डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जयप्रकाश गुप्ता या दळणवळण मंत्र्याने तर हृतिकने नेपाळी जनतेची माफी मागेपर्यंत त्याचे चित्रपट चालू देऊ नयेत, असा आदेश दिला. भारतीय दूतावासाने या सर्व गोष्टींचा इन्कार केला तरी बंद व जाळपोळ चालूच राहिली. भारतीय टूरिस्ट घाईघाईने भारतात परतले. काहींचे विलक्षण हाल झाले आणि नेपाळमधील टूरिझम व त्यावर अवलंबून असलेल्या इतर व्यवसायांचे उत्पन्नही साहजिकच कमी झाले.

नेपाळमध्ये नुकत्याच उसळलेल्या भारतविरोधी दंगलीस हृतिक रोशनचे काही शेरे कारणीभूत ठरले, असे सांगितले गेले. ‘‘नेपाळी माणसे मला आवडत नाहीत, ते वाईट लोक आहेत,’’ असे उद्गार काढून त्याने नेपाळचा अधिक्षेप केला आहे; असे प्रसृत करून नेपाळी विद्यार्थ्यांनी (डाव्या) दंगली घडवून त्याच्या ‘मिशन काश्मीर’ सिनेमाचे प्रयोग बंद पाडले आणि सर्वसामान्य भारतीयालाही या निमित्ताने जमेल तसे ठोकून काढण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी याच सुमारास - 24 डिसेंबर 1999 रोजी भारतीय विमानाचे (इंडियन एअरलाइन्स 184 सीचे)  अपहरण काठमांडूहून निघालेल्या पाच पाकिस्तानी हवाई चाच्यांनी करून ते विमान कंदाहारला कसे नेले, याची उजळणी प्रसारमाध्यमांतून सुरू होती; तोच या दंगलींची वार्ता देशात येऊन ठेपली. हृतिकने आपल्यावर ठेवलेल्या आरोपांबद्दल आश्चर्य व्यक्त केले आणि आपण दिलेल्या सर्व मुलाखतींच्या टेप्स आपल्याकडे असून आवश्यक वाटल्यास त्या ऐकून त्यात नेपाळबद्दल असा अपप्रचार कुठे केला असल्यास दाखवावा, असे आवाहन केले. 

काही दिवसांपूर्वी सिमी गरेवालने ‘रॉन्दिक’ या तिच्या खास कार्यक्रमाद्वारे हृतिक व त्याचे आईवडील यांची एक प्रदीर्घ मुलाखत प्रसारित केली होती. सिमीच्या प्रश्नांना त्यात हृतिकने जी उत्तरे दिली त्यांतून अनपेक्षित आनंदाचा सौम्य वर्षावच सुसंस्कृत श्रोत्यांवर झाला. हे एवढे विस्ताराने देण्याचे कारण असे की, या सर्वच मुलाखतीत नेपाळ आणि नेपाळी माणसाचा दूरांशानेही उल्लेख नसताना त्यावरून दंगली पेटाव्यात, यामागे काहीतरी षडयंत्र असावे हे उघड आहे. हृतिकच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या घरातच राहणा-या दोन नेपाळी कर्मचा-यांशी त्याचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांपैकी एकाच्या अंगाखांद्यावर खेळतच तो वाढला आणि दुसऱ्याबरोबर ‘खेलकूद’ करीत वाढत असताना घनिष्ट मैत्रीसंबंध निर्माण झाले आहेत. त्यामुळे नेपाळी माणसांबद्दल तर त्याच्या तोंडून किंचितही उपेक्षेचे उद्गार निघणे शक्यच नाही. तर मग नेपाळमधील दंगलीसाठी हृतिकचे नाव पुढे केले जाण्यामागे षडयंत्र कोणते असावे? मुंबई चित्रपटजगत आज दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्या कचाट्यात सापडले आहे हे आता गूढ राहिलेले नाही. चित्रपटाचे दिग्दर्शक, नट-नट्या यांच्या निवडीतही या गुन्हेगारी जगताचा हस्तक्षेप चाललेला असतो. 

हृतिकचे वडील राकेश रोशन हे या जगापासून कटाक्षाने दूर राहिले आणि या मंडळींच्या दबावाला बळी न पडता त्यांनी आपल्या मुलाचे या क्षेत्रात अभिनेता म्हणून पदार्पण घडविले. हृतिकचा पहिलाच चित्रपट ‘कहो ना प्यार है’ हा गाजला आणि तो अनेकांच्या दिलाची धडकन बनला. तसेच अनेक प्रस्थापित नटांच्या मत्सराचाही विषय तो बनला. चित्रपट क्षेत्रातील गुन्हेगारी जगताचा त्यांच्यामागे ससेमिरा लागला. त्याला ते दाद देत नाहीत हे पाहून, त्यांना शारीरिकरष्ट्या खतम करता येत नाही, तर अशी बदनामी करून अफवा पसरवून हृतिकला नामोहरम करावे आणि त्याचबरोबर भारताविरुद्धच्या असंतुष्ट शक्तींनाही जागे करावे, असा हा डाव होता. अर्थातच आय.एस.आय.ची साथ या कामी होतीच. या पहिल्या प्रयोगासाठी त्यांनी नेपाळचे कार्यक्षेत्र निवडले. कारण भारत-नेपाळ संबंध जितके बिघडतील तितके आय.आय.आय.ला तिथे हातपाय पसरणे शक्य होईल; आणि पर्यायाने नेपाळमधून भारतातील घुसखोरीचा मार्गही खुला होईल, अशा अंदाजाने तेथील विद्यार्थ्यांना भडकविण्यात आले. 

जयप्रकाश गुप्ता या दळणवळण मंत्र्याने तर हृतिकने नेपाळी जनतेची माफी मागेपर्यंत त्याचे चित्रपट चालू देऊ नयेत, असा आदेश दिला. भारतीय दूतावासाने या सर्व गोष्टींचा इन्कार केला तरी बंद व जाळपोळ चालूच राहिली. भारतीय टूरिस्ट घाईघाईने भारतात परतले. काहींचे विलक्षण हाल झाले आणि नेपाळमधील टूरिझम व त्यावर अवलंबून असलेल्या इतर व्यवसायांचे उत्पन्नही साहजिकच कमी झाले. या परिस्थितीचा फायदा नेपाळ आणि भारत या दोनही देशांतील राजकीय शक्तींनी घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. नेपाळमध्ये आतापर्यंत पाच विद्यार्थ्यांची पोलीस गोळीबारात हत्या होऊन जवळजवळ 100-125 जखमी झाले आहेत. अर्थातच याचा जाब नेपाळ सरकारकडे मागण्यात आला आणि पंतप्रधान गिरिजाप्रसाद कोइराला यांच्या बहुमतात असलेल्या काँग्रेस पक्षातील साथींनी त्यांचाच राजीनामा मागितला. शेरबहादुर देवला यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाने कोइराला यांना पदच्युत करण्यासाठी सह्या जमवण्याचे सत्र चालू केले आहे. इथे भारतात भाजपचे तत्त्वज्ञानी मार्गदर्शक श्री. एम. आर. मलकानी यांनी आणखी एक गंमत करून ठेवली. सध्या भाजपच्या सत्ताधारी नेत्यांना आपली प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष तुलना नेहरू, वल्लभभाई, राजेंद्रप्रसाद यांच्याशी करण्याचा छंद जडला आहे. नेहरू कुठे आणि किती चुकत गेले याचे संशोधन स्वतःचा पाय गाळात रुतत चाललेला असतानाही दुर्बीण लावून चालू आहे. 

श्री. मलकानी यांनी नेपाळविषयी  ‘जे.पी. टुडे’ या मुखपत्रात दिलेल्या मुलाखतीत नेहरूंची चूक' दाखवताना एक विधान असे केले की, 1950 सालीच नेहरूंनी भारताला नेपाळ जोडून घ्यायला हवे होते, कारण नेपाळचे राजे त्रिभुवन यांनी नेहरूंना त्या दशकात तशी विनंती केली होती. पण नेहरूंनी आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेसाठी कच खाल्ली. नेहरूंचा हा ढळढळीत मूर्खपणा पुढे भारताला बाधला. पण वरील विधानात नेहरूंचा कमीपणा आणि मूर्खपणा जनतेसमोर आणण्याच्या आवेशात आपण नेपाळच्या सार्वभौमत्वावर आक्रमण करीत आहोत, याचे भान मलकानींना राहिले नाही. या विधानाचे पडसाद नेपाळमध्ये उमटले आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे चौकशी करण्यात आली. त्यानंतर नेहमीप्रमाणे भाजप नेत्यांची सारवासारव सुरू झाली आहे. पक्षाध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांच्या वतीने उपाध्यक्ष जे. कृष्णमूर्ती यांनी खुलासा करून मलकानींचे ते विधान वैयक्तिक आहे. पक्षाचे ते धोरण नाही, असे जाहीर केले. परराष्ट्र मंत्रालयानेही सरकार या विधानाशी सहमत नाही, नेपाळच्या सार्वभौमत्वाबद्दल सरकारला आदर आहे आणि भारत-नेपाळ मैत्रीसंबंध भारत सरकारला मोलाचे वाटतात, असेही एका निवेदनाद्वारे जाहीर केले. एवढासा हृतिक! फक्त 26 वर्षांचा कोवळा अभिनेता! त्याचा आधार घेऊन आंतरराष्ट्रीय शक्तींना सामील झालेल्या देशी गुन्हेगारांनी एक प्रकरण उभे केले. त्या जाळ्यात नेपाळ व भारत या दोनही देशांतील राजकारणी सापडले. अब्रू जायची ती गेलीच! राजकारण हा खरेच किती प्रतिष्ठेचा आणि सुंदर शब्द! ते करण्याला लागणारा विवेक, बौद्धिक कुवत आणि निःस्पृहपणा यांच्या अभावापायी त्याला गटाराचे स्वरूप आले आहे. वरील सर्व हकिकत त्याचा पुरावाच नव्हे काय?
 

Tags: राजकारण प्रतिक्रिया हृतिक आणि नेपाळ politics comments rhitik roshan & Nepal weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके