डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मे 1971 मध्ये, वयाच्या विशीत असलेले कायद्याचे विद्यार्थी हेमंत गोखले बांगलादेश मुक्तिसंग्रामातील निर्वासितांना मदत करण्यासाठी गेले होते. त्यावर आधारित दहा भागांची लेखमाला जून ते सप्टेंबर 1971 मध्ये साधना साप्ताहिकातून क्रमश: प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर जवळपास 50 वर्षांनी म्हणजे मार्च 2020 मध्ये, वयाच्या सत्तरीत असलेले निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले व्याख्यानांच्या निमित्ताने बांगलादेशमध्ये गेले होते. या भेटीवर आधारित दहा भागांची लेखमाला या अंकापासून क्रमश: प्रसिद्ध करीत आहोत. मागील वर्ष शेख मुजिबूर रहेमान यांचे जन्मशताब्दी वर्ष होते, तर चालू वर्ष बांगलादेशच्या स्वातंत्र्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे, त्यामुळे या लेखमालेला विशेष औचित्य आहे. - संपादक

बांगलादेशचा 1971 चा स्वातंत्र्यलढा ही भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर झालेली, भारतीय उपखंडातील सर्वांत मोठी राजकीय घटना होय. त्या वेळी पूर्व बंगालच्या जनतेची सुरुवातीची मागणी स्वायत्ततेची होती. बंगबंधू शेख मुजिबूर रेहमान त्या लढ्याचे नेतृत्व करीत होते. पाकिस्तानच्या पार्लमेंटमध्ये बहुसंख्य जागा त्यांनी जिंकल्या, तरीही पाकिस्तानचे Marshal Law Administrator जनरल याह्याखान हे बंगबंधूंना सरकार स्थापन करण्यासाठी बोलवत नव्हते. स्वायत्ततेची मागणीही त्यांनी फेटाळली. दि.25 मार्च 1971 रोजी शेख मुजिब यांना अटक करण्यात आली. पाक सैन्याने दडपशाही सुरू केली. जनतेचे आंदोलन वाढतच गेले. अत्याचारामुळे हैराण झालेल्या निर्वासितांचे प्रचंड लोंढे भारतामध्ये येऊ लागले. त्यांच्या हाल-अपेष्टांच्या बातम्या यायला लागल्या.

मी तेव्हा कायद्याचा विद्यार्थी होतो, युवक क्रांती दलाशी संबंधित होतो. आम्हा युक्रांदियांना स्वस्थ बसवेना. निर्वासितांची परिस्थिती समजून घ्यावी, त्यांच्यासाठी जमेल तसे काम करावे, या विचाराने आम्ही सात तरुण-तरुणी 16 मे 1971 रोजी कलकत्त्याला निघालो. काही दिवस बोनगाव आणि पेट्रापोल येथील निर्वासितांच्या छावण्यांत मदतकार्य केले. माझा मुंबईचा मित्र शरित भौमिक आणि त्याचा मोठा भाऊ अमित त्या वेळेस त्यांच्या वडिलांच्या गावी उत्तर बंगालमध्ये जलपैगुडी येथे गेले होते. मी तिथे जाण्याचे ठरविले. माझे इतर सहकारी मुंबईला परत आले.

त्या काळात उत्तर बंगालमध्ये जाण्यासाठी बोटीने गंगा नदी ओलांडून जावे लागायचे. गंगेवरचा ‘फराक्का बॅरेज’ तेव्हा झालेला नव्हता. मी जवळजवळ तीन आठवडे पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी फिरलो. निरनिराळ्या ठिकाणची निर्वासितांची शिबिरे पाहिली. काही विद्यार्थी-नेत्यांना आणि कामगार चळवळीतील व्यक्तींना भेटलो. तेव्हाचे तिथले हिंसेचे राजकारण मला जवळून दिसले. निर्वासितांसाठी काम करणारी भारतातील आणि पूर्व पाकिस्तानातीलही काही उल्लेखनीय माणसे मला भेटली. त्या तीन आठवड्यांत मी जे काही पाहिले-अनुभवले, मला जे जाणवले, त्या सर्वांवर मी साधना साप्ताहिकात 26 जून 1971 पासून ‘शोनार बांगला बिप्लवी बांगला’ ही दहा लेखांची मालिका लिहिली. पुढे भारताने बांगलादेशच्या मुक्तिवाहिनीला मदत करण्यासाठी पूर्व पाकिस्तानात सैन्य पाठविले. पाकिस्तानचा पराभव होऊन बांगलादेश स्वतंत्र झाला.

पुढच्याच वर्षी मी वकील झालो. कालांतराने न्यायाधीश झालो. सुप्रीम कोर्टातून 2014 मध्ये निवृत्तही झालो. मधल्या काळात कलकत्त्याला अनेक वेळा गेलो. बदलत गेलेले कलकत्ता शहर पाहिले. कलकत्त्यातील ‘जोराशंको’ येथील रवींद्रनाथ टागोरांचे घर पाहिले; परंतु जिथे रवींद्रनाथांनी आपले बालपणीचे आणि तारुण्याचे दिवस व्यतीत केले होते, त्या बांगलादेशला जाण्याचा योग आला नव्हता.

निवृत्तीनंतर माझ्याकडे Arbitration ची काही कामे आहेत. त्यातल्या एका कामातले एक सहकारी श्रीराम बापट नुकतेच बांगलादेशला तेथील Atomic Power Station च्या कामासाठी जाऊन आले होते. त्यातच माझे मित्र नागपूरचे प्रा. सुव्रो सरकार यांच्या सूचनेवरून ढाक्याचे प्रा.असाधुझमान यांनी मला तेथील Spring Law School मध्ये व्याख्यानासाठी बोलावले. 10 ते 14 मार्च 2020 या दिवसांत म्हणजे नुकत्याच पसरत असलेल्या कोरोनाच्या तोंडावर ते शिबिर होते. शेवटच्या दिवशी Public Access to Information या विषयावर माझे व्याख्यान ठेवणार होते. मी आमंत्रण स्वीकारायचे ठरवले. माझ्याबरोबर माझे पुण्याचे मित्र अन्वर राजन हेही बांगलादेशला यायला तयार झाले. मी निर्वासितांसाठी 1971 मध्ये काम केले आहे, हे ऐकून बांगलादेशचे मुंबईतील उपायुक्त लुत्फुर रेहमान यांना आनंद झाला. आम्हाला लगेचच व्हिसा मिळाला. मुंबई ते ढाक्का अशी थेट विमानसेवा असल्याने प्रवासाचीही अडचण नव्हती.

मला व्याख्यानासाठी बोलावले होते खरे; पण आमचे स्वागत कसे होईल, अशी मनात शंका होती. एक तर आम्हाला ओळखणारे असे ढाक्क्याला कोणीच नव्हते. दोन वर्षांपूर्वी पुण्यात Symbiosis Law College मधील सेमिनारला भेटलेल्या प्रा.तस्लिमा मन्सूर यांच्याशी सिंबायोसिसच्या प्राचार्या शशिकला गुरपूर यांनी आमच्यासाठी संपर्क साधला. परंतु, प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्या भेटण्याची शक्यता कमी होती. अनेक वर्षांपूर्वी भेटलेल्या बॅ.सारा हुसेन इंग्लंडला गेलेल्या होत्या. आम्हाला बोलविणारे प्रा.असाधुझमान यांनी मात्र सांगितले होते- काळजी करू नका, तुमचे स्वागतच होईल.

शिवाय, गेल्या काही वर्षांत भारत आणि बांगलादेश ह्या दोन देशांमध्ये काही बाबतींत तणावही निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षांत जवळजवळ 10 लाख रोहिंग्या मुसलमानांना म्यानमारमधून हुसकावल्याने बांगलादेशात ते निर्वासित म्हणून आले होते. त्यांच्यासंबंधी भारताची भूमिका बांगलादेशला योग्य वाटत नव्हती. दुसऱ्या बाजूला भारतामध्येही बांगलादेशीयांविरुद्ध काही घटना झाल्या होत्या. बंगलोरमध्ये सफाई आणि इतर कामे करणारे काही हजार बांगलादेशी हाकलण्यात आले होते आणि ते पश्चिम बंगालात बांगलादेशच्या सीमेवर जाऊन बसले होते. मुंबईतही अशा काही घटना घडल्या होत्या. भारतात मंजूर झालेल्या ‘नव्या नागरिकता कायद्या’बद्दल बांगलादेशमध्ये रोष होता, कारण त्यामुळे बांगलादेशातून आलेल्या मुस्लिम धर्मीयांना भारताचे नागरिकत्व मिळणार नव्हते. परंतु आश्चर्य म्हणजे, या पार्श्वभूमीवर आमचे मात्र स्वागत सर्वत्र प्रेमाने आणि जिव्हाळ्याने झाले. 

ढाक्क्याला गेल्यावर 12 ते 20 मार्च असे नऊ दिवस आम्ही बांगलादेशात ठिकठिकाणी जाऊन आलो. या नऊ दिवसांच्या झरोक्यातून झालेले बांगलादेशचे निकट दर्शन कसे होते? ढाक्क्याचा विमानतळ आपल्या बऱ्याच विमानतळांप्रमाणे थोडाफार अनागोंदी वाटला. त्याला हजरत शहा जलाल या सूफी संताचे नाव दिले आहे. विमानतळावर कोविड टेस्ट आणि इमिग्रेशन झाल्यावर पुढे गेलो तर भारतीय उच्चायुक्तालयातील एका कर्मचाऱ्याने आमचे स्वागत केले. तिथल्या ‘टाइम्स युनिव्हर्सिटी’तले प्रा.महम्मद नानूमियाँ आम्हाला शिबिराच्या ठिकाणी नेण्यासाठी आले होते. नानूमियाँनी आमचा ताबा घेतला तो आम्ही ढाक्का सोडेपर्यंत. त्यांच्याबद्दल जितकी कृतज्ञता व्यक्त करावी, तितकी कमीच आहे! 

विमानतळाबाहेर पडल्यावर लक्षात आले, इथल्याही रस्त्यांमध्ये आपल्यासारखीच खोदकामे आणि मेट्रोचीही कामे चालू आहेत, वाहतूककोंडीही आहे. महत्त्वाचे वेगळेपण लक्षात आले ते हे की, सर्व वाहनांवरच्या नंबर प्लेट्‌स फक्त बंगाली भाषेतच होत्या! दुकानांवरचे बोर्डही बंगालीमध्ये आणि क्वचितच कुठे इंग्लिशमध्ये.

विमानतळावरून आम्ही सावरभागातील BRAC University Campus मध्ये गेलो, जिथे Spring Law School योजलेली होती आणि तिथल्या वसतिगृहांमध्ये आमच्या राहण्याची सोय केलेली होती. तिथे जाताना वाटेत ढाक्क्याचा नकाशा आणि बांगलादेशची राज्यघटना विकत घेण्यासाठी एका मॉलमध्ये गेलो. आपल्या मॉल्ससारखाच पॉश. मॉलचे नाव ‘वसुंधरा मॉल’. त्यात सर्व काही उपलब्ध. आश्चर्य म्हणजे, अगदी केरळच्या पद्धतीचे ‘अभ्यंगम्‌’ हे आयुर्वेदिक उपचार केंद्रदेखील तिथे होते. पण कर्मचाऱ्यांची भाषा मात्र सर्वत्र फक्त बंगाली! कलकत्त्यामध्येही हिंदी भाषा चालते, पण इथे नाही. हे सर्व करून कॅम्पसमध्ये पोचायला आम्हाला उशीर झाला. त्या दिवशीची म्हणजे 12 मार्चची सकाळची व्याख्याने आम्ही पोहोचण्याच्या आधीच झाली होती. 

आम्हाला प्रथम तिथल्या कॅन्टीनमध्ये जेवायला नेण्यात आले. जेवणात अर्थातच भात आणि प्रामुख्याने फिश करी. (तिथे आणि नंतरही सर्वत्र बांगलादेशामध्ये.) आम्ही आल्याचे कळल्याने आमच्या पाठोपाठ शिबिराला आलेली मुले तिथे कॅन्टीनमध्ये आली. त्यांनी आम्हाला गराडाच घातला. भारताविषयी त्यांना प्रचंड कुतूहल होते आणि अनेक प्रश्न विचारायचे होते. बऱ्याच जणांचे इंग्रजीचे उच्चार अर्थातच बंगाली ढंगाचे आणि कानाला गोड लागणारे. बहुतेकांचे शालेय शिक्षण बंगाली माध्यमाच्या शाळेतच झालेले, कारण बांगलादेशात शालेय शिक्षण सर्वत्र पूर्णपणे बंगालीतूनच आहे. पूर्व बंगालमधील तरुणांनी उर्दूच्या सक्तीविरुद्ध फेब्रुवारी 1952 मध्ये आंदोलन केले होते. 21 फेब्रुवारी रोजी त्या आंदोलनात काही तरुण मारले गेले होते. ढाक्क्यामध्ये या तरुणांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘शहीद मिनार’ हे स्मारक उभारले आहे. आता 21 फेब्रुवारी या दिवसाला ‘संयुक्त राष्ट्र महासंघाने’ आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून मान्यता दिली आहे.

बांगलादेशच्या निरनिराळ्या भागांतून आलेली, ठिकठिकाणच्या कायद्याच्या महाविद्यालयांत आणि विद्यापीठांत शिकणारी तरुण मुले-मुली शिबिराला आली होती. 55-60 जणांनी नोंदणी केली होती आणि त्यात अर्धी संख्या मुलींची होती. सगळी मुले आपल्या मुंबई-पुण्याच्या मुलांसारखीच रंगीबेरंगी कपडे घातलेली आणि मुली जीन्स व टॉप्स किंवा ड्रेस घातलेल्या. बुरखा वगैरे तर जाऊ दे, पण डोक्यावरून ओढणीसुद्धा न घेतलेल्या. त्यांच्यामध्ये काही हिंदू मुली-मुलेही होती. म्हणजे, केवळ त्यांच्या नावावरूनच ते लक्षात आले, पण इतरांमध्ये मिळून-मिसळून गेलेली. 

कायद्याचे विद्यार्थी असल्याने भारताचे सुप्रीम कोर्ट, अलीकडे भारतात झालेले कायदे, विशेषतः नागरिकत्व कायद्यात झालेले बदल याबद्दल त्यांचे प्रश्न होतेच; पण मी मुंबईहून आलेला असल्याने बॉलीवुडबद्दलचेही प्रश्न होते. अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल खास आकर्षण. क्रिकेटचे प्रचंड वेड. रात्री टेलिव्हिजनवर कोरोनापासून काळजी कशी घ्यायची, हे सांगायला सचिन तेंडुलकर होताच- अर्थात बंगालीत बोलणारा! बांगलादेशी टेलिव्हिजनवर आपल्यासारख्याच मालिका होत्या, म्हणजे रिक्षाने वडिलांबरोबर जाणाऱ्या नायिकेला खलनायक त्रास द्यायला लागतो, नायक तिथे उडी मारून नायिकेला वाचवतो आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात इत्यादी. मी म्हटले, दोन्हीकडे मालिका निर्माण करणाऱ्यांच्या कल्पना सारख्याच आहेत तर!

दुसऱ्या दिवशी सकाळी कॅम्पसमधून मी फेरफटका मारला. खूप झाडे, सुंदर हिरवळ, भरपूर मोकळी जागा आणि सर्वत्र स्वच्छता! तिथे एका ठिकाणी शिबिराला आलेली मुले क्रिकेट खेळणारी. होस्टेल्सना फुलांची नावे दिलेली- रजनीगंधा, कृष्णचुरा आणि मालनचुरा. लायब्ररीच्या इमारतीचे नाव होते ‘अनिषा’- म्हणजे मोठी इच्छा किंवा आकांक्षा! सर्वत्र योग्य त्या संस्कृतप्रचुर बंगाली शब्दांचा वापर.

दि.13 मार्चला सकाळी दोन आणि दुपारी एक व्याख्यान झाले. व्याख्यानांवेळी मुले नोट्‌स काढत होती आणि प्रश्नही विचारत होती. काहींनी ipad आणि छोटे laptop आणलेले होते. पहिले व्याख्यान बांगलादेशच्या सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती महम्मद इमान अली यांचे Violence and Torcher against Children या विषयावर झाले. अतिशय अभ्यासपूर्ण. भारतीय राज्यघटनेच्या कलम 15(3) प्रमाणेच बांगलादेशच्या संविधानातील कलम 28(4) अन्वये इथल्या सरकारला स्त्रिया व मुले यांच्या हितासाठी खास कायदे करण्याचा अधिकार आहे. International Convention on Rights of Children यामधील बऱ्याचशा नियमांचा स्वीकार करण्यासाठी बांगलादेशने 2013 मध्ये Children Act  मंजूर केला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. लहान मुले आणि विशेषतः मुली यांच्याबाबत हिंसेच्या असंख्य घटना होत असतात- अगदी इमाम आणि मुल्ला-मौलवींकडूनही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अशा घटनांचे परिणाम काय होतात, त्या कशा थांबवल्या पाहिजेत, यावर त्यांनी सविस्तर ऊहापोह केला.

तरुण वकील इम्रान सिद्दिकी यांचे, धर्मस्वातंत्र्य आणि कायदा या विषयावर दुसरे व्याख्यान झाले. त्या वेळेला मलाही भारतीय सुप्रीम कोर्टाच्या ‘शबरीमला निकाला’वर प्रश्न विचारले गेले. दुपारच्या जेवणानंतर ज्येष्ठ वकील शहादीन मलिक यांचे Access to Justice ह्यावर अप्रतिम व्याख्यान झाले. त्यांचा एकूण अनुभव आणि अभ्यास त्यातून दिसून येत होता.

तिसऱ्या दिवशी म्हणजे 14 मार्चला सकाळी माझे Public Access to Information या विषयावर व्याख्यान झाले. त्यात मी भारताच्या आणि बांगलादेशाच्याही माहितीच्या अधिकाराच्या कायद्याबद्दल बोललो. माहितीचा अधिकार हा माहिती मिळविण्यासाठी आणि सरकारी यंत्रणांवर अंकुश ठेवण्यासाठी, सत्तेचा दुरुपयोग रोखण्यासाठी उपयुक्त आहे. माहिती नसेल तर कसे नुकसान होते आणि माहिती मिळाली तर कशी प्रगती करता येते, याची मी काही उदाहरणे दिली. अरुणा रॉय यांच्या कामाची माहिती दिली, त्यावर सर्वांनी प्रश्न विचारले.

त्यानंतर Valedictory Function साठी Spring Law School योजणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष आणि बंगबंधू यांचे सहकारी डॉ.कमाल हुसेन हे तिथे आले. University of Asia Pacific चे कुलगुरू डॉ.जमिलूर रझा चौधरी आले. डॉ.जमिलूर हे शिक्षणाने व व्यवसायाने इंजिनिअर आणि बांगलादेशच्या पुनर्बांधणीमध्ये त्यांनी मोठे योगदान दिलेले. (दुर्दैवाने शिबिरानंतर काही दिवसांतच त्यांचे निधन झाले.) त्यांच्या विद्यापीठाचे ट्रेझरर, निवृत्त ‘एअर कमोडर’ इशफाकइलाही चौधरी हेही आले. त्या सर्वांचे आणि माझेही भाषण झाले. शिबिरात भाग घेतल्याबद्दलची सर्टिफिकेट्‌स मुलांना देण्यात आली.

Valedictory Function नंतर Spring Law School संपले. पण तिथे आलेले विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या आठवणी मात्र राहिल्या. त्यातल्या काहींना शासनामध्ये, काहींना राजकारणात आणि काहींना न्यायक्षेत्रात जायचे होते. अनेक मुलांना भारतात आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी जायचे होते. मुंबई, दिल्ली बघायची होती. पुढे आपल्या कुटुंबासाठी आणि देशासाठी काही तरी चांगले करायचे होते. मुला-मुलींनी आमच्याबरोबर फोटो काढले, पत्ते व फोन नंबर घेतले, त्यांच्या गावी येण्याचे आमंत्रणही दिले. त्यांची आपुलकी मनाला स्पर्शून गेली. ढाक्क्याच्या या शिबिरामुळे मला इथल्या तरुण पिढीच्या क्षमतेची आणि आशा-आकांक्षांची थोडी कल्पना आली.

तीन दिवसांनी 17 मार्चला आम्ही शिलाईडाहा येथील रवींद्रनाथांचे घर बघण्यासाठी कुश्तिया येथे गेलो. तो दिवस बंगबंधूंच्या जन्मशताब्दीचा होता. पार्लमेंट आणि इतर महत्त्वाच्या इमारतींवर ढाक्क्यामध्ये रोषणाई करण्यात आली होती, जी आम्ही कुश्तियाला जाताना पाहिली. कोरोनाला रोखण्यासाठी सार्वजनिक समारंभ मात्र मर्यादित ठेवले होते. कुश्तियाच्या इस्लामिक युनिव्हर्सिटीमध्ये आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराशीच शेख मुजिब यांचे भव्य चित्र लावलेले होते. त्यांच्यासमोर पुष्पचक्रे अर्पण केलेली होती. शेख मुजिब यांची भाषणे ध्वनिक्षेपकावरून प्रसारित केली जात होती. 

विद्यापीठाबाहेरच्या चहाच्या टपरीवर आम्ही चहा प्यायला गेलो. आम्ही बंगालीत बोलू शकत नव्हतो पण आम्ही भारतातून आलो आहोत, असे सांगितल्यावर चहावाल्याने चहा देण्याआधी ‘श्रीमती इंदिरा गांधी’ असे मोठ्याने म्हणून चक्क सॅल्यूटच ठोकला! रात्री टेलिव्हिजनवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण प्रक्षेपित केले गेले, ज्यामध्ये त्यांनी शेख मुजिब यांच्या कार्याचा गौरव केला. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि इतरही महत्त्वाच्या व्यक्तींची श्रद्धांजलीची भाषणे झाली. 

कुश्तिया विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये निरनिराळ्या विषयांच्या/विभागांच्या इमारती आणि होस्टेल्स असा मोठा पसारा होता. कोरोनाच्या धास्तीमुळे लेक्चर्स आणि होस्टेल्स बंद करण्यात आली होती. विद्यापीठाच्या बाहेरच्या पारावर अनेक तरुणी आणि तरुण दिसले- आपापल्या बॅगा, हॅवरसॅक्स वगैरे सामान घेऊन, बसेस पकडून गावी जाणारे. ढाक्क्याला भेटली होती तशीच ही मुले-मुली रंगीबेरंगी कपड्यांतली, मोकळी-ढाकळी आणि एकमेकांत मिसळणारी. त्यातल्या दोन तरुण-तरुणींशी बोललो. ते संख्याशास्त्र आणि पदार्थविज्ञानाचे विद्यार्थी होते. या विद्यापीठाचे शिक्षण झाल्यावर त्यांनाही उच्च शिक्षणासाठी भारतात किंवा बाहेरच्या देशांत जायचे होते. एकंदरीत आकांक्षा त्याच- अधिक शिकायचे, पुढे जायचे. 

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला तिथल्या कुलगुरूंनी चहासाठी बोलावले. त्याआधी तिथल्या ज्येष्ठ रजिस्ट्रार रेवा मंडल या भेटल्या. प्रशासनामध्ये येण्याआधी त्या विधी विभागामध्ये डीन होत्या. आम्हाला विधी विभागात घेऊन गेल्या. पुढच्या वेळेला याल तेव्हा आमच्याकडे व्याख्यानासाठी जरूर या, म्हणाल्या. 

भारत आणि बांगलादेश या दोन देशांमधील शिक्षणाच्या देवाण-घेवाणीसंबंधीची दोन उदाहरणे इथे नमूद केली पाहिजेत. पहिले उदाहरण कुश्तियाचेच. कुलगुरू हरून अल्‌ रशीद यांच्या दालनात गेलो, तर तिथे मॅनेजमेंटचे प्रा.झकेरिया रेहमान हे भेटले. आम्ही मुंबई-पुण्याहून आलो हे ऐकल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून Ph.d.केल्याचे आम्हाला सांगितले. ते म्हणाले, ‘‘मी प्रा.एस. डब्ल्यू. भावे यांचा विद्यार्थी होतो.’’ ते ऐकून आम्हाला आश्चर्य तर वाटलेच आणि आनंदही झाला. नंतर कुलगुरू हरून अल्‌ रशीद यांच्या दालनात गेलो. तोच अनुभव त्यांच्याबाबतही आला. ते इंग्रजीचे प्राध्यापक आणि त्यांनीही पुणे विद्यापीठातून Ph.d. केलेली! मी म्हटले, ‘‘हा विशेष योगायोग आहे!’’ त्यांनी सांगितले की, ते पुण्यात तीन वर्षे राहिले होते आणि त्यांना पुण्याच्या चांगल्या आठवणी होत्या. प्रा.शिरीष चिंधडे हे त्यांचे गाईड होते. भारतात परतल्यावर माझा पुण्याचा मित्र विवेक पुरंदरे याच्यामार्फत मी प्रा.चिंधडे यांच्याशी संपर्क साधला, कारण विवेक आणि ते शाळेत बरोबर असल्याचे विवेककडून ऐकले होते. प्रा. हरून अल्‌ रशीद हे कुलगुरू झाल्याचे ऐकून प्रा. चिंधडे यांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले की, प्रा. रशीद हे वीसेक वर्षांपूर्वी त्यांचे विद्यार्थी होते आणि अतिशय अभ्यासू व नम्र विद्यार्थी म्हणून त्यांच्या लक्षात होते. प्रा. रशीद यांनी प्रसिद्ध भारतीय इंग्रजी लेखक निराद सी.चौधरी यांच्या साहित्यावर Ph.d. केल्याचेही त्यांनी सांगितले. निराद चौधरी हे मूळचे पूर्व बंगालमधले होते.

शिक्षणाच्या देवाण-घेवाणीचा दुसरा प्रसंग मात्र अगदी वेगळा. कोविडच्या निर्बंधांमुळे आम्हाला आमची बांगलादेश भेट एक दिवस लवकर संपवावी लागली. आम्ही 20 तारखेला ढाक्क्याच्या विमातळावर पोचलो. तिथे विमान पकडणाऱ्या तरुणमंडळींची मोठीच गर्दी होती. त्यातले आठ-दहा तरुण-तरुणी तमिळमध्ये बोलत असावेत, असे मला वाटले. सुप्रीम कोर्टात जाण्याआधी मी एक वर्ष मद्रासला मुख्य न्यायाधीश होतो, त्यामुळे तमिळशी थोडा परिचय होता. मी त्यांना म्हटले, ‘‘तुम्ही तमिळ भाषिक का? आणि आत्ता इथे कसे?’’ त्यावर ती मुले म्हणाली, ‘‘आम्ही इथल्या मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहोत आणि कोविडमुळे कॉलेज बंद झाले म्हणून परत चाललो आहोत.’’ मला आश्चर्यच वाटले. तमिळ भाषिक मुले आणि शिक्षणासाठी इथे? रशियन भाषा येत नसतानाही भारतीय मुले वैद्यकीय शिक्षणासाठी रशियाला गेल्याचे ऐकले होते, पण बांगलादेशला? मी म्हटले, ‘‘तुम्हाला बहुतेक तमिळ आणि इंग्रजीशिवाय दुसरी भाषा येत नसणार.’’ त्यावर ते म्हणाले हे खरे आहे, पण जुळवून घेत आहोत, कारण तमिळनाडूत सरकारी कॉलेजमध्ये आमचा नंबर लागला नाही. तिथल्या कॉलेजपेक्षा इथली फी कमी आहे, कॉलेजचे शिक्षण इंग्रजीतून आहे आणि शिक्षणाचा दर्जाही तेवढाच चांगला आहे.’’ मी म्हटले, वीस वर्षांपूर्वी बांगलादेशचे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी भारतात येत होते. आता भारतातील विद्यार्थीही उच्च शिक्षणासाठी बांगलादेशमध्ये जात आहेत. आपण उगाचच बांगला देशला मागासलेला समजत होतो. तिथले शिक्षण, प्राध्यापक आणि विद्यार्थी आपल्या तोडीसतोड आहेत तर!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

न्या. हेमंत गोखले

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके