डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

रवींद्र कुठीबाडी : रवींद्रनाथ टागोरांचे बांगलादेशातील निवासस्थान

रवींद्रनाथांबद्दल भारतीय लोकांइतकेच बांगलादेशच्या लोकांना प्रेम आणि आदर आहे. पाकिस्तान सरकारने रवींद्र संगीत हे टेलिव्हिजन आणि रेडिओवर म्हणण्यास 1960 च्या दशकात बंदी आणली, तेव्हा इथल्या कलाकारांनी त्याला प्रखर विरोध करून ती बंदी उठवायला लावली होती. बांगलादेश स्वतंत्र झाल्यावर जेव्हा शेख मुजिब ढाक्क्याला पहिल्यांदा आले, तेव्हा त्यांच्या भाषणात बांगलादेशच्या जनतेचा गौरव करताना त्यांनी रवींद्रनाथांच्या ‘बंगमाता’ ह्या कवितेच्या ओळी उद्‌धृत केल्या होत्या आणि रवींद्रनाथांनी लिहिलेल्या ‘आमार शोनार बांगला’ ह्या गीतालाच बांगलादेशाने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आहे. रवींद्रनाथांच्या जन्मदिनी बांगलादेश सरकार कुठीबाडी येथे पाच दिवसांचा महोत्सव आयोजित करते. त्यात रवींद्र साहित्यावर चर्चा, रवींद्रनाथांची नाटके, रवींद्र संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम योजिले जातात.

बांगलादेशला जाताना जमले तर शिलाईडाहा येथील रवींद्रनाथांचे निवासस्थान पाहायचे, हा विचार होता. ही ‘रवींद्र कुठीबाडी’ कुश्तियाजवळच्या कुमारथळी तालुक्यात आहे. आम्ही कुश्तियाला जायला निघालो. वाटेत सर्वत्र हिरवागार प्रदेश. ढाक्क्याहून कुश्तिया 180 किलोमीटर दूर आणि वाटेत ‘पद्मा’ म्हणजे गंगा नदी स्टीमरने ओलांडावी लागते. अर्थातच आमची मोटार इतर वाहनांबरोबर स्टीमरवर चढवली गेली. खूप मोठी बोट. तिच्यावर अनेक वाहने, ट्रक्स, मोटारी आणि स्कूटर्स. बोटीवर ही सर्व वाहने चढवणे, नदीपार जाणे आणि पुन्हा पलीकडे उतरणे- या सगळ्याला निदान दीडेक तास सहजच लागतो, कारण नदीचे पात्र खूपच विस्तीर्ण आणि बोटीवर वाहनेही अनेक. बोटीवर निरनिराळ्या वस्तू व खाद्य पदार्थ आणि नुकतेच पकडलेले जिवंत मासे विकणारेसुद्धा! बोटही दोन मजल्यांची आणि तिच्यामध्ये एक रेस्टॉरंटही.

कुश्तियाला पोचण्याआधीच शिलाईडाहा येत असल्याने आम्ही तिथे जाऊन मग कुश्तियाला जायचे ठरविले. पण त्या दिवशी म्हणजे 17 मार्चला बंगबंधू शेख मुजिब यांची जन्मशताब्दी असल्याने सार्वजनिक सुट्टी होती आणि रवींद्रनाथांची कुठीबाडी बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्या दिवशी कुश्तियाच्या इस्लामिक युनिव्हर्सिटीमध्ये मुक्काम करून दुसऱ्या दिवशी शिलाईडाहा येथे गेलो. भारतातील कुठल्याही राष्ट्रीय स्मारकाबाहेर जशी सर्व प्रकारची दुकाने लागलेली असतात, तशीच इथेही लागलेली आणि खाण्याच्या स्थानिक पदार्थांचे विक्रेतेही! कारण देश-विदेशातून येथे येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. रवींद्रनाथांच्या घराचे बांगलादेश सरकारने राष्ट्रीय स्मारक केले आहे आणि ते त्यांच्या पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली आहे. सध्या त्याचे नूतनीकरण चालू आहे. नूतनीकरणाची सुरुवात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी केल्याची पाटी बाहेरच लावलेली होती. नूतनीकरण अर्थातच कूर्मगतीने चालू होते.

या रवींद्र कुठीबाडीचा परिसर जवळजवळ 11 एकरांचा आहे. कुठीबाडी म्हणजेच मोठे घर. त्या परिसराच्या मध्यभागी पिरॅमिडसारख्या आकाराचे हे लाल रंगाचे दुमजली घर उभे आहे आणि त्याच्या सर्व बाजूंना हिरवळ पसरलेली आहे. प्रवेशासाठी तिकीट काढून कुठीबाडीकडे जाताना उजव्या बाजूला एका इमारतीचे म्युझियमसाठी बांधकाम चालू असलेले दिसले. अर्थातच, आधी म्हटले त्याप्रमाणे कूर्मगतीनेच.

रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ ह्यांनी हे घर बांधले. त्यांची या भागात जमीनदारी होती. रवींद्रनाथांचा जन्म कलकत्त्यातील जोराशंको येथील ठाकूरबाडीमध्ये 1861 मध्ये झालेला. पण शिलाईडाहा येथील घरात ते अनेक वेळा, विशेषतः 1891-1901 या काळात जमीनदारीच्या कामासाठी राहत असत. इथेच त्यांनी अनेक कथा आणि गीतांजलीमधल्या अनेक कविता लिहिल्या. त्यांनी त्या कवितांचे इंग्रजी भाषांतर करायला 1912 मध्ये सुरुवात केली W. B. Yeats  हे प्रसिद्ध इंग्लिश/ आयरिश कवी या कवितांनी भारावून गेले. गीतांजलीला यीट्‌स यांनी प्रस्तावना लिहिली. रवींद्रनाथांना गीतांजलीसाठी साहित्याचा नोबेल पुरस्कार 1913 मध्ये देण्यात आला. साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळालेले ते पहिले बिगर युरोपियन लेखक होते.

कुठीबाडीमध्ये रवींद्रनाथांचे अनेक फोटो आणि चित्रे लावलेली आहेत. त्यात लक्षात राहावेत असे काही- त्यांनी तरुणपणी ‘वाल्मीकी प्रतिभा’ या नाटकात काम केले त्या वेळचा त्यांचा फोटो, त्यांची पत्नी मृणालिनीदेवी हिचा फोटो, त्यांची मोठी मुले माधुरीलता व रतींद्रनाथ यांच्याबरोबरचा त्यांचा फोटो, त्यांचा शेतकऱ्यांबरोबरचा फोटो आणि गांधीजींबरोबरचा फोटो. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या फोटोंपैकी काही फोटो या स्मारकाला भेट दिलेले आहेत, त्याप्रमाणे त्या फोटोंच्या खाली नोंदही करण्यात आलेली आहे. रवींद्रनाथांनी काढलेले एका स्त्रीच्या चेहऱ्याचे चित्र आणि सेल्फ पोट्रेट हे मला विशेष वाटले. त्यांच्या लहानपणापासून अखेरच्या काळापर्यंतचे त्यांच्या बदलत गेलेल्या चेहऱ्याच्या फोटोंचे कोलाज हेही खासच. रवींद्रनाथ ज्या मेण्यात बसून शेतामध्ये जात असत, तो मेणा आणि जी बोट नदीत जाताना वापरत असत ती बोट, त्यांचे टेबल, पलंग आदी वस्तू तिथे सुरक्षित ठेवलेल्या आहेत. रवींद्रनाथांनी लिहिलेले रवींद्र संगीताचे नोटेशन आणि त्यांना मिळालेले नोबेल पारितोषक यांचेही फोटो तिथे आहेत.

रवींद्रनाथांबद्दल भारतीय लोकांइतकेच बांगलादेशच्या लोकांना प्रेम आणि आदर आहे. पाकिस्तान सरकारने रवींद्र संगीत हे टेलिव्हिजन आणि रेडिओवर म्हणण्यास 1960 च्या दशकात बंदी आणली, तेव्हा इथल्या कलाकारांनी त्याला प्रखर विरोध करून ती बंदी उठवायला लावली होती. बांगलादेश स्वतंत्र झाल्यावर जेव्हा शेख मुजिब ढाक्क्याला पहिल्यांदा आले, तेव्हा त्यांच्या भाषणात बांगलादेशच्या जनतेचा गौरव करताना त्यांनी रवींद्रनाथांच्या ‘बंगमाता’ ह्या कवितेच्या ओळी उद्‌धृत केल्या होत्या आणि रवींद्रनाथांनी लिहिलेल्या ‘आमार शोनार बांगला’ ह्या गीतालाच बांगलादेशाने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आहे. रवींद्रनाथांच्या जन्मदिनी बांगलादेश सरकार कुठीबाडी येथे पाच दिवसांचा महोत्सव आयोजित करते, असे सांगण्यात आले. त्यात रवींद्र साहित्यावर चर्चा, रवींद्रनाथांची नाटके, रवींद्र संगीत आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम योजिले जातात. त्यामध्ये बांगलादेश, भारत आणि जगातल्या इतरही देशांतले कलाकार व विचारवंत भाग घेतात.

रवींद्रनाथांचे कलकत्त्यातील घर बऱ्याचशा गजबजलेल्या भागात आहे. शिलाईडाहा येथील घर मात्र प्रचंड मोठ्या मोकळ्या आणि शांत परिसरामध्ये, चहूबाजूंनी पसरलेल्या हिरवळीत वसलेले आहे. आपल्या शैक्षणिक संकल्पनेला मूर्तरूप देणारी संस्था इथेच उभारावी, असा रवींद्रनाथांचा सुरुवातीचा विचार होता असे म्हणतात; पण पुढे त्यांनी तो बदलला. रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ यांनी कलकत्त्याच्या उत्तरेला 150 किलोमीटरवर असलेल्या बोलपूरजवळ काही जमीन घेतली होती. तोही परिसर अतिशय निसर्गरम्य होता. देवेंद्रनाथांनी तिथेही एक घर बांधले होते, ज्याचे नाव ठेवले ‘शांतिनिकेतन’. रवींद्रनाथांनी नंतर तिथेच त्यांच्या विचाराचे मुक्त शिक्षण केंद्र सुरू केले. प्रथम त्यांनी पाच विद्यार्थी घेऊन 1901 मध्ये एक प्रायोगिक शाळा सुरू केली. नोबेल पारितोषिक 1913 मध्ये मिळाल्यानंतर त्यांनी ह्या केंद्रासाठी अधिक वेळ दिला आणि 1921 मध्ये तिथेच ‘विश्वभारती’ हे विश्वविद्यालय सुरू केले. तिथे त्यांनी कला, संगीत, नृत्य आणि सर्व प्रकारचे पाश्चात्त्य व पौर्वात्य शिक्षण एका मुक्त वातावरणात देण्याचे आपले स्वप्न साकार केले. नंदलाल बोस हे महान चित्रकार आणि अशाच अनेक कलावंतांना, विचारवंतांना, शिक्षकांना रवींद्रनाथांनी तिथे बोलावले.

शांतिनिकेतनमधली अभिनव शिक्षणपद्धती आणि तिथले मुक्त वातावरण ह्यामुळे जगभरातले अनेक विचारवंत, लेखक, कलाकार शांतिनिकेतनकडे आकर्षित झाले. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपली मुलगी इंदिरा हिला तिथे शिक्षणासाठी पाठवले. प्रसिद्ध मराठी लेखक पु. ल. देशपांडे हेही रवींद्रनाथांचे साहित्य समजून घेण्यासाठी वयाच्या पन्नाशीनंतर तिथे काही काळ जाऊन राहिले होते.

काही वर्षांपूर्वी कलकत्त्याला गेलो असताना जोराशंको येथील रवींद्रनाथांची ठाकूरबाडी बघायला गेलो होतो. इथेही रवींद्रनाथांचे फोटो, त्यांनी काढलेली चित्रे, त्यांची बसण्याची खुर्ची, टेबल अशा अनेक वस्तू जतन केल्या आहेत. परंतु, जोराशंको येथील ठाकूरबाडी काय किंवा शिलाईडाहा येथील कुठीबाडी काय- ही दोन्ही घरे पाहिल्यानंतर अधिक काही न म्हणता इतकेच म्हणावेसे वाटते की, त्यांचे ज्या प्रकारे जतन किंवा संवर्धन होणे आवश्यक आहे, तसे झालेले नाही. दोन्हीही घरे दीडेकशे वर्षांपूर्वी बांधलेली आहेत. त्यांची पडझड होत राहणे हे साहजिकच आहे, म्हणूनच त्यांची वेळोवेळी काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. मी जोराशंको येथील घर पाहिले, तेव्हा पश्चिम बंगालमधील डाव्या पक्षांचे सरकार जाऊन तिथे तृणमूल काँग्रेसचे सरकार अधिकारावर आले होते. त्या घराची देखभाल करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, डाव्या पक्षांच्या सरकारच्या काळात त्या घराच्या आवश्यक देखभालीचे पैसे मिळण्यासाठीदेखील वेळ लागत असे. तृणमूल काँग्रेसचे सरकार येऊनही त्या घराची देखभाल काही सुधारलेली दिसत नव्हती.  

युरोपमध्ये तिथल्या प्रसिद्ध लेखकांची घरे ज्या कल्पकतेने आणि कृतज्ञतेने जतन केली आहेत, ती मी पाहिलेले आहे. त्यापासून भारतीय उपखंडातील लोकांनी शिकणे आवश्यक आहे, हे आवर्जून सांगितले पाहिजे. प्रख्यात कादंबरीकार चार्ल्स डिकन्स याचे लंडनमधील घर, कवी वर्डस्वर्थचे लेक डिस्ट्रिक्टमधील घर, शेक्सपिअरचे स्टॅटफर्ड अपॉन अव्हॉन येथील घर, तेथील रॉयल शेक्सपिअर थिएटर हे काही वर्षांपूर्वी पाहिले. ती घरे आणि त्यातील वस्तू इतक्या कलात्मकतेने जतन केल्या आहेत की, तिथे गेल्यावर त्या काळातच गेल्याचा भास होतो. शिवाय तिथेच त्या घरांचे फोटो, त्या लेखकांची पुस्तकेही उपलब्ध असतात. रवींद्रनाथ हे साहित्यातल्या नोबेल पारितोषिकाने गौरविलेले एकमेव भारतीय, भारतीय साहित्याचे मानदंड, शिक्षणाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारे विश्वमानवतावादी आणि भारत-बांगलादेश यांमधले सेतू! जोराशंको आणि शिलाईडाहा येथील त्यांची घरे ही स्फूर्तिस्थाने होत. ह्या घरांचे अधिक चांगले जतन आणि संवर्धन व्हावे, अशी अपेक्षा ठेवावी का?

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

न्या. हेमंत गोखले

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके