डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बिंग फोडिले रणी, वाजतात चौघडे...

भ्रष्ट खासदार काही राजकारणी किती नालायक आहेत त्यांचे गैरव्यवहार वारंवार उजेडात आले; त्यांच्या नावाने भारतभर चौघडे वाजले. यामुळे जनतेचा संसदीय राजकारणावरच्या विश्वासास तडा गेला. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील 'यादवां 'च्या राज्यातील, चोर, गुंड, माफिया, ग्रष्टाचान्यांनी उच्चपदवीधर तरुण कर्तव्यदक्ष अधिकारी सत्येंद्र दुवे आणि मंजुनाथन यांच्या प्रामाणिकपणाची त्यांना शिक्षा म्हणून गोळ्या घालून हत्या केली, तेच गुंड दिवसा भर रस्त्यावरून फिरताना दिसत आहेत. हे सडलेले, भ्रष्ट क्षेत्र टिकून काय उपयोग? त्याची पूजा करायची का? कायद्याचे नव्हे तर, 'माफिया, गुंड, भ्रष्टाचारी राजकारण्यांचे' हात लांब आहेत, असेच म्हणावे लागेल.

महाभारतातील दुर्योधन आणि अभिमन्यू कलियुगात पुन्हा अवतरल्यामुळे अवघा देश स्तंभित झाला आहे. गुप्त कॅमेच्यापुढे खासदारांच्या स्थानिक क्षेत्र विकास निधीतील दलाली घेणान्या आणखी सात खासदारांवर (पूर्वीचे अकरा- करप्ट इलेव्हन) स्टिंग ऑपरेशन झाले आहे. त्याची गंभीर दखल घेत लोकसभाध्यक्ष सोमनाथ चतर्जी यांनी या खासदारांवरील आरोपांची चौकशी करण्याची घोषणा केली. समितीने या खासदारांच्या हकालपट्टीची शिफारस केली आहे. राज्यसभेत हे प्रकरण सभापती भैरोसिंह शेखावत यांनी आचरण समितीकडे सोपविले.

अर्थात खासदारनिधीची रक्कम एका प्रकल्पाला मंजूर करण्यासाठी दलाली मागताना स्टार न्यूज ने पकडलेले गोव्याचे वादग्रस्त खासदार चर्चिल आलेमाव यांनी हा आपल्याला गोवण्याचा कट असल्याचे म्हटले आहे. आलेमाव यांची गोव्यातील कारकीर्द व एकूण कीर्ती लक्षात घेता, त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवण्याची शक्यता नाही. काही दिवसांपूर्वी ऑपरेशन दुर्योधन ने लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेणान्या खासदारांच्या कृष्णकारवायांवर प्रकाशझोत टाकला. स्थानिक क्षेत्र विकास निधीतून दलाली घेणान्या सात खासदारांचे बिंग ऑपरेशन चक्रव्यूह ने फोडले. त्यांमध्ये 'नीतिमान' अशा भाजपचे तीन सदस्य असून, त्यातला एक माजी मंत्री आहे. बसपाबरोबर सपाचाही सदस्य अडकला असून, त्यामुळे मायावतींनी समाधानाचा सुस्कारा टाकला असेल!

"दुर्योधन' अनिरुद्ध बहल यांच्या 'कोब्रा डॉट कॉम' ने पार पाडले व 'आजतक 'चे त्यांना सहकार्य होते. तर 'चक्रव्यूह' स्टार न्यूजने पार पाडले. चॅनेल्समधील स्पर्धेतून शोध पत्रकारितेस प्रेरणा मिळून भ्रष्टाचार बाहेर येत असेल, तर त्यात नाक मुरडण्यासारखे काहीच नाही. मात्र जे खासदार या ऑपरेशनमध्ये सापडले नाहीत, ते स्वच्छ असतीलच असे नव्हे. तसेच यामुळे सगळेच राजकारणी व खासदार भ्रष्ट व नालायक आहेत, असेही नाही. परंतु या प्रकारचे गैरव्यवहार वारंवार उजेडात आल्यास जनतेचा संसदीय राजकारणावरच्या विश्वासास तडा जाईल व हीच खरी चिंतेची बाब आहे. बिंग फोडिले रणी, वाजतात चौघडे...' अशी आपल्या लोकप्रतिनिधींची धिंडे निघणेही लोकशाहीच्या दृष्टीने हानिकारक बाब आहे.

लोकसभेतील जवळपास वीस वर्षांच्या कालखंडात मधू ऊर्फ नाना दंडवते यांनी केलेल्या एकापेक्षा एक सरस भाषणांचा संग्रह 'एकोज् इन् पार्लमेंट' या नावाने ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाला आहे. देशापुढील विविध समस्यांबद्दलचे आपले सखोल विचार दंडवते यांनी त्यात प्रकट केले आहेत. संसदशास्त्रात पारंगत असलेले नाना, कोणती संसदीय आयुधे केव्हा परजायची हे व्यवस्थित जाणून होते. त्यामुळेच 'हा ग्रंथ संसद सदस्यांचा मार्गदर्शक आहे असे उद्गार तत्कालीन राष्ट्रपती आर.व्यंकटरमन यांनी त्या ग्रंथाचे प्रकाशन काढले होते. नानांचे अलीकडेच निधन झाले. त्यांचे मार्गदर्शन यापुढे मिळणार नाही व त्यांचा ग्रंथ वाचणारे किती खासदार संसदेत आहेत, याचा शोध घ्यावा लागेल. गेल्या काही दिवसांत संसदेत ज्या घटना घडल्या आहेत, त्या पाहता, त्या बघायला आपण या जगात नाही तेच बरे, असे कदाचित नाना दंडवते यांच्या आत्म्याला वाटत असेल...

अनिरुद्ध बहल यांच्या 'कोब्रा डॉट कॉम'ने 'आजतक' या चॅनेलच्या सहकार्याने 'ऑपरेशन दुर्योधन' पार पडले व प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेणाऱ्या खासदारांची लाचखोरी उघडकीस आणली. त्या कथित 'करप्ट इलेव्हन'मध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामाचे अमर्याद पैसे खाणारे भाजपचे भक्त सर्वाधिक संख्येने आहेत. काँग्रेस, राष्ट्रीय जनता पार्टी, बहुजन समाज पार्टी यांचेही सदस्य आहेत.

विविध पक्ष, लोकसभाध्यक्ष सोमनाथ चटर्जी व राज्यसभेचे सभापती भैरोसिंह शेखावत यांनी कथित लाचखोर खासदारांविरुद्ध कारवाई केली. खासदारांची चौकशी करण्यासाठी पवनकुमार बन्सल समिती नेमण्यात आली. त्या त्या पक्षांनी आपापल्या खासदारांविरुद्ध निलंबनाची कारवाई केली, तसेच लोकसभा राज्यसभेत त्यांची चौकशी पूर्ण होऊन ते निर्दोष ठरेपर्यंत त्यांनी संसदेत हजर राहू नयेत असे आदेशही देण्यात आले होते.

संशयित खासदारांना पैसे घेताना स्टिंग ऑपरेशन'द्वारे कॅमेन्यानेच कैद करण्यात आले. त्यामुळे आम्ही त्या गावचेच नाही' असे म्हणण्याची सोय राहिलेली नाही! परंतु या खासदारांविरुद्ध आरोप सिद्ध झाल्यास त्यांचे फक्त निलंबन होऊन उपयोगाचे नाही, तर त्यांच्यावर फौजदारी खटले भरले जाण्याची आवश्यकता होती.

प्रश्न फक्त खासदारांचा नाही, तर या व्यवस्थेचा आहे. अमुक-तमुक जबाबदारी सरकारची आहे, असे सतत बोलत राहणे योग्य नाही. प्रत्येक नागरिकाचीही ती जबाबदारी आहे. जनतेच्या अपेक्षांना त्वरेने प्रतिसाद देणारे सरकार व जबाबदारीची जाणीव ठेवणारी जनता यांच्यातील सुसंवादच चांगल्या समाजाची अनुभूती देऊ शकेल' असे उद्गार राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी काढले आहेत. नुकतेच नवी दिल्लीत, एका समारंभात भाषण करताना ते म्हणाले की, 'समस्यांमुळे हतबल न होता, त्यांच्यावर मात केली पाहिजे व पुढची वाट चालायला शिकले पाहिजे' राष्ट्रपतींचे हे भाषण नेहमीइतकेच प्रेरणादायी असले, तरी जमिनीवरचे वास्तव काय आहे ?

बिहारमध्ये रस्ते कामातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणारा आयआयटी इंजिनियर सत्येंद्र दुबे यांची निर्घुण हत्या होते. दुबेने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यालयास लिहून भ्रष्टाचाराबद्दल तक्रार केली; परंतु ते पत्र 'पीएमओ मधून 'लोक' झाले. म्हणजेच भ्रष्टाचाऱ्यांचे हात व्यवस्थेत बरपर्यंत पोहोचले आहेत. चौकशी दावून टाकण्यात आली. रालोआ सरकार बदलल्यानंतर 'सीबीआय 'ने हे प्रकरण तडीस नेले, तेव्हा दुबेच्या आरोपात तथ्य असल्याचे उघड झाले. लालबहादूर शास्त्री, डॉ.राजेंद्र प्रसाद, लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या विहारमध्ये तर भ्रष्टाचाराचा महापूर यावा, यापरते दुर्दैव ते काय!

बिहारमधील प्रकल्पातील सुवर्ण चतुष्कोण रस्त्यांच्या कामांमधील गैरव्यवहार वेशीला टांगणारा सत्येंद्र दुबे आदर्शवादी होता, सडलेल्या व्यवस्थेला मुक्त करण्याच्या युद्धात तो 'हुतात्मा झाला, ही घटना दोन वर्षांपूर्वीची. एक महिन्यांपूर्वी (19 नोव्हेंबर 2005) इंडियन आईल कॉर्पोरेशनमध्ये (आयओसी) काम करणारा मंजुनाथन यानेही यंत्रणेला लागलेल्या किडीबद्दल 'व्हिसल ब्लोईंग' केले, म्हणजेच बोंब ठोकली.

सत्येंद्र दुबे कानपूरचा आयआयटी, तर मंजुनाथन पण्मुगम् हा लखनौचा आयआयएम (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) दोघेही हुशार, कर्तव्यदक्ष व स्वच्छ, 27 वर्षीय मंजुनाथन उत्तर प्रदेशात आयओसी 'मध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होता. लखीनपूर खेरी येथे एका पेट्रोल पंपात भेसळयुक्त पेट्रोल विकले जात होते, ते लक्षात येताच मंजूने ते बंद करण्याचा आदेश दिला. मागील तीन महिन्यांत रखीमपूरमधील आणखी दोन पंप त्याने याच कारणाकरिता बंद करवले होते.

बिहारमध्ये रस्तेकामात खाबूगिरी करणारे कंत्राटदार आहेत, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशात पेट्रोल माफिया आहेत. त्यांनी मंजूला धमक्या दिल्या होत्या व गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले होते. मंजूच्या वडिलांनीदेखील त्याला जरा सबुरीने घे, धोक्यात पडू नकोस', असा सल्ला दिला होता.

मंजूचे वडील कोलारमधील सोन्याच्या खाणीत डिझाइन मॅनेजर म्हणून काम करतात. मुलाकडून कसलीच वार्ता नसल्यामुळे त्यांनी 'हाऊ आर यू' असा एसएमएस त्याला धाडला. त्यावर मंजूचे उत्तर आले नाही. त्याच दिवशी मंजूला बेदम मारहाण करण्यात आली होती, नंतर त्याच्या शरीरात सहा गोळ्याही घालण्यात आल्या. त्याच्याच मोटारीत मागील सीटवर त्याचा मृतदेह मिळाला. पेट्रोलपंपाचे दोन कर्मचारी मंजूचा मृतदेह घेऊन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी चालले होते. त्यांना पोलिसांनी अटक केली व मोनू मित्तल नावाच्या पेट्रोलपंपाच्या मालकासही पकडले.

पेट्रोलपंप भेसळयुक्त पेट्रोल विकतो, तो बंद करावा असे फर्मान मंजूनाथनने काढले; पण महिन्याभरातच तो पुन्हा चालू करण्यात आला. त्यामुळे मंजूने पुन्हा तेथे छापा टाकला, तेक्षाच त्याचा खून करण्यात आला.

आपण ज्या भागात काम करीत आहोत, तेथे आईल माफियाचे राज्य असून, कित्येक टोळ्या कार्यरत आहेत, कोणत्याही क्षणी जिवाचे बरेवाईट होऊ शकेल, असे मंजूने आईवडिलांना सांगून ठेवले होते. पण असा प्रसंग येईल असे त्यांना वाटले नव्हते. म्हणजे कर्तव्यपालन करतानाच मंजू मरणाला सामोरा गेला. पेट्रोल भेसळीवर देखरेख ठेवणारी प्रभावी यंत्रणा नाही व वरिष्ठांचा पाठिंबाही मिळत नाही या मंजूपुढच्या अडचणी होत्या. बिहारप्रमाणेच उत्तर प्रदेशात- जेये मंजू काम करीत होता- गुंडांचे राज्य आहे, त्यामुळे गुन्हा घडत असल्याचे दिसले, तरी मौन पाळावे लागते, नाहीतर प्राणाची भीती, मंजुनाथचा जीव ही त्याने मौन न-व पाळल्याची सजा होती.... 

मंजूने शिक्षण स्वचळाचर घेतले. त्यासाठी नोकरी केली, दक्षिणेतून तो कामाकरिता उत्तरेत गेला आणि तेथेच माफियांनी त्याचा बळी घेतला. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचे राज्य असताना सत्येंद्र दुबेला ठार मारण्यात आले व उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादव सरकार असताना मंजुनाथनची हत्या झाली. हे दोघेही समाजवादी, क्रांतिकारक, दिल्लीत पुरोगाम्यांचे यूपीए सरकार. जे सरकार आपल्याच अधिकाऱ्यांना संरक्षण देऊ शकत नाही, ते जनतेचे रक्षण कसे करणार? स्वच्छ प्रशासन, समाजवाद वगैरे सर्व बोलण्याच्या गोष्टी आहेत.

मंजुनाथनच्या पालकांचे सांत्वन करण्यासाठी सत्येंद्र दुवेचा भाऊ धनंजय गेला; तेव्हा 'तुझ्यामध्ये मला, माझा मंजूच दिसतो' असे उद्गार प्रमिला मंजुनाथन यांनी काढले. सत्येंद्रइतकाच धनंजयही आदर्शवादी आहे, पण 'आम्हांला अजूनही घराबाहेर पडायची भीती वाटते' अशी भावना मंजूच्या पित्याने धनंजयपाशी व्यक्त केली. जेथे खुनी राजरोस रस्त्यावर भटकत आहेत, तेथे भारत हा जगातील महासत्ता बनण्याचा विचार तरी कसा करू शकतो, असा प्रश्न त्यांना पडणे म्हणून साहजिचक आहे. या देशात कायद्याचे राज्य आहे की माफियांचे, हा सवाल खूप जणांच्या मनात येतो.

जोपर्यंत आपली राज्यव्यवस्था भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या मगरमिठीमध्ये सापडली आहे. तोपर्यंत आयआयटी आणि आयआयएममधून बाहेर पडलेल्या विद्यार्यांच्या वाट्थाला मृत्यूच येणार, असे खिन्न उद्गार बनारस हिंदू विद्यापीठात शिकत असलेल्या धनंजयने काढले आहेत; ते उगीच नाहीत!

20 डिसेंबर रोजी राजधानी दिल्लीत झालेल्या एका समारंभात प्रमिला षण्मुगम यांनी राष्ट्रपतींना थेट प्रश्न केला, 'श्रीमान राष्ट्रपतीजी, मंजुनाथनसारखी तरुण व निरपराध मुले कर्तव्य बजावताना मरणार नाहीत, याबद्दल आपण काय करणार आहात. ते सांगा.'

हा प्रश्न विचारताना प्रमिलाजीच्या डोळ्यांतून घळघळा पाणी ओघळत होते. त्यानंतर थोड्याच वेळात अब्दुल कलाम यांनी मंजूच्या आई-वडिलांना राष्ट्रपती भवनात भेटीस बोलावले.

…आम्ही मध्यमवर्गीय आहोत व खुनी श्रीमंत आहेत, ते पैशाच्या बळावर तुरुंगाबाहेर येऊ शकतात" ही मंजूच्या पालकांची भीती असून, राष्ट्रपतींनी त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

सत्येंद्र दुबे व मंजुनाथन षण्मुगम उच्च पदवीधर होते. मनात आणले असते, तर ते परदेशात भरभक्कम पगारांच्या नोकऱ्या मिळवू शकले असते. किंवा खाजगी कंपनीत लठ्ठ पगार व सोईसवलती असलेला 'जॉब' त्यांना सहज मिळाला असता, तरी ते सरकारी क्षेत्रात कामाला लागले. पण सार्वजनिक क्षेत्र माफियांच्या हातांत गेले आहे की काय असे वाटावे, अशी स्थिती आहे. डावे नेते सरकारी क्षेत्राची तरफदारी करतात, पण असले सडलेले, भ्रष्ट क्षेत्र टिकून उपयोग काय? त्याची पूजा का करायची? पं.नेहरू या क्षेत्रातील प्रकल्पांना 'विकास मंदिरे' म्हणत, पण ही मंदिरे आता बडव्यांच्या हातांत गेली आहेत.

सुवर्णचतुष्कोन प्रकल्प, पेट्रोलबाटप या कामांवर देखरेखीच्या प्रभावी व समांतर यंत्रणा नाहीत, केरोसीनवरील सर्वसिडीमुढे पेट्रोल भेसळ वाढली आहे. गोरगरीब लोक काळ्या बाजारात रॉकेल घेतात, कारण ते मुख्यत्वे पेट्रोलमध्ये मिसळले जाते. त्यामुळे त्याची टंचाई निर्माण झाली असून परिणामी ते जादा दाम मोजून काळ्या बाजारात घ्यावे लागते.

यंत्रणेविरुद्ध आवाज उठविण्यास संरक्षण देणारा कायदा व्हिसल ब्लोईंग अ‍ॅक्ट' सरकार करणार आहे. उद्या पेट्रोल भेसळ करणाऱ्यांसाठी कटोर शिक्षेची तरतूद केली जाईल, पण उपयोग कार्य? कारण कायदे राबविले जात नाहीत व प्रामाणिकांची संख्या अत्यल्प आहे.

सिस्टीम मध्ये दुबे, मंजुनाथन अल्पसंख्येत आहेत. त्यामुळेच जेथे कायदे केले जातात, त्या संसदेपासून ते राबविले जातात. त्या प्रशासनव्यवस्थेपर्यंत सर्वत्र भ्रष्ट,गुंड, माफियांचे हात पोहोचले आहेत. कानून नव्हे, तर माफिया के हाथ, बड़े लंबे होते है, भाई' असेच म्हटले पाहिजे !

लोकशाहीचे खांब किती खरसे आहेत, याचेच हे एक उदाहरण आहे...

Tags: मंजुनाथन सत्येंद्र दुबे खासदार ऑपरेशन दुर्योधन कोब्रा डॉट कॉम स्टिंग ऑपरेशन हेमंत देसाई weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके