डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नौखालीत गांधीजी जोयाग या गावी एक दिवस राहिले होते. तिथे आज गांधी आश्रम उभा आहे. त्याचीही थोडी माहिती आधी मिळाली होती. ती जमीन बॅरिस्टर हेमंतकुमार घोष यांची होती. गांधीजींचे काम पुढे चालू राहण्यासाठी त्यांनी ती जमीन आश्रमाला दान केली. गांधीजींना नौखालीला नेणाऱ्यांमधले श्री.चारू चौधरी यांनी अनंत हाल-अपेष्टा व त्रास सोसत तिथे शांतता आणि समाजसेवेचे काम चालू ठेवले. परंतु, 1960 मध्ये पाकिस्तान सरकारने आश्रमाची जागा Enemy Property म्हणून जाहीर केली. चारूबाबूंना 1963 पासून तुरुंगवास भोगावा लागला. बांगलादेश मुक्तिलढ्यावेळी संस्थेचे दोन कार्यकर्ते प्रार्थना करताना मारले गेले होते. बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर या संस्थेला बांगलादेश सरकारने गांधी आश्रम ट्रस्ट या नावाने मान्यता दिली आणि संस्था मोकळेपणाने काम करू लागली.

बांगलादेशला जायचे ठरले, तेव्हाच नौखालीलाही जायचे मी ठरवले होतेच. माझ्याबरोबर आलेले माझे मित्र अन्वर राजन हे, पुण्याच्या ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’चे विश्वस्त आणि सेक्रेटरी आहेत. त्यांनाही नौखालीला जायचे होते. मला ढाक्क्याला बोलावणाऱ्या ‘स्प्रिंग लॅा स्कूल’चा शेवटचा दिवस 14 मार्च 2020 हा होता. त्यानंतर आम्ही एक दिवस ढाक्क्यात थांबलो आणि 16 मार्चला नौखालीला जायला निघालो. सोबत तिथले प्रा.मोहम्मद नानूमियाँ हेही आले. 

ढाक्क्याला येण्याआधी मी महात्मा गांधींवरच्या Last Phase या ग्रंथमालेच्या नवव्या खंडाचे नौखालीसंबंधीचे दोन भाग वाचले होते. महादेवभाई देसाई यांच्या निधनानंतर प्यारेलाल नय्यर हे गांधीजींचे सेक्रेटरी म्हणून काम करत. त्या सर्व काळात ते गांधीजींबरोबर होते. प्यारेलाल नय्यर यांनी त्या दोन भागांमध्ये गांधीजींच्या नौखाली यात्रेमधले प्रसंग तपशीलवार नमूद केले आहेत, ते असे :

‘पाकिस्तानच्या मागणीच्या समर्थनार्थ महम्मदअली जीना ह्यांनी ‘डायरेक्ट ॲक्शन’ची घोषणा दिल्यानंतर 16 ऑगस्ट 1946 रोजी कलकत्त्यामध्ये मोठे हत्याकांड झाले, त्यानंतर 10 ऑक्टोबर 1946 पासून नौखालीमधील हिंसाचाराच्या बातम्या येऊ लागल्या. अत्याचाराने त्रस्त झालेल्या लोकांचे लोंढे कलकत्त्याला येऊ लागले. गांधीजी तेव्हा दिल्लीत होते. तिथून कलकत्त्यात येऊन ते काही दिवस राहिले. तिथे त्यांनी शांततेसाठी प्रयत्न केला, प्रार्थना सभा घेतल्या. तेव्हाच्या एकत्रित बंगालचे मुख्यमंत्री (तेव्हा त्यांना पंतप्रधान म्हणत) मुस्लिम लीगचे हुसेन शहीद सुऱ्हावर्दी हे होते. गांधीजींच्या प्रयत्नांमुळे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक शांतता समिती स्थापन करण्यात आली, जिच्यातर्फे एक जाहीरनामा प्रसृत करण्यात आला. त्यामध्ये म्हटले होते, ‘जातीय दंगे करून पाकिस्तान निर्माण करता येणार नाही. आणि अशाच हिंसक पद्धती वापरल्या तर भारतही एकसंध राहू शकणार नाही. कुठल्याही भागात अल्पसंख्याकांना सुरक्षा ही मिळालीच पाहिजे.’ त्यानंतर गांधीजींनी नौखालीला जाण्याचे ठरवले. त्यांनी तिथे जाणे धोक्याचे आहे आणि त्यांनी तिथे जाऊ नये, असे सर्वांनी त्यांना सांगितले; पण नौखालीतल्या हिंसाचाराच्या बातम्या ऐकून गांधीजी अत्यंत अस्वस्थ झाले होते. ‘कोणीही बरोबर आले नाही तरी मी तिथे जाणारच’ हे त्यांनी जाहीर केले.

गांधीजी 6 नोव्हेंबर 1946 रोजी नौखालीला जायला निघाले. गांधीजींबरोबर नौखालीला जाणाऱ्यांमध्ये बंगाल विधानसभेचे सदस्य हरेन घोष चौधरी, श्री.निर्मल बोस, नौखालीतले स्थानिक कार्यकर्ते चारू चौधरी, डॉ.सुशीला नय्यर, सुचेता कृपलानी, गांधीजींची नात- त्यांच्या पुतण्याची मुलगी मनू, त्यांच्या आश्रमातील एक मुस्लिम कार्यकर्ती अमतूस सलाम हे होते. मुख्यमंत्री शहीद सुऱ्हावर्दी यांची मुलगी आणि एका मंत्र्याची मुलगी यांनाही गांधीजींबरोबर जाण्याची इच्छा होती. परंतु त्या दोघीही बुरखा घालत नसत आणि तिथल्या वातावरणात नौखालीच्या कट्टर मुल्ला-मौलवींचा विरोध नको, म्हणून त्यांना न पाठवण्याचे ठरले. बंगाल सरकारमधले कामगारमंत्री शमसुद्दीन अहमद आणि दोन उपमंत्री गांधीजींच्या बरोबर काही काळ गेले. गांधीजींसाठी योग्य तो पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता, पण गांधीजींनी तो दूर ठेवला. पोलिसांच्या जवळिकीमुळे लोकांपासून दुरावा वाढेल, ही त्यांची भूमिका होती. नौखाली जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे गांधीजी असताना जवाहरलाल नेहरूही तिथे एकदा येऊन गेले.  

दि.6 नोव्हेंबर रोजी गांधीजी नौखालीला निघाले. प्रथम कलकत्ता ते कुश्तिया आणि तिथून गोआलांडापर्यंत ट्रेनने आणि नंतर चांदीपूरपर्यंत 100 मैल अंतर पद्मा नदीतून स्टीमरने. त्यांच्या स्वागतासाठी, त्यांना भेटण्यासाठी लोक सर्वत्र मोठ्या संख्येने उभे होते. पुढे नौखाली जिल्ह्यामध्ये गांधीजी दि.1 मार्च 1947 पर्यंत 47 खेड्यांमधून पायी हिंडले. त्या वेळी नौखालीत हिंदूंची लोकसंख्या साधारणपणे 20 टक्के होती आणि प्रचंड हिंसाचाराने ते सर्व हादरले होते. हिंदू हे प्रामुख्याने जमीनदार असल्याने त्यांच्यावर मुसलमानांचा रोष होता. त्यात मुस्लिम लीगच्या डायरेक्ट ॲक्शनच्या नाऱ्यामुळे हिंसाचार झाला होता. दोन्ही समाजांमध्ये प्रचंड दरी निर्माण झाली होती. दोन्ही समाजांमध्ये सामंजस्य आणि एकोपा निर्माण करणे अतिशय कठीण होते. सर्वत्र चिखल, जळलेली घरे, कुजलेली प्रेते यातून दिवसा आणि रात्री कंदिलाच्या प्रकाशात गांधीजी चालत गेले. घराघरांत, मंदिरांत आणि मशिदींत जाऊन लोकांना भेटले. लोकांना धीर देणे, निराश्रितांची शिबिरे उभारणे, प्रार्थना सभा घेणे, वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करणे, शक्य त्या लोकांना त्यांच्या घरी पाठविणे, स्त्रियांचे अश्रू पुसणे, हिंदू-मुस्लिम समन्वय घडविणे, शांतता समित्या स्थापन करणे- हाच त्यांचा कार्यक्रम होता. गांधीजींच्या प्रार्थनासभांना मोठ्या संख्येने हळूहळू हिंदू आणि मुसलमानही येऊ लागले, शांतता प्रस्थापित करण्याचे आश्वासन देऊ लागले. गांधीजींच्या प्रयत्नांना यश येऊ लागले आणि पुष्कळशी शांतता प्रस्थापित झाल्यानंतरच ते कलकत्त्याला परत गेले, 4 मार्च 1947 ला बिहारला जाण्यासाठी; कारण तिथेही दंगे भडकले होते. तिथे बादशाह खान गांधीजींबरोबर आले. ‘यदि तोर डाक शूने कोऊ ना आशे, तबे एकला चालो रे’ या रवींद्रनाथांच्या काव्यपंक्ती नौखालीमध्ये आचरणात आल्या होत्या.

नौखालीत गांधीजी जोयाग या गावी एक दिवस राहिले होते. तिथे आज गांधी आश्रम उभा आहे. त्याचीही थोडी माहिती आधी मिळाली होती. ती जमीन बॅरिस्टर हेमंतकुमार घोष यांची होती. गांधीजींचे काम पुढे चालू राहण्यासाठी त्यांनी ती जमीन आश्रमाला दान केली. गांधीजींना नौखालीला नेणाऱ्यांमधले श्री.चारू चौधरी यांनी अनंत हाल-अपेष्टा व त्रास सोसत तिथे शांतता आणि समाजसेवेचे काम चालू ठेवले. परंतु, 1960 मध्ये पाकिस्तान सरकारने आश्रमाची जागा Enemy Propertyम्हणून जाहीर केली. चारूबाबूंना 1963 पासून तुरुंगवास भोगावा लागला. बांगलादेश मुक्तिलढ्यावेळी संस्थेचे दोन कार्यकर्ते प्रार्थना करताना मारले गेले होते. बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर या संस्थेला बांगलादेश सरकारने गांधी आश्रम ट्रस्ट या नावाने मान्यता दिली आणि संस्था मोकळेपणाने काम करू लागली. चारूबाबूंनंतर संस्थेच्या सेक्रेटरी झरनाधारा चौधरी यांनी ते काम पुढे चालू ठेवले. सध्या संस्थेचे काम नबकुमार राहा, ए.एन.एम. झहिरउद्दीन आणि तरणीकुमार दास पाहतात.

गांधीजी नौखालीत पायी हिंडले, तेव्हा तिथे साधे रस्तेही नव्हते. आम्ही साडेपाच तासांचा प्रवास मोटारने करून जोयाग-सोनाईमोरी येथील गांधी आश्रमाच्या येथे पोहोचलो. वाटेत सर्वत्र हिरवागार प्रदेश होता. शेवटचे रस्ते चिंचोळे होते. संस्थेचे पदाधिकारी नबकुमार राहा आणि तरणीकुमार दास आमच्या स्वागतासाठी अगत्याने उभे होते. आमची तोंडओळख झाल्यानंतर आम्ही संस्थेच्या प्रागंणामध्ये गेलो, तर समोरच गांधींचा पूर्णाकृती पुतळा उभा होता. त्याला वंदन करून पुढे जाताच नबकुमारजींनी डाव्या बाजूचा एक मोठा फलक दाखविला. गांधीजी ज्या 47 गावांखेड्यांमध्ये गेले होते, तो सगळा मार्ग आणि नकाशाच त्या फलकावर चितारलेला होता.

नंतर नबकुमार आम्हाला संस्थेच्या कार्यालयात घेऊन गेले. कार्यालयात लावलेल्या फोटोंमध्ये नौखालीत येण्याआधी कलकत्त्यात गांधीजींनी घेतलेल्या प्रार्थनासभेचा फोटो होता. त्यात गांधीजींच्या बाजूला तेव्हाच्या एकत्रित बंगालचे पंतप्रधान शहीद सुऱ्हावर्दी बसलेले दिसत होते आणि बाजूला उभ्या असलेल्या दोन तरुणांमधला एक तरुण शेख मुजिब हे होते. चहापाणी झाल्यानंतर तिथे बांधत असलेल्या ‘गांधी मेमोरियल म्युझियम’मध्ये आम्ही  गेलो. म्युझियमची इमारत उभी आहे. वर्षभर तिच्या दुरुस्तीचे काम चालू आहे. तिथे गांधीजींचा जीवनप्रवास आणि त्यांची नौखालीयात्रा रेखाटायची आहे. आर्थिक अडचणींमुळे सध्या काम रेंगाळले आहे. इमारतीच्या दारातच झरनाधारा चौधरी यांचा मोठा फोटो लावलेला आहे. 

संस्थेने दिलेले रुचकर जेवण घेतल्यानंतर त्यांच्या बाजूच्या कार्यशाळेमध्ये गेलो. तिथे दोन महिला हातमागावर कापड विणण्याचे काम करीत होत्या. नबकुमारजींनी सांगितले की, आजमितीस संस्थेच्या हातमाग केंद्रांमध्ये 64 महिला काम करतात. त्यांना महिन्याला किमान 4000 टाका (बांगलादेशी चलन) उत्पन्न मिळते. संस्थेतर्फे Employment Generation Programme चालवला जातो, ज्यामुळे सुमारे 30,000 माणसांना काम मिळते. बाजूलाच असलेल्या संस्थेच्या स्टोअरमध्ये आश्रमात बनविलेल्या वस्तू प्रदर्शनार्थ आणि विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या. संस्थेची छोटीशी लायब्ररीदेखील आहे.

आज संस्थेतर्फे अनेक उपक्रम राबविले जातात. संस्था तीन शाळा चालवते, दोन प्राथमिक आणि एक माध्यमिक. त्यात 600 विद्यार्थी शिकतात. संस्थेतर्फे चार वर्षांचा Nursing Training Course चालवला जातो. शिवाय Homestead Gardening आणि Fish Harvesting चे शिक्षणही दिले जाते.

बांगलादेशात ‘युनियन परिषद’ ही सर्वांत तळातील स्थानिक स्वराज्य संस्था आहे. 75,000 टाक्यांपर्यंतचे वाद त्या परिषदेकडे सोडविण्यासाठी जिल्हा न्यायालये पाठवितात. युनियन परिषदेचे अध्यक्ष हे या वाद सोडविणाऱ्या पंचमंडळाचे प्रमुख असतात. या पंचमंडळाचे सदस्य आणि अध्यक्ष यांना संस्थेतर्फे प्रशिक्षण दिले जाते.

झरनाधारा चौधरी ह्यांनी हे सर्व कार्य उभे केले. त्यांना 1988 मध्ये जमनालाल बजाज पुरस्कार देण्यात आला. भारत सरकारने 2013 मध्ये ‘पद्मश्री’ देऊन आणि बांगलादेश सरकारने 2015 मध्ये ‘एकुशे पदक’ हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. जून 2019 मध्ये निधन होईपर्यंत त्या नौखाली आश्रमामध्ये कार्यरत होत्या. 

नबकुमारजींनी नंतर सांगितले की, 1992 मध्ये भारतामध्ये बाबरी मशीद पाडली गेली, तेव्हा बांगलादेशात काही ठिकाणी दंगे झाले; परंतु विशेष म्हणजे, गांधीजी ज्या 47 गावांमध्ये गेले होते तिथे हिंसेची एकही घटना घडली नाही! वयाच्या 78 व्या वर्षी प्रकृती साथ देत नसताना गांधीजी जवळजवळ चार महिने नौखालीच्या खेड्यापाड्यांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी चालत राहिले होते. माणसा-माणसांमधील द्वेषभावना संपवणे, हा त्यांचा एकमेव कार्यक्रम होता. नौखालीला जाताना आम्हाला या भागात प्रथमच मोठ्या संख्येने बुरखा घातलेल्या स्त्रिया दिसल्या, ज्या आधी कुठेही फारशा दिसल्या नव्हत्या. वाटेत एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो होतो. तिथे एक पोलीस अधिकारीही चहा घेत होते. त्यांना नौखालीतल्या वातावरणाबद्दल विचारले असता ते म्हणाले होते, ‘बांगलादेशमधला हा भाग सर्वांत अधिक Fundamentalistआहे.’ असे असूनही गांधीजींच्या कार्याचे फळ नबकुमारजींच्या वक्तव्यामधून दिसून येत होते. हिंसाचार झाल्यानंतर धार्मिक अल्पसंख्याकांना आजही आधार वाटतो तो गांधीजींचा. त्यांचा आधार घ्यावा लागतो, हे गांधीजींचे मोठेपण आणि तो आधार घेण्याचे प्रसंग अजूनही येत राहतात, हे आपले कोतेपण. महात्म्याने पावन केलेल्या त्या भूमीला आम्ही प्रणाम केला आणि नौखालीचा निरोप घेतला.

गांधीजींचा संबंध आला होता अशा अनेक ठिकाणांना भेट देण्याची संधी मला मिळालेली आहे. पोरबंदर येथील त्यांचे जन्मस्थान, राजकोट येथील त्यांची शाळा, त्यांचे साबरमती आणि वर्धा येथील आश्रम, त्यांना अटक करून जिथे बंदिस्त केले होते तो पुण्याचा आगाखान पॅलेस, त्यांची हत्या झाली ते दिल्लीचे बिर्ला हाऊस, त्यांच्या अखेरच्या वस्त्रांचे जतन करणारे मदुराईचे गांधी म्युझियम- या सर्व ठिकाणी मी जाऊन आलो आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या ज्या पीटरमारिट्‌सबर्ग येथे त्यांना ट्रेनमधून फेकून देण्यात आले आणि त्यांना वर्णद्वेषाचा पहिला चटका बसला, तिथेही मी गेलो आहे. दोन चिमूट मीठ उचलून ब्रिटिश साम्राज्याविरूद्ध जिथे त्यांनी लढा सुरू केला, त्या दांडी या गावी मी गेलेलो आहे. या सर्व प्रेरणास्थानांमध्ये असहाय, अल्पसंख्य लोकांना धीर देणारी नौखालीतली आणि नंतर बिहारमधली पायी केलेली यात्रा मला विशेष प्रेरणादायी वाटते. गांधीजी नौखालीत गेले, तेव्हा जो देश स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले होते तो भारत देश एकत्रितपणे स्वतंत्र होण्याची शक्यता धूसर झाली होती. माणसामाणसांमध्ये जाती-धर्मावरून भेद करू नयेत, या देशातील हिंदू आणि मुसलमान या दोन प्रमुख धर्मांतील लोकांनी गुण्यागोविंदाने राहावे, या त्यांच्या विचाराला तिथे मूठमाती दिलेली त्यांना दिसत होती. प्रकृती ठीक नसताना तिथल्या धोकादायक परिस्थितीत जाऊ नका, असे त्यांना अनेकांनी सांगितले होते; तरीही 78 व्या वर्षी प्रकृती व जीवाची पर्वा न करता शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्या भागातून ते फिरले होते. आणि पुष्कळशी शांतता प्रस्थापित करूनच पुढे बिहारला गेले होते! माउंटबॅटन यांनी गांधीजींना One Man Armyअसे जे म्हटले, ते उगाचच नव्हे!

ज्या प्रश्नासाठी आपल्या प्रकृतीची आणि जीवाची पर्वा न करता गांधीजी नौखालीत गेले होते, तो प्रश्न आजही सगळ्या जगाला भेडसावत आहे. वर्ण, लिंग, जाती-धर्मावरून भेद न करणारा समाज निर्माण करणे आणि अल्पसंख्याकांना विकासाची समान व पूर्ण संधी, सुरक्षा व सन्मान देणे ही आजचीही वैश्विक गरज आहे. यासाठी गांधीजींच्या नौखाली यात्रेतून आपण प्रेरणा घेणार का?

Tags: सोनार बांगला महादेवभाई देसाई महाराष्ट्र गांधी स्मारक निधी महम्मदअली जीना नौखाली महात्मा गांधी गांधी हेमंत गोखले weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

न्या. हेमंत गोखले

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश.


Comments

  1. Prakash Paranjape- 13 Feb 2021

    लेख फारच छान आहे.गाधींची जादू आजही जनमानसावर नक्कीच आहे हे लेख वाचतांना सतत जाणवत होते

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके