डिजिटल अर्काईव्ह

आम्ही सर्वच त्यांच्यावर बेहद्द खूश असू. स्वत:च्या तंद्रीत राहणे त्यांना आवडायचे. सिनेमावर बोलू लागले की, दोन-दोन तास सिनेमाच. संगीतावर बोलू लागले की मग सर्व वातावरण संगीताने फुलवायचे. महाभारत, दुसरे महायुद्ध आणि त्यातही जर्मनीचा फिल्ड मार्शल रोमेल हे त्यांचे आवडीचे विषय. अलीकडे मुस्लिम प्रश्न हा त्यांच्या चर्चेचा खास विषय. त्यांच्याइतका स्मरणशक्तीचा माणूस मला अजूनही पाहायला मिळालेला नाही. हे केवळ भाऊ म्हणून लिहीत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यांची स्मरणशक्ती फोटोस्टेट होती. प्रत्येक क्षण त्यांच्या डोळ्यांपुढे नाचायचा. इंटरला तीनदा नापास होऊनही अपूर्ण शिक्षण ही त्यांच्या प्रगतीतील धोंड झाली नाही. इंग्रजी त्यांना जेमतेच यायचे, परंतु त्यांचे नव्वद टक्के वाचन इंग्रजीत असायचे.

गावावर ओतप्रोत प्रेम करणाऱ्या हमीदभाईंना आपल्या मृत्युपत्राची सुरुवात ‘मला मरणोत्तर गावाला घेऊन जाऊ नये’ अशी मुद्दाम करावी लागली. गावच्या परिसराशी, वातावरणाशी सातत्याने तद्रूप पावणाऱ्या दादांना हे लिहावे लागावे, यावरूनच गावच्या मुस्लिम लोकांचा, नात्यागोत्यांचा त्यांच्या ‘विचारसरणीला’ किती विरोध होता, हे दिसून येईल.

दादांची लहानपणातली जडण-घडण समजल्याखेरीज त्यांच्या संघर्षपिंडाचे बळ लक्षात येणार नाही. खरे म्हणजे, मरणोत्तर त्यांच्याविषयी हे लिहावे लागावे याच्या मनाला यातना होतात. या आठवणी पूर्वीच लिहायला हव्या होत्या. हमीद दलवाईला लोक ओळखतात, ते एक विचारवंत, साहित्यिक म्हणून. व्यक्ती म्हणून फार थोडी माणसं त्यांना ओळखायची. म्हणून कधी तरी त्यांच्याविषयी लिहावे असे अनेक वेळा मनात यायचे. पण दुर्दैवाने तो क्षण हातातून निसटला आहे. दादांचे निधन व्हायच्या अगोदर लिहिले असते, तर ते वेगळ्या दृष्टिकोनातून लिहिले गेले असते.

हमीदभाईंचे आयुष्य असंख्य घटनांनी भरलेले आहे. असंख्य प्रसंगांनी ते संपन्न झाले आहे. त्या सगळ्याच घटना-प्रसंगांची गुंफण करायची झाल्यास त्यांच्या  चरित्राचीच जमवाजमव करावी लागेल. तो इथे उद्देश नाही व तेवढा आता वेळही नाही. ह्या लेखात अगदी थोडक्यात त्यांच्या व्यक्तिगत जीवनातल्या गोष्टी मी सांगणार आहे.

चिपळूण जवळच्या मिरजोळी या गावी त्यांचा जन्म झाला. आमच्या वडिलांनी एकंदर चार बायका केल्या. दादा आमच्या दुसऱ्या आईचा मुलगा. आमच्या पहिल्या आईला काहीच अपत्य झाले नाही, म्हणून तिनेच पुढाकार घेऊन तिच्याच नात्यातल्या मुलीला बाबांसाठी मागणी घातली. बाबांचे वय त्यावेळी चाळीस वर्षांचे होते व मुलीचे वय फक्त पंधरा-सोळा वर्षांचे असेल! ती दिसायला अतिशय सुंदर होती. हे अर्थातच मी आमच्या वडिलांकडूनच ऐकले  होते.

दुर्दैवाने तिला वयाच्या अठराव्या वर्षीच इहलोक  सोडावा लागला. क्षयाने तिचा अंत झाला. बाबांनी तिला खूप औषधपाणी केले. मिरजेच्या हॉस्पिटलमध्येही ठेवले होते. परंतु त्या वेळी आजच्यासारखी क्षयावर औषधे उपलब्ध नव्हती. ती वारली तेव्हा दादा फक्त दोन वर्षांचे होते. त्यानंतर काही वर्षांनी आमची पहिली आईही वारली. मग वडिलांनी तिसरे लग्न केले. तिसऱ्या आईला चार मुले झाली. पहिल्या तीन मुलींनंतर मी झालो. मी दोन-तीन वर्षांचा असताना माझी आईही वारली. त्यानंतर वडिलांनी चौथी बायको केली. त्या वेळी दादा मुंबईत असायचे. त्यांनी लग्नाला विरोध दर्शवला होता. परंतु दादा तेव्हा कमवत नसत. ते बाबांवर अवलंबून असायचे. त्यामुळे त्यांचे बाबांनी ऐकले नाही. आमच्या चौथ्या आईला दोन मुलगे व तीन मुली झाल्या. दादा सोडल्यास आम्ही सर्वच भावंडे बाबांना म्हातारपणीच झालो. त्यामुळे वडील म्हणजे आम्हाला आजोबांसारखेच वाटायचे. आमचे वडील  १९७१मध्ये निधन पावले.

आम्ही सावत्र भावंडे आहोत, असे कधीच कोणाला वाटले नाही. दादा सर्वांत वडील भाऊ. लहान भावंडांची सर्व जबाबदारी त्यांच्यावर पडली; आणि ते आम्हाला सोडेपर्यंत त्यांनी ती पार पाडली.

वडिलांचा कौलांचा व्यापार होता. त्यात त्यांना 1956 मध्ये बरीच खोट आली व धंदा बुडाला. कुटुंबाची फारच वाताहत झाली. वडिलांनी कुटुंब फार वाढवून ठेवले होते आणि त्याची सर्व जबाबदारी दादांवर पडली. त्यातच दादांना 1952 मध्ये क्षय झाला होता. नंतर टायफॉईडनेही ते आजारी होते. प्रकृतीशी त्यांना सतत झगडा द्यावा लागला. किडनीने आजारी पडले आणि त्यांना त्यांचा अंत दिसू लागला. एक दिवस ते म्हणाले, ‘‘मी टी.बी.नी शिग झयलू. तवांच मरायाचो. पण 1950 ला भारतात पैल्यांदा स्ट्रेप्टोमायसिन अयलां आनि मी त्यातून वाचलू. 24  वर्सांचा आयुष्य मला मिलला, ही काय कमी नाय. मोप जगलूं!’’

बहुभार्या प्रतिबंधक कायदा मुसलमानांना लागू व्हावा, हे कदाचित त्यांना आमच्या कुटुंबानेच शिकवले असणार! कारण ऐन उमेदीच्या काळात ते डॉ. लोहियांचे अनुयायी होते. आणि डॉ. लोहिया म्हणायचे, ‘‘.... आणि तीन बायका एकापाठोपाठ गेल्यानंतर चौथ्यांदा लग्न करणारा पुरुष भला नव्हे. एका मागोमाग तीन बायका नैसर्गिक मृत्यूने अकस्मात मृत्यू पावल्या, असे क्वचितच घडते. हेळसांड अथवा गरिबीमुळेच बहुधा बायका मरत असतात.’’ कुटुंबनियोजनविषयीचा धडासुद्धा असाच मिळाला असणार. म्हातारपणी वडिलांना मुले होत राहिली. बहिणींची लग्ने झाल्यावर त्यांनाही वर्षाकाठी एक मूल आहेच. मुलांचे हाल उघड्या डोळ्यांनी पाहिल्यावर  कुटुंबनियोजन कसे आवश्यक आहे, हे शिकायला  समाजशास्त्रज्ञानाची जरुरी नव्हती.

दादा शाळेत गेले, पण धड शिकले नाहीत. आठवीत असताना पहिल्या वर्षी ते नापास झाले. दुसऱ्या वर्षी परीक्षेच्या वेळी मुंबईला पळून गेले आणि त्यामुळे घरात खूप घबराट निर्माण झाली. वडिलांना तोपर्यंत त्यांच्या स्वभावाचा नीट परिचय झाला होता. त्यांनी ते मुंबईलाच गेलेले असणार हे जाणून मुंबईला आले व त्यांना समजावून घेऊन गेले. तिसऱ्या वर्षी अर्थातच ते पास झाले! शाळेत बसून अभ्यास करण्याऐवजी लोकमान्य टिळक लायब्ररीत बसून साहित्याचा व इतिहासाचा अभ्यास करणे त्यांना अधिक पसंत असे.

शाळेत असताना ते सेवादलात जाऊ लागले. पाकिस्तानच्या वातावरणाने सर्व मुसलमानांची मने जेव्हा भारून गेली होती, तेव्हा ते ‘महात्मा गांधी की जय’ म्हणत होते. गावातील पोरे जेव्हा मुस्लिम गार्डसारख्या अत्यंत जात्यंध संघटनेत कवायत करीत होती, तेव्हा ते सेवादलात जाऊन राष्ट्रसेवेचे धडे घेत होते. एकदा ईद मिलादच्या दिवशी आमच्या गावच्या शाळेत मुसलमानांचा एक ‘जलसा’ भरला होता. त्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा झाल्या. कार्यक्रम धार्मिक असताना त्यात राजकारण कशाला? मुसलमान धर्म आणि राजकारण यात फरक करत नाहीत. पण मग त्यांचेच राजकारण का; आमचे का नाही? त्या ‘जलसा’मध्ये हमीदभाईंचा आमच्या गावातलाच एक देशा नावाचा मित्र होता. सध्या तो एस.टी.मध्ये ड्रायव्हर आहे. त्याने आणि हमीदभाईंनी पाकिस्तानच्या घोषणा ऐकल्यावर ‘इन्किलाब जिंदाबाद... महात्मा गांधी की जय’च्या घोषणा दिल्या. सभेत एकच गोंधळ माजला. देशाला धरून लोकांनी कुटला. दादा पळून गेले. त्या जलशात आमचे वडीलही होते व ते चिपळूण तालुक्यातील मुस्लिम लीगचे एक नेते होते. नंतर दादांनी बाबांना आठ- दहा दिवस तोंड दाखवले नाही.

आमच्या गावातच असे संघर्षाचे प्रसंग त्यांच्यावर लहानपणापासून आले आणि त्यांच्यावर तुटून पडणारी माणसेही आमच्या नात्यागोत्यातलीच असत. त्यात सर्व राजकीय पक्षांचे लोक असत. हिंदू-मुस्लिम प्रश्न म्हटला की, सर्व एकत्र यायचे. गावात त्यांना कधी अनुयायी मिळाला नाही. अलीकडे काही तरुण मुले त्यांच्या विचारांकडे आकर्षित होऊ लागली होती, परंतु ती गावातील धर्मलंड पुढाऱ्यांना अजूनही आव्हान देऊ शकलेली नाहीत.

1974 ला चिपळूणमध्ये मुस्लिम स्त्रियांची एक परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी धर्मांध पुढाऱ्यांनी काही दारू अड्डे चालवणाऱ्या गुंडांना हाताशी धरून दादांची मोटार परशुरामच्या घाटीतून ढकलून द्यायची तयारी केली होती; परंतु दादा एक दिवस आधीच गावाला गेले आणि त्या प्रसंगातून केवळ अपघात म्हणून वाचले! परंतु गुंड तेवढ्यावर समाधान मानणारे नव्हते. ते रात्रीचे गावात येऊन हैदोस घालून गेले. दुसऱ्या दिवशी एस.टी. अडवून त्यांनी परिषदेला जाणाऱ्यांना त्रास दिला. दगडफेक केली. त्यात आमच्या बहिणीलाही दगड लागला. इतकी दहशत निर्माण केली की, आजूबाजूच्या गावांतून आलेल्या अनेक स्त्रिया परत गेल्या.

गावातल्या लोकांची दादांविषयीची भूमिका केवळ मुस्लिम प्रश्नांमधून निर्माण झाली असे नव्हे; त्याला आणखी काही कारणे घडली. त्यापैकी दोनच कारणे इथे देतो, म्हणजे त्याचे स्वरूप लक्षात येईल.

दादा शाळेत असतानाच दुसऱ्या महायुद्धामुळे घासलेटची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. गावात मुसलमान हे खोत. इतरांपेक्षा खूपच श्रीमंत. गावातील बौद्ध, हरिजन, कुणबी- इतकेच काय, पण मराठ्यांचेही शोषण करून गबर श्रीमंत झालेले. दलितांचे तर सर्व प्रकारचे शोषण मुस्लिम खोत अजूनही करीत असतात. गावात मुस्लिम खोताचेच किरणामालाचे दुकान होते. तो कुणब्यांना व दलितांना त्यांच्या कार्डावरचे घासलेट देतच नसे. ते घासलेट मागायला आले की, ‘घासलेट संपले’ असे दुकानदार सांगायचा. कुणब्यांना, दलितांना काळोखात रात्री काढाव्या लागायच्या व मुसलमानांची वाडी काळ्या बाजाराने घेतलेल्या घासलेटने रात्रभर उजळायची. सनदशीर मार्गाने उपयोग होत नाही हे पाहिल्यावर, दादांनी रात्री कुणब्यांना बरोबर घेतले आणि घासलेट असलेल्या कंपाऊंडमध्ये जाऊन तेथील काही घासलेटचे डबे तर पळवलेच, शिवाय टाक्या फोडून घासलेट ओतून दिले. या कृतीमुळे अर्थातच दुकानदार व मुसलमान फार चवताळले. पण करणार काय? सर्वच चोरीचा मामला !

गावच्या शेतीची मालकी मुसलमानांकडे व कुळे बहुतेक कुणबी असायची. त्या वेळी खोतांना खंड रूपाने उत्पन्नाचा अर्धा हिस्सा दिला जात असे. कूळकायदा व्हायच्या आधी कुळांनी खंडरूपाने अर्दळ ऐवजी तिर्दळ उत्पन्न खोतांना द्यावे, असा कायदा झाला. खोतांना हे अर्थातच अमान्य होते. कुळांना दम भरून अर्धा खंड वसूल करण्याच्या कारवाया चालू झाल्या. त्याच वेळी दादा आजारी पडल्यामुळे विश्रांतीसाठी गावाला गेले होते. कुणबी त्यांचा सल्ला विचारायला आले. दादांनी अर्थातच कायद्याप्रमाणे उत्पन्नाच्या तिसऱ्या हिश्श्याप्रमाणे खंड द्या, असा सल्ला दिला आणि खोतांचा म्हणजेच दलवाईंचा रोष ओढवून घेतला.

दादांच्या धर्मसुधारणेविषयीची मते दलवाईंना कधीच पटली नाहीत. आणि आपल्या निधनानंतर नात्यागोत्यातली  मंडळी कशी वागतील याचे भान त्यांना मृत्युशय्येवरही राहिले. म्हणूनच महिनाभर आधीच त्यांनी आपले मृत्युपत्र तयार केलेच, पण त्याची अंलबजावणी नीट व्हावी याचीही काळजी घेतली. गावाला प्रेत नेल्यास त्यांची इच्छापूर्ती होऊ शकलीच नसती. मृत्युपत्रानेही त्यांना मृत्योत्तर नात्यागोत्यातल्यांचे वैरत्व पत्करावे लागले.

मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर दादा मुंबईला आले. नोकरीसाठी वणवण भटकले. त्यातच त्यांना क्षयाने ग्रासले. ह्या काळातच त्यांनी कथालेखन केले. ‘बेकार पण कलावंत माणसाची गोष्ट’ ही त्यांच्या ‘लाट’ या कथासंग्रहातील कथा त्यांच्या त्या काळातील जीवनावरच लिहिली गेली आहे. नोकरी नाही, मुंबईत घरही नव्हते. मी सातवी पास झाल्यावर मला पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबईला आणले. मुंबईत तेव्हा आम्ही त्यांचा मित्र जाफरखान यांच्या घरी राहत होतो. जाफरखानचे कुटुंब तेव्हा गावाला गेले होते. कुटुंब तीनच महिन्यांत परतले. जाफरखानची बायको हिंदू होती. सर्वच कुटुंब अतिशय प्रेळ होते. परंतु आम्ही सर्व त्या दोन खोल्यांत राहणे शक्य नव्हते. म्हणून आम्ही कांदिवलीला आमच्या  नातेवाईकाच्या झोपडीत राहायला गेलो. ही झोपडपट्टी भयाण होती. मला मुंबईच्या जीवनाची सवय नव्हती. पावसामुळे  झोपडीत गांडुळे, मुंग्या आणि कधी सापही वावरत असत. जमिनीला पाण्याचा सारखा उपाळा येत असे. आमची बहीण तेव्हा तरुण होती. आजूबाजूला दारूअड्डे असत. मला तिथे राहणे अशक्य झाले. संडासला जाण्यापासून सगळेच वांधे असायचे. सकाळी उठल्यावर दादांच्या खिशातून चार-आठ आणे घ्यायचे आणि चहा-साखर, दूध, पाव आणायचा. तेव्हा न्याहारी व्हायची. दुपारच्या जेवणासाठी पैशांची जमवाजमव करावी लागे. माझी शाळा केव्हाच बंद पडली. त्यातच मला किडनीचा आजार जडला. मला दादांनी गावाला पाठवून दिले. किडनीचे दुखणे माझ्या पथ्यावर पडले आणि त्या नरकवासातून माझी सुटका झाली.

दादांनी लग्न करावे म्हणून बाबांचा सारखा लकडा चालू असायचा. गावातल्या अनेक मुली त्यांना सुचवल्या गेल्या, पण त्यांचे त्याला ठरावीक उत्तर असे, ‘‘मी लग्न करणार नाही!’’ पण हे खोटेच असायचे. मी मुंबईला असताना, त्यांचे एका हिंदू मुलीवर प्रेम होते, हे मला व बहिणीला माहीत होते. परंतु त्यांनी लग्न ठरवले, ती मुलगी वेगळीच होती. बाबांचा अर्थातच विरोध नव्हता. मुलीचा फोटो पाहिल्यावर मात्र ती हिंदूच असेल, असे आम्हाला वाटले होते. भाभीचा फोटो पाहिल्यावर आम्ही सर्वच खूश झालो. बाबांनी लग्नाआधीच भाभींचा फोटो ओटीवर लावला. आमच्याकडे स्त्रीचा फोटो केव्हाच ओटीवर लावला जात नाही, पण बाबांनी भाभींच्या फोटोचा अपवाद केला!

लग्न झाल्यावर दादा भाभीला घेऊन गावाला आले. आठ-दहा दिवस आमचे घर उत्साहाने ओथंबून गेले होते. सगळ्यांना भाभी फारच आवडल्या होत्या. आमच्या गावात तेव्हा वीज आली नव्हती. रात्री घासलेटच्या दिव्यात भाभींना काळोखच वाटायचा. त्यातच एक-दोनदा विंचू दिसला. त्यामुळे भाभी फारच घाबरायच्या. काळोख झाला की, त्या खाटेवरून खाली उतरतच नसत. याची आम्हाला खूप गंमत वाटायची.

मी 1962 ला मॅट्रिक झालो आणि मुंबईला आलो. त्या वेळी दादांनी जोगेश्वरीला मजासवाडीत एक सिंगल रूम घेतली होती. त्यात दादा, भाभी, रुबीना(मुलगी), फातिमा (बहीण) व मी अशी पाच माणसे राहत असू. मच्छर, ढेकूण आणि कमालीचा उकाडा त्या खोलीत नांदत होता. दादाला रेल्वेत नोकरी लागली होती, परंतु संपात भाग घेतल्यामुळे सहा महिन्यांतच नोकरी गेली. आमचे गाववाले ट्रकचा धंदा करीत असत. दादांच्या डोक्यात ट्रकचा धंदा शिरला. मामाकडून पैसे घेऊन त्यांनी स्क्रॅपमधील एक ट्रक ओढत आणला. हा ट्रक आणि ‘चिं. वि. जोशींची मोटर’ (‘जुने ते सोने’) यात खूप साम्य होते. कधी तरी ह्या ट्रकवर सविस्तर लिहिता येईल. या ट्रकचा एक पार्ट रोज नादुरुस्त व्हायचा  आणि भाभीचा पगार असेल त्या दिवशी हटकून काही तरी मोठे नुकसान व्हायचे! कधी हेडला क्रॅक जायचा, कधी रेडिएटर फुटायचा, कधी टायर बर्स्ट व्हायचा; क्लच, प्लेट आणि ॲक्सेल तुटणे हा तर या ट्रकचा गुणधर्मच झाला होता. मग दादा मला भाभीच्या ऑफिसला पाठवायचे. भाभीचा पगार झालेला असायचा. त्या मला पाहताच पगाराचे पाकीट काढायच्या आणि त्यातील दादांनी मागितलेली रक्कम द्यायच्या. ऑफिसमधली कारकून मंडळी फार चमत्कारिक नजरेने आमच्याकडे पाहायची.

आमचे गाववाले ट्रकचा धंदा करायचे म्हणजे ड्रायव्हर, बिगाऱ्यांचे श्रम चोरायचे. त्यांना वेळेवर पगार न देणे, चार थोबाडीत लगावणे, सतत अंगावर भुंकणे- हे दादांना जमत नसे. त्यामुळे ड्रायव्हर, बिगाऱ्यांच्या अंगावरच त्यांचे पैसे असायचे. संवेदनशील माणसाचा तो धंदा नव्हे. शेवटी तो ट्रक एका पठाणाकडे गेला व त्याने त्याचे पार्ट्‌स काढून विकून खाल्ला! या ट्रकपायी साधारण बारा हजारांचे कर्ज झाले व ते गेली दहा-बारा वर्षे ते फेडीत होते.

जोगेश्वरीची खोली सोडून आम्ही दादरला हिंदमातासमोरील ‘जया टेरेस’मध्ये एका मुस्लिम बाईकडे लीव्ह ॲण्ड लायसेन्सने राहायला गेलो. त्या बाईने आठच दिवसांत आम्हाला घर सोडायला सांगितले. जोगेश्वरीची खोली तर विकून टाकली होती. मालकीणबाई तर दर सकाळी उठून ‘सुबाह’ची नमाज पढायची आणि दोन्ही हात वर करून अल्लाकडे आमच्या कुटुंबाचे वाटोळे व्हावे म्हणून ‘दुवा’ करायची. साधारण तासभर ती आम्हाला खुदाच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहत बसायची. याचा दादा- भाभींना फारच मन:स्ताप झाला.

नोकरीसाठी दादा पुन्हा प्रयत्न करू लागले. तेव्हा ते पाकिस्तानातून दौरा करून आले होते. त्यातच त्यांचा मित्र अशोक पडबिद्री यांनी त्यांच्यासाठी खटपट करून ‘मराठा’त नोकरी मिळवून दिली. त्या वेळी त्यांना दोनशे पंचवीस रुपये पगार मिळायचा. पण ते बेहद्द खूश असायचे. मराठात त्यांचे लेख गाजू लागले आणि पुन्हा ते आपल्या आवडत्या साहित्यक्षेत्राकडे वळले. इंधन कादंबरी याच काळात प्रसिद्ध झाली. ते स्वत:वर खूप खूश असायचे.  स्वत:मध्ये मश्गुल राहणे हा त्यांचा स्वभाव होता. भाभीला ते चेष्टेने म्हणायचे, ‘‘मेहरू, तुजो घोस कमी नाय! त्याला अता नोबल प्राईज मिलयाचां हय! भारतात फक्त ही दोघांनाच मिलनार. एक रवींद्रनाथ टागोर आणि दुसरा हमीद दलवाई!’’

आम्ही सर्वच त्यांच्यावर बेहद्द खूश असू. स्वत:च्या तंद्रीत राहणे त्यांना आवडायचे. सिनेमावर बोलू लागले की, दोन-दोन तास सिनेमाच. संगीतावर बोलू लागले की मग सर्व वातावरण संगीताने फुलवायचे. महाभारत, दुसरे महायुद्ध आणि त्यातही जर्मनीचा फिल्ड मार्शल रोमेल हे त्यांचे आवडीचे विषय. अलीकडे मुस्लिम प्रश्न हा त्यांच्या चर्चेचा खास विषय. त्यांच्याइतका स्मरणशक्तीचा माणूस मला अजूनही पाहायला मिळालेला नाही. हे केवळ भाऊ म्हणून लिहीत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यांची स्मरणशक्ती फोटोस्टेट होती. प्रत्येकक्षण त्यांच्या डोळ्यांपुढे नाचायचा. इंटरला तीनदा नापास होऊनही अपूर्ण शिक्षण ही त्यांच्या प्रगतीतील धोंड झाली नाही. इंग्रजी त्यांना जेमतेमच यायचे, परंतु त्यांचे नव्वद टक्के वाचन इंग्रजीत असायचे. वाचनही कमालीच्या गतीने करायचे. मॅक्झिम रॉडिन्सनचे ‘महंद’ हे पुस्तक एका इंग्रजी साप्ताहिकाच्या मार्क्सिस्ट संपादकाला दादांना भेट म्हणून द्यायचे होते. मीच ती मुलाखत ठरवली होती. पुस्तक हाती आल्यावर दुसऱ्याच दिवशी त्याला भेटायचे होते. अडीचशे पानांचे ते पुस्तक त्यांनी एका दिवसात वाचून काढले आणि त्या संपादकाला भेट म्हणून दिले.

अलीकडील काळात त्यांना बरीच लोकप्रियता मिळाली; परंतु त्यांचा उदो-उदो करणाऱ्यांनाही ते धड आकलन झाले आहेत, असे नाही. मुस्लिमांवर ते बोलायचे म्हणून अनेकांना गुदगुल्या व्हायच्या, हे त्यांच्या लक्षातही यायचे. मधून-मधून ते हे जाहीरपणेही बोलायचे. मुंबईत अमर हिंद मंडळात मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नावर भाषण चालू असताना श्रोत्यांचे चेहरे फुलले होते, पण भाषणाचा शेवट करताना ते म्हणाले, ‘‘हिंदू स्त्रियांचा प्रश्न मिटला आहे, असे मी समजत नाही. स्त्रियांना जखडून ठेवणारी विवाहसंस्था जोपर्यंत अस्तित्वात आहे आणि पतीशिवाय मुलांना जन्म देण्याचे स्वातंत्र्य जोपर्यंत स्त्रियांना मिळत नाही, तोपर्यंत स्त्री मुक्त झाली आहे, असे मी समजत नाही...’’ या त्यांच्या शेवटच्या वाक्याने श्रोत्यांचा उत्साह मावळला होता.

(साधना : 14 मे 1977)

ताजा कलम

हमीदभाईंचे निधन झाले त्याला आता 40 वर्षे झाली आहेत. मधल्या काळात बरेच पाणी वाहून गेले. इस्लाम धर्मासंबंधी व मुस्लिम समाजाविषयी बरेच संशोधन झाले आहे, त्याचा फायदा हमीदभाईंना मिळाला नाही. त्यांनी उभा केलेला ‘जुबानी तलाक’चा प्रश्न आता पृष्ठभागावर आला आहे. काही अतिधार्मिक लोक सोडल्यास त्यासंबंधीची अनुकूलता निर्माण होत आहे. म्हणजे ‘जुबानी तलाक’ बंद व्हावा अशी मागणी होऊ लागली आहे. मुस्लिम समाजात खूप बदल झाला आहे. पाकिस्तानच्या भूमिकेसंबंधातही मुस्लिम लोक अधिक स्पष्ट भूमिका घेत असून, पाकिस्तान निर्मितीने आपले नुकसान झाल्याचे त्यांना जाणवत आहे. मौलाना आझादांच्या भूमिकेशी संपूर्ण समाजाने निष्ठा दाखवायला हवी होती, असेच आता मुस्लिमांना वाटते.

मुस्लिम समाज हा पूर्णत: धार्मिक आहे, हे लक्षात घेऊनच आपल्या विचारांची मांडणी केली पाहिजे. त्या बाबतीत महात्मा गांधींच्या मार्गाने जाणेच योग्य! हमीदभाईंना आगरकरांचा रॅशनल मार्ग महत्त्वाचा वाटे! या बाबतीत त्या काळातही माझे-त्यांचे मतभेद व्हायचे, तेव्हा ते मला ‘‘तू युक्रांदीय-समाजवादी भूमिकेतून समाजाकडे पाहतोस.’’ असे म्हणायचे. मात्र हमीदभाईंच्या रॅशनल  भूमिकेमध्ये जीना व सावरकर यांना स्थान नव्हते. जीना व  सावरकर हे दोघेही द्विराष्ट्रवादी विचारांचे जनक होते, असे ते ठासून सांगत असत.

आज आंतरराष्ट्रीय संदर्भात मुसलमानांच्या प्रश्नांची मांडणी करणारे बरेच विचारवंत व त्यांचे साहित्य जगभर निर्माण होत आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे ते आपल्याकडे उपलब्ध होत आहे. अशावेळी मुस्लिम प्रश्नांविषयी अत्यंत तळमळीने विचार करणाऱ्या हमीदभाईंची उणीव मला प्रकर्षाने जाणवते.

(3 मे 1977 रोजी हमीद दलवाईंचा मृत्यू झाला. त्यांचे धाकटे बंधू हुसेन दलवाई हे काँग्रेस पक्षाचे नेते असून, सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. 40 वर्षांपूर्वी त्यांनी साधनात लिहिलेला ‘माझा दादा’ हा लेख आणि आताचा ‘ताजा कलम’ विचारप्रवृत्त करणारा आहे.- संपादक)

Tags: मेहरूनिसा दलवाई हमीद दलवाई हुसेन दलवाई mehrunissa dalwai husain dalwai hamid dalwai weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

हुसेन दलवाई ( 6 लेख )
dalwaih@yahoo.co.in

काँग्रेस पक्षाचे खासदार




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी