डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

या नाटकाद्वारे गो.पुंनी जोतिबांचं ‘रीइंटरप्रिटेशन’ केलेलं आहे. म्हणजे जोतिबांच्या आचारविचारांचा आजच्या काळातून आणि स्वत:च्या दृष्टिकोनातून अर्थ लावला आहे. हे एका अर्थाने ऐतिहासिकच नाटक आहे, पण मराठी रंगभूमीच्या पूर्वसूरींपेक्षा एकदम वेगळं आहे. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ वगैरेंपेक्षा फार दूरचं. ‘सत्यशोधक’ खऱ्या अर्थाने राजकीय आहे, आजच्या समकालीन वर्तमानाचा वेध घेणारं आहे. इथला जोतिबा आज लोकांना सोयीसाठी अभिप्रेत असलेला नाही. तो व्यापक आहे आणि जातिधर्माला वेगळ्या स्तरावर समजावून घेणारा आहे. या नाटकातला सर्वांत महत्त्वाचा (आणि अनेकांना त्रासदायकही!) ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद हा मुद्दा आहे.  

विनोद शिरसाठ - ‘सत्यशोधक’ या नाटकाची संपूर्ण प्रोसेस समजावून घेण्यात मला रस आहे. तुम्हाला हे नाटक का करावंसं वाटलं? 

अतुल पेठे - धन्यवाद! ‘सत्यशोधक’ नाटकाची प्रत्यक्षात सुरुवात एप्रिल 2011 मध्ये झाली. खरी सुरुवात, मी पुणे मनपा युनियनसमवेत ‘कचराकोंडी’ हा माहितीपट केला तेव्हापासूनच झाली. तिथेच त्याची रुजुवात झाली. त्या माहितीपटाने माझ्या स्वत:च्या जगण्यात आणि विचारांतही मूलभूत बदल झाला. त्या वेळी अनेक लोकांशी गप्पा व्हायच्या, तेव्हाच मनात खोल रुतून बसले की यांना घेऊन नाटक करायचे. ही इच्छा मी पुणे मनपा युनियनच्या सरचिटणीस कॉ.मुक्ता मनोहर यांना अनेक वेळा बोलून दाखविली होती. त्याबद्दलच्या भेटीगाठी आणि बैठकाही कामगारांसमवेत आधी दोन वेळा झालेल्या होत्या. सफाई कामगारांना घेऊन नाटक करण्यामागे ठळक तीन गोष्टी होत्या. एक तर या साऱ्या लोकांना राजकारण फार चांगलं कळतं, तो त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. राजकारण कळतं म्हणजे करता येतं असं नव्हे. नाही तर स्वत:चे फायदे लक्षात येऊन आयुष्यच बदललं असतं त्यांनी. पण हजारो वर्षांच्या सामाजिक स्थितीमुळे आणि त्यातून उद्‌भवलेल्या कमालीच्या दारिद्य्रामुळे या साऱ्यांचा संबंध आजूबाजूच्या लख्ख वास्तवाशी येतो, त्यातून ते राजकारण येतं. त्यांचा जो संबंध नगरसेवक, आमदार आणि स्थानिक गुंड वगैरे लोकांशी येतो आणि याचबरोबर इतर हितसंबंध तयार होतात, त्यातून ते शहाणपण, जगण्याचं किंवा असं म्हणू की आयुष्य निभावण्याचं, अंगी येतं. ही माणसं स्थानिक राजकारणापासून फटकून नसतात. जात-पात-धर्माच्या वेगवेगळ्या पातळ्या इथे एकमेकांत घुसलेल्या असतात. 

तेव्हा ही राजकीय असण्याची गोष्ट मला महत्त्वाची वाटायची आणि दुसरं म्हणजे त्यांचे आवाज. जबरदस्त! बहुसंख्य वेळेला हे टिपेचे, वरच्या स्वरातले असतात. बऱ्याचदा संस्कारित असतात, पण त्यांचं बोलणं आणि दिसणं मला आवडत असे. अनेकदा हे माझ्या मध्यमवर्गीय जाणिवांतूनही होत असेल. पण व्हायचं हे मात्र खरं. मला वाटायचं की, यांना घेऊन नाटक केलं पाहिजे, पण ते नाटक मला केवळ ओला- सुका कचरा किंवा कचरा समस्या वगैरेंविषयक नको होते. मला असं नाटक करून पाहायचं होतं, जे त्यांच्या आयुष्याला भिडेल, त्यांच्या समस्या मांडेल आणि ढोबळ प्रचाराला ओलांडून ते जगण्यात किंचित का होईना बदल घडवेल. 

विनोद - पण जोतिबांवरचं नाटक का करावं वाटलं? 

अतुल - कुठलंही नाटक करण्याअगोदर मला ते किती अस्वस्थ करतं त्यावर मी ते नाटक करायचं की नाही ते ठरवतो. ही अस्वस्थता बौद्धिक आणि वैचारिक असते. नाटकाचा आशय माझ्याशी घट्ट जुळावा लागतो तरच ते करता येतं. मुळात महात्मा जोतिबा फुले यांचं थोडं साहित्य मी एम.ए.ला असताना वाचलं होतं. ‘शेतकऱ्याचा असूड’ वाचताना मी अक्षरश: थरारलो होतो. त्यातल्या प्रखरतेने मी दिपलो होतो. शेतकऱ्यांची आणि शूद्रातिशूद्रांची अवनत स्थिती व्हायला कोण कोण कारणीभूत आहेत, ब्राह्मण शेतकऱ्याला कसा नाडतो, सावकार कसा लुटतो हे वाचून हादरलो होतो. जोतिबांनी या ग्रंथात जगण्याच्या दु:स्थितीचं जे वर्णन आणि आकलन केलं आहे त्याला तोड नाही. आसूड ओढल्यागत त्यांची भाषा आहे. अस्सल, रोखठोक, विच्छेदन करणारी आणि रांगडी! ‘माझं जगणं असं का आहे?’ ‘माझं हे असं जगणं कोणामुळे आहे?’ आणि ‘मीच हे जगणं बदलवू शकतो.’ हे तीन मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. जोतिबांचा सारा विचारच मला कमालीचा आधुनिक वाटतो. 

‘मीच माझा प्रकाश’ या गौतम बुद्धाच्या दृष्टिकोनाशी नातं सांगणारा आणि तुकारामांच्या देव ब्राह्मण आणि समाजाशी थेट भांडण करणारा! स्वत:च्या हक्कांविषयी आणि अधिकारांविषयी हा माणूस सजग तर होताच, पण ‘बोले तैसा चाले’ या उक्तीप्रमाणेच जगला. दारिद्य्रातील शोषण व्यवस्थेविषयी जोतिबांचं विश्लेषण आणि आकलन आजही महत्त्वाचं आहे. आमच्यावर अन्याय होतोय अथवा आमचं शोषण होतंय असा ओरडा करून ते थांबत नाहीत तर या अन्यायाची, शोषणाची पाळेमुळे कुठे आहेत याचा ते शोध घेतात. त्यातूनच ते धर्माला प्रश्न विचारतात आणि सत्तेलाही. मात्र हे करताना नुसताच प्रश्नांचा भडिमार ते करत नाहीत, तर एका बाजूने संघर्ष आणि दुसऱ्या बाजूने रचनाही ते करत जातात. मुलींची शाळा, शूद्रातिशूद्रांचे शिक्षण, बालहत्या प्रतिबंधक गृह, विधवा विवाह, साहित्य संमेलनाचे स्वरूप, शेतीव्यवस्था, पाणीव्यवस्था, स्त्री आणि बालककेंद्री दृष्टिकोन, आरोग्य अशा अनेक गोष्टी त्यांनी इथे रुजवल्या. हे त्यांचं कर्तृत्व मला थक्क करून टाकणारं वाटतं. शिवाय, या पलीकडे जाणारा त्यांचा सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोन मला मूलभूत विचार करायला लावतो. म्हणूनच तर ते ‘महात्मा’, ‘महान आत्मा’ होते. 

ख्रिस्त महंद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी। हा अखंड म्हणजे त्यांचा जात-पात-धर्म या पल्याड जाणारा अखिल मानवतावादी दृष्टिकोन वाटतो. संकुचित जागेतलं आणि स्वत:च्या जाती-धर्म आणि वस्ती, गल्ली, गाव, भाषा आणि सीमेपुरतं ते राजकारण नव्हतं. खरं सांगायचं तर कोणाच्याच सोयीचे जोतिबा नव्हते आणि आजही नाहीत. अशा प्रखर व्यक्तिमत्त्वाला संपूर्ण झेलता येत नसल्याने तुकड्या-तुकड्यांत आणि ज्याच्या त्याच्या सोयीने आणि जो तो स्वत:च्या राजकीय फायद्याकरता त्यांना वाटून घेतो. तर मला ‘शेतकऱ्याचा असूड’ नाटकात रूपांतरित करावा असं वाटे. तो आशय आणि भाषा मला कमालीची नाट्यमय वाटत होती. तेव्हा सुरुवातीला हीच संहिता माझ्या डोळ्यापुढे होती. 

विनोद - त्यातून मग ‘सत्यशोधक’पर्यंत कसे आलात? 

अतुल - मी मघाशी म्हटल्याप्रमाणे ‘कचराकोंडी’ने मला या कामगारांच्या जवळ नेलं होतं. त्यांचं शिक्षण, आरोग्य, श्रद्धा- अंधश्रद्धा, व्यसनं, घरांची स्थिती आणि त्यांच्यातली आजची अधिक गुंतागुंतीची जातीयता मला समजू लागली होती. त्यातून मुक्ता मनोहरांशी मी नाटकाबाबत बोललो तेव्हा त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. संप, मोर्चे यांच्याबरोबरच नाटकातून सांस्कृतिक जाणीव विकसित करणं हा मुद्दा त्यांना महत्त्वाचा वाटला. मुक्तातार्इंच्याबरोबर अनेक मुद्दे बोलता आले आणि समजावून घेता आले. ‘कचराकोंडी’ने साऱ्यांनाच आत्मविश्वास मिळालेला होता. मुक्तातार्इंनी हा माझा नाटकाचा मुद्दा उचलून धरला. ही कल्पना  अनेकांना धक्कादायकही वाटली. नाटक किंवा कुठलीही कला ही गंभीरपणे करता येते आणि ती केल्याने आयुष्याला सघनता, सौंदर्य आणि सृजनत्व येते हे आपल्या कोणाच्याच अजूनही ध्यानी येत नाही. त्यामुळे नाटक किंवा कुठलीच कला आपल्या आयुष्याच्या आणि समाजाच्या कधीच केंद्रस्थानी नसते. त्यातून नाटक म्हणजे बिनडोक करमणूक हे मत रुजवण्याला आपली मध्यमवर्गीय स्थितिप्रिय जाणीवच कारणीभूत आहे. 

कुठलीही कला ही किती ‘डेंजरस’ असू शकते याची जाण असल्यानेच कदाचित, ही जाणीव मुद्दाम अंगीकारली असेल. आपल्या वैचारिक, बौद्धिक मानसिकतेला विचारांचे धक्के देणं हेही कलेचं इतर गोष्टींबरोबरच महत्त्वाचं कर्तव्य असतं. तेव्हा असं नाटक करायचं ठरल्यावर मुक्तातार्इंनी मीटिंग लावली. त्याला चाळीस-पन्नासजण आले. मुक्तातार्इंना हे नाटक करणं किती कठीण आहे याचं दर्शन आधीच होत होतं. मी मात्र हवेत होतो. त्यांना जे वास्तव आतून माहीत होतं त्याचं प्रत्यंतर मला यायचं होतं. तेव्हा ही नाव आम्ही समुद्रात ढकलली. मुक्तातार्इंनी तर नाटक झालं नाही तरी चालेल, नुसती कार्यशाळा किंवा नुसत्याच मोकळ्या गप्पा झाल्या तरी चालतील अशी सवलत दिलेली होती. अशा सुरुवातीच्या काळात मीही चाचपणीच करत होतो. जोतिबांवरचं काही करून बघू, इतकीच अस्पष्ट जाणीव माझ्या मनात होती आणि एक दिवस माझ्या मनाशी खूप वर्षांपूर्वी वाचलेले ‘सत्यशोधक’ आले. मग त्या दिशेने प्रवास सुरू झाला. 

विनोद - मग तालमी सुरू झाल्या? त्याविषयी दीर्घ ऐकायची इच्छा आहे. 

अतुल - नाही. आधी गप्पा. बोलणं, व्यायाम, कार्यशाळा. त्यातून आरोग्याचे प्रश्न. त्यावर उपाय वगैरे... सिंहगड पायथ्याला आम्ही सारे गेलो होतो. मूळ चाळीस-पन्नास जणांतले दहा-बाराच उरले होते. अनेकांना विनवणी करूनही ते फिरकले नाहीत. त्यांच्या न येण्याच्या समस्या फार गंभीर आणि खऱ्याही होत्या. रस्त्यांचे झाडण्याचे काम करून आणि गटारात उतरून तालमींना येणं वगैरे किती अशक्य होतं? त्यात बायकांचे प्रश्न म्हणजे तर आपण सहजासहजी कल्पनाही करू शकत असेच असतात. आरडाओरडा, कचकच, मारहाण आणि वणवण पाचवीला पुजलेली. त्यामुळे सुरुवातीला तास-दोन तास गप्पा मारायला आलेल्या स्त्रिया पहिल्या पाचच मिनिटांत डुलक्या घेऊ लागत. झोप अनावर झालेली असे. मीही मग त्यांना झोपेतून जागं करायला बंदी करे. तोच त्यांना मिळणारा विश्रांतीचा काळ असे. त्यांचं दमलेपण व्याकूळ करणारं असे. अतिश्रम आणि ताण यांनी झपाटून टाकणारी ती झोप मला जागं करे. त्यातून त्या अचानक उठल्या तर माझ्याकडे पश्चात्तापदग्ध नजरेने पाहत. ते तर माझ्या मनात अधिकच ‘गिल्ट’ उत्पन्न करे. या साऱ्या काळात, मला गरिबी म्हणजे काय याचं किंचित दर्शन झालं. गरिबीचे स्तर अनेक असतात ही जाणीवच झाली. 

आपल्याला माहिती असते खूप, पण ‘प्रत्यक्ष’ वेगळं ज्ञानात्मक दर्शन आपल्याला जमिनीवर आणतं. एका जागी बसणं, काही वेळ नीटपणे ऐकणं, ऐकलेल्या गोष्टीचा विचार करणं, ते स्मृतीत ठेवणं, मनात आलेल्या विचारांना प्रश्न करणं हे शक्यच होत नाही. त्यातून जगण्याला आवश्यक अशा ‘ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग’पर्यंत पोहोचता येत नाही. आत्ता आणि इथे एवढ्यापुरतं जगणं होऊन जातं. आयुष्यात शांततेचा अभाव असल्याने किती परिणाम होतो! सतत जीवघेणे प्रश्न मनाला स्थिरता देत नाहीत. शांतता मिळाली की  मग मोठमोठ्याने बोलावं वाटतं, गाणी लावावी वाटतात. शांततेत विचारसन्मुख करण्याची ताकद असते तीच अशा स्थितीत गमावली जाते. आपलं आयुष्य आपल्या हाती न राहता सतत बाह्य परिस्थितीच्या हाती, अशी ती भयावह स्थिती होऊन जाते. त्यातूनही माणसं आनंदी राहू पाहतात हे कमालीचं थोर वाटतं. याबाबत आमच्यातले नागनाथ गायकवाड, संतोष गायकवाड माझे आदर्शच बनले आहेत. त्यांना जे जगणं आतून कळलं आहे त्या पातळीपर्यंत मी जाऊच शकत नाही असं वाटतं. तर तालमी लगेच सुरू झाल्या नाहीत. त्यात अनेक टप्पे होते. माझ्याकरता या टप्प्यांत मी त्यांच्याशी किमान पातळीवर जुळणं मला महत्त्वाचं वाटायचं. कणकवली व जालन्यानंतरचा हा कामगारांसोबतचा अनुभव होता. गेली चार-पाच वर्षं मी वेगळ्या गावातील अलग घटकांबरोबर नाटक करून पाहतो आहे. वैचारिक, बौद्धिक आणि कलात्मकदृष्ट्या स्वत:ला समृद्ध करताना माणूस म्हणून विकसित करणं ही माझी गरज त्याच्या मुळाशी आहे. 

या नाटकाच्या वेळी मी बऱ्यापैकी शांत होतो. नव्या चुका करायच्या होत्या, पण आधीच्या टाळायच्या होत्या. आपल्याहून सर्वस्वी वेगळ्या असणाऱ्या संस्कृतीशी जुळवून घेणं आणि त्यातून सृजनशील रचना करणं याबाबत मी सतर्क होतो. आधीची चिडचिड, अस्वस्थता आणि अशांतता या नाटकाच्यावेळी बरीच कमी होती. तालमींमध्ये कलाकारांशी नाळ जोडताना समान धागे शोधणं मला नेहमी महत्त्वाचं वाटतं. त्यात ‘स्वत:चे आरोग्य’ हा मुद्दा मी लावून धरला. या साऱ्या कामगारांचे कामामुळे जे शारीरिक हाल झालेले असतात त्यावर काही किंचित उपाय करता येईल का हा विचार सुरू झाला. माझा परममित्र राजू इनामदार अशा कामात नेहमीच अग्रभागी असतो. तो लोकांशी सुंदरपणे सहज आणि सोप्या पद्धतीने शास्त्रीय विचार, संवाद (गाणी, गप्पांद्वारे) करतो. मीही मला डॉ.राजीव शारंगपाणी यांनी शिकवलेले व्यायामप्रकार सतत घेतो. त्यातून सामायिक छानपणा येतो. 

सिंहगडची कार्यशाळा म्हणजे मनाला ताजेपणा आणणारा भाग होता. मरगळलेली आणि कशावरही विश्वास न उरलेली मनं प्रफुल्लित झाली. शेखर जाधव, नागनाथ गायकवाड, शाहीर भिसे, भीमराव बनसोडे, संतोष गायकवाड, सावित्रा भिसे, शोभा बनसोडे ही पन्नाशी ओलांडलेली मंडळी सिंहगड चढून गेली. त्यातून कमालीचा आत्मविश्वास आला आणि मुख्य म्हणजे अर्थपूर्ण मजा आली. आपल्या कुठल्याही कामातून अशी मजा येणं मला महत्त्वाचं वाटतं. माझ्या हातून किती श्रेष्ठ कलाकृती वगैरे होतेय या पेक्षाही, मला हे असं जगणं वाटून घेणं महत्त्वाचं वाटू लागलं आहे. आपल्या संस्कृतीतील ‘अंगतपंगत’ मला गरजेची वाटते. हे समान पातळीवरचे अनुभव, ज्ञान आणि जाणिवांचं आदानप्रदान आहे. तर हळू हळू आम्ही काही वाचू, पाहू लागलो वगैरे. त्यातून जोतिबांविषयी सतत बोलणं सुरू असायचं. मग मी एक दिवस साऱ्यांना नाटक वाचून दाखवलं. या साऱ्या प्रवासात असंख्य गोष्टी घडल्या. आधीची चारदोन लोकं गळाली आणि चारदोन नवीन आली. हे सारं सहज आपोआप झालं. 

या दहा-बारा कामगारांसोबत पुण्यातली नाटकवाली सामील झाली. त्यांत मुख्य म्हणजे ओंकार गोवर्धन. हा मूळ ‘आसक्त’ या प्रयोगशील नाट्यसंस्थेतला. मी त्याचं काम पाहिलेलं होतं. हाही स्वत:हून भेटायला येणं, नाट्यविषयक गप्पा मारणं करायचा. अतिशय अभ्यासू आणि गुणी माणूस. शिवाय, इतर लोकांहून दृढ निश्चयी असा. मला त्याचे डोळे फार आवडायचे. म्हणजे नाटकाच्या पात्र निवडीत त्या व्यक्तीचे डोळे हे माझ्याकरता फार महत्त्वाचे असतात. त्या डोळ्यांतून जे भाव प्रकट होतात किंवा नट असेल आणि त्या डोळ्यांतून अनेक भाव प्रकट करण्याची ताकद असेल तर ते मला त्या व्यक्तीला नाटकातील भूमिका द्यायला उद्युक्त करतात. ओंकारच्या डोळ्यात मला साधेपणा, सज्जनपणा आणि थेटपणा जाणवला जो मला जोतिबांशी साम्य असणारा वाटला. (असेच डोळे मला पर्णचेही वाटतात, जे सावित्रीचा आत्मविश्वास प्रकट करतात). 

शिवाय भूमिका करणं म्हणजे बाह्यदर्शन नसतं तर ते अंतर्गत दर्शनही असतं. बाह्यदर्शनाकरीता कपडे, मेकअप वगैरे मदत करतं. पण मूलत: अंतर्गततेशी वैचारिक गोष्टी निगडीत असतात. माणूस म्हणून तुमच्या जाणिवा किती प्रगल्भ आहेत त्यावर तुमच्या अभिनयाची गुणवत्ता अवलंबून असते. आपल्याकडे विचार टाळून सारं करण्याकडे कल असतो. नैसर्गिक अभिनयाच्या नावाखाली लोक काय वाट्टेल ते अर्थ लावतात. नैसर्गिक याचा अर्थ अविचारी नव्हे. नैसर्गिक विचारशील होण्या-करण्याला काही श्रम घ्यावे लागतातच... 

तर ओंकार भेटला, तो पुढे घट्ट मित्र झाला आणि तोही या नाट्यकार्यशाळेकडे खेचला गेला. अशीच तीन-चार मुलं आली. भारती विद्यापीठातून त्यांनी पदविका घेतली होती. त्यांतील आदित्य सरवदे हा बारामतीचा होता. नितीन बनकर स्वत: लेथ मशिनवर काम करणारा होता तर रणजित मोहिते विमाएजंट होता. जमलेल्या या मिश्र गटात स्त्रियांची वानवा होती. जे लोक जमले होते त्यांतले काही जण निरक्षर होते. काही जुजबी वाचत. त्यांत संदीप मोरे हाच जास्त शिकलेला. स्त्रिया, मुली शक्यच नव्हत्या. एकदोन स्त्रिया काही दिवस टिकल्या, पण त्याही घरगुती अडचणींनी गळाल्या. आम्ही कमालीचे प्रयत्न केले. एकदोघींच्या घरी जाऊन विनवणी वगैरेही केली, पण ते प्रयत्नही अयशस्वी झाले. अशा वेळेस मला मोलकरीण संघटनेची मेधा थत्ते ही विचारशील कार्यकर्ती खूपच साहाय्य करत असे. चर्चा करत असे. शेवटी मदत म्हणून तीही तालमींना येऊन भाग घेऊ लागली. 

पुढे मी आणि ओंकारने किमान दहा पंधरा नट्यांचा शोध घेतला. आमच्या कामगारांपैकीही कोणाच्या पुतण्या, बहिणी आल्या. पण काहीच शक्य होत नव्हतं. ‘सत्यशोधक’ नाटकात तर चारपाच स्त्री कलाकारांची गरज होती. आम्ही बाहेरच्या नट्यांनाही गाठलं, पण कोणाचं कॉलेज तर कोणाची सीरियल. अर्थात याची मला सवय होती आणि आहेही. आम्ही नाटकातलं स्त्री पात्र पुरुषही करून टाकलं होतं, पण सावित्रीचा प्रश्न होताच. तेव्हा तेही  पुरुषानेच करायचं असं माझ्या मनाने घेतलं. 

विनोद - बाप रे! पण तरीही ‘सत्यशोधक’ करायचे निश्चित केले होते? 

अतुल - म्हणजे प्रयत्न तो होता, पण पर्यायही मी शोधत होतो. एकदा तर नुसती काही गाणी आणि ‘शेतकऱ्याचा असूड’चं वाचन असाही विचार होता. मला घाई कशाचीच नव्हती. जे चालू होतं ते आनंददायी होतं. आम्ही भेटून गाणी वगैरे म्हणायचो. त्यात शाहीर भिसे, नागनाथ गायकवाड आघाडीवर होते. शाहिरांना अण्णाभाऊ मुखोद्‌गत होते. त्यांच्यामागून झील धरायला मला आनंद वाटत असे. नागनाथांनाही अनेक भजनं, गवळणी पाठ. शिवाय, बसल्या जागेवर शब्द बदलून चालीत फिट्ट बसवण्याची क्षमता होती. राजू इनामदारने आपल्या जगण्यातला आशय, प्रश्न सिनेमाच्या चालीत न गाता पारंपरिक चालीत कसे गुंफता येतात याचं ‘ट्रेनिंग’ दिलेलं होतं. आशय आणि चाल यांतून योग्य अर्थ काढण्याचं ते शिक्षण होते. अयोग्य चाल आशयाला मारक असते आणि विरुद्ध अर्थ पोहोचवते हा मुद्दा चांगलाच ठसला होता. तर अशा अनेक गोष्टी हे नाटक करायला कारणीभूत झाल्या. 

या साऱ्या पसाऱ्यात मुख्य गोष्ट होती ती म्हणजे या नाटकाचे लेखक गो.पु. देशपांडे. ते भारतीय स्तरावरचे महत्त्वाचे मराठी लेखक आहेत. आपल्या विचारशील राजकीय नाटकांमुळे ते मराठी रंगभूमीवर प्रसिद्ध आहेत. त्यांची विचारसरणी डावी आहे. आपल्या जगण्याचे सखोल अर्थ ते राजकीयतेतून मांडतात. जोतिबांचं काही साहित्य त्यांनी इंग्रजीत नेलेलं आहे. त्यामुळे जोतिबा भाषिक पातळीवर निश्चितचपणे जगभर पोहोचवण्याचं श्रेय त्यांना द्यायला हवे. या नाटकाद्वारे गो.पुंनी जोतीबांचं ‘रीइंटरप्रिटेशन’ केलेलं आहे. म्हणजे जोतिबांच्या आचारविचारांचा आजच्या काळातून आणि स्वत:च्या दृष्टिकोनातून अर्थ लावला आहे. 

हे एका अर्थाने ऐतिहासिकच नाटक आहे, पण मराठी रंगभूमीच्या पूर्वसूरींपेक्षा एकदम वेगळं आहे. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ वगैरेंपेक्षा फार दूरचं. ‘सत्यशोधक’ खऱ्या अर्थाने राजकीय आहे, आजच्या समकालीन वर्तमानाचा वेध घेणारं आहे. इथला जोतिबा आज लोकांना सोयीसाठी अभिप्रेत असलेला नाही. तो व्यापक आहे आणि जातिधर्माला वेगळ्या स्तरावर समजावून घेणारा आहे. या नाटकातला सर्वांत महत्त्वाचा (आणि अनेकांना त्रासदायकही!) ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद हा मुद्दा आहे. इथला जोतिबा उद्‌धृत केलेला अखंड पुन्हा पुन्हा वाचावा असाच आहे. ‘येथे ब्राह्मणांना यायला सक्त बंदी आहे’ अशी पुणेरी पाटी त्यांच्या दारावर ठोकलेली नाही. सध्याच्या काळात प्रत्येक जातीने त्यांच्या त्यांच्या जातीतला थोर माणूस कुंपणं घालून बंदिस्त केला आहे. जणू ती त्यांची ‘टेरिटरीच’! (अशी पुणेरी पाटी याच लोकांच्या दारावर खरं तर ठोकलेली आहे!) 

प्रतीक आणि अस्मिता अत्यंत महत्त्वाच्या असतात, मात्र हे ‘टोलवसुली’ केल्यागत स्वत:चे ठेले जागोजागी उभे करणं घातक आहे. तर या नाटकात गो.पुं.नी जोतिबांचं आणि त्यांच्या ‘युनायटेड फ्रंट’चं राजकारण अधोरेखित केलेलं आहे. हे नाटक पाहून आम्हांला आजच्या प्रतिगामी ब्राह्मणांनी ‘ब्राह्मणद्वेष्टे’ ठरवलं आणि प्रतिगामी ब्राह्मणेतरांनी ‘बामण’!! अर्थातच हे होणारच होतं. त्याबाबत आम्ही कोणीच अज्ञानी नव्हतो. आपल्या मूर्तिपूजक समाजात (आजच्या घडीला तर अधिकच) असे मुद्दे मांडणं कमालीचं कठीण होऊन वर्तमानाचं आकलन कसं होणार? आणि भविष्याचा तरी काय वेध घेणार? तर सरांचं हे नाटक मला महत्त्वाचं वाटलं आणि मुख्यत: करावंसं वाटलं. 

विनोद - आधीची संहिता जशीच्या तशी केली का? 
अतुल - अर्थातच नाही. त्यात बदल केले. यात काहीच वेगळं नाही. कुठल्याही दिग्दर्शकाचं ते कामच असतं. नाटकातले नवे अर्थ जसे लेखकाला लागतात तसेच ते दिग्दर्शकालाही लागायला हवेत. तो काही फक्त त्या लिखित शब्दांचा हमाल नसतो. ‘सत्यशोधक’ 93-94 ला लिहिलं गेलं होतं. आज ते करताना मी गो.पुं.च्या संमतीने त्यात छोटे छोटे बदल केले. काही चुकाही दुरुस्त केल्या. या नाटकाचा ‘फॉर्म’ जलशाचा. त्यामुळे त्यात गाणी होतीच, पण तरीही आम्ही काही नव्याने लिहिली. आमचे शाहीर नागनाथ त्यात माहीर होते. त्यांनी ती परिश्रमपूर्वक लिहिली आणि संगीतबद्ध केली. पोवाडा होताच, तो बदलला. उदाहरणार्थ- नाटकाची सुरुवात पोवाड्याने होते, ‘जय भवानी जय जगदंबे नमन तुज अंबे’ अशी. पण आम्ही ते बदलून ‘जय स्वातंत्र्य जय समते नमन तुज विद्ये करून प्रारंभे’ अशी केली. पहिल्या वाक्यातच जोतिबांना अभिप्रेत असलेला स्वातंत्र्य आणि समतेचा उद्‌घोष केला गेला आहे. अशा अनेक जागा नाटकात आहेत. ‘उधळू नयेत फुलेच नुसती त्यांच्या पुतळ्यावरी- स्मृती जागवुनी जोतिबांची जाण ठेवा मनी’ हा पोवाड्यातला संदेश आहे. अर्थातच, हे सारं गो.पुं.बरोबर चर्चा होऊनच झालं. ‘ब्राह्मण पंतोजींचा पोवाडा’ हे असंच दुसरं उदाहरण. त्यात मला अस्पृश्य लोकांची स्थिती दृश्यमान करता आली. गळ्यात मडकी अडकवून, आणि ढुंगणाला झाडू लावलेली स्थिती आजच्या लोकांना दाखवता आली. त्यातून न बोललं गेलेलं खोलवरचं राजकारण पुढे आणता आलं. पोत्यातून प्रत्यक्ष लहान मुलगी येणंही त्यातलंच. 

पेशवाईच्या सरत्या काळातली अशी भयाण समाजस्थिती पुढे आली. तर असे अनेक घटक आहेत. मुळात गो.पुं.नीही सावतामाळ्याचा ‘आमुची माळीयाची जात’ आणि ज्ञानेश्वरांच्या ‘आमुच्या मराठीचा बोल कवतिके’ या गाण्यातही फेरफार केलेले आहेत. ते मला महत्त्वाचे वाटतात. ‘आमुची माळीयाची जात हो शेत लावू बागाईत। कांदा मुळा भाजी अवघी विद्याबाई माझी। लसूण मिर्ची कोथंबीरी शूद्र रंगला अक्षरी।’ हे असे तर ‘अमुच्या मराठीचा बोल कवतिके’ च्या पुढच्या चरणात ‘आमुच्या क्रांतीचा बोल कवतिके जाती- हलाहल गिळून टाके’ अशी ओळ येते. असं नाटक करताना मी जास्तीत जास्त सघन, साधं केलं. जोतिबांच्या विचारांना साजेसं नाटकाचं रूप  दिलं. 

‘सिम्प्लिस्टिक आणि स्टे्रट’, रंगमंचीय अवकाश हा माणसांनी आणि त्यांच्या विचारांनी संपूर्ण भारलेला! जिवंत रसरशीत माणसं हेच नेपथ्य! जिवंत माणसं हेच यातलं राजकारण आणि विधान! मला स्वत:ला हे करणं नाटकाच्या आशयाच्या दृष्टीने महत्त्वाचं वाटलं. मूळ नाटकही मोठं आहे, ते मी संपादित केलं. सलग पावणेदोन तास. बाहेरगावी रस्त्यावर, मैदानात मध्यंतर कुठे देणार? आणि दिला तरी आमचा बघणारा प्रेक्षकवर्ग कुठला वडा- थम्सअप्‌ घ्यायला जाणार? त्याला परत बांधून आणणंही कठीण होणार, हा माझा विचार होता. म्हणजे नाटक करण्यापूर्वीच ते कोण पाहतील आणि कितीजण पाहतील याचा आम्हांला अंदाज होता. 

विनोद - नाटकाचे हे विविध पदर या साऱ्यांना कसे समजावले? 

अतुल - मी अनेक गोष्टी जास्त खुलेपणाने बोलतो. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या मानसिक आणि बौद्धिक स्तरावर जाऊन ज्याला त्याला समजावून देण्याचा प्रयत्न करतो. लोकसंवादावर माझा गाढ विश्वास आहे. त्यामुळे सतत बोलताना नाटकाच्या आणि स्वत:च्या जगण्याकडे मी प्रत्येकाला कायम ढकलतो. त्यातून आनंददायी गोष्टी अंगीकारायला लावतो. स्वत:ची आणि आजूबाजूची बिघडलेली ‘सिस्टिम’ दुरुस्त करायला जीव तोडून प्रयत्न करावेच लागतात. शिवाय, माझ्याकरता नाटकापेक्षा जगणं जास्त महत्त्वाचं आहे. नाटकातले कलाकार नुसते ‘वापरा आणि फेकून द्या’ असे मला वाटत नाहीत. म्हणूनच तर मला प्रत्येक वेळी नाटक करायला बराच वेळ लागतो. त्यातून मी नुसतं नाटक बसवून मोकळा होत नाही तर त्या नाटकाचं सारं व्यवस्थापनही मीच करतो. त्याचंही सारं ‘ट्रेनिंग’ कलाकरांना देतो. सतत व्यायाम, बोलणं, फिरणं, बघणं आणि अनेक नवे उपक्रम रुजवणं ही दीर्घकालीन प्रक्रिया असते. या प्रक्रियेत माझ्यातही बदल होतातच. नव्या गोष्टी लक्षात येतात. 

विनोद - शेवटचा प्रश्न, आज शंभरीत पोहोचल्यावर काय वाटते आहे? 

अतुल - एका वर्षात शंभर प्रयोग हे आव्हान आमच्या साऱ्या कलाकारांनी पेललं. दत्ता शिंदे, संदीप मोरे, रणजित मोहिते यांसारखे चांगले नट मिळाले. स्वत:चा चालता दवाखाना अनेक महिने बंद ठेवून उत्साही डॉ.दीपक मांडे मित्र झाले. त्यांचं गटात असणं महत्त्वाचं ठरलं. संदीपबरोबर त्याची मुलगी श्रेया आणि बायको अमृताही आली. सारं कुटुंबच ‘सत्यशोधक’ मय झालं. श्रेयाचं कौतुक करण्याकरता माझ्याजवळ शब्द अपुरे आहेत. असेच रमेश पारसे आणि त्यांचा मुलगा चेतनही त्यात जोरकसपणे सामील झाले. सावित्रीबार्इंचा नातू यश भिसेही पुढे येऊ लागला. तालमीच्या दुसऱ्या टप्प्यावर सोलापूरची वास्तुशिल्पकार प्राजक्ता पाटील आणि माझी मुलगी पर्ण आली. या दोघींनीही समर्पित भावनेने सारं सांभाळलं. तोलून धरलं. 

आमचा पखवाजवादक ब्रह्मानंद देशमुख, ढोलकीवादक संतोष पवार आणि पेटीवादक शेखर जाधव यांनी संगीतात रंग भरले. भीमराव बनसोडेंचं गाणं काळीज चिरून जाणारं होतं. तर प्रदीप वैद्यच्या प्रकाशयोजनेने रंगमंचाच्या मिती सघन झाल्या. घरच्या अनंत अडचणी असून शोभा बनसोडे, सावित्रा भिसे सर्व प्रयोग हजर होत्या. सतत धावपळ करणारे मनोज राजगुरू, हृषीकेश खंबायत. शिवाय युनियनचे आकाश, प्रशांत, भरत ठोरे, असे वाहन चालक इथेच भेटले. या साऱ्या प्रवासात शेखर लोहोकरे आणि त्याची गाडी हे आमचं दुसरं घरच झालेलं होतं. शिवाजीराव हे वाहनचालक आमच्यातले एक बनले. 

याबरोबरच सर्व अडचणींत भक्कमपणे उभे राहणारे प्रकाश जाधव, प्रकाश चव्हाण, प्रकाश हुरकुडली, चंद्रकांत गमरे, मधुकर नरसिंगे, दादा भोईटे, सिद्धार्थ प्रभुणे भेटले. युनियनचे असंख्य कार्यकर्ते आमच्या पाठीशी उभे होते, ही ताकद वाढवणारीच गोष्ट होती. शिवाय, पुण्याच्या मनपा आयुक्तांनी येऊन आमच्या कर्मचारी कलाकारांना ‘ऑन ड्यूटी’ वाढीव रजा दिली. अशा साऱ्या गोष्टींतून आम्ही महाराष्ट्रभर फिरलो. दिल्ली, कोलकाता, म्हैसूर, बंगळूर इथे महोत्सवांत जाऊन आलो. यांतील बहुसंख्य प्रयोग हे लोकशाही आणि घटनेवर विश्वास ठेवणाऱ्या पुरोगामी संस्था- संघटनांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेले होते. त्या साऱ्या कार्यकर्त्यांना भेटणं आमचं उन्नयन करणारं ठरलं. हरी नरके, सदानंद मोरे, मकरंद साठे, कुमार अनिल, डॉ.राजीव शारंगपाणी, अरुणचंद्र गवळी असे मार्गदर्शक त्यात सामील होते. जयंत जोशी आणि नामानंद मोडकसारखे चित्रकार मित्र आणि कुमार गोखलेंसारखा छायाचित्रकार-सुलेखनकार सतत बरोबर होते. शिवाय गोविंदराव पानसरे, श्रीराम लागू, डॉ.अनंत फडके, डॉ.भालचंद्र कानगो, डॉ.सुरेश खुरसाळे, अतुल देऊळगावकर, उल्का महाजन, डॉ.नरेंद्र दाभोलकर, नसिरुद्दीन शहा, रत्ना पाठक- शहा इ. पाठिंबा देणारे ज्येष्ठ आमच्या पाठीशी होते. 

या साऱ्या प्रवासात लाख सव्वालाख प्रेक्षकांना आम्ही सामोरे गेलो. त्यांचं कौतुक मिळालं, सल्ले मिळाले आणि मतभेदही कळले. अनेक वेळा प्रेक्षकांनी भारावून पैसे पदरात घातले. त्यांत आपले पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे होते, त्यांनी चक्क एक लाख रुपये दिले. सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळांनीही या नाटकाचे जिल्हाभर प्रयोग व्हावेत असं सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं. गावोगावच्या कार्यकर्त्यांनी आणि वृत्तपत्रांनीही हे नाटक आपलं मानलं. याच नाटकाची हिंदी, इंग्रजी सबटायटल्ससह डिव्हीडीही आता तयार आहे. हे सारंच मंथन समृद्ध करणारं ठरलं. नाटकाच्या दिग्दर्शकाला अजून काय हवं? ‘भरून पावलो’ अशी गो.पुं. सारखीच माझी अवस्था आहे. 

(शब्दांकन : अनुपमा पाठक) 

Tags: अनुपमा पाठक कचराकोंडी शेतकऱ्यांचा आसूड महात्मा जोतिबा फुले मुलाखत सत्यशोधक नाटक विनोद शिरसाठ अतुल पेठे Kacharakondi Shetkaryancha Asud Mahatma Jotiba Phule Mulakhat Satyshodhak Vinod Shrisath Atul Pethe weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अतुल पेठे
atul_pethe@hotmail.com

नाटककार, दिग्दर्शक 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके