डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अमेरिकेत समृद्धीबरोबर आर्थिक विषमतेत वाढ

धिक वरच्या थरात जाण्याचे प्रमाण श्रीमंत आणि गरीब या दोन्ही स्तरात घटल्याचे आढळले. याचा अर्थ, ‘आहे रे' आणि ‘नाही रे’ असे दोन स्थिर गट अमेरिकन समाजात निर्माण होऊ लागले आहेत. पण असे स्थिर गट निर्माण होण्याने अमेरिकन अर्थव्यवस्था योग्य असल्याच्या लोकांच्या विश्वासालाच एक दिवस तडा जाण्याचा संभव आहे. उत्पन्नाच्या विषमतेत मोठी वाढ आणि सामाजिक स्तर बदलाचे अल्प प्रमाण हे विशेष आता अमेरिकन अर्थव्यवस्थेत रुजले आहेत, गेल्या 25 वर्षांत जागतिकीकरणामुळे बौद्धिक असलेल्या वर्गाचा अधिक फायदा झाला आहे.

अमेरिका सध्या वादळाच्या नैसर्गिक आपत्तीशी झगडत आहे.

न्यूऑर्लिन्समधील 'कॅटरिना' वादळाच्या मागोमाग ‘रिटा’ वादळाचा इशारा मिळताच, त्याला तोंड देण्यासाठी अध्यक्ष बुश यांनी आणीबाणी जाहीर केली. इराक, इराण, उत्तर कोरियाच्या प्रश्नांना तोंड देत असतानाच नैसर्गिक आपत्तीशी जगातील या महासत्तेस सामना करावा लागत आहे. बुश योजीत असलेल्या उपायांनी राजकीय निरीक्षकांचे समाधान झालेले नसून, यावेळी अध्यक्ष रूझवेल्ट यांच्यासारखे नेतृत्व हवे होते, असेही विचार व्यक्त करण्यात येत आहेत. 

बड्या उद्योगपतींच्या हाती अमेरिकन अर्थव्यवस्थेची सूत्रे आहेत. जास्तीत जास्त अमेरिकन अर्थव्यवस्थेची समृद्धी साधतांना अमेरिकन विषमतेची दरी वाढत आहे, हे कोणा अमेरिकाविरोधी कम्युनिस्ट अभ्यासकाचे प्रचारकी निष्कर्ष नसून अमेरिकन संस्थांनी केलेल्या अभ्यासातून त्यास दुजोरा मिळत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या पहिल्या 25 वर्षांत श्रीमंत, मध्यम आणि कनिष्ठ वर्गाच्या उत्पन्नातील वाढ जवळपास सारख्या प्रमाणात होत होती. लोकसंख्येचा एकपंचमांश असलेल्या गरीब वर्गाच्या उत्पन्नातील वाढ त्याच्यावरच्या थरातील वर्गाच्या उत्पन्नवाढीच्या प्रमाणात होती. पण गेल्या 25 वर्षांत श्रीमंत वर्गाच्या उत्पन्नातील वाढ इतर वर्गाच्या उत्पन्नवाढीपेक्षा अधिक प्रमाणात झाली आहे, याचाच अर्थ श्रीमंत अधिक श्रीमंत झाले असून, विषमतेची दरी रुंदावली जात आहे. सर्वसाधारण कुटुंबाच्या उत्पन्नात 1979 पासून 18% वाढ झाली, तर वरच्या एक टक्का श्रीमंतांच्या उत्पन्नात 200 टक्के वाढ झाली. असा, ‘इकॉनॉमिक पॉलिसी इन्स्टिट्यूट’ या संस्थेने केलेल्या अभ्यासाचा निष्कर्ष आहे. सेन्सेस ब्यूरोच्या आकडेवारीप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्नात खालच्या 5 टक्के वर्गाचा वाटा फक्त 5.4 टक्के होता. तर वरच्या 5 टक्के वाटा 40.9 टक्के होता. पंचवीस वर्षांनंतर खालच्या 5% थराचा वाटा 4.4 टक्क्यांपर्यंत घटला, तर वरच्या 5% श्रीमंत वर्गाचा वाटा 46.5 टक्क्यांपर्यंत वाढला. श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब झाले, असाच सरळ निष्कर्ष या आकडेवारीतून निघतो.

थॉमस पिकेरी आणि इमॅन्युएल साएझ या अभ्यासकांनी अमेरिका, ब्रिटन व फ्रान्समधील वरच्या एक टक्का श्रीमंत वर्गाच्या उत्पन्नाचा तुलनात्मक अभ्यास केला. त्यासाठी 1913 ते 1998 असा कालखंड त्यांनी निवडला होता. तिन्ही देशांतील श्रीमंत वर्गाच्या उत्पन्नातील वाढ 1970 पर्यंत जवळजवळ सारख्या प्रमाणात होती, पण 1970 नंतर अमेरिकनांचे उत्पन्न वाढत गेले आणि आज ते ब्रिटन व फ्रान्समधील वरच्या 1 टक्का श्रीमंतांच्या उत्पन्नापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट जास्त आहे असे त्यांना आढळून आले.

आम्ही कामगारांपेक्षा अधिक काम करून अधिक मिळविले, असे या श्रीमंत वर्गाचे समर्थन आहे. 1970 मध्ये वरचे 10% श्रीमंत खालच्या 10 टक्के कामगारांपेक्षा कमी तास काम करीत. आता चित्र उलटे असल्याचे अभ्यासकांचे निरीक्षण आहे. 1970मध्ये वरच्या 0.01 टक्के श्रीमंतांच्या उत्पन्नात 70 टक्के भाग डिव्हिडंड, व्याज अशा स्वरूपाचा होता, आता त्यांच्या उत्पन्नात 80% वाटा वेतनाचा आहे, यावरून ते अधिक काम करतात, असा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. लोकसंख्येतील दारिद्र्य रेषेखालील वर्गाचे प्रमाण 1950 मध्ये 22% होते, ते आता 12% झाले आहे. या आकड्यांचा आधार घेत दारिद्र्य वाढवून आम्ही अधिक श्रीमंत झालेलो नाही, असा श्रीमंत वर्गाचा दावा आहे.

अमेरिकेत आर्थिक विषमता असली, तरी संधीची समानता आहे आणि जन्माने सर्व समान असून यशाची शिडी चढण्याची संधी सर्वांना आहे, अशी हमी अमेरिकेत घटनेने दिली आहे. याकडे लक्ष वेधण्यात येते आणि बेंजामीन फ्रैंकलिन यांचा दाखला देण्यात येतो. मेणबत्त्या बनविणाऱ्या पित्याच्या कुटुंबात जन्मलेला हा पंधरावा मुलगा आपल्या कर्तृत्वाने राष्ट्राध्यक्ष झाला. गरीब कायम गरीब आणि श्रीमंत कायम श्रीमंत अशी साचेबंद वर्गवारी नाही. गरीब श्रमाने आणि कर्तृत्वाने श्रीमंत होऊ शकतात, असे अमेरिकनांना वाटते. असेही काही पाहण्यांचे व अभ्यासकांचे निष्कर्ष आहेत. संधीची समानता पूर्वीपेक्षा कमी झाली आहे, असे त्यांना वाटत नाही. गरिबीची स्थिती असलेल्या नागरिकास कठोर परिश्रम करून श्रीमंत होणे शक्य आहे, असे 80% अमेरिकनांना वाटते.

1980 मध्ये हे प्रमाण यापेक्षा कमी होते. 'न्यूयॉर्क टाइम्स' पत्राने एक जनमत कौल घेतला. त्यात असे दिसून आले की, गेल्या तीस वर्षांत आपली आर्थिक स्थिती खालच्या श्रेणीत गेली, असे वाटणारांपेक्षा वरच्या श्रेणीत जाण्याची संधी वाढली, असे वाटणारांची संख्या दुप्पट आहे.

“आमचे राहणीमान आमच्या पित्यांपेक्षा वरच्या थरांत असून, आमच्या मुलांचे राहणीमान आमच्यापेक्षाही वरच्या थराचे असेल”, असे बहुसंख्य अमेरिकनांना वाटते. विषमता वाढत असली तरी सर्वसामान्य अमेरिकनाच्या आशावादावर आणि आकांक्षांवर त्याचा परिणाम झालेला नाही. 

अमेरिकन अभ्यासकांनी असे आशावादी चित्र रेखाटले असले, तरी काही धोक्यांकडेही लक्ष वेधले आहे. एक धोका म्हणजे आर्थिक वर्ग स्थिर होताना दिसत असून सामाजिक स्तरात बदल म्हणजे गरीब वर्गातील लोक श्रीमंत वर्गात जाणे कमी झाले आहे. मिशिगन विद्यापीठाचे गॅर सोलोम यांच्या नेतृत्वाखालील अभ्यासकांनी या प्रश्नाचा अभ्यास केला, त्यात स्तरातील बदलाचा निर्देशांक फार खाली नाही, तर मध्यम पातळीवर असल्याचे दिसून आले. गरिबीच्या अगदी खालच्या 5% थरातील लोकांपैकी सहा जणांमागे फक्त एखादा, सर्वसामान्य नागरिकाची पातळी गाठण्याची संधी आहे. अगदी खालच्या एक टक्का थरामध्ये ही तफावत यापेक्षा जास्त आहे आणि युरोपशी तुलना करता, तर गरिबीतून वरच्या थरात जाण्याचे प्रमाण फारच कमी आहे.

बोस्टनच्या फेडरल रिझर्व्ह बँकेसाठी कॅथराझ ब्रॅडबरी आणि जेन काटझ् यांनी एक अभ्यास केला. त्यांना असे आढळून आले की, 1978च्या दशकात 65% लोक दशकाच्या सुरुवातीस ते ज्या अधिक स्तरात होते, त्यापेक्षा वरच्या स्तरात गेले. 1998च्या दशकात हे प्रमाण 60% होते, म्हणजे हा काही मोठा बदल नव्हता. पण सोलोन यांच्या निष्कर्षाशी जुळणारा निष्कर्ष म्हणजे पित्याच्या उत्पन्नापेक्षा पुत्राच्या उत्पन्नात फारसा फरक नव्हता. 1988च्या दशकात हा फरक जास्त होता. अधिक वरच्या थरात जाण्याचे प्रमाण श्रीमंत आणि गरीब या दोन्ही स्तरात घटल्याचे आढळले. याचा अर्थ, ‘आहे रे' आणि ‘नाही रे’ असे दोन स्थिर गट अमेरिकन समाजात निर्माण होऊ लागले आहेत. पण असे स्थिर गट निर्माण होण्याने अमेरिकन अर्थव्यवस्था योग्य असल्याच्या लोकांच्या विश्वासालाच एक दिवस तडा जाण्याचा संभव आहे. उत्पन्नाच्या विषमतेत मोठी वाढ आणि सामाजिक स्तर बदलाचे अल्प प्रमाण हे विशेष आता अमेरिकन अर्थव्यवस्थेत रुजले आहेत, गेल्या 25 वर्षांत जागतिकीकरणामुळे बौद्धिक असलेल्या वर्गाचा अधिक फायदा झाला आहे. पदवीचे महत्त्व त्यामुळे वाढले आहे. पदवीधर आणि बिनपदवीधर यांच्या उत्पन्नातील तफावत 1979 ते 1997 या काळात दुपटीने वाढली आहे.

 या बदलाबरोबरच कामाच्या स्वरूपात बदल झाला आहे. मोठ्या कंपनीत खालच्या स्तराला कामाला सुरुवात करून एकेक पद पूर्वी गाठता येत असे. पण आता ही प्रथाच राहिलेली नाही. कायम नोकरीची प्रथा संपुष्टात आली आहे. व्यवस्थापक एकाच कंपनीत फार काळ न राहता आपल्या जागा बदलत राहतात. त्यामुळे पदवीधर असणे आवश्यक झाले आहे. 1930 व 1948च्या दशकात अमेरिकन कंपन्यांमधील निम्मे मुख्य कार्यकारी अधिकारी पदवीधर नव्हते. आता बहुतेक सर्व पदवीधर असतात आणि त्यांतील 70% जणांनी एम. बी. ए.सारखी उच्च पदवी घेतलेली असते. पदवीधरांनाच वरच्या उत्पन्न गटात जाण्याची संधी मिळते. 1970 पासूनचा हा मोठा बदल आहे. त्या काळात उत्पन्नातील वाढ सर्व शैक्षणिक पातळ्यांच्या स्तरात सारखी विभागली जात होती. आता शैक्षणिक गुणवत्तेच्या पायावर अमेरिकन समाजाची घडण होऊ लागली आहे. एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बहुसंख्य कर्मचारी वर्ग माध्यमिक शिक्षण घेतलेला होता, दुसऱ्या महायुद्धानंतर आता तो विद्यापीठ शिक्षण घेतलेला आहे. विद्यापीठ शिक्षण हे वरच्या सामाजिक स्तराकडे नेणारे इंजिन होते ते आता गतिरोधक बनण्याचा धोका आहे, अशी चिंता हारवर्ड विद्यापीठाचे अध्यक्ष लोरेन्स समर्स यांना वाटते.

गरीब कुटुंबांना तर उच्च दर्जाच्या विद्यापीठातील शिक्षण आटोक्याबाहेर झाले आहे. हारवर्ड विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या कुटुंबांचे सरासरी उत्पन्न दीड लाख डॉलर असते. उच्चभ्रू विद्यापीठात लोकसंख्येतील वरच्या 25% श्रीमंत वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रमाण 1976 ते 1995 या काळात 39 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत वाढले. सहा श्रीमंत विद्यार्थ्यांमागे फक्त एक गरीब कुटुंबातील विद्यार्थी या विद्यापीठांमध्ये पदवी घेऊ शकतो. शिक्षण संस्था श्रीमंत आणि गरीब यांच्यातील शैक्षणिक अंतर वाढवीत आहेत.

या बदलाचा कौटुंबिक जीवनावरही परिणाम झाला आहे. पती-पत्नी दोघेही पदवीधर. करिअरसाठी विवाहित महिला पहिले मूल होणे 30 वयापर्यंत लांबवितात. 1970च्या दशकात हे वय 25 होते आणि कॉलेजमध्ये न गेलेल्या महिलांच्या बाबतीत ते 8 वर्षे कमी आहे. गरीब वर्गात उलट चित्र आहे. त्यातील महिलांना नोकरी, रोजगार नसतो. त्यांना मुले असतात, तीही बरीचशी विवाहबाह्य संबंधातून झालेली. समाजकल्याण सुधारणांमुळे विवाहबाह्य मुलांचे प्रमाण घटले आहे. तसेच नोकरी करणाऱ्या मातांची संख्या वाढत आहे. तरीही गरीब व श्रीमंत कुटुंबांच्या स्थितीत बरेच अंतर आहे.

समृद्धीची ही दुसरी बाजू निदर्शनास आली असूनही त्या बाबतीत योग्य उपाय योजण्याची बुश यांची तयारी नाही. त्यामुळे विषमता वाढण्याचीच शक्यता आहे.

Tags: वा. दा. रानडे V.D.Rande weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके