डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘...हिंदोस्ता हमारा’ : मी हे गीत पुन्हा कधीच म्हणू शकणार नाही!

त्या निराश्रितांच्या छावण्यांतून फिरत असताना या अंधःकाराने ग्रासलेल्या काळात गांधीजी असते, तर त्यांनी काय केले असते, हा विचार मनात येतो. कलकत्त्यात झालेल्या दंगलीत गांधीजींनी शांतता प्रस्थापनेसाठी केलेला उपास आठवतो. त्यावेळी, स्वतःचा मुलगा मुस्लिम जमावाकडून मारला गेल्यामुळे दुःखसंतप्त झालेल्या एका हिंदू माणसाला गांधीजी म्हणाले होते, "जर तुला तुझ्या मनातील वेदना शमवायची असेल तर तुझ्या मुलाएवढ्या वयाच्या ज्याचे आईबाप दंगलीत हिंदू जमावाकडून मारले गेले आहेत अशा मुस्लिम मुलाला सांभाळायला घे; पण त्याच्या मुस्लिम श्रद्धांप्रमाणेच त्याला वाढव. कदाचित त्यामुळे तुझे दुःख, तुझा राग आणि सूडभावना शांत होण्यास मदत होईल."

अहमदाबादहून फिरताना आज दंगलग्रस्तांच्या 29 वसाहतींमधून ऐकू येतो तो शोक आणि आक्रोश. या निर्वासित छावण्यांमध्ये दाटीवाटीने जवळजवळ 53 हजार स्त्री- पुरुष आणि मुले वसविण्यात म्हणजे कोंबण्यात आलेली आहेत. काहींच्या हातांत घट्ट धरलेली बोचकी आहेत, त्यांच्यामध्ये त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आहेत; ज्या त्यांना निवारा केंद्राकडून देण्यात आल्या आहेत आणि तेवढीच त्यांची आजची मालमत्ता आहे. काहीजण दैनंदिन उपजीविकेसाठी इतस्ततः धडपडताना दिसत आहेत.

पण जरा या वसाहतीत कोठेही आपण टेकलो, तर हळूहळू लोक बोलू लागतात. त्यांच्या कहाण्या इतक्या भीषण आणि अमानवी आहेत की त्या कागदावर उतरवताना लेखणीलाही थरकाप सुटतो. सशस्त्र संघटित तरुणांच्या टोळक्यांनी अमानुषपणे स्त्रिया आणि लहान मुले यांची जी कत्तल केली आहे तिला आजवरच्या धार्मिक दंगलींच्या इतिहासात तोड नाही, असेच म्हणावे लागेल. उदाहरणे घ्यायचीच तर, 19 जणांचे कुटुंब, त्यांचे घर पाण्याने संपूर्ण भरून त्यात विजेचा प्रवाह सोडून मारले जाते! जहाजपुरा छावणीतील एक सहा वर्षांचा मुलगा त्याचे सहा भाऊ, बहिणी आणि आई यांना ठेचून कसे मारले गेले याची चक्षुर्वेसत्यम् हकीगत सांगतो. या सर्व संहारात तो जिवंत राहण्याचे कारण एवढेच की हा सर्व प्रकार पाहून तो बेशुद्ध पडला; आणि जाता जाता पाठीमागे वळून पाहताना त्या गुंडांना तो मेलाच आहे असे वाटले! अहमदाबादेतील दंगलींचा सर्वांत जास्त फटका बसलेली नरोडा-पारिया वसाहत. त्यातून निसटून आलेल्या कुटुंबाने सांगितलेल्या वृत्तांतानुसार केवळ तीन महिन्यांचे मूल घेऊन तेथून पळून जाणाऱ्या स्त्रीला सुरक्षिततेची जागा म्हणून पोलिसांनी जो रस्ता दाखविला त्याच रस्त्यावर तिला अडवून जमावाने तिच्यावर आणि तिच्या बाळावर रॉकेल ओतून त्यांना जाळून टाकले.

स्त्रियांवर विविध प्रकारचे अत्याचार हा सूडाचा एक मार्ग म्हणून या दंगलीत कधी नव्हे एवढा हिंस्रपणे वापरला गेला. तरुण स्त्रिया, प्रौढ महिला यांच्यामध्ये फरक न करता ठिकठिकाणी फिरणाऱ्या रानटी जमावांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांदेखत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केले. आणि नंतर त्या सर्वांना जाळून टाकून किंवा हातोड्यांनी ठेचून मारून टाकल्याच्या अनेक घटना या वस्त्यांतून फिरताना कानावर येतात.

अहमदाबादेत मला भेटलेले सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि या संहारातून वाचलेले नागरिक या सर्वांच्या मते गुजरातेत जे झाले ती दंगल नव्हतीच, तो समाजातील विशिष्ट वर्गावर योजनापूर्वक केलेला एक दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर त्या जमातीतील स्त्री-पुरुषांची भीषण कत्तल होती. प्रथम एखाद्या ट्रकवरून चिथावणाऱ्या घोषणा देत कार्यकर्ते येत. त्यांच्यामागून शिव्यागाळी करत, आग ओकणाऱ्या तरुणांचे जमाव अनेक ट्रक भरून येत. त्यांच्याकडे त्रिशूळ, तरवारी, कटारी आदी गावठी शस्त्रांपासून ते अद्ययावत स्फोटकांपर्यंत सर्व प्रकारची शस्त्रास्त्रे असत. त्यांचे नेते मोबाईल फोनवरून आपल्या वरिष्ठांकडून सूचना घेत अगर घटनांची माहिती पुरवत असत. त्यांनी त्या वस्तीतील अल्पसंख्याकांच्या इमारती, त्यांचे व्यवसाय यांची तपशीलवार माहिती आधीच गोळा केलेली असे.

काही ट्रक्समध्ये भरलेली गॅस सिलिंडर्स असत. ते घेऊन येणारी वरील सर्व मंडळी श्रीमंत मुसलमानांची घरे, दुकाने व्यवस्थिपणे लुटून घेत. नंतर त्या इमारतींमध्ये सिलिंडरमधील गॅस बराच वेळ सोडून ठेवण्यात येई. त्यानंतर त्यांतला 'तज्ज्ञ' कार्यकर्ता गॅसच्या धुरामध्ये अशा प्रकारे पेटती काडी टाकी की क्षणार्धात आगीच्या ज्वाळा चोहोबाजूंनी इमारतींना वेढून टाकत. अशाच तऱ्हेने अनेक मशिदी व दर्गे उद्ध्वस्त करण्यात आले आणि त्या ठिकाणी हनुमानाच्या मूर्तीची आणि भगव्या झेंड्यांची स्थापना करण्यात आली, या सर्व संहाराच्या काळात पोलिसांना आलेले अपयश आणि, कायदा-सुव्यवस्थेकडे वरिष्ठ प्रशासकांनी व लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक केलेला कानाडोळा यांच्याही कथा आता सर्वांना माहीत झालेल्या आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेत वीस वर्षांपेक्षा अधिक काळ नोकरी करणाऱ्या मला येथे अहमदाबादेमध्ये नागरी आणि पोलीस प्रशासकांनी दाखविलेल्या कर्तव्यविन्मुखतेबद्दल, त्यांचा एक सहकारी म्हणून खरोखरच शरम वाटते. त्यांनी स्वतंत्रपणे, निर्भयपणे, निःपक्षपाती ठाम निर्णय घेऊन धैर्याने आणि अंतःकरणातील करुणा जागृत ठेवून कारवाई करणे, हेच कायद्याला अभिप्रेत होते. अहमदाबादेत एखाद्याही अधिकाऱ्याला जर ही जाणीव असती तर पोलिसांना हटवून त्याने किंवा तिने हिंसा थांबविण्यासाठी सैन्याला ताबडतोब पाचारण केले असते.

काही वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलिसांनी हिंसाचाराबद्दल दाखविलेल्या उदासीनतेमागे त्यांच्यामधील जातीयवादी प्रवृत्तींना दोष देऊन मोकळे झाले. पण प्रामाणिक आणि तळमळ असलेल्या वरिष्ठांच्या नेतृत्वाखाली हेच पोलीस दल नि:पक्षपाती आणि धैर्याने कार्यवाही करताना आढळून आले आहे.

या सर्व रानटी अत्याचारांच्या वेळी आणि विशिष्ट मानवी समूह प्रचंड दुःख आणि यातना सोसत असताना नागरीसंस्था, अशासकीय स्वयंसेवक संघटना, विकासकामे आयोजित करणारे स्वयंसेवक आणि गांधीवादी मंडळी हे सारे कुठे होते? गेल्या वर्षी कच्छ आणि अहमदाबाद येथे झालेल्या भूकंपात दिसलेला उत्स्फूर्त बंधुभाव आताच एकाएकी कुठे लुप्त झाला? वर्तमानपत्रांतून असे कळते की ज्यावेळी मुस्लिम जनतेची कत्तल ऐन भरात सर्वत्र चालली होती, तेव्हा साबरमती आश्रमाचे दरवाजे आतील मालमत्तेच्या रक्षणासाठी बंद करून घेतले गेले होते. आज दंगलीत बळी पडलेल्या मुस्लिम कुटुंबातील निर्वासितांना आधार आहे तो फक्त मुस्लिम संस्थांचा. जणू काही मुस्लिम नागरिकांना भोगाव्या लागलेल्या अपरंपार वेदना, हानी, विश्वासघात आणि अन्याय यांची चिंता फक्त अन्य मुस्लिमांनीच करावयाची आहे!

या सर्व वातावरणात गुजरातमध्ये फिरताना आशा आणि अभिमानाचे काही क्षणही अनुभवायला मिळाले, जेव्हा मी मुजिद अहमदसारखी माणसे आणि रोशन बहेनसारख्या स्त्रिया दंगलग्रस्तांच्या छावणीत भोवतालच्या उद्ध्वस्त वातावरणाच्या पार्श्वभूमीवर अथकपणे, निश्चयाने मानवतेची सेवा करताना पाहिल्या. अमन चौकातील छावणीत तेथील आपद्ग्रस्तांची मुले दूध किंवा अन्न घेतल्याशिवाय उपाशी झोपलेली नाहीत ना, किंवा त्यांच्या जखमांवर उपचार केले गेले आहेत ना, याची पाहणी करण्याकरता पहाटे 4 पासून मध्यरात्रीपर्यंत जे तरुण स्वयंसेवक राबत होते त्यांना तेथील स्त्रिया दुवा देत होत्या. त्या तरुणांचा नेता मुजिद अहमद हा पदवीधर आहे; त्याची रंगांची रासायनिक फॅक्टरी जाळून टाकण्यात आली आहे. पण त्याला स्वतःचे जे नुकसान झाले आहे त्याच्याबद्दल शोक करण्यासाठी सवड राहिलेली नाही. जे छावणीत आश्रित म्हणून राहिले आहेत, त्या पाच हजार लोकांना दर दिवशी 1600 कि.ग्रॅ. धान्याचा पुरवठा कसा करायचा हा त्याच्यापुढील आजचा यक्षप्रश्न आहे. तशीच रोशन बहेन, तिला दुःख करण्यासाठी किंवा संताप व्यक्त करण्यासाठी फुरसदच नाही. थोडीशी झोप ही पण तिच्यासाठी चैनच आहे. ती आणि तिच्या सहकारी स्वयंसेविका, ज्या बहुतेक साऱ्या कष्टकरी महिलाच आहेत, त्या आणि त्यांच्याबरोबर जवळच्या झोपडपट्टीतील काही पुरुष मंडळी छावणीमधील निर्वासितांसाठी तात्पुरती स्वच्छतागृहे आणि अन्नपुरवठा कसा करता येईल याच कामांसाठी आपला जास्तीत जास्त वेळ देत असतात. एका प्राथमिक शाळेच्या प्रांगणात दाटीवाटीने जमलेल्या निराश्रितांना दिलासा देण्याचा त्यांचा प्रयत्न चालू असतो.

त्या निराश्रितांच्या छावण्यांतून फिरत असताना या अंधःकाराने ग्रासलेल्या काळात गांधीजी असते, तर त्यांनी काय केले असते, हा विचार मनात येतो. कलकत्त्यात झालेल्या दंगलीत गांधीजींनी शांतता प्रस्थापनेसाठी केलेला उपास आठवतो. त्यावेळी, स्वतःचा मुलगा मुस्लिम जमावाकडून मारला गेल्यामुळे दुःखसंतप्त झालेल्या एका हिंदू माणसाला गांधीजी म्हणाले होते, "जर तुला तुझ्या मनातील वेदना शमवायची असेल तर तुझ्या मुलाएवढ्या वयाच्या ज्याचे आईबाप दंगलीत हिंदू जमावाकडून मारले गेले आहेत अशा मुस्लिम मुलाला सांभाळायला घे; पण त्याच्या मुस्लिम श्रद्धांप्रमाणेच त्याला वाढव. कदाचित त्यामुळे तुझे दुःख, तुझा राग आणि सूडभावना शांत होण्यास मदत होईल."

आज गांधीजी उरले नाहीत; आणि त्यांच्यासारखे विवेकी आवाजही ऐकू येत नाहीत. आमच्या स्वतःच्याच हृदयात त्या आवाजाचे पडसाद शोधावे लागतील. न्याय, प्रेम आणि सहिष्णुता यांच्यावर पुरेसा विश्वास ठेवणे आता अपरिहार्य आहे.

गुजरातमधील खुनी जमावाने माझ्याजवळचे खूप काही हिरावून घेतले आहे. त्यात एक गीत आहे जे मी अभिमानाने आणि अंतःप्रेरणेने गात असे. 'सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ता हमारा' हे गीत. यापुढे मला हे गीत गाता येईल असे वाटत नाही.

[सदर लेखक भारतीय प्रशासन सेवेतीत एक अधिकारी असून त्यांना ‘अ‍ॅक्शन एड इंडिया’ प्रकल्पावर नियुक्त केलेले आहे.]

(‘टाइम्स ऑफ इंडिया’ च्या सौजन्याने)

अनुवाद : चित्रांगदा

Tags: चित्रांगदा अनुवाद टाइम्स ऑफ इंडिया महात्मा गांधी अहमदाबाद दंगल हर्ष मंदेर Translation- Chitrangada Times of India Mahatma Gandhi Ahamadabad riots Harsh Mander weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

हर्ष मंदर,  नवी दिल्ली

सामाजिक प्रश्नांवर सातत्याने महत्त्वपूर्ण लेखन करणारे हर्ष मंदर सामाजिक कार्यकतेही आहेत. बेघर व्यक्ती आणि मुलांसाठी ते 'उम्मीद अमन घर' ही संस्था चालवतात. दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत काम पाहिले आहे.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके