकाशी जोडला जातो.

सर्वसामान्यांच्या समजुतींना धक्का देणारे अनेक किस्से या पुस्तकात विखुरले आहेत. लेखक अमेरिकन असल्याने व त्यांच्यापुढील अपेक्षित वाचकवर्ग जागतिक असल्याने पुस्तकात भारतीय संदर्भ असलेली उदाहरणे फार कमी आहेत. पण, अशा निवडक किश्श्यांपैकी एक किस्सा- भारत 1991 मध्ये दिवाळखोरीच्या कड्यापर्यंत का येऊन ठेपला याची झलक दाखवतो. जेव्हा समाजवादाचा डंका जगभर  ऐकू येत होता आणि अल्पकाळ चाललेल्या जनता पक्षाचा पराभव करून इंदिरा गांधी पुन्हा भारताच्या पंतप्रधान झाल्या होत्या, त्या काळातली गोष्ट. हिंदुस्थान फर्टिलायझर कॉर्पोरेशनचा कारखाना पश्चिम बंगालमध्ये 1980 मध्ये सुरू(?) झाला. बाराशे कामगार खत निर्माण करण्यासाठी रोज कामावर येत होते. एक किरकोळ गडबड झाली होती. खताचे स्थिर रसायन तयार होत नव्हते. त्यामुळे खताचा एक दाणाही तयार होत नव्हता. पण कामगारांचे पगार वेळेवर होत. विशिष्ट काळानंतर कामगारांना बढत्याही मिळत होत्या, बोनसही मिळे, तो त्यांचा अधिकारच होता. एक दिवसही उत्पादन न करता, बाराशे कर्मचारी असलेला हा खत कारखाना एक-दोन नव्हे, तब्बल बारा वर्षे चालू  होता. कारण फॅक्टरी ॲक्टप्रमाणे कारखाने बंद करता येत नव्हते.

याउलट अमेरिकेतील उदाहरण. तिथे बर्गर किंगच्या प्रवेशद्वारात तुम्हाला पाटी दिसेल- तुम्हाला रोख-पावती मिळाली का? नसल्यास तुमचे आजचे जेवण फुकट. पैसे परत घेण्यासाठी मॅनेजरला भेटा. भारतीयांना आश्चर्य वाटण्यासारखीच ही सूचना आहे. मालकाने काही अन्नछत्र उघडले नव्हते. पण एकदा त्याच्या लक्षात आले की, काही कर्मचारी गिऱ्हाइकांना जेवण देतात आणि पावती न देता परस्पर  पैसे आपल्या खिशात टाकतात. मालकाचे तसेही नुकसान होणारच असते. पण आता जेवण फुकट मिळते यासाठी गिऱ्हाईक मॅनेजरकडे येते आणि चोर सापडतो.

आज भारत संक्रमणाच्या स्थितीत आहे. अर्थात आजही काही मंडळी गांधीजींच्या प्रभावाखाली स्वयंपूर्ण ग्रामराज्याची मागणी करतात. काही नेहरूजींच्या प्रेमामुळे  शासनाच्या मालकीचे मोठे औद्योगिक प्रकल्प आणि त्यासाठी शासनाचा आर्थिक क्षेत्रात वाढता हस्तक्षेप स्वीकारून समाजवादाकडे ओढले जातात. कधी आंधळ्या राष्ट्रवाद्यांना सांभाळून घेण्यासाठी राजकारण्यांना स्वदेशीचा  पुकारा करावा लागतो. कधी आंतराष्ट्रीय दबावाखाली आपण ग्लोबलायझेशन स्वीकारतो, तर कधी निवडून येण्यासाठी खैरात वाटतो. या सगळ्या प्रकारात अर्थशास्त्र हे शास्त्र आहे, विसरून जातो. कोणत्याही शास्त्राचे काही नियम असतात. अर्थशास्त्र हे भौतिकशास्त्राइतके परिपूर्ण नाही, हे खरे आहे. तरीही त्याचे नियम पाळले नाहीत, तर त्याची किंमत द्यावीच लागते आणि मग साऱ्या देशाला गंभीर परिणामाला सामोरे जावे लागते. सामान्य माणसाला हे ठाऊक नसते किंवा क्षणिक फायद्यासाठी दूरगामी फायद्याकडे तो दुर्लक्ष करतो. मग देशासाठी तोट्याचे ठरणारे आर्थिक धोरण निवडणुकीच्या राजकारणात लाभदायक दिसू लागते. त्याचा गैरफायदा लबाड राजकारणी उठवतात. त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम साऱ्यांनाच भोगावे लागतात. प्रस्तुत पुस्तक वाचकाला अर्थसाक्षर करते आणि सुजाण नागरिकांना अशा दुष्परिणामांपासून सावध करते. निकोप लोकशाहीसाठी अशा पुस्तकांची नितांत गरज आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या भाषांतरासाठी डॉ.ब्रह्मनाळकर अभिनंदनास पात्र आहेत.

हरिहर कुंभोजकर, कोल्हापूर

hvk_maths@yahoo.co.in

स्वार्थातून सर्वार्थाकडे

‘नेकेड इकॉनॉमिक्स’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचा अनुवाद

चार्ल्स व्हीलन

अनुवाद :  डॉ. अजय ब्रह्मनाळकर

राजहंस प्रकाशन, पुणे

पृष्ठे 400, किंमत : 400 रुपये

Tags: राजहंस प्रकाशन डॉ. अजय ब्रह्मनाळकर चार्ल्स व्हीलन नेकेड इकॉनॉमिक्स स्वार्थातून सर्वार्थाकडे rajhans prakashan ajay bhrahmanalkar naked economics swarthkadun swarthakade weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके