डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सयाजीराव : जनकल्याणात मोक्ष शोधणारे महाराज

भारताच्या वैचारिक, सामाजिक आणि शैक्षणिक बांधणीत महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे लक्षणीय कार्य आहे. त्या काळातील बहुतांश सर्व युगपुरुषांना मदत केलेल्या या प्रज्ञावंत राजाने आयुष्यभर प्रजाहित आणि समाजसेवेत आपला मोक्ष शोधला. हा सार्वभौम राजा आयुष्यभर ब्रिटिश सत्तेशी हिमतीने संघर्ष करत क्रांतिवीरांचा पाठीराखा झाला. बलसंपन्न भारताचे स्वप्न पाहणाऱ्या आणि लेखक- कलावंताचे पोशिंदे झालेल्या स्वच्छ चारित्र्याच्या सुप्रशासकाची ओळख ही आजची गरज आहे. सयाजीराव यांचे लेखन, भाषणे, पत्रव्यवहार व सरकारी दस्तऐवज अशी विपुल साधनसामग्री 50 खंडांमध्ये प्रकाशित करणाऱ्या बृहद्‌ प्रकल्पाचे बाबा भांड हे प्रवर्तक आहेत, संयोजक आहेत. त्यातील 25 खंड मागील वर्षभरात प्रकाशित झाले आहेत. उर्वरित 25 प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. त्यानिमित्ताने त्यांची घेतलेली ही मुलाखत. 

डॉ.राजेंद्र मगर : महाराजा सयाजीराव यांचा जगद्‌विख्यात इतिहास महाराष्ट्रापुढे न येण्याचे काय कारण असावे? 

बाबा भांड : भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभारली गेली. या चळवळीमुळे मुंबई राज्याचे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. पूर्वीच्या मुंबई प्रांतातील गुजराती भाषकांचे गुजरात राज्य बनले. महाराजा सयाजीराव यांचे बडोदा संस्थान गुजरात राज्याचा भाग झाले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाले. द्रष्टे यशवंतराव चव्हाण यांनी साहित्य, कला, संस्कृती ही राष्ट्राची संपत्ती आहे हे ओळखले. हा सांस्कृतिक वारसा जतन - संवर्धनासाठी 1960 मध्ये महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली. साहित्य-कला संवर्धनासाठीचा भारतातील हा महत्त्वपूर्ण निर्णय होता. प्रकांडपंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी या मंडळाचे पहिले अध्यक्ष होते. मा.यशवंतराव चव्हाण यांनी इ.स. 1962 मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड या सुप्रशासकाचे समग्र साहित्य महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. सर्व क्षेत्रांतील सयाजीरावांच्या कार्यांची ओळख त्यांना होती. इ.स. 1963 हे सयाजीरावांचे जन्मशताब्दीचे वर्ष होते. दुर्दैवाने इ.स. 1962 मध्ये भारत-चीन युद्ध सुरू झाले. यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीला संरक्षणमंत्री म्हणून जावे लागले. महाराजा सयाजीराव समग्र चरित्र साहित्य प्रकाशन प्रकल्प तिथेच थांबला. महाराष्ट्रातील अभ्यासक- लेखकांनी महात्मा फुले, शाहूमहाराज, डॉ.आंबेडकरांना पुरोगामी महाराष्ट्राचे युगपुरुष म्हणताना सर्व महापुरुषांना मदत करत, या देशात अनेक क्षेत्रांत आपले वेगळेपण सिद्ध केलेल्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे दुर्लक्ष झाले असावे. 

दिनेश पाटील : महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती’ स्थापनेपूर्वी तुम्ही केलेल्या सयाजीराव यांच्या कामासंबंधी थोडे सांगा. 

बाबा भांड : नागपूर येथील सरकारी अभिलेखागारात मी तंट्या भिल्ल या आदिवासी वीराची कागदपत्रे शोधत असताना महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत मित्र डॉ.भास्कर लक्ष्मण भोळे म्हणाले, ‘‘हिंदुस्थानात दोन सामान्य माणसांनी कर्तृत्वाने इतिहासात असामान्य काम केले आहे. त्यातील तंट्याचे काम तू करतो आहेस. तसाच दुसरा उपेक्षित नायक आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याचा पोरगा- जो पुढे योगायोगाने बडोद्याचा राजा बनतो, हिंदुस्थानात अनेक क्षेत्रांत लक्षणीय काम करतो; पण त्याबद्दल फारसे लिहिले गेले नाही.’’ आदरणीय डॉ.भोळे यांच्या सांगण्यामुळे मी तंट्या भिल्ल या आदिवासी क्रांतिवीरावर कादंबरी, चरित्र, किशोर कादंबरी, शोधाची कहाणी लिहून होताच बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्यावर ऐतिहासिक कादंबरी लेखनासाठी साधनसाम ग्रीचा शोध सुरू केला. साहित्य समोर दिसू लागले. 400-500 पानांची कादंबरी, चरित्र, किशोर कादंबरी, काही निवडक भाषणे, कायदे प्रकाशित होत गेले; पण प्रचंड संदर्भसाहित्य शिल्लक दिसू लागले. हे प्रकाशन महाराष्ट्र शासनच करू शकेल, हा विचार मग मनात आला. तंट्या भिल्ल आणि महाराजा सयाजीराव या दोन नायकांवर कादंबरी, चरित्र, किशोर कादंबरीशोधाची कहाणी या विविध वाङ्‌मयप्रकारांचा मराठीतील पहिला वाङ्‌मय प्रयोग मी अभ्यासकांसाठी व वाचकांसाठी करू शकलो, याचे खूप समाधान मिळाले. 

डॉ. राजेंद्र मगर : महाराजा सयाजीरावांनी स्वत: शिक्षण घेऊन सुप्रशासन आणि सुधारणांची सांगड कशी घातली? 

बाबा भांड : नाशिक जिल्ह्यातील कवळाणा गावचा गोपाळ दत्तकपुत्र बनून बडोदा येथे राजा बनला. अक्षर- ओळख अन्‌ अंकज्ञानाच्या शिक्षणासोबत राज्यकारभाराचे शिक्षण लाभलेल्या या राजाने शिक्षणाची ताकद ओळखली. राजा ज्ञानी असावा, हे ओळखून ते स्वत: शिकले. जगभरातील प्रशासनपद्धतींचा अभ्यास केला. राज्य चालविणे हे शास्त्र आहे, हे ओळखून प्रशासन समजून घेतले. सुप्रशासन आणि जनतेच्या कल्याणासाठी ज्ञानात्म प्रबोधनाद्वारे सामाजिक सुधारणांची टप्प्याटप्प्याने सांगड घातली. भारतातीलच नव्हे, तर जगभरातील त्या-त्या विषयांतील तज्ज्ञ बडोद्यात आणून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग प्रजेच्या सुधारणेसाठी केला. यामध्ये ग्रंथालयांसाठी अमेरिकेहून बोर्डेन, तर इंग्रजांच्या सेवेतील प्रशासक आर.सी. दत्त यांना बडोद्यात आणले. प्लेगची लस शोधणारे डॉ.हाफकिन यांनाही बडोद्यात सन्मानाने बोलावून घेतले होते. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. प्रजेला शिक्षण दिले तरच प्रबोधन सुलभ होईल, या जाणिवेतून अस्पृश्य-आदिवासींसाठी राज्यकारभार हाती येताच दुसऱ्या वर्षी इ.स. 1882 ला बडोदा सरकारमार्फत शिक्षण, वसतिगृह, शालेय साहित्य मोफत देण्याची समाजक्रांतिकारक कृती करणारे ते पहिले द्रष्टे प्रशासक होते. महत्त्वाचे म्हणजे, या वर्षी हंटर कमिशनसमोर बहुजनांच्या शिक्षणाची मागणी महात्मा फुले करत होते. 

दिनेश पाटील : महाराजा सयाजीरावांच्या हिंदुस्थानातील शिक्षण-योगदानाबद्दल काय सांगाल? 

बाबा भांड : शिक्षण हेच विज्ञान, प्रगती अन्‌ परिवर्तनाचे एकमेव साधन आहे- हे स्वत:च्या अनुभवातून आणि गुरुवर्यांच्या मार्गदर्शनातून सयाजीरावांनी अनुभवले. हे शिक्षण रयतेला उपलब्ध करून देणे हे राजकर्तव्य आहे, या भावनेतून इ.स. 1892-93 मध्ये सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाची सुरुवात केली. गैरहजर विद्यार्थ्यांना दिवसाला आठ आणे दंड सुरू केला. मुलांसाठी पाठ्यपुस्तके तयार केली. वसतिगृहे सुरू केली. शाळेत मुला-मुलींना शारीरिक शिक्षण सुरू केले. चौथीनंतर शाळा सोडलेल्या मुलांची साक्षरता टिकावी, म्हणून गावोगावी सार्वजनिक वाचनालये सुरू केली. ‘गाव तिथे वाचनालय’ हा या देशातील पहिला प्रयोग होता. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेतकी शाळा काढल्या. 

डॉ. राजेंद्र मगर : सयाजीरावमहाराज गादीवर आले, तेव्हा बडोदा राज्य तोट्यात होते. पुढे काही वर्षांनी बडोदा हे जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत संस्थान कसे बनले? 

बाबा भांड : सयाजीरावमहाराज गादीवर आले, तेव्हा बडोदा राज्य काही लक्ष रुपये तोट्यात होते. प्रत्यक्ष राजकारभार हाती येताच या तरुण राजाने राज्याचे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत आणि अनाठायी खर्चाचा बारकाईने अभ्यास केला. खानगी खर्चापैकी राजवाड्यातील देवघर, पुरोहितांचा दानधर्म, राजपुत्रांच्या मुंजी, धार्मिक समारंभांवर होणारा अवाजवी खर्च, नात्या-गोत्यातील मंडळी खर्च वाढवून लूटमार करीत असल्याचे लक्षात येताच, महाराजांनी खासगी खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी ‘काटकसर समिती’ 1904 मध्ये स्थापन केली. समितीच्या अहवालानुसार अनाठायी खर्चास कात्री लावली. महसूलवसुली, सरदार-देवस्थानाकडील महसूलवसुली वाढवून सर्व खर्चांना कायद्याच्या चौकटीत बसवून राज्याचे उत्पादन वाढविण्यासाठीच्या आर्थिक नियोजनाची कडकपणे अंमलबजावणी केल्याने बडोदा राज्याचे उत्पन्न वाढत गेले. राज्यकारभार हाती आल्यानंतर वीस-पंचवीस वर्षांत बडोदा राज्य हे सुयोग्य आर्थिक नियोजनाचे उत्तम उदाहरण आहे. म्हणून बडोदा राज्य जगातले आठव्या क्रमांकाचे श्रीमंत राज्य महाराज सयाजीराव बनवू शकले. प्रत्येक गोष्टीतली काटकसर आणि उत्पन्नवाढीचे स्रोत शोधणे ही त्यांच्या या यशाची गुरुकिल्ली ठरली. 

दिनेश पाटील : सयाजीरावमहाराजांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान काय विशेष आहे? 

बाबा भांड : स्वातंत्र्यापूर्वी हिंदुस्थानात लहान-मोठी 565 संस्थाने होती. सगळे राजे-रजवाडे ब्रिटिश सरकारचे मांडलिक होते. बडोदे संस्थान हे बलाढ्य ब्रिटिश सत्तेचे मित्र आहे, मांडलिक तर मुळीच नाही- हा 1802 व 1818 चा ईस्ट इंडिया कंपनी व बडोदे सरकारातील मूळ करार तरुण सयाजीरावांनी अभ्यासला होता. गुरुवर्य एफ.ए.एच. इलियट यांनी या कराराचे वेगळेपण आपल्या विद्यार्थ्याच्या मनावर पक्के बिंबविल्याने सयाजीरावांनी ब्रिटिश सत्तेशी हिमतीने आयुष्यभर संघर्ष केला. एवढेच नाही तर सयाजीराव यांच्याकडे अरविंद घोष, बॅ.केशवराव देशपांडे, खासेराव जाधव हे क्रांतिकारक नोकरीला होते. प्रो.माणिकरावांसारखी राजरत्ने होती. त्यांच्या जुम्मादादा व्यायाम आखाड्यात क्रांतिकारकांची उठ-बस होती. यांच्या मदतीने बडोदा क्रांतिकारक चळवळीचे केंद्र झाले होते. सयाजीरावांनी देशभरातीलच नव्हे, तर लंडन येथील क्रांतिकारकांनाही हुशारीने मदत केली; पण ब्रिटिश सरकारला एकही ठोस पुरावा मिळू दिला नाही. कर्झनसारख्या गव्हर्नर जनरलना सयाजीरावांनी पत्र लिहून कळविले, ‘मी तुमचा नोकर नाही.’ एका प्रकरणात लंडनच्या उच्च न्यायालयाने निर्णय दिला की, ‘सयाजीराव गायकवाड हे सार्वभौम राजे आहेत.’ स्वातंत्र्यलढ्याचे पाठीराखे सयाजीराव यांच्या या शौर्यशाली इतिहासाची नोंद आमच्या इतिहासाने पूर्वी घेतली नाही, हा वास्तव इतिहास आहे. 

डॉ. राजेंद्र मगर : महाराजा सयाजीराव यांनी अनेक युगपुरुष आणि संस्थांना मदत केली. त्यांच्या या दानशूरतेबद्दल काय सांगाल? 

बाबा भांड : हिंदुस्थानात ज्या काळात राजेलोक रयतेच्या पैशावर हौस-मौज करत आपल्या ऐेशर्याचा डामडौल जगाला दाखविण्यात मश्गूल होते, त्या वेळेस महाराजा सयाजीराव स्वत:पासून काटकसर करत होते. मात्र द्रष्टे सयाजीराव शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळी अन्‌ वाङ्‌मय-कलांचे आश्रयदाते होते. देशभरातील आणि परदेशातील अनेक संस्था आणि गरजू युगपुरुषांना चौसष्ट वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी कोट्यवधींची मदत केली. त्यात पितामह दादाभाई नौरोजी, जमशेटजी टाटा, नामदार गोखले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ.आंबेडकर, पंडित मदनमोहन मालवीय, कर्मवीर भाऊराव, महर्षी कर्वे, स्वा.सावरकर, गंगारामभाऊ म्हस्के, महर्षी शिंदे, सर चंदावरकर, डॉ.श्रीधर केतकर, भास्करराव जाधव, कोल्हापूरचे पहिले छात्रगुरु सदाशिव पाटील-बेनाडीकर, डॉ.अप्पासाहेब पवार, राजारामबापू पाटील (वाळवा), डॉ.बापुजी साळुंखे हे काही मान्यवर आहेत. पुणे शहरातील सार्वजनिक सभा, भांडारकर प्राच्यविद्या संस्था, शनिवारवाडा जीर्णोद्धार, श्री शिवाजी पुतळा, विश्रामबाग वाडा, फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन व्हर्नाकुलर सोसायटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे पंचांग संशोधन मंडळ, अ.भा. अस्पृश्यता निवारण परिषद, अहिल्याश्रम, डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन या संस्था आहेत. या आणि देशभरातील व्यक्ती व संस्थांना महाराजांनी केलेल्या मदतीचा आकडा 89 कोटी रुपयांहून अधिक आहे. याचे आजचे मूल्य हे 2 लाख 80 हजार कोटी एवढे होते. महाराजा सयाजीरावांनी डॉ.भीमराव आंबेडकर यांना पदवी अमेरिकेतील उच्चशिक्षणासाठी दोनदा शिष्यवृत्ती वाढवून दिली. या शिष्यवृत्तीची आजच्या बाजारमूल्यानुसार रक्कम 90 लाख रुपये भरते. डॉ.आंबेडकरांना नोकरीच्या काळात सरकारी निवासस्थानी राहण्याची व्यवस्था केली. त्यांना राहण्यासाठी लवकर बंगला बांधावा, असे आदेशही दिले होते. शेवटी बडोदा शिक्षण शिष्यवृत्ती माफही केली; मात्र या राजाने स्वतःचे ज्येष्ठ बंधू आनंदराव यांना आठ-दहा रुपये शेतसारा माफ केला नाही. 

दिनेश पाटील : अस्पृश्यतानिवारणातील सयाजीराव यांची ऐतिहासिकता थोडक्यात सांगा. 

बाबा भांड : डॉ.आंबेडकरांच्या 'Annihilation Of Caste' या 1936 च्या क्रांतिकारक निबंधाची पूर्वतयारी म्हणावा असा 'Depressed Classes' हा निबंध सयाजीरावांनी 1909 मध्ये लिहिला होता. हिंदुस्थानमध्ये अस्पृश्यता-निवारणासाठी प्रत्यक्ष कायदे करून ती दूर करण्याचा प्रयत्न करणारे महाराजा सयाजीराव हे पहिले प्रशासक होते. त्यांना माहीत होते, समाजातील अनिष्ट रूढी केवळ कायदे करून सुटणार नाहीत. त्याकरता उच्चवर्णीयांनी या वंचित-अस्पृश्य समाजास सार्वजनिक  ठिकाणी स्वीकारले पाहिजे. याकरता त्यांनी स्वत: अस्पृश्याच्या हॉटेलात भोजन करणे, राजवाड्यातील पंगतीभेद दूर करणे, अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी हुकूम काढणे, राजवाड्यात अस्पृश्य विद्यार्थ्यांना मेजवानी देणे, स्वत:चे खंडोबाचे मंदिर अस्पृश्यांस खुले करणे, ग्रंथालयात अस्पृश्य मंडळींना प्रवेश, अस्पृश्यांसाठी 1913 मध्ये संस्कृत पाठशाळा काढणे, अस्पृश्य मुलांसाठी बडोदा, पाटण, अमरेली, महुआ येथे वसतिगृहांची स्थापना इत्यादी अनेक प्रयत्न केले. डॉ.आंबेडकरांशिवाय पी.जी. परमार, एम.जी. परमार आणि आर.टी. लेरूवा या अस्पृश्य समाजाच्या विद्यार्थ्यांना लंडन येथे उच्च शिक्षणासाठी पाठविले. अस्पृश्य विद्यार्थ्यांना निवास, भोजन, कपडे, पुस्तके व शालेय साहित्य त्यांचे सरकार मोफत पुरवत होते. चांभार मुलांना व्यवसायाचा कच्चा माल व हत्यारे घेता यावीत, म्हणून प्रत्येकी दोनशे रुपये बिनव्याजी कर्ज देत. अस्पृश्यांच्या सहकारी सोसायट्यांनाही बिनव्याजी कर्ज द्यायचे. हिंदुस्थानात विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्योद्धाराच्या कार्याची सुरुवात केली. महाराजांनी त्यांना मदत केली. आपल्या हीरकमहोत्सवी कार्यक्रमात अस्पृश्य वर्गाच्या उन्नतीसाठी सयाजीरावांनी स्वत:च्या खासगी फंडातून एक कोटी रुपये पुन्हा दिले. असे अस्पृश्योद्धाराचे उदाहरण दुसरे कोणाचे आहे का हो? अस्पृश्योद्धारात, जनकल्याणातच मोक्ष शोधणारे सयाजीराव हे दूरदृष्टीचे महामानवच होते. 

डॉ.राजेंद्र मगर : सयाजीरावमहाराजांच्या समाजसुधारणांची तोंडओळख कशी करता येईल? 

बाबा भांड : धर्म हे समाजजीवनाचे एक अंग आहे, हे ओळखलेल्या सयाजीरावांनी धर्म आणि समाजसुधारणा ंची व्यवस्थित सांगाड घातली. धर्माच्या नावाने वर्षानुवर्षे अनिष्ट रूढी, चालीरीती सर्वसामान्यांना लुबाडीत आहेत, हे ओळखलेल्या महाराजांनी इ.स. 1917 मध्ये स्वतंत्र धर्मखात्याची स्थापना करून सुधारणांचा श्री गणेशाच केला. इ.स.1915 च्या पुरोहित कायद्यानुसार पुरोहितांची परीक्षा घेऊन ती उत्तीर्ण होणाऱ्या पुरोहितांना पौरोहित्याचा परवाना देण्यास सुरुवात केली. तसेच या कायद्यान्वये यजमानांना त्यांच्या मातृभाषेत धार्मिक विधींचा अर्थ सांगणे पुरोहितांना सक्तीचे करण्यात आले. जगाच्या इतिहासातील अशा प्रकारचा हा एकमेव कायदा आहे. राजवाड्यात वेदोक्तविधी, ग्रहणाची सुट्टी रद्द, संन्यासासाठी नियम, पगारी कीर्तनकारांच्या माध्यमातून समाजप्रबोधन, बालविवाहबंदी, विधवा पुनर्विवाह, दानधर्माचे नियम, मंदिरे सर्वांना खुली केली. तंबाखू व मदिरा विक्री दुकानावर मुलांना बसण्यास बंदी, मुला- मुलींच्या विवाहाचे वय ठरविले. वडिलांच्या मालमत्तेत पत्नी व मुलींना अधिकार दिला. नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी कायदा केला. सयाजीरावांच्या समाजसुधारणांच्या कायद्याबद्दल डॉ.आंबेडकरांनी लिहून ठेवले आहे, ‘बडोदे संस्थानातील सामाजिक सुधारणांविषयी जे कायदे करण्यात आले, ते युरोप व अमेरिकेतील कोणत्याही सुधारलेल्या राष्ट्राच्या तद्‌विषयक कायद्यांपेक्षा पुढारलेले आहेत.’ 

दिनेश पाटील : महाराजांच्या धर्मविषयक कार्याचे वेगळेपण स्पष्ट कराल का? 

बाबा भांड : या प्रश्नाशी संबंधित धर्म आणि सामाजिक सुधारणांची सांगड महाराजांनी घातली, असा उल्लेख मी वर केलेला आहे. जगभरातील प्रशासन आणि धर्मव्यवस्थांचा तुलनात्मक अभ्यास करत असताना सयाजीरावांनी ओळखले, परिवर्तनशील जगात धर्माचे स्थान अटळ आहे. पण धर्माचे स्वरूप निर्दोष आणि सत्यमय असावे, हा विचार त्यांच्या मनात रुजला. या कुतूहलातून त्यांनी सर्व धर्मांची तुलनात्मक ओळख स्वत: करून घेतली. यातून त्यांच्या समोर एक सूत्र आले. खरा धर्म हा विेशबंधुत्वाची शिकवण देतो. सर्व जाती-धर्मांच्या माणसांमध्ये सदाचरण आणि सद्‌गुणांची वाढ व्हावी अशी प्रेरणा देतो; पण याकरता धर्मसाक्षरतेची आवश्यकता आहे. या कर्तव्यभावनेतून महाराजांनी सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास करण्यास अभ्यासकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 1916 मध्ये बडोदा कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान आणि तुलनात्मक धर्म- अभ्यासाचे अध्यासन सुरू केले. महाविद्यालयीन स्तरावर तौलनिक अभ्यासक्रम सुरू करून जगातील पहिली तुलनात्मक धर्म-अभ्यासाची ग्रंथमाला 1918 मध्ये सुरू केली. जगभरातील तौलनिक धर्मसाक्षरतेची ही पायाभरणी म्हणता येईल. 

डॉ.राजेंद्र मगर : महाराजा सयाजीराव एक प्रज्ञावंत लेखक, ग्रंथ व ग्रंथागाराचे पोशिंदे होते, असे आपण सांगता. या संदर्भात महाराजांचे नेमके धोरण काय होते? 

बाबा भांड : शिक्षण हे प्रगती व परिवर्तनचा एकमेव मार्ग आहे, हे स्वत: अनुभवलेल्या सयाजीरावांनी ग्रंथ हेच  ज्ञानाचे भांडार आहे, हे ओळखले. यामुळेच त्यांनी ग्रंथवाचनाची साधना आयुष्यभर केली. दररोज स्वत: वाचन करायचे, टीपा काढायचे, रीडरकडून वाचून घेत. दुष्काळ, संकटं अन्‌ निराशावस्थेत ग्रंथाच्या सहवासाने त्यांनी आपले आत्मबळ वाढविले. इतिहास, धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, विज्ञान या विषयांचे त्यांनी चौफेर वाचन केले. संत तुकाराम त्यांचे आवडते कवी होते. तुकारामगाथा प्रवासात सोबत असायचा. दररोज डायरीलेखन करायचे. सयाजीरावांनी 1800 हून अधिक ग्रंथ-प्रकाशनास मदत केली. अनेक लेखकांना मानधनाची मदत करून लिहिते केले. देशातील व परदेशातील अनेक विद्वान लेखकांस ग्रंथ-लेखनासाठी महाराजांनी आर्थिक मदत देऊन साहित्यनिर्मितीस हातभार लावला. एवढेच नाही तर त्यांची भाषणे, पत्रे, हजारो हुजूरहुकूम, दुष्काळ दौऱ्यातील नोंदी, मराठी शब्दांवर टीपा हे या एका प्रज्ञावंत लेखकाचे अक्षरधनच म्हणता येईल. जगप्रसिद्ध इतिहासकार एडवर्ड गिब्बन यांच्या ‘डिक्लाईन ॲड द फॉल ऑफ रोमन एम्पायर’ या ग्रंथावर सयाजीराव यांनी एकतिसाव्या वर्षी ‘फ्रॉम कैसर टू सुलतान’ हा टीकाग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे मराठी भाषांतर राजारामशास्त्री भागवतांनी ‘कैसरकडून सुलतानाकडे’ या नावाने केले. हा ग्रंथ एका प्रज्ञावंत राजाच्या लेखन-वाचनाची साक्षच आहे. 

दिनेश पाटील : महाराजांची शिक्षण ही संकल्पना अत्यंत व्यापक होती. तिचे खास वैशिष्ट्य काय? 

बाबा भांड : वयाच्या बाराव्या वर्षांपर्यंत निरक्षर असलेले सयाजीराव शिक्षणाची ताकद ओळखून स्वत: चिकाटीमेहनतीने शिकले. रयतेसाठी सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण देऊन ते थांबले नाहीत, प्रगतीची साधने शिक्षणाच्या विविधतेत असल्याने 1890 मध्ये बडोद्यात कलाभवन या आधुनिक तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची स्थापना केली. मानवी प्रगती कलांमुळे होऊ शकते, हे ओळखून विद्यार्थ्यांना औद्योगिक शिक्षण देणे सुरू केले. शेती, सहकार, कुक्कटपालन, दुग्धपालन, पतपेढ्या, गृहउभारणी, वैदिक पाठ, पाककला, छायाचित्रण, संगीतनाट्य, धर्मशास्त्र या शिक्षणाच्या विविध पैलूंच्या विकासासाठी महाराजांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन, हे प्रकल्प सुरू करण्यास मदत केली. पारंपरिक शिक्षणासोबत जगभरातील नवे ज्ञान जनतेला देण्याची व्यापक दृष्टी यात दिसून येते. 

डॉ. राजेंद्र मगर : सयाजीरावमहाराजांच्या दीर्घ कालखंडातील आपत्ती निवारणाबद्दल थोडक्यात सांगा. 

बाबा भांड : सयाजीरावमहाराजांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे जसा सुधारणांचा इतिहास म्हणता येतो, तसेच संकटं आणि संघर्ष निवारण्याचाही प्रवासच आहे. माणसाच्या जीवनात अडचणी आणि संकटं हा जगण्याचा भागच असतो. सयाजीरावांनी निसर्गातील दुष्काळ, अतिवृष्टी अन्‌ प्लेगच्या संकटात प्रजेला मदतीचा आधार दिला. आपत्तीची पाहणी स्वत: केली. बाधित प्रजेला धीर देऊन आवश्यक असणाऱ्या जीवनाश्यक बाबींचा तातडीने पुरवठा केला. संकटं आली की, तात्कालिक मदतीबरोबर दीर्घकालीन उपाययोजनाही केल्या. यासोबत कुटुंबातील संकटं आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधाच्या आपत्तींनाही गनिमीकाव्याने शांतपणे व कर्तव्यभावनेने तोंड दिले. या आपत्तीकडे संकट म्हणून न पाहता शोशत सुधारणेची एक संधी म्हणून त्यांनी पाहिले. दूरदृष्टीने दीर्घकालीन उपाययोजना करत आपत्तीवर त्यांनी मात केली. 

दिनेश पाटील : महाराष्ट्राच्या प्रगतीत सयाजीरावांचे मूलभूत योगदान असताना ते आजवर का दुर्लक्षित राहिले, असे तुम्हाला वाटते? 

बाबा भांड : आजच्या आधुनिक भारताच्या जडणघडणीत ज्या युगपुरुषांचे योगदान आहे, या सर्व महत्त्वाच्या मंडळींना कोणत्या ना कोणत्या प्रकारे साह्य अथवा प्रेरणा महाराजांकडून मिळाली. भाषावर प्रांतरचनेनंतर 1960 नंतर महाराजांचा बडोदा प्रांत गुजरात राज्याचा भाग झाला. महाराष्ट्रातील विचारवंत, इतिहास अभ्यासक यांनी पुरोगामी महाराष्ट्राच्या नायकासोबत सयाजीरावांचे नाव का जोडले नाही, याचे नीट उत्तर सापडत नाही. स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनी येथील लोकशाहीने जात, पात, धर्म या मापाने युगपुरुषांना आपापल्या चौकटीत मढविले. या चौकटीत न बसणारे, परंतु त्या पलीकडे सर्वधर्म-समभावातून मानवतेचा सतत विचार करणारे सयाजीराव राजकारण- मतदानातील शिक्का म्हणून कर्त्या पुरुषांनाही उपयोगी वाटले नसावेत. छत्रपती शाहूमहाराज, महात्मा फुले आणि डॉ.आंबेडकर या महापुरुषांच्या नावाने जात-पात अन्‌ पुरोगामीपणाचा दाखला देत सर्व पक्षीय मंडळी लोकशाही प्रणालीत त्याचा उपयोग करत आले. त्यात या सर्व महापुरुषांना मदत करणारे सयाजीरावमहाराजांचे सर्व क्षेत्रांतील योगदान मात्र दुर्लक्षित झाले असावे. पण हेही खरे  आहे की, राजकीय मंडळींना दोष देण्यापेक्षा महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत, भाषा-अभ्यासक, प्रशासनातील तज्ज्ञ, इतिहासाचे चिकित्सक अभ्यासक, संतसाहित्याचे महामेरू, स्वातंत्र्यलढ्याचा पाढा गाणारे राष्ट्रपेमी या सर्वांनी सयाजीरावांच्या ओळखीकडे का दुर्लक्ष केले, हा प्रश्नही अनुत्तरित आहे. 

डॉ. राजेंद्र मगर : शेती आणि शेतकरी आपल्या देशाचा कणा आहे. याबाबत सयाजीरावांची भूमिका काय होती? 

बाबा भांड : हिंदुस्थानात शेती खाते सुरू केलेल्या महाराजा सयाजीरावांनी ओळखले होते की, या देशात शेती आणि शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शंभर वर्षांपूर्वी ते म्हणाले, या देशात शेतीची साधने अपुरीच आहेत. शेती उत्पन्नासोबत पूरक उद्योग शोधणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे आरोग्य, शेतीसाठी पाणी अन्‌ शेती उद्योगाशी संबंधित शिक्षणबदल ही काळाची गरज आहे. शेतकऱ्याच्या मुलाने पारंपारिक पद्धती सोडून बदलत्या काळाचे अनुकरण करावे. प्राथमिक शिक्षणापासून शेतीपूरक अभ्यासक्रम असावा. नाही तर शिकलेली  शेतकऱ्यांची मुले गावात रमणार नाहीत. सयाजीरावांचे शतकापूर्वीचे हे निरीक्षण आजही फारसे बदलले नाही. हे शेती शिक्षणाबद्दलचे वास्तव आहे. 

दिनेश पाटील : महाराष्ट्र शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीच्या माध्यमातून तीन वर्षांत झालेल्या कामाची व्याप्ती तपशिलाने सांगा. 

बाबा भांड : बरोबर चार वर्षांपूर्वी (4 ऑक्टोबर 2016 रोजी) औरंगाबादला महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाची बैठक होती. दुपारी पावणेदोन वाजता उच्चशिक्षणमंत्री विनोदजी तावडे यांचा फोन आला. ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला. अभिनंदन! कामाला लागा. समितीचे कार्यालय औरंगाबादलाच असणार आहे.’ माझ्या लेखन-प्रकाशन प्रवासातील हा सर्वांत आनंदाचा क्षण होता. मी सरकारचेही आभार मानले. या कामासाठीच्या कसरतीचा ग्राफ डोळ्यांसमोरून सरकू लागला. या कामासाठीच मी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले होते. केंद्र सरकारने या युगपुरुषाचा प्रकल्प करावा, म्हणून बडोदा राजमाता शुभांगिनीराजे यांना सोबत घेऊन पंतप्रधानाची भेट घेण्यासाठी 7 सप्टेंबर 2015 ला दिल्लीला गेलो होतो. ही भेट माझा बालपणाचा प्रिय मित्र सर्जेराव आणि विनयजी सहस्रबुद्धे यांनी ठरविली होती. सरकारकडे केलेल्या अर्जावर राजमाता, मा.विनयजी, सर्जेराव ठोंबरे आणि माझी सही होती. 

पंतप्रधानांच्या भेटीच्या दिवशी सकाळी निरोप आला- पंतप्रधान दिल्ली बाहेर गेले आहेत, सांस्कृतिक मंत्र्यांना भेटा. सांस्कृतिक मंत्रीही निघताना म्हणाले, ‘आमच्या सचिवांना सांगा सगळं.’ सगळा उत्साह गळून गेला. तरीही महाराजा सयाजीराव प्रकाशन प्रकल्प का करायचा याचा एक-एक मुद्दा मी सचिवांना सांगू लागलो आणि ते म्हणू लागले, ‘यह तो अभी सुना है!’ प्रकल्पाची फाईल त्यांच्याकडे देऊन परतलो. आठवड्याभरात केंद्रीय सांस्कृतिक विभागाने प्रकल्प मंजुरीची शिफारस साहित्य अकादमीकडे केल्याचे पत्रही आले. ही गोष्ट हिंदीतील ज्येष्ठ कवी मित्र विष्णू खरेंना सांगितली. ते म्हणाले, ‘माझा आय.ए.एस. मित्र श्री.पंकज राग या विभागात केंद्रीय सहसचिव आहे. ते चांगले कवीही आहेत.’ पुन्हा विष्णू खरेसोबत दिल्लीला जाऊन यांची भेट घेतली. या प्रकल्पाची योजना ऐकताच त्यांनी विचारले, ‘महाराजा सयाजीरावांचे किती खंड निघू शकतील?’ मी चटकन म्हणालो, ‘पंचवीस ते पन्नास.’ आकडा ऐकून ते म्हणाले, ‘अच्छा, इतना बडा काम है?’ यानंतर थांबून ते म्हणाले, ‘अकादमी दहा खंडांपर्यंतच काढू शकेल. आपण महाराष्ट्र सरकारकडेच प्रयत्न करा.’ आणि महाराष्ट्र सरकारच्या औरंगाबाद येथील मंत्रिमंडळ बैठकीचा निर्णय ऐकताच हा अडथळ्यांचा सारीपाट दूर झाला. 

आता मूळ प्रश्नाचं उत्तर असं आहे : महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या संदर्भात थेट प्रथम संदर्भ शोधत असताना (First Source Material) जे साहित्य समोर येत गेलं, यातून किमान पंचवीस खंडांची संदर्भ सामग्री बडोदा येथील महाराजांचे अभिलेखागार, विद्यापीठ, सेंट्रल लायब्ररी, पॅलेस लायब्ररीतून हाती आली. यात महाराजांची भाषणे, पत्रव्यवहार, लेखन, सुप्रशासन, शिक्षण आणि सुधारणा, जगप्रवासाच्या नोंदी, आठवणी व लेख, त्यांची मराठी-इंग्रजी-हिंदी चरित्रे आणि वेगवेगळ्या क्षेत्रांतील सुधारणा असे ढोबळमानाने काम समोर दिसू लागले. माझा लेखन-प्रकाशनातला पंचेचाळीस वर्षांतील अनुभव कामी आला. सयाजीरावांच्या प्रकाशन प्रकल्पाच्या कामात ज्यांना अभ्यासक, संशोधन, संपादन, भाषांतर आणि लेखन या कामात आवड आहे, त्यांच्या भेटी घेऊन एकेकाकडे त्यांच्या आवडीचे काम सोपवून मुदतीत पूर्ण करण्याची विनंती केली. या प्रकल्पात भाषांतराचे मोठे काम मित्रांमुळे होऊ शकले. 

इंग्रजी, हिंदीतून मराठी 6460 पाने, मराठीतून हिंदीत 4462 पाने, इंग्रजी भाषेत भाषांतर 2697 पाने, गुजराती भाषेत 790 पाने, कानडी भाषेत 304 अशा 14713 पानांचे भाषांतर करू शकलो. महाराजा सयाजीराव प्रकाशन समितीने तीन वर्षांत पंचवीस खंडांत बासष्ट ग्रंथांचे 26642 पानांचे अक्षरधन प्रकाशनाचे काम केले आहे. यात मराठी ग्रंथ बत्तीस आहेत, वीस ग्रंथ इंग्रजी भाषेतील आहेत आणि दहा ग्रंथ हिंदी भाषेत छापले आहेत. समितीच्या पहिल्या तीन वर्षांत लेखक, संपादक, भाषांतरकारांच्या टीमवर्कमुळे हे काम होऊ शकले. याशिवाय महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सहा ग्रंथ, महाराजा सयाजीराव संशोधन ट्रस्टचे 14 ग्रंथ आणि साकेत प्रकाशनाने 17 ग्रंथ असे एकूण 99 ग्रंथ महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यासंबंधी होऊ शकले, ही खूप समाधानाची गोष्ट  घडली. 

डॉ.राजेंद्र मगर / दिनेश पाटील : महाराजा सयाजीरावांच्या प्रकाशित 25 खंडांतील ग्रंथांची नेमकेपणाने ओळख करून द्या. 

बाबा भांड : तीन वर्षांत महाराजा सयाजीरावांचे 25 खंडांत बासष्ट ग्रंथ प्रकाशित झाले. यात महाराजांची भाषणे मराठी, इंग्रजी आणि हिंदीत प्रत्येकी दोन ग्रंथ आहेत. महाराजांची पत्रे मराठीत तीन, इंग्रजीत चार आणि हिंदीत तीन ग्रंथ. महाराजांची गौरवगाथा मराठी व हिंदीत आहे. महाराजांच्या लेखनाचा मराठी दोन, इंग्रजीत दोन आणि हिंदीत एक ग्रंथ आहे. महाराजांच्या सुप्रशासनाबद्दल मराठीत दोन आणि इंग्रजीत एक ग्रंथ आहे. महाराजांची मराठी पाच, इंग्रजी पाच आणि हिंदीत दोन अशी बारा चरित्रे आलीत. महाराजांच्या आठवणी, सत्कार व लेख यांचे मराठीत तीन ग्रंथ आहेत. महाराजांचा शिक्षण अहवाल मराठी आणि इंग्रजीत प्रत्येकी एक आहे. महाराजांच्या जगप्रवासाबद्दल मराठी व इंग्रजीत प्रत्येकी तीन खंड आहेत. महाराजांच्या विविध सुधारणा मराठीत दहा ग्रंथ. स्वातंत्र्यलढ्याचे पाठीराखे सयाजीराव हा इंग्रजी व हिंदीत प्रत्येकी एक. असे एकूण बासष्ट ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. तीनशे पृष्ठांच्या आतील ग्रंथ साठ रुपयास आणि तीनशे पृष्ठांच्या पुढील ग्रंथ एकशे वीस रु. अशी किंमत आहे. या संपूर्ण संचाची किंमत केवळ 6320 रुपये आहे. 

डॉ.राजेंद्र मगर : सयाजीरावमहाराज हे एक द्रष्टे जगप्रवासी होते. त्यांच्या जगप्रवासाचे फलित काय? 

बाबा भांड : कवळाणा जन्मगावाहून लहानपणी सयाजीराव बैलगाडीने वेरूळला घृष्णेेशराच्या दर्शनासाठी आले होते. या वेळी नांदगावला लोखंडी रुळावरून धावणारी आगगाडी त्यांनी कुतूहलाने पाहिली. वेरूळला घृष्णेेशर दर्शनानंतर पूर्वेच्या डोंगरात कोरलेले कैलास लेणे पाहिले. ही त्यांच्या जगप्रवासाची सुरुवातीची नांदी होती. पुढे राजा बनल्यानंतर मुंबई, दिल्ली, आग्रा, काशी, प्रयाग या ठिकाणचा प्रवास घडला; पण पुढे प्रकृतीवरच्या उपचारासाठी युरोपचा प्रवास घडला. सगळ्या जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेची मर्मस्थानं काय आहेत, हे या तरुण राजाने कुतूहलाने पाहिले. डायरीत नोंदी केल्या. पहिल्या परदेश-प्रवासाच्या वेळेपासून नगररचनाकार तज्ज्ञ, शिक्षण विषयाचे तज्ज्ञ बडोद्यात आणणे सुरू केले. यातून त्यांची सुधारणावादी दृष्टी विकसित होत गेली. उभ्या आयुष्यात त्यांनी जगभरातील सर्व देशांचा प्रवास केला. या सव्वीस जगप्रवासाचे अहवाल छापून ठेवले. पर्यटनातून जगाचे दर्शन घेत तेथील शिक्षण, साहित्य, कला-संस्कृती, सुधारणा अन्‌ शेती उद्योगातील आधुनिक गोष्टी बडोद्यासाठी आणल्या. जगातील उत्तम ग्रंथ, चित्र, शिल्प आणि या विषयातील जाणकारांना सन्मानाने आपल्या राज्यात आणले. ज्या काळात भारतीय राजे-रजवाडे हौस- मौजेसाठी परदेशप्रवास करायचे, त्या काळात सयाजीराव त्या-त्या देशातील उत्तम व उपयुक्त ते आपल्याला बडोद्यात कसे नेता येईल, याचे नियोजन करत गेल्याने बडोदा राज्य साहित्य, कला, शिल्पकलाचे आगार बनले. 

दिनेश पाटील : आपल्या प्रकल्पातील तयार झालेले बासष्ट ग्रंथ पाहिले असता त्यांची छपाई, कागद, बांधणी आणि एकूण दर्जेदार निर्मिती- हे कसे शक्य झाले? 

बाबा भांड : लेखन-प्रकाशन क्षेत्रातील चार दशकांचा आमचा अनुभव आणि महाराष्ट्र शासनाने या ग्रंथ छपाईचे काम महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ अर्थात बालभारती या अनुभवी शासकीय यंत्रणेकडे सोपविले. ग्रंथांचा कागद, छपाई, बांधणी या संदर्भात माझा या क्षेत्रातील अनुभव कामी आला. बालभारतीने पुस्तक छपाई, प्रक्रिया करून प्रिंटवेल इंटरनॅशनल या महाराष्ट्रातील मान्यवर मुद्रकांकडे काम सोपविल्याने अत्यंत दर्जेदार निर्मिती होऊ शकली. महाराष्ट्र शासनाच्या उच्चशिक्षण विभागातर्फे राजर्षी शाहूमहाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे या युगपुरुषांचे साहित्य वाचकांना स्वस्त किमतीत देण्याचे शासनाचे धोरण असल्याने महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे साहित्यही आपण कमी किंमतीत देऊ शकलो. 

डॉ. राजेंद्र मगर : महाराजा सयाजीरावांना त्यांच्या कार्यामुळे अनेक महत्त्वाचे मानसन्मान मिळाले, त्याविषयी थोडक्यात सांगा? 

बाबा भांड : महाराजांचे वाचन उत्तम होते. विविध विषयांत रुची आणि गती होती. त्यामुळे समकालीन विद्वानांत मानसन्मान होता. राष्ट्रीय परिषदांमध्ये अध्यक्ष- उद्‌घाटक म्हणून त्यांचा जगभर सन्मान केला गेला. महाराज पहिली जागतिक मानववंश परिषद लंडन, 1911, अ.भा. अस्पृश्यता परिषद मुंबई 1918, अ.भा. तत्त्वज्ञान परिषद मुंबई 1927; ग्रंथ संपादक मंडळाचे अधिवेशन, मुंबई 1930; अ.भा. साहित्य संमेलन- कोल्हापूर 1932,   दुसरी जागतिक सर्वधर्म परिषद शिकागो अमेरिका 1933, अ.भा. हिंदी साहित्य संमेलन- दिल्ली 1934, जागतिक सर्वधर्म परिषद- कार्यकारी सभा, लंडन 1935, पहिली जागतिक शांतता परिषद लंडन या काही महत्त्वाच्या परिषदांचे अध्यक्ष महाराज होते. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे चॅन्सलर, ब्रिटिश लायब्ररी असोसिएशन- लंडनचे उपाध्यक्षपदही महाराजांनी भूषविले होते. 

दिनेश पाटील : महाराजा सयाजीरावांचे हिंदुस्थानातील काही पहिले आणि वेगळे प्रयोग सांगा. 

बाबा भांड : महाराजा सयाजीरावांनी या देशात अनेक गोष्टींचा पाया घातला. चौसष्ट वर्षे राज्य करणारे एकमेव सुप्रशासक. स्वातंत्र्यापूर्वी लोकशाही संविधानाचा पाया घातला. स्वातंत्र्यलढ्यास क्रांतिकारकांना हिमतीने मदत करणारे एकमेव राजा, देशातील बहुतांशी प्रमुख युगपुरुषांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केलेले दानशूर राजा, साहित्य- कला-शिल्पकला-संगीताला राजाश्रय देणारे, 1882 ला अस्पृश्य-आदिवासींच्या शिक्षणाचा पहिला हुकूम काढणारे, 1885 स्त्रीशिक्षण व स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा उभारणारे. 1886 मध्ये राजवाड्यातील पंगतीभेद दूर केला. गाव तेथे ग्रामपंचायत व ग्रंथालये काढली. सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण देणारे. दानधर्माचा कायदा. धर्मखात्याची सुरुवात. पुरोहितांना लायसन्स. जगातल्या पहिल्या विमान उड्डाणास तळपदे यांना मदत. शेतकऱ्यासाठी सहकारी पतपेढ्या व बँक सुरुवात. नाशिक येथे आयुर्वेदिक विद्यापीठ सुरू केले. वडलांच्या मालमत्तेत पत्नी व मुलीचा हक्क कायदा. स्वत:चे खंडोबा मंदिर अस्पृश्यांना खुले केले. 1932 मध्ये अस्पृश्यता निवारण कायदा केला. अठराशेहून अधिक ग्रंथ प्रकाशन करून ग्रंथ-ग्रंथगारांचे पोशिंदे झाले. पाच हजार पानांच्या पहिल्या क्रीडाकोशाच्या प्रकाशनास मदत. आठ भाषांतील राज्य व्यवहारकोश काढला. 

डॉ. राजेंद्र मगर : सयाजीरावमहाराजांचे स्त्रियांच्या सुधारणाविषयक नेमके धोरण काय होते? 

बाबा भांड : स्त्री ही कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ आहे. त्यामुळे ती शारीरिक-मानसिक रीत्या सुदृढ असली पाहिजे. या जबाबदारीने महाराजांनी स्वत: राणी चिमणाबार्इंना शिकविण्यास सुरुवात केली. इ.स. 1911 मध्ये महाराणी चिमणाबार्इंनी जगातील सर्व खंडांतील स्त्रियांच्या दर्जाशी भारतीय स्त्रीच्या दर्जाची तुलना करून लिहिलेला ‘Position Of Women in Indian Life’ हा ग्रंथ लंडनमधून प्रकाशित झाला. विशेष म्हणजे, अशा प्रकारचा हा आजअखेरचा जगातील एकमेव ग्रंथ आहे. शालेय शिक्षणास मुलांसोबत मुलींना शिकण्याची सक्ती केली. शाळेत मुलींना शारीरिक शिक्षण सक्तीचे करून, महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा, स्वतंत्र क्लब सुरू केले. युरोपअगोदर महिलांना मतदानाचा अधिकार दिला. पतीच्या मालमत्तेत मुलगी व पत्नीला वाटा दिला. पुरुष व्यसनी असेल, त्याच्यात पुरुषत्वाचा अभाव असल्यास पत्नीला घटस्फोट घेता यावा असा कायदा केला. आई मुलांवर संस्कार करते, हे ओळखून आईचा मानसन्मान राखला जावा, असे ते म्हणत. त्यामुळे महाराणी चिमणाबार्इंना बुरखा हटविणे, पुरुषांसारखेच सामाजिक क्षेत्रात काम करण्याचे त्यांनी स्वातंत्र्य दिले. आंतरजातीय विवाहासह 6 कायद्यांचे हिंदू कोड बिल भारतीय राज्यघटना लागू होण्यापूर्वी 17 वर्षे आधी बडोदा संस्थानात लागू केले. महाराजांची कन्या इंदिराराजे यांनी 1913 मध्ये कुचबिहारचे आदिवासी राजे जितेंद्र नारायण यांच्याशी स्वतः विवाह ठरवून पहिला मराठा-आदिवासी विवाह केला. 

दिनेश पाटील : ‘सयाजी-शोध’यात्रेत आपल्याला आलेल्या विशेष अनुभवांबद्दल काय सांगाल? 

बाबा भांड : सयाजी-शोधयात्रेत आलेले अनुभव माझ्या आयुष्यातील समृद्ध समाधानाचा कालखंड म्हणता येईल. माझ्या जीवनात अनेक टर्निंग पॉइंट जगण्यास बळ देऊन गेले. प्रत्येक काम करताना फार काही अपेक्षा ठेवल्या नाहीत की, ते काम ओझं न वाटता सुसह्य होत असतं. ज्या कामात आनंद-समाधान मिळते, त्यात इतर बाह्य अपेक्षात गुंतून न पडता काम करत गेलं की, ते कामच आनंदी जगणाचा भाग होतो. जगताना काही अनुभव आपणास अस्वस्थ करणारे वाट्याला येत असतातच. आपण आहोत म्हणूनच ते आहेत, त्या सकारात्मक भावनेने स्वीकारले की, निराशा-अस्वस्थतेची तीव्रता कमी होते. हा संस्कार बालपणातील स्काऊट शिक्षणाने आणि चाळिशीतील योगसाधनेने लाभला. त्यामुळेच माझ्या आवडीच्या कामात मी झोकून देऊन काम करत गेलो- मग तो तंट्या भिल्लाचा प्रकल्प असो, जन्मगावातील पाणलोट क्षेत्रविकासाचे काम असो, की महाराजा सयाजीरावांची शोधयात्रा असो. या टप्प्याने मला खूप ऊर्जाच मिळत आहे. तिचे मोल पद, प्रतिष्ठा, पैसा आणि अधिकाराने भरून मिळणार नाही. पुढे  जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा त्या वेगवेगळ्या शोधयात्रांवर लिहिण्याची वेळ आली तर जरूर लिहीनही. 

डॉ. राजेंद्र मगर : बडोद्यात फेरफटका मारताना अनेक सुंदर वास्तू नजरेस पडतात, त्याचे वेगळेपण काय सांगाल? 

बाबा भांड : मी पहिल्यांदा बडोदा शहरात भेट दिली, तेव्हा तेथील इमारती बघून त्या वेळी लंडनमधील काही भागात आलो आहोत, असा क्षणभर अनुभव आला. शालेय जीवनात मी मॅट्रिक होताच कॅनडा-अमेरिकन मेळाव्याच्या निमित्ताने एकोणसाठ वर्षांपूर्वी जाताना- येताना लंडन शहरात चार-दोन दिवस आमचा मुक्काम झाला होता. नंतर लेखन-प्रकाशन व्यवसाय सुरू केल्यानंतर आमचा जगप्रवास सुरू झाला. या निमित्ताने दोनदा लंडन शहर, तिथल्या इमारती, चौक बघितले होते आणि पहिल्या बडोदा भेटीत लंडनच्या खाणाखुणा इथं दिसू लागल्या. ह्याचा जेव्हा मी संदर्भ शोधला, तेव्हा समोर आलं- महाराजा सयाजीरावांना जगातील उत्तम गोष्टींबद्दल आकर्षण होतं. यातून त्यांनी युरोपातून वास्तुविशारद, तज्ज्ञ मंडळी आणून बडोदा कॉलेज, लक्ष्मीविलास पॅलेस, मुख्य कचेरी, न्यायालय, ग्रंथालय, जागोजागी टॉवर, पुतळे, बागा उभारल्या. एवढेच नाहीतर बडोदा राज्यातील इतर प्रमुख शहरांतही महाराजांनी अनेक भव्य वास्तू उभारल्या. याबद्दल महाराजांच्या पंचविसाव्या खंडात सारंग पाटील आणि वैशाली पाटील यांनी बडोद्यातील वास्तुकला हा ग्रंथ आपण प्रकाशित केला आहे. 

दिनेश पाटील : सयाजी शोधप्रकल्पात आपण संशोधकांची नवी पिढी जाणीवपूर्वक घडवलीत. या पुढच्या काळात नव्या पिढीकडून- विशेषत: युवकांकडून आपल्या काय अपेक्षा आहेत? 

बाबा भांड : आपल्या हीरकमहोत्सवी कार्यक्रमात महाराजा सयाजीराव म्हणाले होते- आमची नवी पिढी, विशेषत: तरुण-तरुणी हेच आमचे आधारस्तंभ आहेत. त्यांना त्यांच्या आवडीचे शिक्षण द्या. बदलत्या काळानुरूप शिक्षण आणि विज्ञानाने जगाबरोबर आपण आलो नाही, तर जगामागे पन्नास वर्षे राहू. आमच्या तरुण पिढीसाठी मी त्यांना चार गोष्टी सांगणार आहे. कष्ट आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही. जे कराल ते प्रामाणिकपणे करा. स्वत:सोबत शेजाऱ्यांची आठवण ठेवा. तुम्ही या देशाचे आधार आहात. या देशाचे नाव खराब होईल, असे वागू नका. हा महाराजांचा संदेश नवी पिढी अमलात आणत आहे, याचा अनुभव मला सयाजीराव प्रकल्पात तरुण संशोधकांकडून येत आहे, ही खूप आशावर्धक बाब आहे. ज्येष्ठांचा वारसा ही नवी पिढी जबाबदारीने उचलत आहे, ही चांगली गोष्ट आहे. 

डॉ.राजेद्र मगर : महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या चरित्रविषयक आणि प्रशासनविषयक ग्रंथाचे आज वाचन का आवश्यक आहे? 

बाबा भांड : आज जगभर विज्ञान आणि शिक्षणाच्या माध्यमातून जात, पंथ, धर्म, रंग या मानवी दुराव्याच्या भिंती पाडून सर्वधर्मसमभावातून केवळ मानवता धर्माच्या साह्याने मानवविकास साधण्याचे तत्त्व प्रगत राष्ट्रांत बघायला मिळते. भारतासारखा एके काळी समृद्ध सांस्कृतिक- ऐतिहासिक एकतेचा वारसा लाभलेल्या देशाने पारतंत्र्याचे जोखड भिरकावून धर्मनिरपेक्ष लोकशाही मूल्यांची प्रशासनव्यवस्था स्वीकारली. या लोकशाही मूल्यांचे जतन-संवर्धन ही वर्तमानकाळाची गरज असताना, आज पारतंत्र्यातल्या छोट्या-मोठ्या राजे-राजवाड्यांच्या जहागिरी आणि जाती-धर्म-पंथांचे झेंडे फडकावीत प्रत्येक जण लोकशाही मूल्यांची फरफट करत आहे. प्रत्येक झेंडा ‘आम्हीच या राष्ट्राचे कैवारी अन्‌ पालनकर्ते आहोत’ याची दवंडी पिटत आहे. या काळ्याशार स्वार्थाच्या ढगांनी सगळा आसमंत व्यापलेला असताना भारत हे प्रगतिशील राष्ट्र व्हायचं असेल, तर सुप्रशासन, न्याय, जनकल्याणातच आपला मोक्ष, सर्वांना समानतेने शिक्षणाचा हक्क आणि धर्मस्वातंत्र्य या मूल्यांचे आदर्श प्रशासक महाराजा सयाजीराव हे पुन्हा आजची गरज वाटू लागतात. त्यांचे साहित्यवाचन ही प्रगती अन्‌ परिवर्तनाची एक प्रकाशमान खिडकीच आहे. 

दिनेश पाटील : महाराजांचे चौफेर कार्य उजेडात आणण्यासाठी आपले भविष्यातील नियोजन काय असेल? 

बाबा भांड : साहित्य, कला आणि सुप्रशासन हा प्रत्येक राष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असतो. या वारशाच्या समृद्धीवरच राष्ट्रांची सर्वांगीण प्रगती झाल्याचा जगातील पुढारलेल्या राष्ट्रांचा हजारो वर्षांचा इतिहासाचा अभ्यास सांगतो. हिंदुस्थानात छत्रपती शिवराय, राजा अकबर या कल्याणकारी राजांचे सुप्रशासन हा आमचा वारसा आहेच. आधुनिक भारताचे अनेक युगपुरुष स्वातंत्र्यलढ्यात, पुरोगामी सुधारणांत आणि प्रशासनातही लक्षणीय काम करणारे पितामह दादाभाई नौरोजी, नामदार गोखले, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, न्या.रानडे, म.फुले, राजर्षी शाहू, डॉ.आंबेडकर या युगपुरुषांचे कार्य महत्त्वाचे आहेच. या सर्वांना वेगवेगळ्या क्षेत्रांत एका जबाबदारीने मदत, पाठिंबा देऊन आपला वेगळा ठसा उमटविलेल्या महाराजा सयाजीराव यांची वास्तव ओळख हिंदुस्थानला करून देणे, हे एक कर्तव्य म्हणून आम्ही सर्व जण हे काम करत होतो. हे कार्य उजेडात आणताना सर्व युगपुरुषांसोबत महाराजा सयाजीराव हे आमचे सूत्र असणार आहे. या युगपुरुषांच्या ओळख नियोजनात इतिहासात राहून गेलेल्या वास्तवाचे पुनर्वाचनही होत जाईल. इतिहासाचे पुनर्वाचन हे तर चिकित्सक अभ्यासपद्धतीचे एक महत्त्वाचे सूत्रच आहे. 

डॉ. राजेंद्र मगर / दिनेश पाटील : गेल्या दहा वर्षांत महाराजा सयाजीराव-शोधयात्रा प्रकल्पाच्या कामाकडे बघत असताना आता आपणास काय वाटते? 

बाबा भांड : आपल्या दोघांच्या प्रश्नाचं एका शब्दातील उत्तर आहे- आनंद. सर्व क्षेत्रांत काम करणाऱ्या मंडळींसाठी आनंद ही एक सर्जक ऊर्जा असते. ती आवडीच्या कामातून मिळत असते. समाजात प्रत्येक क्षेत्रात काम करणारा मनुष्य महत्त्वाचा आहे. शेतकरी काळ्या भुईत राबतो, सैनिक देशरक्षणासाठी सीमेवर लढतो, शिक्षक ज्ञानदानाचं काम करतो, सफाई कामगार रस्त्यावरची सफाई करत असतो आणि प्रशासक प्रशासनाचे राष्ट्रकर्तव्यच बजावत असतात. प्रत्येकाच्या कामात जनसेवेचा वेगळा आनंद असतोच. हा आनंद सत्ता, संपत्ती, अधिकार आणि पैशाने मिळत नाही; तो आवडीच्या कामातच मिळत असतो. बहुतेक जण आनंदास पुढं ढकलत असतात. मला हे मिळालं, तर आनंदी होईन... ते झालं, तर आनंद दसपट होईल. याचा अर्थ आनंदास आपण कंडिशनमध्ये डांबल्याने खऱ्या आनंदास दुरावतो. आपल्या आवडीच्या कामात प्रत्येक क्षण आनंदाचाच असतो. हा आनंदाचा अनुभव मी माझ्या लेखन-प्रकाशन प्रवासात घेत आलो आहे.

त्यातील गेल्या दहा वर्षांचा महाराजा सयाजीराव गायकवाड या आधुनिक भारताच्या शिल्पकाराचा शोध हे माझ्या आनंदाचं कैलासशिखर आहे. मी कैलास शिखरावर तेरा वर्षांपूर्वी निसर्गाचं अद्‌भुत रूप बघण्यासाठी जाऊन आलो. तो आनंद शब्दापलीकडचा होता. त्याचप्रमाणे या कामात शेकडो लेखक, संपादक, अनुवादक यांच्या मदतीचे हात आणि प्रशासनातील विविध टप्प्यांतील मंडळींची साथ लाभली. ही सर्वांसंबंधीची कृतज्ञता. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या शोधयात्रेचा हा पहिला टप्पा आहे. पुढील अनेक टप्पे पार करण्यासाठी ज्येष्ठ अन्‌ तरुण संशोधकांची टीम अन्‌ शासनाची साथ लाभणार आहे. या शोधयात्रेतील एक वारकरी म्हणून मी सोबत असणारच आहे. सयाजीरावमहाराजांची ही ओळख आजच्या धुनकारलेल्या काळात मार्ग दाखविण्यास सर्वांना प्रेरणा देईल. 

मुलाखतकार : डॉ. राजेंद्र मगर । दिनेश पाटील   

Tags: मुलाखत बाबा भांड दिनेश पाटील राजेंद्र मगर महाराजा सयाजीराव गायकवाड dinesh patil Rajendra magar interview of baba bhand sayajirao gaikwad maharaj baba bhand sayajirao mahraj collection Baba bhand on sayajirao gaikwad weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

बाबा भांड,  औरंगाबाद
baba.bhand@gmail.com

लेखक, कादंबरीकार व प्रकाशक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके