डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

महात्मा ते महात्मा... पूर्वार्ध

महात्मा ते महात्मा समता ‘पदयात्रा’ महात्मा जोतिबा फुल्यांच्या वाड्यातून 2 जानेवारी रोजी सुरू झाली. ही यात्रा वर्धा येथील महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमापर्यंत (28 फेब्रुवारी रोजी) जाणार आहे.

सर्व क्षेत्रांतील समतेसाठी लढणारे डॉ.बाबा आढावा, भाई वैद्य,डॉ.सुगन बरंठ, एन.डी.पाटील यांनी यात्रेला शुभेच्छा दिल्या. डॉ. यशवंत सुमंत यांच्या वैचारिक नेतृत्वाने व चाळिसेक समतावादी संघटनांनी पुरस्कारलेली ही यात्रा, जवळजवळ एक हजार किलोमीटरचा प्रवास करून 110 गावांतून संवाद साधत 900 किलोमीटर जाणारी ही समता यात्रा, महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे उपाध्यक्ष आबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करू लागली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चवदार तळ्याचे पाणी दलितांसाठी खुले केले, तेथील पाणी व महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी खुल्या केलेल्या विहिरीतील पाण्याची कावड समतेचे प्रतीक म्हणून पदयात्री वाहत आहेत.

या यात्रेचे नेतृत्व करणारे दुसरे व्यक्तिमत्त्व, विजय दिवाण यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते, कारण त्यांचा सतत आग्रह आहे की, सर्वोदयचं नेतृत्व दलितांकडे गेले पाहिजे. पदयात्रेचा पहिला पडाव पुणे येथे साने गुरुजी स्मारकावर झाला. संजीव साने व प्रा. सुभाष वारे यांच्या शुभेच्छा स्वीकारून यात्रा आगाखान पॅलेस येथील कस्तुरबा गांधी व महादेवभार्इंच्या समाधीचे दर्शन घ्यायला गेली. आवाबेन नवरचना केंद्रात, सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त महिलांशी संवाद करताना समोर आले की, महिलांसाठी काम उपलब्ध आहे, पण पुरेशा महिला उपलब्ध नाहीत.

4 जानेवारी रोजी, वाघोलीत दगडखाण कामगारांशी संवाद होता. अँड. बी. एम. रेगे व त्यांच्या पंजाबी सहचारिणीने झिंदाबाद म्हणून स्वागत केले. त्यांनी दगडखाण कामगारांसाठी 1997 साली ‘संतुलन’ ही संस्था स्थापन केली आहे. पाषाण शाळा व ‘दगडफूल’नावाचे नियतकालिकही निघते. पुणे परिसरातील काँक्रीटचे जंगल उभे करण्यासाठी लागणारी खडी या वाघोली परिसरातून उपलब्ध होते. वाघोलीत दगडांच्या 375 खाणी असून, 466 दगडखाणी क्रेशर चालतात. जगण्याचे साधन म्हणून दुष्काळग्रस्त, भूमिहीन, दुर्बल,आदिवासी बेरोजगार कुटुंबे प्रचंड गतीने या व्यवसायाकडे वळतात. राज्यभरात सुमारे 50-60 लाख कामगार या व्यवसायात आहेत. ते एका खाणीवरून दुसऱ्या खाणीवर स्थलांतर करतात, त्यांची आठ ते दहा लाख मुले शिक्षण व आरोग्यापासून वंचित आहेत.

 ‘संतुलन’ संस्थेचे काम पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व अहमदनगर या पाच जिल्ह्यांतून चालते. तेथे सुमारे पाच हजार मुले पाषाण शाळांतून शिक्षण घेत आहेत. ‘बालमजुरमुक्त खदान, यह है हमारी पहचान’ हे त्यांचे घोषवाक्य आहे. पुणे परिसरात 28,530दगडखाण कामगार कुटुंबे आहेत. 3074 मुले 60 पाषाणशाळांतून शिकतात.

आम्ही दगडखाणीला भेट दिली. या खाणीतून काम करणारे मराठवाड्यातील, तसेच यु.पी., बिहार व कर्नाटकातील आहेत. खाणीतून काढलेले दगड फोडण्याचे व ट्रॅक्टरमध्ये भरण्याचे काम करावे लागते. एक ट्रॅक्टर भरेल इतके दगड फोडण्याची मजुरी 60 रुपये मिळते. व ट्रॅक्टरमध्ये भरण्यासाठी 35 रुपये मिळतात.  ट्रॅक्टर भरण्याचे काम एकेका जोडीला करावे लागते. दिवसाकाठी 3 ते 4 ट्रॅक्टर भरून होतात. दगड वाहतूक करणाऱ्या ट्रक ड्रायव्हरला आठवड्याला 900 रुपये पगार मिळतो.

हे लोक खाणीच्या भोवतीच दगडावर दगड रचून, वर पत्रा टाकून घर बनवतात. घरांची उंची असते चार फूट. आमच्याबरोबर असलेल्या पदयात्री कुसुमताई ढगे वाकून घरात जाऊन आल्या. त्या म्हणाल्या, आत उभेच राहता येत नाही, तर ती स्त्री साडी कशी नेसत असेल?

दुपारी कामगार महिलांशी संवाद झाला. नवरा दारू पितो, सरकार दारू बंद करत नाही तर सत्तेवर का आहे? असा प्रश्न एका महिलेने विचारला. दगडखाणीत काम करणाऱ्याचा/आमचा पगार का वाढत नाही? असा प्रश्न एका भगिनीने विचारला. कामाला गेले नाही तर चूल पेटत नाही. बारा महिने काम मिळाले पाहिजे. नवरा वारला. या महागाईत तीन मुले कशी सांभाळू? पिवळे रेशनकार्ड हवे. मुलांना शिक्षण मोफत मिळावे, पाणी लांबून आणावे लागते, त्यात वेळ जातो. मग मजुरी कमी मिळते. आजारी असले तरी कामावर जावे लागते, नाहीतर खोली सोडा म्हणतात. आता इथल्या खाणीतले दगड संपले, मग इथली झोपडपट्टी उठवली तर काय करावे? असे प्रश्न आणि प्रश्नच....

00

4 जानेवारीला फुलगावला धोत्रे विद्यालयाच्या प्राचार्या मुल्ला मॅडमनी स्वागत केले. शाळेभोवती शेती, डोंगर, भरपूर मोकळी जागा, मुले पांढरा शर्ट व डोक्यावर गांधी टोपी अशा गणवेशात. बसलेल्या मुलीही सलवार कमीजमध्ये दिसत होत्या. त्यांच्याशी संवाद साधताना सत्याग्रहावर बोलावे लागले.  गांधींजीनी सर्व जनतेला स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेण्यासाठी इंग्रजांना सत्य सांगू या, तुम्ही परके आहात, हा देश सोडून निघून जा. यातून सामान्य जनता आंदोलन करू शकली. आपलं महाराष्ट्र सरकार आता अन्नधान्यापासून दारू बनविण्याचे परवाने देत आहे. त्याला सत्याग्रहाने विरोध करता येईल. विद्यार्थ्यांनी मुख्ममंत्र्यांच्या नावे पोस्टकार्ड पाठवावे, त्यात एकच वाक्य लिहिले तरी पुरे....‘अन्नधान्यापासून दारू बनविण्याचा निर्णय रद्द करावा...’ असा तुम्ही सत्याग्रह करू शकता. विद्यार्थ्यांशी बोलताना भरमसाठ फीचा प्रश्न येतोच. फुलगावला सैनिकी शाळा आहे. तिथे लाखात फी मोजावी लागते. डोनेशन द्यावे लागते. अशी काहींनी तक्रार केली.

‘इनव्हेस्टमेंट इन मॅन ट्रस्ट’ ही संस्था प्रशिक्षणाचे काम करते. अंगणवाडी शिक्षिकेचे प्रशिक्षण सुरू होते, त्यांच्याशी संवाद झाला.

बऱ्याच शिक्षिकांनी चर्चेत भाग घेतला. अंगणवाडी शिक्षिका समाजसेवा म्हणून करायची आहे, त्यामुळे त्यांना मानधन मिळते. लहान गटासाठी मिनी अंगणवाडी 15 ते 20. मानधन 750 रुपये. वरील गटाला 20 ते 40 मुले 1800 ते 2300 आता मानधन झाले आहे. तीनचार महिन्यांतून एकदा पगार मिळतो. मुलांना आहार देण्याची व्यवस्था करावी लागते. विधवा व गरीब वर्गातील स्त्रिया अधिक आहेत अशी त्यांनी माहिती दिली. झाडलोट, मीटिंग सर्व त्यांना करावे लागते. विद्यार्थ्यांच्या आहार वाटपाला पर्याय नाही. शिक्षिकेचे नातेवाईक मयत झाले असले, तरी आहार वाटप करूनच तिकडे जावे लागते. हक्काची रजा नाही. मे महिन्यात 15 दिवस मदतनीस मिळते, मिनी अंगणवाडीला तेही नाही. दिवाळीत पाच दिवस सुट्टी असते.

5 जानेवारी, सणसवाडी येथे पदयात्रेचे स्वागत झाले. चौकातच लोक गोळा झाले होते. पदयात्रेचा उद्देश आबा कांबळेंनी मांडला. महिला सरपंच स्वागताला हजर होत्या, इतर सदस्यही होते.

रामदास लोखंडे हा तरुण धावपळ करीत होता, त्याने बुद्धवाड्यात जाण्याचा आग्रह धरला. पदयात्रा घेऊन गेलो. मंदिरात गेलो. 2007साली थायलंडमधून आणलेली मूर्ती तिथे बसविली आहे. मूर्तीचे वजन 320 किलोचे आहे. मूर्ती अतिशय लोभस आहे.  बुद्धिस्ट मूव्हमेंट सेंटर (ट्रस्ट)ला ही मूर्ती भेट देण्यात आली असल्याचे सांगितले. रामदास लोखंडे बी.ए. झाला आहे. पुढे शिकता येत नाही,शिक्षणाची फी कमी झाली पाहिजे, शिक्षणाचे खाजगीकरण बंद झाले पाहिजे असे विचार त्याने मांडले. आरक्षणामध्ये दलितांमधील 52 जाती येतात, म्हणून नोकऱ्या मिळणे सोपे नाही असेही त्याने सांगितले. बुडगा जंगम, माला जंगम, लिंगडेर अशांनी नोकऱ्या पटकावल्या आहेत अशी तक्रार त्याने केली.

11 वाजता शिक्रापूरला जाहीर सभा होती. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात श्री सोमनाथ भुजबळ अध्यक्ष समता परिषद वाट पहात होते. बापूसाहेब जकाते- सरपंचही होते. मराठा, माळी, हिंदु-मुस्लिम अठरा पगड जाती तिथे आहेत. रोजगार हमीची कामे बंद आहेत, कारण काम मागणीसाठी कोणी येत नाही असे कळले.

शिक्रापूरला एम.आय.डी.सी. झाली आहे. युपी, व बिहारी लोक कामगार आहेत. त्यांचा आरोग्य, शिक्षणाचा बोजा ग्रामपंचायतीवर पडतो. असे 15 ते 20 हजार लोक बाहेरचे आहेत. स्थानिक 5 ते 10 टक्के लोकच नोकरीत आहेत. बाहेरचे लोक अधिक वेळ काम करतात. स्थानिकांनी छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले आहे.

शेतमजूर मिळत नाहीत, त्यामुळे ज्यांची शेती आहे ते लोक एकमेकांच्या मदतीने शेतीची कामे करतात, त्याला ‘सावड’ म्हणतात. शेतीमालाला आधारभूत भाव मिळाले पाहिजेत. शेतकऱ्यांना बियाणे व खते मोफत दिली पाहिजेत असे विचार व्यक्त करण्यात आले.

धान्य उत्पादन वाढवण्यासाठी संकरित बियाणे आणली. खत, बियाणे सुरुवातीला मोफत दिले, त्यातून उत्पादन वाढलं, पण भावनाही. शेतकरी सुखी नाही असे विचार मांडले. गावातील लोकांना भेटण्यासाठी मी बाहेर पडलो. चौकात पोस्टासमोर काही मंडळी उभी होती. त्यांना पदयात्रेचा उद्देश सांगितला. गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलो आहोत म्हटल्यावर त्यांनी पोस्ट खात्यातील लोकांच्या व्यथा सांगितल्या.

ग्रामीण भागातील पोस्टाचे कामकाज करणारे हे खातेबाह्य नोकर मानले जातात, त्यामुळे 20-25 वर्षे नोकरी करणारेही अद्यापि कायम झालेले नाहीत. त्यांना 4200 ते 5800 रुपये पगार मिळतो, तेच काम करणाऱ्या कायम नोकरास आता 35 हजार पगार झाला. कायम पोस्टमनला 18 ते 20 हजार पगार मिळतो, आम्हाला मात्र 6 हजारांतच रिटायर व्हावे लागणार आहेत. निदान 10 हजार पगार मिळावा अशी त्यांनी मागणी केली. भारतीय डाक विभागाचे एक परिपत्रक पहायला मिळाले. ग्रामीण डाक जीवन विम्याचे प्रस्तावाबाबत ते होते. पुणे ग्रामीण विभागाला 2009-10 आर्थिक वर्षासाठी 543 कोटी रुपयांचे व 539700 ग्रामीण डाक जीवनविम्याचे प्रस्ताव घेण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणेबाबत होते. याबाबत कर्मचारी म्हणाले, हे उद्दिष्ट पूर्ण करण्याची आमच्यावर सक्ती होते, त्यामुळे आम्ही कर्मचारी मिळून वर्गणी काढतो व उद्दिष्ट पूर्ण करतो. नाहीतर नोकरी जायची भीती. त्या पत्रकात अंडरलाईन करून पुढील मजकूर छापला आहे...

आपले काम वाढवून आपण स्वत:च स्वत:ला मदत करावयाची आहे. जेणेकरून आपले शाखा डाकघराची आस्थापना कायम राहील व आपल्या नोकरीवरती कोणतीही बाधा येणार नाही. तसेच उपडाक घरातील सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून प्रास्ताविक रकमेचे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. मला खात्री आहे, मागील वर्षाप्रमाणेच चालू वर्षात आपण सर्वजण प्रयत्न करून आपल्या विभागाचे नाव संपूर्ण देशामध्ये उज्ज्वल कराल.

सही

अधीक्षक डाकघर

पुणे ग्रामीण विभाग

(‘महात्मा ते महात्मा’ पदयात्रेत सामील झालेल्या हुसेन जमादार यांनी पाठवलेला संक्षिप्त वृत्तात.)

(उत्तरार्ध 13 फेब्रुवारी 2010 या अंकात )

Tags: बिकट आयुष्य कामगार दगडखाण शेतमजूर समस्या मद्यपान समस्या मद्यनिर्मिती टपालखाते आरक्षण समस्या पाषाणशाळा अंगणवाडी ग्रामीण चित्र पदयात्रा महात्मा ते महात्मा हुसेन जमादार No progress hurdles in path of villagers pictures of Village life Hussain Jamadar Reort Mahatma te mahatma Padyatra weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके