डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आमार शोनार बांगला, आमी तोमार भालो भाषी

स्वातंत्र्यानंतरच्या पन्नास वर्षांत बांगलादेशने केलेली आर्थिक प्रगती आणि स्त्री-पुरुष समतेसंबंधी उचललेली पावले उल्लेखनीय आहेत. भारत व बांगलादेश यांच्यामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासारखे आहे. हे दोन्ही देश अनेक बाबतींत एकमेकांशी संबंधित आहेत. गंगा, ब्रह्मपुत्रा आणि तिस्ता यांच्यासह 54 लहान-मोठ्या नद्यांनी हे दोन्ही देश जोडलेले आहेत. रेल्वे, रस्ते आणि जलमार्गाने दोन्ही देशातली वाहतूक वाढवली तर ते दोघांनाही उपयुक्त आहे. नागपूरची संत्री आणि भुसावळच्या केळ्यांना इथे प्रचंड मागणी आहे. कांद्याच्या निर्यातीवर भारत सरकारने बंदी घातली की, बांगलादेशमधील लोक हवालदिल होतात. मी बांगलादेशला मार्च 2020 मध्ये गेलो. तेव्हा करोनाची नुकतीच सुरुवात झाली होती. आता वर्षभरानंतरही ही साथ दोन्ही देशांत वाढतच आहे. आरोग्याच्या क्षेत्रात बांगलादेशला भारताच्या मदतीची गरज आहे.

व्याख्यानाच्या निमित्ताने 12 ते 20 मार्च 2020 असे नऊ दिवस बांगलादेशला जाण्याची संधी मिळाली आणि ह्या नऊ दिवसांत तिथे जे पाहिले, ज्या व्यक्ती भेटल्या, जे महत्त्वाचे वाटले ते नऊ लेखांमध्ये मी मांडले आहे. पन्नास वर्षांपूर्वी मे 1971 मध्ये विशीत असताना बांगलादेशमधून- तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानातून- आलेल्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये काम करायला गेलो होतो. एक कोटी निर्वासितांमुळे अडचणीत आलेला पश्चिम बंगाल मी तेव्हा पाहिला होता. याह्याखानच्या जुलूमाखाली दडपल्या गेलेल्या पूर्व पाकिस्तानचे काय होणार, बांगलादेश शरण जाईल का स्वतंत्र होईल, पुन्हा उभा राहील का- असे प्रश्न तेव्हा भेडसावत होते. 

परंतु बांगलादेश शरण गेला नाही, निकराने लढला आणि अनेक प्राणांचे बलिदान देऊन स्वतंत्र झाला. राष्ट्रउभारणीचे प्रयत्न सुरू झाले. पण जगातला एक कंगाल देश (Basket Case of the World)  म्हणून बांगला देश अनेक वर्षे हिणवला गेला. बंग बंधू शेख मुजिब यांची हत्या झाली. प्रतिगामी राजवटी येऊन गेल्या. नैसर्गिक वादळांमुळे आणि कधी दुष्काळामुळे वेळोवेळी हजारो माणसे मृत्यूमुखी पडली. तरीही बांगलादेश हळूहळू विकसित होत गेला, आणि आज आर्थिक प्रगतीचा आदर्श बनला आहे, काही बाबतींत भारताच्याही पुढे गेला आहे. सर्वांत कमी विकसित अशा देशांच्या गटातून (Least Developed Countries) विकसनशील देशांच्या गटांमध्ये जातो आहे. हा प्रगतिशील बांगलादेश मला पाहायला मिळाला.

बांगलादेशच्या आर्थिक प्रगतीची माहिती जगाला प्रथम झाली ती बांगलादेशच्या ‘ग्रामीण बँके’मुळे. बांगलादेशच्या प्रगतीची कथा ग्रामीण बँकेच्या उल्लेखाशिवाय सुरूच होऊ शकत नाही. पारंपरिक बँका कुठल्या ना कुठल्या प्रकारचे तारण (Security) दिल्याशिवाय कर्ज देत नाहीत, परंतु गरिबात गरिबांनाही सोईस्कर अटींवर कर्ज दिले तर ते कर्ज फेडू शकतात, ह्या विश्वासावर ‘प्रा. महंमद युनूस’ ह्यांनी 1983 मध्ये ‘ग्रामीण बँक’ उभी केली. तळातून वरती (वरून खाली नव्हे) असा विकास होऊ शकतो, हा त्यांचा विश्वास होता. अमेरिकेत अर्थशास्त्राचे शिक्षण घेतलेले प्रा. महंमद युनूस चितगाव विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. 1974 च्या दुष्काळामुळे ते व्यथित झाले आणि ह्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा, हा विचार त्यांना अस्वस्थ करू लागला. त्यातूनच सर्वसामान्य स्त्री-पुरुषांना मदत केली तर त्यातूनच पुढे जाता येईल, हा विचार घेऊन त्यांनी ही बँक उभी केली.

सुरुवातीला शेकडो, नंतर हजारो महिलांना छोट्या-छोट्या व्यवसायांसाठी छोटी-छोटी कर्जे देऊन बँकेने त्यांना हात दिला. ह्या कर्जांची परतफेड होईल किंवा नाही, अशी अनेकांना शंका होती. परंतु, ह्या कर्जांची परतफेड हळूहळू होऊ लागली, महिला उभ्या राहिल्या आणि त्यांच्याबरोबर बँकही उभी राहिली, वाढत गेली. ग्रामीण बँक आणि प्रा.महंमद युनूस यांना 2006 मध्ये ‘शांततेचे नोबेल’ पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. प्रा. युनूस ह्यांची भेट घेण्याची आमची इच्छा होती आणि ज्यांना आम्ही आवर्जून भेटलो होतो, त्या शिरीन हक्‌ म्हणाल्याही की, आपण त्यांना जरूर भेटू या. पण वेळ कमी होता आणि त्यामुळे ही भेट राहून गेली.

सार्वत्रिक शिक्षणाचा प्रसार, लोकांची आर्थिक विकासाची धडपड आणि त्यासाठी सरकार उपलब्ध करून देत असलेल्या सुविधा यांमुळे आज बांगलादेश प्रगतिपथावर आहे. शिक्षणाबद्दल सांगायचे तर, Spring Law School  मध्ये आणि कुश्तिया विद्यापीठामध्ये आम्हाला भेटलेले प्राध्यापक, उच्च शिक्षणासाठी चाललेली विद्यार्थ्यांची धडपड, भारतातूनही तिथे वैद्यकीय शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी ह्यातून बांगलादेशची शिक्षणातली प्रगती आम्हाला दिसून आली. बांगलादेशमध्ये आज शालेय शिक्षण सर्वत्र बंगालीतच आहे. काही उच्चभ्रू वेगळ्या शाळांत जात असतील, परंतु त्यामुळे शिक्षणात आणि शिक्षणातल्या भेदभावामुळे होणारी विषमता तिथे नाही, ही फार मोठी जमेची बाब आहे.

आम्ही कुश्तिया, पबना आणि नौखाली इत्यादी ठिकाणी गेलो ते मोटरनेच आणि सर्वत्र रस्त्यांची परिस्थिती चांगलीच होती. मुख्य म्हणजे वाटेमध्ये ठिकठिकाणी स्वच्छ सार्वजनिक प्रसाधनगृहेही होती. अर्थातच पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळी.

आर्थिक प्रगतीबद्दल सांगायचे तर पोशाख (Apparel)  आणि पादत्राणे (Footwear)  यांच्या निर्यातीमध्ये आज बांगलादेश भारताच्याही पुढे गेला आहे. या निर्यातीतले उत्पन्न हा बांगलादेशच्या आणि तिथल्या लहानसहान माणसांच्या आर्थिक उन्नतीचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. पबना येथे गेलो असताना तिथे जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेलो. ते एका औद्योगिक वसाहती (Industrial Estate)  मध्ये होते. तिथे एकापुढे एक अशा गाळ्यांमध्ये कापडापासून पोशाख तयार करण्याचे छोटे-छोटे कारखाने होते. लहान-लहान गाळ्यांमध्ये शेकडो महिला ठरवलेल्या आकाराप्रमाणे कापड कापणे, मशीनवर शिलाई करून पोशाख बनविणे इत्यादी कामे करत होत्या. कुठे तयार झालेल्या कपड्यांचे गठ्ठे बनविणे, त्यांचे सुबक पॅकिंग करणे ही कामे चालू होती. एका माळ्यावर पादत्राणे बनविणाऱ्या गाळ्यांची रांगच होती. तिथे छोट्या-छोट्या मशीनवर पादत्राणे बनविण्याचे काम पुरुषमंडळी करत होती. त्यातल्याच एका उद्योजकाला मी विचारले की, हा माल कुठे पाठवता? तर तो म्हणाला, अर्थातच ढाक्याला किंवा कलकत्त्याच्या New Market  मध्ये- तिथून पुढे युरोप, अमेरिकेला. वस्त्रोद्योग आणि पादत्राणे यांच्या निर्यातीत बांगलादेश हा चीन आणि व्हिएतनाम यांच्याबरोबर स्पर्धा करीत आहे ते उगीच नाही!

आम्ही बांगलादेशला गेलो तेव्हा माझ्या एका Arbitration  मधले सहकारी श्री. श्रीराम बापट हे कुश्तियाजवळ बांगलादेश बांधत असलेल्या अणुभट्टीच्या कामात भारत सरकारतर्फे सल्लागार म्हणून गेले होते. भारतातल्या Nuclear Power Corporation  मधले ते एक निवृत्त ज्येष्ठ इंजिनिअर आहेत. रशिया आणि भारताच्या मदतीने कुश्तियाजवळ अणुभट्टी बांधली जात आहे. आम्ही कुश्तियाला जाऊन आल्यानंतर श्री. बापट यांना भेटायला त्या अणुभट्टीच्या ठिकाणी गेलो. तिथे आत जाण्याची परवानगी अर्थातच नव्हती. कामाची वेळ संपल्यानंतर श्री. बापट आम्हाला भेटायला बाहेर आले. दिवसाचे काम संपल्याने त्या केंद्रामधून बाहेर येणारे रशियन तंत्रज्ञही दिसत होते. रशिया आणि भारताच्या मदतीने तिथे 1200 मेगावॉटच्या दोन अणुभट्‌ट्या उभारल्या जात आहेत. श्री.बापट म्हणाले, ‘‘ह्या अणुभट्‌ट्या भारतातल्या अणुभट्‌ट्यांपेक्षाही मोठ्या आहेत. भारतातली सर्वांत मोठी अणुभट्टी कन्याकुमारीजवळ कुडनकुलम येथे आहे, तीही  1000 मेगावॉटची. बांगलादेशमधील ह्या अणुभट्‌ट्या 2024-2025  पर्यंत कार्यान्वित होणार आहेत. त्यानंतर बांगलादेश विजेच्या बाबतीत पूर्णपणे स्वयंपूर्ण होईलच, परंतु पूर्व भारतालाही वीजपुरवठा करेल!’’

भारताच्या नागरिकत्व कायद्यातील अलीकडच्या सुधारणांवर बोलताना भारतातल्या एका नेत्याने म्हटले होते की, बांगलादेशच्या लोकांना भारतात येण्याची परवानगी दिली तर त्यांचे लोंढ्यावर लोंढे येतील. याउलट बांगलादेशला जाण्याआधीच तिथल्या आर्थिक प्रगतीबद्दल ऐकले होते आणि त्यामुळे अशी शक्यता वाटत नव्हती. आमच्या Spring Law School  ला आलेल्या प्राध्यापकांपैकी एका प्राध्यापकांचा विषय अर्थशास्त्र हा होता. बांगलादेशच्या आर्थिक प्रगतीबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की, 2009 पासून शेख हसीना पंतप्रधान आहेत आणि राजकारणात एकूण बऱ्यापैकी स्थैर्य आहे. बालकांचे व महिलांचे आरोग्य, सार्वजनिक स्वच्छता, रस्ते व पूलबांधणी, वस्त्रोद्योग व पादत्राणांचे उत्पादन आणि त्यात महिलांचा सहभाग यावर शेख हसीनांनी भर दिला आहे. त्यामुळे लोकांचे आयुर्मान आणि दरडोई उत्पन्न वाढले आहे. बालमृत्यूचा दर आणि लोकसंख्यावाढीचा दरही कमी झाला आहे. गरिबी आहे, पण गरिबीतून वर येणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.

अर्थशास्त्राचे प्राध्यापक सांगत होते ती प्रौढी नव्हती. बंगबंधूंच्या सहाकलमी कार्यक्रमाच्या मागणीत पूर्व पाकिस्तानसाठी परकीय चलन आणि उत्पन्नाचा वेगळा हिशेब ठेवला जावा, ही एक मुख्य मागणी होती. पूर्व पाकिस्तानचे उत्पन्न त्या वेळीही पश्चिम पाकिस्तानपेक्षा अधिक होते आणि तरीही त्याचा लाभ पूर्व पाकिस्तानला मिळत नव्हता, ही त्यामागची तक्रार होती. आज आर्थिक प्रगतीमध्ये बांगलादेश पाकिस्तानच्या पुढे तर आहेच, परंतु आत्ता उपलब्ध झालेल्या ऑक्टोबर 2020 मधल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund)  अहवालाप्रमाणे दरडोई उत्पन्नामध्ये भारताच्याही थोडासा पुढे गेला आहे. अमेरिकन डॉलरसाठी पाकिस्तानला 120 रुपये मोजावे लागतात, तर बांगलादेशला भारताच्या जवळजवळ बरोबरीने 85 टका! गेल्या पंधरा वर्षांत भारताची लोकसंख्या 21 टक्क्यांनी वाढली तर बांगलादेश ची 18 टक्क्यांनी. शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक संधी ह्या निकषांनुसार, स्त्री-पुरुष समानतेच्या क्रमवारीत (Gender Parity Ranking)  154 देशांमध्ये बांगलादेश पहिल्या पन्नासात आहे, तर भारत 112 व्या क्रमांकावर!

स्वातंत्र्यानंतरच्या पन्नास वर्षांत बांगलादेशने केलेली आर्थिक प्रगती आणि स्त्री-पुरुष समतेसंबंधी उचललेली पावले उल्लेखनीय आहेत. भारत व बांगलादेश यांच्यामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासारखे आहे. हे दोन्ही देश अनेक बाबतींत एकमेकांशी संबंधित आहेत. गंगा, ब्रह्मपुत्रा आणि तिस्ता यांच्यासह 54 लहान-मोठ्या नद्यांनी हे दोन्ही देश जोडलेले आहेत. रेल्वे, रस्ते आणि जलमार्गाने दोन्ही देशातली वाहतूक वाढवली तर ते दोघांनाही उपयुक्त आहे. नागपूरची संत्री आणि भुसावळच्या केळ्यांना इथे प्रचंड मागणी आहे. कांद्याच्या निर्यातीवर भारत सरकारने बंदी घातली की, बांगलादेशमधील लोक हवालदिल होतात. मी बांगलादेशला मार्च 2020 मध्ये गेलो. तेव्हा करोनाची नुकतीच सुरुवात झाली होती. आता वर्षभरानंतरही ही साथ दोन्ही देशांत वाढतच आहे. आरोग्याच्या क्षेत्रात बांगलादेशला भारताच्या मदतीची गरज आहे.

भारताने नागरिकत्व कायद्यात केलेला बदल आणि भारताची रोहिंग्या निर्वासितांबद्दलची भूमिका याबाबत बांगलादेशात रोष आहे, परंतु बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारताचा सहभाग व साह्य बांगलादेशचे लोक विसरलेले नाहीत. त्यामुळे बांगलादेशी लोकांमध्ये मैत्रीची भावना टिकून आहे, हे जाणवत होते. याउलट पाकिस्तानने 1971 मध्ये केलेले अत्याचार बांगलादेश अजून विसरलेला नाही. त्या वेळच्या जिनो साईडसाठी पाकिस्तानने औपचारिक माफी मागितली पाहिजे आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या वेळेस असलेल्या पाकिस्तानच्या संपत्तीची समान विभागणी केली पाहिजे, ही बांगलादेशची मागणी आजही आहे.

पूर्व बंगाल म्हणजेच आत्ताचा बांगलादेश भारताच्या इतर भागांपासून राजकीय दृष्ट्या वेगळा झालेला असला तरी माणसांचे, परंपरांचे, भाषेचे आणि संस्कृतीचे विभाजन होत नाही, हे बांगलादेशला गेल्यावर जाणवते. बांगलादेश हा भारतीय उपखंडामधील भारताशी सर्वांत जवळचा आणि भारताशी सर्व प्रकारचे नातेसंबंध असलेला देश आहे. तिथला हिरवागार भूप्रदेश आणि मोठमोठ्या विस्तीर्ण नद्या हे बांगलादेशचे वैभव आहे. आम्हाला भेटलेली सर्वच माणसे लळा लावणारी आणि पुढेही संबंध ठेवावेत अशी होती. बांगलादेशात भेटलेले प्राध्यापक, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी केलेले स्वागत आणि त्यांची आत्मीयता विसरणे कठीण आहे. त्यांना आणि बांगलादेशला शुभेच्छा देऊन ही लेखमाला पूर्ण करतो.

हे सोनेरी बांगलादेशा, आम्ही तुझे शुभ चिंतितो!

आमार शोनार बांगला आमी तोमार भालो भाषी!

----

मे 1971 मध्ये, वयाच्या विशीत असलेले कायद्याचे विद्यार्थी हेमंत गोखले बांगलादेश मुक्तिसंग्रामातील निर्वासितांना मदत करण्यासाठी गेले होते. त्यावर आधारित दहा भागांची लेखमाला जून ते सप्टेंबर 1971 मध्ये साधना साप्ताहिकातून क्रमश: प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर जवळपास 50 वर्षांनी म्हणजे मार्च 2020 मध्ये, वयाच्या सत्तरीत असलेले निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले व्याख्यानांच्या निमित्ताने बांगलादेशमध्ये गेले होते. या भेटीवर आधारित दहा भागांची लेखमाला मागील तीन महिन्यांत साधना साप्ताहिकातून क्रमश: प्रसिद्ध झाली. पूर्वीचे दहा आणि आताचे दहा अशा एकूण वीस लेखांचे पुस्तक ‘विप्लव बांगला सोनार बांगला’ या नावाने साधना प्रकाशनाकडून पुढील महिन्यात येत आहे.

- संपादक

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

न्या. हेमंत गोखले

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके