डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मी आंबेडकरवादी, पण मार्क्स आणि गांधी जवळचे वाटतात!

भारतात सगळ्यांत जास्त दंगली या दलितविरोधी आणि मुस्लीमविरोधी झाल्या आहेत. अलीकडच्या काळात ख्रिश्चनांवरही हल्ले होताना दिसत आहेत. हे समाज दंगलीचे भक्ष्य झालेले आहेत. दलित हे मुस्लिमांबरोबर जात नाहीत, कारण हिंदूंचा रोष पत्करण्याची भीती त्यांना आहे. मुस्लीम दलितांबरोबर येत नाहीत, त्यांना दलितांची जात आडवी येते. जोगेंद्र कवाडे ह्यांनी हाजी मस्तानबरोबर दलित-मुस्लीम ऐक्याचा प्रयत्न केला. पण तो टिकला नाही. प्रकाश आंबेडकरांनीही ओवेसी यांच्याबरोबर युती करून दलित-मुस्लीम वंचितांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, तोही टिकला नाही. मला वाटते, दलित, मुस्लीम आणि ख्रिश्चन समदु:खी आहेत. त्यांनी एकत्र येणे ही सामाजिक गरज आहे. आरक्षण घेणारे सगळे एकत्र आले पाहिजेत. आंबेडकरी समाज गटागटांत विभागला आहे. तर हा बहुसंख्य समाज एकत्र कसा येईल, यासाठी चळवळीचा अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे.  

डॉ. शरणकुमार लिंबाळे हे अनेक भाषांत जागतिक स्तरावर पोहोचलेले भारतीय लेखक आहेत. दलित, उपेक्षित समाजाचे संघर्ष हे त्यांच्या लेखनाचे विषय आहेत. 1982 मध्ये त्यांनी लिहिलेल्या ‘उत्पात’ या काव्यसंग्रहापासून त्यांचा लेखनप्रवास सुरू झाला. त्यानंतर 1984 मध्ये त्यांनी लिहिलेल्या ‘अक्करमाशी’ या बहुचर्चित आत्मकथनाने ते प्रकाशझोतात आले. दलित साहित्य आणि दलित चळवळीत एक धगधगता लढाऊ कार्यकर्ता आणि बहुश्रुत लेखक म्हणून त्यांचे योगदान नेहमीच चर्चेत राहिले आहे. ‘दलित ब्राह्मण’, ‘बहुजन’, ‘उपल्या’, ‘हिंदू’, ‘हरिजन’ या त्यांच्या गाजलेल्या कथा-कादंबऱ्या आहेत. याशिवाय मराठी साहित्यातील अनेक वैचारिक संपादने त्यांनी केली आहेत. 

विद्रोही कवी आणि क्रांतिकारी दलित साहित्यिक अशी त्यांची विशेष ओळख आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झालेले शरणकुमार लिंबाळे हे त्यांच्या आक्रमक आणि वादग्रस्त भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. जगातल्या अनेक भाषांत त्यांची पन्नासहून अधिक पुस्तके अनुवादित झाली आहेत. संशोधनक्षेत्रातही त्यांनी भरीव योगदान दिले आहे. कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांत त्यांचे संशोधन निबंध विशेष चर्चिले गेले आहेत. महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्राध्यापक व संचालक म्हणून त्यांचे शैक्षणिक कार्यही मोलाचे ठरले आहे. 

2018 मध्ये ‘सनातन’ ही त्यांची दलितांचा संघर्ष-इतिहास मांडणारी कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीचे हिंदी आणि इतर भाषांतही अनुवाद झाले आहेत. डॉ. लिंबाळे यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला नुकताच पंधरा लाख रुपयांचा ‘सरस्वती’ सन्मान मिळाला. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांची ही विशेष मुलाखत.  

प्रश्न - तुमच्या ‘सनातन’ या कादंबरीला नुकताच ‘सरस्वती’ पुरस्कार मिळाला आहे, यासाठी तुमचे मनापासून अभिनंदन! मराठी भाषेत फार थोड्या लेखकांना हा बहुमान मिळाला याविषयी काय सांगाल? 

- ‘सनातन’ ही कादंबरी 2018 मध्ये प्रकाशित झाली आहे. त्या वेळी भीमा कोरेगावच्या लढाईला 200 वर्षे पूर्ण झाली होती. ह्या पुस्तकाला पुरस्कार मिळेल असे कधीच वाटले नव्हते. ‘सनातन’ नाव वाचूनच माणसं दचकतात. माझे कन्नड प्रकाशक ‘सनातन’ ह्या नावामुळे हे पुस्तक छापायला तयार होत नव्हते. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्येशी ‘सनातन’चे नाव जोडले गेल्याने बुद्धिजीवी वर्गात भयाची मानसिकता निर्माण झाल्याचे दिसते. माझ्या पुस्तकाचे ‘सनातन’ हे नाव असो किंवा पुस्तकाची अर्पणपत्रिका असो, हे पुस्तकाच्या दृष्टीने अडचणीचे ठरणारे आहे. पण या पुस्तकातला कंटेंट आणि फॉर्म साहित्यविश्वात नवे आहेत. हिस्ट्री आणि फँटन्सी यांचा वापर करून ही कादंबरी लिहिली आहे. 

‘सरस्वती’ सन्मान हा दलित साहित्याला किंवा दलित लेखकाला दिल्याची चर्चा आहे, हे चुकीचे आहे. अर्थात, मी दलित लेखक असल्याने अशी चर्चा होते आहे. मला देशातून अनेक फोन आले. यामध्ये दलितांचे फोन अधिक होते. दलित लेखक भारतातील लेखकांशी स्पर्धा करून आपलं प्रभुत्व सिद्ध करू शकतो, अशी ही घटना होती. त्यामुळे त्याचे दलित समाजातून फार मोठे स्वागत झाले. प्रगतिशील समाजाने कौतुक केले. अनपेक्षितपणे मिळालेल्या या पुरस्कारामुळे मला खूप आनंद झाला आहे. विशेष करून भारतीय साहित्यात माझे स्थान मला गौरवाने नोंदवता आले याचेही मला समाधान आहे. 

‘सरस्वती’ सन्मान राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या 22 भाषांना दिला जातो. यासाठी प्रत्येक भाषेत दहा वर्षांत प्रकाशित झालेली पुस्तके विचारात घेतली जातात. निवड समिती पुरस्कार देताना पुस्तकाबरोबर लेखकाच्या संपूर्ण लेखनाचा विचार करत असते. विशेषतः राष्ट्रीय स्तरावर लेखकाची असलेली ओळख आणि त्याच्या साहित्याचे झालेले विविध भाषांतील भाषांतरे विचारात घेतली जातात. लेखकाच्या पुस्तकांबरोबरच त्या लेखकावर किती पुस्तके लिहिली आहेत, विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांचा किती समावेश आहे, त्याला किती पुरस्कार मिळाले आहेत; अशा बाबींचा विचार होतो, असा माझा अनुभव आहे. केवळ एका पुस्तकाचा विचार होत नाही. लेखकाच्या एकूण वाङ्‌मयीन कार्याचा गौरव म्हणून त्याच्या एका पुस्तकाला हा सन्मान दिला जातो. ही वर्षभर चालणारी गोपनीय प्रक्रिया असते. जवळजवळ एकूण 65 तज्ज्ञ ह्यामध्ये भाग घेतात. चार-पाच स्तरांवर या पुस्तकाची छाननी होते. या सर्व पातळीवर टिकून राहायचे असेल तर राष्ट्रीय स्तरावर लेखक पोहोचलेला असणे महत्त्वाचे आहे. यासाठी तज्ज्ञांना तुमचे नाव आणि काम माहीत असणे आवश्यक आहे; तरच दखल घेतली जाऊ शकते. 

प्रश्न - या पुरस्कारासाठी तुमची निवड कोणत्या कारणाने झाली असावी असे तुम्हांला वाटते? 

- मराठी भाषेतल्या अनेक लेखकांच्या पुस्तकांतून माझ्या पुस्तकाची शिफारस झाली. माझी विविध भाषांत 53 पुस्तके भाषांतरित झाल्याने माझी या पुरस्कारासाठी निवड होऊन मराठी भाषेला हा सन्मान मिळू शकता. मला वाटते- एखाद्या मोठ्या पुरस्कारासाठी एका भाषेत तुम्ही महान लेखक आहात हे महत्त्वाचे नाही. तुमचे साहित्य राष्ट्रीय स्तरावर पोहोचले पाहिजे. दुसरे म्हणजे तुमच्या साहित्यावर नितांत प्रेम करणारी मित्रमंडळी असली पाहिजेत. अनेक भाषांत लेखकाचे मित्र व वाचक असले पाहिजेत. प्रकाशक आणि अनुवादक असले पाहिजेत. मराठीला वीस वर्षांनंतर हा पुरस्कार मिळाला आहे. मी बहुश्रुत झालो त्याचे हे फळ आहे. यासाठी माझ्या बाजूने मत मांडलेल्या परीक्षकांचे मी मनापासून आभार मानतो. 

प्रश्न - या पुरस्काराची बातमी कळाल्यावर तुमची स्वाभाविक प्रतिक्रिया काय होती? 

- ‘सरस्वती सन्मान’ जाहीर करण्यापूर्वी मला के.के. बिर्ला फाउंडेशनचा फोन आला आणि त्यांनी ही आनंदाची बातमी दिली. मी त्यांना म्हणालो, ‘‘हा दलित साहित्याचा सन्मान आहे’’. यावर त्यांनी मला लगेच उत्तर दिले. ‘‘आम्हांला तुमची जात कोणती आहे हे माहीत नाही. तुम्ही कोणत्या विचारांचे आहात हे माहीत नाही. एका महान लेखकाच्या श्रेष्ठ कलाकृतीचा आम्ही सन्मान करत आहोत.’’ बिर्ला यांचे म्हणणे योग्यच होते. यावरून हे लक्षात घ्या की- मी केवळ दलित लेखक नाही. मी मराठी लेखकही आहे. मी केवळ दलित नाही. मी भारतीयही आहे. माझी प्रादेशिक आणि राष्ट्रीय ओळख महत्त्वाची  आहेच, पण मी एक भारतीय लेखक आहे हे विसरून कसे चालेल? ‘सरस्वती सन्मान’ मराठी भाषेला मिळाला आहे. मी मराठी लेखक म्हणून हा पुरस्कार स्वीकारणार आहे आणि याचा मला नक्कीच आनंद आहे. माझ्या साहित्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली, याचा अनेकांना आनंद झाला आहे. मला सर्व स्तरांतून अभिनंदनाचे हजारो फोन येताहेत ही त्याचीच पावती आहे. 

प्रश्न -‘अक्करमाशी’ या आत्मचरित्रापासून सुरू झालेला तुमचा लेखनप्रवास पुढे अधिकाधिक उंचावत गेला. मराठीतच नव्हे तर जगभरातल्या असंख्य भाषांत पोहोचलेले जागतिक दर्जाचे लेखक म्हणून तुमची ओळख झाली आहे. या प्रवासाविषयी काय सांगाल? 

- मी केवळ मराठीत लिहीत राहिलो असतो तर या व्यवस्थेने मला दुर्लक्षून संपवले असते. माझ्या साहित्याचा अनुवाद झाल्यामुळेच मी राष्ट्रीय स्तरावर आणि जगातही पोहोचलो. जगामध्ये आणि देशात दलितांमध्ये अभूतपूर्व जागृती निर्माण झाली आहे. त्यामुळे जगभर दलितांच्या प्रश्नांची चर्चा होते आहे. मानव अधिकारांसाठी जगभर संघर्ष सुरू आहेत. ह्या पार्श्वभूमीमुळे माझ्या साहित्याकडे लक्ष वेधले गेले. मराठीपेक्षा मी मल्याळममध्ये अधिक प्रसिद्ध आहे. हिंदी आणि इंग्रजीमध्ये माझ्या साहित्याचा अभ्यासक्रमांमध्ये समावेश आहे. मी भारत व भारताबाहेर भाषणांसाठी फिरतो. लेखक फिरता राहणे गरजेचे आहे असे मला वाटते. 

मराठी भाषेत मला एकूण तीन पुरस्कार मिळाले आहेत. हे महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत. ‘अक्करमाशी’ला उत्तेजनार्थ एक हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला. ‘झुंड’ कादंबरीला विभागून पुरस्कार देण्यात आला. ‘हिंदू’ कादंबरीला पूर्ण पुरस्कार मिळाला, कारण कृष्णा किरवले ह्यांनी ‘हिंदू’ कादंबरीची निवड केली होती. मराठीतल्या गटबाजीमुळे लेखक मोठा होत नाही. मी असल्या कुठल्या गटात नाही. मी केवळ लेखन केले. माझ्या साहित्याचा अनुवाद होण्यासाठी मी प्रयत्न केला. पुढल्या पाच वर्षांत माझी किमान पंधरा पुस्तके भाषांतरित होऊन विविध भाषांत प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत. या पुरस्काराने माझे आणि माझ्या लेखनाचे आयुष्य उजळून निघाले. सनातन ही कादंबरी आता जगातल्या आठ भाषांत भाषांतरित होतेय. शिवाय पेंग्विनसारखी जागतिक दर्जाची प्रकाशनसंस्था माझी पाच पुस्तके इंग्रजीत करू पाहतेय. हे सारे ऐकताना नक्कीच आनंद होतोय. 

प्रश्न - ‘सनातन’ कादंबरीत जो सांस्कृतिक लढा तुम्ही उभा केला आहे त्यात दलित, आदिवासी, मराठा, ओबीसी, मुस्लीम आणि ब्राह्मण अशा जातींचा संघर्ष तुम्ही भीमा-कोरेगावच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर मांडू पाहत आहात, या संघर्षचित्रणात तुम्हाला अंतिमतः नेमके काय सांगायचे आहे? 

- ‘सनातन’ ही कादंबरी लिहिताना केवळ महार समाज आणि भीमा-कोरेगावची लढाई, इतकेच माझ्या डोळ्यांपुढे होते. कादंबरी लिहीत गेल्यानंतर आदिवासी, मुस्लीम, ब्राह्मण असे समाज व्यक्त झाले आहेत. दलित साहित्य आणि आदिवासी साहित्य हे दोन वेगळे प्रवाह स्वतंत्रपणे निर्माण झाले आहेत. या देशात आदिवासींची मोठी लोकसंख्या आहे. दलित-आदिवासी एकत्र आले पाहिजेत असे मला वाटते. देशातल्या आदिवासी लेखकांशी बोलताना मी अशी चर्चा करतो. दलित आणि आदिवासींचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांची भाषा आणि संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे ऐक्यप्रक्रियेत अडचणी येतात. असे असले तरी राष्ट्रीय स्तरावर दलित आणि आदिवासी साहित्याची एकत्र चर्चा होताना दिसून येते. सर्वहारा वर्ग एकत्र आले पाहिजेत आणि विषमतेविरुद्ध लढला पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. केवळ दलित-आदिवासीच नव्हे, ते अभिव्यक्त होऊ पाहणाऱ्या साऱ्याच उपेक्षित साहित्य- प्रवाहांनी एक व्हायला हवे, अशी माझी धारणा आहे. 

प्रश्न - ‘सनातन’ कादंबरी का लिहावी वाटली? यासाठी काय होमवर्क केला. या कादंबरीच्या लेखन प्रक्रियेविषयी सांगा. एक चांगली कादंबरी लिहायला लेखकाने काय खबरदारी घेतली पाहिजे? 

- भीमा-कोरेगावच्या लढाईला 200 वर्षे पूर्ण होत आहेत, तेव्हा या विषयावर कादंबरी लिहिली पाहिजे असे वाटत होते. त्या अगोदर मी ऐतिहासिक कादंबरी लिहिली नव्हती. भीमा-कोरेगावच्या निमित्ताने मला महारांच्या सामाजिक इतिहासावर कादंबरी लिहायची होती. यासाठी महारांविषयी छापून आलेली सर्व मी पुस्तके वाचली. प्रत्यक्ष लेखनाला सुरुवात करण्यापूर्वी भि.शि. शिंदे यांची ‘अमृतनाक’ आणि संजय सोनवणी यांची ‘आणि पानिपत’ या कादंबऱ्या वाचल्या. ‘सनातन’ कादंबरीची सहा प्रकरणांत विभागणी केलेली आहे. पहिल्या प्रकरणात महार समाजाचे सण-उत्सव, प्रथा-परंपरा, दैनंदिन जीवन, गावगाड्यातील महारांचे स्थान आणि त्यांची कामे, स्त्रीपुरुष नात्यांचा पट आणि महारवाडा याचे चित्रण केले आहे. यात कहाण्या, लोककथा, पौराणिक कथा आणि आख्यायिका यांचा वापर करून हे प्रकरण लिहिले आहे. पहिल्या प्रकरणाची सुरुवात निजामकाळात होते. शेवटी दोन महार भीमनाक आणि सिद्धनाक ब्रिटिश फौजेत प्रवेश करतात. 

दुसरे प्रकरण स्थानिक प्रजा, संस्थानिक आणि इंग्रज राजवटीवर आधारलेले आहे. झोळ आणि रामपूर अशा दोन काल्पनिक संस्थानांच्या आधारे ब्रिटिश राजवटीत होणारे सामाजिक आणि राजकीय बदल टिपले आहेत. या प्रकरणात आदिवासींविषयी लिहिले आहे. यासाठी इतिहासाची अनेक पुस्तके वाचली, तसेच तशी लक्ष्मण गायकवाड यांची ‘वकिल्या पारधी’ ही कादंबरी महत्त्वाची वाटली. ‘सनातन’ या कादंबरीत ब्राह्मण समाज व्यक्त झाला आहे. ब्राह्मणांचे चित्रीकरण करण्यासाठी वेद, स्मृती, पुराण-साहित्याबरोबरच इतिहासाचेही वाचन उपयोगी पडले. 

प्रकरण तीनमध्ये भीमा-कोरेगावच्या लढाईचे वर्णन आले आहे. यासाठी पेशव्यांविषयी आणि पेशवेकालीन दलितांविषयीची इतिहासविषयक पुस्तके वाचली. तत्कालीन पुणे, शनिवारवाडा, जातिव्यवस्था, पेशवाई आणि इंग्रज यांचे चित्रण या प्रकरणात आले आहे. यात महार लढवय्ये होते. त्यांनी भीमा-कोरेगावची लढाई जिंकली याचे चित्रण आले आहे. 

प्रकरण चारमध्ये 1857 चे बंड याविषयी लिहिले आहे. या प्रकरणात ब्रिटिशांमुळे त्रासलेली स्थानिक जनता, जंगलावर अतिक्रमण झाल्याने अस्वस्थ झालेले आदिवासी आणि चर्च मिशनरींचे कार्य याचे वर्णन आले आहे. ब्राह्मणांनी ख्रिश्चन धर्माला केलेला तीव्र विरोध यात व्यक्त झाला आहे. नरसोपंत यांनी ख्रिश्चन फादरचा खून केला आणि त्याला इंग्रजांनी फाशी दिली. स्थानिक जनतेबरोबर इंग्रज फौजेत असंतोष पसरतो. त्याची तपशीलवार मांडणी केली आहे. मंगल पांडे, झाशीची राणी यांच्यासोबत दलित नायकांनी इंग्रजांविरुद्ध केलेल्या संघर्षाचा उद्रेक दाखवला आहे. यासाठी मी स्वतः कानपूर, लखनौ आणि अलाहाबाद शहरांना भेटी दिल्या. इंग्रजांविरुद्ध झालेल्या कानपूर उठावाचा तपशील जाणून घेतला. कानपूर इथला पेशव्याचा वाडा पाहिला. मंगल पांडेंना जिथे फासावर लटकावले तिथे प्रत्यक्ष जाऊन भेट दिली. समीक्षक वीरेंद्र यादव, लखनौ यांच्याशी लेखनाबाबत चर्चा केली. कर्नाटकातल्या मंगलोर इथं गेलो असताना ॲड. पुनित अप्पू यांच्याकडून ‘भूत कल्चर’ समजून घेतले. या सगळ्या अभ्यासाचा उपयोग चौथ्या प्रकरणाच्या लेखनासाठीही झाला. 

मुस्लीम आणि ब्रिटिश कालखंडात दलितांनी धर्मांतरे केली. धर्मांतरामुळे त्यांना जगण्याचा नवीन पर्याय मिळाला परंतु भेदभाव संपला नाही, त्यांचे प्रश्न बिकट झाले. याविषयीचे वर्णन पाचव्या प्रकरणात आले आहे. 1857 च्या बंडानंतर महारांना ब्रिटिश सैन्यात प्रवेशाला बंदी घालण्यात आली. त्यामुळे लढवय्या महारांची झालेली दैना याचे चित्रण यात प्रकट झाले आहे. भुतांचा अत्यंत परिणामकारक वापर या कादंबरीत करून घेतला आहे. 

शेवटच्या सहाव्या प्रकरणात देशाबाहेर स्थलांतरित झालेल्या विस्थापितांची व्यथा मांडली आहे. यामध्ये स्थलांतरितांचे प्रश्न मांडले आहेत. धर्मांतर आणि देशांतर करूनही दलितांचे भेदभावाचे प्रश्न सुटत नाहीत. कादंबरीची सुरुवात मेलेल्या जनावराचे ओढणे- या प्रसंगाने होते आणि शेवटही मेलेल्या जनावरांना ओढून आणल्याच्या प्रसंगाने होतो. ही मुर्दाड व्यवस्था वर्षानुवर्षे दलित ओढून नेत आहेत. ही व्यवस्था संवेदनशून्य आणि क्रूर आहे याचे चित्रण होते. कादंबरीच्या शेवटी साउथ ब्यूरो कमिशनपुढे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या साक्षीचा उल्लेख येतो. 1957 च्या नंतर सामाजिक बदलाला सुरुवात होते; याची शेवटच्या दोन प्रकरणांत नोंद घेतली आहे. कल्पना आणि इतिहासाची मदत घेऊन ही कादंबरी लिहिली आहे. ही कादंबरी खूप काळ आणि खूप भूप्रदेश व्यापणारी आणि असंख्य पात्रांच्या आधाराने नाकारल्या गेलेल्या इतिहासाची मांडणी करते. खूप वाचले, टिपणे काढावी लागली. पण प्रत्यक्ष कादंबरीचे लेखन सुरू केल्यानंतर पाच-सहा महिन्यांत ही कादंबरी लिहून झाली. केवळ एकदा पुनर्लेखन केले आहे. 

प्रश्न - आपण सात कादंबऱ्या लिहिल्या आहेत. दलित कादंबरी वाङ्‌मयप्रकार म्हणून विकसित का होऊ शकली नाही? दलित आत्मकथा मात्र खूप लिहिल्या गेल्या आहेत. 

- उपल्या (1998), हिंदू (2003), बहुजन (2006), झुंड (2009), ओ (2015), सनातन  (2018) व रामराज्य (2019) या माझ्या एकूण सात कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. ‘उपल्या’ची चर्चा झाली. इतर कादंबऱ्या दुर्लक्षित राहिल्या. ‘सनातन’ वगळता इतर सर्व कादंबऱ्या समकालीन सामाजिक, राजकीय जीवनाचा वेध घेणाऱ्या आहेत. ‘झुंड’ ही कादंबरी ‘जात’ आणि ‘मानवी नाते’ यांवर आधारलेली आहे. मी सर्वच वाङ्‌मयप्रकारांत लेखन केले आहे. कादंबरी लिहायला प्रतिभा आणि कल्पनेची जोड लागते. लेखकच कादंबरी लिहू शकतो. आत्मकथा लिहिण्यासाठी प्रतिभेची गरज नाही. जगले-भोगलेल्या जीवनाची कहाणी कोणीही सांगू शकेल. लिहायला सगळ्यांत सोपा वाङ्‌मयप्रकार आत्मकथा आहे. दलित लेखकांच्या आत्मकथांची खूप चर्चा झाली. लेखकांना प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे आत्मकथा खूप लिहिल्या गेल्या. या वाङ्‌मयप्रकाराचा विकास झाला. दलित आत्मकथेमुळे दलित साहित्याची विपुल चर्चा झाली. यामुळे दलित कादंबरी मागे पडली. दलित लेखकांनी कादंबरी-लेखनाकडे पाठ फिरवली आहे. ‘फकिरा’- अण्णाभाऊ साठे, ‘मेलेलं पाणी’ - अशोक व्हटकर, ‘झुलवा’ - उत्तम बंडू तुपे, ‘राघववेळ’ - नामदेव कांबळे, ‘वकिल्या पारधी’ - लक्ष्मण गायकवाड, आणि ‘इळणमाळ’ - अशोक पवार या कादंबऱ्या दलित साहित्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. अशोक पवार चांगल्या कादंबऱ्या लिहू शकतील असा मला विश्वास वाटतो. 

प्रश्न - आजच्या परिस्थितीत विशेषतः सध्याच्या बदलत्या सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय पार्श्वभूमीवर हिंदू-दलित आणि हिंदू-मुस्लीम संघर्षाकडे तुम्ही कसे पाहता? 

- भारतात सगळ्यांत जास्त दंगली या दलितविरोधी आणि मुस्लीमविरोधी झाल्या आहेत. अलीकडच्या काळात ख्रिश्चनांवरही हल्ले होताना दिसत आहेत. हे समाज दंगलीचे भक्ष्य झालेले आहेत. दलित हे मुस्लिमांबरोबर जात नाहीत, कारण हिंदूंचा रोष पत्करण्याची भीती त्यांना आहे. मुस्लीम दलितांबरोबर येत नाहीत, त्यांना दलितांची जात आडवी येते. जोगेंद्र कवाडे ह्यांनी हाजी मस्तानबरोबर दलित-मुस्लीम ऐक्याचा प्रयत्न केला. पण तो टिकला नाही. प्रकाश आंबेडकरांनीही ओवेसी यांच्याबरोबर युती करून दलित-मुस्लीम वंचितांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, तोही टिकला नाही. मला वाटते, दलित, मुस्लीम आणि ख्रिश्चन समदु:खी आहेत. त्यांनी एकत्र येणे ही सामाजिक गरज आहे. आरक्षण घेणारे सगळे एकत्र आले पाहिजेत. आंबेडकरी समाज गटागटांत विभागला आहे. तर हा बहुसंख्य समाज एकत्र कसा येईल, यासाठी चळवळीचा अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे. 

प्रश्न - ‘सनातन’ हे तुमच्या कादंबरीचे शीर्षक हिंदुत्ववादी आहे असे वाटत नाही का? 

- स्वातंत्र्यापूर्वी भारत हा देश कधी राष्ट्र नव्हता. स्वातंत्र्यानंतर भारत नावाच्या राष्ट्राची नवनिर्मिती होत आहे. भारत ह्या राष्ट्राची उभारणी संविधानाच्या आधारावर झाली पाहिजे. स्वातंत्र्यानंतर धर्मनिरपेक्ष मूल्यांवर राष्ट्राची उभारणी झाली पाहिजे, असाच आग्रह होता; पण प्रत्यक्षात भारतातच नाही तर जगातदेखील धर्मनिरपेक्ष मूल्यांची पिछेहाट झाली आहे. आज जगात ख्रिश्चन आणि मुस्लिमांमध्ये रक्तपात होत आहेत. भारतात एक धर्म नाही. एका धर्माविषयी बोलणे म्हणजे संपूर्ण राष्ट्राविषयी बोलणे नाही, असे मी ‘सनातन’ कादंबरीच्या मनोगतामध्ये म्हटले आहे. भारतात हिंदू लोकसंख्या मोठी आहे, ते सगळेच हिंदुत्ववादी नाहीत. पण हिंदू धर्मावर प्रेम करणारे आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्रात दलितांनी बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन मराठवाडा नामांतराचे भावनिक आंदोलन चालवले आणि दलितांमध्ये मानसिक ऐक्य निर्माण केले. हिंदुत्ववाद्यांनीही राम मंदिराचा प्रश्न घेऊन ‘जय श्रीराम’ म्हणत आंदोलन केले आणि हिंदूंमध्ये मानसिक ऐक्य निर्माण केले. मला या दोन्ही आंदोलनांची तुलना करायची नाही. पण भावनिक प्रश्नावर माणसं एकत्र येतात, त्या वेळी इतर प्रश्न गौण ठरतात. संघाने हिंदूंच्या मानसिक ऐक्याच्या आधारे आपला विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि संघ यात यशस्वी ठरला आहे. पण आपले काय? पुरोगाम्यांमध्ये प्रयत्न खूप झाले, पण आपण यशस्वी झालो नाही. राजकीय लढाई जिंकायची असेल तर आधी सांस्कृतिक लढाई जिंकायला पाहिजे. ती आपण विसरलो. आज जागतिकीकरणात या सांस्कृतिक लढाया अधिक बोथट झाल्या आहेत हे खरे आहे, पण आपला इतिहास आपले संघर्षाने काठोकाठ भरलेले सांस्कृतिक, सामाजिक संचित आपण समजून घेऊन परिवर्तनाची पावले टाकायला हवीत असे मला वाटते. भारतात इतकी धार्मिक, भाषिक, प्रांतिक विविधता आहे, की ही विविधता एकधर्मीय राष्ट्रनिर्मितीमधील मोठी  अडचण आहे. हिंदू धर्माचे प्रसारक आपल्या भूमिकेवर ठाम असणार आहेत. त्यांचे विरोधक किती ठाम आणि एकजूट दाखवत आहेत हा कळीचा व महत्त्वाचा प्रश्न आहे. 

प्रश्न - डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे तुम्ही प्रसारक आहात. तुम्हांला मार्क्स आणि गांधींचा विचार जवळचा वाटतो, परंतु ज्या आरएसएसच्या व्यासपीठावर तुम्ही ‘पुन:पुन्हा जाईन’, असे म्हणता त्यांना मात्र मार्क्स आणि गांधींची मोठी ॲलर्जी आहे, त्याचे काय? 

- मार्क्स, गांधी आणि आंबेडकर हे महापुरुष केवळ महापुरुषच नव्हते तर जगाने मान्य केलेल्या उन्नतीकडे जाणाऱ्या त्या विचारधारा आहेत. तत्त्वज्ञान म्हणून त्या कधी संपणार नाहीत आणि त्यांना संपवणाराही निर्माण होणार नाही. 

प्रश्न - आंबेडकरवादी, मार्क्सवादी कम्युनिस्ट आणि समाजवादी यांच्या वैचारिक एकीची गरज वाटते का? वाटत असल्यास ती कशी? मार्क्स-गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारांच्या एकीचे सूत्रही मांडले गेले आहे. याविषयी अनेक संमेलने, चर्चासत्रे आणि लेखनप्रकल्प होताना दिसत आहेत. याकडे तुम्ही कसे पाहता? 

- दलित साहित्याच्या विकासप्रक्रियेत एका गटाने सतत मार्क्स आणि गांधींना कडवा विरोध केला आहे. आता ह्या विरोधाने आक्रमक जातिवादाचे स्वरूप धारण केले आहे. मला वाटते, समविचारी माणसे एकत्र आली पाहिजेत. ‘केवळ आम्हीच क्रांतिकारक आहोत’, ही भूमिका सोडली पाहिजे. या देशावर कुठलीही एक जात सत्ता गाजवू शकत नाही असे सामाजिक, राजकीय वातावरण निर्माण झाले आहे. देशात सत्ता स्थापन करण्यासाठी आघाड्या होत आहेत. यूपीए आणि एनडीए हे प्रयोग आपण पाहत आहोत. वैचारिक पातळीवर आपण ठाम असावे; पण लढ्याच्या पातळीवर आपण प्रयोग केले पाहिजेत. समविचारी पक्षांबरोबर मैत्रीचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आहे. एकटे लढणे महागात पडणारे आहे हे अनुभव आहेत. मिळून लढले पाहिजे, त्यासाठी आपले मित्र वाढवले पाहिजेत. मला या अर्थाने मार्क्स आणि गांधीजींचा विचार जवळचा वाटतो. 

प्रश्न - दलित साहित्याच्या भवितव्याविषयी काय वाटते? याविषयी काय विचार करता? नवीन दलित लेखकांविषयी काय बोलता येईल? 

- भारतातल्या प्रादेशिक भाषांत समृद्ध दलित साहित्याची निर्मिती होते आहे. बंगालीमध्ये मनोरंजन बेपारी, तेलुगुमध्ये सुधाकर एंडलुरी, तमीळमध्ये इमियाम, मल्याळममध्ये एम.आर. रेणूकुमार, कन्नडमध्ये देवनूर महादेव, गुजरातीमध्ये दलपत चव्हाण, पंजाबीमध्ये बलबीर माधोपुरी, हिंदीमध्ये अजय नवरिया आणि मराठीमध्ये लक्ष्मण गायकवाड हे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे लेखक आहेत. 

मराठीत नवीन दलित लेखकांना पुढे घेऊन जाणारे वातावरण नाही. दलित पँथरसारखी बलाढ्य चळवळ नष्ट झाली आहे. ‘दलित’ शब्दाला मराठीत होणारा विरोध तीव्र आहे. त्यामुळे दलित साहित्याची चर्चा होत नाही. पण राष्ट्रीय स्तरावर खूप सकारात्मक वातावरण आहे. दलित साहित्य, आदिवासी साहित्य आणि बहुजन साहित्य या प्रवाहांमध्ये संवाद वाढत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खूपच चांगले वातावरण आहे. दलित साहित्य, काळे साहित्य, आणि अबओरिजन साहित्य यांमध्ये तुलना होऊ लागली आहे. संवादाची अदलाबदल होत आहे. ॲकॅडमिक वर्ल्डमध्ये दलित साहित्य आणि स्त्रीवादी साहित्य एकत्रित चर्चिले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा सकारात्मक वातावरणाचा नवीन दलित लेखकांनी विचार केला पाहिजे. चांगले लिहिणारे लेखक शोधले पाहिजेत, अशा लेखकांची चर्चा झाली पाहिजे, नव्या लेखकांना प्रकाशक मिळवून दिले पाहिजेत. ही जबाबदारी ज्येष्ठ लेखकांनी घेतली पाहिजे. गटातटांत न अडकता नव्या लेखकांनी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी खूप लिहिण्याची गरज आहे. ज्याच्याकडे अनुभव आणि प्रतिभा आहे असा लेखक एकटा राहूनदेखील उत्तम लिहू शकतो, हे समजून घेतले पाहिजे असे मला वाटते. 

जी. के. ऐनापुरे, उत्तम कांबळे, लोकनाथ यशवंत, प्रज्ञा दया पवार, राकेश वानखेडे, मिलिंद कसबे, अशोक पवार यांच्यासारख्या लेखक-अभ्यासकांनी मनावर घेतले तर मराठीत पुन्हा एकदा दलित साहित्याची चांगली निर्मिती होऊ शकेल असे मला वाटते. 

मुलाखत व शब्दांकन : ऋता ठाकूर, अहमदनगर 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके