डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

ही परिस्थिती अधिकच असह्य झाली, ती जबाबदार म्हणवणाऱ्या काही तथाकथित माध्यमांमुळे. या माध्यमांनी आपल्या पत्रकारितेतील नैतिकता आणि निकष धाब्यावर बसवत कोरोना संक्रमणाचे खापर संपूर्ण समुदायावर फोडले. अतिशय विश्वसनीय समजल्या जाणाऱ्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, ना या कृतीची दखल घेतली, ना त्यांनी या माध्यमांना नियम पाळण्याची सूचना केली. अतिशय खेदजनक वाटावी अशी ही एकवाक्यता (unison) आहे.

दिनांक: 07 एप्रिल 2020

प्रति                                        

श्री नरेंद्र मोदीजी, 

भारताचे पंतप्रधान 


    विषय :     ‘तब्लिग-ए-जमात’मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे जमातवादी सनसनाटीकरण 

            (परिस्थितीला आलेले जमातवादी सनसनाटी स्वरूप)


‘कोरोना व्हायरस’विषयी आरोग्य मंत्रालयाकडून दररोज दिल्या जाणाऱ्या संक्षिप्त वार्तेमध्ये ‘तब्लिग-ए-जमात’चा वारंवार केला जाणारा उल्लेख ऐकून मला आलेली अस्वस्थता आणि झालेल्या वेदना तुमच्यापर्यंत पोहचाव्यात, म्हणून मी आपणास हे पत्र लिहीत आहे. दि. 13 ते 15 मार्चदरम्यान दिल्लीत आयोजित करण्यात आलेले ‘तब्लिग-ए-जमात’चे वार्षिक संमेलन समर्थनीय आहे, असे म्हणण्याचा येथे अजिबात उद्देश नाही. कोरोना संक्रमणाने संपूर्ण जगाला ग्रासलेले असताना अशा स्वरूपाचे संमेलन आयोजित करणे, ही मरकझची गंभीर चूकच होती. मात्र, मरकझचा हा कार्यक्रम जाणीवपूर्वक आयोजित करण्यात आला, किंवा काही लोकांनी केलेल्या वर्णनानुसार हा ‘कोरोना जिहाद’चा प्रकार होता, असे मात्र म्हणता येणार नाही. या घटनेकडे अगदी प्रामाणिकपणे पाहिल्यास लक्षात येते की बालाजी, वैष्णोदेवी किंवा लंडनमधील इस्कॉन इत्यादी ठिकाणी याच काळात आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक संमेलनांसारखेच मरकझचे आयोजन होते. म्हणूनच कोरोनामुळे संक्रमित झालेल्या मरकझमधील व्यक्तींकडे गुन्हेगार म्हणून न पाहता, त्यांच्याकडे (कोरोनाचे) पीडित म्हणून पाहिले गेले पाहिजे.  

आरोग्य विभागाचे सहसचिव आणि गृह विभागाचे सहसचिव यांच्या अधिकृत संक्षिप्त वार्तेत होत असलेल्या   ‘तब्लिग-ए-जमात’च्या विशेष उल्लेखाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. या संक्षिप्त वार्तेमध्ये एकूण कोरोनाबाधित व्यक्ती आणि त्यापैकी मरकझशी संबंधित व्यक्ती असे वर्गीकरण करण्यात आले. सरकारी अधिकाऱ्यांनी एका समाजाकडे असा अंगुलीनिर्देश करणे सर्वथा अनुचित व अनैतिक आहे. या प्रकारचे वर्तन सामाजिक आयुष्यातील नियमांच्या नक्कीच विरोधात जाणारे आहे.  

भारत या रोगाशी प्राण पणाला लावून लढत असताना, सरकारी अधिकाऱ्यांचे हे निष्ठूर वर्तन आपल्याला विचार करायला भाग पाडते की- एका विशिष्ट समुदायाचे नाव घेण्याची सूचना त्यांना थेट वरिष्ठांकडून मिळाली होती, की आपले सार्वभौम कर्तव्य पार पाडताना ही मंडळी निव्वळ बेजबाबदार आणि असंवेदनशीलपणे वागली? भारतासारख्या विविधता असणाऱ्या देशात एका विशिष्ट समाजाला कोरोना संक्रमणासाठी जबाबदार ठरवणे आक्षेपार्हच तर होतेच, पण अनावश्यकही होते. व्यवस्थेचा एका विशिष्ट समुदायाविषयी असणारा पूर्वग्रहच यानिमित्ताने अधोरेखित झाला आहे.  

ही परिस्थिती अधिकच असह्य झाली, ती जबाबदार म्हणवणाऱ्या काही तथाकथित माध्यमांमुळे. या माध्यमांनी आपल्या पत्रकारितेतील नैतिकता आणि निकष धाब्यावर बसवत कोरोना संक्रमणाचे खापर संपूर्ण समुदायावर फोडले. अतिशय विश्वसनीय समजल्या जाणाऱ्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, ना या कृतीची दखल घेतली, ना त्यांनी या माध्यमांना नियम पाळण्याची सूचना केली. अतिशय खेदजनक वाटावी अशी ही एकवाक्यता (unison) आहे. 

एकीकडे आपण सर्वांनी कोरोनाच्या धोक्याकडे लक्ष केंद्रित केले असताना, दुसरीकडे मात्र ‘मरकझच्या अराजकाचा स्फोट’ अशा स्वरूपाची वाक्ये प्रसारित होऊ लागली होती, तर ‘तब्लिग व्हायरस’ आणि ‘कोरोना जिहाद’ यांसारखे विषय चर्चेत (trending) होते. व्हायरसवरील चर्चा तत्काळ जमातवादी झाल्याचे या घटनांमधून समोर आले. आपल्या देशात घडणाऱ्या सर्वच चुकांसाठी मुस्लिम समाजाला जबाबदार धरण्यासाठी माध्यमांतील एक भागाने स्वतःला वाहून घेतले असल्याचेही या निमित्ताने दिसून आले. 

या वृत्तीमुळे आकडेवारीचे वृत्तांकन करताना अनेक चुका घडल्या. मिशिगन स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन येथे सहयोगी प्राध्यापक असणाऱ्या जोयोजीत पाल यांनी Scroll.in वर व्यक्त केलेले मत त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर- ‘जमातशी संबंधित असणाऱ्या पॉझिटिव्ह (कोरोनाबाधित) केसेसचे विश्लेषण करण्यासाठी, घेण्यात आलेल्या एकूण नमुन्यांची माहिती देणेही आवश्यक आहे. कोरोनाबाधितांच्या एकूण केसेसपैकी 60 टक्के केसेस या जमातशी संबंधित असल्याच्या बातम्या दिल्या जात असताना, चाचणी केलेल्या लोकांमध्ये जमातशी संबंधित किती लोक होते याचीही माहिती संबंधितांनी द्यायला हवी.’

आकडेवारीचे वृत्तांकन करताना पाळायच्या मूलभूत नियमांकडे बहुतांश माध्यमांनी दुर्लक्ष केल्यामुळे, या आकड्यांना सनसनाटी स्वरूप आले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, त्यांचे चुकीचे वार्तांकन करण्यात आले. अनेक वरिष्ठ संपादक आणि विशेषत: केंद्र सरकार यांच्या भाबडेपणामुळे व चुकीमुळे तब्लिग-ए-जमातला कोरोना पसरवणारा विशिष्ट प्रबळ समूह समजण्यात आले. परिणामी, त्यांच्या संमेलनाविषयी चुकीचे उल्लेख आणि निराधार आरोप करण्यात येऊ लागले.     

यामुळे अनेक संघटनांचे आयटी सेल आणि सोबतच कित्येक माध्यमसमूहांनी कोरोना संक्रमणाच्या प्रसारासाठी मुस्लिमांना जबाबदार धरण्याचा मूर्खपणा केल्यामुळे कोरोनाला अत्यंत जमातवादी स्वरूप आले, त्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली.       

शेवटी मी आपल्याला इतकेच सांगू इच्छितो की, अधिकाऱ्यांची आणि माध्यमांची ही पूर्वग्रहदूषित वृत्ती सत्यापर्यंत पोहोचण्यात आता आपली मदत करत नाही आणि हे पाहून माझ्या हृदयाला अतिशय वेदना होत आहेत. ही मंडळी (पूर्वग्रहाने) आजारी असून, ‘सर्वप्रथम सत्य’ प्रसारित करण्याच्या आपल्या मूळ जबाबदारीलाही त्यांनी हरताळ फासला आहे.          

आपल्या प्रिय देशाला या उपद्रवी मूल्यांचे भक्ष्य बनण्यापासून आणि त्यायोगे या देशाला व्यर्थ रक्तबंबाळ होण्यापासून वाचवण्यासाठी आपण प्रतिबंधात्मक उपाय कराल, अशी मी अपेक्षा आणि आशा व्यक्त करेन.    

अतिशय आदरपूर्वक -                               

आपला नम्र, 

हुसेन दलवाई

माजी खासदार, 

राज्यसभा


(अनुवाद : समीर शेख)

Tags: मोदींना पत्र पत्र मेडिया कोव्हीड 19 कोरोना तबलीघी अनुवाद समीर शेख हुसेन दलवाई epidemic covid 19 corona sameer shaikh translation tablighi open letter letter to pm hussain dalwai weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

हुसेन दलवाई
dalwaih@yahoo.co.in

काँग्रेस पक्षाचे खासदार


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात