डिजिटल अर्काईव्ह

पत्रकारिता मला फारच शक्तिशाली शस्त्र वाटतं!

मी लहान होते तेव्हा मला वाटायचं की, मला जग बदलून टाकायचंय. इथं इतकी खोलावर रूजलेली पितृसत्ता आहे. इतकी गरिबी, अशिक्षितपणा आहे. मला चमत्कार घडवून सगळं बदलून टाकायचंय असं वाटायचं. पण जसजशी मोठी होऊ लागले तसतसे लक्षात आले की, आपण काही जग बदलू शकत नाही. लहानपणीचा भाबडेपणा सरला होता. त्याचवेळी हेही कळत होतं की, तुम्ही लोकांचे प्रश्न तर मांडू शकता. काही मुद्यांना घेऊन आवाज तर उठवूच शकता. अर्थात मास कम्युनिकेशन्स शिकत होते तरी पत्रकारितेचा विचार पक्का नव्हता.

जानेवारी 2022 च्या पहिल्याच तारखेला ज्या शंभरहून अधिक मुस्लिम महिलांची झोप उडाली त्यातलं एक नाव होतं इस्मत आरा. ‘बुल्ली बाई’ नावाच्या एका ॲपवर तिचा फोटो आणि त्यावर लिहिलेलं होतं ‘युवर बुल्ली बाई ऑफ द डे ॲट इस्मत आरा.’ त्या ॲपवर तिचा ऑनलाईन लिलाव सुरू होता. या ॲपवर राजकीय-सामाजिक-पत्रकारिता क्षेत्रात स्वत:ला असर्ट करणाऱ्या तिच्यासारख्याच मुस्लिम महिलांचे फोटो आणि टि्वटर हॅन्डलची लिंक होती. हा प्रकार जरी ऑनलाईन असला तरी कुणाही स्त्रीसाठी तो भीतीदायक आणि किळसवाणा होता. या हीन कृतीला वाचा फुटली ती तिच्या टि्वटमुळं. ऑनलाईन संघटित ट्रोलिंगला भीक न घालता तिनंच पुढाकार घेऊन पोलिसांकडे पहिली तक्रार केली. इस्मत आरा. तरुण पत्रकार. सांप्रदायिकीकरण, लिंगभेद, शिक्षण, गुन्हेगारी अशा विविध विषयांमध्ये रिपोर्टिंग करत तिनं अल्पावधीतच पत्रकारितेत आपला वेगळा ठसा उमटवलाय.

तसं पाहता सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात तिचा जन्म झाला. मात्र स्वबळावर परंपरांच्या गुंत्यांतून स्वत:चा पाय अलगद सोडवून घेणारी ती आजची तरुणी आहे. तिच्या कुटुंबात शिक्षणाची फारशी पार्श्वभूमी नव्हती. नातेवाईक कुटुंबात मुस्लिम रहनसहनच्या पारंपरिक चालीरिती आणि बंधनं होती. ज्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम आणि प्रभाव तिच्याही कुटुंबात होताच. पण लहानपणापासूनच तिला वाचन-लेखनाची आवड होती आणि याच आवडीतून तिची स्वत:विषयीची समज वाढत गेली. प्रवाहात वाहत राहायचं नाहीये आणि आपली वेगळी वाट शोधायचीय याची जाणिव तिला हळूहळू होत गेली. पुढं तिनं जामिया मिलीया इस्लामिया या विद्यापीठातून मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझम या विषयात शिक्षण पूर्ण केलं. अल जझिरा, टाईम मॅगझीन, द वायर, हफिंग्टन पोस्ट, द क्विंट, न्यूज 18, फस्ट पोस्ट, बीबीसी हिंदी, न्यूज लाँड्री, ऑक्सफॅम इंडिया, द हिंदू या जगभरातील महत्त्वाच्या नियतकालिकांमध्ये तिच्या बायलाईन्स झळकल्या आहेत.

सध्या शोधपत्रिकारितेची वाट ती चोखाळत आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमे हाताळत नाहीत अशा विषयांवरील लेखनासाठी तिची ओळख आहे. जुलै 2022 मध्ये तिला इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिलच्या वतीने दिला जाणारा ‘ह्युमन राईटस रिलिजीयस फ्रीडम यंग जर्नलिस्ट’ पुरस्कार मिळाला आहे. पत्रकारितेची पार्श्वभूमी नसलेल्या मुस्लिम कुटुंबातून पुढं आलेल्या इस्मतशी मारलेल्या या गप्पा तिच्या आसपासच्या जगाविषयीचं तिचं संवेदनक्षम भान अधोरेखित करतं.

प्रश्न - तुझ्या कामातलं वैविध्य जाणून घेण्याआधी तुझ्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. तुझ्या कुटुंबाची सामाजिक-सांस्कृतिक घडण कशी होती आणि तुझा त्या सगळ्यातला वावर कसा होता?

- बिहारमधील दरभंगा या ठिकाणी माझा जन्म झाला. आम्ही तीन बहिणी. त्यावेळेस वडील दिल्लीत नोकरी करत होते आणि आम्ही दरभंगामध्ये होतो. माझे वडील बी.कॉम झालेत आणि आईनंदेखील पदवीपर्यंत शिक्षण घेतलंय. ते शिक्षण घ्यायचं म्हणून घेतलेलं. बिहारमधल्या छोट्याशा गावातलं ते शिक्षण. हां म्हणजे म्हटलं तर मी शिक्षित कुटुंबातून आलीये, पण घरात काही तसं सुशिक्षित सुधारणावादी वातावरण होतं असंही म्हणता येणार नाही.

माझी आई महत्त्वाकांक्षी स्त्री होती. अर्थात हे मी आज विचार करते तेव्हा लक्षात येतं. माझ्या आईला वाटत होतं की, आम्ही इंग्रजीतून शिक्षण घ्यावं. त्यासाठी गावात सोय नव्हती. त्यामुळं तिनंच दिल्लीत यायचा निर्णय घेतला. इथं आमचा कॅनवास वाढला. लिहायला मला खूप आधीपासूनच आवडत होतं. मी अगदी तिसरीत होते तेव्हापासून डायरी लिहायला लागले. रोजच काही तरी खरडायचे. त्या दिवसांमध्ये मला एकटं, अलिप्त राहायला आवडायचं. त्यामुळं मी डायरी लिहू लागले. त्यावेळी मी फारसं कुणाशी बोलायचेही नाही. मग इतरांशी जे बोलता यायचं नाही ते सगळं माझ्या डायरीत असायचं. त्यावेळेस फार कळत नव्हतं. मात्र आता लक्षात येतं, लिहिणं ही ‘हिलींग’ प्रक्रिया होती. एक तऱ्हेनं तुमचा सर्जनशील निचरा व्हायचा. हळूहळू पुस्तकांशी ओळख झाली. वाचन वाढलं. इंग्रजी पुस्तकंही वाचू लागले. त्यातून आईला हवं तसं इंग्रजीचं चांगलं भान येऊ लागलं.

मी तशी अत्यंत टिपिकल मुस्लिम कुटुंबातून आले. शिक्षण घेण्याबाबतचं गांभीर्य अजूनही माझ्या नातेवाईकांमध्ये नाहीये. मुलींबाबत तर अजिबातच नाही. उलट लवकरात लवकर लग्नं लावून देणं अशा गोष्टींना प्राधान्य दिलं जातं. यावरून तुला अंदाज येईल मला काय म्हणायचंय. सुदैवानं माझ्या घरच्यांनी शिक्षणाबाबत कधीच अडवणूक केली नाही. अभ्यासात हुशार आहे, चांगले मार्क्स मिळताहेत तर शिकत रहा. त्यांनीही सजग मनानं शिकवलं असं नाही, मात्र त्यात आडकाठीही आणली नाही. पुढं नोकरी करू देतील की नाही, याबाबत साशंकता होतीच. कारण त्यांचा याबाबतचा कुठलाही पक्का विचार समोर नव्हता. अशातच मग जामिया मिलीया इस्लामियामधून मास कम्युनिकेशन्स ॲन्ड जर्नालिझममधून एम.ए. केलं. मग नोकरीची वेळ आली तेव्हाही ते कुठल्याही पालकांप्रमाणे थोडे प्रोटेक्टिव्ह होते. पत्रकारितेचं फिल्ड. एकटी कशी फिरणार? एकटी कशी जाणार? अशा भावना त्यांच्या मनात होत्या. पण पुढं काम करू लागले. मग आई-वडिलांनाही वाटू लागलं, ‘आपली मुलगी काही तरी करतीये, मन लावून करतीये, कष्ट घेतीय. त्या कामातून खूश असते.’ मग त्यांचा आपोआप विश्वास वाढला. आता त्यांचा आधीपेक्षा जास्त पाठिंबा आहे. मात्र हेही खरंय की, आमच्या कुटुंबात (नजीकचे नातेवाईक) मुलींची लग्न लवकर लावून देण्यावर भर असतो. त्यासारखे प्रश्न अधूनमधून उपस्थित होतात. पण ठीक यार, असं एकेक करूनच तुम्ही वरची पायरी चढत असता म्हणा. आपल्या भोवतीची बंधनं अशीच हळूहळू सैल करता. 

प्रश्न - आपण पत्रकार व्हावं असं कधी वाटलं तुला? त्या मागची काय प्रेरणा होती?

- मी लहान होते तेव्हा मला वाटायचं की, मला जग बदलून टाकायचंय. इथं इतकी खोलवर रूजलेली पितृसत्ता आहे. इतकी गरिबी, अशिक्षितपणा आहे. मला चमत्कार घडवून सगळं बदलून टाकायचंय असं वाटायचं. पण जसजशी मोठी होऊ लागले तसतसे लक्षात आले की, आपण काही जग बदलू शकत नाही. लहानपणीचा भाबडेपणा सरला होता. त्याचवेळी हेही कळत होतं की, तुम्ही लोकांचे प्रश्न तर मांडू शकता. काही मुद्यांना घेऊन आवाज तर उठवूच शकता. अर्थात मास कम्युनिकेशन्स शिकत होते, तरी पत्रकारितेचा विचार पक्का नव्हता. मग शिकत असताना एका मित्रानं मला सांगितलं की, ‘तू पत्रकारितेत रिपोर्टिंगचा अनुभव घे. कुठं तरी इंटर्नशीप कर. तुला लोकांशी बोलायला शिकता येईल.’ मी ‘द हिंदू’मध्ये इंटर्नशीप सुरू केली. त्या दिवसांत पत्रकार गौरी लंकेशचा खून झाला होता. त्याची फॉलोअप स्टोरी मला करायला सांगितली. लंकेश यांच्या खुनासंदर्भातल्या बातम्या करताना मनात हाही विचार येत होता की, ‘आपण योग्य करतोय ना. हे फिल्ड इतकं भीतीदायक आहे का? आपल्याला जे म्हणायचं आहे त्याची किंमत जीवानं द्यावं लागेल का?’ मन अस्थिर करणारे असे विचार तात्कालिक असायचे. थोड्याच दिवसांत मला त्या कामातली नशा जाणवू लागली. मी फिल्डवर असले की मला सगळ्या जगाचा विसर पडतो... मी खूप सहजपणे तिथं वावरू शकतेय, हे मला त्या दिवसांमध्ये जाणवलं. ग्राऊंडवर काम करणं मला आवडतंय हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं.

प्रश्न - आणि रिपोर्टिंगमधल्या विषयांबाबत जागरूक असावं हा विचार कसा विकसित झाला?

- मी ग्राऊंडवर जाऊ लागले तेव्हा लक्षात आलं की, खूप साऱ्या गोष्टी या मुख्य माध्यमांत (मेनस्ट्रिम माध्यमात) दिसतच नाहीत. काही माध्यमंदेखील तथ्यांची मांडणी करताना महत्त्वाचेच धागेदोरे अर्धवट सोडून देतायेत. रिपोर्ताजमध्ये चुका दिसतायेत. हे बघून अस्वस्थता येऊ लागली. रेपसारख्या विषयांवरील रिपोर्ताजदेखील असंवेदनशीलपणे हाताळलेले पाहिले, तेव्हा तर विचारूच नको. बऱ्याचदा त्याची मांडणी करताना महिलांवरच प्रश्न उपस्थित केलेले दिसू लागले. मला आठवतंय, कठुआ बलात्काराच्या घटनेत एका दैनिकानं त्या पीडितेचा तर थेट पत्ताच छापला होता. थोडक्यात अशा प्रकारच्या चुकांचा त्रास होऊ लागला. अर्धवट सत्य सांगणं, स्वत:चे नॅरेटिव्ह रेटणं या प्रकाराने त्रास होऊ लागला. असं काम करायचं नाहीये हे तर उघडच होतं. शिवाय किती तरी मुद्दे सुटलेले असायचे. फिल्डवर अनेक प्रकारचे मुस्लिम प्रश्नही बघत होते. लोकांचे प्रश्न फिल्डवरच समजू शकतात, याचं भान येऊ लागलं. त्यासाठी मोठीच काही घटना किंवा ग्राऊंडवर अगदी निषेध होणारेच मुद्दे असायला हवेत असं नाही. अगदी तुम्ही एखाद्या ऑटो रिक्षावाल्याशी बोलाल तरी त्यांच्या समस्या कळतात. कुणाही सामान्य लोकांच्या स्वत:च्या स्टोरीज असतात. मात्र हे सर्व विषय मेनस्ट्रीममध्ये दिसत नव्हते. त्यामुळं माझा प्रयत्न हाच राहिलाय की, ज्या लोकांचे प्रश्न येत नाहीत ते आपण मांडायचं. तीच पत्रकारिता करायची.

उदाहरणादाखल सांगते, मध्यंतरी मुलींच्या मदरसांसंदर्भात मी एक स्टोरी केली. मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारची एक योजना आहे. त्याअंतर्गत मदरशांमध्ये आधुनिक शिक्षण आणण्याचा प्रयत्न केला जाई. त्यासाठी वेगळा निधी मिळायचा. ही योजना साधारण 1990 मध्ये सुरू झाली. जेव्हा सुरू झाली तेव्हा तिचं नीट नियमन केलं गेलं. मात्र आज या योजनेअंतर्गत नियुक्त केलेल्या शिक्षकांची दुरवस्था झालीये. मागच्या पाच-सहा वर्षांपासून त्यांचे पगारच झालेले नाहीत. या स्टोरीचा मुद्दा संसदेतही उचलला गेला. तर अशा काही स्टोरीजमधून वेगळं समाधानही मिळतं. कुणीही हात लावत नाहीत असे विषय तुम्ही हाताळता आणि त्याची दखल घेतली जाते, तेव्हा त्यातूनही काम करत राहण्याची प्रेरणा मिळत राहते.

पत्रकारिता माझ्यासाठी एक साधन आहे. समाजात बदल घडवून आणण्यासाठी पत्रकारिता/माध्यमं ही मला फारच शक्तिशाली शस्त्रं वाटतात. त्यामुळं माझा प्रयत्न हाच असतो की, आपल्या बातम्यांचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे प्रभाव निर्माण व्हावा. त्याचा छोटासा तरी परिणाम व्हावा. कोविड काळातली एक स्टोरी सांगते. त्या दिवसांत बऱ्याच लोकांचे रोजगार गेले होते. मी त्यावेळेस वाराणसीत होते. बनारसी साडी विणण्याचा पारंपरिक व्यवसाय असणाऱ्या मोहल्ल्यात फिरत होते. विणकरांचे काम सुटलेले होते. त्या विणकारांना मजुरी करणं हे कमीपणाचं वाटत होतं. खानदानी व्यवसाय सोडून हे काम कसं करणार, अशी त्यांची भावना. मात्र त्याचा परिणाम वेगळा होता. अगदी आठ-दहा वर्षांची मुलं चहाविक्रीचा किंवा कुठला तरी छोटामोठा व्यवसाय करत होती. त्या दिवसांत बालकामगारांचं प्रमाणही खूप वाढलं होतं. ही न्यूजस्टोरी प्रसिद्ध झाली, तेव्हा तिथल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणानं पुढाकार घेऊन तिथल्या भागात पालक-मुलांचं समुपदेशन केलं. माझ्यासाठी ही मोठी गोष्ट होती. लगेच सगळं बदलेलं असं नव्हे, मात्र त्या समुपदेशनातून दोन मुलांचे पालकही समजू शकले तर ते महत्त्वाचंच आहे. दरवेळेस काही तरी फार मोठाच परिणाम घडावं असं नाही आणि दृश्य स्वरूपातलंच काही तरी बदलावं असंही नाही. मात्र आपल्या कामातून काही तरी होत राहिलं पाहिजे.

प्रश्न - ‘फेमिनिझम इन इंडिया’सारख्या प्लॅट-फॉर्मवर तू स्त्रीवादी दृष्टिकोनातून लेखन करतेस. लिंगसमानतेचा पुरस्कार करणारे विषय समाजात नेण्याचा प्रयत्न करतेस. तुला तुझ्या व्यवसायात हीच लिंगसमानता किती दिसते, पत्रकारितेच्या व्यवसायातही भेदभावाचा अनुभव येतो का?

- इथं सगळं आलबेल आहे, असं माननं स्वप्नाळू ठरेल. बाहेरून हे क्षेत्र लिबरल आहे असं दिसत राहतं. मात्र प्रत्यक्षात ते दिसतं तसंं नाहीये. पण तरीही मला वाटतं, मी ज्या काळात पत्रकारितेत शिरलेय त्याआधी बऱ्याच जणींनी संघर्ष करून आमची वाट थोडी मोकळी करून दिलीये. असाईनमेंटस किंवा काम देण्याबाबत एक मूळचा पूर्वग्रह अजूनही दिसतो. पण पूर्वीपेक्षा नक्कीच कमी झालाय. रिपोर्टींगमध्ये भेदभाव हा भाग काही फक्त पुरुष सहकाऱ्यांकडून होतो असं नाही. मला आठवतंय, मी एकदा एका वरिष्ठ पत्रकार महिलेशी बोलत होते. त्यांना सांगत होते की, मला क्राईम बीट करायचं आहे. तर त्या झटकन म्हणाल्या, ‘मुलींनी हे बीट करावं असं मला वाटत नाही. सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो.’ मला काही हा मुद्दा फारसा पटला नाही. उलट मला काही वेळा तुमचं महिला असणं हे वेगळ्या अर्थानं फायद्याचं वाटतं. एखादा गुन्हा घडला, हॉस्पिटलमध्ये गुन्हेगार किंवा पीडित असेल तर तुम्ही त्यांच्या कुटुंबापर्यंत सहज पोहोचता. त्या कुटुंबातल्या स्त्रिया पुरुष पत्रकारांपेक्षा महिला पत्रकारांशी मोकळेपणानं बोलतात. तुम्हाला ‘ॲक्सेस’ मिळतो आणि तो महिला म्हणून मिळतो हेही नाकारता येणार नाही. गावखेड्यांतल्या बायकांसोबत थेट त्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत जायची संधी तुम्हाला मिळते. महिला संवेदनशील असतात, त्या समोरच्या व्यक्तीच्या भावना नीट समजून घेऊ शकतात. त्यामुळं त्यांच्याशी स्टोरीपल्याड खोलवर संवाद साधणं सहज जमतं. आता हा विश्वास पुरुषांना मिळत नाही, तर त्याला काय म्हणायचं!

पूर्वी खूप काळापर्यंत स्त्रियांना सांस्कृतिक पद्धतीच्या बातमीदारीत अडकवलं गेलंय. किंवा फारशी गुंतागुंत नसणारे विषय. ज्याला आम्ही सॉफ्टस्टोरीज म्हणतो. सॉफ्ट स्टोरी महत्त्वाच्या नसतात असं मी म्हणत नाहीये. त्याही तितक्याच आवश्यक असतात, मात्र ते विषय महिलांचेच असा स्टिरियोटाईप होताच. त्यांच्याकडे शासन, मंत्रालय, पायाभूत सुविधा, राजकारण हे विषय येत नव्हते. आता मात्र मुली स्वत: त्यात घुसघोरी करतात. स्वत:ला सिद्ध करतात. आता हाथरसमध्ये झालेल्या बलात्काराचीच घटना बघ. त्या घटनेच्या वार्तांकनाचा केस स्टडीसारखा अभ्यास केला तर लक्षात येईल की, सहा-सात महिला पत्रकारांनी तो विषय किती लावून धरला. या पत्रकारांनी जास्त चांगलं कव्हरेज दिलं. दिवस-रात्र कष्ट घेऊन त्यांनी त्या विषयाच्या खोलात जाऊन रिपोर्टिंग केलं. परिणामी तिथल्या सरकारला झुकावं लागलं. म्हणावं लागलं की, पीडितेचा मृतदेह रात्रीतून घाईत जाळायला नको होता, ही चूक झाली.

थोडक्यात काय तर रिपोर्टींग हे काम आहे. ते कुणीही करू शकतं, हे आता हळूहळू रुजू लागलंय. माध्यमांमध्ये तशा तऱ्हेचा, बदल दिसू लागलाय. मी स्वत:ला भाग्यवान समजते की मला पूर्वीसारखा संघर्ष नाही; तर बदलत्या काळात आणि बदलासाठी खुल्या असणाऱ्या काळात मी या क्षेत्रात आहे.

प्रश्न - तू आत्ता हाथरसच्या घटनेचा उल्लेख केलास आणि याच घटनेच्या वार्तांकनासाठी तुला ‘लाडली मीडिया ॲवार्ड’ मिळाला होता. त्या घटनेचं वार्तांकन हे रुटीन नव्हतं. तू त्यासाठी वेगळं खोदकाम केलं होतं. या प्रकारच्या शोधपत्रकारितेत धोके फार असतात. त्यात अलीकडे तर पत्रकारांना तुरूंगात डांबण्याचा प्रकार जास्त दिसतोय, विशेष करून तुम्ही अल्पसंख्यांक असता तेव्हा. या परिस्थितीत शोधपत्रकारितेकडं तू कसं पाहतेस? तुझा दृष्टिकोन काय आहे?

- शोधपत्रकारिता हा लोकशाहीचा महत्त्वाचा घटक आहे. शोधपत्रकारिता होत राहिली तरच शासन स्वत:चा आरसा बघू शकेल. अन्यथा कुठलंही सरकार स्वत:कडे बघू इच्छित नसतं. मात्र कुणी तरी त्यांना आरसा दाखवत असेल तर त्यांच्या कामावरही लक्ष आहे, आपण काहीही अंधाधुंद करू शकत नाही, ही जाणीव त्यांना असायलाच हवी. आपण जे बोलतोय ते अंधपणे कुणी फॉलो करत नाहीये तर त्यावर लक्ष आहे, त्याची पडताळणी होतेय, या प्रकारचं दडपण शासनाच्या मनात असायलाच हवं. आजचा काळ नॅरेटिव्हचा आहे. लहानशी घटना घडली तरी त्याचे दोन-तीन नॅरेटिव्हज बनवले जातात. हाथरसमध्येच बघ, मुलीच्या घरचे म्हणत होते गँगरेप झालाय. मुलाच्या कुटुंबातील लोक म्हणत होते, मुलीच्या कुटुंबीयांनीच तिला मारलं. पोलिस म्हणत होते, ‘इकडं रेपच झाला नाही.’ एकाच वेळी अनेक नॅरेटिव्हज बनत होते. याच घटनेच्या तीन-चार कहाण्या. पत्रकाराचं कामच आहे, सगळ्या व्हर्जन्स समोर ठेवून त्यातून तथ्याचा शोध घेणं. त्यातून घटनेची स्पष्टता शोधणं.

अशा प्रकारच्या शोधपत्रकारितेला सर्वच काळात धोके होते. सरकारला प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तींना धोका आहेच. पण सरकारचं प्यादं बनून राहून तुम्ही त्यांना आरसा दाखवू शकत नाही.

प्रश्न - दिल्ली दंगल, सीएएविरोधीचं आंदोलन, शेतकरी आंदोलन- अशा मोठ्या घटनांचे रिपोर्टिंग करताना काही वेगळे अनुभव आले का?

- हो. दिल्ली दंगलीचा अनुभव तर फारच भयावह होता. दिल्ली दंगल सुरू झाली तेव्हा मी नॉर्थइस्ट दिल्लीतल्या मौजपूर इलाक्यात होते. दंगल सुरू होताच अल्पावधीत वातावरण खूप खराब झालंय, याची कल्पना नव्हती. मी तर फ्रिलान्सर रिपोर्टर म्हणून गेले होते. त्यामुळं मला कुणी काही सांगितलेलं नव्हतं की, कसं कव्हर करायचंय, काळजी कशी घ्यायचीये. काहीच कल्पना नव्हती. बरं मी फ्रिलान्सर म्हटल्यावर कंपनीचीसुद्धा काही जबाबदारी नसते. तिथं काही झालं तर कोण उत्तर देणार. पण अशा वेळीच लक्षात येतं की, पत्रकारांच्या सुरक्षेचा या दृष्टीनं विचारही केलेला नसतो. असो. तर मी तिथं जाऊन लोकांशी बोलत होते. काय झालं, काय चाललंय हे विचारत होते. एक माणूस हसत हसत खिजवत उत्तरला, ‘सबकुछ हो रहा है. यहाँ सबकुछ हो रहा है, जाओ जाके देखो.’ मी पाहिलं पेट्रोल पंप, टायर जळताहेत. मी मौजपूरच्या एका लेनसमोर उभी होते. तिथं एक छोटीशी व्हॅन आली आणि त्यातून एक माणूस उतरला. त्यानं माईकवरून घोषणा केली की, कोई मुल्ला बचना नहीं चाहिए. ते ऐकून मी घाबरलेच. मुळातच असं होतं की, दंगल करणाऱ्यांच्या रडारवर रिपोर्टर होतेच. पत्रकारांवर हल्ला सुरूच होता. 

त्यातच मला पहिल्यांदा असं जाणवलं की, ज्या शहरात मी शिकले व वाढले, त्याच शहरानं आज माझं मुस्लिम असणं ठळक केलं. तिथंच मला धोका निर्माण झालाय. मी पत्रकार तर होतेच, पण तेवढीच नव्हते. तोवर मला ना माझ्या मुस्लिम असण्याच्या जाणिवेनं अस्वस्थ केलं, ना मी मुलगी असल्याच्या. माझी ओळख यांना पटली तर काय या विचाराने माझा थरकाप उडाला. एकूणच वातावरण फारच भयंकर दिसत होतं. दंगेखोरांची एक टोळी समोर उभीच होती. काय ते समजून मी चालू लागले. ते लोकही माझा पाठलाग करू लागले. दोन-तीनदा मला त्यांनी विचारलं, ‘कुठं आली होती. कुठं चाललीस.’ त्या वेळेस मी खोटंच उत्तर दिलं की, ‘इथं एका मैत्रिणीला भेटायला आले होते. मला कल्पना नव्हती इथलं वातावरण इतकं खराब आहे.’ मी फार जास्त न बोलता चालतच राहिले. त्या पूर्ण दहशतीच्या माहोलमध्ये माझ्या डोक्यात आणखी एक गोष्ट फिरत होती, ती म्हणजे माझं आयकार्ड. माझं आयकार्ड मी कुठं ठेवलंय याचा मी विचार करू लागले. कसंही करून मला माझ्या बॅगेच्या तळात आयकार्ड ढकलायचं होतं, कारण आयकार्ड जर त्यांच्या हातात पडलं तर... माझं नाव आणि... पुढचं काही मी कल्पनाही करू शकत नव्हते. 

थोडं अंतर गेल्यावर काही बायकांचा एक ग्रुप उभा होता. मी पटकन त्यांच्याकडे गेले. त्यांना सांगितलं की मागून काही जण माझा पाठलाग करत आहेत. मला त्या बायकांनी तिथून बाहेर पडायला मदत केली. त्या सगळ्या  हिंदू होत्या. ‘चलो चलो इसको छोडो. इसको जाने दों.’ कशीबशी मी तिथून पळाले. पळतच सुटले. पुढं किती तरी दिवस या घटनांचा माझ्या मनावर परिणाम झाला होता. मानसिक दृष्ट्या खूप हलले होते. भीती अशी रूतून बसली होती. स्वप्नंदेखील तशीच यायची. दरवाजावर कुणी लाठ्या मारतंय असा भास व्हायचा.

सीएएविरूद्ध आंदोलन किंवा शेतकरी आंदोलनात एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की भडकाऊ, फुटिरतावादाचे नॅरेटिव्हज मांडणाऱ्या माध्यमांना आंदोलनकर्त्यांनी जवळपास भटकू दिलं नाही. ‘तुम्ही गोदी मीडिया चॅनेल आहात, आम्हाला तुमच्याशी बोलायचं नाहीये’ अशी स्पष्ट भूमिका घेतली. आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला. त्या माध्यमांनी आत्मपरीक्षण करण्यास ही महत्त्वाची गोष्ट आहे.

प्रश्न - तू आत्ता भीतीविषयी बोललीस... तुझी या वर्षाची सुरुवातही अशीच काहीशी झाली. बुल्ली बाई ॲपवर फोटो आणि लिलावाचा प्रकार. तो प्रकार समोर आल्यावर तुझ्या पहिल्या भावना काय होत्या? पुढं तू जाणीवपूर्वक काय पाऊल उचललंस?

- सकाळी उठले आणि मला तो प्रकार दिसला तेव्हा माझी अगदी पहिली भावना प्रचंड संताप अशीच होती. मला मुळीच धक्का बसला नव्हता. यापूर्वीही हा प्रकार घडला होताच. नवीन काही घडलं नव्हतं. पण तरीही नवीन वर्षाची सुरूवात अशी व्हावी या गोष्टीनं चीडचीड होतच होती. यार एक तर त्यापूर्वी दोन वर्षे कोविडचा काळ राहिला होता. या दोन वर्षात देशात किती आणि कशाकशा प्रकारे विनाश झालाय, आरोग्य व्यवस्था कशी कोलमडून पडली हे सगळं जवळून पाहिलं होतं. कोविडचे आकडे वाढतायेत, लोक रस्त्यावर मरताहेत, मात्र त्यांची कुठं नोंद होत नाहीये, अशा निराशावादी वातावरणात पत्रकार होते. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर 2021 च्या अखेर कोविडच्या अनुषंगानं जरा बरी परिस्थिती निर्माण झाली होती. तर तुम्ही त्या नकारात्मतेतून आणि टॉक्झिसीटीतून बाहेर यावं हीच तुमची भावना असते. आणखी काही नकारात्मक गोष्टी तुम्हाला नको असतात. मात्र माझ्यासमोर जेव्हा हे आलं तेव्हा  संताप खूप झाला. म्हणजे कुणाकडे इतका वेळ आहे, वर्षअखेरला इतका दु:स्वास करत बसायला. जुने वर्ष सरतंय, नवे वर्ष येतंय अशा वेळेस लोक आनंदी असतात, न्यूइयर साजरा करण्याच्या मूडमध्ये असतात. वातावरणात आनंद, जल्लोष असतो. सकारात्मकता असते, अशा वेळी इतका द्वेष, इतकी घृणा कशासाठी? त्या ॲपवर 100 हून अधिक मुस्लिम स्त्रियांची नावं होती. ते सगळंच फार भयंकर, त्रागा झाला.

मग सर्वात प्रथम मी टि्वटरवर त्या ॲपचा स्क्रीनशॉट टाकला. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दिली होती. माझ्या टि्वटवर माहिती व तंत्रज्ञान खात्याच्या मंत्र्यांनी उत्तर दिलं की, या घटनेची नोंद घेऊन ॲक्शन ॲप बॅन केलाय. तर म्हटलं, चला काही ना काही हालचाल होतीय. तक्रारही नोंदवलेली आहेच. मात्र महिला आयोगाकडून काहीच दाद मिळाली नाही. ॲप बॅन झालाय तर पुढं काय? महिला आयोगाकडून काहीच प्रतिसाद आला नाही. ना त्यांचा फोन, ना मेसेज. मीही फॉलोअप घेतला नाही. काही प्रतिसाद मिळाला असता तर पुढं बोलण्यात हशील होतं. पुढं एकाला अटकही झाली. मात्र या घटनेतून एक गोष्ट झाली की, लोकं पाठीशी उभी राहिली. ऑनलाईन ऑफलाईन लोक सोबत आले. ॲप आणि त्या प्रकाराविषयी लोकांच्या मनात चीड होती. सुल्ली डिल्स ॲपच्या वेळेस तक्रार झाली नव्हती. त्यामुळं अशा तऱ्हेचं वागणाऱ्यांना आपण करू ते खपतं हा विश्वास येतो. पण यावेळेस मी तक्रार केली. कुणी काहीच बिघडवणार नाही, या भावनेला सुरूंग लागण्यासाठी अशा हालचाली गरजेच्या असतात. कुणीच आपलं काही बिघडवू शकत नाही तर तसं नाहीये, हा संदेश यातून गेला.

प्रश्न - या घटनेचा तुझ्या कुटुंबावर काय परिणाम झाला?

- याबाबत मी थेट माझ्या कुटुंबीयांशी बोललेच नव्हते, सुरूवातीला. फारच अवघड होतं बोलणं. असे प्रसंग अवघडलेल्या संवादांना जन्माला घालतात. मी एफआयआर नोंदवली तेव्हा त्याची कॉपी मी वडिलांना व्हॉटसॲप केली आणि सांगितलं की, कदाचित यासाठी मला इथून पुढं पोलिस स्टेशन किंवा वकिलांना भेटत राहावं लागेल. मात्र तरीही त्यावर समोरासमोर चर्चा नाही केली. मात्र ते त्या घटनेच्या अनुषंगानं फॉलोअप घेत होते. अपडेटस घेत होते. मला त्याविषयी काही काही सांगतही होते. अर्थात त्यांनी मला खूप सपोर्ट केलं. त्यांच्या मनात नक्कीच भीती होती. माझी एक मैत्रीण या बुल्ली बाई ॲपबाबत एक डॉक्युमेंटरी करत होती. तिला मी घरीच बोलावलं. ती घरी आली होती. तिनं आईला या घटनेविषयी विचारलं तर ती म्हणाली की, इस्मतनं फोन उचलला नाही तर मनात येतं की ती घरी परतेल ना. त्यावेळेस पहिल्यांदा जाणवलं की, त्यांच्या मनात किती खोल भीती बसलीये. तुम्हाला फिल्डवर तर जावं लागणारच असतं. मात्र मागं राहिलेल्या आपल्या कुटुंबीयांवर अशा प्रकारचं एक दडपण असतं याचा त्याक्षणी साक्षात्कार झाला. आपल्या कामाचा त्यांच्याही मानसिकतेवर परिणाम होतो. त्यांचाही ताण वाढतो.

प्रश्न - तुला काय वाटतं, असा प्रकार का केला गेला असेल... बोलणाऱ्या स्त्रिया कुणाला इतक्या खुपतात?

- अलीकडं खूप साऱ्या मुस्लिम स्त्रिया या पब्लिक स्पिअरमध्ये येऊ लागल्या आहेत. खूप स्त्रिया शिकत आहेत, बोलत आहेत, लिहीत आहेत. मुळातच अल्पसंख्यांक किंवा दलित असून प्रश्न करताहेत, मुद्दे मांडताहेत हे बऱ्याच जणींना विनाकारणच आवडत नसतं. ट्रोलर्सना तर नक्कीच. त्यांच्याकडे द्वेष, दु:स्वास करण्याचीही कारणं नसतात. त्यांना फक्त वाटत असतं, मुस्लिम महिलांनी किंवा कुणीही अल्पसंख्यांक, दलितांनी टिपिकल साच्यात अडकून राहावं. त्यांनी काही मांडू नये, पुढं येऊ नये, हीच ट्रोलर्सची भावना असते. मग ते लोकच स्त्रियांना दुय्यम लेखण्याचा जास्त प्रयत्न करत राहतात. ती त्यांची अत्यंत चाकोरीबद्ध मानसिकता असते. त्यांचा उद्देश एकच असतो, कसंही करून स्त्रियांची तोंड बंद करा. त्यासाठी चारित्र्यहनन हे हत्यार. मग त्यासाठी ते वाट्टेल त्या थराला जातात. मात्र त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे. त्यांच्याविरूद्ध काही कृती केली नाही तर त्यांना ते हवंच आहे. तुम्ही विरोधात ठाम भूमिका घेता तेव्हा ‘तुम्ही किती शौर्यवान आहात, तुम्हाला लोकांनी नावाजलं पाहिजे’ असा अर्थच होत नाही. पुढच्या वेळेस ते धजावत नाहीत. त्यांनी आपल्याला कोषात ढकलण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्या अंगलट आला पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे, अरे या गप्पच बसत नाहीत, सगळं पलटवार होतंय. असं घडलं नाही तर ते तुमच्या चारित्र्यावर प्रश्न करायला बसलेतच.

प्रश्न - अशा प्रकारच्या ट्रोलिंगचा सामना महिला पत्रकारांना अधिक करावा लागतो. तू हे प्रकरण कसं हाताळतेस...?

- ट्रोलशी तुमचा संवादच होऊ शकत नाही. त्यांना तो अपेक्षितही नसतो. त्यांचा उद्देशच तुमच्यावर चिखलफेक असतो. टि्वटरवर तर मी नोटिफिकेशन बंदच करून टाकलंय. तिथं मी एखादा संवादाचा थ्रेड सुरू करते, मात्र ते पूर्ण वेळ अटेन्ड नाही करू शकत. नाही तर तुम्ही पूर्णपणे कोलमडून जाल. ट्रोलर्सच्या ट्रोलिंगनं काही काळ त्रास झालाही. सतत डोक्यात तेच घोळत राहायचं. मानसिक दृष्ट्या तुमच्यावर खूप आघात होतो. पण मग मी नंतर रॅशनली काही प्रश्नांचा विचार केला. कोण आहेत हे ट्रोलर्स? का करत असतील? त्यांच्याकडे वेळ आहे, पण आपल्याकडे आहे का? त्यांना मुळी संवाद करायचाय का? या प्रश्नांची उत्तर माझी मला जशी सापडत गेली, तशी मी शांत होत गेले. मागं मी चेन्नईहून दिल्लीला येणार होते. विमानतळाच्या रस्त्यावर एका चहावाल्याकडे चहा पीत होते. माझ्या लक्षात आलं की माझी पिरिएडस (पाळी) सुरू झालेय. त्या चहावाल्याच्या मदतीनं मी सॅनिटरी पॅडस मिळवले. मी हा छोटा अनुभव टि्वट केला आणि नंतर विमानात शिरले. विमानातून बाहेर पडले तर धो-धो नोटिफिकेशन. म्हटलं मी तर काहीच राजकीय कॉमेंट केली नाहीये इतक्यात, मग काय झालं? तर या अनुभवाच्या खाली ट्रोलिंग सुरू झालं होतं. यात वादंग व्हावा असं काहीही नव्हतं. काही वेळा एखादं टि्वट वादग्रस्त ठरू शकतं, याची कल्पना आधीच असते. पण हा तर चांगला अनुभव होता. मात्र मी ट्रोल झाले. त्यातला पाळी, पॅडसचा मुद्दा संस्कृतिरक्षकांना आवडला नसणार. हतबुद्धच झाले मी. शेवटी एकच लक्षात आलं, त्यांना टाळणं हाच उत्तम उपाय आहे. नाही तर तुमची सगळी उर्जा खाऊन टाकतात ते. बर्नआऊट होता तुम्ही.

प्रश्न - सोशल मीडिया किंवा अगदी प्रत्यक्षातही मुस्लिमविरोधी वातावरण दिसतं. समाजाच्या अंतर्गत त्यातूनच भय आहे. दुय्यम नागरिकत्वाची भावना आहे. कामानिमित्त मुस्लिम वस्त्यांमधून फिरताना हे तुलाही जाणवतं का?

- हो, भीती आहेच. मॉबलिचींग वाढलंय. बुलडोजर प्रकरण असेल, लोकांच्या मनात भीती आहेच. दिल्ली दंगलीतही ज्या प्रकारे अटकेचं सत्र झालं आणि ज्या प्रकारच्या केसेस बनवल्या, त्यातून तर स्पष्टच भीती पेरण्यात आलीये. मी लहान होते तेव्हा गुरगावात राहत होते. तो हिंदूबहुल प्रदेश. पण कधीही वेगळेपणाची भावना मनात आली नाही. लक्ष्मीपूजाच्या वेळेस शेजारी पाजारी घरी येऊन सांगायचे, पूजेला तिला पाठवा म्हणून. आम्हीही आनंदानं जायचो. तेही ईदला यायचे. पण आज मी विचार करते की, आजच्यासारखी परिस्थिती तेव्हा असती तर कशा प्रकारची वागणूक मिळाली असती. असा मनात विचार येणंही त्रासदायक.

पण वस्त्यांमधून फिरताना, लोकांशी बोलताना भीती आहे हे जाणवत राहतं. त्याला एकच कुठला मुद्दा कारणीभूत आहे असं नाही, पण लोक भयभीत आहेत. त्यामुळं रिपोर्टींगची जबाबदारी अधिक वाढते. आपल्या रिपोर्टिंगमधून असं काही जाऊ नये की, ती भीती अधिक ठळक व्हावी. 

प्रश्न - आणि तुला मुस्लिम समाजाच्या आत आणि मुस्लिम समाजाच्या बाहेर एक स्वत:ची मतं असणारी स्वतंत्र विचारांची व्यक्ती म्हणून काम करताना काही अडचणी येतात का?

- अर्थातच येतात. मुस्लिम समाजातूनही येतात आणि बाहेरूनही हे तू योग्य बोललीस.  समाजातही तुमच्यावर प्रश्न उपस्थित केले जातात, तुझा हिजाब कुठंय म्हटलं जातं आणि कदाचित त्याबाहेरही तेच प्रश्न. अत्यंत स्टिरियोटाईप पद्धतीनं दोन्हीकडून प्रतिसाद मिळतो. पण तुम्हाला त्यातल्या त्यात एक तारतम्य ठेऊन काम करावं लागतं. त्यांना हाताळताना एक प्रकारचा समतोल साधावा लागतो. तसंच तुम्हाला पुढं जाता येतं. नाही तर सगळं अवघड होऊन बसेल.

प्रश्न - हिजाबचा मुद्दा छेडलास तर आता आपण बघतोय की, इराणमध्ये हिजाबला विरोध म्हणून आंदोलन होतंय. तर काही महिन्यांपूर्वी आपल्याकडे कर्नाटकातील कॉलेजांमध्ये हिजाब घालून जाण्यास परवानगी मिळावी म्हणून गदारोळ सुरू होता. या दोन्ही घटनांकडे तू पत्रकार म्हणून कसं पाहतेस?

- मला वाटतं दोन्ही घटनांमध्ये व्यक्तीची निवड हा महत्त्वाचा घटक आहे. दोन्हीकडच्या सरकारच्या भूमिका बघ. इराण सरकारला वाटतंय की, हिजाबसक्ती असावी. तर इथल्या सरकारला वाटतंय, हिजाब घालून कॉलेजात जाऊ नये. इथं कुणीही ते घालणं वा नाकारणाऱ्याचा चॉईस विचारात घेत नाहीये. जोवर आपण काय घालतोय यानं कुणाचं काहीही नुकसान होत नाही; तोवर सरकारनं इतकी स्वत:ची माथेफोड करायची काय गरज आहे. सरकारचं काम कल्याणकारी भूमिकांसाठी कटिबद्ध राहणं आहे, की कुणी काय घालावं यावर लक्ष देणं.

प्रश्न - हिजाब, तलाक यांनाच केंद्रस्थानी ठेऊन मुस्लिम महिलांच्या प्रश्नांकडं पाहिलं जातं. तुला काय वाटतं, कुठले खरे प्रश्न आहेत? आणि इथल्या मुस्लिम महिला होमोजिनीयस आहेत का?

- खूपच योग्य मुद्दा मांडलास. सगळ्या मुस्लिम स्त्रिया काही सारख्या नाहीत. मुस्लिम महिला म्हणून  त्या एकच एक असा मॅण्डेट वापरत नाहीत, की त्यांच्या सगळ्या जगण्या-वागण्याचा व्यवहार सारखा असेल. आणि जर तोच सारखा नाही तर त्यांचे प्रश्न कसे काय सारखे असतील. अल्पसंख्यांकातल्या अल्पसंख्यांक आणि त्यातून पुन्हा त्यांच्यात वैविध्य हे सगळेच मुद्दे विचारात घेतले पाहिजेत. मागे मी मदरसातल्या मुलींवर एक सिरीज केली होती. मी मुख्यत्वे तिथल्या शिक्षकांच्या अनुषंगानं त्या मुलींशी बोलले. महिन्याची 300 रुपये फीज देऊ शकत नाहीत, मात्र त्या मुलींना आएएस ऑफिसर व्हायचंय. डॉक्टर, आर्मी, शिक्षक बनायचंय. मग लक्षात आलं तलाक आणि हिजाब हे एवढेच काही प्रश्न नाहीयेत, ते नुसतं भासवलं जातं. पण खरे प्रश्न म्हणशील तर शिक्षणाचा किती मुख्य प्रश्न आहे. आरोग्याचा, त्यांच्या लैगिंक आरोग्याचा प्रश्न आहे.

प्रश्न - आपले प्रश्न जर नीट मांडले जात नाहीत असं वाटत असेल तर अल्पसंख्यांक, दलित वर्गातून त्याची मांडणी करणारे तरुणतरुणी पत्रकारितेत यायला हवेत. तुझं याबाबत काय मत आहे?

- खूपच गरजेचं आहे. कम्युनिटी स्तरावरची पत्रकारिता होत राहणं खूप गरजेची आहेच. इंटरनेट या माध्यमानं खूप महत्त्वाची भूमिका निभावलीय. सोशल मीडियासारखे प्लॅटफॉर्म्स खुले झाले. लोकांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी एक माध्यम मिळालंय. आपल्याला असे पत्रकार दिसतात जे मुख्य माध्यमांत नाहीत, मात्र सोशल माध्यमातून पत्रकारिता करतात. अस्पर्श विषयांमध्ये हात घालतात. त्यांना दडपवण्याचा देखील प्रयत्न केला जातो. मात्र लोक प्रयत्न करायचं सोडत नाहीत. हे खूपच दिलासादायक आहे. सगळ्या अडचणी बाजूला सारून लोक पुढं येताहेत आणि यायला पाहिजेतच. त्यांचे नॅरेटिव्ह, त्यांच्या स्टोरीज अन्य कुणीही सांगू शकत नाहीत.

प्रश्न - अलीकडेच इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिलच्या वतीने दिला जाणारा ‘ह्यूमन राईटस रिलीजिएस फ्रीडम यंग जर्नलिस्ट’ पुरस्कार तुला मिळालाय त्या रिपोर्ताजविषयी सांग.

- अल्पसंख्यांकाचे विषय, काही गुन्हेगारीचे, सांप्रदायिकीकरणाचे- या विषयांच्या वार्तांकनासाठी मला हा पुरस्कार मिळालाय. धर्माच्या टोकदार भूमिकेतून बेस्टफ्रेंडलाच मारण्यापर्यंतची एक केस यात होती. केवळ नकारात्मकच नव्हे तर काही सकारात्मक बातम्याही यात आहेत. दिल्लीत जामियानगर म्हणून एक मुस्लिमबहुल प्रदेश आहे. तिथं एक छोटसं मंदिर आहे. काही मोजकी हिंदू घरं आहेत. स्थानिक प्रशासनाकडून ते मंदिर पाडण्याची नोटीस आली. मात्र तिथल्या मुस्लिम लोकांनी कोर्टात त्या नोटीसीविरूद्ध केस केली. म्हणजे एकीकडे आपण लोकांमध्ये वाढता द्वेष बघतोय. पण भेदाभेदाचं जे आजचं वातावरण आहे, त्यात अशा प्रकारच्या एकात्मतेची व एकमेकांच्या भावनांचा आदर करण्याची भूमिका असणारी ती पॉजिटिव्ह स्टोरी होती.

प्रश्न - अशा विविध प्रकारच्या संवेदनशील विषयांना हाताळताना तुला कधी निराश नाही वाटत? फ्रस्टेशन?

- खूपदा होतं. रोजच्या रुटीन बातमीदारीतही होतं. क्राईमच्या स्टोरीज थकवणाऱ्या असतात. मानसिक परिणाम होत राहतो. तुम्हाला मृतदेह बघावा लागतो. पीडितांशी बोलावं लागतं, हे सगळं खूप हतबलता जागवणारं असतं. अशा वेळी वाटतं की, मीडिया ऑर्गनायझेशन्समध्ये काऊन्सिलींग सेशन्स व्हायला हवेत. पत्रकारांच्या मेंटलहेल्थसाठी काही उपाययोजना केल्या पाहिजेत. खूप नाही मात्र छोटे छोटे समुपदेशनाचे, ताण हाताळाण्याचे ट्रेनिंग तर घेतले जाऊच शकतात.

प्रश्न - तुला निराशा आल्यावर, तू काय करतेस?

- प्रवास. खूप निराशा दाटून आली की प्रवास करायचा. माझ्या इन्स्टाग्रामवर जाऊन बघशील तर दिसेल मागच्या नऊ महिन्यांत मी किती वेगवेगळी राज्ये फिरले आहे. प्रवास करून फिरून आल्यावर पुन्हा नव्या कामासाठी सज्ज होते. 

प्रश्न - सध्या तू पूर्ण वेळ कुठं काम करत आहेस?

- अगदी अलीकडेच मी ‘फ्रंटलाईन’मध्ये पूर्ण वेळ रुजू झालेय. इथं पर्यावरण, जेंडर, सांस्कृतिक असेही विषय हाताळण्याचा माझा विचार आहे.

प्रश्न - मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर आलोय तर सहज म्हणून विचारायचंय. तुझं नाव इस्मत चुगताई या उर्दूतल्या प्रसिद्ध लेखिकेशी मेळ खाणारं आहे. तुझ्या आयुष्यात इस्मत चुगताई यांचं लेखन कधी आलं...

- खूप लहान असतानाच. कदाचित असंही घडलं असेन बघ, म्हणजे माझ्या आजोबांना साहित्याची फार आवड होती आणि माझं नामकरण त्यांनीच केलंय, तर कदाचित त्यांनी माझं नावही त्यांच्या नावावरून घेतल्याची शक्यता आहे. अगदी लहान असताना मला माझं नाव आवडत नव्हतं. पण जेव्हा इस्मतआपाशी ओळख झाली तेव्हा मला हे नाव फार आवडू लागलं...

आणि त्यांचं लेखन मला शालेय वयातच गवसलं. माझ्या शाळेत माझा उर्दूचा विषय होता. त्यामुळं त्यांच्या कथा मी लहानपणापासून वाचतेय.

प्रश्न - शेवटचा प्रश्न, अशा प्रकारे काम करत राहण्यासाठी आतूनच जशी इच्छाशक्ती लागते, तशा प्रेरणाही लागतात. तुझ्या प्रेरणा काय आहेत आणि तू उद्याच्या मुस्लिम मुला-मुलींसाठी काय संदेश देऊ इच्छिते?

- प्रवास आणि पुस्तकं या माझ्या प्रेरणा आहेत. पण तू मला आवडती पुस्तकं वगैरे विचारू नको. तो फार अवघड प्रश्न आहे. फार फार तर अलीकडे मी फ्रेड्रीक बॅकमॅन यांचं ‘ॲंक्शियस पिपल’ किंवा भगतसिंग यांचं ‘व्हाय आय ॲम एथिस्ट’ ही पुस्तकं वाचलीत, असं सांगू शकते. पण आवडतं असं सांगणं अवघड. आणि मुला-मुलींना म्हणशील तर मला वाटतं, आपण एखादी गोष्ट करू शकत नाही हा विचारच झटकून टाकायचा हे सांगायला आवडेल. मलाही सुरूवातीला वाटायचं, मी फिल्डवर कशी जाणार? रात्रीचा, पहाटेचा प्रवास कसा करणार पण एकदा का तुम्ही करायचं ठरवलं तर तुम्हाला जमतंच. मी अमूक-तमूक आहे, मला नाही जमणार हा विचारच बाद करायचा. खूप प्रवास केला पाहिजे, तुम्ही प्रवास करत राहिलात तर खूप मोकळे होता. तुमचा आयाम वाढतो. महिलांसाठी आजही प्रवास ही अवघड गोष्ट आहे. पैसा हादेखील फॅक्टर आहे, मात्र तुम्ही एकदा ठरवलंत तर बाकीच्या गोष्टी जुळून येतात आणि पुस्तकं वाचली पाहिजेत. पुस्तकांनी आपला मेंदू मोकळाढाकळा होतो; खुला होतो. कुठल्याही वेळी आपण वाचू शकतो. किती तरी चांगली पुस्तकं आहेत. किती तरी पुस्तकं वाचायची राहणारही आहेत, तरीही वाचत राहिलं पाहिजे.

मुलाखत व शब्दांकन : हिनाकौसर खान, पुणे
greenheena@gmail.com

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

इस्मत आरा,  दिल्ली ( 1 लेख )
ismat123raft@gmail.com

पत्रकार




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी