डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्र. ई. सोनकांबळे यांच्या ‘आठवणींचे पक्षी’ या आत्मकथनामुळे मराठी साहित्यात आत्मकथा लेखनाचा एक वेगळा प्रवाह सुरू झाला. गेल्या आठवड्यात प्र. ई. सोनकांबळे यांचे निधन झाले.

त्या निमित्ताने हा लेख...

डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक समतेची लढाई सुरू केली होती. ‘स्वातंत्र्य, समता, बंधुतेची मानवी मूल्ये जोवर रुजत नाहीत, तोपर्यंत आर्थिक किंवा राजकीय स्वातंत्र्याला काही अर्थ नाही,’ ही भूमिका ते सातत्याने मांडत असत. दलित तरुणाईला उच्च शिक्षणाची द्वारे खुली झाली पाहिजेत; म्हणूनच त्यांनी शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठवाड्यातील औरंगाबाद शहरात 1950 मध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. त्यामुळे खेडोपाडीचे तरुण मिलिंदच्या परिसरात मुक्त श्वास घेऊ लागले. शिक्षणामुळे त्यांच्यात स्वाभिमान जागरूक झाला. ‘माणूस’ म्हणून जगण्याची प्रेरणा त्यांना मिळू लागली. शब्द पुस्तकात असतात, पण त्यांचा अर्थ आपण आपल्या जीवनात शोधायचा असतो हे त्या तरुणाईला गवसले. आपणही बोलू शकतो,लिहू शकतो याचे भान त्यांना तीव्रतेने झाले.

प्राचार्य म. भि.चिटणीस, म. ना.वानखेडे, रा.ग.जाधव, ल.बा.रामभाने यांच्यासारखे गुरु लाभल्याने असंख्य तरुण लिहिते झाले. त्या तरुणांमध्ये अग्रगण्य नाव होते प्र.ई.सोनकांबळे. ‘वाटाड्या’ नावाच्या भित्तीपत्रकातून त्यांनी स्वानुभव लिहिण्यास सुरुवात केली आणि तेच पुढे ‘आठवणीचे पक्षी’ म्हणून मराठी दलित साहित्यातील पहिले आत्मकथन ठरले. अतिशम संयत, प्रभावी, परिणामकारक व जे सांगायचे ते नेमक्या शब्दांत सांगणारे ‘आठवणीचे पक्षी’ सर्वार्थाने मैलाचे दगड ठरले. उदगीर-लातूरकडील मराठवाडी ग्रामीण भाषा, त्यावेळची आजूबाजूची परिस्थिती, दाहक-कटू अनुभव वाचताना क्लेश होतात, अंतरात्मा तडफडू लागतो; आपलाच आपल्याला राग येतो आणि वाटते, ‘....छीऽऽ काय हा समाज?... माणूसच माणसाला इतक्या खालच्या पातळीवर नेतो...? त्याचं अस्तित्वच नाकारतो...? कोणी दिला हा अधिकार...? का?’ रागाने आपल्या मुठी आवळू लागतात आणि आतल्या आत तडफड सुरू होऊन नकळत अश्रू वाहू लागतात. आणि मग वाटते, ‘अरे काय... काय... सोसलंय या माणसाने! किती अपमान... किती अवहेलना? जातिव्यवस्थेच्या उतरंडीतील सर्वांत शेवटची उतरंड. शूद्रातिशूद्र... किती सहनशीलता?

बुद्धाची करुणा आणि डॉ. बाबासाहेबांची प्रेरणाच प्र. ई. ना जगायला जीवनदायी ठरली. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मिलिंद परिसराशी ते एकनिष्ठ राहिले. एकरूप झाले. विद्यार्थी दशेपासून ते प्राचार्यपदापर्यंत पोहोचले. हा प्रवास अतिशय खडतर...क्लेशदायी होता तरीही कडवटपणा, उरबडवेपणा, आक्रस्ताळेपणा त्यांच्या लिखाणात कुठेही आढळत नाही.

बुद्धाची करुणाच त्यांच्या शब्दाशब्दांतून जाणवायची. ते कधीही, कोणाशी मोठ्याने बोललेत असे झाले नाही. तावातावाने कधी भाषण केलेले नाही. अतिशय मृदु स्वभावामुळे बोलणेही अगदी हळुवार. प्रेम, जिव्हाळा, आपलेपणाच क्षणोक्षणी जाणवायचा. अत्यंत साधी राहणी, थोडे झुकून पण हळूहळू चालणे, तितकेच हळुवार संभाषण. सभा-संमेलनाला आवर्जून हजेरी असायचीच. ज्यांच्याबद्दल आपलेपणा आहे त्यांना हातातल्या पिशवीतील सुगंधी फुले, फुलांच्या पाकळ्या आणि खिशातून खडीसाखरेचे खडे हातावर ठेवायचे. जणू आपल्या अंतरंगातील सुगंध, गोडवाच सर्वत्र वाटत रहायचे. अत्यंत मितभाषी असलेले प्र. ई. सर, हा गोडवा मात्र सदैव सर्वत्र पेरत राहिले. त्यांच्या ‘पोत आणि पदर’, ‘असं हे सगळं’ या लेखसंग्रहांतून त्यांचे माणसाविषयी, समाजाविषयीचे चिंतनच वाचकाला भावून जाते. या थोड्याच पण मोजक्या लिखाणाचा केंद्रबिंदू स्वानुभवाच्या पलीकडे जाऊन समाज चिंतनाचा होता. ज्या समाजाने धुत्कारले त्यांच्याविषयी कुठेही अपशब्द नाहीत, वा हिणकस वृत्तीचे दर्शन नाही. हा समंजसपणा, सहनशीलवृत्ती, निर्मळता, सहजता त्यांच्या ठायी आली कुठून...? तर त्यांची मूळ वृत्ती ऋजुतेची. नम्रतेची, विनयशीलतेची. किती नम्रपणा...? समोरचा माणूस त्यांच्याही नकळत नम्र व्हावा एवढे सौजन्य त्यांच्या ठायी होते.  ‘आठवणीचे पक्षी’ मध्ये ते लिहितात, ‘पूर्वीचे उच्चवर्णीय लोक दलितांना शिवू देत नसत, पण जगू देत असत. आता शिवू देतात, परंतु जगू मात्र देत नाहीत.’ केवढा हा समाजव्यवस्थेला मारलेला मार्मिक टोला...! माणसांच्या मनामनातल्या जातीयतेच्या भिंती मात्र नष्ट झाल्याच नाहीत, उलट आता तर अधिकाधिक मजबूत बनत चालल्या आहेत. हे पंचवीस-तीस वर्षांपूर्वी सांगितलेले सत्य आजही तितकेच वास्तव आहे. संवेदनशील माणूस ‘आठवणीचे पक्षी’वाचल्यानंतर विद्ध झाल्याशिवाय राहत नाही. अंतर्मुख होतो...आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात थोडासा विसावा घेऊन तरुणांनी एकदा तरी हे पुस्तक वाचावे म्हणजे कळेल, साहित्य म्हणजे काय असते...! जे हृदयाला भिडते, मनाला भावते आणि बुद्धीला अस्वस्थ करून सोडते- विचार करायला भाग पाडते, ते खरे अक्षर वाङ्‌मय! अक्षरवाङ्‌मयात सर्वांत वरचे एक बिनीचे अग्रगण्य आत्मकथन म्हणून ‘आठवणीचे पक्षी’ सदैव स्मरणात राहील. त्यांच्या या आत्मकथेचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले. प्र.ई. ना अनेक पुरस्कार मिळाले, त्यांनी अनेक मानाची पदे भूषविली, पण अहंकाराचा वारा त्यांच्या बाजूलाही फिरकला नाही. अत्यंत प्रामाणिकपणे, कष्टाने जे मिळविले त्यात त्यांनी समाधान मानले, आपले घरदार उच्चशिक्षित केले. ते स्वत:च सुसंस्कारी असल्याने घरही संस्कारितच राहिले; आदरातिथ्य तर त्यांचा स्थायीभाव होता.

त्यांच्या घरी गेल्यानंतर आग्रहाने खाऊ-पिऊ घातल्याशिवाय पाठवत नसत. वेळ असेल, निवांतपणा असेल तर बाजूला घेऊन म्हणायचे, ‘बहिणाबाई, जरा या गरीब भावाकडे बी लक्ष असू द्या की...! आवो माझ्या पोरांच्या आत्याबाई तुम्ही. तुमच्या भाचीसाठी एखादं चांगलं स्थळ सुचवा; जरा ध्यानात घेऊन कामाला लागा. तुमची भाची लई गुणाचीय. शिकली-सवरलेलीय-कमावतीय. योग्य ‘स्थळ’ शोधलं तर या भावाची चिंता मिटंल बघा. पोरांचं काम, होत राहील... पर पोरगी...काळजी वाटतीय... एवढं शिकून... तिला योग्य ‘वर’ शोधणं अवघड झालंय बघा...’ असं म्हणत असताना त्यांच्यातला ‘बाप’ मला हेलावून टाकायचा. त्यांचे डबडबलेले डोळे ते हळूच पुसायचे नि पुन्हा म्हणायचे, ‘महावीर भाऊंनाही सांगून ठेवा; तुमचा दोघांचा गोतावळा मोठाय... त्यांच्या पाहण्यात खूप मुलं असतात...’ मी मात्र मनातल्या मनात खजिल व्हायची...योग्य वर...? कधी, कुठे... कसा सापडावा? किती कठीण गोष्ट होती! त्याबाबत मी अपयशीच ठरले. पण आजही त्यांचा त्यांच्या लेकीसाठी तळमळणारा जीव, एक अगतिक बाप...डोळ्यांसमोरून जाता जात नाही. मला वाटतं प्रत्येक मुलीचा बाप (अपवाद सोडून) असाच अगतिक, असहाय होत असेल का?‘योग्य’ वराच्या शोधासाठी! मग तो बाप सामान्य असो, असामान्य असो, साहित्यिक असो वा महान कलावंत असो, अखेर त्याच्या आतील बापाचं हृदय खरंच कोणी मोठ्या मनानं जाणून घेईल का...?

Tags: लातूर उदगीर मिलिंद महाविद्यालय प्राचार्य समाजचिंतन इंदुमती जोंधळे पोत आणि पदर आठवणींचे पक्षी आत्मकथन लेखक सोनकांबळे प्र. ई Indumati Jondhle Life sketch Memories Articles Books Death Marathi Autobiography Autobiography Athwaninche Pakshi Author Writer P. R. Sonkamble weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके