डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

भालचंद्र नेमाडे यांची मुलाखत

भालचंद्र नेमाडे आपल्या उपहासात्मक आणि दबंग शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. ज्ञानपीठ पुरस्काराच्या घोषणेबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ‘माझे काही मित्र मला एक एप्रिलला तुला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला  असं सांगून एप्रिल फूल करीत असत. आज एक एप्रिल तर नाहीये ना... मी हे प्रथम पाहिलं.

मुंबईमध्ये डॉ.भालचंद्र नेमाडे यांची भेट नुकतीच झाली. त्यांच्याशी केलेली ही बातचीत.

प्रश्न- आपण सुरुवात ‘हिंदू’पासूनच करू या. आपण ‘हिंदू’ला जगण्याची समृद्ध अडगळ असं म्हटलंय. तुम्ही ‘जगण्याची समृद्ध अडगळ’ यांद्वारे काय सांगू इच्छिताय...?

- या आशयाचं सूत्र माझ्या मनात खूप दिवसांपासून घुमत होतं. आपलं छोटंसं गावं जरी बघितलं तरी त्यात दहा-पंधरा संप्रदाय आढळतात. कुणी फकीर आहे, कुणी नाथपंथी आहे. गोसावी, वारकरी, महानुभाव, कबीरपंथी इत्यादी संप्रदाय आढळतात. जातीदेखील खूप आहेत. त्यांचं खाणं-पिणं, राहणं-वागणं, पोशाख सगळं वेगवेगळं आहे. त्यांची व्रतवैकल्ये आणि सणवारदेखील वेगवेगळे आहेत. लोककथा आणि लोकसाहित्यदेखील भिन्न-भिन्न आहेत. त्यांचं सादरीकरण होतं, काही कलाकार असतात. मी इंग्लंड, जर्मनी या देशांतून असं पाहिलं की, त्यांच्याकडे इतकी समृद्धी असत नाही. त्यांच्याकडे अशी लोकगीतं, लोककथा, लोककला असत नाहीत.

आपल्या देशात ही जी लोकसमृद्धी आहे, ती खूप महत्त्वाची आहे. पण आपली समृद्धी इतकी जास्त आहे की- कित्येक वेळा वाटतं की, या सगळ्याचं काय करावं? अशा स्थितीत नायकाला वाटतं की, पुढे जायचं असेल तर हे सगळं बरोबर घेऊनच जायला हवं किंवा हे सोडून तरी द्यायला हवं. जर ते टाळून पुढं गेलं, तर आमची समृद्धी तितकी कमी होते. मग समृद्धीशिवाय प्रगती तरी कशी करणार? नायकाच्या मनात नेहमी असा प्रश्न येतो की, जीवनात आधुनिकतेचा स्वीकार केला तर या लोकसमृद्धीचं करायचं काय? जी आज उपयोगाची नाही आणि ती टाकूनही देता येत नाही. त्यामुळे मी ‘हिंदू’ला उपशीर्षक दिलंय- ‘जगण्याची समृद्ध अडगळ’.

हिंदू समाजाचं असंच काही तरी झालंय. आम्ही आमच्यापूर्वीच्या रीती-रिवाजांना सोडूही शकत नाही... जशी आमच्या स्वर्गात गेलेल्या आजोबांची काठी आहे... आजीची पेटी आहे. अशा किती तरी वस्तू... ज्यांचे केवळ प्रतिक म्हणूनच आपल्या जीवनात स्थान आहे. त्याशिवाय आणखी काहीही उपयोग नाहीये. प्राचीन संस्कृतीची काही वैशिष्ट्ये आहेतच. प्रगतीसाठी त्यांची गरजही भासू शकते. पण आपल्यापुढे एक आव्हानही आहे की, आपल्याला मंगळावर, चंद्रावरही जायचं आहे आणि आज गावात आपण गाई-बैलाची पूजादेखील करतो आहोत. तर, या सगळ्या गोष्टी बरोबरीने किती काळ चालणार?... पण भारताची हीच ओळख आहे.

प्रश्न- तुमची किती तरी पात्रं परंपरा तोडतात. त्यात चिंटूआत्यादेखील आहे, जी आपल्या पतीचा खून करते. तुम्ही या माध्यमातून काय सांगू इच्छिताय?

- यातील एक सूत्र मातृसत्तेचं आहे. ही जुनी हिंदू परंपरा आहे. ही परंपरा आर्य आल्यानंतर कमी-कमी होत गेली आणि मग पितृसत्ताक व्यवस्था आली. आमची कालिमाता, अंबा, तुळजाभवानी या आमच्या मूळ देवता आहेत. नंतर राम, कृष्ण आले. ते नंतर पितृसत्ताकाचे प्रतीक बनले. पण आपल्यासाठी अजूनही मातृसत्ताकच पूजनीय आहे. माझा नायक तर पुरातत्त्ववेत्ता आहे. त्यामुळे तो सगळ्या गोष्टींचा ऊहापोह करतो. पुढच्या खंडात हे सगळं अजून विस्ताराने येणार आहे. वर्तमानात स्त्रियांची जी स्थिती आहे समाजात, ती चांगली नाहीये. स्त्रियांना भयंकर अत्याचारांचा सामना करावा लागतोय, ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे.

चिंटूला केवळ मुलीच होतात म्हणून तिला घटस्फोट देणं आणि आपण दुसरं लग्न करणं, हे बरोबर नाही. पण आपल्या समाजात हे सगळं खूप चालत आलेलं आहे. आज जे मुलींचं प्रमाण कमी झालेलं आहे, त्याच्यामागे हीच मानसिकता आहे. यावर एकच उपाय आहे की, आपल्याला मागे जाऊन पुन्हा मातृसत्ताक पद्धत सुरू करावी लागेल. हे एक आव्हान आहे. त्यामुळे माझ्या कादंबरीत असं एक पात्रं आलं आहे की, जे मातृसत्ताक पद्धतीला पाठिंबा देते आहे. त्यामुळे वर्तमान व्यवस्था त्याला नष्ट करू इच्छितेय. त्याचा मृत्यू नक्की आहे. त्याची कबरही खोदली गेलीय. ती असा विचार करते की, आपण शरण का जायचं? त्यामुळे ती विद्रोह करते. त्यासाठी दुसऱ्या स्त्रिया तिला मदत करतात. सहनशक्तीची मर्यादा संपली की, हे सगळं घडतंच.

प्रश्न- नायक खंडेरावाच्या माध्यमातून आपण ज्या गोष्टी मांडल्या आहेत, त्या... 

- सगळ्या गोष्टी समांतर चालतात. खंडेरावचा जन्म एका छोट्या समूहात होतो. आणि त्याला नव्या जगात जायचं आहे. तो किशोरावस्थेत आहे. पहिल्या खंडात तो विरोधाभासामध्ये जगतोय. तो परंपरा आणि विकास यांच्यामध्ये उभा आहे. त्यामुळे त्याच्या मनात द्वंद्व आहे.

प्रश्न- तो केवळ ‘हिंदू धर्मा’विषयीच विचार करीत नाहीये. तुमच्या या कादंबरीच्या केंद्रस्थानी वर्तमान आणि प्रगतिवादी विचारदेखील आहे... तुम्ही अध्यात्म आणि धर्म यांमध्ये कशा तऱ्हेने फरक करता?

- मी ‘धर्म’ शब्दाला मानत नाही. आम्ही पूर्वी धर्माबद्दल बोलत नव्हतो. एखाद्या म्हातारीला धर्माबद्दल विचारलं, तर ती आश्चर्यचकित होईल... ‘धर्म काय असतो?’ तिला पंथ, संप्रदाय माहितीय... धर्म या शब्दामुळे एक चर्च, एक पोप, एक प्रॉफेट किंवा बायबल, कुराण यांचा बोध होतो. आपल्याकडे असं नाहीए. आमच्याकडे ज्ञानेश्वर होते... ते ब्राह्मण होते आणि त्यांच्यानंतर तुकाराम, नामदेवही होते. वेगवेगळ्या जातीतील लोकांनी आपल्याला मार्ग दाखवला आहे. प्रत्येक जातीतील एक आदर्श आमच्यासमोर आहे. धर्माचं भूत इंग्रजांनी आमच्या मानेवर बसवलंय... धर्माचं हे भूत नष्ट व्हावं, अशीही माझी इच्छा आहे.

प्रश्न- तुम्ही ईश्वराला मानता?

- नाही. मी ईश्वराला मानत नाही, पण माझं न मानणं शंकराचार्यांसारखं आहे. तेदेखील मानत नव्हते. त्यांच्याप्रमाणेच माझं ईश्वराला न मानणं आहे, असं मी समजतो. सांख्य, कपिल हेदेखील ईश्वराला मानत नव्हते. त्यांच्याप्रमाणेच माझेदेखील विचार आहेत. पण आपण ब्रह्माला मानतो. आमची काही आदर्श व्यक्तिमत्त्वे आहेत... त्यांना मी मानतो. सृष्टी आहे... अशा ईश्वर न मानणाऱ्यांपैकी मी एक आहे.

प्रश्न- तुम्ही मंदिरात जात नाही... पूजापाठ करीत नाही?

- मी मंदिरात जातो. सगळे जातात म्हणून जातो. आस्था असणाऱ्यांवर माझा विश्वास आहे... कर्मकांडांवर नाही. पूजापाठ करणाऱ्यांना माझा विरोध नाही. उलट, त्यांच्याशी जोडून घेऊन मी स्वत:ला आतून बलवान झाल्याचा अनुभव करतो. माझी हीच कमजोरी आहे की, मी ईश्वराच्या संकल्पनेवर विश्वास ठेवू शकत नाही. जे श्रद्धा ठेवतात, त्यांच्याविषयी मला आस्था वाटते.

प्रश्न- तुमच्या लेखनात तुम्ही किती तरी वेळा खूप तिखट प्रतिक्रिया व्यक्त करता. असं वाटतं की, तुम्ही रागावलेले आहात; चिडून बोलताय...

- सहज-स्वाभाविक प्रतिक्रियेच्या रूपात जे येतं, ते मी तसंच अभिव्यक्त करतो. जाणून-बुजून मी कुणाही व्यक्तीला किंवा समुदायाला ठेच लागेल, असं काहीही करीत नाही.

प्रश्न- तुमच्या कादंबरीत तुम्ही किती असता?

- बहुतेक कादंबरीत मीच आहे. कधी नायकाच्या रूपात, तर कधी इतर रूपात.... टक्केवारीत सांगणं अवघड आहे. पण कुठे 50 टक्के, कुठे 60 टक्के किंवा 70 टक्के... कधी कधी तर 90 टक्क्यांपर्यंतही माझे अनुभव कादंबरीत प्रतिबिंबित झाले आहेत.

प्रश्न- कादंबरी लिहिताना तुमच्या मनातील एखादं पात्रं तुम्हाला प्रभावित करून जातं?

- लिहिता-लिहिता तुम्ही एखाद्या पात्रामुळे इतके प्रभावित होता की, तुमच्यामध्ये त्यामुळे परिवर्तन घडून येतं. हे असं माझ्या बाबतीतही घडून आलेलं आहे.

प्रश्न- तुम्ही देशीवादाचे पुरस्कर्ते मानले जाता. महात्मा गांधींच्या स्वदेशीपेक्षा तुमचा देशीवाद किती वेगळा आहे?

- गांधीजींचा प्रभाव माझ्या विचारांवर आहेच. तसा मी स्वत:ला लोहियांचा शिष्य मानतो. मी त्यांना कधीही भेटलेलो नाही... पण मी त्यांना खूप गंभीरपणे वाचलेलं आहे. मी गांधीजी, लोहियाजी, साने गुरुजी, विनोबाजी यांची परंपरा मानतो. राजनीती आणि सामाजिक संदर्भात मी त्यांचा प्रभाव मानतो. पण लहानपणापासून माझ्यावर लोकसाहित्याचा खूप प्रभाव आहे. माझ्या विचारांचा पायाच देशीवाद हा आहे. जेव्हा विदेशी परिस्थितीशी दोन हात करायची वेळ आली, तेव्हा मी माघार घेतलेली आहे. उदाहरणार्थ, रोजीरोटीसाठी मला इंग्रजी शिकवावी लागली. दुसरा पर्याय मला त्या वेळी सुचला नाही. पण त्याचा उपयोगही मी माझी मातृभाषा समृद्ध करण्यासाठी करून घेतला. मी हेही मानतो की, देशाबाहेरून एखादा विचार आला तर त्याचा उपयोग पायाभूत पद्धतीने करायला हवा.

प्रश्न- तुम्हाला अस्तित्ववादी लेखक म्हणूनही ओळखलं जातं. कोणत्या वादाचा तुमच्यावर प्रभाव आहे?

- लेखनाच्या क्षेत्रात वाद येतात आणि जातात. 1960 च्या नंतर लेखक आपापसात चर्चा करत असत. देशातील-विदेशातील कोणत्याही प्रश्नावर, वादावर आम्ही चर्चा करीत असू. दोस्तोवोस्की, कामू, काफ्का आम्ही वाचले. पश्चिमेतील जर्नल्सदेखील वाचली. पण या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या आसपासचा माहोल विचारात घेऊन आत्मसात केल्या. अस्तित्ववाद ही पाश्चिमात्य संकल्पना आहे. आमचा अस्तित्ववाद कबीर, तुकाराम यांचा आहे. आमचे हे विचारवंत परमेश्वरावर निर्भर नव्हते; ते स्वत:वर विश्वास ठेवून आपली वाटचाल करीत असत.

 प्रश्न- साहित्यातील प्रगतिवाद, वामपंथ इत्यादी विचारधारांशी तुम्ही कशा प्रकारे संबंध ठेवता?

- ह्या सगळ्या गोष्टी मला कधीच भावल्या नाहीत. त्यात ज्या चांगल्या गोष्टी होत्या, त्या मी जरूर घेतल्या. पण या वादांनी मला कधीही आकर्षित केलं नाही; माझ्यावर प्रभाव टाकला नाही.

प्रश्न- तुम्ही छोट्या गावांतून आलात, आता महानगराशी जोडलेले आहात; त्यामुळे कधी कोणत्या प्रकारचा संघर्ष उद्‌भवला?

- एक प्रकारचा ताण तर असतोच. मी परदेशातही मोठमोठ्या शहरांतून राहिलोय. लंडन, बीजिंग, पॅरिस, फ्रँकफर्ट इत्यादी शहरांतून मी इंग्रजीचं अध्यापन केलंय. पण मी जिथे कुठे राहिलो, तिथे मी ग्रामीण आहे, असाच अनुभव येत राहिला. मी गावातल्या व्यक्तीप्रमाणेच वागतो. सिमला निवासमध्ये तर तिथले ग्रामीण लोक म्हणतात की, मी त्यांच्याप्रमाणेच वागतो. मी गावांपासून वेगळा झालोय, असं मला कधीही वाटलं नाही.

प्रश्न- तुम्ही सुरुवातीला कविता लिहिल्यात, पण आता मात्र कविता लिहीत नाही...

- कविता लिहिण्यासाठी एक प्रकारचा मॅडनेस असावा लागतो. पण मी कविता लिहितो. माझे दोन संग्रह प्रकाशित झाले आहेत. नवा संग्रहही लवकरच येईल.

प्रश्न- आजकाल साहित्याला वेगवेगळ्या कप्प्यांत ठेवण्याची पद्धत आहे. दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य, अल्पसंख्याक, आदिवासी साहित्य... तुम्ही याकडे कसे बघता?

- हे सगळं अशास्त्रीय आहे. यात खूपसा जातिवाद येतो. भेद होतो.

प्रश्न- असं मानतात की- दलित आपली बाजू, स्त्रिया त्यांची बाजू अधिक चांगल्या तऱ्हेने मांडू शकतात...

- मी असं मानत नाही. संवेदनशीलता खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. कधी कधी या सगळ्यांशी जोडलं गेलेलं राजकारण अडचणीची परिस्थिती उत्पन्न करते. स्त्रीवादी साहित्याची गोष्ट असते तेव्हा.... प्रत्येक मानव अर्धनारीश्वर आहे. त्यामुळे तो एक-दुसऱ्याचे अनुभव योग्य तऱ्हेने व्यक्त करू शकतो. प्रतिभेचा अर्थच हा आहे की, आपण सजीव, निर्जीव... सर्व परिस्थितीचे सार्थक, सजीव चित्र रेखाटू शकलो पाहिजे.

प्रश्न- बहुतेक मराठी लेखकांनी आत्मकथा लिहिल्या आहेत. तुमची तशी काही योजना?

- मी आत्मकथेच्या विरुद्ध आहे. आपण आत्मकथा लिहिली पाहिजे, असं मला कधीही वाटलं नाही. आत्मकथेमध्ये लेखक आपल्या जीवनाला सीमित करतो. तो आपलं एकांगी चित्रण करतो. त्याचं खरं रूप प्रकट होत नाही. आपलं सगळ्यांचं अचेतन मन एकसारखंच आहे. परा-पश्यंतीशी आम्ही जोडले जातो. माझा विचार केवळ माझ्या एकट्याचा असत नाही; त्याची व्याप्ती खूप अधिक असते. आत्मकथेत बहुतेक करून खूप काटछाट केलेली असते. कादंबरीमध्ये असं होत नाही. कादंबरीत पूर्ण विस्तार करता येतो.

प्रश्न- मराठीतील कोणत्या साहित्यकृती आपण महत्त्वपूर्ण मानता?

- मराठीमध्ये आजकाल कादंबऱ्या खूप चांगल्या येत आहेत. वीसएक चांगले कादंबरीकार आहेत. रंगनाथ पठारे, राजन गवस, सदानंद देशमुख, महेंद्र कदम, विदर्भातील नामदेव कांबळे आदी लेखक महत्त्वाचे आहेत. त्यांना कादंबरीचं सूत्र सापडलेलं आहे. ते कादंबरीची रचना, आशय आणि प्रयोगशीलता यामध्ये खूप पुढे गेलेले आहेत.

प्रश्न- भारतीय साहित्यात- विशेषत: हिंदी साहित्यात- तुम्हाला उल्लेखनीय कोण वाटतं?

- हिंदी मी मुळातून वाचतो... हिंदी कविता आणि कादंबरी मला प्रभावित करते. हिंदीचा अँटेना खूप मोठा आहे. हिंदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जनजीवनाचं प्रतिबिंब पडलेलं आपल्याला दिसतं.

प्रश्न- कुणी विशेष लेखक?

- फणीश्वरनाथ रेणू यांची कादंबरी ‘परती-परिकथा’ माझ्या मनाला स्पर्शून गेली. नागार्जुन, प्रेमचंद, उदयप्रकाश, धूमिल यांचं साहित्य मला खूप भावतं.

प्रश्न- एक थोडा वेगळा प्रश्न.. तुम्ही इंग्रजीचे प्रोफेसर होतात. मग अभिव्यक्तीसाठी तुम्ही मराठी भाषा  का निवडलीत?... काही खास कारण?

- आपल्या मातृभाषेत आपण शंभर टक्के अभिव्यक्त होऊ शकतो. अनुभूती मातृभाषेत होते आणि अभिव्यक्तीचं श्रेष्ठ माध्यमही मातृभाषाच असते. मी अकरावीपर्यंत मातृभाषेतच शिकलो. नंतर मी इंग्रजीचा अभ्यास केला आणि ती भाषा शिकविलीही. जगभरातलं साहित्य वाचल्यावर माझ्या असं लक्षात आलं की, दुसरी भाषा समजून घेण्यासाठी आपल्याला अनुवादाच्या प्रक्रियेतूनच जावं लागतं. मग आपल्या भाषेतच का लिहू नये? अधिक वाचकांनी माझं साहित्य वाचावं म्हणून किंवा रॉयल्टीच्या मोहापोटी मी भाषेबरोबर कधीही तडजोड केली नाही.

प्रश्न- तुम्ही इंग्रजीचे प्राध्यापक होतात, पण शाळेत इंग्रजीतून शिकविण्याला तुमचा नेहमीच विरोध राहिला आहे; असं का?

- माझा इंग्रजीला विरोध असल्यामागे कारण आहे. इंग्रजी चांगलं यायचं असेल तर ते मातृभाषेच्या माध्यमातूनच येऊ शकतं. मी केवळ भावनेच्या भरात हे म्हणत नाहीये. भाषाविज्ञान हादेखील माझा अभ्यासाचा विषय होता. त्यातील मूळ सिद्धांत असा आहे की, तुम्ही मातृभाषेतच चांगल्या प्रकारे विचार करू शकता. सृष्टीचं आकलन मातृभाषेतच चांगल्या प्रकारे होऊ शकतं. जगातील प्रत्येक देशाची याला मान्यता आहे. केवळ जे देश गुलाम होते, त्या देशांमध्येच इंग्रजीचं प्रचलन आहे. त्यामुळे आमचा विकासदेखील होत नाहीये. माझं म्हणणं बौद्धिक विकासाशी संबंधित आहे. करोडो लोक शिकले, पण एकही नवी गोष्ट आम्ही जगाला देऊ शकलो नाही. चिकित्सा, विज्ञान या विषयांत आमचा शोध जवळजवळ नसल्यातच जमा आहे. याचं कारण आमच्या देशातील इंग्रजी हेच आहे.

प्रश्न- अशी परिस्थिती इंग्रजांचे गुलाम असलेल्या सगळ्या देशांची असणार?

- आमचं थोडं तरी बरं आहे. कारण आपली अर्धी लोकसंख्या निरक्षर आहे. हे अशिक्षित लोकच काही ना काही क्रिएटिव्ह करू शकतात. जे इंग्रजीतून शिकले, ते परप्रकाशित झाले.

प्रश्न- समाजमनांवर इंग्रजीचा दबाव आहे...

- इंग्रजीच्या साथीला विकास आहे... ही एक प्रकारची अंधश्रद्धा आहे. मी नरेंद्र दाभोलकरांना म्हटलं होतं की, ह्याचा समावेशही अंधश्रद्धांच्या यादीत करा. जागतिकीकरणामध्ये तुम्ही अधिकाधिक विकले जात आहात. इंग्रजीचं तत्त्वज्ञानच स्थलांतरवादी आहे. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, दक्षिण अमेरिका येथील भाषा इंग्रजीने संपवून टाकल्या आहेत. आपण वाचलो आहोत, त्याचं कारण आपली अर्धी लोकसंख्या निरक्षर आहे म्हणून.

प्रश्न- तुम्ही दाभोलकरांचा उल्लेख केलात... पण अंधश्रद्धेला विरोध करणाऱ्यांना संपवण्यासाठी काही शक्ती सक्रिय झाल्या आहेत...

- ते सगळे इंग्रजीमुळे प्रभावित झालेले लोक आहेत. ते अशिक्षित नाहीत, ते प्रशिक्षित-फॅसिस्ट प्रवृत्तीचे लोक आहेत. ते विकले गेलेले आहेत. गोविंद पानसरे हेदेखील त्यांची शिकार झाले आहेत.

प्रश्न- इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वाचनसंस्कृतीवर काय परिणाम होताना तुम्ही पाहताय?

- मी असा विचार करतो की, आमची वाचनसंस्कृती खूप जुनी नाहीए. लेखन-वाचनाचा आमचा इतिहास दोन हजार वर्षांपूर्वीचा नाहीये. आमची परंपरा मौखिकच आहे. लिपीचा शोध लागल्यानंतरही आमची मौखिक परंपराच गावांतून चालू राहिलेली आहे. आणि तसंही इलेक्ट्रॉनिक माध्यमं हेही अभिव्यक्तीचंच एक माध्यम आहे. मोठी कादंबरी आपण यापुढे नेटवर वाचू शकू. ई-बुकचा प्रसारही वाढू शकतो. भाषेचे वय 60 हजार वर्षे आहे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाचं वय 20-30 वर्षच आहे. कदाचित मानवजात पुन्हा मौखिक परंपरेला आपलं मानू लागेल.

प्रश्न- तुमच्या पात्रांतील कुणी समाजातील ओळखीचा ‘चेहरा’ वाटतो- ज्याला पाहून लोक म्हणतील की, हे नेमाडे यांच्या कादंबरीतील पात्र आहे...

- हो, तसं आहे ना! किती तरी पात्रं आहेत. गावातील सगळ्या लोकांना माहितीय की, कादंबरीतील एक पात्र माझ्या वडिलांचंच आहे. पण ते गावातील लोकांना नेहमी म्हणत असत की, कादंबरीतील पात्रं ही काल्पनिक असतात. खऱ्या जीवनातील व्यक्ती साहित्यात कशी येऊ शकते?... अशी किती तरी उदाहरणं आहेत.

(हिंदीतून मराठी अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ)

Tags: चंद्रकांत भोंजाळ दामोदर खडसे भालचंद्र नेमाडे कादंबरी लेखक मुलाखत interview Novels Author Chandrakant Bhonjal Damodar Khadse Bhalchandra Nemade weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके