डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

परिवर्तनवादी चळवळींच्या हातात मी ओबामा दिला!

जानेवारी 2009 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘बराक ओबामा :बदलत्या जगाचा 'सक्सेस पासवर्ड' या मराठी पुस्तकाच्या अवघ्या दोन महिन्यांत बारा आवृत्त्या निघाल्या.त्या निमित्ताने, या पुस्तकाचे लेखक संजय आवटे यांची पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्राचा विद्यार्थी केदार देशमुख माने घेतलेली मुलाखत...

प्रश्न : बराक ओबामांवर पुस्तक लिहावे, असे का वाटले?

-‘आज अनेकांना असे वाटते की, फारच नियोजनबद्ध पद्धतीने हा विषय मी निवडला.काहींनी तर माझ्या चलाखीचेही कौतुक केले! प्रत्यक्षात, एका अत्यंत उत्कट क्षणी हे पुस्तक लिहायला मी सुरुवात केली... आणि सहा दिवस, सहा रात्री सलगपणे ते लिहीत होतो.निव्वळ झपाटलेपणाशिवाय दुसरी कोणतीही प्रेरणा त्यामागे नव्हती. गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास मी करतोय. त्यामुळे अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीकडे लक्ष होतेच. डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी बराक ओबामा आणि हिलरी क्लिंटन यांची लढाई सुरू असताना, ओबामांच्या काही विधानांनी माझे लक्ष वेधून घेतले. त्यातही फिलाडेल्फियात त्यांनी केलेले भाषण विलक्षण होते. प्रत्यक्षात तसेच एक भाषण त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या 2004च्या अधिवेशनात केले होते. मात्र ते माझ्या वाचण्यात आले नव्हते. फिलाडेल्फिमातील त्यांच्या भाषणाचा मजकूर डॉ.प्रदीप आवटे यांनी मला ‘मेल' केला. ते भाषण वाचून मी आंतर्बाह्य हललो. जातीअंताच्या लढाईविषयी तोवर मी कितीतरी लेखन केले होते आणि भाषणेही दिली होती. मात्र त्याचा असा जिवंत पुरावा मला सापडेल, अशी कल्पना नव्हती. ओबामा तेच बोलत होते, जे स्वप्न माझ्यासारखे कितीतरी लोक पहात होते. त्या भाषणानंतर ओबामांना मी सिरिअसली घेऊ लागलो. मग मी त्यांची पुस्तके वाचली. त्याविषयी एक लेखही ‘लोकसत्ता'त लिहिला. हा माणूस निवडून येईल का, असा प्रश्न मला पडला. ओबामांप्रमाणेच माझा भरवसाही तरुणपिढींवर होता. त्यामुळे ते जिंकणार, असे लक्षात येऊ लागले. या सगळ्याविषयी काहीतरी लिहायला हवे, असे वाटू लागले, पण म्हणजे काम करायचे, ते नीट समजेना. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अंगाने या  बदलाचा वेध घ्यावा, असे सुरुवातीला वाटले. मग एका ललित पुस्तकाचीही कल्पना डोक्यात आली. ओबामांचे चरित्र लिहावे असेही वाटले. पण काहीच मजा येईना. ओबामा जिंकोत किंवा हरोत; त्यांच्यावर लिहिले पाहिजे असे मात्र वाटत होतेच. आणि निकाल जाहीर झाला. ओबामा जिंकले. हे सारे अद्‌भुत होते, मात्र बदललेल्या जगाचा तो पुरावा होता. जग बदलले म्हणूनच ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होऊ शकले.

त्यांचे शिकागोतील विजमी भाषण मी पहात, ऐकत होतो. त्यांनी भाषण सुरू केले... ‘If there is anyone out there, who still doubts that America is a place where allthings are possible... this night is your answer! ‘  हे भाषण मी ऐकले आणि माझ्या लक्षात आले, अरे हा तर ‘मोटिव्हेशन गुरु' आहे. मग वाटले हा ‘सक्सेस पासवर्ड' आहे.बदलत्या जगात हा असा ‘ॲप्रोच'च तुम्हाला यश मिळवून देऊ शकतो. ‘व्होट बँक' आणि‘बँक बॅलन्स' यांच्या पलीकडे राजकारण असू शकते, हे ओबामांनी जगाला सांगितले. मी खरोखरच उत्तेजित झालो होतो. लिहिणे-बोलणे या फुकाच्या गोष्टी आहेत; त्यामुळे काहीच साध्य होत नाही असे वाटून, एका अर्थाने कंटाळलेल्या माझ्यासारख्या तरुणाला ओबामांच्या त्या भाषणाने नवे चैतन्य दिले. अवघ्या अमेरिकेला नवे स्वप्न देणाऱ्या ओबामांनी मलाही प्रयोजन दिले. मग ठरले, लिहायचे! पुस्तकाचे प्रारूप ठरलेले होतेच. मग वेड्यासारखा लिहीत सुटलो. मला जे जाणवले ते सगळ्यांना सांगायचे होते. संवाद करायचा होता, सर्वांशी. त्यातही तरुणांशी. माझ्या सर्वसामान्य मित्रांशी. बदलते जग कसे ‘सक्सेस फ्रेंडली'  आहे आणि ओबामासारखा, तुमच्या-आमच्यासारखा माणूस आज अमेरिकेचा अध्यक्ष कसा झाला आहे, हे सांगायचे होते. कोणतीही खोटी आशा मला द्यायची नव्हती किंवा निष्कारण ‘पॉझिटिव्हॲटिट्यूड' ही द्यायचा नव्हता. ही सकारात्मकता नव्या जगात आहे आणि ओबामा ही त्याची अभिव्यक्ती आहे, एवढेच सांगायचे होते. त्याप्रमाणे लिहीत गेलो. लिहिताना प्रकरणं वगैरेही डोक्यात नव्हती. ती नंतर झाली. ‘सो, धिस इज द स्टोरी!'

प्रश्न : हे पुस्तक मराठी वाचकांनी असे डोक्यावर का घेतले असावे?

-‘कारण तो शहाणा आहे! सर्वांना जे आवडते ते चटपटीत आणि वरवरचेच असते, असा एक समज ज्यांनी करून घेतला आहे, त्यांचा‘कॉमन मॅन'च्या या अंगभूत शहाणपणावर भरवसा नसतो. अशा हस्तिदंती मनोऱ्यातील मंडळींना या पुस्तकाने दिलेला विचार कधीच समजणार नाही. हे पुस्तक संजय आवटेंचे आहे म्हणून लोकांनी ते डोक्यावर घेतलेले नाही, कारण तसे असते तर माझी अन्य पुस्तकेही अशीच विकली जायला हवी होती. ‘मनोविकास' प्रकाशनाने या पुस्तकाची निर्मिती विलक्षण अशीच केली आहे, पण हे देखणेपण त्या विक्रीचे कारण ठरू शकत नाही. किंमत 99 रुपये आहे, हा‘मार्केटिंग'साठीचा चांगला मुद्दा असला, तरी साधारण अशीच किंमत असणारी अनेक पुस्तके वर्षानुवर्षे धूळ खात पडलेली आपण पाहतो. ओबामांविषयी लोकांना प्रचंड आकर्षण आहे हे खरे असेल, तर या विषयावरील सगळीच पुस्तके विकली जायला हवी होती! मला वाटते, या पुस्तकाचे यश हे वाचकांचे यश आहे. मराठी पुस्तकांच्या क्षेत्रातील हा इतिहास असेलच, तर तो वाचकांनी घडविला आहे. दोन महिन्यांत बारा आवृत्त्या हा चमत्कार मराठीत घडला, तो वाचकांमुळेच! कारण मराठी वाचकांनी हा विचार स्वीकारला आहे. त्यांना नवे जग समजून घ्यायचे आहे, त्यांना नव्या जगात यशस्वी व्हायचे आहे. जात-धर्म यांच्या पल्याड जाणारा बहुसांस्कृतिक विचारच त्यांना हवा आहे. दुर्दैवाने त्यांच्या अवतीभोवती असे पर्याय नाहीत. त्यामुळे नाईलाजाने ते संकुचित पर्याय निवडत असले तरी प्रत्यक्षात मात्र त्यांना असाच व्यापक पाया असणारा पर्याय हवा आहे. तो त्यांना ओबामांमध्ये दिसला. म्हणून त्यांनी पुस्तक डोक्यावर घेतले.

प्रश्न : हे पुस्तक लिहून तुम्ही नेमके काम साध्य केले?

-‘‘ऑर्कुट'वर, ‘फेसबुक'वर, ‘जी-मेल'वर ज्या प्रतिक्रिया मला मिळत आहेत, किंवा फोन, एसएमएसवरून लोक जे बोलत आहेत आणि या विषयावरील व्याख्यानांना दापोलीपासून सांगलीपर्यंत जो प्रतिसाद मिळत आहे, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे; ती म्हणजे-लोकांना आता सर्वंकष विचार हवा आहे. हा सर्वंकष विचार म्हणजे केवळ आदर्शवाद नाही. आपल्याकडील परिवर्तनवादी चळवळी जातीअंताविषयी बोलत राहिल्या; कल्याणकारी राष्ट्र आणि बहुसांस्कृतिकतेविषयी सांगत राहिल्या; सामाजिक समतेचे महत्त्व पटवत राहिल्या; पण त्या पराभूत झाल्या! कारण त्यांनी कधीच त्यांचा हा आदर्शवाद व्यवहाराशी जोडला नाही. नव्या जगाशी प्रामाणिक संवाद केला नाही. कुठल्या तरी मार्क्सच्या आणि जयप्रकाश नारायणांच्या वगैरे चष्म्मातून किंवा फुले-आंबेडकरांचे शब्द पाठ करून समतेचा विचार सांगितला गेला, कल्याणकारी राष्ट्राचा विचार मांडला गेला. मात्र तो विचार हा खऱ्या विजयाचा मंत्र आहे, हे ओबामांनी राजकारणाच्या आखाड्यात सिद्ध केले. अशा या बराक ओबामांना मी परिवर्तनवादी चळवळींच्या हातात दिले आहे. (नाहीतर अन्य अनेक घटकांनी त्याला आपल्या कामाला लावले असते!) अर्थात, स्वत:ला परिवर्तनवादी मानणारे विचारवंत एवढे परावर्तनवादी झाले आहेत की, स्वच्छ नजरेने मा प्रक्रियेकडे पाहणेही त्यांना शक्य होत नाही.

प्रश्न : तुम्हाला काय वाटते, ओबामा जग बदलेल?

-‘अजिबात नाही. बराक ओबामांकडे मी ‘व्यक्तिवादी' नजरेने अजिबात पहात नाही. उद्या ओबामा ‘पंक्चर' झाले तरी त्यामुळे माझ्या मांडणीला जराही धक्का बसणार नाही. ओबामा अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेल, असे मी म्हणतच नाही; मी असे म्हणतो आहे की जग बदलल्यामुळे ओबामा अध्यक्ष झाले आहेत. असे हे बदललेले जग आपण समजून घ्यायचे आहे. जागतिकीकरण म्हणजे फक्त अर्थशास्त्राची-तंत्रज्ञानाची शैली नाही, तर ती नवी जीवनशैली आहे!तशी ती असेल तर ती किती सृजनशील, गतीशील आणि किती सर्वव्याप्त आहे हे लक्षात घेतले पाहिजे. माहिती-तंत्रज्ञानासारख्या क्रांतीमुळे सर्वांच्या हातात प्रगतीची संधी येऊ लागलेली असताना,लोकशाही वा अर्थकारणासारख्या व्यवस्था मूठभरांच्या हातात जात असतील, तर काही बदल घडवावे लागतील. ओबामांनी हा विचार मांडला तेव्हा अमेरिकेत जागतिक मंदी होती, हे लक्षात घेतले पाहिजे. सामाजिकदृष्ट्या विषमतेची व्यवस्था अर्थकारणाच्या पातळीवरही टिकू शकत नाही, हेच त्यातून स्पष्ट झाले. त्यामुळे ओबामांचा विचार हा स्वप्नाळू प्रकार नाही. ती अर्थकारण, राजकारण यासाठीची शास्त्रशुद्ध ‘थिअरी' आहे. ग्लोबल समंजसपणातून आदर्शवादाच्या पल्याड गेलेल्या बुद्धिमान आणि प्रॅक्टिकल तरुणाईला ओबामांच्या मांडणीची अपरिहार्यता समजावी, हे मला जास्त महत्त्वाचे वाटते.

प्रश्न : भारतात ‘ओबामा' कोण असेल?

-‘हा अत्यंत निरर्थक प्रश्न आहे. असा कोणीही एक ओबामा भारतात अवतरणार नाही. ओबामा हा अवतारी पुरुष असू शकत नाही. मुळात ओबामा आज जे सांगत आहेत, ते आपल्याकडे कितीतरी जणांनी कितीतरी वर्षांपूर्वी सांगितले. ‘कल्याणकारी राष्ट्र' या संदर्भातील ओबामांची मांडणी किंवा त्यांची सर्वंकषता आपल्याकडे डॉ.आंबेडकर आणि नेहरू यांनी कितीतरी विस्ताराने विशद केली आहे, त्यामुळेच तर भारतीय लोकशाहीचा प्रयोग यशस्वी झालेला दिसत आहे. लोकशाहीच्या यशापयशाचा विचार करायचा तर भारताची व्यवस्था अमेरिकेपेक्षाही अधिक प्रगल्भ-समंजस आहे, पण तरीही काँग्रेससारखा सर्वसमावेशकता सांगणारा पक्ष उत्तरोत्तर सरंजामी होत गेला आणि भाजपसारखा मूलतत्त्ववादी पक्ष त्याला आव्हान देणारा पक्ष म्हणून पुढे आला. ‘राइज ऑफ द रेस्ट' या न्यायाने छोटे छोटे प्रादेशिक पक्ष स्वाभाविकपणे उदयाला आले आणि त्यांची एकूण शक्ती या दोन मुख्य पक्षांपेक्षाही जास्त झाली. या सगळ्या गदारोळात आपले राजकारण ‘व्होट बँक' नावाच्या गोष्टीचे गुलाम झाले. एक व्यवच्छेदक राजकीय वर्ग विकसित होत गेला. पैशांवरच राजकारण उभे राहू शकते, असा समज तयार झाला. परिणामत: भारतीय राजकारणाला झुंडशाहीचे रूप प्राप्त झालेले दिसत आहे.

ज्या तरुणांच्या हाती सत्तेची सूत्रे येत आहेत, असे आपण मानतो, ते तरुण कोण आहेत? राहुल गांधी, मिलिंद देवरा, सचिन पायलट, ज्मोतिरादित्य शिंदे, सुप्रिया सुळे, ओमर अब्दुल्ला.... जीवनाची सगळी क्षेत्रे सर्वांसाठी खुली असताना राजकारणाने मात्र सगळे दरवाजे बंद करून घेतले आहेत. अमेरिकेत तीन-साडेतीन वर्षे लोक अगदी नॉन-सिरिअस विषयांवर हव्या त्या गप्पा मारतात; पण निवडणुकीच्या रिंगणात मात्र मूलभूत विषयांवर चर्चा झडतात. आपल्याकडे एरव्ही आपण फार सिरिअस-लंब्या-चौड्या गोष्टी करीत असतो; मात्र निवडणूक जवळ आली रे आली की एवढ्या सुमार आणि गल्लाभरू गोष्टी सुरू होतात की निवडणूक म्हणजे रेड्यांची टक्कर वाटावी! यातून आपल्या राजकारणाचे अध:पतन झाले आहे. या पार्श्वभूमीवर ओबामांच्या राजकारणाकडे पाहिले पाहिजे. हा विचार घेऊन राजकीय प्रक्रियेत उतरणे तरी भारतात शक्य आहे का, हा खरा मुद्दा आहे.

पंधराव्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा आता जाहीर झाल्या आहेत.‘व्होट बँक'च्या पलीकडे जाऊन मतदारांना आकृष्ट करणे भारतात शक्य आहे का, हा मुद्दा आहे. कोणत्याही वृथा भावनिक विषयांना हात न घालता ‘अजेंडा' या केंद्रबिंदूंभोवती निवडणूक होणे शक्य आहे का, हा प्रश्न आहे. भारताला ओबामा हवा तो या अंगाने, म्हणून आपल्याला 545 ओबामा हवे आहेत.

प्रश्न : ओबामांच्या विजयामुळे भारतातील दलित, शोषितांच्या चळवळीला प्रेरणा मिळेल काय?

-‘नक्कीच! ओबामांनी अब्राहम लिंकन यांच्या बायबलवर हात ठेवून शपथ घेतली. कारण ते लिंकन यांच्या खांद्यावर उभे आहेत. लिंकनच काम, मार्टिन ल्मूथर किंग, जेसी जॅसन यांच्याही खांद्यावर ते उभे आहेत. प्रत्यक्षात यापैकी कोणीही तत्त्वज्ञान या अर्थाने काही विकसित केलेले नाही. आपल्याकडे फुले-आंबेडकरांनी तत्त्वज्ञान उभे केले हे खरे; पण त्यांच्या खांद्यावर एकही राजकीय नेतृत्व उभे नाही.ओबामांचा विजय हा फुले-आंबेडकरांच्या विचारांचाच विजय आहे.मात्र आमची दलित चळवळ या विचारांपासून कितीतरी कोस दूर गेली आहे. त्यामुळे यापैकी कोणालाही ओबामांशी नाते सांगता येणार नाही.दलित-शोषित चळवळीची फेरमांडणी करून ‘व्होट बँक'च्या पल्याडचे राजकारण यशस्वी होऊ शकते, हे ज्याला समजेल, त्याला ओबामांचा विजय खऱ्या अर्थाने समजेल. ‘बदला' वा ‘मोबदला' म्हणून राजकीय प्रक्रियेकडे आजवर पाहणाऱ्यांना त्याच्या पुढे असणारा ‘बदल' त्यामुळे दिसणार आहे. आंबेडकरांचे नाव घेऊन जातींचेच राजकारण होणार असेल किंवा ‘सोशल इंजिनिअरिंग'च्या नावाखाली तत्त्वशून्य-नफेखोरीचे निर्लज्ज सत्ताकारण रंगणार असेल, तर उपमोग काय? राज ठाकरे यांच्यासारखा नेता संकुचित-टोकदार भूमिका घेऊन उभा राहतो आणि तरुणांचा त्याला काही प्रमाणात पाठिंबाही मिळतो, हे आपण पाहतो. ही सगळी ‘स्पेस' अशा राजकारणाला उपलब्ध झाली ती काँग्रेसच्या सत्तालोलुप सरंजामी राजकारणामुळे, समाजवादी-सामीवाद्यांच्या भंपकपणामुळे आणि दलित चळवळीच्या तत्त्वशून्यतेमुळे!

शिवाय, त्याला आणखी एक परिमाण आहे. आजवर आपल्या राजकीय नेत्यांनी तरुणांना गृहीत धरले. त्यांना ‘ॲड्रेस' केले नाही.त्यामुळे राजसारखे नेते आज त्यांना आकृष्ट करू शकतात. दलित राजकारणाला ओबामांच्या निमित्ताने फेरमांडणी करण्याची इच्छा झाली आणि आंबेडकरांच्या मूळ विचारांकडे परतण्याची आस निर्माण झाली, तर ते आश्वासक ठरेल. भारतीय राजकारणाची शैली बदलली पाहिजे, असे वाटणाऱ्यांसाठी ओबामांचे प्रारूप हा एक पर्याय असू शकतो!आरक्षणाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी, इतिहासाकडे बघण्याची पद्धत, मुस्लिम जगाशी संवाद साधण्याची शैली, कॉर्पोरेट लॉबीला सामाजिक भान देणारी वक्तव्ये, वंशभेदा विषयाची भूमिका, अर्थकारणाविषयीची मते यातून जे ओबामा दिसतात, ते बदलत्या संदर्भात अधिक महत्त्वाचे. आपल्या राजकारणाने शिकावे, असे ओबामांकडे बरेच काही आहे! खरेम्हणजे, हे सगळे आपल्याकडे आहे. त्या मुल्यांची नेहरू ही अभिव्यक्ती होती. नेहरूंनी मांडलेले भारताचे स्वप्न फार वेगळे नव्हते.(भारतीय राजकारणाचे वैशिष्ट्य असे की, आजही भाजपसारख्या पक्षालासुद्धा त्यांचा छुपा अजेंडा जाहीरपणे मांडून निवडणूक जिंकता येत नाही किंवा त्या अर्थाने धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेला विरोध करता येत नाही.) मात्र आज आपण अशा वळणावर आहोत की आपल्या राजकीय प्रक्रियेला या स्वप्नाचा गंधही नाही. म्हणून समकालीन ओबामांकडे पहायला हवे.

प्रश्न : या पुस्तकासाठी कोणाकोणाचा हातभार लागला?

-‘अनेकांचे हात! पण ‘मनोविकास' प्रकाशनाचे अरविंद आणि आशिश पाटकर यांना मी संपूर्ण गुण देऊ इच्छितो. हा विषय मी सांगताच ज्या पद्धतीने त्यांनी ‘व्हिज्युअलाइज' केला आणि त्याची निर्मिती केली, ती पद्धत असामान्य होती. गिरीश सहस्रबुद्धे यांचे मुखपृष्ठ तर एवढे सुंदर आहे की, माझा कोणताही वाचक मुखपृष्ठाविषयी बोलल्याशिवाय राहूच शकत नाही. या पुस्तकाची मुद्रणप्रत तयार करणाऱ्या आणि प्रसंगी डीकटेशन्स घेणाऱ्या स्मिता पाटील-वळसंगकर, प्रीती अवचार; संदर्भ मिळवून देणाऱ्या वैशाली चिटणीस आणि मुख्य म्हणजे ज्यांच्यामुळे मला बदलत्या जगाविषयी आणखी औत्सुक्य निर्माण झाले ते कुमार केतकर, अरुण साधू, डॉ.प्रदीप आवटे, कमलेश वालावलकर. खरे म्हणजे या प्रश्नाचे उत्तरच देता येणार नाही, एवढे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हात कोणत्याही प्रकल्पासाठी उपयुक्त ठरत असतात. तरुण मित्र-मैत्रिणींशी असणारा अव्याहत ‘डायलॉग' हे तर माझ्या अवघ्या लेखनाचेच बळ. ... त्यामुळे अशा अनेक गोष्टी.

प्रश्न : बदलत्या जगातील तरुणाईला काय सांगाल?

-‘ज्ञात मानवी इतिहासाचा विचार करता, हा सर्वश्रेष्ठ आणि सर्वांचा कालखंड आहे. आपण सर्वजण एका ‘ग्रेट' जगात जगत आहोत... सो!गो अहेड... धिस इज अवर टाइम!

Tags: मनोविकास प्रकाशन बराक ओबामा बराक ओबामा :बदलत्या जगाचा 'सक्सेस पासवर्ड संजय आवटे मुलाखत interview manovikas prakashan barak obama sunjay awate weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संजय आवटे
sunjaysawate@gmail.com

पत्रकार 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके