डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पार्श्वभूमी 

या पाच जणींनी दिलेला लढा महत्त्वाचा आहे. सर्वसामान्य स्त्रिया उभ्या राहू शकतात, लढू शकतात आणि जिंकूही शकतात- या सगळ्या खऱ्या-खुऱ्या शक्यतांचा वेध घेणं आणि ते लिहिणं हेच तर माझं काम. त्या प्रवासातून जे हाती लागलं, ते तुमच्यासमोर ठेवत आहे. त्यांच्या संवादातून हाती जे-जे आलं आणि मला जे-जे उमजत गेलं, ते सारं इथं मांडत आहे. एका अर्थी ही त्या पाच जणींची कहाणी आहे. एकाअर्थी ती माझ्या जाणीव-नेणिवेची, माझ्या समजण्या-उमजण्याची गोष्ट आहे. पण यातून जर तुमच्या जाणिव-नेणिवांमध्ये काही अधिक-उणी भर पडली आणि स्वत:विषयीचा आदर, आत्मविश्वास दुणावला तर या लेखनाला अर्थ.

जमातवादी गटाने मुंबई येथे पाच हजारांहून अधिक प्रतिनिधींना घेऊन मुस्लिम सत्यशोधक मंडळांच्या तलाकबंदीच्या मागणीला विरोध केला. या वेळी निर्भिड दलवाईंनी आपल्या सहकाऱ्यांसह त्यांच्याच परिषदेत जाऊन त्याचा निषेध केला. दलवाईंच्या अंगावर जमाव धावून आला, परंतु त्यांनी निर्भयपणे आपला निषेध नोंदवला. पुढे याच जमातवादींनी एकत्र येऊन ‘मुस्लिम पसर्नल लॉ प्रोटेक्शन’ची समिती स्थापन केली आणि साधारण काही महिन्यांतच 1973 मध्ये त्यांनी याच समितीचे नाव ‘मुस्लिम पसर्नल लॉ बोर्ड’ असे रजिस्टर करून घेतले. आज आपण ‘ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड’ म्हणून या संघटनेला ओळखतो. थोडक्यात, मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कामाला विरोध करण्यासाठी ही संघटना जन्माला आली आणि आज ही संस्था स्वत:ला मुस्लिमांचे कैवारी, मुस्लिमांचे प्रतिनिधी समजू लागली. शायराबानो आणि इतर यांच्या केसमध्येही याच संस्थेने बरीच आढीवेढी भूमिका घेतली.

तत्कालीन राजीव गांधी सरकारने मुस्लिम महिलांच्या विरोधात निकाल दिल्याने तत्कालीन ऊर्जा राज्यमंत्री आरिफ मोहमंद खान यांनी राजीनामा दिला. तलाकच्या प्रश्नासाठी आपलं राजकीय करिअर, पदाचाही त्यांनी विचार केला नाही. त्यांनी दाखवलेली हिंमत खचितच एखादा नेता दाखवतो. मात्र शाहबानो यांनाही कायद्याने मिळालेल्या पोटगीचा आधार घेता आला नाही. त्यांच्यावर इतका दबाव आला की, इतकी वर्षं न्यायालयीन टक्कर दिल्यावर मिळालेला अधिकार त्यांनी सोडून दिला. न्यायालयाने रीतसर सोय केलेली असताना त्या विरोधात जात त्यांनी ‘मला मिळणाऱ्या पोटगीचा मी शपथपूर्वक त्याग करते आहे’ असे जाहीर केले. मुस्लिम समाजातील स्त्रिया कुठल्या भवतालातून जात होत्या आणि जात आहेत, याचा यावरून निश्चित अंदाज येऊ शकतो.

मुलांचं ब्रेन वॉश केल्याचं शायराबानो यांचं म्हणणं आहे, म्हणूनच ती त्यांना दाद देत नाहीत. पण कधी ना कधी त्यांना मम्मी कशी आहे, ते कळेलच. एक प्रश्न सुटला की, दुसरा आपोआप सुटेल. पण त्यांची खूप आठवण येते. भरून येतं. यादरम्यान मुलांनी-पतीने संपर्क करण्याचा कुठला प्रयत्न केला का, असं विचारल्यावर शायराबानो थंडपणे म्हणाल्या, ‘‘रिझवानने तो दुसरी शादी भी की है.. पता नहीं लोग ऐसे दो बच्चे के बाप को बेटी देते भी कैसे है? पर समाज अब भी ऐसे लोगो का साथ देता है तो बहुत बुरा लगता है. खैर... बच्चोंकी तो बहुतही याद आती है. सोचते है क्या कर रहें होंगे, कैसे होंगे? वह नयी औरत कैसे रखती होगी? माँ तो माँ होती है. दुसरी माँ तो दुसरी माँ होती है. बहुत दुख होता है. पर एक दिन बच्चे भी समझ लेंगे. फिर एक नया आशियाना होगा.’’   

तलाक झाल्यानंतर ‘ऑल इंडिया पसर्नल लॉ बोर्डा’कडे का आला नाहीत, अशीही आफरिनला अनेकदा विचारणा झाली. दबाव टाकण्यात आला. पण तिचं म्हणणं- भारतीय मुस्लिम महिलांनी समजून घेतलं पाहिजे, जे आपल्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी उलेमांकडे धाव घेतात. ती म्हणते, ‘‘मी भारतीय नागरिक आहे. संविधानाच्या चौकटीत राहताना जर माझ्या मूलभूत हक्कांवर गदा आली, तर मी त्यासाठी न्यायालयाकडेच धाव घेणार. आमच्या आयुष्याचा फैसला करणारी ही इतर मंडळी कोण आहेत? आणि त्यांना अधिकार कुणी दिलाय? आम्ही न्यायव्यवस्थेवर विश्वास टाकला आणि न्यायालयानेही तातडीने केस चालवून निकाल दिला. आम्ही किमान आवाज उठवला, यातच खूप समाधानही होतं. तिहेरी तलाक बॅन झाल्याने समाधानही आहेच.  

मला कुठं तरी असं वाटतंय की, नंतरच्या टप्प्यात गुलशनचे बंधू राजी झाले होते, मात्र गुलशनच झाल्या नाहीत. अरसदअली यांनी सांगितल्याप्रमाणे जर त्यांच्या लग्नाला पुन्हा एक संधी मिळणार असेल... त्यांच्या पतीला चुकीची जाणीव झाली असेल आणि त्यांचा संसार पुन्हा फुलणार असेल, तर ती खूपच चांगली बाब आहे. चुका प्रत्येकाकडूनच घडतात; परंतु झालेल्या चुकीची जाणीव होणं आणि ती सुधारण्याचा मार्ग स्वीकारणं, ही खरी माणुसकी. याच कारणासाठी गुलशन यांना पतीच्या चुकांची उजळणी करायची नसावी, असा अंदाज आहे. अर्थात हा अंदाज आहे. सत्य हेच की, गुलशन यांच्याशी संवाद झाला नाही. तरीही सर्वोच्च न्यायालयात याचिका करणाऱ्या पाच जणींपैकी त्या एक आहेत आणि तिहेरी तलाकचा जेव्हा जेव्हा इतिहास मांडला जाईल, तेव्हा तेव्हा गुलशन परवीन हे नावही घेतलं जाणार

आईच्या म्हणण्याला त्यांनीही जोड देत उत्तर दिलं, ‘‘माँ कहती है, ये तो रोती नहीं, इसका दिल पत्थर है. पत्थर नहीं होता. इन्सान जिस हालात से गुजरता है उससे वह मजबूत बनता है. उसने कभी नहीं सोचा होता की वो इस दौर से गुजरेगा और उसे गुजरना पडता है. मैं उसके लिए क्यों रोऊँ, जिसने मेरी कदर नहीं की. मुझमें कोई कमी नहीं. मेरी कोई गलती नहीं. फिर मैं क्यों रोऊ? मैंने कभी कुछ गलत किया ही नही था. इसलिए तो ना डर लगा, ना कदम लडखडाये, ना हिम्मत डगमगायी. अपनी जगह सही हूँ. ये लढाई मेरे लिए तो थीहि पर अब मेरी दोनों बेटियोंके भविष्य को कुछ हद तक सुरक्षित कर लिया है. वैसेही दुसरी लडकीयों के लिए एक उम्मीद बनना है. फिर क्यों रोना?’’ एकामागून एक वाईट प्रसंग येत गेले, तर सामना करणं त्यांना अधिक महत्त्वाचं वाटतं. रडून काही मिळत नाही. अतिया यांचा मानी स्वभाव यातून लक्षात येत होता.

त्या भेटल्यापासून पूर्ण वेळ हसतमुख होत्या. आपल्यावरच्या संकटांनाही त्यांनी हसत हसत सांगितलं. ‘हां लोग कहते है, हमेशा हसती रहती हो. परेसानी जाहीर होने नही देती. पर हसेंगे नहीं तो क्या करे. परेसानीयाँ तो होती है. पर हसते रहे, हसते-हसते ही जिंदगी कट जायेगी. वरना कहाँ कटती है ये जिंदगी रोते हुवे.’ त्या पुन्हा हसल्या आणि मग मंदस्मित करत म्हणाल्या, ‘हे घर सोडावं म्हणून खूप मागे लागलेत. दिवस-रात्र त्रास देतात. अजून अंगात बळ आहे म्हणून विरोध करतेय. संघर्ष करतेय. मग एक दिवस सारं काही सहनशीलतेच्या पल्याड गेलं की, हे घरही देऊन टाकेन. सारा कुछ लुट गया, जब बच्चे नहीं, शौहर नहीं, कुछ भी नहीं तो तुम्हारा घर लेकर क्या करेंगे. अपना इंतजाम करके वो भी छोड देंगे, जावो तुम लोग खूश रहो. वैसे तो बहुत कुछ कर सकते है. पर मेरे बच्चे उसके पास है, हमने कुछ किया तो बच्चोंको तकलीफ होगी. उनको दर्द होगा तो हमकोभी दर्द होगा ना.’ त्या पुन्हा खळखळून हसल्या.  

ही गोष्ट आहे फेब्रुवारी 2016 मधील. सर्वसामान्य कुटुंबातली पस्तिशीतली दोन मुलांची आई... संसारात रमू पाहणारी एक गृहिणी सर्वोच्च न्यायालयात पोहोचली. न्यायालय म्हणजे सोपी गोष्ट नाही. साधंसुधं, सरळमार्गी आयुष्य कंठणाऱ्या माणसाच्या वाट्याला न्यायालय आलं की, तो घाबरून जातो. आपला लढा कितीही महत्त्वाचा वाटत असला तरी आतून भेदरून जातो. इथं तर गोष्ट सर्वोच्च न्यायालयाची होती. भीती, तणाव, चिंता- सारं आपसूक येऊन लढणाऱ्याच्या मानगुटीवर बसणारच.

तसंच काहीसं झालं काशीपूर, (उत्तराखंड) इथं माहेरी आलेल्या शायराबानो यांचं. शायराबानो यांना त्यांच्या पतीने- रिझवान अहमदने एकतर्फी तोंडी तलाक दिला होता. पंधरा वर्षांचा संसार एका कागदी दस्तानं मोडून काढला होता. खचलेल्या-खंगलेल्या, आत्मविश्वास गमावून नैराश्यात गेलेल्या शायराबानो कुटुंबाच्या मदतीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका घेऊन पोहोचल्या. तोंडी तलाक, बहुपत्नीत्व व हलाला या मुस्लिम वैयक्तिक कायद्यांमधील पद्धतींमुळे संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्काचा भंग होतो आणि म्हणून या प्रथांवर बंदी आणावी, असं शायराबानो यांचं याचिकेतलं म्हणणं.

आणि मग तोंडी तलाकचा प्रश्न एकाएकी माध्यमांच्या प्राईम- टाइममध्ये आला. माध्यमात तोंडी तलाकच्या चर्चेला उधाण आलं. शायराबानो या कायदेशीररीत्या लढा देऊन तलाकची प्रथाच मोडीत काढायला निघालेल्या पहिल्या महिला. प्रवास सोपा नव्हता. खूप उलथापालथी, खूप निंदानालस्ती झाली. स्वत्व हरवलेल्या महिलेला तिचा आत्मविश्वास मिळायला तब्बल दोन वर्षं लागली. त्या प्रवासाची, त्या संघर्षाची गोष्ट पुढं येणारच आहे, पण तत्पूर्वी इथं थोडं थांबू या. शायराबानोपासून सुरू होणारी आणि आफरीन रेहमान, गुलशन परवीन, इशरत जहाँ अशी वाटचाल करत अतिया साबरीपर्यंत पोहोचणाऱ्या या गोष्टीचा पल्ला गाठण्याआधी अस्ताव्यस्त भवताल समजून घेऊ या.

एक...

वर्तमानपत्राचं पोटं म्हणजे भस्मासुरासारखं असतं. कितीही बातम्या द्या, कमीच पडत असतात. पुन्हा त्या इतर दैनिकांपेक्षा वेगळ्या, एक्सक्लुझिव्ह कशा ठरतील यासाठीही बातमीदार अक्षरश: धडपडत असतात. जरा नवं, वेगळं काही कानावर पडलं की, त्यांच्या मनातला पहिला विचार ‘बातमी होऊ शकेल’ असाच असतो. माझ्याहीबाबत तसंच घडलं होतं. पत्रकारितेची पदवी नुकतीच हातात घेऊन लोकमत दैनिकात रुजू झाले होते. वर्गात जे शिकवलं त्याहीपेक्षा प्रत्यक्षात फार निराळं आहे, हे उमजण्याचे ते सुरुवातीचे दिवस होते. ‘लोकमत’च्या वर्धापनदिनानिमित्त स्नेहभेटीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळेस माझी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या सय्यदभाई आणि शमशुद्दीन तांबोळी यांच्याशी भेट झाली.

त्या भेटीनंतर गप्पांतून मला मुस्लिम सत्यशोधक मंडळ, हमीद दलवाई आणि तलाक या शब्दांची ओळख झाली. तोपर्यंतच्या माझ्या छोट्याशा आयुष्यात मी सोडून दिलेली स्त्री पाहिली होती, तलाकशुदा पाहिलेली नव्हती. त्याविषयी फारशी माहितीही नव्हती. उत्सुकतेनं मी तांबोळीसरांना विचारलं की, किती तलाकच्या प्रमाणाची नोंद कुठं केली जाते? आत्तापर्यंत किती तलाक झाले असावेत? पुण्यात, महाराष्ट्रात, देशात किती तलाक होत असतील; काही आकडेवारी आहे का? मला त्या आकडेवारीची बातमी करायला आवडेल. ‘तलाक’ हा विषय त्या क्षणी तरी मला बातमीचा विषय यापलीकडे फारसा गंभीरही वाटला नव्हता. कदाचित मी अशा एकाही महिलेला प्रत्यक्ष पाहिलेलं नसल्यानं तलाक दिल्याने नेमकं काय घडतं, याची मला यत्किंचतही कल्पना नव्हती. त्या अज्ञानातूनच मी बोलत होते. तर, तांबोळीसर पटकन्‌ म्हणाले- अशी कुठलीच यंत्रणा नाही. तलाकची नोंद होत नाही. मी अवाक्‌ झाले. विवाहनोंदणी होते. फॅमिली कोर्टात नाही म्हटलं तरी येणाऱ्या केसेसवरून घटस्फोटाच्या केसेसची आकडेवारी मिळते. मग तलाकची होत नाही?

तोंडी एकतर्फी तलाक ही मुस्लिम समाजातील स्त्रियांवर अन्याय करणारी प्रथा असतानाही त्याचा कसलाच लेखाजोखा नाही. तलाकसंदर्भात काम करणाऱ्या इतर कार्यकर्त्यांकडे विचारणा केली. तर, प्रत्येकाकडून हेच कळत होतं की, अशी कुठंही नोंद केली जात नाही. या प्रश्नाचं गांभीर्य आणि त्यातील भयावहता स्पष्ट न होण्यामागे हेही एक कारण आहेच. अर्थात, त्या क्षणी मला त्या माहितीत केवळ बातमी दिसत होती. ‘देशात कुठंच तलाकची नोंद होत नाही’ या मथळ्याने मी ती बातमी केली.

बातमीसंदर्भातून का होईना, तलाक या संकल्पनेची पहिल्यांदा ओळख अशी झाली. माझ्या जाणिवा मात्र तरीही बोथटच होत्या. कालांतराने तलाकपीडित मुली/बायकांशी संवाद होऊ लागला. त्यांच्यावर कसं, किती अचानक संकट कोसळल्याच्या, होत्याचं नव्हतं झाल्याच्या अनेक कहाण्या समोर येऊ लागल्या. शिवाय तलाक देण्याचा अधिकार पूर्णपणे पुरुषाचा असल्याने तो आपल्या या एकाधिकाराचं स्वातंत्र्य उपभोगायला कायम तयार असणार. शाहबानो या खटल्यात पाहिलं असेल की, त्या 62 वर्षांच्या असताना त्यांना तलाक दिला गेला. म्हणजे दीर्घकाळ केलेल्या संसाराचं, त्यासाठी कष्टावलेल्या आयुष्याचं, भल्या-बुऱ्या समयी पतीला दिलेल्या साथीचं मोलं किती कसं ठरलं. एका तोंडी तलाकच्या उच्चारानं मातीमोल झालं. एकुणात, एकट्या पुरुषाकडे हा अधिकार असल्याने तीन तलाकची टांगती तलवार कायमच विवाहितेच्या डोक्यावर राहणार. हे सारं हळूहळू आपसूक कळू लागलं आणि मग तलाकपीडितेशी एक ‘एम्पथी’चं नातं जुळू लागलं. त्या अनुषंगानं काही लेखन होऊ लागलं.  

तर मुद्याचं बोलते. तलाकची नोंद होत नाही. ही बातमी केली ती दहा वर्षांपूर्वी. आजही जेव्हा याचा धांडोळा घेतला तर लक्षात आलं की, अशी अद्यापही कुठल्याच प्रकारे नोंद होत नाही. किती मुस्लिम बायका या तोंडी तलाकमुळे बेघर झाल्या, एकट्या पडल्या याची काही आकडेवारी उपलब्ध नाही. दोन वर्षांपूर्वी भारतीय मुस्लिम महिला आंदोलन या संस्थेने आर्थिक निम्नवर्गातील 4,710 महिलांचे सर्वेक्षण केले होते. त्यापैकी 525 महिला या तलाकशुदा आढळल्या आणि त्यातील 408 म्हणजे 78 टक्के महिला या तोंडी तलाक या प्रथेच्या बळी ठरल्या होत्या. अर्थात, हा आकडा परिपूर्ण नाही. सांगायचं इतकंच आहे की, आपल्या देशात तोंडी तलाकने होरपळलेल्या- किंबहुना- असं म्हणू- तोंडी तलाकनंतर आयुष्य लढवय्या मनानं जगणाऱ्या स्त्रियांची अधिकृत संख्याच नाही.

देशात मागील सत्तर वर्षांपासून मुस्लिम समाजातील तोंडी तलाकविषयी इतकी उलथापालथ होत असताना मुस्लिम स्त्रियांचं दुर्भाग्य की, याचा साधा लेखाजोखाही करावासा वाटला नाही. उपेक्षितांमधलं हे उपेक्षितपण घेऊन लढा देणाऱ्या देतच आहेत, काम करणारी मंडळी काम करतच आहेत. तर, माझ्याहीकडं तलाकपीडितांची खात्रीलायक माहिती नाही; तरीही हा संपूर्ण लेख ‘तलाक’च्या अवतीभवती फिरणार आहे. कारण कुठल्याही प्रथेमुळं जर शेवटच्या एकाही व्यक्तीचं नुकसान होणार असेल, त्याच्या अस्तित्वावर प्रश्न उभे राहणार असतील आणि त्याच्या माणूसपणाची विटंबना होत असेल, तर माझ्यासारख्या लिहित्या माणसांनी या गोष्टी सांगणं, हा माझ्या जगण्याचाच भाग आहे.

दोन

आजपर्यंत या तीन तलाकसंदर्भात काही घडलं का नाही... कुणी याविरुद्ध काही बोललं नाही का? तर, वर्तमान समजून घेण्यासाठी इतिहासातही डोकावण्याची गरज आहेच. विचारवंत, समाजसुधारक हमीद दलवाई यांनी 18 एप्रिल 1966 रोजी सात तलाकपीडित बायकांना घेऊन मुंबई विधानसभेवर मोर्चा काढला होता. म्हणजे, या प्रथेचं मूळ फार मागे न जाताही शोधायला गेलो तरी ते अगदी सत्तरच्या दशकात दिसत आहे. या सात बायकांना मोर्चासाठी उभे करणे, ही काही सोपी गोष्ट नव्हती. स्वत:ची आपबिती एकीकडे आणि समाजाचा विरोध पत्करून त्यासाठी उभं राहणे एकीकडे.

मला अनेकदा प्रश्न पडतो, त्या महिलांना दलवाईंनी कसं राजी केलं असेल? त्या कशा तयार झाल्या असतील? की, आपल्यावरचा अन्याय हीच आपली अंत:प्रेरणा असते? कदाचित तीच प्रेरणा असणार. याच लेखाच्या मध्यवर्ती असणाऱ्या पाच याचिकाकर्त्यांकडे पाहता तरी ते खरंच वाटतं. तर, दलवाईंनी मोर्चा काढला. त्या वेळी तलाक, बहुपत्नीत्व, हलाला याच प्रथांवर बंदी आणावी, समान नागरी कायदा यावा म्हणून घोषणा देण्यात आल्या होत्या. म्हणजे तब्बल बावन्न वर्षांपूर्वीच या वाईट प्रथेकडं लक्ष वेधण्यात आलं होतं. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना या प्रथांसंदर्भात निवेदनही देण्यात आलं होतं. अर्थात, अशी निवेदनं अनेक दिली गेली आणि ती स्वीकारण्यापलीकडे फारशा काही हालचाली कधी झाल्या नाहीत.

यानंतर हमीद दलवाई यांनी ‘सदा-ए-निस्वाँ’ या नावाची संस्था स्थापन केली. त्याबरोबरच प्रा.ए.बी. शहा यांच्यासोबत ‘इंडियन सेक्युलर सोसायटी’ची स्थापना केली. मुस्लिम महिलांना संविधानात्मक हक्क मिळावा, हा दलवाईंचा प्रयत्न होता. तोंडी तलाकच्या मोर्चानंतर संघटनात्मक-धोरणात्मक पाऊल उचलता यावे, म्हणून दलवाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून 22 मार्च 1970 रोजी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. यानंतर मुस्लिम स्त्री-पुरुषांचे अधिकार व समान नागरी कायदा यासाठी मंडळाने सातत्याने राज्य व राष्ट्रीय पातळीवर काम केले. मुस्लिम महिलांच्या अधिकारांसाठी परिषदा, मोर्चे, मेळावे काढले. दिल्ली येथे 1971 मध्ये ऑल इंडिया फॉरवर्ड लुकिंग मुस्लिम कॉन्फरन्स घेतली. 

याच दरम्यान दलवाईंनी ‘मेरी कहानी, अपनी जुबानी’ हा कार्यक्रम घेतला. यात तलाकपीडितांनी आपापली कहाणी सांगितली. श्रोत्यांनाही अश्रू अनावर झाले होते. वर्तानपत्रांनी बातम्या तर केल्याच, पण त्यावर संपादकीयही लिहिण्यात आले. परिणामी, मुस्लिम धर्मवादी संघटना व राजकीय पक्षांनी विरोध करण्यासाठी प्रतिपरिषदा घेतल्या. या काळात आपल्या घरातील मुली, बायका, पत्नी, आई, नातेवाइकांना घेऊन ते रस्त्यावर आले आणि त्यातील बायका म्हणत होत्या, ‘आम्हाला सवत आणली तरी चालेल, सोडलं तरी चालेल, रस्त्यावर आलो तरी चालेल, पण आम्हाला आमच्या कायद्यात  हस्तक्षेप नको.’ अशा प्रकारची मांडणी ते बायकांकडूनच करवून घेत होते. बायकांनाच बायकांविरुद्ध उभे केले जात होते.

आजही परिस्थिती फार वेगळी नाही. आजही ‘शरियतमें दखलबाजी नहीं चलेगी’ म्हणत मोर्चे-मेळावे काढले जात आहेत. तेही महिलांनाच पुढे करून. दलवाईंनाही असा पुष्कळ विरोध झाला. जमातवादी गटाने मुंबई येथे पाच हजारांहून अधिक प्रतिनिधींना घेऊन मुस्लिम सत्यशोधक मंडळांच्या तलाकबंदीच्या मागणीला विरोध केला. या वेळी निर्भिड दलवाईंनी आपल्या सहकाऱ्यांसह त्यांच्याच परिषदेत जाऊन त्याचा निषेध केला. दलवाईंच्या अंगावर जमाव धावून आला, परंतु त्यांनी निर्भयपणे आपला निषेध नोंदवला. पुढे याच जमातवादींनी एकत्र येऊन ‘मुस्लिम पसर्नल लॉ प्रोटेक्शन’ची समिती स्थापन केली आणि साधारण काही महिन्यांतच 1973 मध्ये त्यांनी याच समितीचे नाव ‘मुस्लिम पसर्नल लॉ बोर्ड’ असे रजिस्टर करून घेतले. आज आपण ‘ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड’ म्हणून या संघटनेला ओळखतो.

थोडक्यात, मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कामाला विरोध करण्यासाठी ही संघटना जन्माला आली आणि आज ही संस्था स्वत:ला मुस्लिमांचे कैवारी, मुस्लिमांचे प्रतिनिधी समजू लागली. शायराबानो आणि इतर यांच्या केसमध्येही याच संस्थेने बरीच आढीवेढी भूमिका घेतली. ब्रिटिशांनी तयार केलेला मुस्लिम व्यक्तिगत कायदा- म्हणजेच ज्याला शरिया कायदा म्हणतात- त्या कायद्यास सर्वेसर्वा मानून त्यात हस्तक्षेप नको, म्हणून कांगावा करण्यात ही संस्था अग्रेसर असते. अगदी आत्ताच्या याचिकेवेळेसही त्यांची भूमिका अशीच होती. थोडक्यात, अडचणी येत राहिल्या तरी मंडळाने आपले काम नेटाने पुढे नेले. ‘जिहाद-ए-तलाक’सारख्या परिषदा घेतल्या. मुस्लिम महिला मदत केंद्र सुरू करून अनेक तलाकपीडित महिलांना आधार दिला. कायद्याचा सल्ला दिला. काही वेळा दुसरा विवाह करण्यास निघालेल्या पतीची पहिली पत्नी व कुटुंबासह विवाहस्थळी पोहोचून विवाह रोखले. हमीद दलवाईंच्या हयातीत मेळावे, मोर्चे तर सतत घडत राहिले; परंतु त्यांच्या पश्चातही सय्यदभाई, हुसेन जमादार, मेहरुन्निसा दलवाई व इतर कार्यकर्त्यांनीही तलाकचा विषय लावून धरला.

मात्र दलवाई यांच्या मृत्यूने मंडळाचे फार नुकसान झाले. एक द्रष्टे, दूरदृष्टी असणारे नेतृत्व हरपले. त्यानंतरही संस्था कायम राहिली, मात्र ज्या तडफेनं दलवाईंनी कामाला सुरुवात केली असेल, ती कायम राहण्यात अडचणी आल्या असणार. म्हणूनच पन्नास-बावन्न वर्षांपूर्वी त्यांनी छेडलेला तलाकबंदीचा प्रश्न अधांतरी लटकत राहिला. अद्यापही लटकलेलाच आहे. दरम्यान 2007 मध्ये भारतीय मुस्लिम महिला आंदोलन या संस्थेचा जन्म झाला. ही संस्था मुस्लिम स्त्रियांच्या विविध पैलूंना हाताळते. अनेक मुस्लिम महिलांनी मिळूनच या संस्थेची निर्मिती केली. झकिया सोमन आणि नूरजहॉं साफिया नियाज या महिला यामध्ये आघाडीवर राहिल्या. संस्था सुरू झाल्यानंतर शिक्षण, जीवनमान, आरोग्य, स्कॉलरशिप या प्रश्नांवरच संस्था काम करत होती. तळागाळात काम सुरू झाल्याने 2009-10च्या सुमारास तलाकपीडिता येऊन संस्थेला भेट देऊ लागल्या. उभ्या-उभ्या तलाक दिला, घरातून हाकलले, काझीसुद्धा तलाक झाल्याचे सांगताहेत, असं या बायका संस्थेकडे सांगू लागल्या. म्हणून मग संस्थेला तोंडी तलाकच्या विषयावर पद्धतीशीररीत्या काम करण्याची आवश्यकता वाटू लागली.

पहिले पाऊल म्हणून त्यांनी 2012 मध्ये राष्ट्रीय जनसुनावणी घेतली. त्यात विविध राज्यांतून 500 महिलांनी आपल्यावरील तलाकच्या आपत्तीची कहाणी सांगितली. प्रसार- माध्यमांतून त्या विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला गेला. यानंतर संस्थेने राष्ट्रीय सर्वेक्षणच हाती घेतले. 98.02 टक्के मुस्लिम बायकांना तोंडी तलाक अमान्य असल्याचे पुढे आले. बायका या प्रथेने किती त्रस्त आहेत याचाच तो पुरावा होता. त्यानंतर 50 हजार बायकांचे सह्यांचे निवेदन तयार केले. हे निवेदन राष्ट्रीय महिला आयोगाला सादर करून तोंडी तलाकच्या प्रथेवर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली. थोड्या-थोड्या प्रमाणात हालचाली घडत होत्या. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाइतकंच सर्वसामान्य मुस्लिमांचं आपल्या धर्माविषयी असणारं आंधळं प्रेम या प्रमुख अडचणी अद्यापही आहेत.

तीन

तोंडी तलाक, पोटगी, बहुपत्नीत्व अशा अंगाने न्यायालयाची दारं ठोठावली गेली. प्रत्यक्षात समाजाने हे लढे कधीही समजून घेतले नाहीत आणि त्याचा उलटच परिणाम झाला. पहिलं उदाहरण घेऊ या 1979 चं, शाहबानो प्रकरण. पन्नास वर्षांच्या सांसारिक आयुष्यातून या वृद्ध स्त्रीला अहमदखाँ या त्यांच्या पतीने तलाक दिला. साठीला पोहोलेली ही वृद्धा अचानक बेघर झाली. स्वत:च्या उदरनिर्वाहाचं मोठं संकट तिच्यापुढे उभं राहिलं. तिने इंदूर कोर्टात पोटगीसाठी अर्ज केला. तिला 200 रुपये पोटगी मंजूर झाली. याविरोधात सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेली.

शाहबानोला इद्दत काळात पोटगी व मेहेर दिल्याने यापुढे पोटगी देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद तिच्या नवऱ्याने केला. 1985 मध्ये न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी घटस्फोटित मुस्लिम महिलेस पोटगी मिळण्याचा हक्क आहे, असा ऐतिहासिक निर्णय दिला. पण या निर्णयाला जमातवादी मुस्लिमांकडून प्रचंड विरोध झाला. मुस्लिम स्त्रियांना कलम 125 लागू होऊ नये व हा निर्णय बदलावा, अशी प्रचंड जोरदार मागणी झाली. मुंबई आणि भोपाळमध्ये एक लाखाहून अधिक मुसलमानांनी निदर्शने केली. त्या काळी हैदराबाद बंदचे आयोजन झाले. या निर्णयाचे समर्थन करणाऱ्यांची संख्या अगदीच मामुली होती.

दि.25 फेब्रुवारी 1986 रोजी लोकसभेत मुस्लिम  महिला विधेयक मांडण्यात आले व व्हिप वापरून ते विधेयक पास करून घेण्यात आले. यामुळे 125व्या कलमातून मुस्लिम महिलांना वगळण्यात आले. तिचा पोटगीचा हक्क काढून घेण्यात आला. दारिद्याने पिचलेली कुटुंबे घटस्फोटित मुलींना कसा आधार देणार होती? एकाअर्थी तलाकपीडित स्त्रिया निराधार झाल्या. तत्कालीन राजीव गांधी सरकारने मुस्लिम महिलेच्या विरोधात निकाल दिल्याने तत्कालीन ऊर्जा राज्यमंत्री आरिफ मोहमंद खान यांनी राजीनामा दिला. तलाकच्या प्रश्नासाठी आपलं राजकीय करिअर, पदाचाही त्यांनी विचार केला नाही. त्यांनी दाखवलेली हिंमत खचितच एखादा नेता दाखवतो. मात्र शाहबानो यांनाही कायद्याने मिळालेल्या पोटगीचा आधार घेता आला नाही. त्यांच्यावर इतका दबाव आला की, इतकी वर्षं न्यायालयीन टक्कर दिल्यावर मिळालेला अधिकार त्यांनी सोडून दिला. न्यायालयाने रीतसर सोय केलेली असताना त्या विरोधात जात त्यांनी ‘मला मिळणाऱ्या पोटगीचा मी शपथपूर्वक त्याग करते आहे’ असे जाहीर केले. मुस्लिम समाजातील स्त्रिया कुठल्या भवतालातून जात होत्या आणि जात आहेत, याचा यावरून निश्चित अंदाज येऊ शकतो.

लिहायला सुरुवात केली तेव्हापासून ‘एकतर्फी तोंडी तलाक’ असं वारंवार मी म्हणतेय. पण ‘हे काय बुवा प्रकरण?’ असा प्रश्न पडला असेल, तर तेही आधी समजून घ्यायला हवं; नाही का? तोंडी तलाक/तीन तलाक किंवा तलाक-ए-बिद्दत हे शब्द एकमेकांना समानार्थी म्हणून वापरले जातात. म्हणजे काय, तर मुस्लिम समाजातील पती आपल्या पत्नीला एका दमात तीन वेळा तलाक म्हणून तिच्याशी फारकत घेतो. तत्क्षणी त्या दोघांचा संसार मोडतो. या प्रथेमध्ये पत्नीला बोलण्याचा काही अधिकार नाही. मुळात तिला या तलाकविषयी कसलीही चाहूल लागत नाही आणि ती काही म्हणायच्या आतच पती तिला तलाक म्हणून मोकळा होतो. शहरी, ग्रामीण, गरीब, श्रीमंत सगळ्या स्तरांत हा प्रकार घडतो.

आजच्या काळात तलाक देण्याच्या पद्धतीतही बदल झालेला दिसून येतो. पारंपरिकरीत्या समोरून तोंडी तलाक देण्याबरोबरच आधुनिक पद्धतींचाही जन्म झाला आहे. व्हॉट्‌सॲप, मेल, फेसबुकवरूनही तलाक दिला जात आहे. तसेच पोस्टाने, फोनवर, कुरिअर किंवा वर्तानपत्रातील जाहीर नोटिशीद्वारेही कित्येकींना तलाक दिला जातो. अशा रीतीने एकतर्फी, मनमानी पद्धतीने दिलेला तलाक इस्लामलाही अमान्य आहे. पवित्र कुरआनामध्येही अशा प्रकारच्या तलाकला मान्यता नाहीये. शिवाय या चुकीच्या पद्धतीने दिलेल्या तलाकसंदर्भात उच्च व सर्वोच्च न्यायालयानेही कैक केसेसमध्ये ते अवैधही ठरवले आहेत. मात्र ही बाब पीडित मुलींचे वकिलही त्यांच्या निदर्शनास आणून देत नाहीत. उलट, तेही अशा मुलींना ‘तुझा तलाक झालाय’ असंच सांगतात. कायद्याचे ज्ञान असणाऱ्यांकडूनच चुकीची दिशा दर्शवली जात असल्यास या मुलींपुढे न्याय मागण्याच्या पर्यायांवरही मर्यादा येतात. मुस्लिम वकील कडवे धार्मिक असतात की त्यांना खरोखरच अशा कायद्याचे ज्ञान नसते, असा एक प्रश्न उपस्थित होतो.

चार

मुळातच तीन तलाक देण्यासंदर्भातून पवित्र कुरआनमध्येही विशिष्ट पद्धत सांगण्यात आली आहे. तलाक-ए-अहसन आणि तलाक-ए-हसन. तलाक- ए-अहसनमध्ये पतीने तीन तलाकचा उच्चार केल्यानंतर तीन महिने वाट पाहिली जाते. त्या तीन महिन्यांच्या कालावधीत जर दोघांमध्ये समेट घडला, तर ते दोघं पुन्हा एकत्र नांदू शकतात. तसे घडले नाही, तर मात्र त्या दोघांना वेगळे व्हावेच लागते. या तीन महिन्यांच्या कालावधीत पत्नी गर्भवती राहिली, तर मात्र बाळ जन्मेपर्यंत पती तलाक देऊ शकत नाही.

दुसरा प्रकार तलाक-ए-हसन. यामध्ये पतीने पत्नीच्या तीन मासिक पाळीच्या कालावधीत तीन वेगवेगळ्या वेळा तलाकचा उच्चार करायचा आहे. यानंतर पुढचा तलाकचा उच्चार करण्याआधी पत्नीला गर्भधारणा तर झाली नाही ना, हे तपासलं जातं. तिच्या मासिक पाळीनंतर ती गर्भवती नसल्याची खात्री झाल्यावरच पुढील महिन्यातील तलाकचा उच्चार केला जातो. तिसऱ्या महिन्यासाठीही पुन्हा दुसऱ्या महिन्याप्रमाणेच स्त्रीच्या मासिक पाळीपर्यंत थांबणे भाग आहे. यादरम्यान जर पत्नी गर्भवती राहिलीच, तर तिच्या बाळंतपणापर्यंत पतीला तलाक देता येत नाही. शिवाय दोन वेळा तलाक दिल्यानंतरही जर पतीचे मन बदलले, तर त्याही काळात तो पुढील तलाकचा उच्चार न करता आपल्या पत्नीसह संसार करू शकतो.

या दोन्ही प्रकारांत तलाकचा उच्चार मौलवी व साक्षीदारांसमोर करणं अपेक्षित आहे. तीन महिन्यांचा कालावधी हा एक प्रकारे त्यांच्या समुपदेशनाचाच काळ म्हणून गृहीत धरला जातो. याचा अर्थ तलाक-ए-अहसन आणि तलाक-एहसन हे मार्ग सोईचे आहेत का, तर त्याचंही खात्रीलायक ‘हो’ म्हणून उत्तर देऊ शकत नाही. कारण हा कालखंड भांडणं, रुसव्या-फुगव्याचं मूळ शोधायलाच जाणार. मग आपण कधी दोघांच्या मनातील कटुता दूर करून त्यांचा संसार टिकवणार, हा प्रश्नच आहे.

शिवाय या दोन्ही प्रथांत अधिकार एकमेव पुरुषाकडेच आहेत. स्त्रिया तलाक देऊ शकत नाहीत, त्या मागू शकतात. पण किमानपक्षी तीन महिन्यांचा कालावधी समेट घडवण्यास हाती आहे, असं म्हणण्याची मुभा इथं आहे. पूर्वीच्या युद्धाच्या काळात, व्यापारासाठी स्थलांतराच्या काळात पती-पत्नी दोघांनाही सांसारिक सुख उपभोगता यावं म्हणून कदाचित ही तीन महिन्यांची छोटी आणि तरीही शक्यतो दोघांनाही समेटाची संधी देणारी तजवीज असेल; परंतु कालांतराने युद्धं संपली, माणसाच्या जगण्याला स्थैर्य आलं तेव्हा या प्रथांची व्याप्ती, त्यातील समज वाढविण्याची गरज निर्माण झाली. प्रत्यक्षात मात्र त्याहून वाईट प्रथेचा म्हणजे तलाक-ए-बिद्दतचा अवलंब सुरू झाला. प्रत्यक्षात एकाच वेळी तीनदा तलाक म्हणून फारकत घेतली जाते. अनेकदा तर मुलींना माहीतही नसते. त्यांना माहेरी किंवा नातेवाइकांकडे पाठवून परस्परच तलाक दिल्याच्या घटनाही आहेत. मौलवींकडे याबाबत विचारणा करण्यास गेल्यानंतर मौलवी अशा प्रकारचा तलाक वैध असल्याचं म्हणतात. म्हणजे हा तलाक इस्लाममध्ये अधिकृत नाही, परंतु त्याचा उच्चार झाला आहे म्हणजे तलाक झाला आहे. पद्धत चुकीची असेलही,  पण तलाकचा उच्चार केलाय म्हणजे तलाक झालाच! एकदा उच्चार करावा किंवा तीनदा, एका वेळी करावा किंवा तीन वेळा- शेवटी मुद्दा कायम, पत्नीला तलाक दिला म्हणून. या अर्थी मुलगी तलाकशुदा झाली. अशी या मौलवींची भूमिका असते.

‘तीन तलाक’विरुद्ध पाच महिला!

या विषयाकडे वळण्याआधी मुस्लिम सभोवताल समजून घेणं आवश्यक होतं. काशीपूरच्या (उत्तराखंड) शायराबानो, जयपूरच्या (राजस्थान) आफरिन रेहमान, सहारनपूरच्या (उत्तर प्रदेश) आतिया साबरी, गाझियाबाद (दिल्ली)च्या गुलशन परवीन, हावडाच्या (प.बंगाल) इशरत जहॉँ या पाच महिलांचा लढा जाणून घेण्याआधी आसपास नजर टाकणं गरजेचं होतं. ती निरीक्षणं नोंदवल्याशिवाय पुढं जाता येणार नव्हतं. भारतीय मुस्लिम समाज कायमच आपल्या धार्मिक अंगाला चिकटून राहिला आहे. तसं राहण्यातही वावगं नाही, मात्र त्यातील वाईट वा चुकीच्या प्रथांबाबतही आंधळेपण कायम ठेवलं जातं. काळानुसार नव्या प्रवाहांचा स्वीकार करण्यास फार मागे-पुढं पाहिलं जातं. म्हणूनच शायराबानो व इतर महिला उभ्या राहतात, तेव्हा त्यांच्या पुढच्या अडचणी कमी नसतात.

मुळातच समाजातून जर स्त्री-पुरुष भेदाला वाव मिळत असेल आणि ते तोंडी तलाकसारख्या प्रथेनं स्पष्ट होत असेल, तर तिथं या महिलांना आपला आवाज मांडण्यासाठी पुढं येणं किती जोखमीचं असू शकतं याचा अंदाज लावता येईल. शायराबानो यांची केस दाखल झाली, त्यानंतर काही दिवसांतच ‘हमारे शरियामें दखलबाजी नहीं चलेगी’ म्हणत सह्यांची मोहीम सुरू झाली. मुस्लिम पसर्नल लॉ बोर्डाला मुस्लिम स्त्रियांच्या माणूसपणापेक्षा ब्रिटिशांनी केलेल्या कायद्याची अधिक काळजी वाटली. आपल्याला समाजात राहायचं आहे, आपल्याला कुणी धर्मविरोधी समजू नये असं वाटून अनेक जण अशा प्रकारच्या मोहिमांत सहभागी होतात. त्यांचा मनानेही सहभाग असेलच, असं नसतं. मात्र पाहणाऱ्यांना गर्दी दिसते आणि त्यातून एक दबावगटही तयार होत असतो. प्रत्यक्ष आडकाठी घालणारे थोडे-अधिक असतातच. धमकावणारे आणि विटंबना करणारेही असतात. अशा वाटेवर आपल्याला धर्म शिकवण्यासाठी टपून बसलेले तर कैक असतात. या सगळ्याची जाणीव मनाशी ठेवणं आवश्यक होतं.

म्हणूनच या पाच लढवय्यांना भेटवण्याआधी इतक्या वेगवेगळ्या पैलूंना हात लावला. त्याची गरज होती- माझीच नव्हे तर सर्वांची. ही सारी निरीक्षणं एक मोठा पट उभा करू पाहतात, ज्यावर त्या पाच जणी नायिका म्हणून ठळक होतात. म्हणूनच तलाकसंदर्भातील भूतकाळ आणि वर्तमानकाळ दोन्ही एकमेकांना लावून पाहणं गरजेचं होतं. या पाच जणींचा संघर्ष त्याशिवाय अपुरा आहे. म्हणजे मी जे काही सांगणार आहे ते परिपूर्ण असणार आहे, असंही नाही; परंतु परिपूर्णतेच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. आणखी एक महत्त्वाची बाब- तुम्ही म्हणाल, दोन माणसांचं पटत नसेल आणि ते वेगळे झाले तर त्यात इतका बाऊ करण्याचं कारण काय? अगदी रास्त मुद्दा आहे. परंतु दोन व्यक्तींना न्याय्य पद्धतीनं वेगळं होण्याची समान संधी मिळत नसेल तर... तर अस्वस्थ नाही होणार तुम्ही? किमान मी तरी स्वस्थ नाही राहू शकत. अचानक एक दिवस कोणी येऊन म्हणत असेल की, ‘आत्ता या क्षणापासून तू माझी बायको नाहीस, ही तुझी मुलं नाहीत. मी तुला हराम आहे, तू मला हराम आहे. नाही तर, ही तुझी मुलं घे अन्‌ इथून चालती हो.’ तर..?

संसार मोडतो, घर सुटतं; तेव्हा त्या बाईची काय अवस्था होत असेल? सैरभैर होणं या शब्दातून आपल्यापर्यंत जे पोहोचतं, त्याहून काहीतरी अधिक भयंकर असणार- जे त्या प्रत्यक्ष अनुभवतात. या पाच जणी त्यातून गेल्या. या पाच जणींत सारंच साम्य आहे. त्यांच्या पतीने एकतर्फी मनमानी तलाक दिला. या तलाकने त्या भेदरल्या. रडल्या. खचल्या. कोलमडून पडल्या. संसार मोडला म्हणून नैराश्यातही गेल्या. हळूहळू स्वत:चं विस्कटलेपण त्यांनी सावरून घेतलं आणि उभ्या राहिल्या. सभोवताल सारं पेटलेलं असताना, जमातवाद वाढलेला असताना, धर्माची मुळं खोलवर रुजलेली आणि प्रत्यक्ष जगण्यात सगळं टोकदार झालेलं असताना या पाच जणी उभ्या ठाकल्या. सोपं वाटतं ना असं म्हणायला? पण ते किती अवघड होतं, हे त्यांच्याशी बोलताना जाणवत राहिलं.

लग्न मोडावं असं कुणाही दांपत्याला लग्नाच्या वेळेस वाटत नाही. मात्र सांसरिक जीवनात कटुता आली तर वेगळं होणं, हेही काही चूक नाहीच. परंतु त्याचे मार्ग न्याय्य असायला हवेत, इतकी साधी अपेक्षा तर आपण  करायला हरकत नाही. म्हणूनच या पाच जणींनी दिलेला लढा महत्त्वाचा आहे. सर्वसामान्य स्त्रिया उभ्या राहू शकतात, लढू शकतात आणि जिंकूही शकतात- या सगळ्या खऱ्या-खुऱ्या शक्यतांचा वेध घेणं आणि ते लिहिणं हेच तर माझं काम. त्या प्रवासातून जे हाती लागलं, ते तुमच्यासमोर ठेवत आहे. त्यांच्या संवादातून हाती जे-जे आलं आणि मला जे-जे उमजत गेलं, ते सारं इथं मांडत आहे.

एका अर्थी ही त्या पाच जणींची कहाणी आहे. एकाअर्थी ती माझ्या जाणीव-नेणिवेची, माझ्या समजण्या-उमजण्याची गोष्ट आहे. पण यातून जर तुमच्या जाणिव-नेणिवांमध्ये काही अधिक-उणी भर पडली आणि स्वत:विषयीचा आदर, आत्मविश्वास दुणावला तर या लेखनाला अधिक अर्थ. आता प्रत्यक्षात शायराबानो, आफरिन रेहमान, इशरत जहाँ, अतिया साबरी, गुलशन परवीन यांना भेटू या!

शायराबानो (काशीपूर, उत्तराखंड)

‘‘बैठ गयी आप बसमें. हां तो, रामपूर जानेवाली बस पकडली हैं ना? तो फिर कंडक्टर को कहना आपको गौशाला उतार दे. काशीपूरसे दस किलोमीटर पर है. वही भाई खडा होगा. आप कोई टेन्शन ना लो जी.’’ फोनवरून अर्शदभाई सूचना देता-देता आश्वस्तही करत होते. अर्शदभाई हे शायराबानो यांचे भाऊ. दिल्लीला पोहोचून पुढचा प्रवास आंतरराज्यीय परिवहन व्यवस्थेने करण्याचं निश्चित केलं होतं. रेल्वेचा पर्याय होता; परंतु डिसेंबरअखेरची उत्तरेकडील थंडी, धुकं आणि ‘समयसे लेट’ होणाऱ्या रेल्वेंना टाळणंच योग्य ठरणार होतं.

माझा 31 डिसेंबर 2017 चा सूर्य दिल्लीत उगवला होता. खरं तर सूर्य दिसतच नव्हता. आभाळ भरून धुकं होतं. त्या अंधुकशा धुक्यानं भरलेल्या सकाळी प्रवासाला सुरुवात झाली. घड्याळात सकाळचे पावणेदहा वाजले होते. दिल्लीच्या आनंदविहार बसअड्‌ड्यावरून यूपी परिवहनची काशीपूर बस पकडली. बस याच अड्‌ड्यावरून सुटणार होती, त्यामुळे आपल्या भारतीय पद्धतीने रुमाल वगैरे टाकून मला बसायला जागा मिळाली. बसल्याबरोबर किती वाजतील पोहोचायला, म्हणून मोबाईल हातात घेतला. काशीपूरला पोहोचायला पावणेपाच तास लागतील, असं गुगल मॅप सांगत होता; तर माझ्या शेजारी बसणारा तरुण सांगत होता की, ‘छे-साडे छे घंटेसे पहले तो नहीं पहुँचेगे आप...’

सकाळपासून सुरू झालेला प्रवास आता अर्ध्या- पाऊण तासावर येऊन ठेपला होता. खरं तर शायराबानो यांची मी प्रत्यक्षात तिसऱ्यांदा भेट घेणार होते. शायराबानो यांना मी या आधी पुण्यातच दोनदा भेटले होते. पहिल्यांदा मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या संविधानदिनाच्या कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या त्या वेळी भेटले होते. तेव्हा त्यांनी याचिका दाखल करून सात-आठ महिने झाले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून त्या उपस्थित होत्या. कार्यक्रम सत्राचे उद्‌घाटन झाल्यानंतर शायराबानो यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी पाचारण करण्यात आले.

‘‘2002 को मेरी शादी हुई और 2015 में उन्होंने मुझे तलाक दिया... अक्तूबर में- अक्तूबर 2015 में। अं... वो क्या कहते है-’’ इतकं बोलून त्या थांबल्या. ब्लँक झाल्या. असंच एक मिनिटभर थांबल्या असतील आणि मग म्हणाल्या, ‘‘मेरे ससुराल के लोग मुझे बहुत मारते- पिटते थे... और फिर उन्होंने मुझे तलाक दिया।’’ पुन्हा शांतता. थोड्याशा पॉजनंतर परत म्हणाल्या, ‘‘फिर हमने सुप्रीम कोर्ट में केस किया है... इन्साफ मिलना चाहिए...’’ अशी चार वाक्यं बोलून शायराबानो थांबल्या त्या थांबल्याच. त्या वेळेस हॉलमध्ये साधारण शंभरसव्वाशे लोक होते. ‘तलाक’ने होरपळलेल्या बायका आणि त्यांचे नातेवाईक अधिक होते. शायराबानो काय बोलतायत, हे लक्षपूर्वक ऐकण्यासाठी उत्सुक होते; पण आपले अनुभव सांगताना त्या भांबावून गेल्या होत्या. त्या वेळेसचं त्यांचं ते भांबावलेपण मुस्लिम समाजातल्या महिलांच्या स्थितीबद्दल बरंच काही सांगून गेलं होतं.

हां, म्हणजे अचडणीतल्या, तलाकपीडित मुस्लिम स्त्रियांची हीच तर अवस्था. घरात कायम दबलेल्या अवस्थेत राहिलेल्या बाया एकाएकी बेसहारा होतात, तेव्हा त्यांनी काय करावं? ‘एकतर्फी तलाक’च्या मानसिक धक्क्यातून त्या अद्यापही बाहेर आलेल्या नव्हत्या, हे स्पष्ट दिसत होतं. त्या स्पष्ट बोलू शकल्या नाहीत तरी त्यांच्या मनातील घुसमट त्यांच्या देहबोलीतून समजत होती. ही अवस्था एकट्या शायराबानोंचीच नव्हे, तर बहुतांश मुस्लिम महिलांचीही होती... आहे. निरागस चिमुकल्या मुलासारखं त्यांचं ते भांबावलेपण, भेदरलेपण पाहून खरं तर आतून फार हेलावून टाकलं. साधारणपणे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय, पस्तिशीतलीच एक तरुण स्त्री आहे म्हटल्यावर- ही बाई  फार धाडसी असेल, स्त्रीहक्कांविषयी कमालीची जागृत असेल, असं काहीसं चित्र मनात उभं राहिलं होतं. पण प्रत्यक्षात तर वेगळंच दिसत होतं.

मुळातच आदळ-आपट करत बोलणं, कर्कशपणे भांडून मुद्दा मांडणं किंवा स्त्रीवादावरच्या इतिहासाची, पुस्तकांची नाव घेत दे दणादण भाषणं ठोकणं- म्हणजेच फार धाडसी स्त्री होते का? स्त्रीवादी होते का? घराचा उंबरठाच न ओलांडलेली आणि आपल्या दु:खातून अजूनही पुरेशी न सावरलेली बाई एकदम शंभर जणांसमोर उभी राहते, तेच तिचं धाडस म्हणून का पाहू नये? आपल्या आप्तजनांच्या प्रेमाच्या आधाराने स्वत:ला धीर देत याचिकेच्या माध्यमातून आपल्यासारख्या स्त्रियांवरील अन्याय रोखण्यास निमित्तमात्र जरी ठरू शकत असू, तर हरकत नाही. आपलं झालं ते झालं, पण अन्य बायकांसाठी काही करू शकलो तर हरकत नाही- असा विचार घेऊन त्या उभ्या राहिल्या. ते किती मोलाचं, धाडसाचं!

त्यानंतर दुसऱ्यांदा भेटल्या तेव्हा मात्र त्यांच्यात बदल झाला होता. फार नव्हे, परंतु नोंदवावा असा नक्कीच. दुसऱ्यांदा भेटल्या (सप्टेंबर 2017) तेव्हा, सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकतर्फी तिहेरी तलाकला असांविधानिक जाहीर केले होते. तिहेरी तलाकवर बंदी घालण्यात आली होती आणि त्यासंदर्भातून शासनाने कायदा करावा, असा आदेश देण्यात आला होता. या निकालानंतरच्या महिन्याभरातच त्या पुण्यात आल्या होत्या. त्या वेळी अगदी धावती भेट झाली. पहिल्या भेटीच्या वेळेस एखाद दोन शब्दांत उत्तर देऊन गप्प होणाऱ्या शायराबानो आणि निकालानंतरच्या शायराबानो यांत थोडासा का होईना, फरक पडला होता. फार मोकळेपणाने नसल्या, तरी जे काही बोलत होत्या ते अत्यंत आत्मविश्वासाने बोलत होत्या.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर समाधान व्यक्त करत होत्या. ‘कोशिश करनेवाला सफल हो सकता है. लढाई तो और भी बाकी है’ असंही त्या म्हणाल्या होत्या. त्यांचा आत्मविश्वास जाणवून मी त्यांना तसं म्हणालेही, तर त्या सहज उत्तरल्या, ‘‘विस्वास का तो ऐसा है की... वो तो आते आतेही आयेगा. पहले बोलने में परेसानी तो होती थी. सब अजीबसा लगता था. अपनी हालात का बडा दुख लगता था. हमही इतने दुखभरे क्यों है, हमारे साथ ही ऐसा क्यों हुआ ऐसा लगता था... किसीसे मिलने का, किसीसे बात करने का मन नहीं करता था... पर अब थोडा थोडा समझमें आ रहा है. किसी को तो अपना दुख छोडकर दुसरी बेटी-बहूके बारेमें भी सोचना पडेगा.’’ शायराबानो नम्रतेनं कसलाही आव न आणता, परंतु अत्यंत ठामपणे बोलत होत्या. त्यांच्यातला हा बदल पाहिलेला असल्यानं अधिक खोलात जाऊन त्यांच्याशी बोलण्याची उत्सुकता होती.

अर्ध्या तासाने मी गौशाला या ठिकाणी उतरले. समोरच शकीलभाई म्हणजे शायराबानोंचे बंधू होते. मी बॅग घेऊन आसपास पाहिलं. रस्त्याच्या पल्याड मिलिटरी क्वार्टर्सचा परिसर होता. आणखी पंधरा मिनिटांचा प्रवास करून मी त्यांच्या घरी पोहोचले. शायराबानो यांचे वडील इक्बाल अहमद हे आरटीसी हेमपूर डेपोमधील लेखा विभागातील कॅशियरपदावर आहेत. त्यामुळे त्यांना मिळालेल्या तीन खोल्यांच्या छोट्या क्वार्टर्समध्येच शायराबानो यांच्या माहेरचं कुटुंब वास्तव्याला आहे. सध्या शायराबानो या इथंच राहत आहेत. शायराबानो यांचे आई-वडील, भाऊ, वहिनी आणि त्यांची दोन छोटी मुलं असे सगळे मिळून त्या क्वार्टर्समध्ये राहायला आहेत. कुटुंबीयांसोबतचा परिचय व आदरतिथ्यानंतर गप्पांना सुरुवात झाली. बाहेर आता संध्याकाळ आकारू लागली होती. मी तर अक्षरश: पांघरूण अंगावर घेऊन ऐकायला बसले होते. बाहेर थंडी होती आणि आत तलाकसारखा ज्वलंत विषय.

शायराबानो या त्यांच्या भावंडांमध्ये थोरल्या. एकूण तीन बहिणी, एक भाऊ. चौघांची लग्नं झालीत. इतर दोन्ही मुलींची कुटुंबं चांगली लाभली, पण आपल्या मोठ्या मुलीच्या शायराबानोच्या नवऱ्याची- रिझवान अहमदची पहिल्यापासूनच तक्रार राहिली. कधीही तो सुज्ञपणे वागला नाही, की माहेरच्या लोकांसोबत मिळून-मिसळून राहिला नाही. त्याचा वावर सतत दहशतीचा आणि नकारात्मक असायचा.

शायराबानोच्या आई त्रासून म्हणाल्या, ‘‘सुरूसेही उसका रवैय्या ऐसाही रहा. उसका दिमाग सातवे आसमान पे ही रहता था. कभी हसकर, मिलमिलाकर रहा नहीं. पर इतना सबकुछ होगा ये पता नहीं था. इसने भी कभी कुछ नहीं बताया. सेहती रही. बार बार बिमार कर देता था. इलाज नहीं करता था. आखिरमें तो बहुत बिमार हो गयी. फिर तो सोचा होगा, मर जायेगी. इसलिए मुरादाबाद तक ले कर आया, और इसके पापा को फोन किया- आपकी बेटी को ले जाओ. दो घंटे का रास्ता  है यहाँसे. फिर इसके पापा और भाई लेकर आये मुरादाबादसे. मरही गयी होती नहीं लाते तो. माँ-बाप के घर मर जायेगी तो उसपर कुछ नहीं आयेगा ये सोचकरही वो छोडने आया था. बाकी दोनों लडकियोंका अच्छा है. बस, सुरूसेही इसका कुछ ठीक नहीं रहा.’’ असं म्हणत त्यांनी शायराबानोकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या आणि त्या आत निघून गेल्या.

शायराबानो यांचं एकूणच कुटुंब, माणसं अत्यंत साधी आणि सच्ची असल्याचं जाणवत होतं. आपण फार काही मोठी कामगिरी केली, असा कुठलाच भाव त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर नव्हता. शायराबानो यांचं साधेपणं, काहीसं बुजरेपणही त्यांना या कुटुंबीयांकडून मिळाल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्यामुळं त्यांचे लग्नाआधीचे दिवस कसे होते, हे जाणण्याची उत्सुकता वाटली.

शायराबानो अत्यंत शांत धीरगंभीर आवाजात बोलू लागल्या, ‘‘बचपनसे शादी तक जीवन बहुतही अच्छी तरह से गुजरा. मेरे भ्रताराने सबी तरह की आजादी दी. एज्युकेशन की आजादी दी. उच्च शिक्षण की आजादी दी. काशीपूर कुमाऊन युनिव्हर्सिटीसे समाजशास्त्र विषयमें एम.ए. किया. टीचिंग करने का शौक था. पर 2002 में शादी हो गयी. वो लोग इलाहाबाद के रहनेवाले थे. माँ का पीहर इलाहाबाद का है. उन्ही के जानपहचानसे यह रिश्ता आया था. इलाहाबाद और काशीपूर काफी दूर रहने के कारण सही रूपसे जान नहीं पाये और शादी हो गयी. पर सुरूसेही उनके घर का और हमारे घर माहौल अलग रहा. सास जो थी वह बडे पुराने विचारोंकी थी. हर छोटी चीज को नाम रखती थी. दहेज के लिए परेसान करती ती. उनका बडा दबाव रहता था और पती भी बस उनकीही बात सुनते थे. भले वो गलतही क्यों ना बोल रही हो. पर हम लोग पहले पता नहीं कर पाये थे.’’

मुलाकडच्या कुटुंबीयां- विषयी अधिक माहिती न काढताच लग्न झाल्याची खंत त्यांच्या बोलण्यात वारंवार येत होती. दूरचं अंतर आहे, म्हणून अनेकदा नातेवाइकांच्या ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून लग्न होतात; पण माहिती देणाराच खात्रीलायक नसला की, सगळा बट्‌ट्याबोळ ठरलेला. शायराबानो यांच्याबाबतीत तसंच घडलं होतं. एम.ए. झालेल्या शायराबानो यांच्या पतीने त्यांच्या कुटुंबीयांना ते तर बारावी झाल्याचं सांगितलं होतं. प्रत्यक्षात तर ते हायस्कूल फेल होते. लग्नाच्या वेळेस त्यांची एक पेप्सीची एजन्सी होती.

यावरही शायराबानो समंजसपणे म्हणतात, ‘‘कमी शिकलेली असली तरी माणसं विचारांनी चांगली असतात. चांगला विचार करण्यासाठी शिकलेलं असण्याची गरज नाही. पण माझ्या नवऱ्याच्या बाबतीत असं होतं की, त्याचे विचारही आधुनिक, चांगले नव्हते. सोच अच्छीही नहीं थी. आणि आम्हाला आधी ते कुटुंब कसं आहे, हे कळलंच नाही. सासूसुद्धा मागास विचारांची होती. सुनेनं काही बोलू नये, सतत कामाला जुंपून घ्यावं- असं तिला वाटत राहायचं. शिवाय हुंडा आणावा म्हणून छळायची. माझ्या कुटुंबीयांनी कर्ज काढूनच माझं लग्न लावून दिलं होतं, अधिकचा हुंडा कुठून आणणार होते? त्यामुळे निमूट सहन करत राहायचे. माझ्या नवऱ्याचा स्वभावही भांडकुदळ. स्वत:च्या कुटुंबीयांबरोबरही त्याचं कधी जमलं नाही. त्यांच्या घरगुती वादातून तो त्याच्या कुटुंबीयांवर नाराज झाला आणि आम्ही वेगळे राहू लागलो. त्या वेळेस मी पहिल्या मुलासाठी गर्भवती होते.

सुरुवातीला मलाही वाटलं- चला, वेगळं राहिल्यानंतर तरी काही सुधार येईल. पण तसं काही झालं नाही. माणूस मुळातच ज्या वातावरणात वाढलेला असतो, जे संस्कार झालेले असतात, ते सोबत येतातच, तो कुठेही गेला तरी. कधी मला कुठं जाऊ दिलं नाही, कुठे नेलं नाही. माझी सख्खी बहीण इलाहाबादेतच राहायला होती; पण कधी कुठल्या फंक्शनसाठी, दु:खाच्या प्रसंगी जाऊच दिलं नाही. तेही येत नसत. सुरुवातीच्या एक-दोन भेटीतच त्यांनी त्यांची नाराजी, त्यांचं अकडूपण बहीण व दाजींना दाखवल्यावर ते का येतील? असं चारही बाजूंनी मला माझ्या कुटुंबीयांपासून तोडल्यासारखं झालं होतं. बघ म्हणजे, कशा प्रवृत्तीचा असेल. त्यांच्या या गोष्टीचा सुरुवातीला राग यायचा. मी सांगायचे, भांडायचे, रुसायचे; पण त्यांचं वागणं चांगलं नव्हतं. ते त्यावरही भांडणं करायचे. वाट्टेल ते बोलायचे. मग घरात क्लेष नको म्हणून शांत राहायचे. म्हणजे ते आधी मारझोड करायचे, शिव्याशाप द्यायचे. मग पुन्हा येऊन गोड बोलायचे. माझी काळजी करतायेत, माझ्याविषयी प्रेम वाटतं, असं दाखवायचे. मग मीही म्हणायचे, झालं-गेलं गंगेला मिळालं. याच वातावरणात दुसरी मुलगीही झाली. अगदी टिपिकल गृहिणी झाले. घरसंसार, मुलं सांभाळणं. कधी कुठं जाणं-येणं नाही, की कशानिमित्त घराबाहेर पडणं नाही. पण या दरम्यान मी आजारी पडू लागले.’’

मघाशी त्यांच्या आईसुद्धा आजारपणाविषयी बोलत  होत्या. शायराबानोही तसंच काहीसं सांगू लागल्या. मीही उत्सुक झाले. ‘‘दरअसल उन्होंने मेरे सात अबॉर्शन किये. घरपरही कुछ दवाईयाँ ला कर देते थे. उसका साईड इफेक्ट हो कर मेरी किडनी और लिव्हर में प्रोब्लेम्स हुई. पता नही कौनसी दवाईयाँ देते थे कि मुझे चक्कर भी आता था.’’ मी अवाक्‌. गर्भपात? तेही एक दोन नव्हे, तर सात वेळा. तेही डॉक्टरांच्या देखरेखीत नव्हे, तर कुठल्या तरी गोळ्यांनी. ‘सर्दी जुकाम’ झाल्यावर त्यानं कधी शायराबानो यांना दवाखान्यात नेलं नाही, तिथं गर्भपातासाठी नेण्याची अपेक्षाच दुरापास्त होती. न राहून मी विचारलंही, ‘‘तुम्ही कधी त्यांना सुरक्षित संबंध ठेवण्याविषयी सुचवलं नाही का? त्यासाठी कंडोम, कॉपर-टी, गर्भनिरोधक गोळ्या असे पर्याय सुचवले नाहीत किंवा थेट मूल न होण्याची शस्त्रक्रिया का केली नाही?’’

खरं तर मारझोड करणाऱ्या आणि लैंगिक मक्तेदारीलाच ‘मर्दानगी’ समजणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात बायकोच्या भावना समजून घेण्याची समज कितीशी असेल, हे उघडच आहे. तरीही त्यांनी कधी काही प्रयत्न केला का? आपल्या सासरी, माहेरी या गर्भपातांविषयी काही सांगितलं की नाही? त्यांना ते कधी कळलं-जाणवलं की नाही? या साऱ्याच प्रश्नांनी मी अस्वस्थ झाले. त्याहून अस्वस्थ करणारं तर शायराबानो यांचं उत्तर होतं, ‘‘निरोध किंवा तत्सम सुरक्षासाधनांविषयी सांगितल्यावर ते मला घाबरवत असत. एक तर अशी साधनं लैंगिक सुखात अडथळा ठरतात. दुसरं त्यामुळे तुलाच गुप्तरोग किंवा काही तरी आजार होईल. आजारांविषयी फार वाढवून-चढवून सांगत. मीही घाबरून जात असे. मला गर्भपाताच्या गोळ्यांचीही भीती वाटायची, पण नाइलाज होता.

बरं, मी गर्भनिरोधक गोळ्या घ्याव्यात, तर तेही मला कोण आणून देणार? पती-पत्नीतला हा खासगी मामला असतो. मी असं कुणाला सांगणार होते? त्यामुळं गर्भ राहिला की निमूट तो घरच्या घरी पाडून घ्यावा लागत होता. त्यासाठीची औषधंसुद्धा तोच आणायचा. नंतर नंतर कुठली तरी औषधं सतत देऊ लागला. त्यामुळं तर सतत कुठल्या तरी धुंदीत असल्यासारखीच अवस्था झाली होती. या गर्भपातांविषयीदेखील मी कधीच कोणाला सांगितलं नाही. माहेर तर दूर होतं. सासरच्या लोकांशी तर माझ्या नवऱ्याचंच जमायचं नाही, तर माझी कोणाला काळजी असणार? औषधांच्या दुष्परिणामांनी मात्र आपलं काम सुरू केलं होतं.’’ केवढं भयंकर होतं हे! सात वेळा गर्भपात आणि दोन मुलं म्हणजे नऊ वेळा गर्भधारणा. बाईपणाचा सोस तो किती? शारीरिक क्षमता खिळखिळी होणारच. वर आपल्याकडे लैंगिक संबंधांच्या ताणाविषयी न बोलण्याचा प्रघात. संस्कार वगैरे. पण हे असे कथित संस्कार माणसाच्या माणूसपणाचा जीव घेतात त्याचं काय?

शायराबानो पुढं सांगू लागल्या, ‘‘एकीकडं शारीरिक त्रास होता, दुसरीकडं मानसिक त्रासही होता. माझ्या पतीचे मामा-मामी आणि त्यांचा एक मित्र हे नेहमी म्हणायचे, सोडून दे तिला. आपल्यात काय तलाकही होतात आणि दुसरं लग्नही. सतत आजारी असते. ती बिनकामाची झाली आहे. काही गुण नाहीत तिच्यात. जाणीवपूर्वक माझ्यासमोर म्हणायचे. मला घाबरवायचे. शिवाय कुठला कायदाही नव्हता की, असं म्हणणाऱ्यांचा विरोध करेल. त्याचं चांगलंच फावलं होतं. 2015 मध्येही असाच एक गर्भपात झाला आणि खूप आजारी पडले. सतत ग्लानी. डोकं भणाणून गेलं होतं. उठता- बसता येत नव्हतं, की काही करता. आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे नेण्याची जबाबदारी तर नवऱ्याची आहे ना? परंतु तो मला सरळ माहेरी घेऊन आला. त्या वेळेस सोबत मुलंही होती. मुरादाबादलाच सोडलं. माझ्या वडिलांनी माझी अवस्था पाहिली आणि घरी आणण्याआधी हॉस्पिटलमध्येच नेलं. वेळेत आले नसते तर माझं वाचणं अशक्य होतं, असं डॉक्टर सांगू लागले. उपचार सुरू झाले.

जरा जरा तब्येत बरी होऊ लागली. तीन महिने झाले होते. जून सुरू होणार होता. मुलांनाही वडिलांची आठवण येऊ लागली होती. त्यांच्याकडून तर काही प्रतिसाद येत नव्हता, मीच फोन करून त्यांना म्हणाले, ‘मैं आ जाती हूँ. आपके भी तो खाने के लिए परेशान होना पडता.’ तर, तिकडून त्यानं साफ मना केलं. ‘येण्याची जरूर नाही. मी तुला सोबत ठेवणार नाही’ असं म्हणाले. मी गळाठून गेले. ‘का नाही ठेवणार? काय झालं?’ मी विचारत राहिले, पण त्यांनी फोन कट केला होता. दुसऱ्या लग्नासाठी मुलगी शोधत असल्याचं माहीत झालंच होतं. त्याच वेळी मुलंही तिथं रहायला तयार नव्हती. त्यांचे शालेय प्रवेशही झाले नव्हते. सतत वडिलांविषयी विचारणा करू लागले. मग मुलांमुळे तरी दुसऱ्या लग्नाचा विचार सोडेल, असा विचार करून त्यांना पाठवलं, तर त्यानंतर आजतागायत मुलांचं तोंड पाहिलं नाही की आवाज ऐकला नाही!’’ त्या हळुवार झाल्या. मुलांच्या आठवणीने व्याकूळ झालेलं त्यांचं मन स्पष्ट कळत होतं. काही सेकंद गप्पच राहिल्या.

‘‘10 ऑक्टोबर 2015 ला स्पीड पोस्टाने तलाकनामा पाठवला. त्याचबरोबर मी घरातील पैसे- दागिने घेऊन गेले, अशी केस केली. ती स्पीड पोस्ट पाहून मी तर हादरून गेले. कितीही भांडणं झाली तरी आपला ‘तलाक’ होईल, असं कधीही वाटलं नव्हतं. मी तर नेहमीच त्यांना पाठिंबा दिला. कधी त्रासही दिला नाही. दर वेळी तडजोड करून राहिले. त्याच्या चुकांवरही पांघरूण  घालत राहिले. इतकं सगळं करूनही आपल्या वाट्याला हे दु:ख का, हे कळतंच नव्हतं. सुरुवातीला मुफ्ती- मौलानांकडे गेले. सगळ्यांनी सांगितलं, तलाक तर झालाच. शरियतमध्ये असंच असतं. आम्हीही ते सत्य मानून बसून राहिलो. आयुष्यात तोवर मी कधी तलाकपीडित स्त्री पाहिली नव्हती. माझ्या कुटुंबात खूप सुशील माणसं. याविषयी ऐकून होते, पण स्वत:वरच ते ओढवेल याची जराही कल्पना नव्हती.

त्या तलाकनाम्याने खूप खचले. नैराश्यात गेले. सहा-सात महिने डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू होती. नैराश्यातून बाहेर येणंही सोपं नव्हतं. त्याच्या कुठल्या-कुठल्या औषधांचा परिणाम मन- मेंदूवरही झाला होता. स्वत:च मग्न राहू लागले होते. खूप खडतर होता तो काळ. साऱ्या आठवणी ताज्या होत्या. भयंकर त्रास व्हायचा. मुलांची आठवण यायची. वाईट विचार यायचे आणि कोणाला काही सांगताही येत नसे. पण त्यानं दुसरी केस जी दागिने-पैशांची केली होती, त्यासाठी इलाहाबादला वारंवार जाणं शक्य नव्हतं. म्हणून मग ती केस काशीपूरला ट्रान्सफर करून घ्यायची होती. राज्यांतर्गत केस ट्रान्सफर करायची असेल, तर उच्च न्यायालयात जावं लागतं; पण आंतरराज्य असेल, तर सर्वोच्च न्यायालयात.

माझे बंधू अर्सदअली यांना इथल्या लोकल वकिलांनी सर्वोच्च न्यायालयातील वकील बालाजी श्रीनिवासन यांच्याविषयी सांगितले. स्त्रियांच्या केसेस लढण्यासाठी ते एकही पैसा घेत नाहीत, अशीही त्यांनी माहिती दिली. माझे बंधू त्यांच्याकडे कागदपत्रं घेऊन गेले. बालाजी श्रीनिवासन यांनी केस ट्रान्सफर करून घेण्यासाठी तर अर्ज केला; पण त्यांच्या लक्षात आलं की, फारच अन्यायकारक प्रथा आहे आणि हे सारं अघटनात्मकही आहे. त्यांनी भावाला सांगितलं की, ‘तुम्ही या विषयावर आवाज उठवू शकता. कायदेशीर लढा देऊ शकता. तुम्ही तयार असाल, तर मी तुमची बाजू लढवेन. यासाठी तुम्हाला समाजाकडून खूप निंदानालस्ती सहन करावी लागेल. तुमच्यावर फार दबाव येतील, कदाचित समाजातून वाळीत टाकतील. मस्जिदमध्ये प्रवेश नाकारतील. हे सोपं नसेल. घरी जा. दोन-तीन महिने विचार करा आणि मग ठरवा...’’

शायराबानो यांच्या कुटुंबीयांच्या हिमतीची खरंच दाद द्यावी लागेल. मुस्लिम समाजाचा आणि इथल्या मुल्ला-मौलवींचा रोष गृहीत धरून एक धाडस करायला ते अवघ्या पंधरा दिवसांत तयार झाले. त्याच वेळी एकही पैसा न घेता केस लढण्यास तयार असणाऱ्या बालाजी श्रीनिवासन यांचंही कौतुक वाटलं. त्यांच्या वडिलांनी अवघ्या पंधरा दिवसांत बालाजी श्रीनिवासन यांना कळवलं की, ‘आम्ही तिहेरी तलाक बंद करण्यासंदर्भात याचिका करायला तयार आहोत. माझ्या मुलीवर आली तशी वेळ इतर कुणावर येऊ नये.’ तरीही वकील म्हणून ते पुन:पुन्हा समजावत होते की, ‘पाहा, तुम्ही उद्या मागे हटलात, तर फार अवघड होईल. नीट विचार करून निर्णय घ्या. तुम्ही तयार झालात तर मी पूर्णत: लढेन. लोक घाबरवायला येतीलच, पण तुम्ही हटू नका. आपल्या म्हणण्यावर कायम राहा. हे शक्य असल्यासच याचिका करू.’

शायराबानो सांगतात, ‘‘आपल्यावर अन्याय झाल्याने तलाक म्हणजे काय, हे कळतंय. जर याचिकेनं इतर मुलीं/बायकांना न्याय मिळणार असेल, तर आपण निश्चितच करू. मनात या सगळ्याविषयी चीड होती. मग म्हटलं, कुणाला आणि का घाबरायचं? साऱ्या कुटुंबीयांचं एकमत झालं आणि देशातून तिहेरी तलाकचं उच्चाटन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात फेब्रुवारी 2016 मध्ये पहिली याचिका दाखल झाली.’’ दरम्यान, त्यांनी मुलांचा ताबा आणि पोटगीसाठी काशीपूर फॅमिली कोर्टातही अर्ज केला. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर माध्यमांमधून या केसविषयीची माहिती देशभर पसरायला वेळ लागला नाही. मागील सत्तर वर्षांमध्ये तिहेरी तलाक या प्रथेविरुद्ध थेट न्यायालयीन आव्हान देऊन मोडून काढण्याचा प्रयत्न झाला नव्हता. त्यामुळे याचिका दाखल होण्यालाच ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झालं होतं.

पण एकीकडं त्यांनी जरी मुस्लिम महिलांच्या अन्यायाविरुद्ध याचिका दाखल केली होती, तरी दुसरीकडं याच महिलांना त्यांच्याविरुद्ध शस्त्र म्हणून उभं करण्याचे प्रयत्नही सुरू झाले होते. ‘तिहेरी तलाकला आमचा विरोध नाही’, ‘तिहेरी तलाक आम्हाला मान्य आहे, परंतु यात अन्य धर्मीयांचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही’, ‘हमारी शरियतमें दखलअंदाजी बर्दाश्त नहीं करेंगे’ असे निरनिराळे आवाजही त्याच वेळेस जोर धरू लागले. या आवाजांना बहुतांश वेळा महिलांचा चेहरा देण्यात आला. वेगवेगळ्या पातळ्यांवर शरियतमध्ये बदलाव नको म्हणून सह्यांची मोहीम राबविण्यात आली. मुस्लिमांचे कैवारी समजणाऱ्या राष्ट्रीय संस्थेकडूनही अशी सह्यांची मोहीम आखण्यात आली. याचे पडसाद, याचा परिणाम शायराबानो यांच्यावर व कुटुंबीयांवर पडणं साहजिक होतं, परंतु कुठल्याही क्षणी ते डगमगले नाहीत. त्यांच्या भावांना भेटून मौलाना लोक समजूत काढू लागले. अशी याचिका दाखल करून ते काय साध्य करणार आहेत, इस्लामला का बदनाम करत आहेत, याचे परिणाम चांगले होणार नाहीत... अशा धमक्या येऊ लागले. केसच्या काळात वर्ष-दीड वर्ष त्यांना अशा अनेक प्रकारच्या दबावांचा सामाना करावा लागला, परंतु त्यांनी  कधीही पीछेहाट केली नाही. माध्यमांच्या चर्चेतही उपस्थित मौलवी लोक त्यांना म्हणत की, यांना तर कुठून तरी फंड येत असेल. कुणी तरी पैसा पुरवत असणार म्हणूनच इस्लामला बदनाम करत आहेत.

त्या म्हणतात, ‘‘रिझवानने माझ्या वडिलांचं 15 लाखांचं घर स्वत:च्या नावे करून घेतलंय. त्या पैशांसाठी, पोटगीसाठी आम्ही तडफडतोय आणि हे कशाच्या आधारे म्हणतात पैसा येतोय? वर इस्लामला बदनाम करण्याचा प्रश्नच कुठंय? जे चूक आणि अन्याय्य होतं, त्याविरुद्धच आम्ही बोलत होतो. कधी काळी ते असेलही योग्य, पण आत्ताच्या काळात त्याचा संदर्भ किंवा त्यामागचा उद्देश न समजून घेता पुरुष आपली मनमानी करण्यासाठी त्या प्रथांचा वापर करतोय, त्याचं काय?’’ माध्यमांच्या चर्चेत जर आपण पाहिलं, तर शायराबानो यांना बोलताही येत नसायचे. त्यांचं नैराश्य, ओढवलेला प्रसंग याचाही परिणाम होताच. मौलवींच्या म्हणण्याचा कधी दबाव वाटला का, त्यामुळं बोलत नव्हत्या का, असंही वाटलं.

त्यांना तसं विचारलं तर म्हणाल्या, ‘‘मुझे कभी डर नहीं लगा. नहि कभी ये छोड देने का खयाल आया. हां, मुझे ज्यादा खुलकर बात नहीं करना आती थी और वे लोक चिल्लाचिल्लाकर हमपर गंदे आरोप करते थे. हमारे बारे में भली बुरी बाते करते थे तो बहुत दुख होता था. पर केस पीछे ले लूँ, चुप हो जाऊँ- ऐसा कभी नहीं लगा. मेरा परिवार मेरे साथ था, शायद तभी मैं वह हिम्मत कर पायी. वही तो सोचती हूँ कि जब दुसरी औरतोंके पास ऐसा कोई सपोर्ट नहीं होगा तो वो क्या करेंगी- अगर माँ बाप कह दे चलो, अब शादी कर दी, अब बाकी वही देख लेंगे, कहाँ कोई साथ देते है. इनसे मेरी भी हिम्मत बढती कि चलो ऐसी औरतों के लिए कुछ अच्छा होगा. मेरी भी तो बेटी है ना. उसके लिए भी भला होगा. और हो भी गया. वैसे तो कोर्ट कचेरी में सालों लगते पर यहाँ तो दो सालमेंही डिसिजन आ गया.

कोर्ट ने तीन तलाक को बॅन किया. उस वक्त कोर्टरूममें लॉयर्स और एनजीओ के कुछ लोग, पिटिशनरही थे. बाकीओंको मना था. मैं अकेलीहि अंदर थी. शुरूवात में तो दोन जजेसने तीन तलाक को बॅन करने के खिलाफ कहाँ. डर सा लगा. पर बादमें तीन जजेसने तलाक को बॅन करार दिया तो बहुत खुसी हुई. ऐसा लगा, जो मेहनत की थी वो वसूल हो गयी. अभी हलाला और बहुविवाहके खिलाफ भी लढेंगे. इस डिसिजन के बाद कॉन्फिडन्स भी बढा. लोग तो उसके बाद भी कहते, अब तो ढेरो पैसा मिला होगा. बिल पारित हुआ तब भी कहाँ काफी पैसा आया होगा. पर असलीयत तो हमही जानते. हमारे तो वकील अच्छे है. उन्होंने एक रुपै नहीं लिया. वरना सुप्रीम कोर्ट के वकिलोंकी तो फी 5-5 लाख होती है. हमने कई बार खुशीसे भी देने की कोशिश की तब भी उन्होंने नहीं लिया. ऐसे लोग मिले तभी आगे बढ पाये.’’

शायराबानो यांनी लग्नाच्या तेरा वर्षांतही खूप सहन केलं आणि लग्न मोडल्यानंतरही. आता मात्र त्या स्वत:ला त्यातून सावरण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. त्यांनी एमबीएसाठी प्रवेश घेतला आहे. त्यानंतर नोकरी करण्याचाही त्यांचा मानस आहे. प्रवाहित राहण्यालाच अर्थ आहे हे उमजलं आहे, असं त्या म्हणतात. इतकंच नव्हे, तर आपण विनाकारण इतकी वर्षं सहन करत राहिलो. तेव्हा वाटायचं की- घर का मोडायचं? घरात वाद का निर्माण करायचे? पण वेळीच जर सावध झाले असते, तर असा प्रसंग आलाच नसता. त्यामुळेच इतर मुलींनीही सहनशक्तीची सीमा आखून घ्यायला हवी, असं त्या सुचवतात.

शायराबानो यांची लढाई संपलेली नाही. त्यांची दोन्ही मुलं- म्हणजे बारा वर्षांचा इरफान आणि दहा वर्षांची मुस्कान- यांना भेटण्याची, पुन्हा परत आणण्यासाठी त्यांना झगडा द्यायचा आहे. त्यासाठी त्यांची केस सुरूच आहे. पोटगीसाठीसुद्धा त्यांनी केस केली आहे. मुलं लहान आहेत आणि सतत त्यांना ‘मम्मी ऐसी है, मम्मी वैसी है’ असं सांगितलं जातं. त्यांच्या मेंदूत तसंच भरवलं तर तीसुद्धा काय करणार? निर्णय घेण्याच्या वयाचीसुद्धा नाहीत. मुलांचं ब्रेन वॉश केल्याचं शायराबानो यांचं म्हणणं आहे, म्हणूनच ती त्यांना दाद देत नाहीत. पण कधी ना कधी त्यांना मम्मी कशी आहे, ते कळेलच. एक प्रश्न सुटला की, दुसरा आपोआप सुटेल. पण त्यांची खूप आठवण येते. भरून येतं.

यादरम्यान मुलांनी-पतीने संपर्क करण्याचा कुठला प्रयत्न केला का, असं विचारल्यावर शायराबानो थंडपणे म्हणाल्या, ‘‘रिझवानने तो दुसरी शादी भी की है.. पता नहीं लोग ऐसे दो बच्चे के बाप को बेटी देते भी कैसे है? पर समाज अब भी ऐसे लोगो का साथ देता है तो बहुत बुरा लगता है. खैर... बच्चोंकी तो बहुतही याद आती है. सोचते है क्या कर रहें होंगे, कैसे होंगे? वह नयी औरत कैसे रखती होगी? माँ तो माँ होती है. दुसरी माँ तो दुसरी माँ होती है. बहुत दुख होता है. पर एक दिन बच्चे भी समझ लेंगे. फिर एक नया आशियाना होगा.’’  आपण यावर काय रिॲक्ट व्हावं, हे सुचत नव्हतं. मोडलेल्या संसारावरही आपल्या मुलांसमवेत ‘नया आशियाना’ बनवण्याचा शायराबानो यांचा आशावाद भावला. आपल्या दोन मुलांपासून त्या जून 2015 पासून दूर आहेत. दु:ख-नैराश्य पचवून आलेली ही सकारात्मकता त्यांना त्यांच्या इच्छापूर्तीसाठी दीर्घ काळ ऊर्जा देणार, हे तर स्पष्ट जाणवत होतं.  

आफरिन रेहमान (जयपूर, राजस्थान)

प्रवास जयपूरच्या दिशेने सुरू झाला. शायराबानो यांच्यानंतर दुसरी याचिका जयपूरच्या आफरिन रेहमान या अठ्ठावीस वर्षीय तरुणीने केली. आफरिन एमबीए (फायनान्स) झाली आहे. पाचही याचिकाकर्त्यांमध्ये आफरिनचं वय कमी आहे. लग्नानंतर वर्षभरातच तिचा तलाक झाला. एकोणीस-वीसची असेल, तेव्हा तिच्या वडिलांचा हार्टॲटॅकने मृत्यू झाला होता आणि लग्नानंतरच्या वर्षभरातच एका अपघातात आईचं निधन झालं. त्या अपघातातून ती स्वत: कशीबशी वाचलेली होती. पण आई गेल्याची जखमच तर ठसठशीत होती. तिचं मन आईच्या नसण्याचा स्वीकार करायला धजावत नव्हतं. त्या दु:खाचा कढ ओसरला नव्हता, त्याच सुमारास तिच्यावर ‘तिहेरी तलाक’चा आघात झाला. आई-बापाविना पोरक्या झालेल्या आफरिनला जेव्हा तिच्या पतीची सर्वाधिक गरज होती. ज्याच्या प्रेम आणि काळजीने ती आपल्या जखमांवर आणि दु:खावर फुंकर मारणार होती. नेमका त्याच वेळेस तिच्यावर अवघड प्रसंग ओढवला. त्या दु:खद काळातून बाहेर पडायला तिला वेळ लागला खरा, पण त्यातूनच तिची एक सशक्त व्यक्ती म्हणून घडवणूक झाली.

याचिका दाखल झाल्यानंतरचा सुरवातीचा काळ पाहिला, तर विविध माध्यमांच्या चर्चांमध्ये आफरिन दिसली. केवळ चर्चा असेल तर गोष्ट निराळी असते; परंतु जर माध्यमांनी वाद-विवादाचा कार्यक्रम ठेवला असेल, तर चर्चा रंजक आणि गरमागरम करण्यासाठी समर्थक व विरोधक अशा दोन प्रवाहांचा मेळ बरोबर साधलेला असतो. तिहेरी तलाकच्या अशा गरमागरम वादविवादांमध्येही आफरिन निर्भीडपणे भेटलेली आहे. अनेकदा तर तिचे राहणीमान, पेहरावावरून ठपकेही ठेवण्यात आले. ‘आप बहोत बोल्ड हो’, ‘आप मीडिया तक आयी हो तो जरूर कुछ बात होगी’, ‘आपके कॅरेक्टरकी वजहसेहि आपको तलाक दिया होगा’ ‘ससुराल के बारेमें ऐसे सरेआम किचड उछाल रही हो तो पता नहीं घरमे क्या किया होगा’ यांसारखे अगणित आरोप चॅनेलच्या कॅमेरासमोर करणाऱ्या आणि ते थेट प्रक्षेपित होतंय याचं भानही विसरलेल्या मौलवी-अभ्यासकांपुढे आफरिनने कधीच नांगी टाकली नाही. त्यांच्या बोलण्याकडे कधी हसून, कधी दुर्लक्ष करून टाळलं.

आपल्या लढाईची पकड तिनं सोडली नाही, की ती खेचू पाहणाऱ्या मौलवींच्या हाती जाऊ दिली नाही. ती अत्यंत निर्भीडपणे तिहेरी तलाक, हलाला, बहुपत्नीत्व या मुद्यांचा विरोध करत राहिली. आपलं म्हणणं मांडण्याची कलासुद्धा असावी लागते. तो गुण तिनं या प्रवासातच कमावला. म्हणूनच ‘जयपूर टेडटॉक’च्या एका मोठ्या व्यासपीठावरूनही तिनं आपली आपबिती सांगून तिच्या सशक्त व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवून दिली. तिची ही सगळी पार्श्वभूमी माझ्या मनाच्या तळाशी होतीच. या भेटीनंतर तिच्या व्यक्तिमत्त्वाले कंगोरे अधिक कळणार होते. ‘गुलाबी शहर’ असणाऱ्या जयपूरचा गुलाबी साज पाहत चित्रकूट, वैशालीनगर या परिसराकडे निघाले होते. 200 फूट बायपास चित्रकूट हा लांबलचक बायपास रस्ता आहे. माझ्यासारख्या नवख्या आणि रिक्षावाल्यालाही फारसा परिचित नसणारा परिसर असल्याने आम्ही बराच वेळ त्या रस्त्याच्या अवती-भवती फिरत राहिलो. त्यावरून वैशालीनगर हा परिसर मध्यम व उच्च मध्यमवर्ग लोकवस्तीचा असल्याचं दिसत होतं. अखेरीस ती राहत असलेल्या ठिकाणी पोहोचले.

आफरिन व तिचे कुटुंबीय आदल्या रात्री जोधपूरहून प्रवास करून सकाळी अकराला पोहोचले होते. त्यामुळे थकलेल्या इतर कुटुंबीयांना काही भेटता आलं नाही, परंतु आफरिनशी मोकळा संवाद झाला. तिच्या रूममध्ये शिरता-शिरताच ती म्हणाली, ‘यु नो, मुस्लिम वुमन प्रोग्रेस्ड इन देअर थिंकिंग, देअर आऊटलुक बट मेन आर स्टील रिग्रेसिव्ह. जस्ट लुक ॲट यू, यू केम अलोन टू मीट. पर आज भी हमारी सोसायटी के मर्दोंको ये किसी अजूबेसे कम नहीं लगता. दे स्टिल लिव्हज इन फोर्टीन्थ सेंच्युरी. आय रिअली फील, मेन नीड टू चेंज देअर आऊटलुक. इट्‌स मोअर हेल्पफुल टू देम रादर दॅन वुमन.’’ आफरिनची कळकळ बरोबर होती. पण त्यात गडबड इतकीच होती की, पुरुषच नाही तर काही  बायकाही चौदाव्या शतकात जगत आहेत, तर फक्त स्त्रियाच नव्हे तर पुरुषही एकविसाव्या शतकात जगत आहेत. त्यामुळे प्रोग्रेस्ड होण्याची गरज ही दोघांनाही सम प्रमाणात होती. अर्थात, तिनं जे पुरुषप्रधान मानसिकतेमुळे आणि त्यापद्धतीने बनलेल्या समाजाकडून सोसलं होतं, त्यावरून तिचा त्रागा योग्य होता.

पारंपरिक पद्धतीने पाहून जरी आफरिनचं लग्न ठरलं तरीही लग्नाचा प्रस्ताव पारंपरिक पद्धतीने नातेवाइकांकडून आलेला नव्हता. ‘शादी डॉट कॉम’ या विवाहेच्छुकांच्या संकेतस्थळावरून त्यांचे प्रस्ताव एकमेकांकडून मंजूर झाले होते. आफरिन सांगते, ‘‘जानेवारी 2014 में शादी डॉट कॉम से इंदौर के अशहर वारसी इनका प्रोफाईल मुझे आया. जनरली लडका क्या करता है, कैसा है, फैमिली में कौन है इस तरह की मालुमात ले ली. फिर उसके बाद वे लोग घर आये. देखना दिखाना हुवा. अशहर लॉयर है. उनके पापा भी डीवायएसपी रह चुके है. मम्मी भी वेल एज्युकेटेड रही. काफी रेप्युटेड फॅमिली लगी. काफी प्रॉपर्टी और पैसा भी था उनके पास. अशहरके भी पापा नहीं थे. बस, एक छोटा भाई था. वो भी मुंबई में फिल्मलाईनमें करिअर कर रहा है. किसीभी प्रपोजलके बारे में जितना जानना-समझना होता है, हमने भी सब मालुमात ले ली. उपरसे तो सभी ठीक ही था. उनके फैमिलीने भी मुझे पसंद किया तो अप्रैलमें फिर एंगेजमेंट हुई. रोका होता है बस वैसा, छोटासाही. जनवरीसे तो हमने कभी एक दुसरे को कोई बातचित नही की थी पर अप्रैल के बाद थोडा थोडा बात करना शुरू किया.

उस वक्त अशहर एक नाईस डिसेंट गाय लगते रहे. शादी के लिए उन्होंने कहा था की फाइव्ह स्टार में शादी हो. दहेज और जेवरात भी देना था. अब मेरे भी पापा नहीं है. भार्इंयों पर इसका बोझ आना था. पर मेरे भाईने भी दस लाख का कर्जा ले कर फोर स्टार रिसॉर्टमें शादी का इंतजाम किया और 24 ऑगस्ट 2014 को शादी हो गयी.’’ अशहरचा दुटप्पीपणा तर इथंच अधोरेखित झाला होता. आफरिनने दिलेल्या माहितीनुसार अशहर वारसी हा पटियालाच्या ‘राजीव गांधी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लॉ’ अशा नावाजलेल्या संस्थेतून वकील झाला होता. हुंडा घेणं हा कायद्याने गुन्हा आहे, ही बाब उच्चशिक्षित आणि त्यातही वकील असणारा व्यक्तीच जर अमलात आणणार नसेल तर बाकी सर्वसामान्यांकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? आपल्या समाजात हुंडा घेणं-देणं ही अद्यापही सर्वसामान्यच बाब आहे. मुलींचं लग्न होणं महत्त्वाचं मानलं गेल्याने प्रत्यक्ष रोख रकमेत असो वा वस्तूंद्वारे हुंडा दिला घेतला जातोच. आफरीनचेही सासूच्या प्रतिष्ठेप्रमाणे लग्न झालं.

आफरीनही पुढे सांगते, ‘‘सुरुवातीचे दिवस नव्या नवरा-नवरीसारखे सुंदर होते. सारं काही छान आलबेल सुरू होतं. दोन-तीन महिन्यांनंतर सासूच्या थोड्याफार तक्रारी सुरू झाल्या. घरगुती पद्धतीच्या. परंतु माझं आणि अशहरचं चांगलं सूत जुळलं होतं. नवरा-बायकोमध्ये प्रेम असतं, थोडी लुटूपुटीची भांडणं असतात, कधी काळजी असते, कधी तक्रार असते. असं सारं काही आमच्या नात्यात होतं. माझं राहणीमान आधुनिक होतं. अशहरबरोबर फिरायला जातानाही जीन्स-टॉप घालायचे, तर कॉलनीतल्या लोकांना फार हेवा वाटायचा. आम्हाला ‘मेड फॉर इच अदर कपल’ असंही लोक नावाजायचे. इतकं सगळं सुरळीत होतं. माझे सासरे नाहीत, दीर मुंबईला असतो. राहता राहिले अशहर. त्यामुळे त्यांना आपला मुलगा आपल्यापासून दुरावेल का, अशी असुरक्षितता वाटत असणार. ते जाणवायचं अधूनमधून. खरं तर मी अगदी लहानातली लहान गोष्ट सासूलाच विचारून करायचे. तरीही त्यांना कुठं तरी ते वाटायचं की, ही आधुनिक आहे. स्वतंत्र आहे. नोकरी करते. म्हटल्यावर काही प्रमाणात तरी माझ्याही मतांना महत्त्व आहे. काही निर्णय माझेही चालतात. याच गोष्टी त्यांना खटकायच्या. पण त्यांनी तेही कधी स्पष्टपणे सांगितले नाही. पण त्यांच्याकडून तलाक यावा, असं टोकाचं तर काहीच घडलेलं नव्हतं.’’

आफरिनला स्पीडपोस्टनेच तलाक आला होता. तलाकनामा येण्याआधी तर ती माहेरी होती. बायको सासरी वा पतीसोबत असतानाच तिच्या हाती तलाकनामा देण्यापेक्षा तिला माहेरी धाडून मग तलाकनामा पाठवून देणं, असे प्रकार बऱ्याचदा पाहण्यात आले. आफरिनला माहेरी पाठवलेलं नव्हतं, पण त्याआधी असं काही घडलं होतं की ती माहेरीच होती. आफरिन त्याविषयी सांगते, ‘‘आम्ही तसे मूळचे जोधपूरचे. आमचं लहानपण तिथंच गेलं. कामानिमित्त एक भाऊ जयपूरला येऊन राहत होता. दुसरा भाऊ आणि आई जोधपूरला राहायचे. आई सतत आजारी असायची. तिच्या ट्रीटमेंटसाठी जयपूरला येत असू. त्याच वेळेस मीही जयपूरला आले होते.

दि.4 ऑक्टोबर 2015 रोजी जोधपूरला नात्यातलं एक लग्न होतं. आम्हाला दोघींनी तिथं जायचं होतं. अशहरदेखील तिथं येणार होते. त्यामुळं भावानं आम्हाला 2 ऑक्टोबरला जयपूरहून ट्रॅव्हल्समध्ये बसवून दिलं. आई फारच जाड होती. तिच्याकडून फारसं चालणं होत नसे. त्यामुळं आम्ही ट्रॅव्हल्सने निघालो. अर्ध्याहून जास्त प्रवास झाल्यानंतर चारच्या सुमारास मला जाग आली तेव्हा पाहते तर काय- आमचा खूप मोठा अपघात झाला होता. आम्ही ड्रायव्हरच्या मागील सीटवरच होतो. ड्रायव्हर जागेवर मेला होता. आई खिडकीच्या बाजूनं होती आणि खिडकीची काच तुटली होती. समोरची काच तुटून पडली होती. आई तर रक्ताच्या थारोळ्यात होती. तिला मी उठवण्याचा निष्फळ प्रयत्न केला, पण ती उठली नाही. ज्या गावात अपघात झाला तिथं छोटंसं हॉस्पिटल होतं. मी भावाला फोन करून कसंबसं कळवलं. दवाखान्यात गेल्यावर लोकांनी दाखवल्यावर माझ्या लक्षात आलं की, मी स्वत:ही जखमी होते. त्या क्षणी आईसाठी उभं राहणं गरजेचं असल्यानं मला माझं दुखणं फारसं काही जाणवलंच नाही. हाताला, तोंडाला, छातीला जखमा झाल्या होत्या. डॉक्टरांनी आईला तपासून पाहिलं आणि म्हणाले, ‘तिचे  प्राण गेले आहेत.’

पायाखालची जमीनच सरकली. एकाकी, पोरकं, हतबल वाटू लागलं. भाऊ आले. अशहर आला. तो दिवस भयंकर होता. रात्री सोबत निघालेली आई आता नाही, ही गोष्ट पचवणं फार अवघड होतं. वडील तर नव्हतेच, आता आईसुद्धा नव्हती. मला कळत नव्हतं की, माझं सुख-दु:ख आता कोणाला सांगणार? कुटुंबात मला आई फार प्रिय होती. आम्ही मैत्रिणीसारख्या होतो पण आता तीच जगात नव्हती.’’ आफरिनसाठी हा प्रसंग निश्चितच अवघड होता. जोधपूरमध्येच आईची दफनविधी झाल्यानंतर तिला पुन्हा जयपूरला नेण्यात आलं. इथं आल्यानंतर तिच्या जखमा, खरचटलेल्या जागी औषधं लावायची म्हणून डॉक्टरांनी तपासणी केली, तर लक्षात आलं की, तिच्या सहा रिब्स तुटल्या होत्या. हात वर उचलता येत नव्हता. झोपताना सरळच झोपायचं. एका अंगावर व्हायचं नाही. आई नसण्याचा मानसिक धक्का तर होताच, परंतु आता शारीरिकही त्रास सुरू झाला होता. त्या वेळेस अशहर तिच्यासोबत होता. पुढील दहा दिवसही त्यानं तिची सेवा केली. तिला खाऊ-पिऊ घालणं, तिच्यासाठी काळजी करणं- असं कुठल्याही पती-पत्नीच्या नात्यातलं चित्र होतं.

आफरिन सांगते, ‘‘वो बंदा मेरे सामने बैठ के रोता था. तुम्हे ये क्या हुआ? कैसे हुआ? पर वही आदमी दस दिन बाद तो पुरा बदल जायेगा ये बिलकुल पता नहीं था. उस वक्त मेरी सास हज गयी हुई थी इसलिए ही शायद वह दस दिन मेरे साथ रहा. फिर एक और बार आ कर अब घर जाना है, अगली दफा तो सामान ले कर जाता हूँ ऐसे बताया और सारे कपडे भी लेकर गया. इतना सबकुछ ठीक चल रहा था. पर उनके दिमाग में पता नहीं क्या चल रहा था. उन्होंने फोन पर ब्लॉक किया. फिर सोशल मीडियासे ब्लॉक किया. फोन ले नहीं रहे थे. तब तक सास आयी हुई थी. उनसे कहती की आप कब आ रही हो. मुझे घर आना है. अब यहॉँ तो मेरे माँ-बाप तो नहीं रहे अब वही मेरा घर है. वो भी बस कहती कि अगले हफ्ते आयेंगे. अशहरसे बात नहीं हो रही थी. बहुत परेशान हो गयी थी. घंटो सोचने लगी कि हुआ क्या? कुछ तो गडबड है यह समझ आ रहा था फिर भी तलाक होगा ऐसा नहीं लगा था. तब तक मुझे इस बारेमें ज्यादा नॉलेज भी नहीं था. कॉलेज में बस दोस्त कहते थे कि, तुम्हारे में ऐसा होता है तो हमको भी लगता था, हां यार होता है. पर वो ॲक्च्युअल कैसे होता है यह तो तलाक होने परही पता चला.’’

दि.27 जानेवारी 2016 रोजी तिला तलाक पाठवण्यात आला. तिच्या भावांनी सुरुवातीला तलाकच्या पत्राविषयी माहिती दिली नाही. दोघांमध्ये बातचित घडवू या, म्हणून ते तिला थेट इंदोरला घेऊन गेले. परंतु तिथं ना कोर्टात, ना घरात- कुठंच त्यांची माहिती मिळाली नाही. तो आधीच पसार होता. शेवटी भावांनी आफरिनला वस्तुस्थिती सांगितली. त्या क्षणी आपण लहान मुलांसारखे रडत राहिल्याचं आफरिन सांगते. ‘‘अगदी बेसहारा, बेचारे झाल्यासारखं वाटलं. आईच्या गळ्यात पडून रडावंसं वाटत होतं, पण ती कुठं होती? पाण्याविना मासा तडफेल तशीच मीही तडफडत होते. तलाकनामा त्यानं स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेला होता. ‘मैंने तुम्हे तलाक दिया’ हे वाक्य, तो परिच्छेद तर मी एकदा नव्हे दहादा वाचत होते. पहिल्यांदा तर काही कळलंच नव्हतं, काय म्हणतोय? काय झालंय? विश्वासच बसत नव्हता. वेडीपिशी झाले होते.’’

आफरिनसाठी तो काळ फार कठीण होता. ती म्हणते, ‘‘आजपर्यंत मला तलाक का दिला, हेच कळलेलं नाही. असं नाही की दोन माणसं वेगळी होत नाहीत, पण त्याची किमान एक पद्धत असायला हवी. आपण सुशिक्षित माणसं आहोत. बसून, बोलून, सांगून समज-गैरसमज दूर करता आले असते. ज्याला तलाक दिला जातोय, त्याला किमान कारण तर सांगितलं पाहिजे. दोन्ही बाजू मांडल्या पाहिजेत. माझ्या तलाकनामात म्हटलं की, मी फार खर्च करायचे; पण मी तर स्वत:च कमवत होते. त्यांचा पैसा तर कधी वापरलाही नव्हता. मग? ‘सुख में कमी है’ असंही नमूद केलं. त्याचा तर रागच आला. या सुखाची तर स्पष्टताच नाही. नवरा- बायकोतलं सुख? घरकामाचं सुख? की आणखी काही म्हणायचंय? किमान त्यात तरी स्पष्ट असावं.’’

या सगळ्यातून तिला प्रचंड डिप्रेशन आलं. डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू झाली. दरम्यान, जयपूरमधील मोठमोठ्या उलेमांनी त्यांचा तलाक वैध ठरवला होता. त्यातील एक- दोघा मौलानांनी असा तलाक अवैध आहे, तीन महिन्यांचा इद्दतचा काळ न घेता तलाक होऊ शकत नाही- असं म्हणून अशहरशी संपर्क साधला. बैठक करू या. आई-बापाविना पोर आहे, लग्न वाचवा, असं सांगितलं. समेट घडवण्यासाठी खूप प्रयत्न केले. तिने स्वत: अनेकदा ‘आपण पुन्हा सुरुवात करू’ म्हटलं. पण त्यांनी  कशालाच दाद दिली नाही. सगळी नकारात्मकता घेरून होती. जगणंच नकोसं वाटून तिनं आत्महत्येचा प्रयत्नही केला, पण बचावली. तिच्या हातून चांगलं काही तरी घडणं बाकी होतं अद्याप.

त्या सुमारास तिने एक बातमी वाचली, ज्यात यूपीच्या एका न्यायाधीशांनी आपल्या पत्नीला तलाक दिला होता. ‘‘मी चकित राहिले. कुणाला काही भिडभाडच नाही. बिद्दत तर शब्दातच गलत, गुन्हा असं आहे. मग कुणीही असं तलाक-ए-बिद्दत कसं देतं? शायराबानोंच्या केसविषयी दरम्यान वाचण्यात आलं आणि ठरवलं की, आपणही याचिका दाखल करू या. आपण सुशिक्षित आहोत, तर आपल्या हक्कासाठी लढणं हे तर आपलं काम आहे. शिवाय ना आई-वडील आहेत, ना नवरा आहे. मागे-पुढं पाहणारं कुणी नाही तर कुणासाठी घाबरायचं कारणच नाही, समाज काय करणार आहे? पण केस कशी करतात माहिती नव्हतं. यासाठी माझ्यासोबत कायम माझी आतेबहीण नसीम अख्तर उभी राहिली. ती स्वत: महिला प्रश्नांसाठी काम करते. तिने तिच्या परिचयातील वकिलाकडे पाठवलं. पहिल्याच भेटीत म्हणाले, ‘इस्लाम का नाम तो खराब करेगी पर मेरा भी करेगी.’ महिन्याभरात लक्षात आलं की, तो केस करणार नाही. मग नसीम- आपाच्या दिल्लीतील परिचित वकिलाने केवळ 10 हजार रुपये फी घेतली आणि केस दाखल केली. हे पैसेदेखील नसीमआपानेच दिले. माझ्याकडे पैसे तरी कुठं होते?

याचिकेनंतर असं वाटू लागलं की, ठीक आहे, आपण जगलं पाहिजे. लाईफ बेटर वाटू लागलं. पॉझिटिव्ह होप वाटू लागली.’’ आफरिनने स्वत:ला जरा कुठं सावरायला सुरुवात केली होती की, तिच्यावर दुसरा आघात झाला. तिच्या मोठ्या भावाचे अपघाती निधन झाले. अशा सगळ्या घटनांतून ती तावून-सुलाखून निघाली. अधिक सशक्त बनू लागली. माध्यमांतूनही तिला निमंत्रणे येऊ लागली. अनेकांनी तिच्यावरही फंड मिळत असल्याचा आरोप केला. तिच्या आधुनिक राहणीमानावरून तिच्या चारित्र्यावर ठपका ठेवण्यात आला. केस मागे घेण्यासाठी दबाव टाकत, तिची बदनामीही करत. पण ती म्हणते, ‘‘केस क्यों पीछे ले? मेरे साथ जो हुआ वो मुझे पता है. फिर ये उलेमा लोग किस चीज का इंतजार कर रहे कि उनकी बेटियोंके साथ हो? एक साँसमें तीन दफा तलाक कह दो, रिश्ता टूट जायेगा. शादी टूट जायेगी. हम मिडल क्लास लोग है. शादी हमारे लिए मायने रखती है. प्यार, इज्जत पाना और जिंदगी बिताना दोनोंके हिसाब से बहुत बडी बात होती है.’’

सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात लग्न ही आयुष्यभराची बांधिलकी असते. आपल्याकडे तर आपण मुलींना त्याच धारणेतून वाढवतो. अशा वेळी सामोपचाराने जरी घटस्फोट होत असेल तरी स्त्री-पुरुष मोडतात, इथं तर एकतर्फीच मामला. तलाक झाल्यानंतर ‘ऑल इंडिया पसर्नल लॉ बोर्डा’कडे का आला नाहीत, अशीही तिला अनेकदा विचारणा झाली. दबाव टाकण्यात आला. पण तिचं म्हणणं- भारतीय मुस्लिम महिलांनी समजून घेतलं पाहिजे, जे आपल्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी उलेमांकडे धाव घेतात. ती म्हणते, ‘‘मी भारतीय नागरिक आहे. संविधानाच्या चौकटीत राहताना जर माझ्या मूलभूत हक्कांवर गदा आली, तर मी त्यासाठी न्यायालयाकडेच धाव घेणार. आमच्या आयुष्याचा फैसला करणारी ही इतर मंडळी कोण आहेत? आणि त्यांना अधिकार कुणी दिलाय? आम्ही न्यायव्यवस्थेवर विश्वास टाकला आणि न्यायालयानेही तातडीने केस चालवून निकाल दिला. आम्ही किमान आवाज उठवला, यातच खूप समाधानही होतं. तिहेरी तलाक बॅन झाल्याने समाधानही आहेच.

निकालाच्या दिवशी तर माझ्या डोळ्यांसमोर तलाकचं पत्र येत होतं. माझ्यासाठी त्याची किंमत शून्य होती. आनंददु: ख सारं एकवटून आलं होतं. त्या क्षणी खरं तर एका अर्थी तलाक झाल्याचं समाधानच वाटलं. जे होतं ते भल्यासाठीच होतं. वर्षभरात झालं नसतं आणि पुढे केव्हा तरी सासूने तो घडवला असता तर मी काय करणार होते? तलाक झाला नसता, तर मीही एक सर्वसामान्य आयुष्य जगले असते. मुलं झाली असती. नेहमीच्या चक्रात अडकले असते. पण अल्लाहने मला कदाचित या बदलाच्या मुळासाठी निवडलं होतं. तलाक बॅन करण्याचं निमित्त होण्याची संधी द्यायची असेल. मी ते दु:ख भोगल्यानं इतरांचं समजून घेऊ शकते. यातून मला प्रकर्षानं जाणवलं आणि मी ते इतरांनाही सांगू इच्छिते की- तुमच्याकडे हरण्याचा पर्याय आहे, परंतु प्रयत्नच न करण्याचा पर्याय असू शकत नाही. चुकीच्या बाबींविरुद्ध आवाज न उठवणे, लढा न देण्याचा पर्याय नसतोच. लढा न देता हरण्याची भीती बाळगणं तर चूकच आहे. पुरुषांनाही भलं-बुरं कळलं पाहिजे. इस्लाम धर्माने जर त्यांना काही अधिकार दिले असतील, तर ते चांगल्याकामी वापरावेत; स्वत:च्या फायद्यासाठी नव्हे.’’  

आफरिनसुद्धा शायराबानोंप्रमाणेच पुरुषांच्या बदलाचा मुद्दा मांडत होती. आपल्या व्यवस्थेत स्त्रियांवरच्या अन्यायाची बहुतांश मुळं पितृसत्ताक पुरुषप्रधानेतच आहेत. म्हणूनच या पाच जणी पुरुषांनी बदलण्याचा, वैचारिक प्रगल्भता आणण्याचा मुद्दा मांडत होत्या. या वेळी आफरिनने एक खंत व्यक्त केली. ‘‘आम्ही याचिका करून, रोष पत्करून धाडस केलं. त्यामुळे तिहेरी तलाक असांविधानिक ठरून त्याच्यावर बंदी आली. कायद्यासाठी लोकसभेतलं बिल पारित झालं. हा निकाल ऐतिहासिक आहे, असं बोललं जातं. परंतु या सगळ्याला आम्ही पाच जणी कारणीभूत ठरलो, तर त्यासाठी आम्हाला कुणी साधी एखादी नोकरीची विचारणा केली नाही. मला फार आश्चर्य वाटतं याचं. उलट, तलाक झाल्यावर मी नोकरी शोधू लागले, तर घटस्फोटित म्हणून मला नोकरी मिळत नव्हती. एके ठिकाणी मी घटस्फोटाची बाब सांगितली नाही, तिथं नोकरी मिळाली, परंतु बातम्यांमधून जेव्हा नाव येऊ लागलं, तेव्हा कंपनीला कळणं स्वाभाविक होतं. अशा वेळेस कंपनीला आपल्या सहकाऱ्याविषयी अभिमान वाटण्याऐवजी त्यांनी मला नोकरीवर न येण्याची विनंती केली. लोक फक्त शाब्दिक सहानुभूती दाखवतात, पाठबळ देतात; पण आजपर्यंत कोणीच नोकरीची विचारणा केली नाही. मी तर सिंगलच आहे, परंतु ज्यांना मुलं-बाळं असतील, त्यांनी काय करायचं? कसे जगत असतील ते? बरं, फुकट म्हणतच नाही. नोकरी देऊनच मदत करा ना?’’

आफरिनचा मुद्दा अगदी रास्त आणि आश्चर्यजनकही होता. तिलाच नव्हे, तर इतरही जणींना नोकरीच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर कुठल्याही प्रकारे कुणी मदत केलेली नाही. ते सगळे आपपल्या परिस्थितीशी झगडा देतच कायदेशीर लढा देत आहेत. तीदेखील हलाला आणि बहुपत्नीत्वाविरुद्ध लढत राहणारच आहे. निरनिराळ्या प्रकारच्या मानसिक-शारीरिक त्रासातून गेलेल्या आफरिनच्या डोळ्यांत ‘सुखी संसारा’चं स्वप्नही कायम आहे. ‘‘जॉब करेंगे, सेट होंगे, जितना बन सकता उतना दुसरी औरतों के लिए कुछ करेंगे. किस तरहसे काम करूँगी, अभी तय नहीं. फिलहाल अपने आपको फिजिकली फिट करना है. मेंटली स्टेबल होना है. और फिर शादीवादी का क्या है, वो भी कर लेंगे. दुनिया रुकी थोडी है? जिंदगी में शायद कोई और अच्छा इन्सान मिल जायेगा. सोसायटीमें एक डिवोर्सी, एक पिटिशनर की शादी होना आज भी बडी बात होती है. पर कोई इन सबको समझ लेगा वही तो साथ देगा. तो सब अच्छाही होना है.’’ ती स्वत:च्या लग्नाविषयी अगदी बेफिकरीनं, सहज बोलली. अवघड गोष्टींविषयीची सहजता सहज येत नसते. परिस्थितीनंच शिकवलेला हा बेडरपणा, सहजता तिच्या जगण्याची ऊर्जा असणार. तिची ती बेफिकिरी खरं तर मलाही आनंद देऊन गेली. जणू ती देव आनंदसाहेबांच्या धर्तीवर म्हणतीये, ‘हर गम को नजर अंदाज करते गये... मैं जिंदगी का साथ बेफिकर हो कर निभाती गयी..!’  

गुलशन परवीन (गाझियाबाद, दिल्ली) (न झालेली भेट)

उत्तर प्रदेश येथील रामपूरच्या गुलशन परवीन या तिसऱ्या याचिकाकर्त्या. तिशीतल्या गुलशन यांना अडीच वर्षांचा एक मुलगा आहे. गुलशन परवीन या सध्या आपल्या भावाकडे गाझियाबादमध्ये राहतात. गुलशन यांच्याशी कुठलाच संवाद झाला नाही. त्यांच्या भावाचा रईसभाईंचा संपर्क क्रमांक मिळाला होता. त्यावर संपर्क करून त्यांना गुलशन यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा ते अगदी पहिल्याच फोनमध्ये फारसे सकारात्मक नसल्याचे जाणवले. रईसभाई म्हणाले, ‘‘डॉक्युमेंटेशन होणं वगैरे ठीक आहे, पण त्यानं तिला न्याय मिळणार आहे का? तिचं घर-संसार उभा राहणार आहे का? हे सारं करण्यातून हशील काय असणार? मीडियाची काय, एखाद-दोन दिवसांची स्टोरी असते. त्यातही सनसनाटीपणा अधिक असतो. माध्यमं स्टोरी करून मोकळी होतात. पण ज्यांच्यावर करतात, त्यांच्या आयुष्यात काडीमात्र फरक पडत नाही. तिचं ती आयुष्य कंठत राहणार! ॲट द एंड, तिच्या हाती जर काही लागणारच नसेल तर काय? त्यामुळे नकोच.’’ रईसभार्इंनी सुरुवातीलाच त्यांची अशी भूमिका सांगितल्यावर मीही जरा गोंधळले.

तरीही त्यांना विनवणी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. ‘‘निश्चितच, गुलशन यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होणार नाही. मात्र त्यांच्या संघर्षामुळे, त्यांच्या धाडसामुळे एखाद्या जरी स्त्रीला उभारी मिळाली, तिलाही अन्यायाचा विरोध करण्याची प्रेरणा मिळाली; तर त्याची मोजदाद कशात करणार? गुलशन यांनी गमावलेलं मिळवून देता येणार नाहीच; परंतु आयुष्य कमावण्याच्या नव्या वाटा, नवी संधी तर शोधता येतीलच. चांगल्या भविष्यासाठी कुणाला तरी खस्ता खाव्या लागतात. कुणी  तरी त्याची किंमत चुकवावी लागते. ती किंमत जर तुमच्या बहिणीने चुकवली आहेच, तर त्याची नोंद योग्य व्हावी. त्या जर कुणासाठी मार्गदर्शक ठरल्या, तर हरकत काय? भेट तुमच्या घरी, तुमच्या कम्फर्टच्या ठिकाणी करू.’’ माझ्या बोलण्याचा किमानपक्षी सकारात्मक परिणाम झाला, असं मला वाटलं आणि त्यांनी बहिणीला विचारून कळवतो म्हणून सांगितलं.

नंतरच्या फोनमध्ये त्यांनी, ‘माझ्या बहिणीला फारसं मीडिया इंटरॲक्शन आवडत नाही. तिला नको आहे.’ असं सांगितलं. तरीही मी प्रयत्न करत राहिले. कालांतराने त्यांनी माझे फोन उचलणे बंद केले. दरम्यान, शायराबानो यांचे बंधू अरसदअली यांनी सांगितलं की, ‘ते पहिल्यापासूनच मीडिया टाळत आले आहेत. दुसरं असं की, बहुधा ते पुन्हा तिचं आताचं मोडलेलं लग्न जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणूनही त्यांना मीडिया नको असेल.’ उलट, मला तर ही सकारात्मक बाजू वाटली. त्यानंतर पुन्हा फोन करून मी रईसभाईंना कळवलं की- जर हे सत्य असेल, तर आम्ही त्याचीही नोंद घेऊ. त्या वेळेस ते म्हणाले, ‘‘मी माझ्या बहिणीला मनवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही दिल्लीत आल्यावर कळवा.’’ त्यानुसार मी दिल्लीत गेल्यावर त्यांना कळवलं, पण त्यांची सुरुवातीची नकारघंटा कायम राहिली. ‘गुलशन इज नॉट इंटरेस्टेड, आय ॲम अनेबल टू कन्व्हिन्स हर.’ या उत्तरात त्यांनी विषय संपवून टाकला.

या संपूर्ण संवादाच्या काळात गुलशनची इच्छा आणि रस किती होता, हे केवळ मला रईसभाईंकडून कळत होतं. त्यामुळे खुद्द रईसभाईच भेट नाकारत होते की, खरोखर गुलशनने नकार कळवला याची स्पष्टता नाही. मी प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलत होते, म्हणून जर मला त्या बोलण्यातून काय जाणवलं हे विचारात घ्यायचं ठरवलं; तर मला कुठं तरी असं वाटतंय की, नंतरच्या टप्प्यात गुलशनचे बंधू राजी झाले होते, मात्र गुलशनच झाल्या नाहीत. अरसदअली यांनी सांगितल्याप्रमाणे जर त्यांच्या लग्नाला पुन्हा एक संधी मिळणार असेल... त्यांच्या पतीला चुकीची जाणीव झाली असेल आणि त्यांचा संसार पुन्हा फुलणार असेल, तर ती खूपच चांगली बाब आहे. चुका प्रत्येकाकडूनच घडतात; परंतु झालेल्या चुकीची जाणीव होणं आणि ती सुधारण्याचा मार्ग स्वीकारणं, ही खरी माणुसकी. याच कारणासाठी गुलशन यांना पतीच्या चुकांची उजळणी करायची नसावी, असा अंदाज आहे. अर्थात हा अंदाज आहे. सत्य हेच की, गुलशन यांच्याशी संवाद झाला नाही. तरीही सर्वोच्च न्यायालयात याचिका करणाऱ्या पाच जणींपैकी त्या एक आहेत आणि तिहेरी तलाकचा जेव्हा जेव्हा इतिहास मांडला जाईल, तेव्हा तेव्हा गुलशन परवीन हे नावही घेतलं जाणार. त्यामुळेच इथं त्यांची नोंद करावीशी वाटली.

तर, गुलशन या सहा भावंडांत सर्वांत लहान. त्यांनी इंग्रजी साहित्यातून एम.ए. केले आहे आणि एका खासगी शाळेत त्यांनी शिक्षक म्हणून नोकरीही केली आहे. त्यांच्या गावात सर्वांत जास्त शिकलेली मुलगी अशीच त्यांची ओळख आहे. दि.20 एप्रिल 2013 रोजी गुलशन यांचा विवाह झाला. त्यांचे पती बी.कॉम. असून नोएडा येथील एका फर्ममध्ये नोकरीला होते. मात्र गुलशन यांना त्यांनी कधीही खूश ठेवले नाही. लग्नाच्या वेळेस त्यांना अडीच लाख रुपये हुंडा देण्यात आला होता. तरीही ते हुंड्याची मागणी सतत करून त्यांना मारहाण करत असत. अधूनमधून तलाक देण्याचीसुद्धा धमकी देत असत. इतकंच नव्हे, तर भांडणं काढून, मारझोड करून ते तिला माहेरी पाठवत असत. त्याच दरम्यान तिला एक मुलगा झाला. त्या मुलाला कुटुंबाचं प्रेम मिळावं, या हेतूने ती पुन्हा पतीकडे जात असे. मात्र एकदा त्यानं तिला लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली आणि घरातून हाकलून दिलं, त्या वेळेस ती रामपूर येथील पोलिसांकडे गेली. हुंडा आणि कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी त्याला पोलिसांनी अटकही केली.

यानंतर समाजातील प्रतिष्ठित वयस्क माणसांच्या मदतीने त्यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. त्या वेळी गुलशन यांच्या पतीने दहा रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर आपण गुलशन यांना तलाक दिल्याचे पत्र दिले. गुलशनने ते पत्र स्वीकारले नाही, तेव्हा त्याने रामपूर कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली आणि तलाकनामाच्या आधारे लग्नाचं नातं संपुष्टात यावं म्हणून अर्ज केला. यानंतर मात्र तिने सर्वोच्च न्यायालयात तिहेरी तलाकविरुद्ध याचिका दाखल केली. याचिका दाखल केल्यानंतरही तिच्या मनात पुन्हा सासरी जाण्याची इच्छा दिसत होती. आपल्या मुलाला आई व वडील दोघांचे प्रेम मिळावे, तो एका कुटुंबात वाढावा, या एका कारणासाठी आपण हे लग्न टिकविण्याचा पुन्हा प्रयत्न करू- असं तिनं 30 जून 2016 रोजी प्रसिद्ध झालेल्या इंडियन एक्स्प्रेसच्या दिल्ली आवृत्तीत म्हटलेलं आहे. याचा अर्थ, अरसद अली यांनी दिलेल्या माहितीत तथ्य आहे, असं म्हणायला हरकत नाही.  

अतिया साबरी (सहारनपूर, उत्तर प्रदेश)

सहारनपूरच्या अतिया साबरी या याचिका दाखल करणाऱ्या पाचव्या याचिकाकर्त्या. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले की- तिहेरी तलाक, हलाला, बहुपत्नीत्व यांच्या बंदीसंबंधी आता अन्य कोणतीही याचिका दाखल करून घेतली जाणार नाही. अतिया साबरी यांनी याचिका दाखल केल्यानंतर मार्च 2017 मध्ये उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका आल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं होतं की, उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यानंतर मुस्लिम महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा बीमोड करू, त्यांच्या सुरक्षेसाठी कायदा करू. तिहेरी तलाकचा नायनाट करू. त्यासाठी भाजपला सत्तेत आणा. मतदानाच्या वेळेस अतियाने जाहीरपणे सांगितले की, ‘आम्ही भाजपला मतदान करून आमचा वायदा पूर्ण केला आहे; आता वेळ भाजप सरकारची आहे. त्यांनी सत्तेत आल्यानंतर तिहेरी तलाकविरोधी कायदा आणावा आणि फतवे काढणाऱ्या संस्थांवरही अंमल ठेवावा.’ यासंदर्भात त्यांनी जाहीररीत्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपील केले होते की, आता त्यांनी त्यांच्या अजेंड्यावर असणाऱ्या तीन तलाकविरोधी कायदा करून आपलं वचन पूर्ण करावं. इतकंच नव्हे, तर  अतियाकडून प्रेरणा घेऊन शगुफ्ता शहा या महिलेने तीन तलाकबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून या प्रथेचा नायनाट करण्याचे आवाहन केले होते. या घटना माध्यमांत बराच काळ चर्चेत राहिल्या.

अशा रीतीने सहारनपूरची मोहल्ला आळी, तेलीवाला चौक इथं राहणाऱ्या अतियाने सहारनपूरच्या मुस्लिम महिलांना हिंमत आणि धीर देण्यास सुरुवात केलीच होती. देवबंदसारख्या बड्या इस्लामिक संस्थेलाही त्यांनी आव्हान दिले. यावर त्यांना नातेवाईक, परिसरातून बरंच काही ऐकून घेऊ लागलं; मात्र अशा सगळ्या विरोधातून अतिया स्वत:ची वाट काढत राहिल्या. सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्या. अतिया यांचा जन्म तीन भावांच्या पाठचा. त्यांच्या आई-वडिलांना तीन मुलगे असतानाही वाटत राहिलं की, एक मुलगी असावी. मुलीच्या वावरानं घरात चैतन्य राहतं. मुलीच्या ओढीतून त्यांच्या पालकांनी मन्नते केली आणि अतियाचा जन्म झाला. तीस वर्षांपूर्वी त्यांच्या पालकांना मुलगी हवी होती आणि तीस वर्षांनंतर आत्ताच्या काळात ‘मुलीच’ झाल्या म्हणून अतिया यांचा तलाक झाला होता- केवढी क्रूर चेष्टा!

अतियाकडचा प्रवास सुरू झाला होता. सहारनपूरच्या स्टेशनवर अतिया यांचे बंधू रिझवानभाई घ्यायला आले. त्यावेळी त्यांच्यासोबत आतिया यांच्या दोन मुली- सना आणि सादिया होत्या. चार आणि दोन वर्षांच्या दोघी चिमुकल्या. दोघी अगदी गोड मुली होत्या. दिवसभर त्यांनी मला किती गाणी, किती गोष्टी ऐकवल्या. लहानग्या सनाने तर तिच्या वडिलांना कधीही पाहिलं नाही. सादिया तरी केवढीशी! तिला तरी काय आठवणार? वडिलांच्या प्रेमाला पारख्या झालेल्या त्या गोड छोकऱ्या मात्र मोठ्यांच्या साऱ्या विवंचनांपासून दूर होत्या. त्यामुळेच त्यांच्या घराला रौनकसुद्धा होती. अतिया या स्वत:च्या दोन मुलींसह आई-वडील, दोन भाऊ, वहिनी, त्यांच्या दोन मुलीं यांच्यासोबत राहतात. उत्तरेकडे घरांना ‘हवेली’ म्हणतात, तसाच छोटा टुमदार बंगला. वरच्या मजल्यावर भावाचं कुटुंब. इतर मंडळी खालच्या मजल्यावर. मधे अंगण आणि त्याभोवती खोल्या.

कुटुंबात मुलगी हवी, या ओढीनं जन्मलेल्या अतिया साहजिकच अत्यंत प्रेमात वाढल्या. आई- वडिलांबरोबरच भावंडांतही त्या लाडक्या राहिल्या. शिकण्याचीही पूर्ण मोकळीक मिळाली. समाजशास्त्र आणि उर्दू विषयांत त्यांनी एम.ए. केले. अन्याय सहन न करण्याचा कणखरपणा यायला उच्च शिक्षणानेही मदत केली असणार, असं जाणवतं होतं. अतिया यांचा विवाह तिच्या सख्ख्या मावशीच्या मुलाशी झालाय. त्यांची आई सुरुवातीलाच अगदी वैतागून म्हणाली, ‘‘हमें तो घर के हि लोगोंने दुख दिया. मेरी सगी बहन ऐसा करेगी, ये कभी ना सोचा था. दिल तो बडा रोता है. कुछ सुकून ना मिला इसे. बहुत बुरा लगता है. आगे जाने क्या होगा? पर इसने एक बूँद आँसू ना निकाले. बडा हिम्मत रखती है.’’ अतिया यांच्या माँने सुरुवातीलाच अतिया यांच्या वृत्तीचं केलेलं वर्णन पूर्णवेळ जाणवत राहिलं. अत्यंत धीरगंभीरपणे त्या बोलल्या. बाणेदारपणा, कणखरपणा आणि खंबीर वृत्ती पूर्णवेळ जाणवत राहिली.

आईच्या म्हणण्याला त्यांनीही जोड देत उत्तर दिलं, ‘‘माँ कहती है, ये तो रोती नहीं, इसका दिल पत्थर है. पत्थर नहीं होता. इन्सान जिस हालात से गुजरता है उससे वह मजबूत बनता है. उसने कभी नहीं सोचा होता की वो इस दौर से गुजरेगा और उसे गुजरना पडता है. मैं उसके लिए क्यों रोऊँ, जिसने मेरी कदर नहीं की. मुझमें कोई कमी नहीं. मेरी कोई गलती नहीं. फिर मैं क्यों रोऊ? मैंने कभी कुछ गलत किया ही नही था. इसलिए तो ना डर लगा, ना कदम लडखडाये, ना हिम्मत डगमगायी. अपनी जगह सही हूँ. ये लढाई मेरे लिए तो थीहि पर अब मेरी दोनों बेटियोंके भविष्य को कुछ हद तक सुरक्षित कर लिया है. वैसेही दुसरी लडकीयों के लिए एक उम्मीद बनना है. फिर क्यों रोना?’’

एकामागून एक वाईट प्रसंग येत गेले, तर सामना करणं त्यांना अधिक महत्त्वाचं वाटतं. रडून काही मिळत नाही. अतिया यांचा मानी स्वभाव यातून लक्षात येत होता. अतिया यांची सख्खी मावशीच सासू असल्यामुळे त्यांच्यावर कुठलाही वाईट प्रसंग ओढवेल, असं त्यांना कधीही वाटलं नव्हतं. दि.25 मार्च 2012 रोजी त्यांचा विवाह वाजिद अली यांच्यासोबत झाला. वाजिद यांचे वडील सईद अहमद हे समाजवादी पार्टीचे दहा वर्षं नेता म्हणूनही राहिले आहेत. एकुलती एक मुलगी म्हणत त्यांच्या पालकांनी लग्नात सुमारे 30 लाख रुपये खर्च केला. त्यांना 20 तोळे सोनं, त्यांचे पती वाजिद अली यांना सात तोळे सोनं, ह्युंडाईची कार आणि घरातलं एकूणएक सामान त्यांच्या लग्नात दिलं होतं. वाजिद  अलीचं कुटुंबही रईस होतं. त्यामुळं त्या तोलामोलाचं लग्न अतियाच्या पालकांनी लावून दिलं. खरं तर मुलगी फार लांब जात नाही, नात्यातच आहे म्हणून ते अगदी निश्चिंत होते.

अतिया यांना सासू-सासरे, तीन नणंदा व एक दीर असा मोठा परिवार होता. लग्नानंतरच्या महिन्याभरातच वाजिदने त्यांची कार विकण्यास काढली. वॉशिंग मशीनपासून एलईडी टीव्ही, फ्रीज, फर्निचर असं सारं काही दिलेलं असताना, ही तर काहीच घेऊन आली नाही; फारच छोट्या वस्तू आहेत, म्हणून उठता-बसता त्यांचा अपमान करू लागले. त्यांच्या नवऱ्याने वस्तूंची विक्रीही हळूहळू सुरू केली.

अतिया सांगतात, ‘‘लग्न होईपर्यंत आम्हाला कधीही त्यांच्या मनातील लालसा कळली नव्हती. कार विकायला काढली, तेव्हा ‘बाईकची डिलरची एजन्सी सुरू करण्यासाठी मला आत्ता पैशांची गरज आहे’ असं अपराधभावनेनं माझा नवरा सांगायला आला. तेव्हा मी म्हटलं की, माझ्या आई-वडिलांनी ती तुला दिली. आता तू विक, जाळ किंवा ठेव- तो तुझा प्रॉब्लेम. त्यांनी त्यांचं काम केलंय. पुढं तू ती कशी ठेवतोस, ते तुलाच माहीत. मला वाटलं, माझा नवरा तरी किमान चांगला आहे; पण आज विचार करते तेव्हा लक्षात येतं की, तो माझ्याशी एक वागायचा आणि खाला-खालूंसमोर वेगळा वागायचा. त्याने एक-एक करून वस्तू विकायला हळूहळू सुरुवात केली. याविषयी मी माझ्या माहेरी काहीच सांगितलं नाही. लोक म्हणतात, ‘तू बोलायला हवं होतंस.’ पण सांगून होणार काय होतं? माझ्या घरचे भांडायला आले असते. मग तेही भांडले असते. यातून निष्पन्न काहीही होणार नव्हतं. घरात वाद नको म्हणून मी ते टाळलं. तरीही लेखाजोखा करायचं म्हटलं, तर पहिलं वर्ष खूप सुखाचं होतं. आम्हा नवरा-बायकोमध्ये तर खूप प्रेम होतं. त्याच काळात दिवस गेले. पहिली मुलगी सादिया झाली. मुलगी झाल्याची गोष्ट त्यांना आवडली नव्हती. त्यांनी माझ्यासमोरच तोंडं वाकडी केली.’’

अतिया यांचं पहिलंच अपत्य असल्याने त्याबाबत फारशी वाच्यता झाली नाही. मात्र दुसऱ्या वेळेस गर्भवती झाल्या, त्याच वेळेस त्यांच्या कुटुंबीयांनी गर्भपातासाठी त्यांच्यावर जोर टाकला. गर्भधारणा झाल्याची गोष्टच त्यांना उशिरा लक्षात आली होती. दोन महिने झाले होते. वाजिदचा बाईक डिलरचा व्यवसाय अजून नीट आकाराला आला नव्हता. त्यामुळे त्यालाही वाटत होतं की, दुसरं मूल नको. परंतु अतिया यांनी गर्भपात करण्यास नकार दिला. दुसऱ्या खेपेलाही मुलगी- सनाचा जन्म झाला. त्या वेळेस सासू-सासऱ्यांनी तर तोंडच फिरवलं. अतिया यांची प्रसूती सासरीच झाली होती. त्यांच्यामध्ये माहेरी जाण्याचा प्रघात नाही. मुलगी झाल्याचं कळल्यावर सासू-सासऱ्यांनी तोंड आंबट केलं. पण अशा वेळी स्त्री नवऱ्याकडून अपेक्षा करते. त्याची साथ महत्त्वाची वाटते.

अतिया त्यांच्या प्रतिक्रियेविषयी सांगतात, ‘‘वाजिदने कहा, ‘तुमने मेरे कंधे झुका दिये’. ये बात कहने पर बहुत बुरा लगा. कोई साथ हो न हो अपना आदमी साथ है, तो फिर दुनिया की फिकर नहीं होती. औरत आतीही उस आदमी के भरोसे और फिर अगर वह उस मोड पर आपका साथ छोड दे जिसके आगेके बारे में कुछ पता नहीं.’’ मुलगी होणं हा सर्वस्वी अतिया यांचा दोष असल्याप्रमाणे त्यांना कुटुंबातून वागणूक मिळू लागली. अगदी त्या ओल्या बाळंतीण आहेत, त्यांना आराम मिळायला हवा याचाही विसर कुटुंबीयांना पडला. ज्या मावशीला-सासूला तीन मुली होत्या, त्यांनीच अतियाला मुली होण्याचा बाऊ केला होता. याच सुमारास अतिया यांच्या छातीत दुधाची गाठ झाली. त्या सांगतात, ‘‘मला प्रचंड वेदना व्हायच्या. पण कोणीही मला दवाखान्यात न्यायला तयार नव्हते. वेदनेनं विव्हळत राहायचे; तरी घरातल्यांना वाटायचं की, काम नको म्हणून मी नाटक करते. माझा त्रास वाढतच चालला होता. कसाबसा सव्वा महिना झाला आणि माझा भाऊ मला घ्यायला आला. एक वो दिन और एक आज का दिन फिरसे लौटकर उस घर नहीं गयी. ना वाजिदने पलटकर देखा की जिंदा हूँ या मर गयी. बचूँगी नहीं ऐसी हालात हो गयी थी. तन ढकनेके कपडोंपर लौटे थे.’’

माहेरी आणल्यानंतर प्रथम त्यांचा उपचार सुरू झाला. एकाच वेळी त्यांना दोन-तीन गाठी झाल्या. औषधांचा डोस वाढला. इंजेक्शन्स वाढली. साधारणपणे बाळंतपणानंतर आठवडाभर जी औषधं दिली जातात, ती त्यांना महिनाभर खावी लागली. त्या उठू शकत नव्हत्या की बसू, इतका अशक्तपणा आला होता. सहा महिन्यांच्या काळात वाजिदने त्यांची हालचाल एकदाही विचारली नाही. उलट, सहा महिन्यानंतर त्यांच्या मामांकरवी वाजिद व त्यांच्या कुटुंबीयांनी कळवले की, ते लोक अतियाला तलाक देणार आहेत. अतिया सांगतात, यानंतर दीड वर्ष त्या माहेरीच होत्या. या काळात दोघांचे संपर्क पूर्णपणे संपले होते. फोनवरूनही त्यांचं बोलणं नव्हतं. आपल्या चारित्र्याविषयी खालच्या पातळीवर आरोप केल्याने त्यांचं दुखावणं स्वाभाविक होतं आणि म्हणूनच त्यांनीही संपर्क ठेवला नाही. दरम्यान, त्या त्यांच्या आजीच्या गावी गेल्या. आजीचं गाव त्यांच्या सासरहून जवळ आहे.

त्याच सुमारास त्यांच्या सासरच्यांनी मुलींसाठीच्या एका योजनेसाठी अर्ज केला होता. त्यासाठी वाजिदला आतिया यांची काही माहिती हवी होती. त्यांनी अतिया यांच्या भावाला फोन करून त्याबाबत विचारणा केली व सासरी येण्यास सांगितले. ‘‘लालची लोग थे. पंधरा हजार रुपये आना था इसलिए फोन किया. पर मैंने भी सोचा, ठीक है जा कर देखते है.’’ त्या तिथं गेल्यानंतर त्यांचे पती वाजिद आणि सासरे त्यांना भेटायला आले. भेटताच त्यांनी अतिया यांची माफी मागितली. घरी येण्याची गळ घालू लागले. त्यानंतर गावातील काही मोठी माणसं, पंच यांना बोलावलं. सर्वांदेखत वाजिदने माफी मागितली. मीही तिला माफ करतो, असं त्याने सर्वांना सांगितलं. अतिया  यांच्यासाठी हे अनपेक्षित होतं. यावर आतिया यांच्या मनात आलं की, ‘उपरवाला भी एक गलती माफ करता है, आपणही एकदा माफ करायला हरकत नाही. त्या क्षणी खरं तर मुलींचा विचार मनात होता. त्यांना जर एक पूर्ण कुटुंब मिळत असेल, तर आपण ते द्यायला हवं. एकदा आपण आपल्या नात्याला संधी द्यायला हरकत नाही.’

जवळपास दीड वर्षानंतर त्या पुन्हा सासरी गेल्या. सासरी दोन घरं होती. एक गावात मुख्य चौकात. गावात सगळे राहत असत. यांना मुख्य चौकातल्या घरी पाठवलं. त्या वेळी नवरा दोन-तीन दिवस त्यांच्याकडे, दोन-तीन दिवस आई-वडिलांकडे राहत होता. ‘‘त्यांच्या मनात काय षडयंत्र सुरू होतं, ठाऊक नाही. मी तर साफ दिलाने आले होते. थोडेच दिवस असे गेले असतील की- एके दिवशी दुपारी माझे सासू-सासरे, नणंदा सर्व जण माझ्या घरी आले. तू आमची फार बदनामी केली असं म्हणत सारं काही आत्ताच मिटवू या म्हणाले आणि त्यांनी मला विष पाजलं. मी कशीबशी घरातून पळून रस्त्यावर धावले आणि शेजाऱ्यांना वाचवण्यासाठी हाक मारली. शेजाऱ्यांनी मला जीपमध्ये टाकलं आणि ताबडतोब दवाखान्यात नेलं. ज्यांचं मरणं आलेलं नसतं, ते मरत नाहीत. मीही वाचले. यानंतर त्यांच्यावर 498 ची केस केली.

त्यांनी आधीच तलाकचा पेपर तयार करून ठेवला होता. त्यांचा डाव नंतर लक्षात आला. त्यांनी धोक्याने बोलावून घेतलं. घरी नेलं, त्यानंतर त्यांना मला मारून टाकून पुन्हा तलाक दिल्याचं घोषित करायचं होतं; पण मी तो तलाक मानलाच नाही. त्यांनी तलाकचा फतवा भावाच्या ऑफिसमध्ये पाठवला. दोन्ही मुलीच आहेत म्हणून ‘तलाक तलाक तलाक’ देतो असं त्यात म्हटलं. इतकंच नव्हे तर, वाजिदने हा तलाक वैध आहे, असा दारुल उलूम देवबंदकडून फतवाही आणला होता. हा फतवा दारुल उलूमने कसा बनवला? त्या मौलानांनी माझं म्हणणं ऐकलं का? माझी मंजुरी नाही, अशी गोष्ट मी मान्य कशी करणार? मग त्या क्षणी ठरवलं की, याविरुद्ध उभं रहायचं. जानेवारी 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.’’

याचिका दाखल केल्यानंतर त्यांना त्यांच्या गली- मोहल्ल्यातूनच विरोध होण्यास सुरुवात झाली. ‘मजहब के खिलाफ जा रही हो. हिंदू बन गयी हो. अपनेमें तो ऐसाही तलाक होता है. अब क्या हिंदूओंके जैसा साईन करके तलाक लेंगे? दुप्पटा नहीं ओढती, मुसलमान नहीं है, ऐसी दुनियाभरकी बात लोग कहने लगे. मैं तीन सालसे मायके हूँ तो क्या कोई आया मेरी बेटियोंको देखने? नहीं ना? मैंने तो लोगोंके तानों को भी हिम्मत बना लिया.’’ लोकांच्या टोमण्यांना त्यांनी सकारात्मकतेने घेतलं.

खरं तर अतिया मुळातच खुल्या वातावरणात वाढल्या. त्यांनी कधीही बुरखा घातला नव्हता, की डोक्यावर ओढणी घेऊन फिरल्या नव्हत्या. त्या जशा पूर्वी होत्या, तशाच आताही आहेत; मात्र लोकांनी त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यांनी त्याचा दबाव घेतला नाही, उलट त्यांनी तर त्यांच्या याचिकेत विविध फतवे काढून महिलांना इस्लामच्या चौकटींची आठवण देणाऱ्या दारुल उलूम देवबंद यांनाही पार्टी केले होते. तलाकचे फतवे बायकोच्या अनुपस्थितीत ही मंडळी काढतातच कसे, असा त्यांचा सवाल होता. तिहेरी तलाकवर बंदी घालण्याचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला, त्या वेळेस अतिया यांना आपल्या मुलींसाठी सर्वाधिक आनंद झाला. निसर्गाचा न्याय पाहा वाजिदने दुसरं लग्न केलं, पण ते पंधरा दिवस टिकलं नाही आणि ती मुलगी वाजिदला सोडून गेली. 

31 वर्षीय अतिया मात्र दुसऱ्या लग्नाबाबत उत्सुक नाही. ‘‘लग्न हा जगण्याचा हेतू नाही. माझ्या जगण्याचा हेतू कदाचित सफल झाला. मी जे सोसलं, ते इतर बायकांना सोसावं लागू नये म्हणून कदाचित मी याचिकेचा भाग झाले असेन. माझ्यामुळे जर कोणा बाईला हिम्मत मिळाली, तिचा घरसंसार टिकला, तर त्याचं फार समाधान आहे. याउपर जर माझ्या कुटुंबीयांना वाटलं आणि तसा योग्य साथी मिळाला तर विचार करेन. पण तूर्तास तरी तशी इच्छा नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लवकर लागला. कायद्यासाठी हालचाली सुरू झाल्या. महिला पुढे येऊ लागल्या आहेत, हेच मला यश वाटतं. आपला इरादा नेक आणि आपण प्रामाणिक असलो की, जगात कशाला घाबरायचं कारण नाही. बायकांनी आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे- न घाबरता, न डगमगता आणि उभं राहिल्यानंतर माघारही न घेता. पण याचा अर्थ आतातायी निर्णयही घेऊ नये. आपला घरसंसार आपण प्रेमाने फुलवण्याचा प्रयत्न करावा. कारण ते विस्कटतं, तेव्हा फार यातना होतात. पतीकडून जर योग्य सन्मान आणि योग्य दाद मिळत नसेल, तर मात्र लक्षात घेतलं पाहिजे की- आपल्यासाठी दुसरं कुणी उभं राहणार नाही, तर आपल्यालाच उभं राहावं लागणार आहे.’’  

अतिया एकाच वेळी दोन गोष्टी सांगत होत्या. संसारात लहान-मोठ्या भांडणांना, मनभेदांना हत्यार करून एकमेकांवर चिखलफेक करण्यातून काही मिळणार नाही. मीच खरी, माझंच खरं- असं टोकाचं कोणीही वागत असेल, तर चूकच आणि माझ्यावरच अन्याय होतोय, असंही मानणं चूक. त्यामुळं थेट संसार मोडण्याआधी तो वाचवायचा प्रयत्न करा आणि नाहीच शक्य झालं, तर मात्र वेगवेगळे रस्ते- तेही प्रेमानेच स्वीकारा.

इशरत जहाँ (हावडा, प. बंगाल)

हावडा येथील इशरत जहाँ यांच्याशी फोनवरून संपर्क साधत होते. तेव्हा त्यांचा ठसकेबाज आवाज ऐकूनच त्यांच्याविषयी प्रचंड कुतूहल वाटत होतं. ही बाई पाचही याचिकाकर्त्यांमध्ये कमी शिकलेली. आपण याचिका दाखल केली म्हणजे अन्याय, अत्याचाराविषयी बोलावं, बायकांना हिंमत द्यावं हेही आपलं काम आहे, असं काही त्यांना वाटत नाही. म्हणजे कुणाला हिंमत मिळाली तर ठीकच पण आपणहून त्यासाठी प्रयत्न करावं असा काही त्यांचा विचार नाही. तसं पाहता वक्तृत्त्वाचं असं काही कसब तिच्याकडे नाही. ‘‘दूसरों को हिंमत देना वो तो ठीक है. अपनी लढाई यहाँ किसे टली.’’ असं अगदी साधंसुधं, पण नेमकं बोलून जाते.

खूप लहान वयात लग्न झालं आणि दीर्घकाळ अत्याचार सहन करावा लागला. या काळात पैशांची तंगी राहिली, पण अनुभवांचा घडा कायम भरून वाहिला. त्यामुळेच त्या जे बोलतात ते त्या जगण्यातून आलेल्या शहाणपणाने हे जाणवतंच. त्यांचा बोलण्यातला ठसका तर जाणवला होताच, पण तिला भेटण्याआधी तिच्या बोलण्यावरून मला ती जशी वाटली, ती तशीच होती. अगदी सरळ नव्हे, पण साधी, बिनधास्त, बंडखोर!

कोलकत्त्याहून हावडाची बस घेतली त्यावेळेस इशरत यांना कळवलं. सकाळची साडेआठची प्रसन्न वेळ आणि बसमध्ये पूर्णवेळ गाणी. बसचं तिकीट मात्र अगदी माफक. माझ्या दीड तासाच्या प्रवासाला दहा रुपये इतकंच तिकीट होतं. बस आपल्या रस्त्याने निघाली होती. दरम्यान इशरत यांचा पुन्हा फोन आला, ‘कुठं आहेस’ असं विचारणारा? ‘बसमध्ये’ याखेरीज अर्थातच मला काही सांगता येणार नव्हतं. मग त्यांनी बसमधून उतरल्यावर दहा मिनिटाच्या अंतरावर घर असल्याचं सांगितलं. ‘सायकलरिक्षा करा’ असं सांगितलं. हावडामध्ये उतरल्याबरोबर मी कळवलं. हावडा बसस्टॅण्डमध्ये मात्र मला दहा मिनिटे लागली बाहेर यायला. चारही बाजूंनी कुंपण. प्रचंड गर्दी असलेल्या त्या स्टॅण्डवरून बाहेर कुठून जायचं कळत नव्हतं. बरं ज्या दिशेने बाहेर आले त्या दिशेने केवळ टॅक्सी आणि टॅक्सीच दिसत होत्या. सायकलरिक्षा अधोरेखित करत सांगितलं आहे म्हणजे अंतर फार नाही, हे माझ्या लक्षात आलं होतंच. शेवटी सायकलरिक्षा नव्हे पण रिक्षा दिसली. नंदा घोष रोड असं सांगून मी त्यात बसले.

एवढ्या वेळात त्यांनी पुन्हा दोनदा फोन केला. दुसऱ्या वेळेस जरा वैतागतच म्हणाल्या, ‘कहाँ हो यार आप? कबसे धूप में खडे है.’ आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यावर आपल्याला कितीही वैतागावं वाटलं तरी आपण ते असं दाखवत नाही. इशरत मात्र बिनधास्त वैतागल्या होत्या. त्यांचं हे आतून- बाहेरून सारखं असणं, स्पष्ट असणं खटकत नव्हतं, ही त्यांची खासियतच म्हणावी लागेल. त्या रस्त्यावर मैत्रिणीबरोबर उभ्या होत्या. दोघींनी बुरखा घातला होता. मग आम्ही एका लांबलचक गल्लीतून आत चालू लागलो. हावडा या ठिकाणी उतरल्यापासूनच अस्ताव्यस्त, गिचमीड, गर्दीचं शहर वाटलं. ती गल्लीही तशीच होती. फार लागून लागून घरं, इमारती. पाच-सात मिनिटं चालल्यानंतर एक बाहेरून प्लास्टर न झालेली इमारत आली. पाचव्या मजल्यापर्यंत चालत चालत आम्ही इशरत यांच्या घरी पोहचलो. घर तरी कसं म्हणावं असा मला प्रश्न पडला. आम्ही दारातून आत शिरलो तर अगदी छोट्या पॅसेजमधून उजवीकडे वळलो. रेल्वेच्या डब्याप्रमाणे एकाला लागून दोन खोल्या, मग बाथरूम मग पुन्हा एक खोली. त्याशेजारी गॅलरीची केलेली खोली. डबलबेडचा एक दिवाण मावेल इतकी खोली म्हणजे इशरत यांचं घर. तेवढीच जागा त्यांची.

इशरत यांनी बुरखा काढला तेव्हा मी पाहत राहिले. अवघ्या एकतीसच्या इशरत चार मुलांच्या आई आहेत. त्यातली पहिली मुलगी चौदा वर्षांची. ईशरत यांच्या निम्म्याच वयाची. म्हणजे ईशरत स्वत: अठराच्या नव्हत्या झाल्या, तेव्हा त्या पहिलटकरणी झाल्या होत्या. इशरत आणि त्यांचे पती मूर्तुजा अन्सारी हे दोघंही मूळचे बिहारच्या छोट्या गावातले. इशरत यांचं लग्न झालं तेव्हा त्यांचे वय चौदा-पंधरा होते. त्यावेळी त्यांच्या पतीचे मूर्तुजाचे वय तीस होते. दुप्पट वयाच्या माणसाशी त्यांचं लग्न झालं. इशरत सांगतात, ‘‘माहेरी माझं मोठं  कुटुंब आहे. आम्ही चार बहिणी, दोन भाऊ, आई- वडील. वडिलांचा टेलरिंगचा व्यवसाय. खाणारी इतकी तोंडं, पण खाऊन पिऊन सुखी होतो. चौदा पंधराची असेल तेव्हा स्थळ आलं. मूर्तुजा दुबईमध्ये एका कापड कंपनीत एम्ब्रॉयडरी वर्कर म्हणून काम करायचा. अजूनही तो तिथंच असतो. तर वडिलांनाही वाटलं असेल चला एका मुलीचा भार कमी होईल.

जून 2001 मध्ये लग्न करून सासरी आले. मोठा दीर, जाऊ, त्यांची मुलं, सासू अशा परिवारात मीही दाखल झाले. लग्नानंतर दोन अडीच महिने मूर्तूजा राहिला असेल मग दुबईला गेला. साधारण सतरा-अठरा महिन्यांनीच तो तीन महिन्यांसाठी येत असे. आमचा संसार हा असा चालायचा. सासू फार मागास विचारांची होती. ‘औरत तो पैरों की जूत्ती होती है’ असं ती नवऱ्याला सांगायची. यावरून समजून घ्या, तिनं आम्हाला कसं ठेवलं असेल. माझा नवरा तर इथं नसायचा. त्यामुळे मी तर पूर्ण वेळ घरकाम करणारी बाई त्यांना मिळाली होती. माझ्या बाजूनं बोलणारं होतंच कोण? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मी राबायचे. याबरोबर शिव्याशाप, मारझोड, विनाकारणाची भांडणंही असायचीच.

2004 मध्ये पहिली मुलगी झाली. तेव्हा मुर्तुजांचं म्हणंणं होतं की, माझ्या भावाला पहिला मुलगा झाला मग तुला कसा झाला नाही. आता सांगा यात माझी काय चूक? आपल्याच मुलीला तो ‘मनहूस’ समजायचा. मग इथून आमची भांडणं सुरू झाली.’’ 2004 मध्येच त्यांचं कुटुंब पश्चिम बंगालमध्ये आलं. तोपर्यंत सासू राहिली नव्हती. मोठ्या दीराच्या कुटुंबासोबत त्या बंगालमध्ये आल्या. इथंही काम चुकलं नव्हतं. शिवाय स्वत:ची मुलगी होती. इशरत यांचे पती तर वर्षभरानंतर केवळ तीन महिन्यांसाठी यायचे, परंतु त्या काळात पत्नीला समजून घेण्यापेक्षा इतरांच्या बहकाव्यात येऊन तिला मारझोड करत रहायचे. दीड-दीड वर्षांच्या गॅपने संसार सुरू होता, पण आतून पोखरून निघालेला होता. मुलाच्या हट्टापायी त्यांना एकापोठापाठ तीन मुली झाल्या. या संपूर्ण काळात मोठा दीर त्यांच्याशी सतत या ना त्या कारणावरून भांडायचा. भांडण करून पुन्हा आपल्या भावाला त्यांच्या चुगल्या करत असे. मुली लहान होत्या. घरातली-बाहेरची सारी कामं करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच असे. यावर त्यांचा दीर मुर्तुजाचे कान भरत असे की, तासन्‌तास बाहेर जाते. घराबाहेर जायची कारणं शोधत असते. मग तो फोनवरूनही त्यांच्याशी भांडायचा. त्यांना टॉर्चर करायचा.

दिवस असेच चालले होते. 2009 मध्ये त्या पुन्हा गर्भवती होत्या. त्यावेळेस त्यांच्या दीराने इशरत यांना स्वयंपाक- पाणी वेगळं करायला सांगितलं. त्या गर्भवती, तीन लहान मुली होत्या. तरीही त्यांनी ऐकलं नाही. इशरत सांगतात, ‘‘जेठाजी मुझसे हमेसासे ही झगडते रहे. उनका जो था मेरे पती का पूरा पैसा ऐंठलेना था. मुझे उनकी चाल समझ आयी थी. मुर्तूजा को बताया पर उस पर असर नहीं हुआ. आप घरमें घुमकर देखेंगी ना तो थालसे लेकर बडी बडी चीजे मुर्तूजा के पैसे से आये है. जैसे मेरे जेठा को समझ आया की मैं अपने पती को समझा सकती’ उन्होंने मुझेही घरसे निकलवाने का सोचा. आये दिन झगडा करो. मुर्तूजा को बताओ. हमारे बीच क्लेस पैदा करो. बस यही करते रहते. मेरी हालत भी ना देखी उन्होंने, हमे अलग चूला लगाने कहाँ. हम भी फिर यही अलग चुला लगा लिये. उन्होंने जितना जुल्म करना था कर लिए, हम भी हटे नहीं. 2013 मे मुर्तूजा दुबई से आया था. मैं अपने पडोसी के घर बात कर रहीं थी. आकर अचानकसे खूब पिटने लगा. दात से मेरे हात में इतनी जोर से काटा की देढ महिना काला पडा था. बस उस वक्त पता नहीं मुझे भी बडा गुस्सा आया, मैं सीधे पोलिस थाना गयी. घर का मामला है निपटालो कहकर पुलिसने भी भगाया. तब तक मेरा गुस्सा भी ठंडा हुआ था. अपनी बच्चोंका सोचकर आयी तो घरपर मुर्तूजा नहीं था, ना बच्चे. बच्चोंको लेकर भाग गया था.

फिर थाने जाकर 498 की रिपोर्ट लिखायी. पुलीसने जेठा को बताया, वो नही आया तो अरेस्ट वॉरंट निकलेगा. फिर गिडगिडाता आया. कुरआन की कसम खॉकर कहा कि, फिरसे मारपीट नही करेगा. हमने भी केस पिछे ना ली, बस बेल करा दिया. बच्चोंका भविष्य सोचकर चूप रहे. पर वो ना सुधरा. फिर घर के बटवारे को लेकर झगडा शुरू किया. कहने का मतलब लढाई के कई कारण थे. वैसेही सब चलाते रहे. दिनमें मारपीट करता था, रात में प्यार दिखाता था. हम भी कभी कबार झटकाही देते थे, ‘दिन में मारो और रात में अपनी जरुरत पूरा करने आओगे, नहीं चाहिए हमे तुम्हारा ये प्यार.’ साल-दो साल में आता था तो हमबिस्तरी के लिए बहुत परेसान करता था. फिर भी जिंदगी चलती गयी.’’

इशरत एक एक गोष्ट मोकळेपणानं सांगत होत्या. ते सांगताना आपण कसं वागलो हेही सांगत होत्या. कुठलाच आडपडदा नव्हता. दरम्यान इशरत आपल्या चार मुलांसह गावी होत्या. तेव्हा त्यांच्या बहिणीचा अपघात झाला म्हणून आईकडे गेल्या. तिथं गेल्यानंतर मुर्तूजाने त्यांना फोन करून सांगितले की, गावी जाऊ नको, गेली तर तुझ्या मुलांचा सांभाळ कसा करायचा ते तू बघ. म्हणून मग त्या बंगालमध्ये आल्या. एप्रिल 2015 मध्ये त्याने दुबईहून फोन करून त्यांना तीन वेळा तलाक म्हटले. पुढे फार काही संवाद न करता त्याने फोन कट केला. यासंबंधी त्यांनी हावडा येथील कौटुंबिक न्यायालयात केस केली. त्यांची 498 ची केससुद्धा सुरूच होती. चारही मुलं नव्हती. इशरत सांगतात, ‘‘फोन करून सुरुवातीला शिव्या घातल्या आणि मग तलाक दिल्याचं सांगितलं. आधी मला काही कळलंच नाही. पण त्यानं पुन्हा सांगितलं आपलं नातं तुटलंय. मी हतबल. मुलंही सोबत नव्हती. मुलांनाही त्यांनी भडकवून ठेवलं होतं.

यानंतर सुट्टीत म्हणून तो ऑक्टोबर 2015 मध्ये आला. मला बाहेरून कळालं की तो लग्न करतोय. मीदेखील पोलिसांना घेऊन तिथं पोहोचले. पोलिसांसह आल्याने पहिल्या दिवशी तो आणि त्याचा भाऊ पळून गेले. लग्न कुठं हे आम्हाला काही कळालं नाही. मी माझ्या माहेरी परतले. लग्न दुसऱ्या दिवशी होते. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा जाऊन शोधाशोध करू लागले. एका माणसानं लग्न कुठं आहे ते सांगितलं, मी तिथं गेले, पहिलं लग्न लपवून तो तिथं दुसरं लग्न  करायला तयार झाला होता. त्या वेळेस मुर्तूजा म्हणाला की, ‘मी हिला तलाक दिला.’ त्यांनी कागदपत्र दाखव म्हटलं, पण त्याच्याकडे असा कागद कुठं होता. त्यांची फसगत केली म्हणून त्या लोकांनी आपणहूनच लग्न मोडले. पण दुर्दैव असतंच हात धुवून मागे लागलेलं. नोव्हेंबर 2015 मध्ये कळालं की त्यानं दुसरं लग्न केलं.’’

इशरत इतकं बोलून हसल्या. दु:ख पचवून आलेलं ते हास्य होतं. स्वत:च्याच दु:खावर हसण्यासाठी ही हिंमत कुठून येत असेल. मुलं, संसार सारं काही हिरावल्यानंतरही असा धीरगंभीरपणा कुठून येत असेल. स्वत:ला शांत, सकारात्मक कसं ठेवता येतं असेल मला प्रश्न पडला. इशरत त्यावरही सहज म्हणाल्या, ‘‘बस जिंदगी जैसे आते गयी, हम वैसे चलते गये. कुछ समझा ही नहीं कहाँको जारे... एक के बाद एक चीज होते गयी. जैसे नया कुछ सामने आया. उससे फिर लढ लिये. बहुत कुछ सहा है, बता नहीं सकते. अब तो याद भी नहीं आता. कितना याद करोगे? पहले तो बहुत रोती थी. हर बात पर रोना आता था अब चाहो तब भी आसू नही आते. जिंदगी छोटी रही संघर्ष बडा रहा!’’ मी यावर काय बोलणार होते. स्मित केलं.

पंधरा वर्षांच्या अंतरा-अंतराने चाललेला संसार तसा मोडका तोडकाच सुरू होता. पण सुरू आहे अशी एक खात्री होती. मुलं सोबत होती. आता तर हाती काहीच नव्हतं. पण त्या मार्गक्रमण करत राहिल्या. मुर्तूजाने दुसऱ्या लग्नाचा प्रयत्न करण्याआधीच म्हणजे 12 ऑगस्ट 2016 रोजी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या वकील नाझिया खान यांनी त्यांना याचिकेबाबत सुचवलं होतं. इशरत यांची 498 ची केस सुरू आहे. त्यांनी तिहेरी तलाकविरुद्ध याचिका दाखल केली आहे. स्वत:चा तलाक मान्य केलेला नाही अशी सारी परिस्थिती असताना, त्याची चर्चा सुरू असतानाही मुर्तूजा दुसरं लग्न करू शकला. शायराबानो यांच्याबाबत जसं घडलं की केस सुरू आहे, माध्यमांमध्ये विषय ताजा आहे, तरीही ही मंडळी दुसरं लग्न करू शकले. या साऱ्याचा विचार करताना मन विषण्ण झालं. तलाकच्या वैधतेवरच केस सुरू असताना दुसऱ्या लग्नाचं धाडस कुठून येतं अशा पुरुषांमध्ये. आपल्याच तर समाजातून मुर्तूजा, रिझवान अहमद यांसारख्या नवऱ्यांना मुल्ला-मौलवींकडून पुरेसा पाठिंबा असल्याची जाणीव लोकांना असते. शहाबानो केसंचं अपयशही त्यांना ठाऊक असतं. गरिबाघरची मुलगी मिळवली जाते अन्‌ पुन्हा मौलवी तर दुसरा निकाहनामा पढतात. हे सारं चीड आणणारं आहे.

परंतु इशरत यांच्याबाबत काव्यात्मक न्याय झाला. मुलगा हवा म्हणून मुर्तूजाचा सतत आग्रह राहिला, तेवढ्याखातर तीन मुली झाल्या. तोच मुलगा मोहम्मद जैद अफजल आज इशरत यांच्याकडे आहे. त्यांची 12 वर्षांची मुलगी बुश्रा आणि अफजल हे दोघेही आपणहून त्यांच्याकडे यायचं म्हणाली. तीन वर्षांनंतर त्यांना त्यांची दोन्ही मुलं मिळाली होती. परंतु त्यांना पुन्हा पळवून नेण्याचा प्रयत्न मुर्तूजाने केला. इशरत यांनीही तातडीने कमिशनर ऑफिस गाठले. पोलिसांची चक्रं फिरली आणि मुलांना घेऊन मुर्तूजाला पोलिसांकडे यावेच लागले. मुलीला तो काय पढवून आला होता ठाऊक नाही. मुलीने पोलिसांसमोर ‘मला वडिलांकडे जायचं आहे’ असं सांगितलं. मुलगा मात्र त्यांच्याकडे आहे. मुलालाही सतत मोठे दीर भडकवत असतात. आईकडं देण्यासाठी काय आहे? मुर्तूजासुद्धा जाणूनबुजून महागड्या वस्तू त्याला द्यायचा प्रयत्न करतो. शेवटी मुलंच ते. भुलेल केव्हातरी अशी भीती आहेच. त्यामुळे तोही किती काळ राहील याची खात्री नाही. पण त्यांनी हिंमत सोडलेली नाही.

इशरतच्या हिंमतीची दाद आणखी एका गोष्टीसाठी द्यावी लागेल. बहुतांश वेळा घर मोडलं की, बाई घराबाहेर पडते. ती माहेरी जाईन किंवा वेगळं झोपडं करून राहीन, पण इशरत यांनी त्यांचे हावडा येथील घर कधीच सोडले नाही. आपण कुठं जाणार आहोत, असं म्हणून त्या तिथंच राहतात. याचिका दाखल झाल्यानंतर पोलिस येऊन गेले, माध्यमांच्या फेऱ्या वाढल्या, तेव्हा इमारतीतल्या लोकांनीही त्यांच्याविरुद्ध एक आवाज केला. आमच्या परिसराची बदनामी होते म्हणून त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला, पण त्या पुरून उरल्या. उलट त्यांच्या एका रूमची लाईटही त्यांच्या दिराने कापून ठेवली होती. आपल्या शेजाऱ्यांनी शेजारधर्म लक्षात ठेवला नाही, तेव्हा त्यांनीही भीडभाड न ठेवता हा सगळा प्रकार माध्यमांना सांगितला. दीड वर्षापासून त्या अंधारात राहत होत्या. बातमीचा परिणाम झाला आणि त्यांना वेगळी वीजजोडणी करून मिळाली.

इशरत म्हणतात, ‘‘आपल्या समाजात कसं असतं की, बायकांना दडपून ठेवा. व्यवस्थाच तशी असते की- बायकाही दबून घेतात. कहते है ना, मौन हे तो संस्कारी, आवाज करे तो बदचलन. इस लिए औरतों ने भी कितना  सहना हैं ये सोच लेना चाहिए. अन्याय करना गुन्हा है तो बर्दाश्त करना उससे भी बडा गुन्हा है. पर किसीमें हिम्मत नहीं होती. सौ में एक हि अपने लिए खडी होती है. ये उलटा होना चाहिए, सौ में से एक चुप रहे बाकी 99 तो खडे रहे. इसलिए जरूरी है कि औरतोंने अपने उपर निर्भर रहना चाहिए. अब हमने तो पहल कि, अबी जिंदगी बाकी है, लढाई बाकी है. लढेंगे और इन्शा अल्लाह जितेंगे भी.’’ सारं काही सहज उत्स्फूर्त होतं.

हे बोलता-बोलताच म्हणाल्या, ‘‘अब हमारे मयके लोग भी कहते है, सब कुछ निपट गया, उसने तो दुसरी शादी भी की, तुम भी घर बसा लो. हमने भी उनसे कहाँ पहले तो नाबालिग थी, समझ नहीं थी तो आपको लगा आपने शादी करवा दी. हम भी शादी कर आये, बच्चे जने. पर अब हमारी जिंदगी जो फैसला है वो कोई और नहीं लेगा. हमे शादी करनी है, नही करनी है हमारी मर्जी. हम करे भी ना भी करे. हमे इसबारे में कोई पुछे नही.’’ त्या भेटल्यापासून पूर्ण वेळ हसतमुख होत्या. आपल्यावरच्या संकटांनाही त्यांनी हसत हसत सांगितलं. ‘हां लोग कहते है, हमेशा हसती रहती हो. परेसानी जाहीर होने नही देती. पर हसेंगे नहीं तो क्या करे. परेसानीयाँ तो होती है. पर हसते रहे, हसते-हसते ही जिंदगी कट जायेगी. वरना कहाँ कटती है ये जिंदगी रोते हुवे.’ त्या पुन्हा हसल्या आणि मग मंदस्मित करत म्हणाल्या, ‘हे घर सोडावं म्हणून खूप मागे लागलेत. दिवस-रात्र त्रास देतात. अजून अंगात बळ आहे म्हणून विरोध करतेय. संघर्ष करतेय. मग एक दिवस सारं काही सहनशीलतेच्या पल्याड गेलं की, हे घरही देऊन टाकेन. सारा कुछ लुट गया, जब बच्चे नहीं, शौहर नहीं, कुछ भी नहीं तो तुम्हारा घर लेकर क्या करेंगे. अपना इंतजाम करके वो भी छोड देंगे, जावो तुम लोग खूश रहो. वैसे तो बहुत कुछ कर सकते है. पर मेरे बच्चे उसके पास है, हमने कुछ किया तो बच्चोंको तकलीफ होगी. उनको दर्द होगा तो हमकोभी दर्द होगा ना.’ त्या पुन्हा खळखळून हसल्या.

सारांश शायराबानो, आफरिन रेहमान, अतिया साबरी, इशरत जहाँ आणि हो गुलशन परवीन. गुलशन परवीन यांना प्रत्यक्ष भेटले नसले तरी जेव्हा जेव्हा याचिकाकर्त्यांचा उल्लेख होणार तेव्हा-तेव्हा त्या आपल्यासोबत राहणारच. याचिकाकर्त्या म्हणून त्यांचं आपलं एक स्थान त्यांनी मिळवलेलं आहेच. या सामान्य महिलांच्या संघर्षातून कुणी काय घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण मला सतत-सतत जाणवत राहिलेली गोष्ट म्हणजे त्या सामान्य महिला आहेत. सामान्य माणसाला म्हणणं नसतं, किंमत नसते असं वाटणाऱ्या प्रत्येकाने या महिलांकडे पहावं. कोण होत्या त्या? गृहिणी. घर सांभाळण्याची किमया जाणणाऱ्या किमयाकार. घरं वाचली पाहिजेत. बाईवर अन्याय झाला नाही पाहिजे, म्हणून तर त्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचू शकल्या.

सामान्य महिला ते याचिकाकर्त्या असा रस्ता कापणं सोपं नव्हतं. काही अल्पबुद्धीची माणसं इतक्या गंभीर प्रश्नाबाबतही प्रसिद्धीचा डाव म्हणून या महिलांचा अपमान करू शकतात. पण लक्षात घ्यायला हवं, माध्यमांचं पाठबळ मग त्यातून तयार होणारा जनरेटा ही नंतरची बाब असते. प्रत्यक्षात तो जुगार असतो. लाभला तर लाभला नाही तर नाही. तरीही या महिलांनी हिंमत केली आणि पहिलं यश मिळवलं. पण लढाई अजून संपलेली नाही. उलट ती तर आत्ता सुरू झाली. कायद्याचा लढा सुरू राहीलही. पण या प्रवासात या सगळ्यांच्या बोलण्यात एक मुद्दा सतत जाणवत होता, तो म्हणजे पुरुषी मानसिकता. याचिका जिंकू, कायदा येईल, स्त्रिया बदलतील, पण जर पुरुषांनी आपला विचार बदलला नाही (आणि त्या स्त्रिया ज्यांनी आपल्या मनावर पुरुषीपण बिंबवलं आहे) तोवर काही घडू शकत नाही, असं त्या चौघींना वाटत होतं. ते वाटणं नैराश्यातून नव्हतं, उद्वेगातून होतं. या उद्वेगावर गप्प राहून चालणार नाही. त्या उद्वेगाची ऊर्जा करूनच पुरुषी विचारांना, असमानतेच्या विचारांना उपटवून टाकावं लागेल.

कुठल्याही अन्याय अत्याचारावेळेस ‘पुरुषी मानसिकता’ काय घेऊन बसतात बाया असं वाटत असेल तर साधं उदाहरण घेऊ. अतिया असो वा इशरत या दोघींना मुली झाल्यानंतर त्यांच्या पतीने मुली झाल्याचा दोष कोणावर ढकलला. एकटी बाईच मुलांना जन्म घालत असल्यासारखे ते हात झटकून ‘तू हे काय  केलंस, असं का केलंस’ म्हणून आदळाआपट करत राहिले. मुलगा-मुलगी होण्यातील मुख्य भूमिका कोणाची हे अद्याप आपल्या समाजात खालच्या स्तरापर्यंत पोहोचलं नसेल आणि मुलगा-मुलगी समान असतात हा सम्यक विचार रूजला नसेल तर ही लढाई किती लांब पल्ल्याची आहे हे समजून घ्यावं लागेल. दुसरं उदाहरण. मालेगाव, कराड, जालना येथे निघालेले मुस्लिम महिलांचे मोर्चे. मुस्लिम महिला प्रोटेक्शन ॲक्ट 2017 चे बिल लोकसभेत मंजूर झाले आहे. या प्रस्तावित कायद्यातील तरतुदीबाबत वाद आहेत. कायदेशीर आक्षेप आणि सामाजिक चौकटीतही मतप्रवाह आहेत. कायदा सक्षम आणि न्याय असावा यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात, केले पाहिजेत. चुकीच्या तरतुदींवरही बोट ठेवलेच पाहिजे. परंतु तसं न करता जर संपूर्ण कायदाचा मोडीत काढायचा विचार असेल तर?

देशभरात पुन्हा एकदा हा कायदा ‘शरियत विरोधी’, ‘इस्लाम विरोधी’ आहे अशी भूमिका घेऊन मोर्चे निघत आहेत. या मोर्चांमध्ये बुरखा घातलेल्या महिला आहेत. यु-ट्यूबवरून आणि फोटोवरून हा प्रचंड मोठा जनसमुदाय असल्याचं दिसत आहे. भर उन्हात आपल्या नवऱ्याच्या इच्छे वा आदेशाखातर या महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. या कायद्याचा ज्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे, त्याच या कायद्याविरोधात उभ्या असल्याचं दर्शवलं जात आहे. हे मोर्चे मुस्लिमांचे कैवारी समजणाऱ्या संघटनांकडून काढले जात आहेत. या मानसिकतेच्या मुळाशी पितृसत्ताच आहे. त्यांना बायकांना दडपण्याचे, हत्यार सोडायचे नाही. आणि ते कामही ते बायकांच्या खांद्यावर बंदूक ठेवूनच करत आहेत. असेच मोर्चे निघत राहिले आणि शासनाने या मोर्चांना मनावर घेतले तर या याचिकाकर्त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरेल. यापुढच्या परिणामांची कल्पनाच न करणे बरं!

त्यामुळे हिमनगाचं टोकं आत्ताशी दिसलंय. संपूर्ण शिखर दिसायला अजून काही काळ जावा लागेल, पण ज्यांनी त्यासाठी किंमत मोजली त्यांचा त्याग वाया जाऊ नये म्हणजे खूप मिळवलं. एक सांगू, समाज नावाची एक मोठी आणि अमूर्त व्यवस्था आपल्या आसपास नांदते. ही व्यवस्था अनेकदा मानवहितांच्या प्रवाहांबरोबर आंधळी कोशींबीर खेळण्यात फार धन्यता मानते. स्वत:च्याच डोळ्यांवर पट्टी बांधून ज्यांना सारं जग दिसत असतं, कळत असतं अशांनाच ‘आऊट’ करायला निघालेली असते. हे आऊट करणं आजच्या संदर्भात तर फार निरनिराळ्या प्रकारे आहे. एखाद्याला एकटं, एकलकोंडं करण्यापासून ते अगदी जिवानिशी बळी घेण्यापर्यंत. या व्यवस्थेला चेहरा नसतो. आकार-उकारही नसतो. ती दिसत असतेही आणि नसतेही. अशा या सगळ्या अमूर्त व्यवस्थेविरुद्ध पाच सामान्य स्त्रिया एक मुठ्ठी बनून लढल्या. आंधळी कोशिंबीर खेळायची असली तरी आपण इथं टिकाव धरून रहायचं या इराद्याने, इर्षेनं खेळल्या. आपल्या खरेपणाच्या, प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांनी यशही मिळवलं. कारण पट्टी व्यवस्थेच्या डोळ्यांवर आहे, आपण डोळे उघडे ठेवून मार्गक्रमण करू ही खूणगाठ त्यांनी मनाशी ठेवली असणार. असा खेळ खेळताना आंधळे वार अगणित झाले तरी यश मिळतं हे या पाच जणींनी दाखवून दिलं आहे. या डोळस जाणिवेची लागण समाजाला लवकरात लवकर होवो! आमीन!

(या रिपोर्ताजसाठी 29 डिसेंबर 2017 ते 4 जानेवारी 2018 या काळात दिल्ली, सहारनपूर, काशीपूर व जयपूर असा प्रवास केला होता. आणि 4 व 5 फेबु्रवारी 2018 रोजी कोलकाताहावडा या ठिकाणी गेले होते.)

तीन तलाकविरुद्ध पाच महिलांचा लढा महत्त्वाचा आहे. त्याला कायदेशीर यश मिळवून देण्यात शायराबानो यांचे मुख्य वकील ॲड. बालाजी श्रीनिवासन यांचाही फार मोलाचा वाटा आहे. मुख्य म्हणजे या केससाठी त्यांनी शायराबानो यांच्याकडून एकही रुपया घेतला नाही. मी दिल्लीत गेले तेव्हा अगदी शॉर्ट नोटीसवर बालाजी श्रीनिवासन यांना भेटण्याची इच्छा व्यक्ती केली तर त्यांनी कसलेही आढेवेढे न घेता पुढच्या दोन तासातील वेळ दिली. भेटल्यावर जाणवलं की ‘विद्या विनयेन शोभते’ म्हणतात ते उगीच नाही. अत्यंत हुशार आणि नम्रता दोन्ही त्यांच्या ठायी होती. या केससाठी उभे राहिलेल्या शायराबानो आणि त्यांच्या वडिलांचे त्यांना प्रचंड कौतुक वाटत होते. ते म्हणाले, ‘शायराबानो यांचे बंधू जेव्हा माझ्याकडे कागदपत्र घेऊन आले तेव्हा ते सारं वाचून मी हादरलोच. आपल्या मुलभूत हक्कांवर घाला आहे. भारतीय दंडविधान 14, 15, 21 आणि 25 या हक्कांचा भंग होत आहे. तिहेरी तलाकविरुद्ध याचिका करता येऊ शकते हे लक्षात आलं. तसं त्यांना सुचवलं आणि म्हणालो तीन-चार महिने वेळ घ्या आणि कळवा. तर पंधरा दिवसांत शायराबानो यांच्या वडिलांनी फोन केला, आम्हाला केस करायची आहे. इतर मुलींना न्याय मिळू शकणार असेल तर आम्ही केस करायला तयार आहोत.

मी तरीही त्यांना पुढच्या शक्यता सांगितल्या. समाजातून अगदी वाळीत ही टाकलं जाऊ शकतं. काहीही होऊ शकतं. पण ते अजिबात घाबरले नाहीत. काय व्हायचं ते होऊ दे, आम्ही तुमच्यासोबत आहोत असं त्यांनी निक्षून सांगितलं. मग आम्हीही केससाठी तयार झालो.’ सर्वोच्च न्यायालयाला 2015 च्या हिवाळ्याच्या डिसेंबरच्या सुट्‌ट्या सुरू होत्या. महिना-दोन महिने पूर्ण वेळ कामाला लागले. त्यांच्यासोबत आणखी चारजणं होती. तिहेरी तलाकच्या प्रथेला कसं कोर्टाच्या परिघात बसवता येईल यासाठी डोकं लढवू लागले. कुरआन, हदीस काय म्हणतं याचा अभ्यास सुरू झाला आणि केस आकाराला आली. केस दाखल झाल्यानंतरही सतत तीन  तीन चार-चार तास आमचा अभ्यास सुरू होता. घरात आल्यानंतरही कागदं जमवं, इतिहास तपास असं त्यांचं काम सुरू होतं.’

या काळात इतर वकिलांनीही बालाजी यांना समोरून आडून ‘पैसा किती येतो, कुठून येतो हे विचारण्याचा प्रयत्न केला.’ खरं तर त्यांनी शायराबानो यांच्याकडून एकही पैसा घेतला नाही हे मला शायराबानो यांच्या कुटुंबीयांकडून आधीच माहीत झाले होते. मात्र हा किस्सा सांगतानाही त्यांनी आपण पैसा घेतला नसल्याची प्रौढी मिरवली नाही. ‘‘पैसा जिथून मिळवायचा तिथून मिळवायचा. ते एक तंत्र असतं असं वडील सांगायचे. माझे वडीलही सर्वोच्च न्यायालयातील ख्यातनाम वकील. त्यांना पाहूनच आम्ही वाढत होतो. लोकहितासाठी असणाऱ्या केसमध्ये ते कसे पैसे घेत नव्हते. हे आम्ही जवळून पाहिलं होतं.’’ अशी आठवण सांगून आपण शक्य तिथं तो कित्ता गिरवावा. असं प्रांजळपणे सांगितलं. या केसच्या काळात सुरुवातीला त्यांना बारमध्ये वा कॅन्टीनमध्ये टाळण्याचे काही अनुभव आले, मात्र जेव्हा केसबाबत माध्यमांमध्ये चर्चा वाढल्या तेव्हा विरोध गळाल्याचे ते सांगतात.

यशाचं श्रेयही ते स्वत:कडे घेत नाहीत. ते म्हणतात, ‘‘हे कलेक्टिव्ह यश आहे. सर्वांनी आपापली चोख बाजू मांडली. इतर वकील, भारतीय मुस्लिम महिला आंदोलन, बेबाक कमिटी असो वा शासनाची भूमिका मांडणारा ड्राफ्ट असो. त्या सर्वांचं योग्य ड्राफ्टींगच केसला बळकटी देत होतं आणि माध्यमांनी या केसची चर्चा कायम ठेवली त्याचाही सकारात्मक परिणाम झाला. सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकवर बंदी आणल्यानंतर माजी खासदार आरिफ मोहम्मद खान यांनी स्वत: भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आपण आपल्या आयुष्यात या प्रथेवर बंदी पाहू असं कधीही वाटलं नव्हतं, असं ते म्हणाले. आम्ही या प्रथेविरुद्ध केव्हापासून लढत होतो परंतु संविधानाच्या, कायद्याच्या चौकटीत आणून याचिकेद्वारे लढावं हे आमच्याही लक्षात आलं नाही, असं भरभरून कौतुक त्यांनी केलं. मोठ्या माणसांकडून अशी पावती मिळाली की काम करण्याची मजा वाढते.’ बालाजी श्रीनिवासन या वकील म्हणून मोठ्या असणाऱ्या व्यक्तीतील नम्रता व प्रांजळपणा, माणूस म्हणूनही ते किती मोठे आहेत याची जाणिव देत होते.

ॠणनिर्देश - या लेखन-प्रवासासाठी विनोद शिरसाठ, रझिया पटेल, नासीरूद्दीन, अन्वर राजन, मुबारक अन्सारी, शमशुद्दीन तांबोळी, हलिमाबी कुरेशी, निशाद हुसेन, रितेश भुयार, अभिजीत शेवाळे व याचिकाकर्तींचे सहृदयी कुटुंब यांची विशेष मदत झाली. महिला दिनानिमित्त प्रसिद्ध होत असलेला ‘तीन तलाकविरुद्ध पाच महिला’ हा रिपोर्ताज साधना ट्रस्ट, साधना साप्ताहिक आणि संपादक विनोद शिरसाठ यांच्यामुळे शक्य झाला. विनोदसरांनी माझ्यावर विश्वास टाकून मला या प्रवास-लेखनाची संधी दिली. केवळ संधी नव्हे तर या प्रवासाची आर्थिक बाजूदेखील साधना ट्रस्टने सांभाळली. माझ्यासारख्या तरुण पत्रकारासाठी ही संधी, हा प्रवास आणि हे लेखन सारंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांचे विशेष आभार! 

Tags: रिपोर्ताज हिनाकौसर खान हिना खान reportaj triple talaq heenakausar khan heena khan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके