डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

चितळे ब्रँडच्या चौथ्या पिढीचा प्रतिनिधी

जगभरात केवळ दोन टक्के बिझिनेस चौथ्या पिढीपर्यंत जातात. ते पाचव्या पिढीत जाताना 0.73 टक्के राहतात. त्यामुळे माझ्या पिढीवर हे टिकवायची जबाबदारी आहे आणि आता आम्हाला पुढील पिढीकडे हा बिझिनेस द्यायचा आहे, तर आम्हाला या 0.73 टक्क्यांतच खेळावे लागणार आहे. जर का तुमची यशस्वी होण्याची शक्यता एक टक्क्याहून कमी असेल, तर आम्हाला त्यासाठी काही तरी वेगळे करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी एका थर्डपर्सन व्ह्यूने आम्हाला व्यवसायाकडे पाहावे लागेल. त्यासाठी तुम्ही स्ट्रॅटेजिकली चांगले असायला हवे. तुम्ही ऑपरेशनमध्ये किती चांगले आहात, यापेक्षा स्ट्रॅटेजीमध्ये चांगले असणे अशा परिस्थितीत महत्त्वाचे ठरते.

इंद्रनील चितळे- चितळे हा ब्रँड ज्याला वारशात मिळाला, असा चितळे ग्रुपचा अवघ्या 31 वर्षांचा सी.ई.ओ. इंद्रनील गेली 10 वर्षे या ग्रुपचा कारभार पाहत आहे. चव, दर्जा आणि विश्वास या त्रिसूत्रीला पुढे नेत त्यात स्वतःच्या इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट स्किल्सची भर टाकून त्याने आपल्या एक दशकाच्या कारकिर्दीतील ग्रुपची उलाढाल (टर्नओव्हर) दुपटीहून अधिक वाढवली, शिवाय खाद्य पदार्थ टिकवण्याच्या क्षेत्रात नवनवे प्रयोग करून पुण्याची बाकरवडी अमेरिकेत पोहोचवली आणि वर्ष-वर्ष टिकवली. उद्योजकता, अर्थकारण, समाजकारण याबद्दल त्याची स्वतःची ठाम मते आहेत. त्याच्या उद्योगाव्यतिरिक्त इतर उपक्रमांतून ती अमलातही आणली आहेत. व्हॅल्यूबेस्ड वेल्थ क्रिएशन म्हणजे काय आणि एखाद्या ब्रँडचा प्रवास कसा असतो, हे समजून घेण्यासाठी साधलेला हा संवाद.

प्रश्न - चितळे या आडनावाला एक खूप जुना इतिहास आहे. तुम्ही कामाला सुरुवात करतानासुद्धा चितळे हा ब्रँड होताच, त्यामुळे व्यवसायाची सुरुवात ते चितळे ब्रँड हा प्रवास कसा होता, ते आधी समजून घ्यायला आवडेल.

- माझे पणजोबा कै.भास्कर गणेश चितळे यांनी हा व्यवसाय 1939 मध्ये सुरू केला. सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठी भिलवडी नावाचे गाव आहे, तिथून आमची सुरुवात झाली. कृष्णेमुळे असणारी बारमाही पाण्याची उपलब्धता आणि आजूबाजूला असलेली सुपीक जमीन- यामुळे हे गाव डेअरी आणि शेतीसाठी चांगले असेल, असा त्यांचा अंदाज होता. महत्त्वाचे म्हणजे, त्या वेळी ब्रिटिश रेल्वे भिलवडीपर्यंत पोहोचली होती आणि मुंबईपर्यंत तिची कनेक्टिव्हिटी होती. त्यामुळे दुधाच्या उत्पादनाला थेट मुंबईचे मार्केट मिळू शकणार होते. या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी भिलवडीत व्यवसाय सुरू केला.

सुरुवातीला काही वर्षे हा व्यवसाय बिझिनेस टू बिझिनेस असा सुरू होता, म्हणजेच चितळे हा ब्रँड अजून जन्मायचा होता. भिलवडीमध्ये आमची उत्पादने तयार व्हायची आणि मुंबईला जायची. मुंबईमध्ये इतर काही ब्रॅण्ड्‌स होते, ते आमची उत्पादने त्यांच्या नावाने  विकायचे. मात्र थोड्याच दिवसांत त्यांच्या असे लक्षात आले की, बऱ्याच वेळा व्यवसायामध्ये फसवणूक होत आहे. कारण मुंबईच्या मार्केटमध्ये नक्की काय चालू आहे, याची माहिती त्यांना गावात राहून कळत नव्हती. तेव्हा त्यांनी  त्या वेळी सुरतमध्ये कामाला असणाऱ्या आपल्या थोरल्या मुलाला बोलावून घेतले आणि मुंबईत राहून व्यवसाय पाहायला सांगितले. दोन वर्षे मुंबईत व्यवसाय केल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की, मुंबई हे स्थलांतर करणाऱ्यांचे गाव आहे, त्यामुळे इथे रिपीट कस्टमर मिळणे कठीण आहे. आणि दुधाच्या व्यवसायात नफा कमवायचा असेल, तर सातत्याने खरेदी करणारा नियमित ग्राहक असावा लागतो. त्यामुळे मुंबईपेक्षा असा ग्राहक असणाऱ्या पुण्यामध्ये हा व्यवसाय करावा, असा निर्णय झाला आणि चितळे पुण्यात आले. इथेही पहिल्यांदा बी टू बी म्हणजे दुसऱ्या ब्रँडना उत्पादने पुरवण्याचा व्यवसाय होता. मात्र काही दिवसांनी थेट ग्राहकांना उत्पादने विकायला सुरुवात झाली आणि ब्रँड चितळेची मुहूर्तमेढ रोवली. या व्यवसायात त्यांच्यासोबत त्यांचे धाकटे बंधू म्हणजे राजाभाऊ चितळे, काकासाहेब चितळे व नानासाहेब चितळे असे चौघे सोबत असल्याने ‘चितळे बंधू’ असा तो ब्रँड आकाराला आला.

या पिढीने या उद्योगाला खऱ्या अर्थाने आकार दिला. साधारण 70 च्या दशकात दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. आमच्या उत्पादनात बाकरवडीची ॲडिशन झाली आणि तोपर्यंत ग्लास बॉटलमध्ये मिळणारे दूध आम्ही पॉलिपॅकमध्ये आणले. या अनोख्या प्रयोगामुळे आमचा रीच आणि व्यवसाय वाढला. आमच्या कुटुंबाचे तेव्हापासूनचे एक तत्त्व आहे- ते म्हणजे, काहीही झाले तरी गुणवत्तेत तडजोड करायची नाही. त्यामुळे इंजिनिअरिंग व कॉमर्स शिकून आलेल्या तिसऱ्या पिढीने क्वालिटी कंट्रोल, प्रोकुर्मेन्ट सिस्टीम कशा चांगल्या करता येतील यावर भरपूर काम केले. त्याचा परिणाम म्हणून चितळे हा ब्रँड म्हणून अधिक चांगल्या पद्धतीने एस्टॅब्लिश झाला. गेल्या दशकभरात माझ्यासह चौथी पिढी कार्यरत झाली आहे.

या सगळ्याचा परिणाम असा झाला की, 1989 मध्ये डेक्कनला आणि बाजीराव रोडवर अशी आमची दोन दुकाने होती, आता साधारण 30 दुकाने पुण्यात आहेत. पुण्याच्या बाहेरदेखील एक्स्प्रेस स्टोअर्सच्या माध्यमातून दुकाने वाढत आहेत. सध्या आमचे 350 डिस्ट्रिब्युटर्स आहेत- जे महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये आमची उत्पादने पोहोचवतात. त्याचसोबत अमेरिका, इंग्लंड, युरोप, मिडल ईस्ट, ऑस्ट्रेलिया या खंडांमध्ये सर्व माल निर्यात होतो.

प्रश्न - चितळे बंधू म्हटलं की, दोन गोष्टी आठवतात. एक म्हणजे चितळेंची बाकरवडी- जी पटकन संपते. दुसरी गोष्ट म्हणजे, दुपारी एक ते चार बंद असणारी तुमची पुण्यातील दोन दुकाने. या दोन्ही गोष्टी कशा एस्टॅब्लिश झाल्या?

- पहिले दुकान हे आमच्या एका नातेवाइकांच्या जागेत कुमठेकर चौकात सुरू झाले. नंतर डेक्कनला दुकान चालू झाले. मात्र पानशेतच्या पुरात हे दुकान वाहून गेले. त्यानंतर बराच काळ ते बंद होते, नंतर ते नव्याने सुरू झाले. त्यानंतर बाजीराव रोडवर आजच्या सेवासदन बिल्डिंगमधील दुकान सुरू झाले. तेव्हा असे होते की, दुधाचा व्यवसाय हा सकाळी 3.30 वाजता सुरू व्हायचा. घरातले सर्व लोक व सर्व कामगारदेखील दोन सेशनमध्ये काम करायचे. सकाळी 3:30 ला सुरू होणारे काम रात्री 9 ला संपायचे. त्यामुळे सगळ्या टीमची प्रॉडक्टिव्हिटी चांगली ठेवण्यासाठी तेव्हा तो धोरणात्मक निर्णय घेतला गेला की- आपण दुपारच्या वेळेत दुकान बंद ठेवावे, जेणेकरून सर्व टीमला ऊर्जा मिळेल व ती येणाऱ्या ग्राहकांना योग्य सर्व्हिस देऊ शकेल. गेल्या काही वर्षांत पुणे आणि पुण्याचा ग्राहक बदलत गेला. आमची दुकानेही अधिक प्रोफेशनली मॅनेज होऊ लागली. त्यामुळे मग ग्राहकांच्या सोईला प्राधान्य देऊन आम्ही दुपारी दुकान बंद ठेवणे बंद केलं.

बाकरवडीची गोष्ट अशी की- पूर्वी बाकरवडी हाताने बनवली जायची. त्यामुळे दिवसाला 200 ते 250 किलो बाकरवडी बनवता यायची. त्यासाठीसुद्धा 70-80 लोक हातांनी पोळी लाटणे, मसाला भरणे आणि वळून तळणे, ही कामे करायचे. मनुष्यबळ आणि उत्पादनाला मर्यादा असल्यामुळे ‘बाकरवडी संपली’ हा बोर्ड दुकानात दिसायचा. आमच्या लक्षात आले की, मागणी वाढत आहे आणि बाकरवडीसाठी चितळ्यांची ओळख निर्माण होते आहे, तेव्हा बाकरवाडीचे उत्पादन वाढवणे गरजेचे होते. कारण ग्राहक त्यासाठी दुकानात येत होता आणि सोबतच चार इतर गोष्टी घेऊन जात होता. यावर उपाय म्हणून 1987 मध्ये माझे वडील, काका आणि आजोबा यांनी बाकरवडीच्या ऑटोमेशनवर काम सुरू केले. पहिल्यांदा केवळ पोळी तयार करायचे मशीन आले. नंतर मसाला भरायचे मशीन आले. पण रोलिंगचे काम अजून मॅन्युअल चालू होते.

आणखी संशोधन केले असता असे समजले की, नेदरलँड आणि जर्मनीमध्ये काही मशीन आहेत- जी पूर्ण प्रोसेस ऑटोमेट करण्यासाठी वापरता येतील. त्या वेळी व्हिडिओ कॅसेटवर आमच्या रिक्वायरमेन्ट आम्ही रेकॉर्ड करायचो आणि त्यांना कुरिअरने पाठवायचो. त्या कंपनी त्या रेकॉर्ड्‌स पाहून पत्र लिहून संवाद साधायचे. या धडपडीचा परिणाम म्हणून पूर्ण बाकरवडी यांत्रिक पद्धतीने बनवणारे एक मशीन 1993-94 मध्ये भारतात आले. आज अशा पद्धतीची तीन मशीन काम करत आहेत आणि हजारो किलो बाकरवडी तासाला बनत आहे. परिणामी, आज बाकरवडीला आमचीच नाही, तर पुण्याची ओळख निर्माण झाली आहे.

प्रश्न - पण अजूनही बाकरवडी संपतेच...

- ती संपलीच पाहिजे.

प्रश्न - या प्रवासात तुम्ही कधी सामील झालात आणि तुमचा आजवरचा प्रवास कसा आहे?

- सन 2011 मध्ये मी व्यवसायात सामील झालो. त्याआधी इंजिनिअरिंग करून परदेशात एका ठिकाणी इंटर्नशिप केली होती. त्यानंतर मी- भारतात येऊन व्यवसायात जॉईन झालो. सुरुवात करताना पूर्ण वेळ हाताशी असल्याने जिथे कमी तिथे मी, अशा पद्धतीने सर्वच विभागांत मदत करत होतो. त्या वेळी माझ्या काकांनी मला फॅक्टरीमध्ये लक्ष देण्यास सांगितले. यांत्रिकीकरणाद्वारे व्यवसाय कसा सुधारता येईल हे पाहणे, हे माझे उद्दिष्ट होते. त्या वेळी सर्व विभागांत काम करून फॅक्टरी कशी चालते हे समजून घेतले व त्यानंतर ती कशी वाढवता येईल, याचा आराखडा मांडला. हा आराखडा मांडायचे कारण हे होते की- स्वतःची दुकाने वाढवायला खूप मर्यादा होत्या. कारण आमच्या व्यवसायात ताजा माल विकला जातो. त्याची शेल्फ लाईफ कमी असते. शिवाय एका दुकानात किती ग्राहकांना सेवा देता येते, यावर मर्यादा असतात. त्यामुळे दर्जात तडजोड न करता दुकाने वाढवून व्यवसाय वाढवणे शक्य नव्हते.

सेंट्रलाइज प्रॉडक्शन करून पुरवठा करणे म्हणजे पॅकेजिंग करूनच मिठाई विकणे व त्यातून व्यवसाय वाढवणे शक्य होते. त्याचा आणखी एक फायदा असा होता की, पॅकेजिंग करून विकायचे असेल तर फक्त आपल्याच दुकानात नव्हे, तर डिस्ट्रिब्युशन चेनद्वारे हजारो इतर दुकानांतसुद्धा माल विकता येणार होता. त्यामुळे 2015-16 मध्ये स्वतःची दुकाने वाढवण्याऐवजी जास्तीत जास्त उत्पादनांची निर्मिती करणे, त्यांच्या पॅकेजिंगमध्ये इनोव्हेशन आणणे आणि जगभरात स्वतःची डिस्ट्रिब्युशन चेन उभारणे- असा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली. गेल्या पाच वर्षांत जवळपास काही लाख दुकाने जगभरात आमची प्रॉडक्ट्‌स विकतात. ठिकठिकाणचे सुपर मार्केट, किराणा माल दुकाने, ऑनलाईन वेबसाईटवर किंवा सॉफ्टवेअर पार्कमधील व्हेंडिंग मशीनमध्ये उत्पादने मिळतात. त्या वेळेपासून आजपर्यंत आमचे सेल्स व्हॉल्युम तीनपट केले आहेत आणि पुढील पाच वर्षांत ते आम्ही परत तीनपट करू या दिशेने प्लॅन चालू आहे. घराण्याची तत्त्वे जपून ही ग्रोथ मिळवणे; त्यासाठी लागणारे फंडिंग, मार्केटिंग, सेल्स, क्वालिटी कंट्रोलिंग कसे असावे, हे सर्व मी सध्या पाहतो आहे.

प्रश्न - म्हणजे फॅमिली बिझिनेसचे कॉर्पोरेट बिझिनेस करण्याचे काम तुम्ही केले.

- केलंय म्हणण्यापेक्षा अजून प्रयत्न चालू आहेत, असे आपण म्हणू.

प्रश्न - तुम्ही कारखान्यात पदार्थ तयार करून जगभर विकता हे समजलं, पण मग ही बाकरवडी किंवा मिठाई सहा-सहा महिने टिकते तरी कशी?

- पॅकेजिंग हे एक असं क्षेत्र आहे की, जिथं सतत नवनवीन शोध लागत असतात. हे शोध समजून घेऊन त्यातील सुयोग्य गोष्टी आपल्यासाठी वापरणे, हे माझे काम. एखादा खाद्य पदार्थ टिकवायचा म्हणजे काय, तर त्याचे डिग्रेडेशन होऊ न देणे. हवा लागल्यानंतर कोणतीही गोष्ट डिसइंटिग्रेट होत असते, हे आपल्याला माहिती आहे. ऑक्सिडेशन प्रक्रियेमुळे हे घडते. ऑक्सिडेशन प्रक्रियेचा वेग कमी करता आला, तर तुम्ही पदार्थ टिकवू शकता किंवा पॅकेजच्या आतमधील वातावरण बदलून ऑक्सिडेशन प्रक्रिया थांबवू शकता. अर्थातच ही प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नाही. आम्ही काय करतो- तर कोणतेही प्रॉडक्ट असो; त्याचे फॉर्मिंग, फिलींग आणि सिलींग या तिन्ही गोष्टी आमच्या फॅक्टरीमध्ये करतो. त्याचा सर्व कंट्रोल आमच्याकडे असतो. म्हणजे बायोलॉजिकल भाषेत सांगायचे तर- हवेतील मॅक्रोबेल काऊंट किती आहे, एन्व्हॉयर्न्मेंट लोड किती आहे, प्रॉडक्ट्‌सवरील टोटल प्लेट काऊंट किती आहे- या सगळ्या गोष्टी कंट्रोल कराल, तर प्रॉडक्ट्‌स टिकण्याची शक्यता जास्त असते.

चांगल्या क्वालिटीमध्ये म्हणजे- केवळ मशीन नाही तर चांगल्या वातावरणात तयार झालेल्या उत्पादनाला जर का योग्य पॅकेजिंग केले, चांगले मटेरियल वापरून तयार केलेल्या पॅकेटमध्ये व्हॅक्युम तयार केला असेल, तर हवाच नसल्याने ऑक्सिडेशन होत नाही. अशी एन्ड टू एन्ड प्रिसिजन काळजी घेतल्याने आपले उत्पादन उत्तम टिकते. माझ्याकडे तर चार वर्षांपूर्वीची बाकरवडीची काही पॅकेट आहेत, जी आम्ही स्वतः खातो आणि ती या यंत्रणेमुळे एकदम उत्तमरीत्या टिकली आहेत.

प्रश्न - या सगळ्यात तुमची इंजिनिअरिंगची पार्श्वभूमी तुम्हाला कामाला आली?

- 100 टक्के. यामध्ये मेकॅनिक्स येते. इलेक्ट्रॉनिक्स येते. पॉलिमर स्टडी येतात. बायोलॉजी येते. हे सर्व करताना टेक्निकल आऊटलुक असणे फायद्याचे ठरते. या सर्व कॉम्प्लेक्स, हाय प्रिसिजन गोष्टी समजायची तुमची क्षमता वाढते.

प्रश्न - चितळेची अजून एक खासियत होती की, तुम्ही कधीच जाहिरात करायचा नाहीत. सध्या मात्र सर्वत्र तुमचे जोरदार मार्केटिंग सुरू असते. हा बदल का केला?

- पूर्वी ग्राहक आमच्याच दुकानातून आमच्या वस्तू घ्यायचा. पण जेव्हा मल्टिब्रँड रिटेल आणि ऑनलाईनमध्ये आम्ही गेलो, तेव्हा ग्राहकांना चॉईस करायला आणखी चार प्रॉडक्ट्‌स उपलब्ध होते. त्या सगळ्यामध्ये आपला प्रॉडक्ट कसा पिक होईल, हे आमच्यासमोरील चॅलेंज होते. इथं अर्थातच तुमची ब्रँड व्हॅल्यू मॅटर करते. आजवर ज्याने चितळेचे एकही उत्पादन घेतलेले नाही, अशा नव्या कस्टमरला आमच्या उत्पादनाबद्दल आपुलकी आणि खात्री कशी वाटेल, हा आमच्यासमोरील मोठा प्रश्न होता. त्याचे उत्तर असे की, प्रॉडक्ट्‌सची क्वालिटी अशी असायला हवी की- ग्राहकांनी ती निर्धास्तपणे उचलावीत, ती तर आम्ही जपतोच. पण ग्राहकांच्या मनात तो विश्वास तयार होण्यासाठी त्याला आमची मूल्ये आणि तत्त्वे काय आहेत हे समजायला हवे. तेव्हा आमच्या व्हॅल्यूज काय आहेत, हे सांगणाऱ्या त्या-त्या सणाला साजेशा अशा जाहिराती आम्ही करतो. ग्राहकाला आमच्या व्यवसायाची मूल्ये आणि तत्त्वे आम्ही त्यातून सांगू पाहतो. एकदा ग्राहकाला आमची मूल्ये पटली की, तो आमचा कायमचा ग्राहक बनतो आणि आमच्या आजोबांनी हे शिकवलं आहेच की, रिपीट कस्टमर महत्त्वाचा!

प्रश्न - तुमच्या बोलण्यात व्हॅल्यूजचा उल्लेख सतत येतो. चितळे ब्रँड म्हणजे या व्हॅल्यूज सिस्टीम आहे. आता तुम्ही चौथ्या पिढीचे प्रतिनिधी आहात. इतकी मोठी लीगसी सांभाळताना आणि पुढे घेऊन जाताना या सगळ्या तत्त्वांचे, मोठ्या वारशाचे प्रेशर येत नाही का?

- प्रेशर असते ना. ते प्रेशर चांगले पण असते. कारण ती एक खूप मोठी जबाबदारी असते. माझ्या पिढीला सगळ्या गोष्टी मिळाल्या, आमचा जन्म सुखवस्तू घरात  झाला. कशाचीही टंचाई नव्हती. पण या सगळ्याचा उपभोग घेत असताना त्यामागचे कष्ट काय आहेत, याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे. मागच्या काही पिढ्यांनी कष्ट घेतले आहेत, म्हणून आज सर्व काही मिळाले आहे. त्याची जबाबदारी तुम्हाला समजत नसेल, तर अवघड होईल. 

साधारणतः फॅमिली बिझिनेसमध्ये  दोन पिढ्यांमधील जे काही ब्रिजिंग असते, ते जर का नीट नाही झाले तर त्यामुळे कधी कधी प्रॉब्लेम येतात. आधीची पिढी सत्ता सोडायला तयार नसते वा फ्रीडम द्यायला तयार नसते आणि नवी पिढी मात्र ‘मला काहीच स्कोप मिळत नाही’ म्हणून नाराज असते. त्यामुळे हे हॅन्डहोल्डिंग नीट करणे खूप गरजेचे आसते. हे तुम्हालाच करावे लागते. तुमचा मॅनेजर हे नाही करू शकत. तुमचा मॅनेजर एखादा टास्क तुमच्यापेक्षाही अधिक चांगला एक्झिक्यूट करेल, पण स्ट्रॅटेजी नाही.  नव्या-जुन्या पिढीची मोट बांधणे, नव्या पिढीला व्यवसायिक मूल्ये जपायला उद्युक्त करणे, नव्या-जुन्या पिढीतील सीमारेषा आखणे खूप गरजेचे असते. माझ्या बाबतीत आधीच्या पिढीने यावर खूप चांगले काम केले होते. त्यामुळे मला ही जबाबदारी सांभाळणे सोपे गेले.

प्रश्न - आज भारतात किंवा महाराष्ट्रात फॅमिली बिझिनेस कमी आहेत. त्यातच चौथ्या किंवा पाचव्या पिढीपर्यंत गेलेले ब्रँड खूपच कमी आहेत. यामागे तुम्ही आता जे मांडले, हेच गमक आहे का?

- हो, नक्कीच. कारण तुम्ही जसे म्हणाला, तसे जगभरात केवळ दोन टक्के बिझिनेस चौथ्या पिढीपर्यंत जातात.  ते पाचव्या पिढीत जाताना 0.73 टक्के राहतात. त्यामुळे माझ्या पिढीवर हे टिकवायची जबाबदारी आहे आणि आता आम्हाला पुढील पिढीकडे हा बिझिनेस द्यायचा आहे, तर आम्हाला या 0.73 टक्क्यांतच खेळावे लागणार आहे. जर का तुमची यशस्वी होण्याची शक्यता एक टक्क्याहून कमी असेल, तर आम्हाला त्यासाठी काही तरी वेगळे करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी एका थर्डपर्सन व्ह्यूने आम्हाला व्यवसायाकडे पाहावे लागेल. त्यासाठी तुम्ही स्ट्रॅटेजिकली चांगले असायला हवे. तुम्ही ऑपरेशनमध्ये किती चांगले आहात, यापेक्षा स्ट्रॅटेजीमध्ये चांगले असणे अशा परिस्थितीत महत्त्वाचे ठरते.

प्रश्न - भारतात वेल्थ क्रिएशनकडे फारशा बऱ्या नजरेने पाहत नाहीत. आता कुठं मागील काही वर्षांत तो टोन जरा बदलतो आहे. शिवाय आजकालचा ट्रेंडिंग शब्द आहे तो म्हणजे ‘नेपोटिझम’.  पिढीजात व्यवसाय करणाऱ्याला काय सगळे आयते मिळते, असे लोकांना वाटते. या दोन्ही गोष्टीकडे तुम्ही कसे पाहता?

- मीदेखील नेपोटिझमचा भाग आहे, हे खरे आहे. ते नाकारता येणार नाही, कारण मला माझा व्यवसाय माझ्या आधीच्या पिढीकडून मिळाला आहे. आता नेपोटिझमचा शिक्का न लागण्याच्या दृष्टीने आम्ही काय करायला हवे, तर आम्हीसुद्धा व्यवसायात आमचे स्वतःचे काँट्रिब्युशन दिले पाहिजे. जे काही मिळाले आहे ते आयते जरी मिळाले असले, तरी त्यामागे कष्ट आहेत. आणि वारशात फक्त संपत्ती नाही, तर मूल्ये आणि संस्कारही मिळाले आहेत. त्या व्हॅल्यू सिस्टीम तुमच्या घरात असतील, तर नेपोटिझमपलीकडे जाऊन तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता.

खासकरून युरोपमधील आजही टिकून असणारी राजेशाही पाहा. कित्येक रॉयल फॅमिली तेरा-चौदा पिढ्यांपर्यंत टिकलेल्या आहेत. ते कसे टिकू शकले? त्यांनी त्यांचा रोल इन द ऑरगॅनायझेशन हा मॉडिफाय करत नेला. जर त्यांनी सत्ता प्रोटेक्ट करायची, बाहेरचे कुणी येऊनच द्यायचे नाही आणि आम्हाला कुणी चेक्स व बॅलेन्सस लावायचेच नाहीत, अशा पद्धतीचे धोरण बाळगले असते तर अनार्की निर्माण झाली असती. त्यातून डिक्टेटर जन्माला येतो. सो, आपल्याला कुटुंबातही लोकशाही कशी राखता येईल; सर्वांनाच अधिक व्यावसायिक पद्धतीने कसे सामावून घेता येईल, हे पाहावे लागते. अशा वेळी एखादी त्रयस्थ व्यक्ती लागते आणि नेतृत्वाने चिकित्सक पद्धतीने सगळ्या कामाकडे पाहावे लागते. लीडरशिप शुड बी क्रिटिकल.

प्रश्न - आता परिस्थिती बदलते आहे. कोविडमुळे काही रेफरन्स बदलतील, असे बोलले जाते. न्यू नॉर्मल येईल, असे म्हणतात. पुढचा प्रवास करताना कोणती आव्हाने आहेत?

- आमचे इव्होल्युशन असे आहे की, आम्ही सेलिब्रेशन प्लेअर आहोत. जसे की- आज चांगले वाटले, रिझल्ट लागला आहे, नवे घर घेतले आहे अथवा प्रोमोशन झाले म्हणून आनंद साजरा करण्यासाठी चितळेंची मिठाई विकत घेणे. आमचा दुसरा व्यवसाय आहे दुधाचा. जो डेली कमॉडिटीमध्ये येतो. या दोन्ही टोकांच्यामध्ये जो काही सगळा स्पेक्ट्रम आहे, तिथे आम्ही अजून पोहोचलेलो नाही, ती गॅप कमी करून एक ओव्हरऑल फूड कंपनी म्हणून कसे येऊ पुढे येऊ, हे पाहणे महत्त्वाचे आहे. केवळ सेलिब्रेशनपुरते मर्यादित न राहता मॉडर्न लाईफसोबत कसे लिंक करता येईल, हे पाहावे लागेल. हेल्थ असेल अथवा डे टू डे गुड्‌स असतील- इतक्या वाईड रेंजमध्ये प्रॉडक्ट्‌स वाढवून दहा ते वीस लाख दुकानांत आमचे प्रॉडक्ट्‌स विकता येतील का? आणि त्याचबरोबरीने इतर देशांत उत्पादन करून इंटरनॅशनल प्लेअर आपण बनू शकतो का? आणि हे करताना व्हॅल्यू एडिशन करणारी कंपनी म्हणून ब्रँड उभा राहील का? मी सध्या या स्ट्रॅटेजीवर काम करतो आहे.

प्रश्न - तुम्ही तरुण वयात व्यवसायात आलात आणि असंख्य प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळू लागलात. या सगळ्यात स्वतःच्या ग्रूमिंगला कसा वेळ देता?

- थोडा वेळ कमी पडतो. पण नशीब चांगले आहे की, बायको समजूतदार आहे. लग्न करायच्या आधी तिला कल्पना होती की, व्हॉट शी गेटिंग इन टू. त्यामुळे उत्तम सपोर्ट मिळतो. माझ्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे- व्यायाम करणे. दुसरी म्हणजे- मला मोटारसायकल चालवायला फार आवडते. आणि तिसरी म्हणजे- म्युझिक. या गोष्टी मला चॅलेंज करतात. स्वतःला बाकीच्या गोष्टींपासून डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर मित्र, नातेवाईक आणि पुस्तके यांचीदेखील साथ असते.

प्रश्न - तुमचं काम जितकं इंटरेस्टिंग आहे तितकेच तुमचे छंद इंटरेस्टिंग आहेत. त्यासाठी एनर्जी कुठून आणता?

- एक थिंकिंग ब्रेन जसा असतो, तसा मला आहे. मला डोक्याला काही चालना सतत लागते. मी रिकामा बसू शकत नाही. नीड्‌स टू बी ऑक्युपाईड. नशिबाने या पद्धतीने ग्रूमिंग मिळाले, एक्स्पोजर मिळाले. त्यात मला हे लक्षात आले की, माझा ब्रेन मला ऑक्युपाय ठेवणे गरजेचे आहे. जर काही चॅलेंज नसेल, तर कसे होईल? त्यामुळे दर सहा महिन्यांनी मी विचार करतो की, आपण नवीन काय करू शकतो? मध्यंतरी मी जर्मन शिकत होतो. थोडी इटालियन पण शिकलो. माझा कस लागेल असे करायला मला आवडते.

प्रश्न - तुमच्या आयुष्यात वाचनाचा काय रोल आहे?

- मला ऐतिहासिक पुस्तके वाचायला प्रचंड आवडतात. ‘हिस्टरी रिपीट इटसेल्फ’ असे म्हणतात. तशा इतिहासामधून खूप गोष्टी शिकायला मिळतात.  महाभारत, अलेक्झांडर, शिवाजी महाराज... आपण इतिहासात वाचत असतो. अशा अनेक महान नायकांच्या आयुष्यात अनेक ट्रान्झिशन पॉइंट्‌स होते आणि त्या वेळी त्यांनी तसे निर्णय का घेतले, हे समजून घेणे आजही खूप गरजेचे असते. ते आपणाला इतिहासातून कळते. बऱ्याचदा आपण सिच्युएशनमध्ये सापडलेले असतो, अशा वेळी इतिहास मदत करतो.

इतिहासासोबतच मला चरित्रं आणि आत्मचरित्रं वाचायला आवडतात. त्यातून बऱ्याच लोकांचे विचार समजतात. तुम्ही लीडरशिप पोझिशनला जाता तेव्हा तुम्हाला खूप कमी गोष्टी बोलायला लागतात, कारण पोलिटिकली योग्य राहणे गरजेचे असते. त्यामुळे त्यांच्या टॉपला असताना ते कसा विचार करत होते, त्यांच्या डोक्यात काय चालले होते, ते काय गोष्टी बघत होते, त्यातून आपण काय शिकू शकतो- हे अशा चरित्रांतूनच शिकायला मिळते

मी जास्त प्रमाणात वाचतो ते म्हणजे स्ट्रॅटेजी. ते आवडते. थिंकिंग ब्रेन असल्यामुळे वाचणे आणि एखाद्या गोष्टीचा मोठ्या पटलावर विचार करणे मला आवडते. त्यासोबत मी तंत्रज्ञानाबद्दल वाचत असतो. तंत्रज्ञानाला आपण किती कॅचअप करू शकत आहोत, ते त्यातून समजते. मला गाड्यांचीदेखील खूप आवड आहे, त्यामुळे भरपूर ऑटोमोबाईल मॅगझिन वाचत असतो.

प्रश्न - लेटेस्ट काय वाचले आहे?

- अलीकडे युवान नोवा हरारी यांचे सेपियन्स नावाचे पुस्तक वाचले. ते खूप इंटरेस्टिंग आहे. बऱ्याच लोकांना मी त्याची शिफारस करतो. आपली उत्क्रांती कशी झाली आणि पुढे काय होणार आहे, याबद्दल हे पुस्तक आहे. बहुतांश संकल्पना या मानवनिर्मित आहेत- मग ते धर्म असो, राजकारण असो वा इतर अनेक अशा गोष्टी. या सगळ्याकडे प्रत्येकाची बघायची दृष्टी वेगळी असते, त्याबद्दल हे पुस्तक बोलते.

प्रश्न - प्रत्येकाची काही स्वप्नं असतात. एक व्यक्ती म्हणून तुमचे ‘गोल’ काय आहे? अशी कोणती गोष्ट आहे, ज्यासाठी तुम्ही पॅशनेट आहात?

- प्राण्यांच्या बाबतील मी खूप पॅशिनेट आहे. खासकरून कुत्र्याच्या बाबतीत. मी आणि माझ्या बायकोने बऱ्याच कुत्रांना सांभाळले आहे. प्राण्यांना मदत व पुनर्वसन करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. माणसामुळे प्राण्यांच्या अधिवासावर  अतिक्रमण झाले आहे, त्यामुळे त्यावर काम करणे मला महत्त्वाचे वाटते.

दुसरे म्हणजे, भारतात कुपोषणाचे प्रमाण खूप आहे.  जन्मापासूनच्या पहिल्या चार वर्षांत कुपोषणाचे प्रमाण तब्बल 60 टक्के इतके आहे. तेव्हा कुपोषणाशी लढताना आमचे फूड सायन्सचे ज्ञान कुठे वापरता येईल का, त्यावर काम करत आहे.

प्रश्न - आजकाल उद्योजकता व स्टार्ट-अप याबद्दल तरुणांच्यात प्रचंड आकर्षण आहे. त्याबद्दल तरुणाईला काय सांगायला आवडेल?

- भारताची अर्थव्यवस्था आपणाला पाच ट्रिलियन डॉलर करायची आहे, असे आपले पंतप्रधान म्हणतात. सध्या ती  2.5 ट्रिलियन इतकी आहे. ती जर का आपणाला दुप्पट करायची असेल, तर देशाला उद्योजकांची गरज आहे. कारण उद्योजक हे जॉब्ज क्रिएटर आहेत. आपल्या देशाच्या इतक्या वर्षांच्या आर्थिक विचारसरणीत आपण जॉब्ज सिकर्स खूप बनवले, पण उद्योजकतेला महत्त्व देऊ शकलो नाही. त्यामुळे जॉब क्रिएशन ही गोष्ट आपल्याकडे सेलिब्रेट होत नाही. ज्यांना कोणाला शक्य वाटते आहे. ज्यांना वाटते आपल्याकडे ती क्षमता आहे, त्यांनी हे नक्की करून पाहावे. आपण देशाच्या विकासाकरता काय हातभार लावू शकतो आणि फक्त आपला प्रॉफिट नाही तर ओव्हरऑल एक इकोसिस्टीम कशी उभी करू शकतो, याच्यावरती लक्ष द्यायला हवे. असा विचार केल्यास यश मिळतेच, पण ते बायप्रॉडक्ट आहे.

दुसरे म्हणजे, तुमचा व्यवसाय हा सर्व्हिस असो वा प्रॉडक्ट्‌स- तुम्हाला ते नीट मार्केट करता यायला पाहिजे आणि बियाँड हाईप व बियाँड मार्केटिंग कँपेन तुम्हाला व्हॅल्यू क्रिएट करता यायला पाहिजे. व्हॅल्यू क्रिएट झाली, तर यश आहे. काही युनिकॉर्न होतील, तर काही होणार नाहीत. तेव्हा स्पर्धात्मक पद्धतीने धंदा करा, पण तो युनिकॉर्न झालाय म्हणून मी पण होणार, असे नको. व्हॅल्यू क्रिएट करा. आज नाही, पण चार वर्षांनी तुम्ही युनिकॉर्न व्हाल. पण आपण प्रगत देशातील कल्पना भारतात कॉपी करणार असू, तर आपले स्टार्ट-अप यशस्वी होऊ शकणार नाहीत. आपल्या देशाला विशिष्ट समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्टार्ट-अप्स आपणाला केले पाहिजे. ते जर का नीट केले, तर ते बिझिनेस नीट टिकतील. तसेच बिझिनेस पुढे मल्टिजनरेशन पण होतील. यासाठी थोडा संयम हवा आणि चिकाटी हवी. या दोन्ही गोष्टी हव्याच. आणखी एक पुस्तक मला आवडते. ते म्हणजे ‘बिल्ट टू लास्ट’ नावाचे. स्टार्ट-अप करायचाच असेल तर बिल्ट टू लास्ट हे प्रिन्सिपल घेऊन सुरू करावा.

प्रश्न - या सगळ्यात अपयशांना कसे सामोरे जायचे?

- आयुष्यात अपयश हे अपरिहार्य आहे. विजेते नेहमी इतिहास लिहीत असतात, असे नेपोलियन म्हणतो. आपण जर का दहा गोष्टी जिंकलो आणि दोन गोष्टी हरलो, तर आपण त्या दोन गोष्टींबद्दल बोलत नाही. साधारण दोनच नाही तर दोनशे गोष्टी असतात, ज्यात आपण अपयशी झालेलो असतो. त्या दोनशेपैकी दहा गोष्टींमध्ये यश आलेले असते. तेव्हा  अपयशाचा स्वीकार करा. अपयश म्हणजे एन्ड ऑफ द वर्ल्ड नाही. पण एन्ड ऑफ द वर्ल्ड जेव्हा होतो, जेव्हा तुम्ही आवाक्याबाहेरचे धाडस करता. त्यामुळे स्वतःचा आवाका ओळखून उडी मारली, तर कितीही अपयश आले तरी यशही मिळतेच. अपयशाचा आनंदाने स्वीकार करून चिकाटी ठेवली की, यश आपोआप येतेच.

मुलाखत व शब्दांकन : विनायक पाचलग

Tags: विनायक पाचलग मुलाखत बाकरवडी चितळे उद्योगसमूह उद्योग इंद्रनील चितळे chitale owner chitale bakarwadi marathi industrialists indraneel chitale interview weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

इंद्रनील चितळे

चितळे उद्योगसमुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके