डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भारताचा 44 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया- इफ्फी) पणजी येथे 20 ते 30 नोव्हेंबर 2013 या काळात पार पडला. सन 2004 पासून गोव्यामध्ये हा महोत्सव कायमस्वरूपी होऊ लागला आहे. पणजीमध्ये इफ्फीने आपलं बस्तान बसवलंय. या वर्षीच्या इफ्फीचा हा एक आढावा....

मिट्ट काळोखात गाडी पुलावर आल्याचं लक्षात आलं आणि दूरवर दिव्यांची रोषणाई दिसू लागली. पणजी शहर जवळ आलं आहे याची जाणीव हा झगमगाट देत होता. दर वर्षीप्रमाणे चित्रपट महोत्सवाकरता येणाऱ्या पाहुण्यांसाठी, प्रतिनिधींसाठी, पत्रकारांसाठी हे शहर सजलं होतं. त्यांचं स्वागत करायला सज्ज झालं होतं. पाचच मिनिटांत गाडी पणजीत शिरली आणि मला जणू आपण आपल्या घरात प्रवेश केल्यासारखं वाटलं. गेली दहा वर्षं सातत्याने याच सुमाराला याच महोत्सवासाठी येत असल्याने या शहराशी झालेली घट्ट ओळख, इथल्या लोकांचा आपलेपणा आणि अर्थातच आयनॉक्स व कला अकादमीमधलं ‘फिल्मी’ वातावरण. किती तरी जण केवळ इथेच दर वर्षी भेटतात. भारतभरातले पत्रकार असतात, फिल्म स्कूल्सचे विद्यार्थी असतात, तर काही निव्वळ आस्वादक. तिकिटांच्या रांगेत उभं असताना आपण पाहिलेल्या सिनेमाविषयी बोलण्याकरता, एखादा सिनेमा नक्की पाहा असं सुचवण्याकरता एकमेकांचं नाव माहीत असण्याची गरज भासत नाही. सगळेच कॉम्रेड. संपूर्ण आसमंतात सिनेमा भरून राहिलेला असतो. वर्षभर ज्याची वाट पाहावी, असा.

या वर्षीचा हा भारताचा 44 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. सुरुवातीला दर एक वर्षाआड हा महोत्सव दिल्लीमध्ये होत असे आणि मधल्या वर्षांत मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू अशा महानगरांमध्ये. मात्र, जगभरात होणारे महोत्सव अशी जागा बदलत नाहीत. एकाच शहरात वर्षानुवर्षं ते होत असतात. त्यामुळे त्या शहराला महोत्सवासाठीच्या स्वत:च्या अशा पायाभूत सुविधा निर्माण करता येतात. येणाऱ्या लोकांसाठीही ते सोईचं होतं आणि कालांतराने तो चित्रपट महोत्सव त्या शहराच्या सांस्कृतिक वातावरणाचा एक अविभाज्य घटक बनून जातो. गेल्या दहा वर्षांमध्ये पणजीतल्या महोत्सवाचं नेमकं हेच झालंय.

अगदी पहिल्या वर्षापासून इथला महोत्सव संपूर्ण शहराने साजरा करायचा, अशी जणू रीतच होऊन गेली आहे. पहिल्या वर्षी भाजपचे मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री होते. त्यांनी दृष्ट लागेल असं आयोजन केलं होतं. त्यानंतर काँग्रेसच्या दिगंबर कामतांनीही आपल्या कारकिर्दीत कोणतीही कसूर ठेवली नाही. पणजीचे रस्ते या काळात अक्षरश: नटलेले असतात. रस्त्याच्या दुतर्फा रोषणाई असते. झाडांवर दिव्यांच्या माळा असतात. रंगीबेरंगी कटआऊट्‌स, खास गोव्याच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारी कलाकुसर, खाण्यापिण्याचे चिक्कार स्टॉल्स आणि नाचगाणी. (अर्थात ही नाचगाणी रस्त्यावर असतात तोवर ठीक आहे, पण या वर्षी थेट आयनॉक्सच्या आवारात बांधलेल्या स्टेजवरून जे काही रंगारंग कार्यक्रम पेश करण्यात आले ते निव्वळ रसभंग करणारे होते. इथे सिनेमाप्रेमी आलेले असतात, त्यांना आपण बघितलेल्या सिनेमांवर चर्चा करायची असते, गप्पा मारायच्या असतात, वाद घालायचे असतात. पण त्यासाठी एकमेकांचे आवाज ऐकू येणं आवश्यक असतं. पार्श्वभूमीला जर बेसूर आणि कर्कश आवाजात गाणी चालू असतील, तर ते शक्य होत नाही याची जाणीव आयोजकांना असायला हवी. (अभिनेता विजय कदम भेटला तेव्हा म्हणाला, ‘दृष्ट लागण्याइतकी बेसूर गाताहेत ही मंडळी!’)

थोडक्यात, पणजी शहराचा अख्खा परिसर म्हणजे जणू एक उत्सव असतो. दि. 20 ते 30 नोव्हेंबर या दहा दिवसांच्या काळात त्या उत्सवात सहभागी व्हायचं- कधी कौतुक करत, तर कधी टीका करतही. पण महत्त्वाचं असतं ते सहभागी होणं आणि सिनेमाविषयी- विशेषत: जगभरातल्या सिनेमाविषयी- जर प्रेम आणि आपुलकी असेल, तर हा उत्सव साजरा करायलाच हवा. अगदी पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या निष्ठेने, हजला जाणाऱ्या भाविकांच्या ओढीने.

चेक रिपब्लिकच्या यिरी मेंझिल या महान दिग्दर्शकाला या वर्षी लाईफटाइम अचिव्हमेंटचा पुरस्कार दिला गेला. सर्वार्थाने योग्य असा. महोत्सवाची ओपनिंग फिल्म होती त्यांचीच- ‘द डॉन युआन्स’. पंचाहत्तर वर्षांचा हा दिग्दर्शक आजही पहिल्यासारख्याच जोमाने सिनेमे करतोय, हेच मुळात उल्लेखनीय आहे. ‘द डॉन युआन्स’ हा मेंझिल यांच्या आजवरच्या सिनेमांच्या तुलनेत किंचित तोकडा वाटला. मोझार्टच्या डॉन जिओव्हानी या ऑपेराची चेक थिएटरमध्ये तालीम होत असते आणि त्यातल्या डॉन युआनच्या व्यक्तिरेखेच्या निमित्ताने पुरुषांमधल्या पुरुषी प्रवृत्तीवर मेंझिल यांनी विनोदी पद्धतीने भाष्य केलंय. 1966 मध्ये त्यांचा ‘क्लोजली वॉच्ड ट्रेन्स’ हा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला. मुंबईतल्या एका महोत्सवामध्ये तो पाहिल्यानंतर सगळे प्रेक्षक भारावून गेले होते. त्यावेळी मेंझिल यांचं वय केवळ 28 वर्षे होतं. या सिनेमाने त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार पटकावला! 1986 मध्ये पुन्हा एकदा आणखी एका डार्क कॉमेडीसाठी- ‘माय स्वीट लिट्‌ल व्हिलेज’साठी- त्यांना नामांकन मिळालं. 1969 मध्ये त्यांच्या ‘लार्क्स ऑन द स्ट्रिंग’ या उपहासात्मक चित्रपटावर कम्युनिस्ट सरकारने बंदी आणली. मात्र 1990 मध्ये तो प्रदर्शित झाला आणि बर्लिन महोत्सवामध्ये या सिनेमाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन बेअर पुरस्कार मिळवला. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाने प्रेक्षकांना भारावून टाकणारा अनुभव दिलेला आहे, अस्वस्थ केलेलं आहे. यिरी मेंझिल यांचा जन्म झाला तेव्हा चेकमध्ये नाझींची सत्ता होती. स्वाभाविकच  हिटलरच्या अत्याचारांचे ते एक साक्षीदार होते. मात्र, दुसरं महायुद्ध संपल्यानंतर या चिमुकल्या देशाने कम्युनिस्ट राजवटीमधले हालही भोगले. या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या सिनेमांमध्ये पडलेलं दिसतं. (केवळ त्यांच्याच नाही, तर अनेक चेक आणि पोलिश दिग्दर्शकांचे सिनेमे आपल्याला या वास्तवाचे चटके देतात.) काही वेळा विनोदी पद्धतीने, काही वेळा ब्लॅक कॉमेडी, तर काही वेळा अत्यंत गंभीरपणे ते दिग्दर्शक म्हणून त्यांचं भाष्य करतात आणि आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात.

कोणत्याही मोठ्या महोत्सवामध्ये साधारण दोनशे सिनेमे दाखवले जातात. इफ्फीही त्याला अपवाद नाही. यात स्पर्धेसाठी जगभरातून आलेले सिनेमे होते, मास्टर स्ट्रोक्स हा विभाग होता, भारतीय पॅनोरामा होता, पहिल्यांदाच ईशान्य भारतातल्या सिनेमांचं खास पॅकेज होतं, जपानवर फोकस होता, रेट्रोस्पेक्टिव्ह होते... शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरीज, सोल ऑफ एशिया असे विविध विभाग होते. दहा दिवसांच्या काळात जगभर फिरून येण्याचं चित्रपट महोत्सवाइतकं दुसरं उत्तम साधन नाही. भारतातली विविध राज्यं, इराण, फिलिपाइन्स, टर्की, जपान, इस्रायल, अफगाणिस्तानपासून ते युरोपातले फ्रान्स, जर्मनीपासून ते चेक रिपब्लिक, पोलंड, स्लोव्हाकिया असे अनेक छोटे-मोठे देश पाहायला मिळतात. तिथल्या संस्कृतींचं दर्शन होतं. तिथे आजचे दिग्दर्शक काय विचार करताहेत, त्यांना कोणते विषय महत्त्वाचे वाटताहेत, ते कसे मांडले जाताहेत याची एक झलक मिळते आणि खूप खूप समृद्ध व्हायला होतं.

मात्र महोत्सवाचं यश हे त्याच्या आयोजनात, सिनेमांच्या संख्येत जितकं असतं त्यापेक्षा किती तरी जास्त ते निवडलेल्या सिनेमांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतं. ते कसं ठरवायचं, याबाबत मी माझे काही निकष आखलेले आहेत. मास्टरपीस म्हणावे असे एखाद्‌ दोन सिनेमे पाहायला मिळाले, अप्रतिम असे पाच-सहा आणि चांगले असे आठ-दहा सिनेमे हाताशी लागले; तर तो महोत्सव उत्तम झाला, असं प्रमाणपत्र द्यावं. या वर्षीचा महोत्सव या निकषांवर निश्चितपणे यशस्वी झाला, असं म्हणता येईल. विशेषत: महोत्सवाच्या उत्तरार्धात चांगल्या सिनेमांचा जणू पाऊस पडला. असगर फरहादींचा ‘द पास्ट’ हा सिनेमा असाच उत्तरार्धात पाहायला मिळालेला एक सिनेमा. महोत्सवामधला सर्वोत्तम सिनेमा. अगदी मास्टरपीस म्हणता येईल असं नाही; पण दीर्घ काळ आपल्याबरोबर रेंगाळणारा अनुभव या सिनेमाने दिला, एवढं नक्की. या सिनेमाला न्याय द्यायचा तर त्यावर एक स्वतंत्र लेख लिहायला हवा, एका परिच्छेदात ते शक्यच नाही.

या वर्षीचं पोलिश सिनेमांचं पॅकेजही अप्रतिम होतं. आंद्रे वायदा या दिग्गज दिग्दर्शकाने वयाच्या नव्वदीत केलेला ‘वालेसा : द मॅन ऑफ होप’ हा लेक वालेसा यांच्यावरचा बायोपिक असेल किंवा दिग्दर्शक यान किदावा ब्लॉन्स्की यांचा ‘इन हायडिंग’ असेल, क्रिस्टॉफ लुकाझेव्हिक यांचा ‘व्हिवा बेलारूस’ असेल, नाही तर व्लादिस्लॉ पासिकोव्हस्की यांचा ‘आफ्टरमाथ’ असेल; प्रत्येक दिग्दर्शकाला आपल्या सिनेमाच्या माध्यमातून राजकीय विधान करायचं होतं, भूमिका घ्यायची होती आणि हे करताना माध्यमाचं भान कुठेही कमी झालेलं नव्हतं.

फ्रान्सचेही खूप सिनेमे या वर्षीच्या महोत्सवामध्ये होते आणि जपानवर तर फोकसच होता. इथेही गुणवत्तेच्या बाबतीत तक्रार करण्यासारखं फार काही नव्हतं. फ्रान्सच्या ‘ब्लू इज द वॉर्मेस्ट कलर’ या सिनेमाची पुष्कळ वाहवा झाली. (दुर्दैवाने मला तो बघायला मिळाला नाही. कान महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाचं पारितोषिक मिळालेला हा सिनेमा दोन मुलींची हळुवार प्रेमकथा आहे.) चांगल्या सिनेमांची नुसती यादी दिली, तरी आपल्या हाती या महोत्सवामध्ये खूप काही लागलंय याची जाणीव होते.

फ्रान्स/ रशियाचा ‘मारुसिया’, जर्मनीचा ‘हॅना आरेन्ड्‌ट’, हे अप्रतिम सिनेमांच्या यादीतले आणखी काही सिनेमे. या- शिवाय- द अमेझिंग कॅटफिश, आय ॲम अ डिरेक्टर, क्वाय दे ऑर्से, जॉय, वेटिंग फॉर द सी, मीटिंग्स विथ अ यंग पोएट, क्लोज्ड कर्टन्स, सारा प्रीफर्स टु रन, डिस्‌मॅन्टलिंग, फँड्री, टपाल, कन्यका टॉकीज, इलो इलो, ग्रिग्रि, मदर आय लव्ह यू, लव्ह इज ऑल यू नीड यांचाही उल्लेख करायला हवा.

ही एवढी सगळी नावं सांगण्यामागे आणखी एक उद्देश आहे. जानेवारीच्या नऊ तारखेपासून पुण्याचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू होतोय. यांतले काही सिनेमे पुण्यातही निश्चितपणे असतील. ते पाहण्याची तयारी आतापासूनच करता येईल. निदान मी तरी गोव्याला चुकलेले सिनेमे पुण्याला पाहाण्याचं ठरवून टाकलेलं आहे. (पुढच्या अंकात असगर फरहादींच्या ‘द पास्ट’विषयी)

Tags: आंतरराष्ट्रीय सिनेमा सिनेमा इफ्फी मीना कर्णिक राजकीय भूमिका संस्कृती मनोहर पर्रीकर हिटलर Rajkiy Bhumika Sanskruti Manohar pararikar Hitlar Intrnational Cinema Cinema Panaji Iffi Meena Karnik weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके