डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गोव्याच्या निसर्गसमृद्ध भूमीने अनेक मूल्यवान रत्ने भारतीय शास्त्रीय संगीताला दिली आहेत. पंडित प्रभाकर कारेकर हे त्यांतील एक महत्त्वाचे नाव. शास्त्रीय संगीताची कोणतीही परंपरा घरामध्ये नसताना लहान वयात पोर्तुगीजकालीन गोव्यातून मुंबईत येऊन स्वकर्तृत्वाने पंडितजींनी गायनविद्या संपादन केली आणि संगीतविश्वात स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांच्या आवाजातील कित्येक नाट्यगीतांच्या ध्वनिमुद्रिका आजही मराठी संगीत-रसिकांच्या मनात घर करून आहेत. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, तानसेन सन्मान असे सुप्रतिष्ठित सन्मान लाभूनही त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील साधेपणा आणि स्वभावातील ऋजुता कायम आहे. गेल्या महिन्यात त्यांनी वयाची 77 वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने निरुता भाटवडेकर यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद.

प्रश्न - आपण गाऊ शकतो याचा शोध तुम्हाला कसा आणि कधी लागला?

- तेव्हा माझं वय 11 वर्षे असेल. मी गोव्याचा. आमच्या घरी माझे वडील गात असत. ते नेहमी 3 मिनिटांच्या रेकॉर्ड आणायचे आणि ऐकायचे. माझे चुलत आजोबा (पुंडलिक बुवा) भजनं म्हणत, पण मी त्यांचे गाणे कधी ऐकलेले नाही. भजन गाण्याचा संस्कार गोव्यातल्या घरांमध्ये मुलांवर लहानपणीच अगदी सहजगत्या होत असतो. दर गुरुवारी आमच्या घरी भजन असे. मी, माझा भाऊ आणि वडील देवापुढे बसून भजनं म्हणत असू. असे करता करता मला गाण्याची आवड निर्माण झाली.

एकदा शाळेमध्ये गंमत झाली. मी बाकावर तबला वाजवत होतो. ते पाहून पारकर नावाच्या एका शिक्षकांनी मला टीचर्स रूममध्ये बोलवून घेतले आणि विचारले, ‘‘तू गातोस का?’’ मी म्हटले, नाही. ‘‘मी गुणगुणतो...’’ त्या काळात शाळेत मी फुटबॉल खेळत असे. पारकरसरांनी मला शाळेच्या स्नेहसंमेलनात गाणी गायला सांगितले. मी घरी येऊन भावाला घडला प्रकार सांगितला आणि स्नेहसंमेलनात गाण्यासाठी दोन गाणी पाठ केली. अखेर स्नेहसंमेलनाचा दिवस आला. हाफ पॅन्ट व शर्ट अशा वेशात मी शाळेत गेलो. समोर दीडेक हजार विद्यार्थी आणि पालक बसलेले. मी पाठ केलेली गाणी जशीच्या तशी म्हटली. माझ्या दोन्ही गाण्यांना वन्स मोअर मिळाला! तिथल्या पुष्कळ लोकांनी नंतर ‘‘याचा गळा छान आहे, हा गायक होईल,’’ असे माझ्या वडिलांना सांगितले. त्यामुळे मला गाणे शिकवायचे असे ठरले. परंतु त्या काळी गाणे शिकवणारे गोव्यात फारसे कुणी नव्हते. क्लासिकल वगैरे तर मला काहीच माहीत नव्हते. मी भजन गायचो. ह्याला गाणे शिकवण्यासाठी कुठे पाठवायचे असा प्रश्न वडिलांसमोर निर्माण झाला. त्या काळात गोव्यात पोर्तुगिजांचे राज्य असल्यामुळे गोव्याबाहेर जाण्यासाठी पासपोर्ट लागायचा. वडिलांच्या डोक्यात सतत काही ना काही चालू असायचे. एके दिवशी वडील मला म्हणाले, ‘‘आपण मुंबईला जाऊ. तिथे तुझी गाणे शिकण्याची व्यवस्था होईल.’’ त्या काळी मडगावात काही वाटाडे असत, गोव्याबाहेर जाणाऱ्या गोयंकरांना ‘सत्याग्रही’ असल्याचे दाखवून ते गोव्याच्या हद्दीबाहेर सोडत. कुणा पोर्तुगीज अधिकाऱ्याच्या तावडीत सापडू नये म्हणून रात्रीच्या अंधारात प्रवास करावा लागे. रात्री 9.30 वाजता आम्ही चालायला सुरुवात केली. गोव्याच्या हद्दीनजीक कॅसलरॉक नावाचे गाव आहे, आधी तिथपर्यंत आलो. सतत चार-पाच दिवस चालून चालून माझे पाय सुजले होते. कॅसलरॉकमध्ये त्या वाटाड्याने आम्हांला एका व्यक्तीकडे ‘हे सत्याग्रही आहेत’ असे सांगून सुपूर्द केले. त्या व्यक्तीने तिथून आम्हांला बेळगावला आणून सोडले आणि तिथून मी, माझे वडील आणि माझा भाऊ मुंबईला आलो. मुंबईला आम्ही आलो खरे, पण राहायला जागा कुठे होती! मुंबईत सदानंद हळदणकर नावाचे वडिलांचे एक मित्र होते. त्यांच्या घरी आम्ही उतरलो. जागा लहानशीच होती. मी व माझा भाऊ घराजवळच असलेल्या मॉडर्न लाँड्रीबाहेरच्या फळकुटावर पथारी पसरून निजू लागलो. असे आम्ही काही दिवस काढले.

सुप्रसिद्ध गायक सुरेशबुवा हळदणकर आमच्या ज्ञातीतले. म्हणजे तेपण गोल्डस्मिथ व आम्हीपण गोल्डस्मिथ! शिवाय तेही गोव्यातलेच. वडील आम्हां दोघांना त्यांच्याकडे घेऊन गेले आणि त्यांना म्हणाले की, ह्याला गाणे शिकायचे आहे. आपण शिकवा. बुवांनी मला गाणे म्हणून दाखवायला सांगितले. त्यांना माझा आवाज आवडला. त्यांचा ‘होकार’ मिळाला. पण राहायचे कुठे हा प्रश्न समोर होताच. वडील आम्हां भावंडांना आता तुम्ही तुमचे बघा म्हणाले आणि गोव्याला निघून गेले. सुरेशबुवा माहीमला राहायचे. त्यांच्याकडे शिकायला सुरुवात झाल्यानंतर पंधरा दिवसांनी बुवांनी तुम्ही कुठे राहता, तुमचे वडील कुठे गेले वगैरे चौकशी केली. आम्ही सर्व सांगितले. बुवांनी ते ऐकल्यानंतर मला ‘‘तू माझ्याकडेच राहा’’ असे सांगितले. आमच्यावर मोठेच उपकार झाले. भावाने नोकरी धरली आणि काही काळाने मुलुंडला भाड्याने खोली घेतली. त्या काळात खोलीचे भाडे सात रुपये होते आणि जेवण सहा आण्याला मिळत असे. मी सुरेशबुवांकडे राहायला लागलो.

प्रश्न - सुरेशबुवांकडे गुरू-शिष्य परंपरेने तुमचे शिक्षण सुरू झाले त्याविषयी आणखी थोडे सांगा.

- मी सुरेशबुवांकडे राहू लागलो. डोक्यावर छत व दोन वेळचे जेवण, रात्री घरात वीज हे माझ्यासाठी खूप होते. तिथे मी घरातील सगळी कामे करत असे. पुढे बुवांबरोबर आम्ही त्यांच्या कार्यक्रमांनाही जायला लागलो. त्यांच्यामागे बसून मी तंबोरा साथ करत असे. बुवा कडक शिस्तीचे होते. मला ते सहजासहजी बाहेर कुठे पाठवत नसत, कुठे गेलो तरी वेळेवर परत यावे लावे. मी बिघडू नये यासाठी बुवा खबरदारी घेत. 10 वर्षे मी त्यांच्याकडे होतो. मी त्यांची खूप सेवा केली, पडेल ते काम केले. बरेच जण मला म्हणायचे की, तू बाहेर गाण्यासाठी जात जा. पण सुरेशबुवा म्हणायचे की, अजून गाणे छान व्हायला हवे.

प्रश्न - पुढे तुम्ही अभिषेकीबुवांकडे शिकू लागला, त्यांच्याविषयी सांगा.

- मी त्यांचे गाणे ऐकत होतो, ते आवडत होते. अभिषेकीबुवाही आमच्या गोव्याचेच. पुढे मला तीन वर्षांसाठी संगीत अकादमीची स्कॉलरशिप मिळाली. अकादमीने मला बनारसला जाण्यास सुचवले होते. मी अभिषेकीबुवांकडे शब्द टाकला. मी मुंबईला अभिषेकीबुवांकडे शिकतो हे सांगितल्यावर अकादमीने मान्यता दिली. अभिषेकींकडे मी नऊ वर्षे शिकलो. त्यांची गायकी आत्मसात करायचा प्रयत्न करू लागलो. माझे गाणे ऐकून अभिषेकीबुवांनी मला सांगितले की, तुझे गाणे महाराष्ट्रभर जायला हवे. त्या काळात मी आठ-आठ तास रियाज करत असे. परंतु राहायला जागा नव्हती. माझा एक मित्र रघुवीर भट मुंबईत ‘गुडविल’मध्ये राहायचा. गप्पांच्या ओघात मी त्याला माझा जागेचा प्रश्न सांगितला. तो चटकन म्हणाला, ‘‘अरे, तू माझ्याकडे ये ना राहायला.’’ मी जवळजवळ आठ वर्षे त्याच्याकडे राहत होतो. त्याचे लग्न झाल्यावर तिथे राहणारे इतर मित्र दुसरीकडे निघून गेले, तरीही मला मात्र त्याने स्वतःकडे ठेवून घेतले होते. तिथे माझ्या खूप ओळखी झाल्या.

प्रश्न - तिथले वातावरण कसे होते?

- बापटकाका, गोरेकाका, सप्रेकाका असे बरेच जण तिथे राहत. खूप छान माणसांचा सहवास मला तिथे लाभला.  माझे गाणे तिथे वाढू लागले. दिनू पणशीकर तिथेच राहत होते. आम्ही एकत्र रियाज करायचो. चार्टर्ड अकौंटंट जी. एन. जोशीदेखील जवळच राहत. त्यांच्याकडे दिलीपकुमार येत असत. त्यांच्या इन्कमटॅक्सची कामे जी. एन. जोशी करत. देव आनंद आणि वहिदा रेहमानदेखील त्यांच्याकडे यायचे.

एकदा मी खोलीत रियाज करत होतो. गाण्यात रमून गेलो होतो. दारात जी. एन. जोशी व दिलीपकुमार उभे राहून रियाज ऐकत होते. दिलीपकुमार यांना माझे गाणे आवडले. त्या वेळेस त्यांच्या ‘राम और श्याम’ या चित्रपटाचे शूटिंग मद्रासला चालू होते. ते मला त्यांच्याबरोबर मद्रासला घेऊन गेले. दिवसा ते शूटिंग करत आणि रात्री माझे गाणे ऐकत. माझे फॅन झाले होते ते!

एकदा जी. एन. जोशींनी मला विचारले, ‘‘दिलीपकुमार विचारत आहेत की तुम्हांला काय हवे आहे? त्यांना तुम्हांला काहीतरी द्यायचे आहे.’’ मी म्हटले, ‘‘माझे गाणे त्यांनी ऐकले. मला त्यांचे आशीर्वाद मिळाले. बाकी मला काही नको.’’ तरीही दिलीपकुमारनी मला तंबोऱ्याची जोडी भेट दिली. अजूनही ती माझ्याकडे आहे.

प्रश्न - तुमच्या गाण्याला ‘पु.लं.’स्पर्श झाला होता, ती आठवण...

- भाई ‘रवींद्र नाट्यमंदिर’मध्ये रंगसंगती नावाचा कार्यक्रम करत होते. या कार्यक्रमात ‘शाकुंतल ते सौभद्र’ असा नाट्यसंगीताचा प्रवास ते घडवणार होते. कार्यक्रमात त्यांचे निवेदन होतेच. पण पं. भीमसेन जोशी, पं. वसंतराव देशपांडे, छोटा गंधर्व, पं. राम मराठे, जोत्स्ना भोळे, लालजी देसाई अशी दिग्गज मंडळी त्यात नाट्यपदे सादर करणार होती. या कार्यक्रमात दोन साधी गाणी गायला पु.लं.ना मुले हवी होती. लालजींनी माझे नाव सुचवले. भार्इंनी मला गायला सांगून माझा आवाज ऐकला. त्यांना माझा आवाज आवडला.  ‘प्रिये पहा’ आणि ‘नच सुंदरी करु कोपा’ ही दोन गाणी त्यांनी म्हणायला सांगितली. ही गाणी मी पूर्वी कधी म्हटली नव्हती. पण भार्इंना ‘नाही’ म्हणायची हिंमतच नव्हती. शेवटी स्वतः भार्इंनीच मला ती गाणी शिकवली. प्रत्यक्ष कार्यक्रमाचा दिवस आला. इतक्या लोकांसमोर मी पूर्वी कधीच गायलो नव्हतो. मला घाम फुटू लागला. तेवढ्यात भार्इंनी, ‘‘आता आमचा तरुण मुलगा गाणी सादर करेल.’’ अशी घोषणा केली. उत्तररात्रीची वेळ होती. मी देवाचे व गुरूंंचे स्मरण करून पदे सादर केली. हार्मोनियमवर गोविंदराव पटवर्धन आणि तबल्याला वसंतराव आचरेकर होते. प्रत्यक्ष गाताना मात्र मी अजिबात घाबरलो नाही. मी ‘प्रिये पहा’ म्हटले आणि माझे गाणे संपताच सर्व रसिक उठून उभे राहिले. टाळ्यांचा कडकडाट झाला.

प्रश्न - या घटनेने तुमच्या आयुष्याला कलाटणीच मिळाली, नाही का?

- याच कार्यक्रमात गोव्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर होते. त्यांनाही माझे गाणे आवडले. मीही मूळचा गोव्याचा हे त्यांना माहीत नव्हते. दुसऱ्या दिवशी ते ‘द गोवा हिंदू असोसिएशन’मध्ये मीटिंगसाठी गेले होते. तिथे पु.लं.च्या त्या कार्यक्रमाचा उल्लेख होणे स्वाभाविक होते. भाऊसाहेब म्हणाले, ‘‘काल तो तरुण मुलगा प्रभाकर ‘प्रिये पहा’ हे पद छान गायला.’’ तिथे त्यांना कुणाकडून तरी कळले की, मी गोव्याचा आहे. त्यांनी मला आणण्याकरता गाडी पाठवली आणि ते मला त्यांच्या दादरच्या घरी घेऊन गेले. दोन तास त्यांनी मला वेळ दिला, पाहुणचार केला  आणि म्हणाले, ‘‘तू खूप रियाज कर, तू मोठा गायक व्हायला पाहिजेस.’’ खरोखरच पुढे त्यांनी मला खूप मदत केली. ते माझे प्रोग्रॅम ठरवायचे. दोन-दोन हजार रुपये बिदागीही द्यायचे. ‘दिल्ली दरवाजा’ नावाचा एक कार्यक्रम गणेशोत्सवात होत असे. या कार्यक्रमात अनेक दिग्गज गायक आपली कला सादर करत, त्यात त्यांनी एकदा माझेही गाणे केले होते. हे सर्व सुरू असताना मी रियाजही करत होतो. पण मन तृप्त होत नव्हते. आणि दरम्यान एक दिवस अचानक अभिषेकीबुवांनीही पुण्यात स्थायिक व्हायचे ठरवले. त्या काळात मला वारंवार पुण्यास जाणे शक्य नव्हते. त्यामुळे माझ्या शिक्षणाची मला काळजी वाटायला लागली. मी माझ्या एका मित्रासोबत जाऊन पंडित सी. आर. व्यास यांना भेटलो. त्यांना गाणे शिकवण्यासाठी विनंती केली आणि व्यासबुवांनी मला शिकविण्याचे मान्य केले. त्यांच्याकडे मी अनेक राग नव्यानेच शिकलो. गाणे कसे असावे हे शिकलो. पुढे मी भरपूर कार्यक्रम केले. कार्यक्रमांच्या निमित्ताने गाण्यासाठी तीनदा अमेरिकेला गेलो. मस्कत, दुबई, बहरिन असे परदेशी दौरे केले. लोकांनी मला खूप उचलून धरले. पुढे मुंबईत स्थायिक व्हायचे म्हणून माहीम भागात (टायकलवाडी परिसर) पन्नास हजार रुपयांत अखेर जागा घेतली. आपले शिक्षण झाले नाही एवढी एक सल मला आहे. पण संगीतानेच मला सर्व काही दिले आहे.

प्रश्न - आपल्या मुलांना या क्षेत्रात यायचे आहे का?

- त्यांना गाण्याची आवड आहे. पण माझी मेहनत पाहून घाबरले ते!

प्रश्न - तुम्ही अजूनही रियाज करता?

- पूर्वीइतका नाही. पण रोज दोन तास करतो. आता माझे वय 77 आहे. पण विद्यार्थ्यांना शिकवतो भरपूर... आता कोरोनाकाळात ऑनलाइन शिकवतो.

प्रश्न - ऑनलाइन माध्यमांतून संगीतासारख्या विषयाचे ‘खरे शिक्षण’ मिळते का?

- प्रत्यक्ष शिकवण्यात-शिकण्यात असणारा आनंद या ऑनलाइन शिक्षणात नाही. पण काय करणार? पूर्ण बंद होण्यापेक्षा शिक्षण चालू असलेले चांगले. कोरोनाकाळात माझे सर्व शिष्य ‘आम्हांला शिकवा’ म्हणून मागे लागले होते. मी म्हटले, ‘‘कसे शिकवू?’’ मग हा ऑनलाइनचा पर्याय पुढे आला. मग मीही हे माध्यम शिकून घेतले. आधी मुलाने शिकवले, आता माझा नातू शिकवतो. कानाला हेडफोन लावून मी ‘झूम’वरून शिकवतो. माझा वेळ छान जातो. विद्यार्थांनाही आनंद आहे.

प्रश्न - नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भजन यांपैकी तुम्ही स्वतः कुठे जास्त रमता?

- मी सगळ्यांत रमतो. सर्व संगीतप्रकारांचा मी आनंद घेतो. मी ठुमरीही गायलो आहे. मध्ये काही काळ तब्येतीने जरा त्रास दिला. पण आता ठीक आहे. आपण नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. मी नेहमी accommodative राहिलो आहे.

प्रश्न - गाण्याऱ्याचा स्वभाव गाण्यात दिसतो?

- गाणे हे सर्वांना आनंद देणारे आहे, तसेच शांत स्वभावाचे आहे. संगीत तुम्हांला शांत ठेवते. संगीतावर सध्या भरपूर संशोधन चालले आहे. एखाद्याला ब्लड प्रेशरसारखा आजार असेल तर त्यावर संगीताचा उपयोग होतो असे समोर आले आहे. तुम्हांला एक गंमत सांगतो. एकदा मी अकोल्याला गेलो होतो. तिथे माझा एक मित्र मला भेटायला आला आणि म्हणाला, ‘‘बुवा, तुम्हांला तुमच्या संगीताचा इफेक्ट सांगतो. माझा एक गोठा आहे. त्यात 20 गाई-म्हशी आहेत. मी तुमची आणि भीमसेन जोशींची रेकॉर्डिंग्ज जमा केली आहेत. रात्री गाई-म्हशी त्यांचे खाद्य खात असताना मी तिथे त्या रेकॉर्ड्‌स लावतो आणि सकाळी दूध काढतो. दिवसाला दोन लिटर दूध देणाऱ्या गाई-म्हशी आता रोज तीन लिटर दूध द्यायला लागल्या आहेत. या प्राण्यांना बोलता येत नाही, पण त्यांनाही कान आहेत, हृदय आहे. त्यांनाही संगीत आनंद देते. आपले शास्त्रीय संगीत खूप महान आहे, शांती देणारे आहे. म्हणूनच आपले संगीत जगभरात पोहोचले आहे.

माझ्या अमेरिकेमधील एका दौऱ्याचा अनुभव सांगतो. मी खोलीत रियाजाला बसलो होतो. तिथे जॅझ शिकणारी दोन तरुण मुले आली. केस वाढवलेले, हातात कडे घातलेले अशी ती मुले माझा रियाज ऐकून मला पाहायला आली. ‘काय करतोय हा’ असा प्रश्नार्थक भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. बहुधा त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत प्रत्यक्ष कधीच ऐकलेले नव्हते. त्यांच्याशी बोलल्यावर कळले की, खरे तर ती ब्राह्मण घरातली मराठी मुले होती. मी त्यांना म्हटले, ‘‘मी प्रॅक्टिस करतो आहे.’’ त्यांना जॅझची प्रॅक्टिस माहीत होती. माझा रियाज ऐकून त्यांना काय वाटले कोणास ठाऊक, त्यांनी मला विचारले, ‘‘आम्ही तुमच्या प्रोग्रॅमला येऊ का?’’ नंतर ती मुले आली व तीन तास पूर्ण वेळ गाणे ऐकत बसली. मला म्हणाली, ‘‘तुमच्या गाण्याने आम्हांला आनंद दिला.’’ आपले भारतीय शास्त्रीय संगीत सर्व जगभर पोहोचले आहे आणि ऐकले गेले आहे. पण भारतातच त्याची कदर केली जात नाही असे मला वाटते. आज टी.व्ही.वर बघा, आपले संगीत कुठे आहे?

प्रश्न - ...आणि टी.व्ही. चॅनेलवर ज्या गाण्याच्या स्पर्धा घेतात, त्यातून गायक घडतात?

- त्यांना ‘महागायक’ म्हटले जाते! स्पर्धेत तीन-चार मिनिटांचे गाणे म्हणून गायक होता येत नाही. स्पर्धेतून बाहेर पडल्यावर त्यातल्या कोणाचे नाव टिकते?

प्रश्न – निकालही forgone असतात?

होय. एसेमेसवरून कुणी गायक ठरत नाही. बराच काळ रियाज करून गवई घडतात आणि ते चार-चार तास गाऊ शकतात. आपण संगीताला कुठे नेऊन ठेवले आहे! स्पर्धा संपल्यावर कुठे नाव तरी ऐकायला मिळते का ‘महागायका’चे? नुसता चांगला गळा उपयोगी नाही. त्यावर संस्कार करावा लागतो. हिरा हा मुळात तसा नसतो. जवाहिर त्याच्यावर प्रक्रिया करून, पैलू पाडून त्याला ‘हिऱ्या’चे रूप आणि चमक देतात. तसेच गळ्याला पैलू पाडण्याचे काम गुरू करतो, ते रियाजाने साधते.

प्रश्न - हे खूप छान सांगितले तुम्ही. आपल्या संगीतात वेळेचे आणि रागाचे काय नाते आहे? ठरावीक राग ठरावीक वेळीच गातात. असे का?

- ती आपल्या संगीतातली शिस्त आहे. कर्नाटक संगीतात कुठलाही राग केव्हाही गायला जातो. भूपाली, भैरवी तिथे केव्हाही गातात, हिंदुस्थानी संगीतात तसे नाही. भातखंड्यांनी संगीताच्या शास्त्रासंबंधात केलेले काम खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही पाहा, आपल्याकडे सकाळच्या आसावरी, तोडीसारख्या रागांत कोमल स्वर आहेत. ते सकाळचा आभास निर्माण करतात. दुपारी ऊन वाढले की सारंग गातात. संध्याकाळी पूरिया, मारवासारखे राग; त्यानंतर कल्याण, शुद्धकल्याण, भूपाली, त्यानंतर मालकंस, दरबारी. पूर्ण दिवसाचे हे चक्र बसवलेले आहे.

कुमार, भीमसेन, सुरेशबुवा, माणिक वर्मा या महान गायकांनी आपले हे संगीत वाढवले आहे. आता मात्र पोकळी निर्माण झाली आहे. मला अजूनही मल्लिकार्जुन आठवतात; कुमार, भीमसेन आठवतात.

प्रश्न - सध्याच्या पिढीबद्दल काय सांगाल?

- आजची पिढी हुशार आहे. पण त्यांना बैठक नाही! फटफट केस उडवणे, चांगले कपडे घालणे याकडे लक्ष अधिक आहे. आम्ही असे कधीच केले नाही. आम्ही उत्तम गाण्याला अधिक महत्त्व दिले. नवीन पिढीला मी वाईट म्हणत नाही, पण या पिढीत जुन्या गवयांसारखी ताकदच राहिलेली नाही. आम्ही आठ-आठ तास रियाज करायचो. भीमसेन रोज चार शेर दूध प्यायचे. रहमतखाँसाहेब कपभर तूप प्यायचे. त्याने शरीरात ताकद येते, मजबूतपणा येतो. त्या ताकदीचे गाता येते. आमटी-भात खाऊन तशी ताकद येत नाही. तुला भास्करबुवा बखल्यांची गोष्ट सांगतो. उस्तादांनी सांगितले आहे म्हणून ते उस्तादांसाठी मटण आणायला जात. ‘‘मी ब्राह्मण आहे, मी आणणार नाही’’ असे त्यांनी म्हटले नाही. नुसता भात खाऊन गाण्यात ताकद येत नाही.

प्रश्न - गाण्याबरोबर तुमच्या इतर आवडीनिवडी काय आहेत?

- पूर्वी मी अभिषेकीबुवांबरोबर मी कुस्ती बघायला स्टेडियममध्ये जात असे. मला कुस्तीचे सामने पाहणे आवडत असे. अजूनही मी खूप गाणे ऐकतो. लताबाई, आशाताई, महंमद रफी मला खूप आवडतात. गाणे तासभराचे असो किंवा तीन मिनिटांचे, ते सारखाच आनंद देते. एक गोष्ट सांगतो, बूट किंवा चपला घालून जे गातात ते गाणे नाहीच. गाणे ही सरस्वतीची पूजा आहे. ती नीट करा, मनःपूर्वक करा. टी.व्ही.वर ‘चला हवा येऊ द्या’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अशा विनोदी मालिका पाहायला मला आवडते.

उगाच मोठेपणा मिरवणे मला आवडत नाही. चार घास दोन वेळेस जेवायला मिळते यात मी समाधानी आहे. तुझी आई, शैला माझी बालपणीची मैत्रीण आहे. आम्ही अजूनही प्रेमाने भेटतो. ‘गुडविल’मध्ये हे असेच वातावरण होते. आजकाल कोणी कोणाचे तोंड बघत नाही. मला असे आवडत नाही. मला साधेपणा आवडतो... मी स्वतः तसाच आहे.

मुलाखत : निरुता भाटवडेकर, मुंबई

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

प्रभाकर कारेकर

भारतीय शास्त्रीय संगीतातील बुजुर्ग कलावंत


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके