डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

एक लक्षात घेण्यासारखा प्रयोग

हा प्रश्न आणि उत्तर फार उद्‌बोधक होते. नगरसेवकाने प्रांजळपणे सांगितले की, त्याला निवडून यायचे आहे. वर उल्लेखिलेल्या अडथळ्यांबाबत जर त्याने काही केले तर लोक त्याला मते देणार नाहीत. या उत्तरामधून जशी जनतेची सुप्त शक्ती जाणवली तसेच जनतेमधील विस्कळीतपणा, स्वत:पुरते पाहण्याची वृत्ती यांचे दर्शन घडले.

आम्ही म्हणजे चिंतामणीनगर नागरिक समिती ही सहकारनगर नं. 2 मधील एका लहानशा विभागामधील नागरिकांची संस्था आहे. बिजली- सडक- पानी हे प्रश्न जेव्हा सुटलेले नव्हते तेव्हा या संघटनेची स्थापना झालेली आहे. आता हे प्रश्न शिल्लक आहेत असे म्हणता येणार नाही. परंतु संस्था अस्तित्वात आहे, नागरिकपणाची जाणीव जोपासण्याचे काम आमच्या परीने आम्ही करीत आहोत.

गेली 10 वर्षे आम्ही स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन साजरे करीत आलो आहोत. त्यासाठी एखाद्या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण आणि त्यांचे भाषण तसेच स्थानिक कलाकारांच्या कलांचे सादरीकरण असे कार्यक्रम चालतात. या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाला आमचे पाहुणे होते तरुण विज्ञान संवादक श्री.शिवाजी माने.

ध्वजारोहणाच्या दोन्ही दिवशी आम्ही अजून एक उपक्रम आवर्जून करत आलो आहोत, हा उपक्रम गेली चार वर्षे तरी चालू आहे. या दिवशी नगरसेवकाबरोबर खुला संवाद हा कार्यक्रम असतो. या प्रजासत्ताक दिनी फक्त आम्ही जाणीवपूर्वक हा उपक्रम केला नाही. आमचा हा उपक्रम समाधानकारक रीतीने चालू आहे. नगरसेवकांचे आम्हांला उत्कृष्ट सहकार्य मिळते. अनौपचारिकपणे नागरिक व नगरसेवक एकमेकांशी संवाद करतात. नागरिक प्रश्न विचारतात आणि त्यांना मोकळेपणे उत्तरे मिळतात.

नागरिक आणि नेते यांच्यामधील हा संवाद चालू ठेवण्याच्या दृष्टीने या वर्षी आम्ही एक नवा प्रयोग करण्याचे ठरविले. हा प्रयोग इतर नागरिकांना माहीत व्हावा यासाठी हा लेखनप्रपंच.

प्रजासत्ताकदिनाच्या आयोजनासाठी बऱ्याच आधी आमची बैठक झाली. त्यामध्ये अशी कल्पना पुढे आली की मनपाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी जे उमेदवार इच्छुक असतील त्यांचे विचार ऐकून घेण्यासाठी त्यांना आपण निमंत्रित करावे. प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला एक दिवस अशी व्यवस्था आम्हांला परवडणारी नव्हती. कारण आम्हांला बसायला मैदान आहे, परंतु खुर्च्या व ध्वनिक्षेपक यांचा खर्च चारपट झाला असता. त्यामुळे एकाच वेळी सर्व उमेदवारांना निमंत्रित करावे असे ठरले. सर्व वक्त्यांना मुक्तछंदात बोलू द्यायचे का, तर उत्तर उघडपणे ‘नाही’ असेच आले. वेळेचे बंधन घालणे म्हणजे पूर्ण कार्यक्रम दोन तास चालणे व्यवहार्य आहे. त्यात वक्त्यांच्या प्रमाणात वेळ वाटता येईल आणि ती मर्यादा घालावी लागेल हे ओघाने आले. मुक्तछंद बोलू देणे व्यवहार्य नसेल तर साधारणपणे वक्त्यांनी कशाबद्दल बोलावे हे सांगणे भाग होते. आमच्या भागात उद्‌भवणारे प्रश्न हे साधारण ओळखीचे आहेत आणि त्यावर नगरसेवक मनपा यांच्या साहाय्याने मार्ग काढता येतो, हा आमचा अनुभव आहे. त्यामुळे वॉर्डातल्या प्रश्नांबद्दल बोलू नये असे ठरले. सर्वानुते असे ठरले की, पुणे शहराच्या विकासाबद्दल या सर्व उमेदवारांचे, नेत्यांचे विचार काय आहेत, त्याबद्दल त्यांची काय स्वप्ने आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण रोजचे वृत्तपत्र वाचून हे सहज लक्षात येते आहे की, शहरामधील माणसे तणावग्रस्त होत आहेत. 25 जानेवारीला स्वारगेट बस स्टँडमधून एस.टी.बस पळवण्याचा जो दु:खद आणि धक्कादायक प्रकार घडला, त्याबद्दल आमच्या वसाहतीमधील मानसशास्त्राच्या एक विदुषी ध्वजारोहणानंतर उत्स्फूर्तपणे बोलल्यादेखील. तर हे शहर वास्तव्यासाठी भविष्यात सुखावह होईल यासाठी, या भावी कारभाऱ्यांच्या काय योजना आहेत हे जाणून घेणे आम्हांला महत्त्वाचे वाटते. गमतीची गोष्ट म्हणजे 11 फेब्रुवारी च्या ‘सकाळ’मध्ये एका पाहणीचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. हेडलाईन म्हणते, ‘गप्पा पुरे, शहराच्या मूलभूत समस्या सोडवा.’ सर्व शहर एकाच दिशेने विचार करते आहे, हे यातून दिसते. त्यामुळे सर्व माननीय वक्त्त्यांनी खालील चार मुद्यांना धरून मांडणी करावी असे आवाहन करण्यात आले.

1. शहरासमोरचे विद्यमान प्रश्न, तसेच भविष्यात उभे राहू शकतील असे प्रश्न.

2. हे प्रश्न सोडविण्यात येणाऱ्या अडचणी.

3. या अडचणींचे निराकरण कसे करणार?

4. नागरिकांकडूनच्या अपेक्षा.

चार प्रतिस्पर्धी पक्षांचे उमेदवार समोरासमोर आल्यास शाब्दिक ठिणग्या पडू शकतील अशी रास्त भीती आम्हांला वाटत होती.  त्यामुळे एकमेकांची अथवा पक्षांची निंदा, अवहेलना कोणी करू नये असे आवाहन आम्ही केले होते.

हा कार्यक्रम खरे तर 26 जानेवारीस घ्यावा अशी आमची इच्छा होती, परंतु एकूण रागरंग बघता त्याआधी उमेदवार ठरणे शक्य नाही याचा आम्हांला अंदाज आला. वृत्तपत्रांत अधिकृत उमेदवारांची नावे प्रसिद्ध झाल्यावरच पुढील कामाला हात घालता आला. सारासार विचार करून 10 फेब्रुवारीच्या संध्याकाळची वेळ निश्चित करून उमेदवारांना भेटायला सुरुवात केली, कारण प्रचाराच्या धामधुीत ते वेळ काढू शकतील का, अशी आम्हांला शंका होती. सुदैवाने त्यांनी तयारी दर्शविली. त्यातून वादंग वाढू शकण्याची शंका एकाने जरूर व्यक्त केली, परंतु आम्ही आमच्या अपेक्षा त्यांच्या कानावर घातल्यावर त्यांचे समाधान झाले. यानंतर आमच्या वर उल्लेख केलेल्या अपेक्षा व्यक्त करणारे पत्र आम्ही प्रत्येकास पोहोच केले.

नागरिकांपैकी आम्ही ज्यांच्याशी बोललो त्या सर्वांना ही कल्पना आवडल्याचे दिसले. त्यामुळे एवढा मोठा कार्यक्रम चिंतामणीनगरपुरता मर्यादित न ठेवता आजूबाजूच्या वसाहतींमधील नागरिकांपर्यंत निमंत्रण पोहोचावे म्हणून आम्ही हँडबिले वाटली. नागरिकांचा प्रतिसाद आम्हांला फार मिळाला. प्रतिसाद जेवढा होता तेवढे नागरिक सभेला आले नाहीत, परंतु जेथे आम्ही पोहोचलो नव्हतो अशा ठिकाणांहून काही नागरिक सभेसाठी आल्याचे नंतर स्पष्ट झाले. समाजाच्या विविध आर्थिक स्तरांधील स्त्री-पुरुष कार्यक्रमास उपस्थित राहिले, याचा आम्हांला फार आनंद वाटतो. आम्हांला असे वाटते की, या स्वरूपाचा कार्यक्रम नागरिकांना हवाच होता. प्रचाराचे सध्या प्रचलित मार्ग म्हणजे रिक्षातून केली जाणारी आवाहने, उमेदवारांच्या पदयात्रा, पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या भाषणाच्या ध्वनिफिती इत्यादींपेक्षा उमेदवारांशी जिवंत संवाद लोकांना हवा होता असे आम्हांला वाटते.

प्रत्यक्ष भाषणांबद्दल काय?

शहराबद्दलचे आपले स्वप्न उमेदवारांनी मांडले नाही. चार उमेदवारांनी एकमेकांना कोपरखळ्या देणे टाळले. दोन उमेदवार तो संयम दाखवू शकले नाहीत. त्यामधून मग प्रत्युत्तरे देणे- अध्यक्षांच्या अधिकारांची तमा न बाळगता- असे प्रकार घडले. काहींनी ‘आम्ही प्रभागांबद्दलच बोलणार’ असे सांगून टाकले. एकाने प्रभागपद्धती हिताची नाही असे सांगून, नागरिकांनी त्याला विरोध करायला हवा होता असे सांगितले. बहुतेकांनी आपण कार्य केले आहे हे सांगितले. नगरसेवक म्हणून काम केलेल्या एका नगरसेवकाने मनपाचा वाढता आर्थिक पसारा आणि त्यासाठी उपयुक्त ठरलेली धोरणे हे अगदी थोडक्यात परंतु नेमकेपणे सांगितले. एकाने कचरा ही फार मोठी कठीण समस्या असल्याचे सांगितले. दोघांनी विद्यमान नगरसेवकाच्या कामावर टीका करण्यातच समाधान मानले. शहर, स्त्रियांसाठी, ज्येष्ठांसाठी सुरक्षित करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

आमची अपेक्षा होती तेवढ्या सौहार्दपूर्ण वातावरणात सभा पार पडू शकली नाही. मतदान जवळ आले असल्याने सर्वजण अटीतटीच्या मन:स्थितीत असावेत असे आम्हांला वाटते. हीच सभा आधी ठरविल्याप्रमाणे 26 जानेवारीला होऊ शकली असती तर सर्वजण आमच्या अपेक्षांच्या जवळ पोहोचू शकले असते असे आम्हांला वाटते.

प्रश्नोत्तरासाठी वेळ उरणार नाही, अशी आमची अटकळ होती. त्यात एकंदर प्रचाराच्या धामधुमीमुळे सर्वजण वेळेत पोहोचू शकले नाहीत. कार्यक्रम एक तास उशिरा चालू करावा लागला. त्यामुळे तर प्रश्नोत्तरे अशक्यच वाटत होती, परंतु उपस्थित श्रोत्यांपैकी काही जणांच्या आग्रहाखातर प्रश्न विचारण्यास परवानगी दिली. त्याबद्दलचा अनुभव असा की, जास्त करून लोक प्रश्न विचारण्याऐवजी भाषणेच करतात. त्यातून उमेदवारांचे समर्थक प्रतिस्पर्ध्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न करतात. हा अभिनिवेश एकूण धुरळा उडविणारा ठरतो. एका ज्येष्ठ महिलेने या कारकीर्दीबद्दल नाराजी व्यक्त करून बेरजेचे राजकारण करण्याची सर्व उमेदवारांना सूचना केली. काही प्रश्न मात्र सर्वांना उपयोगी पडावेत असे होते. एका प्रश्नावरून बचतगटांची उत्पादने विक्री करण्यासाठी जागेची आवश्यकता अधोरेखित झाली आणि सर्व उमेदवारांनी त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. महिलांसाठी स्वच्छतागृहे हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्याबद्दल आणि झोपडपट्टी निर्मूलन योजनेबाबत बोलताना एका अनुभवी नगरसेवकाचा सूज्ञपणा चांगला नजरेस आला. घर मोठे मिळू शकले नाही तरी घरात स्वच्छतागृह मिळण्याचे महत्त्व त्याने सांगितले. स्त्रियांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांबाबत ते कुठे असावे, सुरक्षिततेची गरज हे मुद्दे त्यांनी मांडले. त्यामधून त्यांची प्रश्नाबद्दलची जाण चांगली दिसली. एका विद्यमान नगरसेवकाच्या कार्यक्षेत्रातील झोपडपट्टीमधील रस्ते अडविणाऱ्या बांधकामाविषयी प्रश्न उपस्थित केला गेला. हा प्रश्न आणि उत्तर फार उद्‌बोधक होते. नगरसेकाने प्रांजळपणे सांगितले की, त्याला निवडून यायचे आहे. वर उल्लेखिलेल्या अडथळ्यांबाबत जर त्याने काही केले तर लोक त्याला मते देणार नाहीत. या उत्तरामधून जशी जनतेची सुप्त शक्ती जाणवली तसेच जनतेधील विस्कळीतपणा, स्वत:पुरते पाहण्याची वृत्ती यांचे दर्शन घडले. आमच्या हातून एक लक्षात घेण्यासारखा प्रयोग घडला असे आम्हांस वाटते. म्हणून सर्वांच्या उपयोगासाठी तो सर्वांसमोर सविस्तरपणे मांडण्याचा खटाटोप केला आहे.

नेता आणि जनता दोहोंमध्ये संवादाची गरज आहे. नागरिकांनी नागरिक संघटनांच्या माध्यमातून असा संवाद होत राहील हे बघितले पाहिजे.

Tags: सडक पानी बिजली प्रयोग हेमंत गोळे नगरसेवक nagarsevak weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

हेमंत गोळे
hemantgole1@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके