काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणारे ठाकरे आपल्या घराणेशाहीचे मात्र समर्थन करतात. कार्यकर्त्यांवर एखादी व्यक्ती लादणे म्हणजे घराणेशाही, अशी त्यांची घराणेशाहीची व्याख्या आहे. राज ठाकरे यांनी रेषेच्या एका स्ट्रोकमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी 'मै हूं ना' असे म्हटल्यामुळे, ते उदया खरोखरच या पदावर गेले, तर 'क्यों हो गया ना?’ असे उद्गार काढून 'आम्ही मराठी'चा जयघोष होईल, यात शंका नाही.
'महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे.' असे महात्मा गांधीजींनी म्हटले होते. आता मात्र महाराष्ट्र हे मुख्यमंत्री पदासाठीच्या उमेदवारांचे मोहोळ आहे. असे म्हटले पाहिजे. राज्यातील निवडणुकीच्या रणांगणावर काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना-भाजप अशी लढाई आहे. या लढाईत कोण जिंकतो, कोण हरतो हे ठरण्याअगोदरच मुख्यमंत्री होण्यासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत. या पार्श्वभूमीवर 'इंडिया टुडे’ ने केलेल्या पाहणीत सुशीलकुमार शिंदे हे 'सर्वांत लोकप्रिय मुख्यमंत्री' ठरले असले तरी ते कर्तबगार वा कार्यक्षम असल्याचे कोणीही म्हटलेले नाही. यापूर्वी राज्यातील रयतेचा असा काही गैरसमज झालेला नाही. तसेच शिंदे हे यापूर्वी अर्थमंत्री वा सांस्कृतिक मंत्री असताना बिल्डर, व्यापारी, उद्योगपती व चित्रपट व्यवसायातील निर्माते कम् ब्रोकर यांच्यातच लोकप्रिय होते. आता मुख्यमंत्री असतानाही या परिस्थितीत फारसा फरक झालेला नाही, मात्र ते खूप लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा साक्षात्कार 'इंडिया टुडे’ ला झालेला दिसतो. शिंदे यांनी आपल्या वर्ष-दीड वर्षाच्या कारकिर्दीत सामाजिक अर्थसंकल्प आणला व राबविला; दलित-मागासांचा अनुशेष भरला आणि शेतकऱ्यांची कर्जे माफ केली व फुकट विजेची घोषणाही केली.
निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्यांचे अनेक निर्णय अंमलात येऊ शकलेले नाहीत. तसे ते अंमलात आले असते, तर त्यांची लोकप्रियता आणखी वाढली असती. आचारसंहिता लागू होण्याच्या एक दिवस अगोदर मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरातील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजला सर्व नियम बाजूला ठेवून 'डीम्ड युनिव्हर्सिटी’ चा दर्जा बहाल करण्याचा निर्णय घेतला. नाट्यसंकुलाला त्यांनी अनपेक्षितरीत्या जादा अनुदान घोषित केले. मराठी सिनेमावाल्यांच्या अनुदानातही वाढ केली जाणार आहे. सरकारी कृपाछत्राच्या तसेच अनुदाने व सोयी-सवलतींच्या जोरावर मते मिळविण्याचे उदारीकरणाच्या काळाशी विसंगत असे हे मुख्यमंत्र्यांचे वर्तन आहे. ज्यांना सरकारी संरक्षण हवे आहे. त्यांना ते न देता, ज्यांना ते देण्याची मुळीच गरज नाही, अशांना द्यायचे व मते मिळवायची, ही काँग्रेसवाल्यांची जुनी नीती आहे व त्याला धरूनच शिंदे यांचा कारभार सुरू आहे. त्यामुळे जनतेच्या पैशांचा वापर करून ते जनतेतच लोकप्रिय होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याउलट केरळमध्ये ए. के. अँटनी यांच्यासारख्या मुख्यमंत्र्याला लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या तेथील पराभवानंतर राजीनामा द्यावा लागला आहे. केरळमध्ये डाव्यांनी काँग्रेसला तडाखा दिला. मात्र त्यास फक्त मुख्यमंत्री एकटेच जबाबदार नसले, तरी त्यांना खुर्ची सोडायला लागली आहे. खरे तर सरकारचा कारभार सुधारण्यासाठी अँटनी यांनी कर्मचाऱ्यांना शिस्त लावली. त्यांच्या सवलती कमी केल्या. त्यांच्या विरोधास भीक घातली नाही.
गेल्या वर्षी त्यांनी राज्यात 'ग्लोबल इन्व्हेस्टर मीट' आयोजित केली; त्यामुळे 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आकर्षित होईल. अशी अपेक्षा आहे. आजारी सरकारी उद्योग त्यांनी गुंडाळायला सुरुवात केली व वीजसुधारणा राबविल्या. परंतु आर्थिक सुधारणा व प्रामाणिक कारभार लोकप्रियता मिळवून देऊ शकत नाहीत. त्यामुळे अँटनी यांना पद सोडावे लागले. उलट शिंदे यांच्यासारखा माणूस लोकप्रिय ठरतो व गौरविला जातो, ही आपल्या समाजजीवनाची शोकांतिका आहे. ते असो. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यास विलासराव देशमुख, पतंगराव कदम, गोविंदराव आदिक प्रभृतींना मुख्यमंत्री व्हायचे आहे. पण आता कदाचित 'लोकप्रिय मुख्यमंत्री' शिंदेच त्या पदावर बसतील. सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा दोनदा पराभव झाला असला, तरी सुशीलकुमार शिंदे 'लोकप्रिय' आहेत, असे आपण मानले पाहिजे. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाही; समजा ती संधी निर्माण झाल्यास विजयसिंह मोहितेपाटील, छगन भुजबळ, अजित पवार हे उमेदवार आहेत. ग्रामविकासमंत्री व नंतर गृहमंत्री म्हणून उत्तम कामगिरी करणारे आर. आर. पाटील भुजबळांसारखे 'फोकस'मध्ये नसले तरी राष्ट्रवादीतील ते सर्वांत चांगले नेते आहेत.
महानगरचे संपादक निखिल वागळे हल्ला प्रकरणीदेखील त्यांनी तत्परतेने कारवाई केली व सी.आय.डी. चौकशीचा निर्णय जाहीर केला. त्यांच्यानंतर अर्थमंत्री जयंत पाटील यांचा नंबर लागतो. तेही अत्यंत हुशार व कामात रस असलेले नेते आहेत. या दोन पाटलांपैकी एक मुख्यमंत्री झाल्यास राज्याचे भले होईल; पण ती शक्यता कमी आहे. कारण लोकशाही आघाडीचा विजय झाल्यास सुशीलकुमार शिंदेच वर्षभर तरी मुख्यमंत्री राहतील. त्यानंतर आम्हांला हे पद मिळावे असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेस धरण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास अजित पवार यांचे चान्सेस अधिक आहेत. शिवसेना-भाजपा युतीच्या विजयाची शक्यता धूसर असल्याचा गुप्तचर खात्याचा अंदाज आहे. लोकशाही आघाडीच जिंकेल, असा त्यांचा होरा आहे. सेना-भाजपचे काही नेतेही खाजगीत 125 जागाच मिळतील असे म्हणत आहेत. रेणापूर मतदारसंघात गोपीनाथ मुंडे यांना कडव्या आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे. भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे व नितीन गडकरी या दोघांनाही मुख्यमंत्री व्हायचे आहे. पण ज्यांचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री हा युतीतील करार असल्यामुळे सेना-भाजप सत्तेवर आल्यास सेनेचाच मुख्यमंत्री होणार, हे उघड आहे. 'साहेबांनी संधी दिल्यास मला मुख्यमंत्री होणे निश्चितच आवडेल, साहेब मला न्याय देतील' अशी आशा माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी प्रकट केली आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर उपराष्ट्रपती होण्याची महत्वाकांक्षा धुळीस मिळाली. राष्ट्रीय स्तरावर वावरण्याची स्वप्ने गाडली गेली. त्यामुळे पंत राज्याच्या राजकारणात लक्ष घालू लागले. पंतांच्या पराभवानंतर त्यांचे हाडवैरी समजले जाणारे नारायण राणे त्यांना भेटायला गेले होते. पण विधानसभा निवडणुकीत पंत उभे नाहीत; पराभव होऊन फार दिवस झालेले नाहीत. तरीही मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात त्यांना जराही संकोच वाटत नाही. मुख्यमंत्री व नंतर लोकसभाध्यक्ष असलेल्या व्यक्तीने 'साहेब' वगैरे संबोधणे आणि 'ते न्याय देतील' अशी भाषा करणे हे लाजिरवाणे आहे. ठाकरे यांच्या कृपेनेच पंत मुख्यमंत्री व लोकसभाध्यक्ष झाले असले तरी ही पदे भूषविलेल्या व्यक्तीने आपल्या अभिव्यक्तीत किमान लोकशाहीस शोभेल असा सुसंस्कृतपणा आणला पाहिजे. पण ही अपेक्षा व्यर्थ आहे. दुसरे नारायण राणे! त्यांनाही साहेबांनी जबाबदारीचे पद देण्याचे आश्वासन दिल्यामुळे ते खुशीत आहेत. उद्धव ठाकरे यांचे नाव शर्यतीत सर्वांत पुढे आहे. कारण ते ठाकरे यांचे वारसदार आहेत. पण आता राज ठाकरेंनी आपल्यालाही मुख्यमंत्री होणे आवडेल, असे जाहीर करून गोंधळ उडवून दिला आहे. उद्धव व राज यांच्यात विस्तवही जात नाही. उद्धव नेमस्त तर राज जहाल. उद्धव 'मी मुंबईकर 'वाला, तर राज 'आम्ही मराठी’ वाला. उद्धव घोळदार, मोहक बोलणारा, तर राज स्पष्टवक्ता व रोखठोक. आणि उद्धव फोटोग्राफर, प्राणिमित्र तर राज व्यंगचित्रकार आणि मनुष्यमित्र! मात्र उभयतांत एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे दोघांनाही मुख्यमंत्री व्हायचे आहे.
फक्त उद्धव ठाकरे ते स्पष्टपणे सांगत नाहीत, राज सांगतात इतकेच! पण मुळात राजकारणाचा अनुभव, कर्तृत्व, प्रशासकीय अनुभव या बाबी विचारात घ्यायच्या की नाहीत? ‘ठाकरे फॅमिलीतील’ या पलीकडे या उभयतांची लायकी काय? कर्तृत्व काय? मनोहर जोशी यांनी महापौर, विरोधीपक्षनेता अशी पदे भूषविली. सेनेतल्या इतर काही नेत्यांनी सेनेसाठी रक्त आटविले, आंदोलने केली, मोर्चे काढले, लाठया झेलल्या, पण यापूर्वी माधव देशपांडेंपासून छगन भुजबळापर्यंत आणि सुरेश प्रभूंपासून ते शिशिर शिंदेपर्यंत अनेकांना डावलण्यात आले वा ते मोठे होऊ लागताच, त्यांना बाजूला सारण्यात आले. सेनेतून निघून जाताना भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर घराणेशाही जोपासल्याचा आरोप केला होता. त्यानंतर माधव देशपांडे यांनीही हाच आरोप केल्यानंतर संतापलेल्या ठाकरे यांनी राजकारण संन्यासाची, सेनाप्रमुखपद सोडण्याची घोषणा केली. 'शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांचा, कुटुंबियांसमवेत अखेरचा जय महाराष्ट्र' असा मजकूर सामनामधून प्रसिद्ध झाला होता. अर्थात ठाकरेंचे हे दबावतंत्र होते. अखेर 'सैनिकांच्या आग्रहास्तव' त्यांनी आपला हा निर्णय बदलला. यथावकाश अलीकडे उद्धव सेनेचे कार्यकारी अध्यक्ष बनले. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणारे ठाकरे आपल्या घराणेशाहीचे मात्र समर्थन करतात. कार्यकर्त्यांवर एखादी व्यक्ती लादणे म्हणजे घराणेशाही, अशी त्यांची घराणेशाहीची व्याख्या आहे.
"त्यांनीच जर, ठाकरे कुटुंबियांपैकी एखाद्याची निवड केली तर मी विरोध करणार नाही, शिवसैनिकांनी उद्धववर पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली, तेव्हा मला याची कल्पना नव्हती." असे ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानांवर शेंबडे पोरदेखील विश्वास ठेवणार नाही. शिवाय दोनच गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी यांनाही काँग्रेस कार्यकर्त्यांनीच 'निवडले' होते, 'लादले' नव्हते. मग ती घराणेशाही कशी? “आता मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल” असे राज ठाकरे म्हणतात. या पदावर जाणे कुणाला आवडणार नाही? बाळासाहेब म्हणतात की, मुख्यमंत्री मीच ठरवीन. सेनेत लोकशाही नसल्यामुळे आमदार नाहीत, तर ठाकरेच सर्व काही ठरवितात. ठीक आहे, पण 'राजचे विधान गंमतीचे होते; त्याने व्यंगचित्रकार म्हणून मिष्किलपणे उत्तर दिले. 'असेही बाळासाहेब म्हणतात. मुख्यमंत्रीपद म्हणजे त्यांना गंमतजंमत वाटली का? सहा मुख्यमंत्री व तेवढेच उपमुख्यमंत्री करून सर्वांना खूष करण्याची भाषाही बाळासाहेबांनी केली आहे. केवढा मिष्किलपणा बरे. थोडक्यात, भविष्यात महाराष्ट्रास मुख्यमंत्र्यांची उणीव भासणार नाही. राज ठाकरे यांनी रेषेच्या एका स्ट्रोकमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी 'मैं हूं ना' असे म्हटल्यामुळे, ते उद्या खरोखरच या पदावर गेले, तर 'क्यों, हो गया ना?' असे उद्गार काढून 'आम्ही मराठी'चा जयघोष होईल, यात शंका नाही.
Tags: Balasaheb Thakare Udhdhav Thakare Gopinath Munde A. K. Antony Sushilkumar Shinde India Today Shivsena Rashtravadi Congress Hemant Desai बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे उद्धव ठाकरे गोपीनाथ मुंडे ए. के. अँटनी सुशीलकुमार शिंदे 'इंडिया टुडे’ भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हेमंत देसाई weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या