डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सिनेमा : कलर ऑफ पॅराडाईज (पर्शियन, इराणी)

मोहम्मदचं गावंही जंगलानं वेढलेल्या एका पहाडी इलाक्यातलंच आहे. पहाडावरच्याच त्यांच्या शेतात रंगीबेरंगी फुलांच्या बागा आहेत. पक्ष्यांचे आवाज आहेत. छोट्याश्या घराभोवतीचं अंगण आणि त्या अंगणात कोंबडीचा खुराडा, रचून ठेवेलले चाऱ्यांचे भार... हे सगळं रंगीत चित्र मोहम्मदच्या अंधपणाला अधिक अधोरेखित करत राहतं. पण तरीही तो त्याच्या शेतात रंगीबेरंगी फुलांच्या बागांमधून बहिणींसोबत धमाल करत फिरतो हे पाहून आपणही आनंदून जातो.

इराण देशाची तेहरान ही राजधानी. या शहरातल्या अंध शाळेत मोहम्मद नावाचा आठ वर्षांचा अंध मुलगा शिकतोय. शाळेतल्या परीक्षा संपल्यानं त्याला तीन महिन्यांच्या सुट्ट्या लागल्यात. सामान पॅक करून तो वडिलांची वाट पाहत शाळेच्या आवारात उभा राहतो. मात्र एकेक करून त्याचे शाळामित्र पालकांबरोबर निघून जातात तरी त्याला घेण्यासाठी त्याचे वडील अजून पोचलेले नसतात. तो तसाच बेंचवर पाय पोटात घेऊन बसून राहतो... निमूटपणे!

‘कलर ऑफ पॅराडाईज’ या मूळ पर्शियन भाषेत असलेल्या इराणी सिनेमाचं पर्शियनमधलं नाव ‘रंग ए खुदा.’ एखाद्या अंध व्यक्तीला माणसं, भवताल, निसर्ग काहीच दिसत नाही, पण तरीही ते त्यांच्या ज्ञानेद्रियांच्या मदतीनं संपूर्ण जग बघत असतात. मोहम्मदच्या अनुभवांतून आणि स्पर्शातून त्याला दिसत असलेला रंगबेरंगी निसर्ग, शेत-शिवारं, जंगलं, पर्वतरांगा, प्राणी-पक्ष्यांचे आवाज आपल्याला कॅमेऱ्याच्या लेन्समधून दिसत राहतात.

अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले इराणचे प्रसिद्ध दिग्दर्शक माजिद माजिदी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. माणसांच्या रोजच्या जगण्यातले साधेसाधे प्रसंग, त्या प्रसंगातली गुंतागुंत, भाव-भावना आणि त्यातून पुढं सरकत राहणारं आयुष्य... त्यांच्या सिनेमांतून दिसतं. ‘कलर ऑफ पॅराडाईज’ हा सिनेमा एका अंध मुलाभोवती फिरतो.

या सिनेमाची गोष्ट जितकी त्या अंध मुलाची आहे तितकीच त्याच्या वडिलांचीदेखील आहे. वडिलांना दुसरं लग्न करायचं असतं, पण मोहम्मदच्या अंधपणामुळं ते करता येत नसतं. अंध मुलाची आई होण्यास कुणीच तयार होणार नाही, अशी त्यांना भीती असतेे. त्यामुळे ते त्याला शक्य तेवढे घरापासून दूरच ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठीच त्यांनी त्याला आपल्या गावापासून बरचंसं दूर तेहरान शहरातल्या अंध शाळा आणि वसतिगृहात ठेवलेलं असतं.

अशीच एकदा मोहम्मदला शाळेची सुट्टी लागते तरी त्याला त्याचे बाबा घ्यायला जात नाहीत, तेव्हा तो हिरमुसून बाकावर बसून राहतो. त्याचवेळी त्याला एका पक्ष्याच्या पिल्लाचा चीची करणारा... जरासा रडका आवाज ऐकू येतो. आवाज जिथून येत होता त्या झाडीकडं तो वळतो. तर त्याच दिशेनं एक मांजर चालत येत असल्याचं त्याला जाणवतं. खरं तर मांजरीच्या पावलांचा आवाज होत नाही. ती इतक्या दबक्या पावलांनी येते की, आपल्यासमोर धपकन्‌ येईपर्यंत किंवा म्यांव-म्यांव ऐकू येईपर्यंत तिची चाहूल लागत नाही. पण मोहम्मदला तिची चाहूल बरोबर लागते. पिल्लाच्या घाबऱ्या  आवाजाचा आणि मांजरीचा काही तरी संबंध आहे, हे त्याच्या लगेच लक्षात येतं. तो तोंडानं मोठा आवाज करून मांजरीला पळवतो. आणि हळूहळू झाडीत चालत जातो.

तो पिल्लाच्या आवाजाच्या जवळ पोचतो. पिल्लू हातात घेतो. पण त्याला मघापासून झाडावरून आणखी एका पिल्लाचा आवाज येत असतो. खाली पडलेल्या पिल्लाचं झाडावर एक घरटं असतं, हे त्याच्या बरोबर लक्षात येतं. मोहम्मद झाडाच्या दिशेनं वर बघतो आणि हातातलं पिल्लू स्वत:च्या शर्टाच्या खिशात ठेवून झाडावर चढू लागतो. त्याला झाडाची फांदी कुठंय, घरटं कुठंय काहीच ठाऊक नसतं. झाडावर चढण्यासाठी कुठं धरावं, कशावर पाय द्यावा हे काहीच माहीत नाही. पण तरी तो मोठ्या कष्टानं झाडावर चढायला लागतो. त्याचा पाय सटपटतो. हात खरटचटतो पण या कशाची चिंता न करता तो कसाबसा झाडाच्या एका मोठ्या खोडावर चढतो. कान टवकारून ऐकतो तेव्हा घरटं कुठंय हे त्याला अचूक समजतं. खिशातलं पिल्लू अलगद घरट्यात सोडतो. त्याला स्वत:ला घरी न्यायला बाबा येणार की नाही माहीत नसतं, पण तो पिल्लाला मात्र प्रयत्न करून त्याचं घरटं मिळवून देतो. अर्थात त्याला घ्यायला त्याचे बाबा अनिच्छेनं का होईना येतातच. इथून पुढं त्यांचा घराकडं जाणारा प्रवास सुरू होतो. या प्रवासात आपल्याला इराणच्या निसर्गरम्य पर्वतरांगा, जंगलं पहायला मिळतात.

या सिनेमाचं चित्रीकरण इराणच्या उत्तरेकडच्या भागात झालं आहे. कॅसपियन समुद्र आणि अलबोर्जच्या पर्वतरांगानी उत्तर इराणचा भाग व्यापलेला आहे. या भागात घनदाट जंगलं, थक्क करणारे बर्फाच्छदित पर्वत आणि निळे, चमचमीत समुद्रकिनारे आहेत. इराणचा हा निसर्ग सिनेमाचा एक मुलभूत घटक बनून येतो. मोहम्मदचं गावंही जंगलानं वेढलेल्या एका पहाडी इलाक्यातलंच आहे. पहाडावरच्याच त्यांच्या शेतात रंगीबेरंगी फुलांच्या बागा आहेत. पक्ष्यांचे आवाज आहेत. छोट्याशा घराभोवतीचं अंगण आणि त्या अंगणात कोंबडीचा खुराडा, रचून ठेवलेले चाऱ्यांचे भार... हे सगळं रंगीत चित्र मोहम्मदच्या अंधपणाला अधिक अधोरेखित करत राहतं. पण तरीही तो त्याच्या शेतात रंगीबेरंगी फुलांच्या बागांमधून बहिणींसोबत धमाल करत फिरतो हे पाहून आपणही आनंदून जातो. मोहम्मदला खरं तर ना सभोवताचे रंग दिसत आहेत, ना सौंदर्य! पण तरीही तो ज्या आनंदानं त्या शेत-शिवारातून फिरत असतो ते पाहून आपण प्रेक्षक म्हणूनही खूप सुखावतो.

मोहम्मदला आई नसते. वडील, दोन बहिणी, आजी असं त्याचं कुटुंब असतं. आजीचा आणि बहिणींचा तो फार लाडका असतो. त्याला त्यांच्यासोबत राहायला फार आवडतं. ते चौघं एकत्र असले की भरपूर गमंतीजमंती करतात. निरनिराळ्या रंगाची फुलं गोळा करून त्या फुलांपासून रंग बनवणे असेल, पांढऱ्या धाग्यांना त्या फुलांच्या रंगात बुडवणं असेल, कोंबड्यांनी घातलेली अंडी वेचणं असेल, कोंबड्यांची पिसं उडवणं असेल. या सगळ्याची मोहम्मदला खूप धमाल वाटते. तो गावी जातो तेव्हा आजीला म्हणतो, ‘आजी तू बस जरा. डोळे मीट आणि हात पुढं कर.’ आजीसुद्धा लगेच डोळे मिटून हात पुढं करते. तो तिचा हात शोधत त्यावर एक बारकीशी क्लिप ठेवतो. आजी डोळे उघडते आणि आनंदून जाते. आजीनं डोळे मिटले नसते तरी ते काही मोहम्मदला थोडीच कळणार होतं. पण त्याच्या आजीचा हा प्रामाणिकपणा पाहून नकळत आपले डोळे पाणावतात.

या सिनेमात मोहम्मदला सूक्ष्म आवाजही खूप तीक्ष्णपणे ऐकू येतात. अंध मुलांची ऐकण्याची क्षमता चांगली असते हे माजिद यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सिनेमात खूप चांगल्या प्रकारे ध्वनीचा वापर केला आहे. या सिनेमात पाण्याच्या झुळझुळीचा, समुद्रकिनाऱ्यांचा, पक्ष्यांचा, सुतारपक्षी आणि टर्की पक्ष्यांचा आवाज तर खूपच छान वापरला आहे. विशेष म्हणजे मोहम्मदला ऐकू येतंय, असे त्याच्या चेहऱ्यावर भाव उमटतात तेव्हा नकळत आपण सिनेमाचा आवाज वाढवून त्याला ऐकू येत असलेला आवाज लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करतो.

मोहम्मदच्या वडिलांना मोहम्मद नकोसा वाटणं, त्यानं दूर निघून जावं, मरावं किंवा त्याचं काहीही होवो अशा तऱ्हेच्या त्यांच्या मनातल्या भावना दाखवण्यासाठी टर्की पक्ष्याच्या आवाजाचा वापर केला आहे. हा आवाज एका विशिष्ट लयीत हळुवारपणे कमी होतो.

मात्र पुढं मोहम्मदचे बाबा आजीचा विरोध न जुमानता त्याला दुसऱ्या गावी फसवून नेतात. एका अंध सुताराकडे काम शिकवण्यासाठी ठेवतात. घरापासून खूप दूर आणि फसवून आणल्यामुळं मोहम्मद खूप जास्त दुखावतो. अंध सुतार त्याला सुतारकामाच्या लाकडांची माहिती देत असतो. पण मोहम्मद रडत राहतो. सुतारही तर अंध आहे त्याला मोहम्मद रडतोय हे दिसत नसतंच. पण त्याच्या हातावर मोहम्मदचे अश्रू पडतात. तेव्हा सुतार म्हणतो, ‘इतक्यात तुला घरच्यांची आठवणही येऊ लागली.’

मोहम्मद रडतारडताच सुताराला म्हणतो, ‘नाही. पण मी अंध आहे म्हणून कुणालाच नकोय. अगदी आजीलादेखील. तीदेखील माझ्यापासून दूर पळते. सगळेच पळतात.’ अंध सुतार हे ऐकून काहीच बोलत नाही. त्याचंही कदाचित तेच दु:ख असणार.

मोहम्मद मुसमुसत म्हणतो, ‘‘माझ्या शाळेतले शिक्षक म्हणतात, जी मुलं अंध असतात ती देवाला खूप प्रिय असतात. पण असंच असेल तर त्यानं आम्हाला अंधच कशाला केलं? आम्ही तर त्यालाही पाहू शकत नाही. माझे शिक्षक म्हणायचे, ‘पण तसंही देव दिसतच नाही. मात्र तो सगळीकडं आहे. तू तुझ्या बोटाच्या पेरेवर त्याला अनुभवू शकतोस.’ मी आता त्याचा माझ्या बोटांना स्पर्श होईपर्यंत शोध घेत राहणार आहे. आणि तो सापडल्यावर मी त्याला आधी माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. सगळी गुपितंसुद्धा सांगणार आहे.’’

आपलं मन जाणणारा, ऐकून घेणारा कुणीच नसल्याची सल त्याच्या या संवादातून थेट आपल्यापर्यंत पोचते. याच भावना त्या अंध सुताराच्याही असतात आणि म्हणूनच तो फक्त इतकंच म्हणतो, ‘तुझे शिक्षक खरं बोलतात.’ आणि मग शांतपणे उठून निघून जातो.

इकडं आजी मात्र मोहम्मदचा दुरावा सहन करू शकत नाही. ती घर सोडून जायला निघते, मोहम्मदचे वडील तिची विनवणी करतात. तरीही ती निग्रहाने बाहेर पडते, तेव्हा मोहम्मदचे वडील तिच्यासमोर आपली हतबलता व्यक्त करतात. पत्नीचा मृत्यू झालेला आहे, मोहम्मदला भविष्यात कोण सांभाळणार ही चिंता त्यांना असते. आजी परत येते, पण लवकरच तिचा मृत्यू होतो.

प्रेम करणारी आजी आता या जगात नाही, हेही कुणी मोहम्मदला सांगत नाही. पण काही दिवसांनी त्याच्या बाबांचं होऊ घातलेलं लग्नही मोडतं. पुढं काही दिवसांनी त्याचे बाबा त्याला घरी घेऊन जाण्यासाठी येतात तेव्हा परतीच्या प्रवासात निसर्गाच्या वादळी संकटात अडकतात. पाण्यावरचा लाकडी पूल तुटून पाण्याच्या प्रवाहात दोघंही वाहत जातात, पण अखेर वाचतात. माणसांचं साधं आयुष्यही अचानक कुठल्या ना कुठल्या संकट आणि अडथळ्यांच्या भोवऱ्यात अडकतं आणि त्यातून निसटतंही. अगदी तसंच घडतं हे!

एखाद्या अंध मुलावर सिनेमाची कथा लिहावी असं माजिद यांचं ठरलेलं नव्हतं. पण त्यांना सतत वाटायचं की दृष्टी असणारी माणसं जग बघून कंटाळतात, पण अंध व्यक्तींचं कधीच असं होत नाही. असं कसं? या एका प्रश्नाचा शोध घेण्यासाठी ते वर्षभर तेहरानमधल्या अंधशाळेत जाऊ लागले. अंध मुलं त्यांच्यासाठी अपरिचित असणाऱ्या जागांवर कसे रिॲक्ट होतात, याविषयी त्यांचं कुतूहल जागं झालं. तेवढ्यासाठी ते काही मुलांना उत्तर इराणच्या प्रदेशात घेऊन गेले. ही मुलं जेव्हा नदी, पर्वतरांगा, समुद्र पाहतील तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया असेल, ते या निसर्गाचा कसा आनंद घेतील हे माजिद यांना पहायचं होतं. मुलं तर निसर्गात धमाल करत होती. नदीच्या किनारी खेळू लागले, पाण्याला स्पर्श करू लागले आणि वाळूचा स्पर्श झाल्यानंतर तर ते ब्रेल भाषा वाचत असल्यासारखे अक्षरं म्हणू लागली. हे सगळं पाहून माजिद थक्क झाले. तिथंच मोहम्मदचं पात्र करण्यासाठी ‘मोहसीन रोमझानी’ हा मुलगा त्यांना गवसला. मोहसीननं काही वाळूच्या कणांना स्पर्श करून ‘गॉड’ शब्द उच्चारला. माजिद यांनी सहज म्हणून तीच वाळू अन्य एका मुलाला दिली तर त्यानंही त्यात ‘गॉड’ हा शब्द असल्याचं सांगितलं. माजिद चकित झाले.

ते म्हणतात, ‘आपण जेव्हा निसर्गाकडे पाहतो, तेव्हा ते फारच वरवरचं असतं. अंध व्यक्ती मात्र त्याच्या खूप खोलात शिरण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणूनच त्यांना त्या वाळूच्या कणांत दिसलं ते आपल्याला दिसत नाही.’

या अंध मुलांच्या वर्षभराच्या भेटीतून, सहलीतून जे जे अनुभव माजिद यांना येत होते, त्यातून चित्रपटाची कथा आकारत गेली. यामध्ये निसर्ग आणि अंधत्वाची एक हळुवार गुंफण घालण्यात आली आहे. सिनेमाच्या सुरुवातीला जवळजवळ दोन मिनिटं पडद्यावर केवळ काळा रंग आहे आणि फक्त आवाज ऐकू येतात. आपण अस्वस्थ होतो,  पडद्यावर काही दिसत का नाही म्हणून, इतका वेळ झाला तरी पडदा काळाच! ज्यांचे आवाज येताहेत ते तरी दिसावेत म्हणून आपली चलबिचल होत राहते. पण सिनेमाच्या या पहिल्याच दृश्यात माजिद आपल्याला अंधपणाचा अनुभव देऊन जातात. अंधकार आणि काळाच रंग असणाऱ्या अंध मुलांच्या आयुष्यात विविधरंगी भावना, रंगबेरंगी निसर्ग असतो हे या सिनेमातून खूप साध्या पद्धतीनं सांगितले आहे.

या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोहम्मदच्या वडिलांचं पात्र साकारणारे होसेब महजूब वगळता कुणीही व्यावसायिक कलाकार नाहीत. मोहम्मद या पात्रासाठी मोहसीन रोमझानी या अंध मुलाची निवड केली आहे. बहुतांश वेळा माजिद आपल्या कलाकारांची निवड अशाच तऱ्हेनं सर्वसामान्य लोकांमधून करतात. या सिनेमात मोहम्मदच्या गोड आजीचीदेखील निवड अशीच झाली. त्या खऱ्याखुऱ्या सुरकुतलेल्या आजीच. मोहम्मद बहिणींच्या सामान्य शाळेत जाण्यासाठी हट्ट करतो तेव्हा आजीचे डोळे पाणावतात आणि मोहम्मद खूश होतो तेव्हा त्या मंद हसतात, हे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी खरेखुरे आहेत.

माजिद म्हणतात, ‘आमच्या बहुतांश कलाकरांना हे माहीतच नसतं की सिनेमाचं चित्रीकरण सुरू आहे. विशेषत: मुलांना. आम्ही त्यांना सांगतो की, हा एक खेळ आहे आणि आपण तो खेळतोय. त्यांच्या नैसर्गिक वावरासाठी आम्हाला खूप सराव घ्यावा लागतो. एका अर्थानं आमच्या सिनेमांच्या फ्रेम्स हे वेगवेगळ्या तऱ्हेनं केलेले सरावच असतात.’

या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानचा माजिद यांचा एक अनुभवही फारच गहरा आहे. चित्रीकरणादरम्यान एकदा मोहसीन यानं माजिद यांचा हात हातात घेतला आणि तो म्हणाला, ‘तुमचे हात किती पांढरे आहेत.’

माजिद यांनी स्वत:चा हात पाहिला आणि म्हणाले, ‘मोहसीन माझे हात पांढरे नाहीत.’ यावर तो म्हणाला, ‘नाही, मला माहीत आहे तुमचे हात पांढरे आहेत, कारण तुम्ही खूप चांगले आहात.’

माजिद म्हणतात, ‘एखादी गोष्ट खूप शुद्ध, चांगली असली की आपण म्हणतो किती स्वच्छ, स्पष्ट आहे... हे त्याच अर्थानं.’

याच अर्थाचा आजी आणि मोहम्मद यांच्यातला एक संवादही सिनेमात येतो. तेव्हा माजिद यांच्या निरीक्षणाचं कौतुक वाटतं. मोहम्मदची निरागसता आणि त्याच्या आयुष्यातला संघर्ष त्यांनी अशा निरीक्षणांतूनच उभा केला आहे. मोहम्मदच्या भाषेत सांगायचं तर ‘कलर ऑफ पॅराडाईज’ हा खरंच शुद्ध संवेदनशील अनुभव आहे.

----

साधना बालकुमार दिवाळी अंक 2021 मधील सर्व लेख आता ऑडिओबुक स्वरुपात स्टोरीटेलवर ऐकता येतील. त्यातील 'कलर ऑफ पॅराडाईज' या पर्शियन भाषेतील इराणी चित्रपटावर हिनाकौसर खान- पिंजार यांनी लिहिलेला लेख ऐका त्यांच्याच आवाजात.

'साधना बालकुमार दिवाळी अंक 2021'  Storytel वर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

हिनाकौसर खान,  पुणे
greenheena@gmail.com

पत्रकार, लेखक 


Comments

  1. Ravi Gaonkar- 09 Nov 2021

    सिनेमा खूपच प्रभावी आहे!

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके