डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विज्ञान ही केवळ काही बुद्धिमान लोकांना समजावी आणि त्यांनीच विकसित करायची ज्ञानशाखा आहे असा व्यापक गैरसमज आपल्याकडे आहे. तसेच भारतीय विज्ञान तेवढेच खरे आणि उपयुक्त. पाश्चात्त्य विज्ञान हे माणसांना गुलाम बनवणारे व संहारक वृत्तीचे म्हणून ते त्याज्य, हा आणखी एक विचारप्रवाह. लोकविज्ञानाचा पुरस्कार करणारे हेमू अधिकारी या विषयाचे अनेक पैलू दरमहाच्या आपल्या लेखातून उलगडत जातील.

दर वर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस ‘विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे (डिपार्टमेंट ऑफ सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी-डीएसटी) या दिवशी समाजाच्या विविध घटकांकरता विशेषतः विद्यार्थ्यांकरिता.. विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. विज्ञानाशी संबंधित सरकारच्या अन्य मंत्रालयांतर्फेदेखील असेच कार्यक्रम होतात. अणुशक्ती विभागातर्फे देशभरच्या अणुशक्ती केंद्रांना विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या आणि सर्वसाधारण नागरिकांच्या भेटी आयोजित केल्या जातात. या भेटींमधून भाभा अणुसंशोधन केंद्रासारख्या विख्यात संशोधन संस्थांमधून चालणारे संशोधन व त्याचा प्रत्यक्ष समाजाला होणारा उपयोग याची माहिती नागरिकांना दिली जाते. देशातील वैज्ञानिक प्रगतीचे हे दृश्य स्वरूप पाहून विद्यार्थ्यांपासून शिक्षक-नागरिकांपर्यंत सर्वच थक्क होताना मी पाहिले आहेत.

या प्रगतीमधील खरी किती आणि तथाकथित किती, किंवा या संशोधनाचा लोकांचे जीवनमान वाढवण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग वास्तवात किती प्रमाणात होतो आहे हे प्रश्न-उपप्रश्न बाजूला ठेवून पाहिले तर लोकांपर्यंत विज्ञान नेण्याच्या शासकीय प्रयत्नांचा एक भाग म्हणून अशा उपक्रमांचे मर्यादित महत्त्व मान्य करायला हरकत नाही. प्रश्न असा आहे की ही विज्ञानविषयक माहिती लोकांपर्यंत नेऊन पोचवण्यापर्यंतच या उपक्रमांची मर्यादा असते. या (घातल्या गेलेल्या) मर्यादेमुळे विज्ञानाबद्दल जी जाणीव लोकांच्या मनात तयार होते ती एकांगी आणि विज्ञानाचे मानवी व्यवहारांतले महत्त्व समजण्यासाठी अपुरी असते.

ज्ञानशाखेचा गाभा

मुळात, विज्ञान ही केवळ काही बुद्धिमान लोकांना समजणारी आणि त्यांनीच विकसित करावयाची ज्ञानाची शाखा आहे अशी सर्वसाधारण समजूत आपल्या समाजात व्यापक प्रमाणात आढळते. त्यामुळे पांढरा कोट घालून प्रयोगशाळेत काम करणाऱ्या आणि आपल्या संशोधनाच्या विश्वातच रमणाऱ्या वैज्ञानिकांबद्दल लोकांना कुतूहलमिश्रित भय वाटत असते. वर उल्लेख केलेल्या माहिती पोचवण्याच्या उपक्रमांतून त्यांचे मर्यादित महत्त्व मान्य करूनही सर्वसामान्यांच्या मनातील विज्ञानाबाबतची हीच जाणीव घट्ट व्हायला मदत होते.

विज्ञान ही ज्ञानाची एक शाखा आहे हे खरेच, पण हे ज्ञान मिळवण्याची, ते पारखून घेण्याची आणि त्यातून चिकित्सापूर्वक झालेले निष्कर्ष स्वीकारण्याची विज्ञानाची पद्धत हा या ज्ञानशाखेचा गाभा आहे याकडे सोयीस्करपणे, वर्षानुवर्षे, आपण दुर्लक्ष करतो आहोत. या विज्ञानाच्या पद्धतीचे सामान्य माणसाच्या दृष्टीने महत्त्व कसे आणि कोणते आहे ते समजले नाही तर विज्ञान ही बुद्धिमान लोकांना समजणारी ज्ञानशाखा आहे असा समज हढ होणारच. म्हणून आपल्या नित्याच्या सामाजिक व्यवहारात वैज्ञानिक पद्धतीचे महत्त्व लोकांना समजावून सांगणे जरुरीचे आहे. विज्ञान विकासाचा इतिहास हे महत्त्व समजावून सांगण्यासाठी विज्ञानाच्या विकासाचा इतिहास सांगणे ही एक परिणामकारक पद्धत आहे, असा माझा अनुभव आहे.

विज्ञान म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र- अशा विविध शाखांमधून एकत्र केलेले ज्ञान- या पारंपरिक कल्पनेला छेद देण्यासाठी आपल्याला आदिमानवापासून सुरुवात करायला लागते. आणि विज्ञान किती जुने आहे हा प्रश्न विचारावा लागतो. या प्रश्नाचे सामान्यपणे दिले जाणारे उत्तर म्हणजे चारशे वर्षे. सतराव्या शतकाच्या मध्याला गॅलिलिओने ‘पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरते,’ हा प्रस्थापित ज्ञानाला उखडून टाकणारा आपला सिद्धान्त मांडला आणि तेव्हापासून विज्ञानाची सुरुवात झाली असे या उत्तरात गृहीत घरलेले आहे. 'विज्ञान' या विषयाखाली जे ज्ञान आज शाळा-कॉलेजांतून शिकवले जाते आणि पुस्तकांतून ग्रथित केलेले आहे त्या आधुनिक विज्ञानाची सुरुवात साडेतीनशे वर्षांपूर्वी झाली हे खरे आहे. पण याआधी हजारो वर्षांपूर्वीपासून माणूस विज्ञान करतो आहे... अगदी आदिमानवाच्या अवस्थेत असल्यापासून याचे असंख्य पुरावे जागोजाग विखुरलेले आहेत. त्यांच्याकडे पाहायची आपली इच्छा आणि तयारी हवी.

एक साधे उदाहरण घेऊ. प्राथमिक अवस्थेतल्या गुहेत राहणाऱ्या आणि अन्न गोळा करून, शिकार करून जगणाऱ्या माणसाने दगडांची हत्यारे तयार केली हे सर्वज्ञात आहे. तीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या उपयोगांसाठी... प्राण्यांची शिकार करण्यासाठी एक, मेलेल्या जनावरांचे कातडे सोलून काढण्यासाठी दुसरे, गवत कापण्यासाठी तिसरे- अशी अनेक आणि हे सगळी हत्यारे करण्यासाठी त्याच्या हाती असलेले हत्यार म्हणजे दगडच. एका दगडाचा हत्यारासारखा उपयोग करून दुसऱ्या दगडापासून हवे असलेले हत्यार तयार करायचे तर त्यासाठी त्याने आपल्या निरीक्षणांतून आणि अनुभवांतून दगडांच्या गुणधर्माविषयी आणि वैशिष्ट्यांविषयी काही अंदाज केले असणार, काही निष्कर्ष काढले असणार, त्यांतून दगडांचा कठीणपणा, ठिसूळपणा, धारदारपणा यांविषयी त्याचे अंदाज वापरून दगडांची निवड त्याने केली असणार.

हे विज्ञान नाही तर काय आहे? हे सारे करण्यासाठी त्याने जी पद्धत वापरली ती त्या काळच्या त्याच्या आकलनशक्तीचा विचार केला तर विज्ञानाचीच पद्धत होती. अर्थात माणसाने त्या काळी वापरलेली पद्धत ही त्याच्या अनुभवांवर आधारलेली होती. त्या अर्थाने हे अनुभवजन्य विज्ञान होते. आधुनिक विज्ञानात ज्या पद्धतीचा वापर केला जातो...निरीक्षण-प्रश्न-अनुमान-प्रयोग-निष्कर्ष. ती पद्धत जशीच्या तशी प्राथमिक अवस्थेतल्या माणसाने वापरली नाही हे उघडच आहे. तो (बहुधा) निरीक्षण-अनुभव- अंदाज- ठोकताळे- चाचण्या या मार्गाने गेला असणार (ट्रायल अॅन्ड एरर). तरीसुद्धा या अनुभवजन्य विज्ञानासाठी प्राथमिक अवस्थेतल्या माणसाने वापरलेली पद्धत आणि गॅलिलिओने गुरूला उपग्रह आहेत हे मांडण्यासाठी वापरलेली पद्धत किंवा आज सुसज्ज प्रयोगशाळेत आधुनिक आनुवंशशास्त्रात संशोधन करणारा वैज्ञानिक वापरत असलेली पद्धत... यांत एक सातत्य आहे, कंटिन्यूटी आहे यात अजिबात संदेह नाही आणि या सातत्यामुळेच विज्ञानाला वैश्विक स्वरूप आले आहे.

विज्ञानाची अयोग्य विभागणी 

वैज्ञानिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक वैज्ञानिकांना हे सातत्य मान्य नाही. गॅलिलिओपूर्वीचे सारेच विज्ञान.... आदिमानवापासून ते प्राचीन विज्ञानापर्यंत.. आणि गॅलिलिओनंतरचे आधुनिक विज्ञान अशी विभागणी ते करतात. पूर्वीचे विज्ञान हे अनुभवजन्य, निरीक्षणावर आधारलेले विज्ञान आहे आणि म्हणून 'विज्ञान' या संज्ञेला ते पात्र नाही. याउलट आधुनिक विज्ञान हे प्रयोगांवर आधारलेले, प्रयोजनविज्ञान आहे आणि म्हणून तेच (तेवढे) विज्ञान या संज्ञेला प्राप्त आहे, अशीही मांडणी आहे. परंतु ही मांडणी संपूर्णपणे बरोबर नाही.

एकतर आधुनिक विज्ञानाच्या पूर्वी जे जे विज्ञान झाले ते केवळ निरीक्षणात्मक किंवा अनुभवजन्य होते आणि त्यात प्रयोग केलेच नाहीत असे म्हणणे फारच धाष्ट्‌र्याचे ठरेल. वर उल्लेख केलेले दगडांच्या हत्याराचे उदाहरण जरी घेतले तरी त्यात हत्यारे तयार करण्यासाठी वापरलेल्या दगडांची त्या त्या विशिष्ट उपयोगासाठी योग्यायोग्यता किंवा प्रतवारी ठरवणे, काही एक दगड तपासून पाहून आणि त्यांच्या चाचण्या घेऊन (वैज्ञानिक परिभाषेत प्रयोग करून) नंतर ठरवणे माणसाला शक्य झाले असणार. नंतरच्या विज्ञानाच्या प्रत्येक टप्प्याकडे आपण अभ्यासपूर्वक पाहिले तर अग्नीचा उपयोग, चाकाचा शोध किंवा शेतीचे तंत्र या सगळ्या शोधांच्या उपयोगापाठीमागे काही-एक प्रयोगांचा आधार असल्याशिवाय या गोष्टी विकसित करणे माणसाला शक्य झालेले नाही.

दुसरीकडे गोष्ट अशी की आज आपण ज्याला आधुनिक विज्ञान म्हणतो त्यांतल्या काही शाखांमधून चालणारे संशोधन हे निरीक्षणात्मकच आहे. उदाहरणार्थ, खगोलशास्त्रामधील संशोधन आणि त्यातून येणारे निष्कर्ष हे प्रामुख्याने निरीक्षणांवरच आधारलेले आहेत. आधुनिक आनुवंशशास्त्राच्या क्षेत्रात (जेनेटिक्स) पेशींच्या केंद्रकांत असलेली गुणसूत्रे वेगळी करून त्यामधील जनुकांचे कार्य आज चाललेले तपासण्याचे संशोधन हेदेखील बऱ्याच अंशी निरीक्षणात्मकच आहे. तेव्हा अनुभवजन्य विज्ञान आणि प्रयोगजन्य विज्ञान अशी विभागणी करून प्रयोगजन्य तेच तेवढे विज्ञान, अशी मांडणी करणे हे मुळातच बरोबर नाही. 

लोकविज्ञानाकडे दुर्लक्ष 

परंतु या मांडणीमुळे होणारा आणखी एक परिणाम म्हणजे या मांडणीतून पुढे येणारी एक विचारसरणी. ही विचारसरणी आधुनिक विज्ञान तेवढेच विज्ञान असे मानून थांबत नाही, तर अनुभवजन्य विज्ञानामुळे काहीशा तुच्छतेने पाहण्याची वृत्ती जोपासते. वास्तविक पाहता लोकांनी आपल्या अनुभवांतून आणि हजारो वर्षांच्या निरीक्षणातून अनेक उपयुक्त तंत्रे तयार केली आहेत. आपल्या देशात तर असा लोकविज्ञानाचा साठा प्रचंड आहे. उदाहरणार्थ, शेतीच्या क्षेत्रात विविध प्रकारच्या जमिनीचा कस, त्यांत येणारी पिके, त्यांना लागणारी पाण्याची मात्रा यांविषयी भारतीय शेतकऱ्यांचे ज्ञान पूर्वापार चालत आले आहे.

शेतीसाठी आजही वापरात आलेल्या काही तंत्रांचा उगम शेकडो वर्षांपूर्वी झाला आहे. शेतीप्रमाणेच लोहारकाम, सुतारकाम किंवा अगदी स्वयंपाकदेखील या सर्व क्षेत्रांमध्ये वर्षानुवर्षे लोकांमध्ये रुजलेली तंत्रे आहेत. भारतात हिंडताना स्थानिक औषधी आणि खाण्यायोग्य वनस्पतींचे ज्ञान असलेले अनेक आदिवासी, खेडूत, ग्रामीण लोक भेटतात. त्यांचे हे परंपरागत ज्ञान पाहून अनेक वेळा आपल्याला थक्क व्हायला होते. असा हा प्रचंड लोकांमध्ये असलेल्या विज्ञानाचा साठा आहे. तो नाकारून आणि त्यांच्याबद्दल तुच्छता बाळगून आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा बडेजाव माजवण्याच्या वृत्तीचा प्रभाव आपल्या आजच्या विकासाच्या आराखड्यावर पडलेला आहे. त्यामुळेच आपल्या विकासप्रकल्पात, लोकांमध्ये प्रचलित असलेल्या तंत्रज्ञानाचा विकास आधुनिक विज्ञानाची जोड देऊन कसा करता येईल याचा विचार करण्याऐवजी लोकांची पारंपरिक उपजीविकेची साधने विकासाच्या नावाखाली नष्ट केली जातात आणि विकास प्रकल्पांतून निर्माण होणारी उपजीविकेची नवी साधने (उदाहरणार्थ, रोजगार) मात्र मूठभरांच्यापुरती- तीही औपचारिक शिक्षणातून तंत्रकौशल्य प्राप्त केलेल्या लोकांपुरतीच मर्यादित राहतात. वर पुन्हा हे सारे करताना, 'पहा, आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाची ही गंगा आता तुमच्या दारात आम्ही आणतो आहोत. आता वेगाने भरभराट होते की नाही पहा' असा आविर्भाव असतो.

प्रत्यक्षात मात्र जिथे विकासप्रकल्प उभे राहतात तिथल्या लोकांच्या जमिनी आणि अन्य उपजीविकेची साधने हिरावून घेऊन त्यांना नव्या व्यवस्थेतला त्यांचा वाटा नाकारून उपजीविकेसाठी शहरांकडे वळावे लागते आणि शहरांतल्या झोपडपट्ट्यांतून जनावरांपेक्षाही वाईट जीवन कंठावे लागते. या विकासाच्या आराखड्याला छेद द्यायचा असेल तर स्थानिक पातळीवर लोकांची जीवनपद्धती, त्यांची उपजीविकेची साधने, त्यांचे भौतिक सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरण यांविषयी आदर आणि आस्था बाळगून लोकांमध्ये असलेल्या ज्ञानाची उपेक्षा आणि हेटाळणी न करता विकासाचा आराखडा आखावा लागेल. हे सारे करण्यासाठी लोकविज्ञानाचे मर्म आणि महत्त्व समजून घेण्याची मानसिकता राज्यकर्त्यांमध्ये आणि धोरणे ठरवणाऱ्यांमध्ये असणे आवश्यक आहे.

आजच्या राज्यकर्त्यांमध्ये ती नाही हे स्पष्टच आहे. या सगळ्या प्रश्नाला दुसरीही एक बाजू आहे. भारतीय विज्ञान आणि पाश्चिमात्य विज्ञान, अशी विभागणी करून भारतीय विज्ञान तेवढे खरे आणि उपयुक्त आणि आधुनिक विज्ञान म्हणजे पाश्चिमात्य विज्ञान, हे मूलतः हुकूमशाही प्रवृत्तीचे माणसांना गुलाम बनवणारे आणि संहारक वृत्तीचे म्हणून ते त्याज्य- हा एक विचारप्रवाह ही ती दुसरी बाजू. त्याविषयी नंतर केव्हा तरी.

Tags: उपयुक्त-अनुपयुक्त विज्ञान विभागणी लोकविज्ञान विज्ञान वैचारिक useful-unuseful diversification of science folklore science ideological weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके