डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

युवक मित्रांनो! तुमच्यासाठी खास एक गोष्ट. जरा वेगळीच. कळवा आवडली तर.

ही गोष्ट काही मोठ्या सम्राटाची नाही. राजाच्या लाडक्या राणीची नाही, किंवा फॅशनेबल तरुणाची किंवा कॉलेज कुमारीचीही नाही. एका लहान मुलीची, एका कामगाराच्या मुलीची आहे ही गोष्ट! ...गोष्ट कसली, त्या लहान मुलीपुढे उभा राहिलेला एक प्रश्न आहे हा. आणि मला वाटतं तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्याल!

त्या कामगाराच्या मुलीचं नाव काशी. मोठी चुणचुणीत पोर, आणि चलाखही. मराठी दोन बुकं वाचली होती ना तिनं! पण पुढे उठावं लागलं शाळेतून. अन् न उठेल तर काय करील? मायेला कोण मदत करील? बिचारी माय शेतात मोलमजुरी करी. संध्याकाळी थकून भागून येई. तिला काशी हातभार लावी. शिवाय दोन भावंडे होती लहान. माय कामाला गेल्यावर त्यांना सांभाळावे लागेना! बा तर ममईला गेलेला. एका मिलीत कामावर होता तो पोटासाठी. मिलीचं काम व ममईच ऱ्हाणं. कसेबसे शंभर सवाशे रुपये साठवून पाठवायचा मधून मधून. म्हणून काशीची माय मजुरी करी. दादल्याच्या पिठात आपलं मीठ घालून भाकरी करी. ढकलीत होती संसाराचा गाडा. या संसाराच्या गाड्याला कसली चाकं असतात माहीत आहे ना तुम्हाला, युवकांनो! ती चाकं म्हणजे दोन भाकरी. लक्षात ठेवा.

...आता दिवाळी आली होती. काशीचा बा घरी येणार व्हता. मोठ्या मुश्किलीने गेले सहा महिने त्याने विडीकडचं व्यसन बंद केलं होतं, आणि ती 'गंगाजळ' साठवून त्यात उधारीच घालून यायपुरतं भाडं उभं केलं होतं. ती एक गोष्ट तुम्ही वाचलीच असेल, ना.ह.आपट्यांची. ती 'भागूचा कुणगा'! त्या भागूला आपल्या दादल्याला पत्र पाठवायचं असलं तर ती कितीतरी दिवस मिठाशिवाय भाकरी खाते आणि तसं पाहिलं तर गरिबांनी भाकरी खाणं हीसुद्धा एक चैन आहे, नाही? गॉर्कीच्या एका गोष्टीत तर गोष्टीचा नायक, तो कॅप्टन, एक प्रमुख, 'माजी माणूस' म्हणतो, 'अरे लेका, (गरिबाला उद्देशूनच असे गौरवाने शब्द वापरले जातात, हे काही सांगायला नको!) येथे राहणाऱ्या लोकांना रोज जेवणाची सवय नाही... पण मी म्हणतो, 'तुझ्यासारख्याला हे चोचले हवेत कशाला रे? शक्य तितक्या लवकर लवकर टाकून दे ही सवय. दुष्ट सवय! रोजच्या रोज जेवायला तू मोठा उमरावच लागून गेलास की नाही? बरे उमराव राहू दे, पण तू सभ्य गृहस्थ किंवा मध्यमवर्गीय तरी आहेस का? तू स्वतःलाच का नाही खात त्यापेक्षा? ते जास्त चांगलं!' 

म्हणूनच विनोदाने कुणाला तरी म्हणताना मी ऐकलं आहे की, माणसांची पोटं नष्ट केल्याशिवाय खरा समाजवाद यायचा नाही! पण, हे शक्य नाही! म्हणून दुसरा पर्याय म्हणजे त्या पोटाची काळजी मिटवणं. कुणालाही पोटाची विवंचना म्हणून ती नको! पण जनावरांप्रमाणे माणसाला केवळ पोटाचीच भूक आहे काय? त्याच्या शारीरिक भुका आहेत तशाच मानसिक, आत्मिक भुकाही आहेत!   

-तर काशी आनंदात होती. दिवाळीची गोड गोड स्वप्ने रंगवीत होती. बाबा ममईहून येईल तर काही खाली हात येणार नाही. फटाके, फुलबाज्या, मिठाई... सारखी हुरहुरत होती ती! 

आज दुपारीच कुठशी सभा होती. आईबरोबर ती गेली होती. तिथंही ती भिरभिरत होती, पण जेव्हा पुढाऱ्याचं व्याख्यान रंगात आलं तेव्हा आपसूकच ती गप्प बसली आणि आपले शोधक डोळे विस्फारून त्या पुढाऱ्याकडे तोंड वासून ती पाहू लागली.   

'भविष्य राज तुम्हारा जानो, ऐ मजबूरो और किसानो!' 

तो पुढारी गर्जत होता, 'कामगार बंधूंनो! आज आपल्याकडे पहाताच असं वाटतं की, सर्व दारिद्र्य मातेची लेकरं आहेत. ही तुमची मलीन लक्तरं, ही कोंदट खुराडी, ही झिजलेली शरीरं! हे दबलेले आत्मे-पण आशा ठेवा! नाही, विश्वास ठेवा, उद्याचं राज्य तुमचं आहे. तुमचीच सत्ता जगावर चालणार आहे. सात्विक भरपूर अन्न, थोडं काम, भरपूर विश्रांती, हवेशीर घरे, आपल्याला जन्मसिद्ध हक्कानेच मिळतील. आपले आत्मे असे हीन-बळ राहणार नाहीत.   

काशी ऐकत होती. आपल्या दोन कानांनी, दोन डोळ्यांनी ऐकत होती, बुद्धीने ऐकत होती, प्राणांनी ऐकत होती. 

सभा संपली. मायंबरोबर काशी घरी परतत होती. एका विमानाची घर घर ऐकू आली. सर्वजण वर पाहू लागले. तो अ‍ॅल्युमिनीयमचा पक्षी तिरप्या सूर्यकिरणात विलक्षण चकाकत होता. 

काशीने विचारलं, माये, कुठनं येतं हे इमान? 
'ममईहुन!' 'कुठं जातं?' 'हैदराबादेला!' 
'कोण जातंय त्यातनं?' 
'आपली इंदिरा गांधी...'
'माझा बा का येत नाही यातनं?'

'अर्र! फुढ बघ! अश्शी वर किती सारखी बघत्येस? ठेच लागंल. मरशील ना!' माय चिडली.

ममईहून इमान येतं. आपल्या गावाहून जातं. माझा बा इमानातून येईल वर कसा दोन घंट्यात पोचंल की! 

काशीच्या मनातील फुलबाज्या, फटाके मारले गेले. फक्त ठिणग्या होत्या बाकी. पण शेवटी तिला पटलं की इमानं काही आपल्यासाठी नाहीत!...नाही, नाही! आपलं नेहमीचं काम आटोपून ती आपल्या गोधडीवर पडली होती, तेव्हा तिची अशी खात्री झाली होती. काळोख! का काळाची सावली? का काळाची पावलं?...पण उन्नतीकडे नेणारी.

आता कोणी काशीच्या बाला अरेतुरे म्हणत नाही. त्याला राव म्हणतात. अजून तसाच मिलीत नोकर आहे. तसाच साधा मजदूर आहे. पण त्याच्या ठिकाणचं दारिद्र्य धुतलं गेलं आहे. लक्तर गेली आहेत. साधा नेहरू शर्ट, पायघोळ धोतर, लोकरी जाकीट आणि खादीची टोपी असा त्याचा पोशाख. काशी न् तिची आई यांना त्याच्यापासून दूर रहावं लागत नाही. कारण त्यास पोटासाठी आपलं गाव सोडावं लागत नाही. काशीही आता शाळेत जाते. एक हुषार मुलगी म्हणून तिचं कौतुक होतं. काशीची माय समाधानी होतीच. ती आता आनंदी आहे. तिला शेता-रानात काबाडकष्टांसाठी जावं लागत नाही. आपल्या मुलांचं संगोपन करण्यात आणि घराचं घरपण राखण्यात तिची तत्परता कामी येते. आणि मुख्य म्हणजे वडिलांची सेवा करण्यात तिला अत्यानंद होत आहे. उलट वडिलांनाही वाटू लागलंय की आपण आता जीवन जगत आहोत! साधं, पण जीवनच...(आणि शेवटी, निश्चयानं जे आपल्यासाठी नाही असं वाटत होतं, तेच दृश्य काशीला पहायला मिळालं)...ती, तिची आई, भावंडं आणि बाबा उन्हाळ्याच्या सुट्टीत एका विमानात-हो विमानात बसून सफरीला जात आहेत! घर्रर, घर्ररss

...आपल्या कोंदट झोपडीत, फाटक्या गोधडीवर, क्षयाची भावन असलेल्या मायेच्या शेजारी ती झोपली आहे. तिचा दरिद्री बा ममईला आहे आणि ती हे स्वप्न पहात आहे.
...आणि खरं सांगू?-संपली माझी गोष्ट! कारण आकर्षक शेवट करण्यासाठी मला कुणाला विनाकारण मारायचं नाही.

...आणि नेहमीप्रमाणे सकाळ होते. कोंबडा आरवतो. आपली फुटकी घागर घेऊन काशी कडाक्याच्या थंडीत पाण्याला जाते. तेव्हा तिच्या कापऱ्या मनात येतं-काय येडे आपन? असं काहीच्या बाहीच सपान पाहिलं! येथून दिल्ली जितकी दूर तितकीच ती गोठ आपल्यापासून दूर हाय गड्या!

-आणि मी जर रडवा कवी असतो, तर म्हणालो असतो तिच्या स्वप्नात आणि वास्तवात जितकं अंतराय आहे, ते अफाट आहे. कित्येक युगं लागतील हे अंतर कापायला- 
-पण मी असं म्हणणार नाही. आणि तुम्हीही असं म्हणू नये, नाही-तुम्ही असं म्हणता कामा नये!

कारण तुम्ही युवक आहात!

Tags: इंदिरा गांधी. विमान शाळा पोट समाजवाद मुंबई स्वप्नं काशी इतबारखाँ पठाण Indira Gandhi. #कथा Aeroplane School Stomach Socialism Mumbai Dreams Kashi Itbarkhan Pathan #Story weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके