डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पाण्याचा डोळसपणे संयमित वापर हवा

शेती म्हणजे शेवटी सौरशक्ती गोळा करून ठेवण्याचे काम आहे. घाटावरचे किती पाणी समुद्रात सोडून पुरंधर वा माणदेशाच्या पाठारांवर किती पाणी चढवायचे, किंवा कधी काळी साठलेली तेल वा कोळशाच्या रूपातील किती सौरशक्ती वापरून धान्य-फळे-भाजीपाला, चारा, लाकूड यांच्या रूपाने किती सौरशक्ती साठवायची मिळवायची, वापरायची हे तारतम्यानेच ठरवावे लागणार. पाणी उपसण्यासाठी ऊर्जेचा एखादा अक्षय स्रोत असेल तर गोष्ट वेगळी!

'साधना' 1 मेच्या अंकातील आपल्या संपादकीयावरून लिहावेसे वाटले.

■ महाराष्ट्रात कोकण घाटमाथा, मावळपट्टी या भागात जेथे भाताचे पीक घेतले जाते तेथे भरपूर पाऊस पडतो. नाशिक-पुणे-बंगलोर रस्ता साधारणपणे घाटांना समांतर जातो. या रस्त्याच्या पूर्वेकडे पाऊस झपाट्याने कमी होतो. साधारणपणे 200 कि.मी. रुंद अशा या पट्ट्यात अवर्षणप्रवण असे महाराष्ट्र राज्यातील 87 तालुके येतात. हा पट्टा उत्तरेत गुजरातपासून थेट तामिळनाडूपर्यंत कमी-अधिक रूंद असा उत्तर दक्षिण पसरलेला आहे. या अवर्षण विभागाच्या पूर्वेला पाऊस पुन्हा वाढू लागतो. भंडारा-गडचिरोली येथे भाताचा प्रदेश लागतो.

■ महाराष्ट्र राज्याचा 85% भूभाग अग्निजन्य काळ्या बेसॉल्ट खडकांनी बनलेला आहे. पश्चिमेकडे हा खडक हजारो फूट जाड आहे. पूर्वेकडे त्याची जाडी कमी होत जाते. या अग्निजन्य पठारावर जलीघांच्या कडेनेच तेवढा मातीचा जाड थर आढळतो. जलौघांपासून दूर गेल्यावर मातीच्या थराची जाडी कमी होत जाते. या अग्निजन्य खडकापासून तयार होणाऱ्या काळ्या चिकणमातीमध्ये पाणी धरून ठेवण्याचा गुण आहे. या कारणाने या मातीमध्ये पाणी जिरण्याचा वेग वालुकामय मातीपेक्षा फार कमी असतो. 

■ या अग्निजन्य खडकामध्ये ज्यामध्ये पाणी साठावे अशा भेगा वगैरे फार नाहीत. ज्या आहेत त्या फार खोलवर नाहीत. खडकांचा विघटन पावू लागलेला थर आणि अकुहरी पाषणांमध्ये असणाऱ्या शिलारस निवतानाच्या भेगा, डाइक्स यामध्येच काय ती भूजल साठण्यास अनुकूल परिस्थिती आहे.

■ ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे, त्या भागात पावसाळी दिवसांचे प्रमाणदेखील कमी आहे. थोड्या पावसातच बहुतेक पाणी पडून जाते.

■ 100" पाऊस पडणाऱ्या प्रदेशात एखाद्या वर्षी निम्म्या प्रमाणात पाऊस पडला तरी तो 40" म्हणजे भरपूरच होतो. परंतु 15" पावसाच्या प्रदेशात निम्मा पाऊस झाला, म्हणजे फारच अल्प पाणी पडलेले असते. जे पडते ते तीव्रतेने पडते. त्यामुळे भूजलाच्या साठ्यात फार भर पडत नाही. कारण 

1. काळ्या मातीमधून पाणी जिरण्याचा वेग कमी असतो.

2. भूजल साठण्यासाठी आवश्यक असा सच्छिद्र थर पुरेसा जाड नाही. 

■ अवर्षणप्रवण विभागात काही भाग उदा. पुरंधर तालुका, खानापूर तालुका, माणदेश इत्यादी असा आहे की जो म्हणजे पठारावर उगवलेले अजून एक पठार आहे. ही पठारे घाटमाथ्यापासून निघालेली नाहीत. पुण्याहून सातारला जाताना कात्रज घाट ओलांडला की पुरंधरच्या पठाराची कड एका ठेंगण्या डोंगररांगेसारखी रस्त्याच्या पूर्वेच्या बाजूने आपली साथ करते. माणदेशचे पठार सडकेच्या एवढे जवळ नाही. पुण्याच्या उत्तरेकडे अवसरी घाट आपण चढतो आणि एका विस्तृत पठारावर उतरतो. घाटमाथ्यापासून म्हणजे पाऊस आणि पावसाळी दिवस दोनही गोष्टी जेथे जास्त आहेत तेथून उगम पावणाऱ्या नद्या, या पठारांपासून शेकडो फूट तरी खोलीवर आहेत. राज्यातील उपलब्ध पाण्याचा मोठा वाटा या घाटमाथ्यापासून निघालेल्या प्रवाहांमधून वाहतो. या बहुतेक नद्या पूर्व-दक्षिण वाहिनी आहेत. त्यामुळे हा अवर्षणप्रवण प्रदेश त्या ओलांडतात. या प्रदेशामधील जो भूभाग या नद्यांपासून फार उंचावर नाही, त्यांना या नद्यांवरील धरणांपासून वहाळाने अथवा विजेच्या साहाय्याने उचलून पाणी देणे व्यवहार्य आहे. विजेच्या साहाय्याने पाणी उचलण्याला तांत्रिक नसली तरी व्यावहारिक मर्यादा आहे. 

■ शेती म्हणजे शेवटी सौरशक्ती गोळा करून ठेवण्याचे काम आहे. घाटावरचे किती पाणी समुद्रात सोडून पुरंधर वा माणदेशाच्या पाठारांवर किती पाणी चढवायचे, किंवा कधी काळी साठलेली तेल वा कोळशाच्या रूपातील किती सौरशक्ती वापरून धान्य-फळे-भाजीपाला, चारा, लाकूड यांच्या रूपाने किती सौरशक्ती साठवायची मिळवायची, वापरायची हे तारतम्यानेच ठरवावे लागणार. पाणी उपसण्यासाठी ऊर्जेचा एखादा अक्षय स्रोत असेल तर गोष्ट वेगळी!

वरील सर्व विवेचनाच्या जोडीला लक्षात घ्यायला हवा असा अजून एक मुद्दा म्हणजे आपल्याला तीन-साडेतीन महिनेच काय तो पाऊस मिळतो. भारतातील भारतात बघितले तर असे दिसते, केरळ राज्य पावसाळी दिवसांच्या बाबतीत आपल्यापेक्षा फारच नशिबवान आहे. छोटा नागपूरच्या पठारावरदेखील पावसाळी दिवस आपल्यापेक्षा जास्त आहेत. ग्रेट ब्रिटन या बेटावर पाऊस वर्षभर विखुरलेला आहे. इतका की 12 पैकी कोणताही महिना सर्वांत जास्त पावसाचा असू शकतो. हिमवृष्टी जेथे असते तेथे धरण न बांधताच बर्फाच्या रूपाने पाणी साठून राहते व अगदी आदर्श पद्धतीने हळूहळू उपलब्ध होते. उत्तर भारतामधील सिंधू, गंगा, यमुना, सतलज यांसारख्या हिमनद्यांपासून निघालेल्या नद्या आहेत. त्यांमधील पाण्याची उपलब्धता त्या मानाने समप्रमाणात असते.

वरील सर्व विवेचनावरून लक्षात घेण्याचे मुद्दे असे, की 1. आपल्याला पाण्याची उपलब्धता ही स्थळ आणि काल या दोनही बाबतीत अत्यंत विषम आहे. 2. आपली माती ही सहजपणे पाणी पिणारी नाही. 3. पाणी साठायला योग्य असा भूगर्भ आपल्याकडे नाही. 4. ऊर्जेचा अक्षय असा झरा अजून कोणाला सापडलेला नाही.

या सर्व आपल्या निसर्गाने आपल्याला घातलेल्या मर्यादा आहेत. अवर्षणप्रवण भागात तर या मर्यादा अतिशयच जाचक ठरतात.

आतापर्यंतच्या चर्चेवरून येथपर्यंत स्पष्ट झाले असावे की अवर्षणप्रवण भागात पाण्याची उपलब्धता- मग ते भूपृष्ठावरील असो वा भूपृष्ठाखालील अतिशय कमीच असणार आणि या भागातील पठारांवर घाटमाथ्यांवर पडणारे पाणी शेतीसाठी उपलब्ध करून देणे व्यवहारात कोणत्याही युतीला वा आघाडीला शक्य होणार नाही. या भागात जसे सिंचनाचे प्रमाण वाढले आहे तसे उन्हाळ्यात टँकरचे प्रमाणदेखील वाढलेले आहे. कारण मुळात अल्प असणारे पाणी हे हिवाळ्यापर्यंतच संपवून टाकले जाते. अवर्षणप्रवण टापूत न मोडणाऱ्या प्रदेशांतदेखील हे जाणवू लागलेले आहे. तर अवर्षणप्रवण भागांत मार्च- एप्रिलपासूनच पाणी संपणे हे स्वाभाविक आहे. मुळात पाणीच कमी असले, तर भूसंधारणाची कितीही कामे केली तरी त्याचा उपयोग काय?

जेजुरीला बांधलेले धरण ज्या जलाशयाला मल्हारसागर असे नाव आहे- त्या जलाशयात बांधल्यानंतर काही वर्षे पाणी येत असे, साठत असे. आता कित्येक वर्षांत हे धरण कधी भरलेलेच नाही. कारण सर्व पाणी तेथे पोहोचायच्या आधीच वापरले जात आहे. सासवडच्या पश्चिमेला सासवड ते गराडे धरण यांच्यामध्ये कित्येक बंधारे आहेत. कऱ्हा नदी आता वाहातच नाही.

पाण्याच्या सिंचनासाठी होणाऱ्या वापरामुळे उन्हाळ्यात पाणी कसे संपलेले असते, याचा अजून एक अनुभव आहे. 72च्या महादुष्काळात आमच्या परिचे गावात पाण्याचा आतासारखा तुटवडा नव्हता. काही जणांकडे तर ऊस उभा होता. आज पिण्याच्या पाण्याची अडचण झाली आहे.

भूसंधारणामुळे पाण्याची उपलब्धता किती वाढू शकते? जेथे भातशेती आहे तेथे पाणी किती पद्धतशीरपणे वळलेले असते! डोंगरउताराला आडवी जाणारी समतळ असंख्य खाचरे, त्यामध्ये तुंबलेले पाणी यांपेक्षा जास्त परिणामकारक जलसंधारण काय असू शकते? आणि एवढे करूनदेखील उन्हाळ्यात या भागात पाण्याची किती उपलब्धता असते?

तेव्हा याबाबत उघड्या डोळ्यांनी काहीतरी ठरवायची आवश्यकता आहे. मुळात जिथे पाण्याची उपलब्धता कमी आहे आणि जे भाग खात्रीच्या पाण्याच्या स्रोतापासून उंचावर आहेत तेथील उपलब्ध पाण्याचा वापर किती आणि कसा करावा, यावर निर्बंध तरी आणावेत अथवा उन्हाळ्यात त्या भागात पाणी उचलून देणे त्यासाठी आवश्यक तो खर्च करणे हे रास्त आहे असे ठरवून त्यासाठी काही स्थायी स्वरूपाच्या योजना अग्रक्रमाने राबविल्या पाहिजेत. आताची टँकरव्यवस्था ही नेहमीची व्यवस्था मानू नये. सासवड शहराला जसे पाणी आणले तशी स्थायी योजना करावी त्यासाठी वीज, पाणी कोठून उपलब्ध करणार ते ठरवावे आणि ते काटेकोरपणे अंमलात आणावे.

पाण्याची उपलब्धता नसणे हा दुष्काळी परिस्थितीचा एक पैलू मात्र झाला. श्री.चा.अ. दाभोलकर यांनी 'महाराष्ट्रातील दुष्काळावर’ लिहिलेल्या पुस्तकामधील मूलभूत विचार खरे तर पुढे आणले गेले पाहिजेत.

पाण्याच्या उपलब्धतेबद्दलचा अजून एक मुद्दा आहे. नुकतेच श्री. विलासराव साळुंखे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त जो परिसंवाद झाला त्यामध्ये अशी माहिती ऐकली, की कृष्णा खोऱ्यातील उपलब्ध पाण्याच्या 18% पाणी कोकणात सोडले जाते; तर भीमा खोऱ्यातील 27% पाणी कोकणात सोडले जाते आणि दुष्काळी वर्षांतदेखील यात फरक पडत नाही. दरवर्षी जायचे तेवढे पाणी सिंधू सागरास जातेच! मुळशी धरणाविरुद्धचा लढा फक्त जमिनीपुरताच झाला पाण्याचे काय?

थेट आंध्र प्रदेशापर्यंतच्या कृष्णा खोऱ्यातील जनतेचा त्यावर हक नव्हता? पूर्वेकडे पिण्याचे पाणी उपलब्ध नसताना दिव्यांचा चकचकाट, फ्रीज, एअरकंडिशनर्स, पंखे, गीझर्स, दूरदर्शन, लाऊडस्पीकरच्या भिंती, लिफ्टस् यांना वीज पुरवठा करण्यासाठी लक्षावधी लोकांच्या तोंडचे पाणी पळवणे न्याय्य आहे काय?

Tags: नद्या भूजल पाणी माती पाऊस चिकणमाती अग्निजन्य खडक बेसॉल्ट खडक महाराष्ट्र अवर्षण कोकण Rivers Groundwater Water Soil Rain Clay Volcanic Rock Basalt Rock Maharashtra Drought Konkan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

हेमंत गोळे
hemantgole1@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके