डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मोठ्या प्रमाणावर गोंगाट करणं हे 'रानटीपणाचं' लक्षण असून आजच्या काळात ते 'हिंसक' कृत्य आहे. देवभोळ्या जनतेला हे कसं पटवून द्यावं समजत नाही. सुबुद्धी कशास म्हणावी, दुर्बुद्धी कशास म्हणावी याचंच भान आस्तिक समाज हरवून बसला आहे की काय? आदर्श पद्धतीनं गणेशोत्सव सादर करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाकडून यायला हवेत की काय?

तुम्ही शांतताप्रिय नागरिक आहात का?

असाल, तर या देशात तुमचे जगणं मुश्कील आहे. देशातील सर्वोच्च न्यायालय तुमच्या बाजूला असले तरी या देशातील बहुसंख्य जनता तुमच्या विरोधात आहे.

रात्री दहानंतर ध्वनिवर्धकाचा वापर थांबवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश इथल्या बहुसंख्य जनतेला आवडलेला नाही. मुंबई शहरातील गणेशोत्सव मंडळांनी परवा या आदेशाचे बऱ्यापैकी पालन केले. पोलिसांची दहशत आणि न्यायालयाची कठोर भूमिका, ही त्यामागची खरी कारणे होती.. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

एरवी इथल्या उत्सवी समाजाला शांतता प्रिय नाही. शांततेवर मनापासून प्रेम करणारी माणसं धार्मिक उत्सवाच्या नावाखाली चालणाऱ्या हैदोसात सहभागी होत नाहीत. शहरात अशी मंडळी संख्येने कमी आहेत. शासकीय आणि राजकीय क्षेत्रातही त्यांचा वरचष्मा नाही. वृत्तपत्रांत तक्रारवजा पत्र लिहिण्याखेरीज ही मंडळी काही करू शकत नाहीत. सुदैवाने माध्यमं त्यांच्या बाजूची असल्याने तिथं काही प्रमाणात त्यांचा आवाज उमटतो.

तुलनेने गोंगाटावर मनापासून प्रेम करणारी माणसं संख्येने जास्त आहेत. शासकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातही त्यांचे वर्चस्व आहे. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दीपोत्सव, होलिकोत्सव, कृष्णजन्मोत्सव यांसारखे उत्सव म्हणजे त्यांना पर्वणी वाटते. त्यांच्या गोंगाटप्रेमाला या उत्सवात धार्मिक अधिष्ठान मिळाल्यासारखे होते. 

परवाच्या गणेशोत्सवात टीव्हीवाल्यांनी न्यायालयाच्या आदेशासंदर्भात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया अजमावल्या. माणसं न्यायालयाच्या निकालाविरोधात आक्रमक भाषेत बोलताना दिसली. आनंद व्यक्त करण्याच्या आपल्या पद्धतीपासून दुसऱ्यांना त्रास होतो याची जाणीव एकाच्याही प्रतिपादनात आढळली नाही. शांतता ही ज्यांची गरज आहे, अशी माणसंही अस्तित्वात आहेत, या वास्तवाचा स्पर्श एकाही भक्ताच्या मनाला झालेला आढळला नाही. रात्री दहा वाजल्यानंतर बंदीहुकूम आहे, म्हणून रात्री दहाच्या आधी सर्वांनी आपले ढोलताशे बडवून घेतले. न्यायालयाच्या निर्णयाचा मथितार्थ समजून घेण्याचे शहाणपण त्यांच्यापैकी कुणाशीच नव्हते. ईश्वर आणि धर्म या संकल्पनांवर प्रेम करणाऱ्या या समाजाला धर्माची मूलतत्त्वं ठाऊक नाहीत की, ती त्यांच्या हुल्लडबाजीच्या आड येत असल्याने जाणूनबुजून हा समाज त्याकडे दुर्लक्ष करतो? समजत नाही. वास्तविक उत्सवकाळात या उत्सवप्रेमी जनतेकडून धर्माची जी अवहेलना होते, तेवढी ती नास्तिक समाजाकडूनही होत नसेल.

पुण्यात विसर्जनाच्या दिवशी गणेशभक्तांनी दगडच हातात घेतले. जनतेच्या रक्षणासाठी झटणाऱ्या पोलिसांवरच त्यांनी दगडफेक केली. खुर्च्यांची फेकाफेक केली. पोलिसांच्या गाड्या पेटवून दिल्या. हा सगळा तमाशा आपल्याला टीव्हीवर पहायला मिळाला.

उत्सवाच्या निमित्ताने चार माणसं एकत्र येतात. हे लक्षात घेऊन गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकशिक्षण साधता येते का? हे अजमावण्याचा प्रयोग लोकमान्य टिळकांनी केला. हा प्रयोग कितपत यशस्वी झाला, हे पुण्यात अलका टॉकीजच्या चौकात परवा दिसून आलं. बुद्धीचं आराध्य दैवत मानला जाणारा गणपती, त्याच्या मूर्तिसमोरच गणेशभक्तांनी आपल्या विवेकशून्यतेचं दर्शन घडवले.

पोलिसांच्या चतुर हाताळणीमुळे मुंबईत याची आवृत्ती पाहायला मिळाली नाही. पण ढोल आणि ताशे जोरजोराने बडवल्याशिवाय आपले गणेशावर किती प्रेम आहे हे सिद्ध होणार नाही, या भावनेने मुंबईकरांनाही पछाडलेले आहे.

मोठ्या प्रमाणावर गोंगाट करणे हे रानटीपणाचं लक्षण असून आजच्या काळात ते हिंसक कृत्य आहे. देवभोळ्या जनतेला हे कसे पटवून द्यावे समजत नाही.

निदान विसर्जनाच्या दिवशी तरी ‘पारंपरिक गोंगाट' करायची मुभा असावी, म्हणून गणेशभक्तांनी न्यायमूर्तींना अर्जविनंत्या केल्या. हे अर्ज करताना, “बंदी उठवण्याची सुबुद्धी न्यायमूर्तींना दे”, अशी प्रार्थना देखील गणरायापाशी केली असावी.

कारण, अर्जविनंत्यांचा न्यायमूर्तीवर काही परिणाम झाला नाही. विसर्जनासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारची सवलत द्यायला नकार देऊन बंदीहुकूम कायम ठेवला. ही गणरायांनी न्यायमूर्तीना दिलेली सुबुद्धी नाहीतर काय?

सुबुद्धी कशास म्हणावी, दुर्बुद्धी कशास म्हणावी याचंच भान आस्तिक समाज हरवून बसला आहे की काय? 

प्रश्न गणेशविसर्जनाचा नाही, तर विवेकबुद्धीच्या विसर्जनाचा आहे. 

कर्णकर्कश आवाजाने ध्वनिप्रदूषणात भर घालण्याचा प्रयत्न फक्त गणेशभक्तच करतात असे नाही. खाजगी पातळीवरल्या सत्यनारायणाच्या महापूजाही स्पीकर लावून पूर्ण परिसराला ऐकवण्यात येतात. संपूर्ण शहर झोपले असता पहाटे पाच वाजता लाऊडस्पीकर लावून पैगंबराची आळवणी चालते. छत्रपती शिवाजी महाराजांवरचे प्रेमही लाऊडस्पीकरवरून गाणी लावून सिद्ध केले जाते. आंबेडकर जयंतीही याच आवाजी पद्धतीनं साजरी होते.

उत्सवाच्या माध्यमातून आपण समाजोपयोगी कामे करतो, असा दावा करणाऱ्या गणेश मंडळानं आपलं अर्थकारण जनतेसमोर ठेवलं पाहिजे. मंडळ मूर्तीसाठी, सजावटीसाठी किती खर्च करते? आणि समाजोपयोगी कामासाठी किती? हे जाहीर करायला हवे.

उत्सवकाळात टीव्ही, वृत्तपत्रे जोशात असतात. त्यांचे हे सुगीचे दिवस असतात. मूर्ती आणि सजावटीसाठी होणाऱ्या फाजील आर्थिक उधळणीची चर्चा ते माध्यमातून होऊ देत नाहीत. उत्सवात कोणते असे प्रबोधनात्मक कार्यक्रम होतात, हे जनतेला कळायला हवे. भव्य रोषणाई, भव्य देखावे सादर करणाऱ्या मंडळांऐवजी साधेपणानं सादर केलेल्या गणेशोत्सवाबद्दल मंडळांना पुरस्कार दिले पाहिजेत. शांत वातावरणात काढल्या जाणाऱ्या मिरवणुकांसाठी संबंधित मंडळांचा गौरव केला पाहिजे.

आदर्श पद्धतीने गणेशोत्सव सादर करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाकडून यायला हवेत की काय?

असो. ध्वनिवर्धकासंबंधीच्या आदेशाबाबतची नाराजी अजून ओसरलेली नाही. तमाम गणेशभक्त अजूनही सर्वोच्च न्यायालयाकडे क्रोधाने पाहताहेत. न्यायालयीन आदेशाबाबत गणेशप्रेमिकांत आज ज्या कडवटपणे बोलले जातेय ते पाहिलं की, विधायकतेकडून विघातकतेकडे वळू लागलेल्या या माध्यमातील नव्या संघर्षाची चाहूल लागते.

गणेशविसर्जनापूर्वी विवेकबुद्धीचे विसर्जन करण्याचा जो पराक्रम पुणेकरांनी दाखवला, त्याचे 'अ‍ॅक्शन रिप्ले' महाराष्ट्रभर सादर होण्याची शक्यता आहे.

शेवटी धाकदपटशाने प्रस्थापित झालेली शांतता किती काळ टिकणार? जनमानसात शांततेविषयी तीव्र ओढ निर्माण होत नाही, तोवर उत्सवासारख्या सांस्कृतिकदृष्ट्या मौल्यवान माध्यमाचं गोंगाटाशी असलेले हे अनैतिक नाते कायम राहणार.

Tags: अवधूत परळकर Avadhoot Paralkar #Weekly sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके