मित्रांनो, गेल्या अंकात आपण या कादंबरीचे तिसरे प्रकरण वाचले. चौथे पाचवे तितकेच सुंदर प्रकरण वाचू या तर :
दुसरे दिवशी सकाळी मी जरा धाबरून गेलो होतो.कसली तरी भीती वाटायला लागली होती. आई जवळ असायला हवी असं सारखं वाटायचं. एवढ्यात मला नेण्यासाठी स्ट्रेचर आणले व उचलून मला त्या उंच ऑपरेशन टेबलावर ठेवलं देखील!
लगेच रॉबर्टसन् हसत हसतच आत आले. आपल्या हाताची बोटे चोळून चोळून ते जणू मसाजच करत होते. एकीकडे माझ्याकडे बघून हसतही होते. तेवढ्यात एक-करड्या रंगाच्या केसाचे डॉ. क्लार्क आत आले. त्यांचे ओठ अगदी घट्ट आवळून धरल्यासारखे दिसत होते. 'काय म्युनिसिपालिटीची माणसं आहेत बुवा, अजून आमच्या फाटकाशी असलेला खड्डा काही त्यांनी भरून काढला नाही. अलीकडं कुणाच्या शब्दावर विश्वास म्हणून ठेवता येत नाही.' असं म्हणत त्यांनी गाऊन अंगावर चढवला. 'सिस्टर, हा गाऊन मोठा आहे का? नव्हे, माझाच दिसतोय. ठीक आहे, चला-'असं स्वतःशीच बोलत ते ऑपरेशन टेबलाच्या जवळ आले.
मी वरती नुसता छताकडे बघत पडलो होतो. मलाही आमच्या दारातल्या खड्डयांत पाणी साठून डबकं कसं व्हायचं, मी त्याच्यावर उडी मारून कसा जा-ये करायचो, मेरीला ती उडी मारणं मुळीच जमत नसे, मी कोणत्याही डबक्यावरून मोठ्ठी उडी मारत असे-हयाची आठवण झाली.
डॉ. क्लार्कनी माझ्या नाकावर एक फुग्यासारखी पांढरी टोपी घातली. डॉ. रॉबर्टसन्नी खूण करताच त्यांनी टोपीच्या पॅडवर निळ्या बाटलीतल औषध ओतून घेतलं. मी श्वास घेताच इकडे-तिकडे मान वळवून ती टोपी काढा, नको मला असं सांगण्याचा प्रयत्न करत होतो. डॉ. माझे नाक सोडत नव्हते. तो श्वास घेणं जास्तच जड जातंय असं वाटलं. मला रंगीत दिवे दिसायला लागले. मी त्याच्यावर तरंगत तरंगत वरती जातोय-अगदी वर, मग दिव्यांचेच ढग झाले. मी हलका होऊन वरच जातोय. पुन्हा अंधार झालाय. त्या अंधारातून बाहेर पडण्यासाठी मी खटपट करत होतो. डोळे किलकिले केले, सिस्टर् समोर दिसली. 'हं, आता अगदी मुळीच हलू नकोस, अस्साच रहा. हे प्लॅस्टर अजून ओलं आहे बरं का,' असं तिनं बजावलं.
पायाचा जडपणा जाणवायला लागला. दगडासारखा टणक प्लॅस्टरचा थर माझ्या कंबरेभोवती गुंडाळल्याचे माझ्या लक्षात आले. स्वस्थ पडून रहा. अगदी मी एका मिनिटात बाहेर जाऊन येते. नर्स, हयाच्यावर लक्ष ठेव वरं' असं सांगून सिस्टर बाहेर गेली.
'कसं वाटतंय् अॅलन?' नर्स कोनार्डने मला विचारलं. 'हलू नकोस हं' कोनार्ड नर्स नेहमी असंच गोड आवाजात बोलायची. मला तिचे गुबरे गुलाबी गाल आणि चकाकणारे डोळे, त्या जाड भुवया आवडायच्या, पण तिला हे सांगायची मला लाज वाटत असे. ती पुनःपुन्हा हलू नकोस असं बजावत होती.
मला वाटतं, माझी टाच जरा हललीय, मिस् कोनार्ड, मी म्हणालो. हलवू नकोस, हलवू नकोस. ह्या त्यांच्या सारख्या सांगण्यामुळे मला माझा पाय हलतो की मुळी हालतच नाही, हे हळूच बघावसं वाटायचं. त्याशिवाय माझ्या मनाचं समाधान होईना.
जेवणाच्या वेळेपर्यंत मी त्या ऑपरेशन् टेबलावरच होतो. मला मग हळूच ट्रॉलीवरून नेऊन बिछान्यावर ठेवलं. 'कसं वाटतंय् रे अॅलन्?' अंगसनी विचारलं. 'फार दुखला रे माझा पाय, मी एकटाच होतो-' म्हणतच मी रडायला लागलो.
'थांबेल हं दुखायचं' म्हणून अंगस्नी माशी समजूत घातली. पण दुखायचं थांबलं नाही. मी हळूच पाय हालवून पाहिला असावा, प्लॅस्टर मऊ होतं तेव्हा. पुनः चमक आली. मी तो पहिल्यासारखा करूच शकलो नाही. माझ्या कंबरेच्या हालचालीमुळे आतलं बँडेज व प्लॅस्टर हाललं की काय! आला ते मला चाकूसारखं आत कमरेच्या हाडाला टोचायला लागलं होतं. नंतरच्या दोन आठवड्यांत ती टोचणी घुसत घुसत माझ्या मांसातून आत जाऊन अगदी हाडाला लागलीय असं वाटायचं. कंबरेजवळचं प्लॅस्टर जरा सैल करून मी किचित् कुशीवर वळू शकलो तेव्हा मला जरा बरं वाटलं. दुखण्याची कळ जरा थांबली की मला डुलकी लागे, तेवढ्या वेळात मला ऑपरेशन, ह्या वेदना, जडपणा अशी दुःखे सोसत असल्याचीच स्वप्ने पडत.
डॉ. रॉबर्टसन्ना नक्की माझे कुठे, कसे दुखतेय हे समजत नव्हते म्हणून ते पुनः पुन्हा 'तुझा पाय, की हे पाऊल दुखतेय् रे?' असे विचारायचे.
'सगळेच दुखतेय हो, ते थांबतच नाही दुखायचे.'
'हा गुडघा दुखत असेल!' ते मेट्रन्कडे बघून म्हणाले.
'काय रे, तुझी कंबरही दुखते का?' त्यांनी माझ्याकडे बघून विचारले.
मी हललो जरा, तर दुखते.' मी म्हणालो-त्यांनी ते प्लॅस्टर थोडे वर सरकविले.
"ओ ss ओss दुखतेय् ना,' मी ओरडलोच.
'ह-बरे, बरे,' डॉक्टर निघून गेले.
★ 5 ★
ऑपरेशनला एक आठवडा झाला. मी अगदी जखडून पडलो होतो. पार वैतागून गेलो. मला जास्त जास्त रडू यायचे. कधी कधी वरच्या छताकडे बघून, खिडकीतून आकाशाच्या तुकड्याकडे डोळे लावून बसायचो, पाणी भरल्या डोळ्यांनी उंच छताकडे बघत. मी मेलो असतो तर बरे झाले असते! तसा मृत्यू म्हणजे, मी अजिबात जायला नको-पण दुःख विसरण्याइतकी गाढ झोप लागावी, आणि पुनः पुनः मी अगदी, मेलो तर बरे, असे एकसुरात म्हणत होतो. डोके सारखे हलवत ते म्हणण्याचा एक तालच मी धरला. त्या म्हणण्याच्या तालात, ती मान सारखी हलवण्यात माझी तंद्री लागायची, त्यामुळेच माझे पाय दुखण्यावरचे लक्ष कमी होतेय हे माझ्या लक्षात आले. मग वरचे छत हळुहळू भुरकट होऊ लागे. कॉटला पंख लागलेत, मी वर जातोय असे वाटे. मी रात्री झोप येण्यासाठी हाच उपाय, असेच म्हणण्याचा ताल धरायचा व मान हालवत राह्यचा. केव्हा केव्हा दिवसा पण दुःख सहन होईनासे झाले की, 'मी मेलो असतो तर....!' नर्सेस वॉर्डच्या बाहेर होत्या. अँगसने ते माझे विव्हळणे ऐकले.
'असे काय करतोस रे अॅलन' त्यांनी विचारले.
' असे केले की दुखणे थांबते! गुंगी लागते.' मी म्हणालो,
त्याचा पाय खूपच दुखत असला पाहिजे. एरवी तो असे बडबडायचा नाही' तो नर्सला सांगत होता.
त्या रात्री सिस्टरने मला इंजेक्यान दिले. मी स्वस्थ झोपलो.' दुसऱ्या दिवशी पण तसे दुखणे थांबले नव्हतेच. नर्स मला रोजच गोळी द्यायला लागली. आता झोप स्वस्थ,' सांगून जायची.पण छे-वेदना तर वाढायलाच लागल्या. त्या कापलेल्या प्लॅस्टरच्या आत चांगले गळू तयार होत होते. त्याचा चांगलाच ठणका सुरू झाला. मी स्फुदून स्फुदून रडायला लागलो. विव्हळायला लागलो. अंगस ते सगळे पहात होता. त्याने ओरडून नर्सला बोलावले. तिने चादर बदलली. मग गड-बडीने आत गेली. थोड्याच वेळात डॉक्टर, मेट्रन, सिस्टर, सगळेच माझ्या कॉटभोवती जमले. डॉक्टरनी प्लॅस्टर काढायला सुरुवात केलेली मला आठवतेय- देवा-आग होतीय ही पायाची, दुखतेय, बाप रे, देवा-देवा, आई, आई-असे म्हणतच मला झोप लागली, का ग्लानी आली कोण जाणे. मी, आई-बाबा त्या आठवड्यात येणार होते हे विसरून गेलो. मी वॉर्डमध्येच आहे असे जाग आल्यावर मला कळाले. अॅगसच्या वेडवर दुसराच पेशंट निजलेला दिसला. अँगसनी माझ्या कपाटावर तीन अंडी व अर्धी बाटली लोणच्याची ठेवली होती. मला तो गेल्याने कसेसेच झाले.
माझा पाय आता प्लॅस्टर काढून स्प्लिन्टमध्ये होता. दुखणे एकदम थांबले, पण हाड जुळून येण्याची क्रिया अगदीच हळू होत असावी. 'त्याच्या पायात रक्ताभिसरण व्हावे तसे होत नाही,' डॉ. रॉबर्टसन मेट्रनबाईना म्हटल्याचे मी ऐकले. 'अगदी फिक्कट दिसतोय चेहरा, तेव्हा त्याला व्हीलचेअरवर बसवून जरा उन्हात बसायला पाठवा-' त्यांनी मेट्रनला सांगितले. सिस्टरनी मला मग हलकेच खुर्चीत बसवले, पण पाय त्या लाकडीपट्टीपर्यंत पोचत नव्हते. पाय उगीचच मध्ये लोंबकळल्यासारखे राहयचे, पण माझे हात बळकट आहेत. दरवाजातून बाहेर बागेत येताच तो सूर्यकिरणांचा प्रचंड झोत अगदी हातात कवटाळून घ्यावा असे वाटले. मी खुर्चीत आणखीच ताठ बसलो. त्या पिवळ्या निळसर सूर्य-किरणांकडे तोंड केले. माझ्या चेहऱ्यावर येणारी ती गार मंद वाऱ्याची झुळूक. पाणबुड्याला समुद्रातून वर येताना कसे वाटत असेल, तस्से वाटले! जवळ जवळ तीन महिने मी ढग, आकाश, सूर्यकिरण काहीच पाहयले नव्हते. पूर्वी असे नव्हतेच, इतके मी ते विसरून गेलो होतो. आता मला ते सर्व नवे नवे आणि कसे छान वाटले! सिस्टरनी माझी खुर्ची एका शिऑकच्या झाडाखाली आणून ठेवली. तसा वारा मुळीच नव्हता. पण झाडांच्या फांद्या काही तरी कुजबुजताहेत असे मला ऐकू येत होते. हो, नाही तरी झाडे एकमेकांशी बोलतात असे बाबा म्हणतात. मी बरेच दिवसांनी ते निसर्गसौंदर्य पहात होतो. इतके दिवस हे सारे कुठे दडले होते? फी आता सारे बदलले की काय, हयाचे मी आश्चर्य करीत होतो. कुंपणाच्या पलीकडे रस्त्यावरून दुडकत जाणारा एक कुत्रा मला निरखून पहावासा वाटत होता. असा कुत्रा पूर्वी पाहयल्याचे मला आठवेचना.
माझी खुर्ची खडबडीत जाड वाळूवर रोवून ठेवली होती. त्या प्रत्येक दगडाला रंग होता! किती तरी लहान मोठे वाळूचे गोटे, लाखोंनी होते म्हणायला हरकत नाही. कुठून कुठून आले होते देव जाणे! काही चुकून गवतावर पडून त्यांच्याभोवती हिरवळीची जणू लेस झाली होती. गम्च्या झाडाची पाने सळसळली आणि सूर्यतेजाची माणके इतकी चकाकली की माझे डोळे पार दिपून गेले. पुनः हळूहळू डोळे उघडून पाहयला लागलो तर सूर्यकिरणांनी मला आता अगदी कवेत कवटाळून घेतल्यासारखे वाटले.
मी खुर्ची ढकलता येते का, चाके फिरवता येतात का. हे पाहयला लागलो. बाजूचा खळगा चांगलाच खोल होता. शेजारच्या रस्त्यावर नुसते दगड टाकले होते.
तेवढ्यात एक मुलगा कंपौंडच्या तारेवर हातातली काठी वाजवत आला. त्याच्या मागून एक पिंग्या रंगाचा कुत्रा पण येत होता. मला दोघेजण आवडले. त्याचे नाव जॉर्ज. त्याची आई हॉस्पिटलमध्ये येतांना रोज त्याला बरोबर घेऊन येई. जातांना तो मला कॉमिक्स, सिगरेटच्या पाकिटावरची चित्रे देऊ लागला. त्याला पाहून मला आनंद झाला. 'कसे काय,जॉर्ज?' म्हणून मी त्याला हाक मारली.
"छान आहे रे, पण मला आईने सरळ घरी यायला सांगितलेय!' तो म्हणाला.
‘अस्से?' मी मोठ्या निराशेने म्हणालो.
'पण हे बघ! माझ्याजवळ पुष्कळ लॉलीज् आहेत, गोळ्या आहेत. तू कुंपणापर्यंत येतोस का? मी तुला देतो.' त्याने विचारले. मी थोडावेळ खुर्चीशी धडपड केली. पण-
'नाही रे, मला चालता येणार नाही. ते माझा पाय नीट करताहेत अजून' मी ओरडून त्याला सांगितले.
"बरे मी इथून बरोबर फेकतो हं.' आणि तो क्रिकेट-सारखा बॉल फेकण्यासाठी आधी मागे गेला. पळत पळत येऊन तो लॉलीची बॅग माझ्याकडे म्हणजे स्टम्प्स्कडे बरोबर टाकणार होता. एवढ्यात त्याला त्याची ममी येताना दिसली वाटते आणि त्याचा नेम थोडा चुकला. 'घसरलारे बॉल हातातून ' तो क्रिकेटीअरसारखा म्हणाला. स्वतःवरच चिडला, मोठ्याने म्हणाला,
'छे:! एखाद्या पोरीने बरोबर टाकला असता! छट्! ' लॉलीची ती बॅग माझ्यापासून दूर आठ एक यार्डावर लांब पडली.
'आत येऊन देशील का रे जॉर्ज? ' मी काकुळतीनेच विचारले.
'नाही रे, आई हाक मारतीय बघ. तिथेच पडू दे, मी उद्या आल्यावर तुला देईन. अच्छा टाऽटा!' म्हणून तो गेलादेखील.
मी लॉलीकडे बघत राहचलो. काय करावे, कसे तिथपर्यंत जावे? ती लॉलीची चव मला स्वस्थ बसू देईना. एकदा कुणाचा घोडा जरा वेळ धरून उभे राहाण्याबद्दल मला एक पेनी मिळाली होती. मी धावत धावत लॉलीच्या दुकानात गेलो. हरत-हेच्या गोळ्या, चॉकलेट्स, साखरकांड्या, खोकल्याच्या वड्या, म्हातारीचे केस जिरे बडीशोपेच्या बारीक गोळ्या, आईस्फूट-एक ना दोन इतके प्रकार पाहून मला काय घ्यावे अशी पंचाईत पडली.
आता मला बॅग भरून लॉलीज् मिळाल्या होत्या! पण मरोत ते पाय! म्हणून मी पुनः चाके फिरवायला लागलो. व्हीलचेअर मी एकाच बाजूने जोर केल्याने कलंडलीच. माझ्या स्प्लिटरला रस्त्याची कडा लागली, आणि पायाकडून एक जोराची कळ आली. लॉलीज आणायच्या नादात माझे कलंकेट, उशी, कॉमिक्स सगळे तिथेच पडले. जेव्हा त्या लॉलीजच्या कागदी पिशवीला हात घातला तेव्हा इतका आनंद झाला मला! पुनः मी पाठीवर पडलो न् वरती झाडाकडे पहात एक लॉली तोंडात टाकली. अरे, हयाच्यावर I love you' पण लिहिलेय!
खूप खूप आनंद झाला मला आणि नसं माझ्याजवळ केव्हा येऊन उभी राह्यली, कळलेही नाही. मला वॉर्डमध्ये आणल्यावर मेट्रन माझ्या बिछान्याजवळ उभी! प्रश्नांचा मारा केला तिने, ' का पण तू असे केलेस?'
'मला लॉलीज्ची बॅग घ्यायची होती' मी म्हणालो.
'अरे, नर्सला बोलवायचे होतेस,' सिस्टर म्हणाल्या.
"मला स्वतःला जाऊन आणायचे होते पॅकेट' मी म्हणताच ' कसा मुलगा आहेस-काही समजत नाही बाबा, म्हणून तक्रार करीत ती निघून गेली.
मी बाबा आल्यावर त्यांना हे सर्व सांगितले. तसे ते लगेच म्हणाले, 'मी पण नर्सला बोलावले नसते. तिने पाकीट आणून दिले असते अरे, पण छेः त्यात आनंद मिळाला नसता! हो पण अॅलन, लॉलीसाठी पुनः अशी धडपड करू नकोस, धडपड करायचीच आहे तर ती काही मोठे मिळवण्यासाठी कर!' नंतर काही आठवडे नर्स, सिस्टर मी व्हीलचेअरमध्ये असलो तरी लक्ष ठेवीत.
एक दिवस डॉक्टर एक कुबड्यांची जोडी घेऊन माझ्याकडे आले. म्हणाले, 'हे बघ, तुझे पुढचे पाय!'
मेट्रन, नर्सेस्, सर्वजणच मी कुबड्या घेऊन कसा उभा राहातो हे पाहयला जमल्या. डॉक्टरनी मला उचलून उभा केला. मेट्रननी माझ्या काखेखाली कुबड्या घातल्या. माझा उजवा पाय पुरा गेलेलाच होता. कमरेपासून खाली तो नुसता लोंबकळत असल्यासारखा, आकार-जीव नसलेला दिसायचा. पण डावा पाय थोडा, वजन उचलून धरायला मदत करीत होता. पुष्कळ आठवडे मी कॉटवर बसून, उभा राहून त्याला प्रैक्टिस देत होतो. पाठीच्या स्नायूचा बाक मात्र मला डावीकडे झुकवत असे. कुबड्या घेतल्यावर तो जरा ताठ झाल्यासारखा होई. माझ्या पोटाचे स्नायू पण तसे दुबळे झाले होते, पण माझी छाती आणि हात चांगले हवे तसे होते. आता पायाचा विचार मला हळूहळू सोडून द्यायला हवा. मला सोडून त्यांचे आयुष्य ते केविलवाणे जगणार होते म्हणून मला वाईट वाटले! तरी माझ्या हाताचा आणि छातीचा मला अभिमान होता आणि इतर स्नायूंच्या ताकदीची त्यांना भर करायची होती. असे डोक्यात चालले असतांना डॉक्टरनी माझ्या अंगाचा हात काढून घेतला. मी पडेन म्हणून दोन्ही हात पसरून ते उभे होते. मी कुबड्या उचलल्या. पुढे मी त्या कुबड्यांना जोराने एक झोका दिल्यासारखे केले. माझे वजन कुबड्यांवर टाकले. पायांनाही मी पुढे ओढले, पण माझा उजवा पाय खाली धुळीत, तुटलेल्या पंखासारखा ओढत आणला जातोय-दमल्यासारखा श्वास लागून मी थांबलो.
"छान!' डॉक्टर म्हणाले.
कुबडी घेऊन तसे मी दोन-तीन वेळा करून दाखवल्यावर 'आज पुरे आता, उद्या पुनः असेच करायचे बरे का. बैस तुझ्या खुर्चीत' पुनः ते बोलले. थोड्याच दिवसांत मी एकटा कुबड्यांनी व्हरांड्यात चालायला लागलो. एक-दोनदा पडलो, पण मला आता आत्मविश्वास वाटायला लागला. 'तुला घरी जाता येईल,' असे सिस्टरने सांगितले खरे; पण ते ऐकून मला काही फार आनंद झाला नाही. आता मी हॉस्पिटलच्या वातावरणाशीच समरस झालो होतो. मला तिथेच जास्त सुरक्षित आहे असे वाटे!
आई मला न्यायला आली तरी मी माझ्या कॉटवर बसून रिकाम्या व्हीलचेअरकडेच पहात बसलो होतो. तिनेच मला प्रथम बाहेर नेले होते, सूर्यप्रकाश दाखवला होता! आमच्या बाबांना अशी व्हीलचेअर आणणे परवडणारे नव्हते. त्यांनी घरच्या बावागाडीचीच व्हीलचेअर केली होती, तीच आई घेऊन आली होती.
नर्सने माझा जातांना पापा घेतला होता. मला रडू कोसळेल, असे वाटत होते. मग माझ्या बाबांनी दिलेली जवळची पोपटाची पिसे मी तिला प्रेझेंट दिली. 'खूप झाली अरे!' असे म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरवला. आईने माझ्या अंगाभोवती शाल गुंडाळली नर्स कोनार्डनी दिलेला मातीचा वाघ पण मी त्यात गुंडाळला 'टा ऽ टा, वाय, बाय्-' करून आम्ही निघालो.
कसे कोण जाणे, पण आई वळणावरून ती व्हीलचेअर उचलून घ्यायला गेली न् ती चाके उलटीच झाली. मी चक्क खाली गटारात पडलो. व माझ्यावर ती व्हीलचेअर. आईने गाडी बाजूला केली. मला उचलणे तिला जमेना. माझ्या वाघाचे डोके मोडल्यासारखे दिसत होते. आई जाणान्या माणसाला मदतीला बोलावित होती.
'काय झालेय बाई मुलाला?' असे एकाने विचारले.
'हळूच धरा हं त्याला, तो एका पायाने पांगळा आहे.' पांगळा! मला प्रथम धक्का बसला. पांगळा, म्हणजे लंगडणारा घोडा. जो काहीच कामाला न येणारा, असे माझ्या मनात बिंबले होते. म्हणून मी आईला, पांगळा, मम्मी?' असे आश्चर्यानेच म्हणालो, " असे का म्हणालीस तू? मी घोड्यासारखा निरुपयोगी झालोय का गं?'
[क्रमशः]
लेखक : अॅलन मार्शल
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या