डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हीच वेळ आहे- लोकशाहीवर विश्वास व्यक्त करण्याची!

पूर्वी मतदान केंद्रे ताब्यात घेतल्याच्या, मतपेट्या ताब्यात घेतल्याच्या बातम्या असत; आता ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. यातील अनेक कारणे तर पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासूनच अस्तित्वात आहेत. ती सांगणे हा या लेखाचा हेतू नाही. आपल्यासारख्यांनी- ज्यांना भारतात लोकशाही टिकवून ठेवायची आहे, भारतातील लोकशाही अधिक चांगली करायची आहे, त्यांनी- काय केले पाहिजे, हा आज गंभीर प्रश्न बनत चालला आहे. निवडणुकीतल्या आणि लोकशाही प्रक्रियेतल्या त्रुटी दाखवल्या पाहिजेत, त्या कमी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे याबद्दल वाद नाही. पण हा प्रयत्न करत असताना एकूण निवडणुकांबद्दल आणि लोकशाहीबद्दल आपल्या व लोकांच्या मनात ‘नको ती निवडणूक, नको ती लोकशाही’ असा विचार आणि भावना निर्माण होत नाहीत, याचीही आपण काळजी घेतली पाहिजे. आज या तरतमभावाचे भान सुटत चालले आहे का?

भारतीय जनता पक्ष आणि आणि त्यांचे मित्र पक्ष यांचा या निवडणुकीत फार मोठा विजय झाला. एक्झिट पोलनी भाजप विजयी होईल, असा अंदाज वर्तवला होता, हे खरे; पण तो विजय इतका मोठा असेल, असे भाकीत एक्झिट पोलनीसुद्धा वर्तवले नव्हते. त्यामुळे हताश आणि सैरभैर होऊन काही जण भारतात होणाऱ्या निवडणुका व कार्यान्वित असलेली लोकशाही प्रक्रिया यावरच समग्र अविश्वास व्यक्त करू लागले आहेत. हे धोकादायक आहे. भारतात होणाऱ्या निवडणुका व कार्यान्वित असलेली लोकशाही प्रक्रिया यावरच आग्रहाने विश्वास व्यक्त करण्याची हीच वेळ आहे. आपल्या देशातील लोकशाही आणि निवडणुका यांच्यात खूप त्रुटी आहेत, त्याबद्दल वाद नाही. या त्रुटींची एक छोटी जंत्री खालीलप्रमाणे देता येईल-

- निवडणुकीत पैशांचा वारेमाप वापर होतो. ज्याच्याकडे पैसा नाही, त्याला निवडणूक- विशेषतः लोकसभेची निवडणूक- जिंकता येणे जवळपास अशक्य आहे.

- मोठे प्रमुख राजकीय पक्ष धनाढ्यांना मदत करून, मदत करण्याचे आश्वासन देऊन अब्जावधीने पैसे गोळा करतात. नव्याने सुरू झालेल्या इलेक्शन बाँडमुळे याला आता कायदेशीर स्वरूप मिळाले आहे. पैसे जमा   करण्याच्या या शर्यतीत नव्याने निर्माण होणारे पक्ष किंवा छोटे पक्ष किंवा असल्यास साधनशुचिता मानणारे पक्ष, हे स्पर्धा करू शकत नाहीत.

- वर्तमानपत्रे व दूरसंचार वाहिन्या या पैसेवाल्यांच्या आणि मोठ्या राजकीय पक्षांच्या ताब्यात आहेत. खोट्या बातम्या तयार करून हवे तसे जनमानस घडवण्यात त्या तरबेज आहेत. कोणाला निवडून आणायचे आणि कुणाला पाडायचे याचे निर्णय ही प्रसिद्धिमाध्यमे करू शकतात.

- नव्याने निर्माण झालेली सोशल मीडिया ही वरकरणी सर्वांना खुली असली, तरी प्रत्यक्षात ती संघटितपणे ताब्यात घेतली जाते आणि तिचा कमालीचा दुरुपयोग केला जातो.

- धर्म आणि जात यांचा उपयोग द्वेषभावना वाढवण्यासाठी केला जातो, त्यामुळे द्वेष आणि स्वार्थ यांच्यावर न आधारलेले राजकारण करणारे पक्ष व उमेदवार निवडून येणे कठीण बनते.

- निवडणुकीवर देखरेख करणारी यंत्रणा निष्पक्ष असावी, अशी अपेक्षा आहे; पण भारतात निवडणूक आयोग, न्यायालये आणि सरकारी नोकरशाही पक्षपाती भूमिका, बोटचेपेपणा राबवते आहे असे वाटायला पुरेशी कारणे आहेत.

- पूर्वी मतदान केंद्रे ताब्यात घेतल्याच्या, मतपेट्या ताब्यात घेतल्याच्या बातम्या असत; आता ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत.

यातील अनेक कारणे तर पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासूनच अस्तित्वात आहेत. ती सांगणे हा या लेखाचा हेतू नाही.

आपल्यासारख्यांनी- ज्यांना भारतात लोकशाही टिकवून ठेवायची आहे, भारतातील लोकशाही अधिक चांगली करायची आहे, त्यांनी- काय केले पाहिजे, हा आज गंभीर प्रश्न बनत चालला आहे. निवडणुकीतल्या आणि लोकशाही प्रक्रियेतल्या त्रुटी दाखवल्या पाहिजेत, त्या कमी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे याबद्दल वाद नाही. पण हा प्रयत्न करत असताना एकूण निवडणुकांबद्दल आणि लोकशाहीबद्दल आपल्या व लोकांच्या मनात ‘नको ती निवडणूक, नको ती लोकशाही’ असा विचार आणि भावना निर्माण होत नाहीत, याचीही आपण काळजी घेतली पाहिजे.

आज या तरतमभावाचे भान सुटत चालले आहे का? वानगीदाखल ईव्हीएमचे उदाहरण घेऊ. या वेळच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, तेव्हा एकूण झालेले मतदान आणि मोजलेली मते यांच्यामध्ये निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकड्यांमध्येच तफावत दिसून आली आहे. काही ठिकाणी ईव्हीएम ही पहाऱ्याशिवाय होती, काही ठिकाणी त्यांची वाहतूक पहाऱ्याशिवाय बैलगाडीतून करण्यात आली. शिवाय ईव्हीएम हे ‘दाब खटका आणि उठव शिक्का’ अशा स्वरूपाचे जुन्या टाइपरायटरसारखे शुद्ध मेकॅनिकल यंत्र नाही. सांख्यिकी संदेश समजून संचित आदेशाप्रमाणे कृती करण्याची योजना त्यात असते. अशी कार्यप्रणाली ज्यात लिहिली आहे, अशी ‘चिप’ अशा यंत्रांमध्ये असते. संदेशाने नियंत्रित कुठल्याही तर्कप्रणालीचा वापर ज्या यंत्रात आहे, ते यंत्र लांबून सांख्यिकी संदेश देऊन हॅक करता येते हे खरेच आहे. तेव्हा ईव्हीएम यंत्रांची निष्पक्ष आणि समर्थ यंत्रणेमार्फत परत-परत तपासणी केली पाहिजे; झालेले मतदान आणि मोजलेली मते यात तफावत का आहे, हे शोधून त्याबद्दल निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले पाहिजे; ईव्हीएमची विश्वासार्हता वाढवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत- या मागण्या योग्यच आहेत.

पण या विषयावर कुठलीही अर्थपूर्ण चर्चा करण्याच्या मन:स्थितीत ईव्हीएमचे- काही मोजकेच- विरोधक नाहीत आणि अशा अंध विरोधकांचे प्रमाण वाढते आहे, अशी मला भीती आहे. उदाहरणार्थ- कालच पुणे विद्यापीठात पीएचडी करणारे एक तरुण कार्यकर्ते ‘विचारवेध’च्या कार्यालयात स्वत:चे भाषण रेकॉर्ड करण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना ईव्हीएमविरोधी होणाऱ्या घंटानाद आंदोलनाची माहिती दिली. आम्ही त्यांना काही प्रश्न विचारले,

प्रश्न एक- मध्य प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात भाजपची सत्ता असताना तिथे विरोधी काँग्रेस पक्ष निवडून कसा येऊ शकला? तिथे ईव्हीएम हॅक करण्यात काय विशेष अडचणी आल्या असतील?

प्रश्न दोन- लोकसभा निवडणुकीत भारतभर लक्षावधी ईव्हीएम हॅक करायची, तर त्यांची आज्ञाप्रणाली सगळे उमेदवार ठरल्यानंतरच हॅक करावी लागेल; नाही तर माहिती नसलेल्या उमेदवाराला कुठे तरी लक्षावधी मते मिळतील आणि ईव्हीएम चुकते, हे उघड होईल. असे घडलेले ऐकिवात नाही.  

प्रश्न तीन- उमेदवार ठरल्यानंतर दूरस्थ यंत्रणेमार्फत हजारो ईव्हीएम हॅक करायची, तर त्यासाठी खूप मोठी यंत्रणा लागेल- खूप मोठे संदेश उपग्रहाद्वारे यावे लागतील. याचे काहीच पुरावे कसे सापडत नाहीत?

प्रश्न चार- ज्या ठिकाणी मतदान झालेली मते आणि मोजलेली मते यातील आकड्यांत तफावत आहे तिथे ही तफावत इतकी आहे का, की ज्यामुळे फरक असलेली मते दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला मिळाली असती तर दुसऱ्या क्रमांकाचा मतदार निवडून आला असता?

आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी पहिल्या दोन प्रश्नांना काहीही उत्तरे दिली नाहीत, ‘पुढचे प्रश्न विचारा’ म्हटले. पुढचे प्रश्न विचारल्यावर ‘तुम्ही खंदे भाजपवाले आहात, तुमच्याशी बोलण्यात अर्थ नाही’ असे त्यांनी जाहीर केले.

मला ही मानसिकता फार धोकादायक वाटते. वर्तमानपत्रांनी खोट्या बातम्या छापल्या, तर त्या खोट्या आहेत हे दाखवणे तुलनेने सोपे आहे. पैशांचा वारेमाप वापर मतदारांना उघड दिसतो. पण ईव्हीएम हॅकिंग सोपेपणाने किंवा उघड दिसेल असे दाखवता येणे कठीण आहे. त्यामुळे हे काही तरी अद्‌भुत, अदृश्य आहे- असा सामान्य माणसाचा समज सहज होऊ शकतो. त्यातून भानामती आणि भुताटकी यांच्या जोडीला ईव्हीएम हॅकिंग जाऊन बसेल व निवडणुकांवरचा विश्वासच नाहीसा होऊ लागेल. निवडणुकांतल्या त्रुटी कमी होतात, हे पाहण्याची आपली जबाबदारी आहेच; पण त्यापेक्षाही जास्त मोठी जबाबदारी निवडणुकाच नको असा विचार-भावना पसरत नाही ना, हे बघण्याची आहे. ज्या प्रकारची काळजी ईव्हीएमबद्दल मागण्या करताना घेतली पाहिजे; त्याच प्रकारची काळजी निवडणूक आयोगाची पक्षपाती भूमिका, न्यायालयाचे अनाकलनीय निकाल आणि प्रसारमाध्यमांतला अपप्रचार याबद्दलही घेतली पाहिजे. ‘आज भारतामध्ये हुकूमशाहीच हवी’ म्हणणाऱ्या ताकदी प्रबळ होत आहेत. ईव्हीएमविरोधाचे कोलीत, स्वायत्त संस्थांच्या विरोधाचे कोलीत यांच्या हातात दिले तर ते लोकशाहीलाच आग लावतील, याचे भान आपण ठेवलेच पाहिजे.

Tags: loksabha election 2019 protest evm machine anand karandikar लोकसभा निवडणूक २०१९ इव्हीएम मशीन आनंद करंदीकर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके