डिजिटल अर्काईव्ह

‘सुलभा महाजन’सोबत प्रवास करा!

आत्ताच्या काळात अनेक वेळेला जेव्हा मी ‘सतरा ते पंचवीस’ या वयोगटातील मुलींना भेटतो तेव्हा त्या आवर्जून सांगतात, ‘‘सर तुमचा उंबरठा सिनेमा खूप आवडला.’’ मला प्रश्न पडतो, ‘‘तुझं वय सतरा आहे. मग त्या सिनेमातलं तुला काय रिलेट झालं असणार? किंवा तुझ्या आयुष्यातला एकही प्रश्न त्या सिनेमात असेल का?’’ त्यावर त्या म्हणतात, ‘‘सऽऽर सगळे आमचेच तर प्रश्न त्यात आहेत!’’

भारतीय सिनेमाची पार्श्वभूमी पाहता अनेक दशकं सिनेमातील स्त्रीपात्र हे एका विशिष्ट पद्धतीने सादर केलं जात होतं. यात ती स्त्री पतिव्रता किंवा सती अन्यथा मूर्ख, बिचारी, कमजोर किंवा कुणा पुरुषावर अवलंबून अशी दाखवली जात होती. स्त्रीच्या बुद्धी आणि क्षमतांपेक्षा तिच्या शरीराला आणि त्याच्याच सजावटीला सर्वाधिक अधोरेखित केलं गेलं होतं किंवा मग त्याउलट अत्यंत क्रूर, निर्दयी आणि चालबाजी करणारी म्हणून तिचं चित्रण केलं गेलं होतं. 1950 ते 1970 चा भारतीय सिनेमाचा सुवर्णकाळ वगळता, मधल्या काळात बहुतांश सिनेमांत वर नमूद केल्याप्रमाणेच स्त्रियांची पात्रं दिसायची. प्रेक्षकांमधील अनेक महिला सिनेमागृहातून मनसोक्त रडून बाहेर पडायच्या. तसं जर झालं तर ती फिल्म हिट आहे असं फिल्ममेकर समजायचे. सिनेमात अशा स्त्रियांची पात्रं पाहताना प्रेक्षकांच्या भावनांचा निचरा व्हायला मदत होते, असा एक समज तयार झालेला होता. मात्र त्याच वेळी, सिनेमातील स्त्रीपात्र जर इतके अन्याय सहन करण्याची तयारी ठेवत असेल तर आपणही ते सहन करू शकतो अशी न कळतपणे त्या प्रेक्षक महिला स्वतःची एक समजूत करून घ्यायच्या. मराठी सिनेमाच्या बाबतीतही फार काही वेगळं नव्हतं. मात्र काही सिनेमे असे आले ज्यामधल्या स्त्रीपात्रांनी या वर्षानुवर्षे चालत आलेल्या चौकटी मोडण्याचा प्रयत्न केला. हे सिनेमे भारतातील त्या स्त्रीपात्रांची खरी कहाणी सांगत होते. ते आपल्याला केवळ त्या स्त्रियांची व्यथा सांगत नव्हते तर त्याचबरोबर त्या स्त्रियांची आंतरिक शक्तीसुद्धा दाखवून देत होते. याच पद्धतीचा एक मराठी सिनेमा 1982 मध्ये प्रदर्शित झाला, त्याचं नाव ‘उंबरठा’...

एक मध्यमवर्गीय कुटुंब. त्यात सुलभा ही सुशिक्षित स्त्री. तिचा नवरा सुभाष, व्यवसायाने वकील. त्यांना एक छोटी मुलगी, पण तिला काकूंचा विशेष लळा. सुभाषचा भाऊ व वहिनी यांना मूल नाही. सुभाषची आई सामाजिक कार्यकर्ती. अशा या सुखवस्तू कुटुंबात असूनही सुलभाचे मन घरात रमत नाही. समाजकार्याचा कोर्स करून आल्यावर तर तिची घुसमट तीव्र होत जाते. दरम्यान दूर अंतरावरील एका ‘महिलाश्रमाची प्रमुख’ या जागेसाठी तिला बोलावणे येते. स्वतःची मुलगी व पती यांना सोडून जायचे की नाही, असा पेच निर्माण होतो. घरात चर्चा झडते, थोडासा तणाव निर्माण होतो. पण सुलभा अखेर जाते. गेल्यावर महिलाश्रमात आलेल्या विधवा परित्यक्ता आणि नवऱ्याने किंवा आई-वडिलांनी नाकारलेल्या त्या मुलींचे जग समोर येते. त्या महिलांची व आश्रमाची स्थिती सुधारावी यासाठी ती जोमाने कामाला लागते. अनेक प्रकारच्या विरोधाचा आणि अडचणींचा सामना तिला करावा लागतो. ती लढते, पण अखेर राजीनामा देऊन स्वतःच्या घरी परत येते आणि... अशी मध्यवर्ती कल्पना असलेला हा चित्रपट!

हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावर त्यातील काही गोष्टी अनेकांना पटत नसल्या तरी ज्या पद्धतीने हा सिनेमा अनेक अंगांनी मनाला भिडला, स्त्रीचं अस्तित्व आणि अंतरंग वेगळ्या पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न करत गेला, त्यामुळे त्यातील आगळेवेगळेपण नाकारता येणं कोणालाही शक्य झालं नाही.

या वर्षी ‘उंबरठा’ सिनेमाला चाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत. हा सिनेमा आजही प्रेक्षकांना तितकाच महत्त्वाचा वाटतो, किंबहुना अधिक प्रभावी वाटतो. म्हणून ‘उंबरठा’ सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते डॉ. जब्बार पटेल यांची घेतलेली ही मुलाखत.

प्रश्न - 1980 च्या दशकाची सुरुवात म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीसाठी, विशेषतः प्रायोगिक अंगाने जाणाऱ्या भारतीय सिनेमासाठी, अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक समजला जाणारा काळ! याच काळात तुम्ही ‘उंबरठा’ सिनेमाची निर्मिती मराठीत केली आणि त्याच वेळी ‘सुबह’ या नावाने त्याच सिनेमाची निर्मिती हिंदीत केली. त्या काळात हे चित्रपट व्यावसायिकरीत्या प्रदर्शित करणे हे एक धाडसच म्हणायला हवे. तर पहिल्यांदा सांगा, 1980-82 च्या दरम्यान ‘उंबरठा’सारखा धाडसी आणि वास्तववादी सिनेमा करण्याचे बीज तुमच्या मनात कसे पडले?

- चाळीस वर्षांनंतरसुद्धा ‘उंबरठा’सारखा सिनेमा आजच्या स्त्रियांना कालसुसंगत आणि आपला वाटतो, म्हणून ‘साधने’ला त्याबद्दलची मुलाखत करावीशी वाटते याचा मला आनंद होतो आहे. सुरुवातीला मी याची पार्श्वभूमी सांगतो. मी उंबरठाचा निर्माताही आहे. मला ‘‘ही फिल्म करा,’’ असं कुणी सांगितलं नव्हतं. ‘सामना’ आणि ‘जैत रे जैत’ झाल्यानंतर मला स्वतःला असं वाटायला लागलं की, या प्रवासामध्ये मला खूप चांगले लोक भेटले आहेत. जसे की सामनामध्ये मला रामदास फुटाणे यांनी खूप मदत केली. जैत रे जैतच्या वेळी मंगेशकर कुटुंबीय होते. या सगळ्या लोकांनी मला काम करताना खूप स्वातंत्र्य दिलं होतं. असं जरी असलं तरी, सिनेमाचे काम संपेपर्यंत माझ्या मनात यायचं- काही तरी री-शूट करायचंय. किंवा नंतर लक्षात यायचं की ‘अरे! आपण हे पुन्हा जरा नव्याने करून पहायला हवे’ वगैरे. त्या वेळेला, त्यांची जरी यासाठी तयारी असली तरी माझ्या मनात या अदलाबदली करण्याबद्दलचं आणि सिनेमाचं बजेट वाढत आहे याबद्दलचं एक अपराधीपण जाणवायचं. त्याचं मानसिक ओझं असायचं. हे असं अनेक दिग्दर्शकांच्या बाबतीत घडत असावं. त्या निमित्ताने मी विविध लोकांशी बोलत असताना, सिनेमाची निर्मिती आपण स्वतः करावी इथपर्यंत त्या चर्चा येऊन पोहोचल्या. या चर्चेनंतरचा ‘सिंहासन’ हा पहिला सिनेमा, ज्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. हा सिनेमा पुण्यातील डेक्कन सिनेमागृहात बावन्न आठवडे सुरू होता. मुंबईतील प्लाझामध्ये पंधरा आठवडे रेग्युलर चार शोमध्ये आणि मॅटिनीमध्ये पंचवीस आठवडे! त्याला राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारदेखील मिळाले. त्यानंतरचा सिनेमा ‘उंबरठा’. तर झालं असं की सिंहासननंतर विजय तेंडुलकर मला म्हणाले, ‘‘आता नवीन काय करणार आहेस? काही वेगळा विचार केला आहेस का?’’ माझ्या मनात तेंडुलकरांना सांगावा असा एक विषय होता. तो विषय सुचविण्यामागची पार्श्वभूमी अशी की -

रमेश देव यांनी मला शांता निसळ यांची ‘बेघर’ नावाची कादंबरी वाचायला दिली होती. रमेशचं म्हणणं असं होतं की, यावर वसंत कानेटकर नाटक लिहिणार आहेत आणि मी हे दिग्दर्शित करावं. सीमा देव बायकोच्या भूमिकेत असतील आणि रमेश देव हे नवऱ्याची भूमिका करतील. वसंत कानेटकरांनी रमेश देव यांना सांगितलं होतं की, हे नाटक जर कुणी करू शकेल तर तो जब्बार आहे. कारण त्याच्या निर्मितीचा पिंड मला माहीत आहे. आता झालं असं की, रमेश देव आणि माझी निवड दुसऱ्यांदा एकत्र आली होती. पहिल्यांदा, ‘जैत रे जैत’च्या वेळेस. मला तेव्हा बाळासाहेबांनी (हृदयनाथ मंगेशकर) सांगितलं होतं, ‘‘रमेशलासुद्धा हे करायचं होतं बरं का!’’ म्हणून मी रमेश देव यांना फोन केला होता तर ते म्हणाले, ‘‘अरे हो! पण ते जैत रे जैत प्रकरण फार अवघड आहे. त्यावर तू काही करणार आहेस का? करणार असशील तर छान. नक्की कर.’’ आणि आता दुसऱ्यांदा, ‘बेघर’ कादंबरीच्या निमित्ताने आमची निवड पुन्हा एकत्र आली होती. मी ती कादंबरी वाचली आणि रमेश यांना म्हणालो, ‘‘रमेश, नाटकाच्या बाबतीत आयुष्यात पुढे काय करायचं याबद्दलचा माझा विचार ठरलेला आहे. मला व्यावसायिक थिएटरमध्ये जायचं नाहीये. घाशीराम कोतवालनंतर आमची थिएटर ॲकॅडमी झाली आहे आणि मी प्रायोगिक थिएटरमध्ये आहे. मी यात असल्यामुळे मला हे नाटक करता येणे शक्य नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की, ही कादंबरी जर तुम्ही नीट वाचली तर लक्षात येईल, या कादंबरीतील मांडणी ही नाटकासाठी योग्य नाही. जोपर्यंत तो आश्रम आणि त्या शंभर मुली प्रेक्षकांसमोर उभ्या राहत नाहीत तोपर्यंत याचा आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकणार नाही. हे आपल्या रंगभूमीवर व्यवहार्य नाही.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘आपण आश्रमासाठी प्रतीकात्मक सहा-सात मुली घेऊ या.’’ मी म्हणालो, ‘‘मला काही हे पटत नाही. माझ्याकडून हे काही होणे नाही.’’ मग तो विषय तिथेच संपला.

नंतर जेव्हा तेंडुलकरांनी मला या कादंबरीविषयी विचारले तेव्हा मी त्यांना या कादंबरीतील गोष्ट सांगायला सुरुवात केली. साधारणपणे तीन चतुर्थांश कथा सांगून झाली असेल तेवढ्यात तेंडुलकरांनी मला थांबवलं. मी म्हणालो, ‘‘अहो! अजून बरीच कादंबरी शिल्लक आहे!’’ ते म्हणाले, ‘‘या कादंबरीत पुढे साधारण काय होणार आहे याची मला कल्पना येते आहे. मी काही कादंबरी वाचलेली नाही. पण हे अत्यंत प्रामाणिकपणे सांगितलेलं कथन आहे हे नक्की! या कादंबरीचा शेवट काय होणार आहे याचा मला अंदाज येतोय. यात समाजव्यवस्थेकडे बघण्याचा एक अत्यंत रोमँटिक दृष्टिकोन आहे हेही खरंय. पण तरीही आपण इथेच थांबू या. ती आश्रमातून घरी परत येते इथेच आपल्या सिनेमासाठीची गोष्ट संपते.’’ मी तेंडुलकरांना म्हणालो, ‘‘तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण एकदा शांतातार्इंना विचारायला हवे.’’

शांताताई निसळ तेव्हा केसरीमध्ये संगीतावरचे समीक्षण लिहायच्या. त्यांचं शिक्षण समाजशास्त्र विषयातलं होतं आणि महिला निवारा गृहाबरोबर त्या काम करत होत्या. तेंडुलकरांच्या म्हणण्याबद्दल मी जेव्हा त्यांच्याशी बोललो तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘असं आहे का? पण, मुळात तेंडुलकरांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीला आपलं लिखाण आवडतं यात मला खूप समाधान आहे. आणि खरं तर ही फिल्म व्हावी असंही मला वाटतं. खरं सांगू का, कथा ही एक रचना असते, तिला एक आकार असतो आणि कथा कुठे थांबवायची हा मुद्दा नाहीये. दुसरं असं की, इथे माध्यमांतर होणार आहे. त्यामुळे बदल होऊच शकतो याची मला जाणीव आहे. तेव्हा, मीसुद्धा असा अट्टाहास करणं चुकीचं आहे. हरकत नाही. तरीसुद्धा, माझं असं म्हणणं आहे की, कादंबरीच्या पुढच्या घटनासुद्धा येऊ शकल्या तर बरं होईल. तसं तू प्लीज तेंडुलकरांशी एकदा बोल.’’ यावर तेंडुलकरांचं म्हणणं असं होतं, ‘‘नको जब्बार. त्या फिल्ममधील कथेची जी व्याप्ती आहे ती तेवढीच आहे आणि तीच प्रभावी ठरेल. तू शांताताईंना विचारून बघ.’’

काही दिवसांनंतर शांताताई जड मनानं ‘हो’ म्हणाल्या आणि ही फिल्म करायची असं ठरलं. ‘बेघर’ या नावानेच तेंडुलकरांनी फिल्मची पटकथा लिहायला सुरुवात केली.

प्रश्न - मग या सिनेमाचं शीर्षक ‘बेघर’वरून ‘उंबरठा’ कसं काय झालं?

- पटकथा लिहून होत असताना माझ्या असं लक्षात आलं की खरं तर यात उंबरठा सोडल्यानंतरचं स्त्रीचं आयुष्य आहे, म्हणून या चित्रपटाचं जे शीर्षक असावं ते म्हणजे ‘उंबरठा’. आपल्याकडे तुळस, मंगळसूत्र किंवा वहिनीच्या बांगड्या वगैरे सिनेमाची नावं आहेत जी थेट काळजाला भिडतात. मी तेंडुलकरांना म्हटलं, ‘‘मी अजून जास्त काही वाचलं नाहीये तरी मला या सिनेमासाठी ‘उंबरठा’ असं शीर्षक सुचतंय.’’ ते थोडा वेळ थांबले आणि म्हणाले, ‘‘उंबरठा? चांगलंय. हे शीर्षक घेऊ या आपण.’’ मला खंर तर आश्चर्याचा धक्काच बसला. ज्या व्यक्तीच्या नाटकांची नावं - सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल, शांतता! कोर्ट चालू आहे अशी आहेत, त्याच तेंडुलकरांच्या सिनेमाला ‘उंबरठा’ हे शीर्षक फायनल झालं! 

प्रश्न - अनेक वेळा पटकथा लिहीत असतानाच लेखकाच्या मनामध्ये त्यातील पात्रं कोण साकारणार याची एक छबी तयार झालेली असते. उंबरठा सिनेमातील कास्टिंग (पात्रयोजना) हा सर्वांत महत्त्वाचा भाग असावा असं मला वाटतं. कारण त्यामध्ये पात्रांची संख्या हा महत्त्वाचा भाग आहेच; मात्र त्याचबरोबर प्रत्येक पात्राची स्वतंत्र छटासुद्धा आहे. तर सुरुवातीला, या सिनेमातील मुख्य पात्र ‘सुलभा महाजन’ साकारण्यासाठी स्मिता पाटील यांची निवड कशी केली हे ऐकायला आम्हांला आवडेल.

-  फिल्मचा काही भाग लिहून झाल्यानंतर तेंडुलकरांनी मला विचारलं, ‘‘यात जे मुख्य पात्र आहे त्यासाठी मुलगी कोण आहे? काही विचार केला आहेस का तू?’’ मला विचाराल तर, मी पात्रयोजनेत लेखकाचं मत खूप महत्त्वाचं मानतो. कारण लिहीत असताना लेखकासमोर पात्रांची निश्चित अशी एक व्यक्तिरेखा असणे महत्त्वाचे ठरते. उदाहरणार्थ - अरुण सरनाईक हा एक ढोलकी वादक अशी छाप पडलेला माणूस ‘सिंहासन’ फिल्ममध्ये मुख्यमंत्र्याच्या भूमिकेत कसा आला असेल? त्यांचा अभिनय पाहून लोकांना वाटलं की, जब्बारने या कास्टिंगमध्ये काय कमाल केली! खरं सांगायचं तर, मुख्यमंत्री हे पात्र कोण करणार याची निवड ही तेंडुलकरांची होती. त्यांनी मला सांगितलं की, तू अरुण सरनाईकला या भूमिकेसाठी विचार. (मी अरुण सरनाईक यांना ‘तुघलक’ नाटकामध्ये बघितलं होतं.) तेंडुलकरांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे म्हणून अरुण यांनी आव्हान घेतलं आणि त्यांनी केलेली भूमिका लोकांना आजही अचंबित करते. त्यामुळे माझ्या दृष्टीने पात्रयोजनेमध्ये लेखकाचे मत खूप महत्त्वाचे आहे.

माझ्या डोक्यामध्ये उंबरठामधील मुख्य पात्रासाठी एक आंतरिक शक्ती असणारी, जिचा चेहरा बोलका आणि देहबोलीचं भान ठेवणारी अशी फक्त एकच व्यक्ती होती आणि ती म्हणजे स्मिता पाटील! मी स्मिताला म्हणालो की आपल्याला माझ्या पुढच्या फिल्मच्या संदर्भात भेटायचं आहे. मुळात स्मिता ही माझ्या आयुष्यात अपघाताने आलेली मुलगी आहे. माझे डॉक्टरकीचे पोस्ट ग्रॅज्युएशन होत असताना मी पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये रजिस्ट्रार म्हणून काम करत होतो. तेव्हा स्मिताची आई म्हणजे विद्याताई पाटील या नायडू रुग्णालयाच्या मेट्रन म्हणून काम करत होत्या. आम्ही तिथल्या क्वार्टरमध्ये राहायचो. एक दिवस मी माझ्या पडवीत बसून अभ्यास करत होतो आणि बाहेर काही मुली सायकलवर धावाधाव करत किंचाळत खेळत होत्या. त्यात एक हाफ पॅन्ट घातलेली काळीशी, सडपातळ मुलगी होती. त्यांच्या गोंगाटाचा माझ्या अभ्यासात मला खूप त्रास होत होता. मी बाहेर आलो आणि रागातच त्यांना म्हणालो, ‘‘ए! काय चाललंय तुमचं? मी अभ्यास करतोय आणि किती किंचाळताय तुम्ही!’’ तर, त्यातली एक मुलगी म्हणाली, ‘‘म्हणजे काय? मग आम्ही खेळायचं नाही का?’’ मी रागावलो, ‘‘खेळा! पण किती किंचाळणार? आणि कोण आहेस तू? काय नाव तुझं?’’ ती म्हणाली, ‘‘मी मेट्रनबाईंची मुलगी आहे - स्मिता.’’ मी म्हणालो, ‘‘ठीक आहे. मी तक्रार करतो मेट्रनबार्इंकडे. चला आता, पळा इथून!!’’ ती रडत गेली आणि नंतर मला वाटतं ती तिच्या आईला म्हणाली, ‘‘मम्मा तो कोण आहे गं? पटेल नावाचा डॉक्टर तुमचा? किती भयंकर खडूस माणूस आहे! तो आम्हांला किती बोलला!’’ तर थोडक्यात असं की मी स्मिताला तेव्हापासून ओळखत होतो.

मी जेव्हा ‘सामना’ चित्रपट करत होतो तेव्हा स्मिता दूरदर्शनला वृत्तनिवेदक म्हणून काम करत होती. त्यामुळे सगळ्यांनी तिचा चेहरा बघितलेला होता. तिला मी FTII (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) मध्ये शिकत असलेल्या अरुण खोपकर या माझ्या मित्राच्या ‘तीव्र मध्यम’ नावाच्या डिप्लोमा फिल्ममध्ये पाहिलेलं होतं. तिचा चेहरा अत्यंत फोटोजेनिक होता. मला सामनामध्ये मास्तरच्या मुलीसाठी असंच कुणीतरी हवं होतं. माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशननंतर विद्याताई आणि त्यांच्या परिवारासोबत माझा तसा फारसा संपर्क नव्हता. पण स्मिता माझ्या लक्षात होती आणि ती त्या काळात थिएटर ॲकॅडमीमध्येसुद्धा येणार होती, असंही मला कळलं होतं. तिला संपर्क साधून सामनाच्या त्या रोलसाठी जेव्हा मी विचारलं तेव्हा ती त्या कामासाठी कोल्हापूरला आली होती. सामना सिनेमात ‘या टोपीखाली दडलंय काय?’ या गाण्यामध्ये ‘साऽऽखर’ असं म्हणत जी मुलगी नाचत येते ती स्मिता पाटील आहे. 

त्यानंतर तिने ‘जैत रे जैत’मध्ये माझ्या सोबत काम केलं. त्यात जर तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल की, स्मिता पाटीलमध्ये भूमिकेसाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेण्याची वृत्ती आणि क्षमता होती. तिथल्या ठाकर वस्तीमध्ये राहणं, त्या लोकांच्या झोपड्यांमध्ये राहणं, झोपणं- अगदी त्यांचे कपडे, अंगावरची कांबळी वगैरे सगळं त्यांचं ती वापरायची! तिथे मला बघायला मिळालं की ही मुलगी किती जीव ओतून काम करते. स्मिताच्या कुटुंबाची पार्श्वभूमी म्हणजे- वडील शिवाजीराव पाटील त्या वेळी राज्याचे मंत्री होते. आई विद्याताई आणि त्यांच्या घरची सामाजिक पार्श्वभूमी आणि तिची सेवा दलातील जडणघडण हे सगळं कुठेतरी उंबरठामधील भूमिकेसाठी अत्यंत पूरक ठरणार होतं, असं मला वाटलं.

जेव्हा मी तिला उंबरठाची कथा सांगितली तेव्हा सगळं ऐकून झाल्यानंतर तिने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि ती मला म्हणाली, ‘‘जब्बार, मी तुम्हांला एक गोष्ट सांगू का? तुम्ही निवडा कुणाला निवडायचं असेल ते, पण मी जेवढे जीव ओतून ही भूमिका करेल तेवढे कुणीही करू शकणार नाही. आणि माझा एक हक्क आहे तुमच्यावर, कारण मी तुमच्या बरोबर फिल्म केलेली आहे. तुम्ही मला व्यवस्थित ओळखता.’’ पुढे ती निग्रहाने म्हणाली, ‘‘...आणि मी एक सांगते तुम्हांला- कुणीही हा रोल माझ्याकडून हिसकावण्याचा प्रयत्न केला तर मी ते होऊ देणार नाही अगदी तेंडुलकरसुद्धा! प्लीज तुम्ही त्यांना हे सांगा. आणि माझं रोल मॉडेल माझी आई आहे. तिचं सामाजिक काम तुम्हांला माहीत आहेच आणि या सुलभा महाजनच्या व्यक्तिरेखेमध्ये मला माझ्या आईची देहबोली स्पष्ट दिसते. तुम्ही हे प्लीज तेंडुलकरांपर्यंत पोहोचवा.’’

मी जेव्हा तेंडुलकरांना भेटलो तेव्हा त्यांनी मला विचारलं, ‘‘काय रे? कुणी आलं आहे का डोक्यात?’’ तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘‘माझ्या डोक्यात स्मिता पाटील आहे.’’ ते काही वेळ शांत बसले आणि त्यांनी मला विचारलं, ‘‘तू तिला शब्द दिला आहेस का?’’ त्यांच्या साशंक डोळ्यांत बघत मी म्हणालो, ‘हो’. ते आणखी थोडा वेळ शांत राहिले आणि म्हणाले, ‘‘चांगली आहे ती. पण माझ्या डोक्यात ती अजिबात नाही. आणि खरं तर, या क्षणी सांगायचं झालं तर ही अतिशय चुकीची निवड आहे, असं मला वाटतं. तू तिला जरी शब्द दिला असशील तरी तिची समजूत काढता आली तर बघ. कारण आपल्याला एका चांगल्या अभिनेत्रीची गरज आहे.’’ मी दबकतच म्हणालो, ‘‘तेंडुलकर, हे जरा अवघड आहे. मी त्या मुलीला ही गोष्ट सांगत असताना ती माझ्या समोर बसलेली होती आणि मी पाहत होतो की, ती पूर्णपणे भारावलेली होती!’’ त्यावर तेंडुलकर हसून म्हणाले, ‘‘तू गोष्टी कशा सांगतोस हे तुलाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे! तू ज्यूली क्रिस्टीला जाऊन ही गोष्ट सांगितली तर तीसुद्धा भारावून जाईल! माझ्या डोक्यात दुसरंच कोणीतरी आहे, ती म्हणजे- दीप्ती नवल! कारण तू हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांत फिल्म करतोयस, त्यामुळे विचार कर.’’ मी तेंडुलकरांना म्हणालो, ‘‘चांगली आहे दीप्ती. पण ती माझ्या ओळखीची नाहीये. हे काम करणारी व्यक्ती माझ्या परिचयाची असेल तर बरं, असं मला वाटतं. माझ्या सोबत काम करत असताना मी जे काही सांगतोय ते तिच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. दीप्तीला ते कळणार नाही असं नाही पण...’’ त्यावर तेंडुलकर म्हणाले, ‘‘...हे बघ, मला दीप्ती दिसत होती. पण तू काही वेगळं ठरवलं असशील तरी हरकत नाही.’’ ...आणि उंबरठासाठी स्मिताने काम करायचं, असं मी निश्चित केलं. 

या फिल्मचा पहिला भाग पुण्यामधल्या खडकीत माझ्या मित्राचा बंगला आहे तिथे आम्ही शूट केला आणि रश प्रिंट बघायला तेंडुलकर आले. कॉफी प्यायला आम्ही थोडा वेळ थांबलेलो असताना, तेंडुलकरांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि ते मला म्हणाले, ‘‘जब्बार कुठेतरी चुकलोय गड्या मी. अरे, ही मुलगी स्मिता पाटील आहे ना? चमत्कारच केलाय तिने यात! कमाल आहे! काय बोलू मला समजत नाहीये. या मुलीला फिल्ममध्ये घेण्याबाबत कुठेतरी मी चुकीचा विचार करीत होतो आणि तू बरोबर होतास. ती जर इथे असेल तर मला भेटायला आवडेल.’’ त्या वेळी स्मिता या ट्रायलमध्ये शेवटच्या रांगेत अंग चोरून बसलेली होती. मी तेंडुलकरांना म्हणालो, ‘‘ती आलेली आहे. मागे कोपऱ्यात बसली आहे आणि थोडी घाबरलेली आहे. कारण तिला ठाऊक आहे की, ती या सिनेमासाठीची तुमची चॉइस नाही.’’ तो क्षण फारच विलक्षण होता. स्मिताला मी हाक मारली. ती हळूच डोळे पुसत आली. तेंडुलकर तिला म्हणाले, ‘‘स्मिता, तू हरवलंस मला.’’ ती म्हणाली, ‘‘कसं काय?’’ तेंडुलकर म्हणाले, ‘‘मी ज्या सुलभा महाजनची कल्पना केली, ती तू जवळजवळ साक्षात जगली आहेस.’’ हे ऐकल्याबरोबर स्मिताचा बांध फुटला. मला अजून आठवतंय, ती अक्षरशः त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून मोठ्याने रडायला लागली! मला इथे हे सांगायचे आहे की, तेंडुलकरांसारख्या अभिजात लेखकालासुद्धा, आपण जे पात्र लिहिले आहे त्यासाठीच्या भूमिकेसाठी दिग्दर्शकाने केलेल्या निवडीबद्दल शंका असतानाही, तिने केलेल्या कामाकडे निरपेक्षपणे पाहत ते ‘उत्तम आहे’ असं मान्य करणं हा खरं तर त्यांचा मोठेपणा होता. ते स्मिताला म्हणाले, ‘‘छान आहे आणि पुढेही तू हे उत्तमच करशील!’’ अशा प्रकारे विजय तेंडुलकर आणि स्मिता पाटील हे माझ्यासाठीचं कोडं सुटलं.

प्रश्न - उंबरठामध्ये मुख्य पात्राच्या बरोबरीने सिनेमातील सेटिंग आणि लोकेशन्स प्रेक्षकांना सिनेमात खिळवून ठेवतात. प्रेक्षक जणूकाही खरंच त्या आश्रमात पोहोचला आहे आणि सगळं समोरून अनुभवत आहे असाही फील येतो. त्यामुळे सिनेमातील लोकेशन्सबद्दल जाणून घ्यायला आवडेल.

- आता सिनेमामध्ये महत्त्वाचं होतं ते घर आणि तो आश्रम. पुण्यामधे लक्ष्मी रोडवर हिरालाल मेहता अँड सन्स हे एक प्रमुख केमिस्ट होते. त्यांच्यापैकी बच्चुभाई मेहता यांच्याशी माझी जवळीक होती. माझी दौंडला डॉक्टरकीची प्रॅक्टिस सुरू होतीच. मी बालरोग तज्ज्ञ आणि माझी पत्नी स्त्रीरोग तज्ज्ञ. त्यामुळे दवाखान्यासाठी औषधं विकत घेण्याच्या निमित्ताने आम्ही त्यांच्या दुकानात जायचो. ते उत्साही गृहस्थ होते. दरवेळी भेटल्यावर ते मला म्हणायचे, ‘‘डॉक्टर, तुम्ही एकदा माझ्या खडकीमधल्या बंगल्यावर या. तिथे उत्तम शूटिंग करता येईल असं मला वाटतं.’’ तर तो बंगला बघायला आम्ही गेलो. असा छान बैठा बंगला. मोठ्या खोल्या होत्या. ‘उंबरठा’चा कॅमेरामन राजन किणगीलासुद्धा हे लोकेशन शूटिंगसाठी सोयीचं वाटलं. मी या लोकेशनबद्दल स्मिताशी बोललो. ती मला म्हणाली, ‘‘मला ते बघायला गेलं पाहिजे. ते माझं घर असणार आहे, त्यामुळे मला तिथे घेऊन चला.’’ आग्रह करून स्मिता स्वतः तिथे आली आणि त्या मेहताभाईंच्या घरातील सर्व महिलांशी मैत्री करून ‘‘भाभी, हम यह परदे बदल सकते है क्या? हम यहां पर यह रखेंगे, वहा वो करेंगे,’’ असं करत स्वतःच्या हाताने घरातली सगळी सजावट आणि रचना तिने ‘सुलभा महाजन’च्या घराप्रमाणे करून घेतली. त्या घरातल्या बायकासुद्धा या सगळ्यात अगदी रमून गेल्या होत्या. तुम्हांला विश्वास बसणार नाही, पण उच्च मध्यम वर्गीय मराठी कुटुंबाच्या घरामध्ये ज्या प्रकारचे पडदे, हॉल, स्वयंपाकघर, बाथरूम, बेडरूम, कपाट आणि इतर फर्निचर असायला हवे तशी सगळी ॲरेंजमेंट स्मिताने स्वतः लक्ष घालून करून घेतली होती. त्यानंतर स्वतःच्या वेशभूषेकडे तिचं बारकाईने लक्ष असायचं, कारण स्मिताला व्हिज्युअल सेन्स उत्तम होता. ती उत्तम फोटो काढायची. त्यामुळे कला दिग्दर्शक दीनानाथ चव्हाण यांना या सगळ्या गोष्टीत मदत झाली. त्यामुळेच कदाचित कोणत्याही फिल्ममेकरसाठी स्मिता पाटील ही एक ॲसेट होती.

आता मुद्दा होता तो आश्रमाचा. मला कोणीतरी सांगितलं, ‘पुण्यातील येरवडा भागात जेलच्या बाजूला एक रिमांड होम आहे. तिथे मुलं असतात, पण तुम्ही बघा काही जमतंय का. मी तिथे गेलो तर तिथे चारशे पोरं होती आणि त्यांच्यात पाकीटमारी करणाऱ्या पोरांची संख्या जास्त होती. म्हणजे पुण्यातील खास पिक पॉकेटर्स! मी स्मिताशी याबद्दल बोलल्यावर ती म्हणाली, ‘‘छान आहे हे. आपल्याला त्या मुलांना भेटता येईल जब्बार! आपण तिथे जाऊ या.’’ तिथे गेल्यावर राजननेसुद्धा शूटिंगसाठी दिवस आणि रात्रीचे लाइट चेक करून घेतले आणि ते लोकेशन आम्ही फायनल केलं. आम्ही तिथे गेलो तर ती पोरं शूटिंग होणार आहे म्हणून उत्साहात होती. आता या चारशे मुलांना प्रत्येक शॉटच्या वेळी सांभाळायचं म्हणजे कठीणच! पण स्मिताने त्यात पुढाकार घेतला. तिने त्या मुलांना सांगितले, ‘‘हे बघा बाळांनो! जेव्हा शूटिंग असेल तेव्हा तुमच्या सगळ्यांचे आवाज गप्प. तुम्ही सगळ्यांनी आपापल्या खोलीत जायचं.’’ आणि चक्क त्यावर ‘होऽऽऽ’ म्हणत ती मुले ते पाळत होती. त्यांच्यामध्ये स्मिता इतकी मिसळली होती की विचारूच नका. अगदी जैत रे जैतमध्ये ती त्या ठाकर वस्तीत मिसळली होती तसं तिने हे पूर्ण रिमांड होम मनाने काबीज केलं होतं. ती त्या मुलांशी संवाद साधायची, ‘‘काय रे? तू पिकपॉकेटर आहे? आणि कसं करतोस नेमकं?’’ नखांच्या आणि बोटांच्या मध्ये कुठेतरी छोटासा ब्लेडचा तुकडा ती मुले लपवतात आणि त्यांच्याकडे ते वापरण्याचं अतिशय शार्प स्किल आहे असं माझ्या लक्षात आलं. स्मिता त्यांना एकदा म्हणाली, ‘एऽऽऽ! पण तुमच्या या गोष्टीनं मी काही बनणार नाही!’’ त्यावर ते ‘‘हो ताई, बरं ताई’’ करत गेले आणि एके दिवशी स्मिता माझ्याकडे आली, ‘‘जब्बार, माझं पाकीट हरवलंय...’’ आणि तिच्याकडे बघत एक मुलगा हसत आला आणि हातात पाकीट घेऊन तिच्या समोर उभा राहिला! कौतुकाने स्मितानं त्याच्या डोक्यावर टपली मारली. अशी ही सगळी लोकेशनची गोष्ट.   

प्रश्न - तर, या सिनेमातील आश्रमात इतक्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या महिला पाहायला मिळतात. त्यांच्या कास्टिंगबद्दल ऐकायला आवडेल.

- आश्रमात राहणाऱ्या मुली कोणत्या? हा प्रश्न माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. कारण त्या खरंच आश्रमातल्या मुली आहेत असं वाटणं फार गरजेचं होतं. ज्या वेळी मी ‘तीन पैशाचा तमाशा’ हे नाटक केलं होतं तेव्हा दलित रंगभूमीशी माझा खूप संपर्क आला होता. त्यांच्यातील कलाकारांमध्ये सगळ्या समाजाच्या आर्थिक वर्गांच्या मुळाशी जाण्याची एक ताकद असते. विशेषतः उंबरठामध्ये ज्या दोन मुली (गुलाब आणि बकुळा) स्वतःला जाळून घेतात त्या मला अशा बेफाम हव्या होत्या. त्या भूमिका चंचल सूर्यवंशी आणि अरुणा भिंगारदिवे यांनी केल्या आहेत. थिएटरमुळे मला या मुली मिळू शकल्या. यात खूप वेगवेगळी उदाहरणं आहेत. म्हणजे एक मुलगी जी वेडी दाखवली आहे आणि छपरावर चढून खाली उडी मारणार असते, तिचं नाव सुजल वाटवे आणि मुळात खऱ्या आयुष्यात ती सायकॉलॉजिस्ट आहे. त्यानंतर घाशीराम कोतवाल नाटकामधील गौरीचे पात्र केलेली अभिनेत्री (जिच्यावर नाना फिदा होतात) स्वरूपा खोपकरसुद्धा या फिल्ममध्ये उत्पला जोशीच्या भूमिकेत आहे. सोलापूरच्या रंगभूमीशी निगडित काही महिला या सिनेमामध्ये आल्या आहेत. उदारणार्थ- आश्रमाच्या सुपरिटेंडेंट काळेबाई आणि बऱ्याचशा इतर मुली सोलापूरच्या आहेत. नाटकातील अगदी ताकदीच्या या मुली मिळालेल्या असूनसुद्धा माझं काही समाधान होत नव्हतं. कारण शोषणाची आणि त्यातून येणारी व्यथा याची जाणीव चेहऱ्यावरती उमटणे आवश्यक होते. आणि या संबंधीचा एक वेगळा विचार म्हणून मी आर्यभूषण या तमाशा थिएटरला गेलो. ‘सिंहासन’ फिल्ममध्ये एक म्हातारा आणि त्याची मुलगी, अन्याय झालेले पीडित म्हणून तक्रार करण्यासाठी बसलेले असतात. त्यातला तो म्हातारा म्हणजे खऱ्या आयुष्यातील लोकप्रिय आणि प्रेक्षकांचा आवडता सोंगाड्या - किसन कुसगावकर! सिंहासनच्या वेळी निळू फुले यांच्या सांगण्यावरून किसन कुसगावकरांना शोधायला मी आर्यभूषणमध्ये गेलो. कारण मला एक सुरकुतलेला दलित चेहरा तेव्हा हवा होता. ज्याला एकही संवाद नसताना, ज्याच्या केवळ चेहऱ्याच्या हावभावावरून ते पात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेल असा. त्या वेळी मी किसन कुसगावकर यांचं ‘मिठा राणी’मधलं काम पाहिलं होतं आणि मी तुम्हांला सांगतो, किसन कुसगावकर व्यासपीठावर पुढे काय करतात हे दादा कोंडकेसुद्धा अवाक होऊन पाहत राहायचे. तर, आर्यभूषणमध्ये व्यासपीठावर अतिशय सुंदर आणि ताकदीच्या कलाकार मुली मी पाहिल्या. त्यातल्या आठ ते दहा मुली उंबरठामध्ये आहेत. त्यांना शोषणातली वेदना सांगायला लागत नाही. ती त्यांच्या चेहऱ्यावर येतेच. आता या सगळ्या वेगवेगळ्या स्तरांतील मुली उंबरठा सिनेमाच्या निमित्ताने एकत्र कशा राहणार हा प्रश्न माझ्या मनात होता. मात्र या सगळ्या जणी एकत्र आल्या आणि अक्षरशः खुलून गेल्या.

आश्रमामध्ये अजून एक करारी बाई आहे जी आश्रमाच्या कार्यकारी मंडळाची चेअरमन असते. तिची भूमिका नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या दया डोंगरे यांनी केली आहे. त्याचबरोबर त्या आश्रमाचं एक कार्यकारी मंडळ असतं. अतिशय महामिश्कील आणि डांबरट पात्रं त्यात तेंडुलकरांनी लिहिली आहेत. त्यात मला मिश्कील अशा मुख्याध्यापकाच्या भूमिकेसाठी सतीश आळेकर हे आठवले. एक आगाऊ संपादक या मंडळात असतो, तो गुपित ठेवायला हव्यात अशा आश्रमातल्या महत्त्वाच्या घटना ब्रेकिंग न्यूज म्हणून वृत्तपत्रात छापतो. त्या रोलसाठी आमच्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकातील सूत्रधार श्रीराम रानडे यांची निवड झाली. त्यात एक म्हातारे गृहस्थ असतात जे सतत ‘‘काय म्हणाले होऽऽ?’’ असं विचारत असतात. ती भूमिका भरत नाट्य मंदिराशी निगडित बाबुराव विजापुरे यांनी केली आहे. त्या मंडळात एक बाई आहेत ज्या बैठकीत नुसतं विणकामच करत असतात. त्या आमच्या फिल्मच्या मेकअप आर्टिस्ट निवृत्ती दळवी यांच्या पत्नी हिराबाई दळवी आहेत. पण दुर्दैवानं, या पात्रांना महिला आश्रमातल्या बायकांच्या व्यथा आणि पुनर्वसन यापेक्षा या बैठकीतून मिळणारा भत्ता वगैरे गोष्टींत जास्त रस असतो. असं ते सगळं होतं.

प्रश्न - सुलभा महाजनच्या नवऱ्याचं पात्रदेखील अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारं आहे. यासाठी गिरीश कार्नाड यांना निवडले. याबद्दल काय सांगाल?

- नवऱ्याचं काम कुणी करायचं, हा प्रश्न होताच. सिनेमा दोन भाषांत असल्यामुळे ज्याला हिंदी आणि मराठी दोन्हीही येतं असा कुणीतरी पाहिजे होता. स्मिताने मला एक वेगळंच साकडं घातलं. ती मला म्हणाली, ‘‘जब्बार, या कथेतला नवरा मला कळालेला आहे. हे काम तुम्ही करायला हवे.’’ मी तिला म्हणालो, ‘‘मी या सिनेमात काम करत नाहीये आणि मी कधीच कोणत्याच सिनेमात काम करणार नाही. मी नाटकातसुद्धा आता काम करत नाही स्मिता. ‘अशी पाखरे येती’मध्ये माझा नाटकातला शेवटचा अभिनय होता. त्यालासुद्धा आता दहा वर्षं झाली आहेत! आणि मला फिल्म दिग्दर्शित करायची आहे. एका फिल्ममध्ये मी दिग्दर्शन आणि अभिनय अशा दोन्ही गोष्टी करू शकत नाही. मी गुरुदत किंवा राज कपूर नाहीये, मी साधा माणूस आहे. या दोनच माणसांना हे गणित कळलेलं आहे. मुळात आपल्याला चांगली फिल्म करायची आहे आणि माझं त्याकडे दुर्लक्ष होईल असं मला काहीही करायचं नाही.’’ या बाबतीत तेंडुलकरांनासुद्धा माझ्या कास्टिंगबद्दल काहीही आक्षेप नव्हता. पण मी तयार नव्हतो. मग कोण? माझ्या समोर नाव आलं - गिरीश कार्नाड. मी गिरीश कार्नाड यांना फोन केला, फिल्मबद्दल सांगितलं तर ते म्हणाले, ‘‘दिग्दर्शन तू करणार आहेस ना आणि तेंडुलकरांचं स्क्रिप्ट आहे? मग करू या. हीरोइन कोण आहे? स्मिता पाटील? मग काय! ही आपलीच फिल्म आहे. करू या.’’ असं गिरीश कर्नाड यांनी सांगितलं. हे झालं नवऱ्याच्या कास्टिंगबद्दल. 

त्याच्या भूमिकेबद्दल - पुढे सिनेमाच्या कथानकात एक असा भाग आहे, जिथे तो नवरा सुभाष आपल्या बायकोला म्हणजे सुलभाला आश्रमात भेटायला येतो आणि त्याची एक वेगळी कुचंबणा तिथे आहे. इतक्या दिवसांनंतर बायको भेटली तर त्याला वाटतं की आपल्या बायकोला जवळ घ्यावं, मिठीत घ्यावं, काहीतरी व्हावं. त्याची शरीराची भूक आहे, मनाची भूक आहे. पण त्याला ती संधी मिळत नाही. तिथे बायकांचा कलकलाट आहे. आणि त्याला सतत असं वाटतं की कोणीतरी खिडकीतून बघतंय. तो सतत असा बेचैन आहे आणि त्याच्या पुढच्या वागण्याची पार्श्वभूमी कुठेतरी इथे आहे की काय, असं आपल्याला वाटतं.

आपल्याला दुसऱ्या कुठल्यातरी बाईशी संबंध जोडायचे आहेत असं काहीही त्याच्या मनातसुद्धा नसतं. आपल्या मुलीला सांभाळायला आपली वहिनी आहे याची त्याला खात्री असते. म्हणून तर तो सुलभाच्या स्वप्नांच्या आड येत नाही. तिला सोडवायलाही जातो. त्याची मुलगी राणी गाडीपाशी जेव्हा तिला बिलगून रडत असते तेव्हा त्याला ते सहन होत नाही. तिथे गिरीश यांची अभिनयाची ताकद आपल्याला पाहायला मिळते. कास्ट करतानासुद्धा मी त्यांना हे म्हणालो होतो, ‘‘गिरीश, तुमच्यामध्ये एक पुरुषी डॉमिनन्स आहे. नुसता शारीरिकच नव्हे तर बौद्धिकसुद्धा आहे. तो या पात्रासाठी मला महत्त्वाचा वाटतो.’’ तिथे आम्ही एक प्रयोगसुद्धा केला आहे. ती आश्रमात जाण्याआधी घरातला एक सीन आहे जिथे तो अंघोळीला गेलेला असतो आणि तिला टॉवेल मागतो. तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिलं तर गिरीश तिथे अर्धनग्न आहे आणि हे नवराबायकोमधलं रोजचं नातं सोडून ती आश्रमात आलेली आहे. आणि तो जेव्हा तिला भेटायला आश्रमात जातो तेव्हा या सगळ्यात आपली पूर्वीसारखी असलेली बायको हरवली आहे आणि ती चक्क एक सार्वजनिक, सामाजिक बाई झालेली आहे असं त्याला वाटून जातं. तिने स्वतःचं अस्तित्व काय तयार केलंय याबद्दल त्याला काही म्हणायचं नाहीये; मात्र दोघांच्या नात्यांमधलं नवऱ्याचं अस्तित्व कुठेतरी हरवलं आहे असंही त्याला वाटतं. म्हणजे आपण आता हिच्या आयुष्यात नाही; फक्त ही आहे, या मुली आहेत आणि त्यांचे प्रश्न आहेत.

सुलभा आणि सुभाष यांच्या नात्यांमधल्या दरीची सुरुवात तेंडुलकरांनी फार छान पद्धतीने मांडली आहे असं मला वाटतं. शेवटी त्याचं रूपांतर सुभाषच्या या म्हणण्यात होतं, ‘‘माझ्या आयुष्यात एक दुसरी बाई आलेली आहे आणि ती राहणार.’’

आश्रमात आपल्या बायकोबरोबर त्याला एकच रात्र मिळते. एकमेकांबद्दलची जवळ येण्याची त्यांची मानसिक आणि शारीरिक तयारीसुद्धा झालेली असते. मात्र तेवढ्यात एका गर्भार मुलीला प्रसूती कळा सुरू होतात. सुभाषलाच ड्राइव्ह करत त्यांना दवाखान्यात पोहोचवावं लागतं. यादरम्यान तो एकटाच आश्रमात परत येतो आणि सुलभा त्या मुलीजवळ दवाखान्यात थांबलेली असते. रात्री उशिरा ती मुलगी दगावते आणि या दुःखाने जेव्हा सुलभा आश्रमात परत येते तेव्हा ती दुसऱ्या कुठल्याही मन:स्थितीत नसते. सिनेमातलं हे प्रकरण इतकं गुंतागुंतीचं आहे की, सतीचं वाण घेतलेल्या त्या बाईला आयुष्यामध्ये किती आणि काय काय सोसावं लागतं. एका बाजूला आपल्या नवऱ्याला आपल्या सोबत शारीरिक संबंध निर्माण करावेसे वाटतात आणि त्याच क्षणी कोणासोबततरी झालेल्या शरीरसंबंधामुळे दवाखान्यातल्या त्या मुलीचा गर्भारपणात मृत्यू होतो! हे सगळं तेंडुलकरांना म्हणायचं होतं.

आता, सुलभाच्या डोक्यात हे सगळं सुरू असताना ती कशी तिच्या नवऱ्यासोबत समरस होऊ शकेल? पण त्याच वेळी सुभाषच्या दृष्टिकोनातून हे सगळं असं नाहीये. त्याच्यासाठी ती मुलगी गेली हे वाईट झालं. पण तो ‘पण’ आहे पुढे. तो तिला म्हणतोसुद्धा, ‘‘मला हे सगळं तुझ्याइतकं समजत नाही, मी एक सर्वसामान्य माणूस आहे.’’ आश्रमातून जातानासुद्धा तो कसा निघून जातो ते बघा. ती गिरीश कार्नाड यांच्या अभिनयाची खासियत होती. त्यांनी मला सांगितलं होतं, ‘‘जब्बार, मला प्लीज फिल्ममध्ये जास्त संवाद बोलायला लावू नकोस. मी खूप ऑकवर्ड होतो.’’ त्यामुळे त्यांना कमीतकमी संवाद असतानासुद्धा त्यांच्या केवळ चेहऱ्यावरचे हावभाव आणि देहबोली यांतून ते पात्र कसे उभे राहील हे आम्ही दोघांनी कायम ध्यानात ठेवलं होतं.

प्रश्न - सिनेमातील इतर पात्रांबद्दल तुम्ही काय सांगाल?

- आता या फिल्मच्या इतर कास्टिंगमध्ये सुलभा महाजनच्या नवऱ्याचा एक भाऊ आहे जो डॉक्टर आहे. त्याची बायको आहे - माया. सुलभा महाजनची सासू आहे. आणि सुलभा व सुभाष महाजन यांची मुलगी आहे - राणी. यातील सासूच्या रोलसाठी, का कोण जाणे, मला सुनीताबाई देशपांडे आठवायच्या. मी पु. ल. देशपांडे यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो, तेव्हा भाई आणि सुनीताबाई दोघांनाही मी फिल्मची पटकथा सांगितली आणि म्हणालो, ‘‘यातला जो सासूचा रोल आहे तो तुम्ही करावा असं मला वाटतं. ती सासू प्रेमळही आहे आणि करारीसुद्धा आहे. आणि वहिनी, तुमचा चेहरा इतका फोटोजेनिक आहे की, मला अनेक वेळा वाटतं, ‘‘वी मिस्ड अ वन्डरफुल ॲक्ट्रेस इन द फिल्म इंडस्ट्री!’’ त्या म्हणाल्या, ‘‘हे बघ, तो ‘वंदे मातरम’ नावाचा सिनेमा मी आणि भार्इंनी एकत्र केला तो माझा शेवटचा सिनेमा. त्यानंतर कुठल्याही सिनेमात काम करायचं नाही हे मी मनाशी पक्कं केलेलं होतं. आणि आजही मी त्या मतावर ठाम आहे.’’ मी त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला, म्हणालो, ‘‘फिल्ममध्ये असं किती काम आहे? एकच तर तासाचं काम आहे, फार फार तर शूटिंगला दहा दिवस लागतील. पुण्यातच शूटिंग आहे.’’ त्यावर त्या भार्इंकडे बघत म्हणाल्या, ‘‘आणि? या तुझ्या या भाईला दहा दिवस एकटा सोडू मी!? समोर असलेलं पंख्याचं बटनसुद्धा त्याला माहीत नसतं!’’ त्यावर भाई म्हणाले, ‘‘अगं काय हे सुनीता! पंख्याचे बटन वगैरे जाऊ दे. जब्बार करतोय ना फिल्म आणि मला रोल आवडलाय. तू कर.’’ मी पुढचे दहा दिवस त्यांचा पिच्छा पुरवला, पण त्यांचं ते ठरलेलं होतं. मग, नंतर कुसुमताई कुलकर्णी सासूच्या भूमिकेसाठी आल्या.

सुभाषचा भाऊ म्हणून श्रीकांत मोघे माझ्या मनात आले. ते पात्र म्हणजे असा एक दिलखुलास डॉक्टर. सुलभा महाजनच्या मनातली बेचैनी समजून घेणारा तो दीर आहे. श्रीकांतला यात फार संवाद नव्हते तरीसुद्धा त्याच्या असण्याने ते पात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला मदत झाली. त्याची बायको म्हणून आशालता यांनी ‘माया’ची भूमिका केली आहे. या सिनेमातलं ते एक अतिशय गोड दाम्पत्य म्हणून मी त्यांना निवडलं. सुभाष आणि सुलभाची मुलगी ‘राणी’ हिची भूमिका पुर्णिमा गानू हिने केली आहे. असं ते सगळं होतं.  

प्रश्न - तेंडुलकरांनी लिहिलेल्या या सिनेमाच्या स्क्रिप्टला स्क्रीनवर उतरवत असताना आलेले काही अनुभव जाणून घ्यायला आवडेल. त्याबद्दल काय सांगाल?

- यातील दोन महत्त्वाचे अनुभव मी तुम्हांला सांगतो. पहिला, या सिनेमातला एक महत्त्वाचा सीन मला बदलायला लागणार होता. मूळ स्क्रिप्टमध्ये असं होतं की- सुलभा एकटी असते आणि तिला एक दुःस्वप्न पडतं. तर त्यात तेंडुलकरांनी असं लिहिलं होतं की, तिला जाग येते तेव्हा ती एका ट्रेनमध्ये असते आणि त्या ट्रेनमध्ये आपण एकटे आहोत असं तिच्या लक्षात येतं. त्यानंतर ती या डब्यातून त्या डब्यात पळत सुटते. गाडी थांबते. ती प्लॅटफॉर्मवर एकटी धावते आणि पुन्हा ट्रेनमध्ये, असं ते होतं. पण ‘रजनीगंधा’ फिल्ममध्ये बासू चॅटर्जी यांनी हे वापरलेलं होतं. मग मी तेंडुलकरांना विचारलं, ‘‘तुम्ही इथे जे दुःस्वप्न मांडलं आहे ते मी काहीतरी वेगळ्या पद्धतीने केलं तर चालेल का? आपलं जे आश्रमाचं लोकेशन आहे ते एका पातळीला रहस्यमय आहे आणि अंग थिजवून टाकणारंसुद्धा आहे. आपल्या असं लक्षात येतं की, जणू काही ती एखाद्या कोंडवाड्यात अडकलेली आहे. त्यातलं स्वयंपाकघर, त्या मोकळ्या खोल्या, ते मैदान, त्या उंच भिंती; ती जेव्हा स्वप्नातून जागी होते तेव्हा तिला त्या आश्रमातच कोंडल्यासारखं होतं, असं काहीतरी माझ्या डोक्यात आहे. ती तिथेच अडकली आहे आणि तिला बाहेर पडायची इच्छा आहे, पण तिला काही करता येत नाही. दु:स्वप्नाच्या शेवटी ‘‘दार उघडा! दार उघडा!’’ म्हणत जेव्हा ती रडत दारावर हात आपटत असते, तेव्हा तिला अंदाजसुद्धा नसतो की स्वत:च्या घरी परतल्यावर तिची व्यथासुद्धा या कोंडवाड्यातल्या बायकांसारखीच होणार आहे. आश्रमातल्या बायकांचं जे या समाजाने केलं किंवा त्यांच्या आयुष्यात आलेल्या पुरुषांनी केलं; तेच या स्वतःच्या ध्येयाने आश्रमात काम करायला गेलेल्या बाईला, जिचं त्याच विषयातलं उच्च शिक्षण आहे, तिच्याही वाट्याला हे अनुभव येणं चुकत नाही, अशा ठिकाणावर येऊन ते पोहोचतं. तेंडुलकरांनी जे काही बारकावे त्यात मांडले आहेत, त्यामुळेच हे सगळं उभं राहू शकलं. 

दुसरा अनुभव असा की, सुलभा महाजनची चौकशी होते तेव्हाचा भाग मला थोडा बदलावासा वाटला. मूळ कथेमध्ये असं होतं की तिच्यावर चौकशी बसते, ती निर्दोष आहे असं सिद्ध होतं आणि मग ती तिच्या घरी जाते. मी तेंडुलकरांना म्हणालो, ‘‘आपण तिच्याबद्दल एवढं सगळं मांडलं आहे तरी तिच्या मनात नेमकं काय आहे? म्हणजे त्या बायकांबद्दलची तिची व्यथा काय आहे हे सगळं कुठेतरी पटकथेत यायला हवं असं मला वाटतं.’’ त्यावर तेंडुलकर म्हणाले, ‘‘जब्बार, तुला सुलभा महाजनबद्दल जे काही म्हणायचं आहे ते स्मिताच्या डोळ्यांतून आणि अभिनयातून व्यवस्थित पोहोचतंय. तुला त्यात अधिक स्पष्टीकरण का द्यायचं आहे? तू अजिबात असा काही विचार करू नको.’’ मी आणखीन त्यांना थोडं पटवण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा ते म्हणाले, ‘‘जब्बार, हे नाटक नाहीये. हा सिनेमा आहे. सुलभा महाजनने इथे अधिक स्पष्टीकरण करायची गरज मला वाटत नाही.’’

पण हट्टाला पेटून मी त्यांना म्हणालो, ‘‘मी तुम्हांला शब्द देतो. तुम्ही मला प्लीज हा भाग लिहून द्या. आपण ते शूट करू आणि त्यानंतरसुद्धा तुम्हांला असं वाटलं की हे नकोय, तर मी ते काढून टाकीन.’’ ते म्हणाले, ‘‘नक्की ना? मला जर नाही पटलं तर तू ते नक्की काढून टाकशील?... बरं, मी काय लिहिणार आहे हे मला आत्ता लगेच माहीत नाहीये. बघू.’’ मी ‘हो’ म्हणालो. कारण मला विश्वास होता की जे काही येणार आहे ते शेवटी तेंडुलकर लिहिणार आहेत! काही दिवसांनी त्यांनी मला बोलावलं आणि अत्यंत थंड चेहऱ्याने ते म्हणाले, ‘‘तुला ते जे काही हवं होतं ते लिहून आणलं आहे. हे बघ.’’ मी ते वाचलं आणि अक्षरशः हरवून गेलो- असं काहीतरी ते विलक्षण होतं आणि चित्रपटामध्ये मौलिक भर घालणारं होतं. मी त्यांना म्हणालो, ‘‘तेंडुलकर, धिस इज द हायलाइट ऑफ द फिल्म!’’ त्यांना मात्र हे पटलेलं नव्हतं.

मी हे स्मिताला दाखवलं तेव्हा तिची अवस्थाही माझ्यासारखीच झाली. ती सुद्धा भारावली. माझ्या इतर सहकाऱ्यांशीसुद्धा मी बोललो की, या सीनचं टेकिंग हे संपूर्ण चित्रपटाच्या शैलीपेक्षा काहीतरी वेगळं असायला हवं. सौंदर्यशास्त्रातल्या एलियनेशन थेअरीसारखं हे आहे. आणि या सीनचा परिणाम संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतरसुद्धा अनेक दिवस प्रेक्षकांच्या मनामध्ये रेंगाळत राहील, असं काहीतरी आपल्याला करायचं आहे. म्हणजे अक्षरशः जणूकाही ती मुलगी कोर्टात बोलते आहे, पण तिथे कोर्ट नाहीये. ते नाट्यमय आहे, पण ते नाट्यमय वाटलं नाही पाहिजे. त्याचबरोबर तो मोनोलॉग आहे, तरीसुद्धा तो मोनोलोग वाटला नाही पाहिजे. त्यात असलेल्या वन पर्सन कमिटीची भूमिका सुभाष गोडबोले यांनी केली आहे. त्यांना मी सांगितलं होतं की, यात तुमचा अतिशय मोजका संवाद आहे. सुरुवातीला हावभावांवरून तो तिच्या मतांच्या विरुद्ध आहे असं वाटायला हवं आणि नंतर तिचं ऐकताना हळूहळू त्याचे हावभाव असे यायला हवे की, जणूकाही तो तिला समजून घेतोय. राजन आणि मी कॅमेरा बघत होतो आणि त्यात आम्ही मिड-क्लोज, क्लोज-अप आणि लाँगशॉट वापरले आहेत. त्यात ट्रॉलीसुद्धा वापरली आहे. तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर लक्षात येईल की, तो सबंध कॅमेरा त्या दोघांना असा घेरतो. ते दोघं एकमेकांपासून लांब बसलेले होते. त्यामुळे एक अंतर राहील आणि म्हणून त्याच्या खांद्यावरून शॉट घेतला की ती दिसायची आणि तिच्या खांद्यावरून शॉट घेतला की तो दिसायचा. मध्ये मध्ये टू-शॉट, म्हणजे त्यात दोघेही दिसतात असं आहे. त्यात लाइट इफेक्टसाठी सोर्स म्हणून राजनने एक टेबल लॅम्पसुद्धा वापरला होता.

हे सगळं पूर्ण झाल्यावर मी तेंडुलकरांना ते दाखवायला घेऊन गेलो. ते म्हणाले, ‘‘हं! तू हे जरा वेगळा ट्रीट केलं आहेस. तू हे संपूर्ण फिल्ममध्ये जोडून पाहिलं आहेस का? दुसरं कोणी पाहिलं आहे? राजन, तुला काय वाटतं?’’ राजन म्हणाला, ‘‘सर, मी कॅमेरामन आहे. हे तुम्ही खरं तर डॉक्टरांना विचारायला हवं. हे सगळं शूट करत असताना मी एकच गोष्ट लक्षात ठेवली होती की, स्मिता पाटील यांचा चेहरा खूप बोलका आहे; पण तरीसुद्धा संपूर्ण कॅमेरा फक्त त्यांच्यावर न ठेवता हा प्रयोग आम्ही करून पाहिला.’’ पुढे तेंडुलकर त्यांना म्हणाले, ‘‘तुला आवडलं आहे, हे लिहिलेलं? हा सीन खरंच वाटतो तुला घ्यावासा?’’

त्यावर राजन म्हणाला, ‘‘कऽऽऽय! हे तुम्ही लिहिलेलं तुम्हाला आवडलं नाहीये? आणि हा सीन राहणार नाही या सिनेमात? असं कसं? हा सीन म्हणजे एक सिनेमॅटिक हायलाइट आहे सर!’’ तेंडुलकरांच्या चेहऱ्यावर एक बारीकसं स्मित उमटलं. दाद देण्याची त्यांची ही एक खासियत होती.

प्रश्न - 1980 च्या काळात ‘उंबरठा’मध्ये तुम्ही लेस्बियनिझमचा समाजातून जाणीवपूर्वक दुर्लक्षित असलेला आणि ज्याबद्दल बोलायला संकोच वाटावा असा महत्त्वाचा विषय मांडला आहे. याबद्दल काय सांगाल?

- फिल्म करत असताना मला फक्त एक काळजी होती. ती म्हणजे, आम्ही त्यात लेस्बियनिझमचा म्हणजेच समलैंगिकतेचा विषय मांडला होता आणि भारतात या फिल्मच्या पूर्वी एकदाही हा विषय कुणीही हाताळलेलाच नव्हता. मी तेंडुलकरांना म्हणालो, ‘‘मला माहीत नाही, सेंसर बोर्ड याबद्दल काय करेल.’’ तेंडुलकरांचं त्यावर म्हणणं असं होतं, ‘‘आपण या विषयाबद्दल खूप सूचकपणाने मांडायला हवं.’’ मी विचार केला की हे करावं कसं? त्यासाठी आम्ही त्यामध्ये वसंत बापटांची कविता गाणं म्हणून वापरली -

‘चांद मातला, मातला त्याला कशी आवरू
अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू’

या गाण्याच्या कोरिओग्राफीसाठी माझ्या मनात असं होतं की, जणू काही एखादी स्त्री आणि पुरुष जितक्या प्रेमाने एकमेकांकडे पाहतात तसं त्या दोघींमध्ये होतंय असं यायला हवं. म्हणून मी राजनला सांगितलं की कॅमेऱ्याचं सगळं लक्ष या दोघींच्या चेहऱ्यांवर केंद्रित व्हायला हवं. या गाण्यानंतर त्या दोघी कुठे तरी गच्चीवर त्यांच्या नाजूक क्षणांत असताना इतर मुलींना सापडतात आणि पुढे त्यांना आश्रमातल्या इतर मुलींकडून जो काही त्रास दिला जातो वगैरे ते सगळं आहे. या संपूर्ण भागासाठी त्या दोन्ही मुली अत्यंत ताकदीच्या अभिनेत्री असणे गरजेचे होते. त्या मुलींना जेव्हा मी या विषयाबद्दल सांगितलं तेव्हा तो विषय अतिशय व्यवस्थित समजून घेऊन, कुठेही संकोच न करता त्या म्हणाल्या, ‘‘डॉक्टर, आपण हे करू.’’ त्यातली एक जी पुरुष पार्टनर म्हणून दुसऱ्या मुलीकडे बघत असते ती ‘जंगम’ नावाची भूमिका ‘व्हंय, मी सावित्रीबाई’ हे एकपात्री नाटक करणाऱ्या सुषमा देशपांडे यांनी केली आहे. त्यातील दुसरी पार्टनर ‘हिरवे’ जी कारकून असते, तिची भूमिका संध्या काळे यांनी केली आहे. आश्रमातल्या मुलींमध्ये सुगंधा नावाच्या एका अतिशय डांबरट मुलीची भूमिका आहे, जी ‘जंगम’च्या अंगावर गरम डाळ ओतते ती... ही भूमिका जयमाला काळे यांनी केली आहे. जयमाला अतिशय हुशार अभिनेत्री आणि नृत्यांगना. ‘चांद मातला मातला’ या गाण्याची संपूर्ण कोरिओग्राफी जयमाला काळे यांनी केली आहे. आम्ही ‘घाशीराम कोतवाल’ नाटक करायचो तेव्हा त्यामध्ये जयमाला लावणी करणाऱ्या मुलीची मुख्य भूमिका करायची. त्यामुळे मी तिला फक्त माझ्या मनातली थीम समजावून सांगितली की- ‘या दोन मुली आहेत, मात्र जसं लावणीमध्ये आपण वापरतो तसं, इथे जणूकाही एक पुरुष आहे आणि एक स्त्री आहे असं समजून तू हे गाणं कोरिओग्राफ कर.’ आणि तिने ते केलं! त्यामुळे ‘चांद मातला मातला’ हे गाणं खास त्या लेस्बिअन जोडप्यासाठी केलं आहे आणि मी तुम्हांला सांगतो की, सेन्सर बोर्डाने या संपूर्ण सिनेमाला एकही कट दिलेला नाही.

नंतरच्या काळात माननीय शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भाषणात अनेक वेळा हा मुद्दा मांडलाय की, ‘1980 च्या दशकात भारतात पहिल्यांदाच लेस्बिअनिझम या विषयावर जर कोणी सिनेमातून काही मांडलं असेल तर ते जब्बार पटेल यांच्या उंबरठा या मराठी सिनेमाने मांडलं आहे आणि मला हे सांगणं फार महत्त्वाचं वाटतं.’

प्रश्न - गाण्यांचा विषय निघालाच आहे तर, उंबरठा सिनेमातील गाणी अजरामर आहेत यात शंकाच नाही. सिनेमातील गाणी आणि संगीताच्या या प्रवासाबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल.

- ‘जैत रे जैत’पासून माझी आणि बाळासाहेबांची (हृदयनाथ) खूप दाट ओळख झाली होती. कारण जैत रे जैतमध्ये एकोणीस गाणी आहेत, त्यांचं संगीत त्यांनी केलेलं होतं. तेंडुलकरांच्या मते उंबरठामध्ये एक प्रार्थना सोडली तर संगीत करावं असं फार काही नव्हतं. सामनाच्या वेळेससुद्धा असंच झालं होतं. (ते मी साधनेच्या 2014 च्या दिवाळी अंकात सामनाविषयी दीर्घ मुलाखत देताना सविस्तर सांगितलेलं आहेच.) तर बाळासाहेबांना मी म्हणालो, ‘‘सध्या दोन गाणी माझ्या डोक्यात आहेत. एक, त्या मुली काहीतरी सेलिब्रेशन करतात तेव्हा एक गाणं करायचं आहे. दुसरी, सगळ्यात महत्त्वाची- प्रार्थना!’’

त्यावर ते म्हणाले, ‘‘डॉक्टर, जैत रे जैतच्या वेळी आपण दीदींचं एक गाणं घेतलं होतं. कारण त्यात मला दीदी एकदाच दिसली होती. ‘उंबरठा’चं मात्र तसं नाहीये. या चित्रपटाच्या थीममध्ये मला फक्त दीदीचाच आवाज दिसतो. तुम्ही दोन दिवसांनी या. माझ्या डोक्यात एक कल्पना आहे.’’ दोन दिवसांनी मी गेलो तर बाळासाहेब मला म्हणाले, ‘‘माझ्याकडे बाबांची एक चीज आहे ती घ्यायची म्हणतो आहे.’’ तिलक कामोद रागातील मास्टर दीनानाथ यांनी स्वरबद्ध केलेली, एकताल मधील, ‘वितरि प्रखर तेजोबल। करि जन समरनिरत। हरूनि दयाल मोहजाल॥’  ही चाल त्यांना वापरायची होती. त्याचे शब्द कुणी करावेत हा प्रश्न माझ्या समोर होता. 

माझा एक चॉइस कायम असा राहिलेला आहे की, संगीतकारानेच कवी निवडायचा. बाळासाहेब असं म्हणाले की, आपण वसंत बापटांना हे करायला सांगू या. ते उत्तम करतील.’’ आणि वसंत बापटांनी ‘गगन सदन तेजोमय, तिमिर हरून करुणाकर, दे प्रकाश, देई अभय’ लिहिलं. ते बाळासाहेबांना आणि दीदींना प्रचंड आवडलं. म्युझिक ॲरेंजमेंटसाठी अमर हळदीपूरकर आले. सिम्फनीच्या पद्धतीचा एक फार वेगळा वापर भारतीय संगीत पद्धतीने अमरने यात मांडला. आणि ‘गगन सदन’चं रेकॉर्डिंग झालं. त्यानंतर वसंत बापट यांचंच ‘चांद मातला मातला’ हे गाणं केलं.

आता पुढे प्रश्न असं होता की, सुलभाला नवऱ्याची आठवण येते आहे आणि तिथे गाणं करायला हवं असं मला वाटलं. आम्ही तसं बापट सरांना सांगितलं. तर त्यांच्या मनामध्ये तिथला तो आश्रम, त्या मुली, त्यांच्याबद्दलची करुणा अशा भावनेतून ‘मला दुःख जाहले वगैरे’ असे काहीतरी शब्द येत होते आणि मला व बाळासाहेबांना ते मनापासून पटत नव्हतं. आम्हांला काहीतरी नवीन प्रतिमा हव्या होत्या. नंतर एके दिवशी बाळासाहेबांनी एक वही काढली आणि मला वाचायला दिली. त्यात एक गीत होतं - ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे.’ ते म्हणाले, ‘‘हे आपल्या सिच्युएशनला एकदम करेक्ट आहे, पण हे जयश्री गडकर यांच्या सिनेमासाठी सुरेश भटांनी लिहिलेलं आहे. मला तरी वाटतं की, बाईंचा हा सिनेमा काही होणार नाही. कारण गेली वर्षभर ही कविता माझ्याकडेच आहे. तर तुम्ही जयश्रीबाईंशी एकदा बोला. मी फोन लावून देतो.’’ जयश्रीबाईंना फोनवर विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, ‘‘मी जो सिनेमा प्रोड्युस करणार होते त्याचं मला नाही वाटत, पुढे काही होणार आहे. तुम्हांला त्या गाण्याचं काही करायचं आहे का?’’ मी त्यांना ‘उंबरठा’बद्दल सांगितलं तर त्या म्हणाल्या, ‘‘जब्बार, माझ्या आवडीचं गाणं तुमच्या सिनेमात जर कुठे व्यवस्थित बसणार असेल तर तुम्ही ते घेतलेलं मला मनापासून आवडेल.’’ आणि असं ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’ हे गाणं अलगदपणे उंबरठ्यात आलं.

लतादीदी गाणे रेकॉर्ड करण्यासाठी स्टुडिओमध्ये आल्या. त्या दिवशी स्मितासुद्धा आली. ते गाणे रेकॉर्डिंग करत असताना एका शब्दावर मी अडकलो. मूळ लिहिलेल्या गाण्यात अशा ओळी होत्या- ‘पुन्हा पुन्हा भास होत आहे, कुणीतरी आरशात आहे.’ आता, या ओळीमधल्या ‘कुणीतरी’ या शब्दावर मी अडकलो होतो. माझ्या दृष्टीने ती हे तिच्या नवऱ्याबद्दलच म्हणते आहे तर तिला ते ‘कुणीतरी’ आरशात आहे असं का वाटेल? सुरेश भटांना आम्ही फोनवर हे बोललो तर ते म्हणाले, ‘‘मी विचार करतो.’’ त्या दिवशी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये नेमक्या शांताबाई शेळकेसुद्धा होत्या. गाण्यातील एका शब्दामुळे रेकॉर्डिंग थांबलेलं आहे, असं कळल्याबरोबर त्यांनी मला विचारलं. माझं म्हणणं समजून घेतल्यानंतर त्यांनी एका क्षणात सांगितलं, ‘कुणीतरी’ हा शब्द काढून तिथे ‘तुझे हसू’ असं टाका नाऽऽऽ!’’ बाळासाहेबांनी सुरेश भटांना पुन्हा फोन केला तर खूश होऊन सुरेश भट म्हणाले, ‘‘शांताबाईने केलं आहे का हे? हा त्यांचा शब्द चपखल बसेल. घेऊन टाका.’’ मग त्या गाण्याचं रेकॉर्डिंग पूर्ण झालं. सगळ्यांच्या मनाप्रमाणे ते झालं. स्मिता गाणं ऐकताना अचानक रडायला लागली, इतकी ती त्या गाण्याशी समरस झालेली होती.

आता आणखीन एका गाण्याबद्दल- सुलभा टांग्याने आश्रमापर्यंत प्रवास करते, एक नवीन आव्हान घेऊन. तर या टांग्यातल्या प्रवासावर आणि तिच्या निग्रहीपणाबद्दल मला एक पार्श्वगीत हवं होतं. तिथे आम्ही सुरेश भटांनी लिहिलेलं ‘गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे’ हे गाणं केलं. रवींद्र साठे यांनी त्या गाण्याचं सोनं केलं.

आता मी सांगितलं की, मराठी आणि हिंदी दोन्ही व्हर्जन्सचं शूटिंग आम्ही एकत्रच करत होतो. तर गाण्यांचंही आम्ही तसंच केलं होतं. हिंदीमधले गाण्यांचे शब्द सुप्रसिद्ध कवी पंडित नरेन्द्र शर्मा यांचे होते. ती गाणी आम्ही स्वतंत्रच हिंदीत केली होती. ते मराठी गाण्यांचं भाषांतर वगैरे नव्हतं. ‘गगन सदन’प्रमाणेच दीदींचं ‘तुम आशा विश्वास हमारे’ हे गाणंसुद्धा प्रचंड गाजलेलं आहे. लतादीदी आवर्जून ते गाणं त्यांच्या मोठमोठ्या मैफलीत, नुसतं भारतात नव्हे तर परदेशातसुद्धा गायच्या.

अशा प्रकारे ही फिल्म एकाच वेळी दोन्ही भाषांत शूट केली आहे. मराठीचा सीन शूट करून झाला की लगेच हिंदीचा सीन शूट व्हायचा. मराठीत ‘उंबरठा’ आणि हिंदीमध्ये ‘सुबह’ या नावाने हे सिनेमे आलेले आहेत. दोन्हीही फिल्मचे निगेटिव्ह वेगवेगळे आहेत. वसंत देव यांनी त्याचे हिंदी संवाद लिहिलेले आहेत.

तर, या सिनेमांच्या गाण्यांचा असा प्रभाव आहे की, आजसुद्धा विविध गाण्यांच्या स्पर्धेत गाणाऱ्या नवीन मुली येतात तेव्हा एक तर ‘सामना’तील दीदींचं ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ किंवा ‘जैत रे जैत’मधील ‘मी रात टाकली’ किंवा ‘उंबरठा’मधील ‘सुन्या सुन्या मैफिलीत’ वा ‘गगन सदन’ ही गाणी जर गाणार असतील तर त्या मुलींचा गाण्यांचा स्तर हा वरच्या दर्जाचा आहे असं समजलं जातं. दीदींची ही चार गाणी म्हणजे जणूकाही गाणाऱ्यांची लिटमस टेस्ट आहे असं समजलं जातं. खरं तर, हे सगळं सांगताना मला यातून बाळासाहेबांचं महत्त्व संगीत दिग्दर्शक म्हणून अधोरेखित करायचं आहे. त्यांची कविता किंवा गाण्यांची निवड अगदी अनवट आहे. चित्रपटाची थीम समजून घेणं आणि त्या गाण्याला आवाज जास्त कुणाचा चांगला वाटेल हे ठरवणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. जैत रे जैतमध्ये आशाताईंचा आवाज जास्त वापरला गेलाय, तर उंबरठामध्ये लतादीदींचा प्रभाव आहे. ‘उंबरठा’ आणि ‘सुबह’ मिळून एकूण आठ गाणी आहेत जी दीदींनी गायली आहेत. मात्र यातल्या एकाही गाण्यासाठी माझ्याकडून बाळासाहेबांनी आणि दीदींनी एकही रुपया घेतलेला नाही. लतादीदींच्या आवडत्या सिनेमांपैकी उंबरठा हा एक सिनेमा होता आणि त्यातील गाणी त्या त्यांच्या कार्यक्रमांमध्ये आवडीने गायच्या.

प्रश्न - ‘उंबरठा’ करायला घेतला, त्या काळापर्यंतच्या बहुतांश हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये स्त्रीचे पात्र हे निर्णय घेणारे किंवा खऱ्या अर्थाने व्यक्त होणारे सहसा दाखवले जात नव्हते. तुमच्या सिनेमात असं केलं म्हणून त्याला तीव्र विरोध होण्याची शक्यता नाकारता येणार नव्हती. या पार्श्वभूमीवर ‘उंबरठा’चा शेवट कसा ठरला? त्याबद्दल ऐकायला आवडेल.

- सुलभा जेव्हा आश्रमातून घरी परत येते आणि तिला सुभाष सांगतो, ‘‘तू माझी पत्नी आहेस आणि या घरावर तुझा संपूर्ण हक्क आहे. तुझा मालकीहक्क तसाच राहणार आहे. पण एक सांगतो की, माझ्या आयुष्यात आता दुसरी स्त्री आलेली आहे आणि हे नातंसुद्धा कायम राहणार आहे.’’ हे ऐकल्यानंतर सुलभा स्तब्ध होते आणि तिचा बांध फुटतो व ती रडतच कोसळते. फिल्म तिथेच संपते असं तेंडुलकरांनी लिहिलं होतं. ‘‘ती कोसळणारच रे जब्बार... भारतीय स्त्री आणखी काय करणार?’’ माझ्या हातात पटकथा देताना तेंडुलकर अगदी हताशपणे म्हणाले होते. मी विचारलं, ‘‘ती काहीच करत नाही?’’ ते म्हणाले, ‘‘कोण करतं? कुठल्या बाईने केलं आहे? तुझ्याकडे अशी उदाहरणं आहेत का? आपल्याला हे दाखवायचं आहे की त्या ज्या आश्रमामधल्या मुली होत्या, ज्यांचं समाजाने शोषण केलेलं आहे आणि त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी जी बाई आलेली आहे ती नंतर त्यांच्यापैकीच एक झालेली आहे. खरं तर हा चित्रपटाचा तार्किक शेवट आहे.’’ मी म्हणालो, ‘‘असं नाही होऊ शकत तेंडुलकर... मी ज्या पद्धतीने या व्यक्तिरेखेला या चित्रपटात आकार द्यायचा प्रयत्न केला आहे आणि स्मिताने ते तिच्या अभिनयातून जीव ओतून ठाशीवपणे मांडलं आहे, ते लक्षात घेता मला वाटतं मी मांडलेली व्यक्तिरेखा हे असं सहन करणार नाही.’’

खरं तर मी माझ्या डॉक्टरकीच्या दौंडमधल्या प्रॅक्टिसमध्ये खूप स्त्रिया पाहिल्या आहेत. माझी बायको ही तिथे स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. आकडी येणाऱ्या लहान मुलाला एक इमर्जन्सी इंजेक्शन देण्यासाठीसुद्धा अगदी मोठ्या घरातल्या बायका आणि शेतकऱ्यांच्या बायका ‘‘थांबा, माझ्या सासूला किंवा नवऱ्याला विचारून सांगते. मगच इंजेक्शन द्या,’’ असं म्हणायच्या. या बायका कोणताही निर्णय घ्यायला धजावायच्या नाहीत. अगदी शेतातसुद्धा कोणीतरी काहीतरी गैरप्रकार केला असेल तरी आपल्या मुलीला घेऊन संपूर्ण दवाखाना रिकामा होईपर्यंत आईवडील थांबायचे. ती मुलगीसुद्धा तोंडातून एक अक्षर काढायची नाही. एखादी विधवा बाई असेल किंवा अन्य कुणी... हा आपला समाज आहे... तेंडुलकरांनी आश्रमाच्या मुलींमध्ये एका मुस्लिम मुलीचे पात्रसुद्धा लिहिले आहे. तिचा नवरा ते केस सुंदर असल्यामुळे तिला वाईट नजरेने कुणी पाहू नये म्हणून तिचे केस कापून टाकतो आणि तिला चक्क तलाक देतो! अशा प्रकारच्या श्रीमंत, मध्यम वर्गीय आणि गरीब बायका, कुठल्या ना कुठल्यातरी पेचात अडकतात आणि त्या प्रत्यक्षात आश्रमात नसल्यातरी घरातच अडकतात. त्यांचं अस्तित्व घरात असूनसुद्धा या आपल्या चित्रपटातल्या आश्रमासारखंच होतं, ही सगळी परिस्थिती आपण सगळ्यांनी समाजात अगदी जवळून पाहिलेली आहे.

म्हणून मी तेंडुलकरांना म्हणालो, ‘‘एवढ्या सगळ्या परिस्थितीमधून आलेल्या मुलींना सावरण्याची इच्छा असलेली आणि आंतरिक शक्ती असलेली सुलभा हताश झालेली आहे, असह्य झालेली आहे असं दाखवणं मला योग्य वाटत नाही. आता तिचा पुढचा प्रवास काय असेल हे मला माहीत नाही; पण चित्रपट इथं संपवणं मला योग्य वाटत नाही.’’ तेंडुलकर थोडा वेळ शांत राहिले. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, ‘‘मी बघतो काय करता येईल ते.’’ त्यांनी पाच-सहा दिवसांनंतर नवीन लिखाण माझ्याकडे दिलं आणि मला म्हणाले, ‘‘हे मी जरा वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. माझ्या मनाविरुद्ध नाहीये हं... तू असं समज की नव्वद टक्के बायकांना हे आवडणार आहे, फक्त मनात! पण त्यांना आवडणार हे निश्चित. जब्बार, मात्र प्रत्यक्ष तुला सांगताना कदाचित त्या म्हणतील की आम्हांला हे आवडलेलं नाही. तुला काही करायचंच असेल तर आता तू सुलभाला मुक्त कर. मी जरा कठोर निर्णय घेतलाय. मी तिला घराबाहेर काढतो आहे आता. ...आणि मला तुझा हा आग्रह आवडलाय. तुला महिलांसाठी काही तरी सकारात्मक करायचं आहे असं मला दिसतंय. तू कर. मात्र, ती मुक्त झालेली आहे हे कसं करशील ते तू बघ.’’

सुभाषला तिचं घर सोडून जाणं पसंत नाही. तो तिची भरलेली बॅग रिकामी करतो तरी तिचं मात्र पक्कं ठरलेलं आहे. घराच्या खिडकीतून ती हळूच मुलीकडे बघते आणि खात्री करून घेते की, तिला काकूच्या रूपाने एक आई मिळालेली आहे. खिडकीतून बघत असताना ती मुलगी एक इंग्रजी कविता म्हणत असते. तिथे आम्ही लॉर्ड अल्फ्रेड टेनिसन यांची ‘व्हॉट डज लिटिल बर्डी से?’ ही कविता वापरली आहे. ‘देन शी फ्लाइज अवे’ या ओळी राणी म्हणत असतानाच ट्रेनचा आवाज सुरू होतो. सुलभा शेवटी ट्रेनमध्ये खिडकीजवळ बसलेली आहे. लांब पसरलेल्या आकाशाकडे तिची नजर आहे. आणि तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आहे. तिथे मी राजनला म्हणालो, ‘ही फ्रेम आपण इथंच फ्रीज करू या.’ आणि मग फ्रीज झालेल्या फ्रेमवरती शेवटच्या क्रेडिट टायटल्स सुरू होतात. पार्श्वभूमीला गाण्याचे हे शब्द उमटायला लागतात-

‘भवमोचन हे लोचन तुजसाठी दोन दिवे
कंठातील स्वर मंजूळ, भावमधुर गीत नवे
सकलशरण मनमोहन सृजन तूच, तूच विलय
गगन सदन तेजोमय’

प्रश्न - ‘उंबरठा’ प्रदर्शित झाल्यानंतर नेमके काय घडले? सिनेमा कशा प्रकारे स्वीकारला गेला?

- उंबरठा प्रदर्शित झाला तेव्हा त्याच्या प्रीमिअरला पु.ल. देशपांडे आले होते. ते म्हणाले, ‘‘मुळात हा विषय सिनेमाचा होऊ शकतो का असा प्रश्न असताना, हे जे काही तुम्ही केलेलं आहे ते फार उत्तम जुळून आलेलं आहे. हृदयनाथने संगीत अतिशय सुंदर दिलेलं आहे आणि ही मुलगी जी आहे स्मिता पाटील- तिने जे काही काम केले आहे ते कल्पनाशक्तीच्या पलीकडचे आहे. मराठी सिनेमाच्या या सगळ्या गदारोळात हा ‘उंबरठा’ सिनेमा येतो आणि त्यात ही स्मिता पाटील नावाची मुलगी जे काही करते ते म्हणजे तांबटांच्या गल्लीतून जात असताना अचानक सतारीचे सूर ऐकू यावे असे आहे!’’

या सिनेमाबद्दल पुष्कळ चर्चासत्रे झाली. सफाई कामगार किंवा इतर कामगार ज्या महिला होत्या त्यांना हा सिनेमा खूप सकारात्मक वाटला होता. मात्र मध्यम वर्गीय ज्या महिला होत्या त्यांना असं वाटत होतं की, संपूर्ण सिनेमा चांगला आहे. पण ती घर आणि मुलीला सोडते हे त्यांना मान्य होत नव्हतं. सिनेमाबद्दलच्या प्रतिक्रियेचं एक उत्तम आणि साधेपणाचे उदाहरण सांगतो-

मी सिनेमाच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पुण्यातील प्रभात टॉकीजला गेलो, सिनेमाबद्दल काय रिॲक्शन्स येत आहेत हे पाहण्यासाठी. सगळेच लोक मला ओळखतात असं काही नव्हतं. सिनेमा सुटल्यावर बाहेर आलो तर एक रिक्षा उभी होती आणि मला स्टेशनला जायचं होतं. मी ती रिक्षा घेतली. रिक्षावाल्याशी माझा झालेला संवाद असा होता-

तो म्हणाला, ‘‘साहेब, तुम्ही हा पिक्चर बघितला आहे का?’’

मी म्हणालो, ‘‘बघितला. का ओ?’’

त्यावर तो म्हणाला, ‘‘अहो, दोन आठवडे झाले हा पिक्चर फुल गर्दीत चालला आहे. काय वेगळं आहे या सिनेमात मला बघायचं आहे.’’

मी विचारलं, ‘‘का ओ? काय झालं?’’

तो म्हणाला, ‘‘अहो काय सांगायचं साहेब, सिनेमा संपल्यावर नवरा-बायको माझ्या रिक्षामध्ये बसतात आणि बसल्या-बसल्या जे काही भांडण सुरू होतं ते घर येईपर्यंत संपत नाही. नवरा म्हणतो- ‘काय आहे या सिनेमात आवडण्यासारखं?’ तर बायको म्हणते- ‘का आवडू नये? सांगा मला.’ त्यावर नवरा म्हणतो- ‘म्हणजे काय? बाई कधी असं घर सोडून जाते का?...’ साहेब, तुम्ही मला एक सांगा, या सिनेमात ती बाई काही वेगळी वागली आहे का?’’

मी म्हणालो, ‘‘हो. काय आहे की तिच्या नवऱ्याच्या आयुष्यात एक दुसरी बाई येते.’’

त्यावर तो त्वरित म्हणाला, ‘‘हां? दुसरी बाई येते? आणि म्हणून ही बाई घर सोडून जाते? मग तर फर्स्ट क्लास आहे! असंच करायला पाहिजे. अच्छा! म्हणून हे नवरा-बायको माझ्या रिक्षामध्ये बसून भांडत असतात काय! अहो साहेब, मी तरी कधी बायकांना इतकं भांडताना बघितलेलं नाही. सिनेमातल्या विषयांवर अशा भांडतात की नवरा गप्पच बसतो! त्या चक्क नवऱ्याला विचारतात- ‘तिने घर सोडलं तर इतकं वाटतं आहे. समजा- ती गेली बाहेर नोकरी करायला आणि तिलाच कोणी बाप्या भेटला, तर चालेल का तुम्हाला?...’ यावर नवरा म्हणतो की असं काही नसतं. तर बायको म्हणते- ‘असं काही नसतं म्हणजे? आम्हां बायकांना अधिकार नाहीयेत का?’ नवरा म्हणतो- ‘जाऊ दे आता. आपण हा विषय बंद करू या’ असं म्हणत अनेक जोडपी गेल्या दोन आठवड्यांत भांडताना मी पाहिली आहेत साहेब!’’

त्या रिक्षावाल्याच्या या कमेंटमध्ये सर्वसाधारण माणसाला वाटणारं सगळंच आलं होतं.

भारतभरात जिथे जिथे महिलांची अधिवेशने झाली तिथे बहुतांश ठिकाणी पहिल्यांदा हिंदीतली ‘सुबह’ फिल्म दाखवली गेली आहे. बरं, तिथे अशा वादाच्या चर्चा व्हायच्या आणि महिला प्रश्न विचारायच्या- ‘‘सिनेमात जे दाखवलं आहे त्याच्या बरोबर उलट घडलं असतं आणि त्या बाईने समजा अफेअर केलं असतं तर काय? तो टाकूनच देणार होता ना तिला? मग या बाईने त्याला टाकलं तर काय झालं?’’ सोलापूरलासुद्धा एक परिसंवाद झाला होता ज्यात स्मिता स्वतः हजर होती. त्यातही अनेक प्रश्नांची उत्तरे तिने अगदी व्यवस्थित दिली. मूळ वादाचा मुद्दा- ‘तिने घर आणि मुलगी सोडून जाणं’ हाच असायचा. अगदी, सिनेमाला नॅशनल ॲवॉर्ड मिळाले तेव्हा रात्री डिनर पार्टीत ज्यूरी असलेल्या अशोक कुमार आणि बी. आर. चोप्रा यांच्यातसुद्धा अशाच प्रकारच्या प्रश्न-उत्तरांची मैफिल रंगली होती. अशोक कुमार अगदी मोकळ्या मनाने विचारायचे, ‘‘तिचं काय चुकलं?’’ तर बी. आर. चोप्रा नेमक्या विरुद्ध विचारांचे होते. त्यामुळे या सिनेमाला खूप वेगळ्या प्रकारे स्वीकारलं गेलं आणि सिनेमासुद्धा चांगला चालला असं मी म्हणेन. सरासरी, बहुतेक ठिकाणी हा सिनेमा पंधरा ते वीस आठवडे रेग्युलर चार शोजमध्ये गर्दीत चालायचा.

एकदा मला सुधीर नांदगावकर यांचा फोन आला आणि ते म्हणाले, ‘‘अटल बिहारी वाजपेयी मुंबईत आहेत आणि त्यांना तुमचा उंबरठा सिनेमा बघण्याची इच्छा आहे.’’ त्या वेळेला दादर-टीटीला ब्रॉडवे नावाचं एक थिएटर होतं आणि तिथे अटलजी फिल्म बघायला येतील असं ठरलं. त्यांच्या सोबत त्यांच्या कार्यकर्त्या महिलासुद्धा फिल्म बघण्यासाठी आल्या होत्या. मी अटलजींच्या समोर गेलो. तेव्हा ते मिश्कीलपणे म्हणाले, ‘‘जब्बार पटेल आप हैं? क्या ‘घाशीराम कोतवाल’ आपने किया हैं? आप तो बडे युवा लग रहें हैं! हमें तो लगा था, की घाशीराम करने वाला व्यक्ती कोई पचास-साठ साल का होगा, लेकिन आप तो बड़े यंग लग रहे हैं।’’

मी त्यांना म्हणालो, ‘‘आप जो फिल्म देखने के लिए आए हैं, उस की एक हिंदी कॉपी भी है जिसका नाम है ‘सुबह’। हमें थोड़ा पहले पता होता तो हम वह कॉपी अरेंज कर देते।’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘अरे नहीं नहीं, हमें तो मराठी ही देखनी हैं। आपके घाशीराम कोतवाल के बारे में भी हमें किसी ने बताया था कि वह हिंदी में भी होता है, लेकिन वह भी हमने मराठी में ही देखा था। ‘...श्री गणराय नर्तन करी। आम्ही पुण्याचे बामन हरी। क्यों बराबर हैं?’’ मी म्हणालो, ‘‘जी हां! ये सब आपको बिलकूल याद है।’’ असा सगळा तो संवाद झाल्यावर फिल्म सुरू झाली. त्यांनी संपूर्ण फिल्म लक्ष देऊन पाहिली. फिल्म संपल्यावर ते मला म्हणाले, ‘‘आपको मैं जब्बार कहूं या डॉक्टर कहूं?’’ मी म्हणालो, जे काही तुम्हांला म्हणावंसं वाटेल. पुढे ते म्हणाले, ‘‘देखो भैया जब्बार, इस फिल्म में यह जो लड़की है ना? इसने हमको बहुत रुलाया। हमें इस लड़की का नंबर चाहिए। यह शिवाजीराव पाटील की लड़की है न? साखर संघवाले शिवाजीराव? वह सोशलिस्ट हैं, हमारे मित्र हैं। आपके पास उनके लड़की का नंबर है तो जरा बात करवाइए।’’ तिथे फोन होता. मी स्मिताला फोन लावला. ती नेमकं घरी होती. मी तिला म्हणालो, ‘‘स्मिता, अटल बिहारी वाजपेयी यांना तुझ्याशी बोलायचं आहे. त्यांनी आता आपली फिल्म बघितली आहे.’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘अरे काय हे! मला तुम्ही आधी नाही का सांगायचं? मी आले असते. केवढा मोठा कवी-माणूस आहे!’’ त्यांचा फोन घेतल्यानंतर ते दोघे कमीतकमी अर्धा-पाऊण तास तरी बोलत होते. अटलजी इतके भारावून गेले होते की ते पुन्हा पुन्हा तिला म्हणत होते, ‘‘अरे बेटी, तुमने हम को बहुत रुलाया।’’

फोन झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या सोबत आलेल्या महिलांना विचारलं, ‘‘हां कहिए, यह फिल्म कैसी लगी आप को?’’ त्या महिलावर्गाकडून ठरलेल्या मध्यम वर्गीय प्रतिक्रिया आल्या- ‘‘इनकी फिल्में बहुत अच्छी होती है अटल जी। इनकी जैत रे जैत हमने नहीं देखी, लेकिन इनकी सिंहासन हमने देखी है। पॉलिटिक्स पर है। अच्छी बनाई है।’’ त्यावर अटलजी म्हणाले, ‘‘मैं आपको ‘उंबरठा’ के बारे में पूछ रहा हूं। यह फिल्म आपको कैसी लगी?’’ त्यावर त्यांच्या- ‘घर कसं काय सोडते, मुलीला कसं काय सोडून जाऊ शकते,’ अशा प्रकारच्या ठरलेल्या प्रतिक्रिया आल्या. त्यावर अटलजी म्हणाले, ‘‘अच्छा, आप को यह सब गलत लगा? अच्छा- तो हमें अब यह बताइये, वैसे तो भगवान की दया से ऐसा ना हो, लेकिन अगर आपके पतिदेव ने कहा कि मेरे जीवन में और एक दूसरी औरत है और आप को उसके साथ अब रहना पड़ेगा। आप मेरी पत्नी रहोगी और वह भी मेरी जिंदगी में होंगी। तो क्या आप यह सहन करेंगी? आपको क्या लगता है? आपके जीवन में यह सब कभी नहीं होगा? शायद हो सकता है। तो ऐसी स्थिति में फिल्म में उस लड़की ने जो किया वो क्या गलत किया? ऐसे पति को तो छोड़ना ही चाहिए। जब्बार, आप की फिल्म में सबसे प्रभावशाली जो चीज है - वह है इस फिल्म का अंतिम क्षण! स्मिता के चेहरे पर जो एक हलका सा स्मित है वह बडा विलक्षण है और महत्वपूर्ण भी है।’’

नंतर कधीतरी, एका कामाच्या निमित्ताने अटलजींसोबत मी लालकृष्ण अडवाणी यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा अटलजींनी त्यांना ओळख करून देताना म्हटलं, ‘‘यह डॉक्टर जब्बार पटेल है। आपने इनकी फिल्म देखी है, उंबरठा? जिसमें वह बच्ची है स्मिता पाटील?’’

अडवाणी म्हणाले, ‘‘मैंने इन का नाम सुना है। लेकिन उंबरठा नहीं देखी है। क्या है क्या इस फिल्म की कहानी?’’

मी म्हणालो, ‘‘एक महिला आश्रम की कहानी हैं, जिस में स्मिता पाटील उसकी मुख्य संचालिका होती है और...’’ मी हे बोलत असताना अडवाणीजी मध्येच म्हणाले, ‘‘क्या गिरीश कार्नाड इस में इनके पति हैं?’’

‘‘जी हां!’’ मी म्हणालो.

पुढे अडवाणीजी म्हणाले, ‘‘अरे! इस फिल्म को तो मैंने हिंदी में देखा है, ‘सुबह’ नाम से। और मैंने उसका ऑर्गेनाइजर में रिव्यू लिखा है। वह आप की फिल्म है? बहुत बढ़िया है।’’ अडवाणीजी हे आत्ता-आत्तापर्यंत ऑर्गनायझरमध्ये नवीन आलेल्या काही फिल्म्सचे रिव्ह्यू लिहायचे.

स्मिताच्या कामावर अटलजी अत्यंत खूश होते. मध्ये कधी तरी एकदा भेटले तेव्हा ते हळहळून म्हणाले, ‘‘वह बेचारी बच्ची चली गई, उसने मुझे बहुत रुलाया।’’ स्मिता पाटीलच्या अकाली जाण्याचं त्यांना प्रचंड दुःख झालं होतं.

या संदर्भातली अजून एक गोष्ट मला इथे आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे मा. शरद पवार आणि शिवाजीराव पाटील यांचं राजकीय नातं तर होतंच; मात्र त्याचबरोबर कौटुंबिक स्नेहसुद्धा होता. शरदराव यांच्या मनामध्ये स्मिताबद्दल एक चांगली अभिनेत्री म्हणून खूप कौतुक असायचं. स्मिताच्या अचानक जाण्याचं शरदराव यांच्या चेहऱ्यावरसुद्धा इतकंच तीव्र दुःख मी जवळून पाहिलेलं होतं. मला आठवतं, स्मिता गेली तेव्हा शरदराव मला म्हणाले, ‘‘आपल्याला नायर हॉस्पिटलमधून तिला आणायला गेलं पाहिजे.’’ नायर हॉस्पिटलमधून तिच्या घरापर्यंत तिच्या पार्थिवासोबत आमच्या बरोबर शरदरावांनी सोबत केली. अगदी तिला शेवटचा निरोप देईपर्यंत...

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बहुमोल योगदान करणाऱ्या कलाकारांच्या नावाने एक मेमोरिअल लेक्चर असतं. जसं सत्यजित राय यांच्या नावाने कलकत्ता फेस्टिव्हलला, अरविंदाचं केरळच्या फेस्टिव्हलला, पुण्यामध्ये तेंडुलकरांच्या नावाने- तसं मुंबईला यशवंत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (धखऋऋ), शरदरावांनी सुचवलं की आपण स्मिताच्या नावानं इथे मेमोरिअल लेक्चर करू या.

तर, राजकारणात असताना, त्याच वेळी कलेच्या क्षेत्रातील लोकांचे योगदान समजून घेण्याचे भान असणाऱ्या अटलजी, अडवाणीजी आणि शरदराव यांच्या या स्मिता आणि ‘उंबरठा’बद्दच्या आठवणी!

प्रश्न - उंबरठा या सिनेमाने भारतीय महिलांना नव्याने विचार करायला भाग पाडलं असं म्हणायला काहीच हरकत नाही. हा सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा स्क्रीन केला गेला होता. तिथले अनुभव नेमके काय होते?

- सुबह फिल्मचे राइट्‌स गुल आनंद यांच्याकडे होते. ते मला म्हणाले, ‘‘जब्बार, ही फिल्म मॉस्को फिल्म फेस्टिव्हलला दाखवायची आहे. मला असं वाटतं की तुम्ही आणि स्मिता पाटील दोघांनीही मॉस्कोला जाऊन आपल्या फिल्मचं प्रमोशन करावं. त्यानंतर आपण ही फिल्म रिलीज करू.’’ म्हणून मी आणि स्मिता मॉस्कोला गेलो. तिथे आम्हांला उत्तम रिसेप्शन मिळालं आणि त्यापेक्षाही उत्तम रिसेप्शन आम्हांला बल्गेरियामध्ये मिळालं. तिथल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ही फिल्म दाखवण्यात आली. तिथे या फिल्मला इंटरनॅशनल फ्रीपेसी ॲवॉर्ड मिळालं. तिथल्या वारना (तरीपर) जे इंटरनॅशनल प्रेस असतं ते हे ॲवॉर्ड देतं. या फिल्म फेस्टिव्हलच्या दरम्यान इंग्लिश सबटायटल्स नव्हते. त्याला बल्गेरियन भाषेत पॅरा-डबिंग यायचं. म्हणजे मराठी संवाद येणार आणि नंतर कानातल्या हेडफोनमध्ये बल्गेरियन भाषेत तो संवाद ऐकायला येणार असं ते होतं. आणि ज्या ठिकाणी सिनेमा पाहताना आपल्या भारतीय बायका इमोशनली डिस्टर्ब व्हायच्या त्या सगळ्या ठिकाणी या बल्गेरियातील बायका इमोशनली रिॲक्ट झाल्या. सिनेमा संपल्यावर दिग्दर्शकाची ओळख करून दिल्यानंतर त्या बायकांनी अक्षरशः मला घेरलं. पंचेचाळीस ते साठ वर्षांच्या बायका सिनेमाबद्दल अतिशय इंप्रेस झाल्या होत्या आणि विशेषतः त्या सतत स्मिताच्या अभिनयाबद्दल बोलायच्या.

आणखीन एक असं होतं, बीएफआय (ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट) ने लंडनमध्ये एक विमेन्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केलेलं होतं. त्याचं निमंत्रण पहिल्यांदा स्मिताकडे आलं. त्यांनी तिला निरोप दिला की, ‘तुमची उंबरठा फिल्म आम्हांला फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवायची आहे. त्यामुळे तुम्ही आणि तुमच्या दिग्दर्शकांनी लंडनला यावं.’ म्हणून लंडनला आम्ही दोघेही गेलो आणि तिथली ही एक आठवण फार गमतीशीर आहे-

तिथल्या लोकांना फिल्म आवडली. त्याला इंग्लिश सबटायटल्स केलेली होती. त्यांनी त्याच्यामध्ये इंटरव्हल केलं आणि इंटरव्हलमध्ये मला कोण भेटलं असेल? ज्यूली क्रिस्टी! ‘डॉक्टर झिवागो’ नावाच्या सिनेमातील ओमर शरीफ यांनी केलेल्या डॉक्टर झिवागो या पात्राच्या प्रेयसीची, अतिशय ताकदीची भूमिका करणारी त्या काळची फार मोठी ब्रिटिश अभिनेत्री. अगदी हॉलीवुडमध्येसुद्धा गाजलेली! ज्यूली क्रिस्टी यांनी शशी कपूर यांच्या सोबत ‘हिट अँड डस्ट’ नावाची एक फिल्म केलेली होती. त्या निमित्ताने त्यांनी भारत पाहिलेला होता आणि म्हणून त्यांना उंबरठा सिनेमाबद्दल उत्सुकता होती असं त्यांनी सांगितलं. मध्यंतरात त्या मला म्हणाल्या, ‘‘जब्बार, मला त्या मुलीला भेटायचे आहे. ती इथे आलेली आहे का?’’ मी त्यांना सांगितलं, ‘‘हो, ती काही शॉपिंग करण्यासाठी बाहेर गेली आहे. थोड्या वेळात यायलाच हवी.’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मी तिच्यासाठी थांबते.’’ आम्ही सिनेमा संपल्यावर तिथेच बाहेर असलेल्या एका कॉफी शॉपमध्ये बसलो होतो. तेवढ्यात स्मिता दोन्ही हातात चार-चार बॅगा घेऊन चालत आली. आल्या आल्या ती उत्साहात मला म्हणाली, ‘‘हांऽऽऽ! अरे घ्या ना जरा बॅगा. काही कर्टसी वगैरे आहे की नाही!!’’ मी तिला हळूच म्हणालो, ‘‘सगळं आहे. आधी माझ्या बाजूला कोण बसलं आहे ते बघ.’’ तिने मला हळूच विचारलं, ‘‘कोण आहे?’’ मी म्हणालो, ‘‘ज्यूली क्रिस्टी.’’ तसे तिने हातातल्या बॅगा खाली टाकल्या आणि ती दोन्ही हात गालावर ठेवून आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिली. तिथून पुढे साधारण एक तासभर त्या दोघी एकमेकींच्या अभिनयाबद्दल मनमोकळ्या गप्पा मारत होत्या. ‘‘तू हा सीन कसा केला?’’, ‘‘या सीन मध्ये तू नेमकं काय केलं?’’ वगैरे... ते चित्र बघणंसुद्धा फार विलक्षण होतं. त्यानंतर केरळ फिल्म फेस्टिव्हल मध्ये ज्यूली क्रिस्टी ज्यूरी म्हणून आलेल्या होत्या. त्या वेळी आम्ही भेटलो. तेव्हा त्यांना उंबरठा सिनेमाची आठवण झाली आणि त्यांनी स्मिताच्या अचानक जाण्याबद्दल मला विचारलं. त्यांना सगळं सांगितल्यानंतर त्या प्रचंड हळहळल्या. स्मितासारख्या मुलीला करण्यासारखं अजून खूप काही होतं, असं त्यांनाही वाटलं.

प्रश्न - स्मिता पाटील हा विषय आजही अनेकांसाठी एक अत्यंत सेन्सिटिव्ह विषय आहे यात वादच नाही. मी शेवटच्या प्रश्नाकडे येते. ‘उंबरठा’ हा सिनेमा ज्या सगळ्या विषयांना हात घालतो, त्या विषयांच्या बाबतीत म्हणावा तसा बदल व्हायला कदाचित अजून शंभर वर्षं लागतील! तरीही, गेल्या चाळीस वर्षांत या बाबतीत तुम्हांला काय बदल झालेले दिसतात?

- काहीसा बदल असा झालेला आहे, तेव्हाच्या मानाने लग्न आणि लग्नामध्ये स्त्रियांना दाबून टाकणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या जरा मोकळ्या झाल्या आहेत. आता महिलासुद्धा करिअरिस्ट असू शकते. तिला करिअर करता येतं. त्याचबरोबर एक असा चांगला बदल झाला आहे की- नाही पटलं तर नाही पटलं, इथपर्यंत स्त्री पोहोचलेली आहे. आत्ताच्या काळात अनेक वेळेला जेव्हा मी ‘सतरा ते पंचवीस’ या वयोगटातील मुलींना भेटतो तेव्हा त्या आवर्जून सांगतात, ‘‘सर तुमचा उंबरठा सिनेमा खूप आवडला.’’ मला प्रश्न पडतो, ‘‘तुझं वय सतरा आहे. मग त्या सिनेमातलं तुला काय रिलेट झालं असणार? किंवा तुझ्या आयुष्यातला एकही प्रश्न त्या सिनेमात असेल का?’’ त्यावर त्या म्हणतात, ‘‘सऽऽर, सगळे आमचेच तर प्रश्न त्यात आहेत!’’

त्या सिनेमाबद्दलचा अजून एक कनेक्टिंग पॉइंट असा आहे की, या मुलींना जी गोष्ट त्या सिनेमाकडे नेते आणि ती म्हणजे- ‘‘वी आर मिसिंग धिस वुमन - स्मिता.’’ या सगळ्यांच्या बोलण्यात हा मला फार कॉमन पॉइंट वाटतो. अगदी हिंदी सिनेमातले लोक जरी मला भेटले तरी ते म्हणतात, ‘‘जब्बार, तुम्ही फार लकी आहात. तुमच्याकडे स्मिता पाटील ही अभिनेत्री होती.’’ आणि लोक इतक्या काळानंतरसुद्धा सिनेमाशी या कनेक्ट करत असण्याचे दोन महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत ते म्हणजे - विजय तेंडुलकर आणि स्मिता पाटील.

तेंडुलकरांनी ज्या पद्धतीने ती फिल्म लिहिली, त्यातला संवाद विशेषतः ती शेवटची इन्क्वायरी. पंचेचाळीस वयोगटाच्या वरच्या ज्या बायका आहेत त्यांना तर हा सिनेमा त्यांचाच वाटतो.

आणि त्याच्या शेवटाबद्दल सांगायचं झालं तर ते एक गृहीतक आहे असं समजा. एक दिग्दर्शक म्हणून मी काही तुम्हांला ‘तुमचे लग्न मोडा’, असं सांगितलेलं नाहीये. मी सांगितलं आहे की, ‘तुम्ही सुलभा महाजनबरोबर या सिनेमातून स्वच्छ मनाने प्रवास करा. कुठपर्यंत करू शकणार आहात तुम्ही? तिथपर्यंत करा!’

वैयक्तिक नातेसंबंधाच्या बाबतीत स्त्री मोकळी झालेली आहे असे दिसते. त्यात स्त्री आणि पुरुष दोघांचेही श्रेय आहे. तरीसुद्धा, सुलभा महाजनचं समाजाशी जे एक नातं आहे ते कुठेतरी बहुतांश स्त्रियांमध्ये अजूनही दिसत नाही. आणि हा सिनेमा हेच सांगतो की, स्त्रियांनी कुठे तरी समाजाला भिडलं पाहिजे. ‘तुम्ही घर सोडा’, असे तुम्हांला मी सांगत नाहीये; मात्र जे तुम्हांला वाटतं ते तरी तुम्ही सांगू शकता की नाही? हा सिनेमा तुम्हांला ते सांगण्याची शक्ती देतो. ‘उंबरठा’ ही फिल्म आपल्याला विचार करायला लावते. सिनेमात आहे तसंच्या तसं तुम्ही वागा असं मी किंवा तेंडुलकर - आम्ही - कधीही म्हणालेलो नाही. शेवटी, ‘सुलभा महाजन’सोबत तुमचा प्रवास कसा आणि कुठपर्यंत जाणार आहे हेही तुम्हीच ठरवायचं आहे.

संवादक व शब्दांकन : दिपाली अवकाळे
(मानसशास्त्र समुपदेशक व संचालक, स्वानुभव इंडिया ह्यूमन डेव्हलपमेंट प्रा. लि., पुणे)
deepaliawkale.25@gmail.com 

(40 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘उंबरठा’ हा संपूर्ण सिनेमा अडीच तासांचा असून, यू-ट्यूबवर उपलब्ध आहे.)

या मुलाखतीसोबत वापरलेली ‘उंबरठा’मधील सर्व छायाचित्रे NFDC - National Film Archive of India, Pune यांनी उपलब्ध करून दिली आहेत, त्यांना मन:पूर्वक धन्यवाद!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

जब्बार पटेल ( 5 लेख )

चित्रपट दिग्दर्शक 




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके