डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कृष्णा सोबती : ‘आतल्या’ आवाजाची लेखिका

कृष्णा सोबतींमधल्या लेखिकेचा स्वत:वर ठाम विश्वास असतो आणि आतल्या आवाजाचं ऐकून त्या काहीही करू शकतात. आपल्या काही कथासंग्रहांनंतर त्यांनी वयाच्या 27 व्या वर्षी ‘चन्ना’ नावाची पहिली कादंबरी लिहिली. ही कादंबरी लीडर प्रेसने छापली होती. लेखिकेची प्रत त्यांच्या हातात पडल्यावर कथानकामधील बदलासोबत त्यांची पंजाबी/ उर्दूमय हिंदी संस्कृतप्रचुर झाल्याचं पाहून त्यांना राग अनावर झाला. त्यांनी प्रकाशकांना ‘प्रकाशन थांबवा’ असा टेलिग्रामही केला. मात्र तोवर पुस्तकाच्या सर्व प्रती छापूनही झाल्या होत्या. लेखिकेने त्या काळात पुस्तकाच्या सर्व प्रती विकत घेऊन पाण्यामध्ये भिजवून लगदा केला. स्वत:च्या पहिल्या कादंबरीच्या स्वरूपाविषयी, आकृतिबंधाविषयी, भाषेविषयी ठाम राहून बदलवलेली कादंबरी लोकांपुढे येऊ न देण्याचा त्यांचा हा खटाटोप आजच्या प्रदूषित काळात वेडगळपणाचा व अव्यवहारी वाटेल. या कादंबरीचा पुढचा प्रवास आणखीच विलक्षण आहे. 

निवडणुकांच्या माहोलात साहित्यिक क्षेत्रातील एका बातमीकडे कदाचित आपलं दुर्लक्ष झालं असेल. ही बातमी म्हणजे हिंदीतल्या एका ज्येष्ठ लेखिकेला मिळालेल्या साहित्यातील सर्वोच्च म्हणजेच ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराची. खरं तर बातमी अशी असायला हवी होती की, त्यांनी ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारला. कारण 2010 मध्ये भारत सरकारचा ‘पद्मभूषण’ पुरस्कार त्यांना जाहीर झाला होता, तेव्हा त्यांनी तो नाकारला होता. अलीकडेच असहिष्णुतेच्या विरोधात 1980 मध्ये मिळालेला ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारही त्यांनी सरकारला परत पाठवला होता. पण ‘ज्ञानपीठ’ हा पुरस्कार शासनअंकित संस्थेकडून दिला जात नाही म्हणून त्यांनी तो स्वीकारला असावा. हिंदीमध्ये ‘महादेवी वर्मा’ यांच्यानंतर ‘ज्ञानपीठ’ स्वीकारणाऱ्या त्या दुसऱ्या महिला लेखिका होत. या स्वयंभू, अंतर्मनाच्या हाकेला ‘ओ’ देऊन निर्भय जगणाऱ्या लेखिकेचं नाव आहे ‘कृष्णा सोबती’. वय वर्षे 93. त्यांची लेखणी अव्याहतपणे सुरू आहे. या वर्षी दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत, तीन प्रस्तावित आहेत.

कृष्णा सोबती यांचा जन्म फाळणीपूर्व पाकिस्तानमधील गुजरात प्रातांतला. काश्मीर खोऱ्यातील या डोंगराळ प्रातांत दळणवळणाला घोड्याशिवाय दुसरे साधन नसायचे. त्यांची आई उत्तम घोडेस्वार होती. ओघानेच ‘चिनाब’ नदीच्या काठाने कृष्णा सोबतीही घोड्यावर बसून दौड करायच्या. त्यांचे वडील इंग्रज काळातल्या प्रशासकीय सेवेत होते. त्या वेळच्या प्रथेनुसार त्यांचं प्राथमिक शिक्षण ‘सिमला’ येथे झालं. हिंदीमधील प्रख्यात लेखक निर्मल वर्मा (लेखिका महादेवी वर्मा यांचे धाकटे बंधू) हे त्यांचे शाळासोबती. फाळणीपूर्व हिंदुस्तानात दिल्लीपेक्षा मोठे शहर ‘लाहोर’ मानलं जायचं. लाहोरमधल्या फतेहचंद महाविद्यालयात त्यांचे पुढील शिक्षण झाले. ‘कृष्ण बलदेव वैद’ हे नंतर ख्यातनाम झालेले लेखक त्यांचे त्या काळातले सहाध्यायी. यांना इंग्रजी विषय शिकवायच्या ‘तेजी सुरी’ (अमिताभ बच्चनची आई). पुढे फाळणीचं दु:ख ज्या अनेक नागरिकांच्या वाट्याला आलं, त्यांपैकी कृष्णादेखील एक. जगण्याचं साधन म्हणून राजस्थानातल्या सिरोही राजघराण्यात महाराजांच्या नातवासाठी त्यांनी दोन वर्षे शिक्षिका म्हणून नोकरी केली. कालांतराने त्या दिल्लीला परतल्या आणि दिल्लीच्याच झाल्या.

  कृष्णा सोबती यांच्या भाषेविषयी अनेकदा बोललं गेलं. जन्म उर्दू प्रांतातला, शालेय शिक्षण हिंदी माध्यमात, पुन्हा महाविद्यालयीन शिक्षण उर्दूच्याच आगारात. फाळणीनंतरचा मोठा काळ त्यांनी पंजाबी लोकसंस्कृतीत घालवला, तर काही काळ राजस्थानमध्येही वास्तव्य होतं. त्यांचं हिंदी हे उर्दू, पंजाबी आणि राजस्थानीमिश्रित आहे, असं अनेकांना वाटतं. त्या वेळचे प्रसिद्ध लेखक अमृतलाल नागर यांनी सोबती यांना भाषाशुद्धीचा सल्ला देऊन ‘लिखाणामध्ये पंजाबी, उर्दू, शब्द टाळा’ असा सल्ला दिला होता. मात्र ‘वाचक मला आज नाही, तर दहा वर्षांनंतर नक्कीच स्वीकारतील,’ असे आत्मविश्वासपूर्ण उत्तर त्यांनी दिले होते.

त्यांच्यामधल्या लेखिकेचा स्वत:वर ठाम विश्वास असतो आणि आतल्या आवाजाचं ऐकून त्या काहीही करू शकतात. आपल्या काही कथासंग्रहांनंतर त्यांनी वयाच्या 27 व्या वर्षी ‘चन्ना’ नावाची पहिली कादंबरी लिहिली. ही कादंबरी लीडर प्रेसने छापली होती. लेखिकेची प्रत त्यांच्या हातात पडल्यावर कथानकामधील बदलासोबत त्यांची पंजाबी/उर्दूमय हिंदी संस्कृतप्रचुर झाल्याचं पाहून त्यांना राग अनावर झाला. त्यांनी प्रकाशकांना ‘प्रकाशन थांबवा’ असा टेलिग्रामही केला. मात्र तोवर पुस्तकाच्या सर्व प्रती छापूनही झाल्या होत्या. लेखिकेने त्या काळात पुस्तकाच्या सर्व प्रती विकत घेऊन पाण्यामध्ये भिजवून लगदा केला. स्वत:च्या पहिल्या कादंबरीच्या स्वरूपाविषयी, आकृतिबंधाविषयी, भाषेविषयी ठाम राहून बदलवलेली कादंबरी लोकांपुढे येऊ न देण्याचा त्यांचा हा खटाटोप आजच्या प्रदूषित काळात वेडगळपणाचा व अव्यवहारी वाटेल. या कादंबरीचा पुढचा प्रवास आणखीच विलक्षण आहे.

राजकमल प्रकाशन यांनी हीच कादंबरी ‘जिंदगीनामा : जिंदा रुख’ या नावाने 1979 मध्ये प्रसिद्ध केली. याच कादंबरीला 1980 सालचा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार मिळाला. पुढे हिंदीमधल्या आणखी एक ख्यातनाम लेखिका अमृता प्रीतम यांचं ‘हरदत्त का जिंदगीनामा’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. या पुस्तकाचे सहलेखक हरदत्तजी होते. पुस्तकाच्या नामसाधर्म्यावरून सोबती यांनी कॉपीराईट कायदे-हक्कभंगाबाबत अमृता प्रीतम यांच्या विरोधात खटला दाखल केला. हा खटला दिवाणी न्यायालयात तब्बल 26 वर्षे चालला. या खटल्याचा निकाल पुढे अमृता प्रीतम यांच्या बाजूने लागला, तोवर त्यांना इहलोक सोडून सहा वर्षे झाली होती.

फाळणीचे दु:ख आजच्या पिढीच्या मानसिक अवकाशात येत नाही. इस्मत चुगताई, आदत हसन मंटो, खुशवंतसिंग हयांच्या कथा-कांदबऱ्यांपासून ते अगदी अलीकडचे चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या ‘पिंजर’सारख्या सिनेमांनाही फाळणीच्या व्यथांना वा त्यातील कथा- उपकथानकांना भिडायचे असते. दु:खांना भिडण्यासाठी साहस लागते. कोणत्याही गोष्टींवर कोणतीच भूमिका न घेऊ इच्छिणाऱ्या आजच्या कमालीच्या आत्ममग्न मध्यम व उच्च मध्यमवर्गीयांना जगण्याला आणि वाचनाला भिडायचे आहे, असे ठळकपणे आता दिसत नाही. बलराज साहनी, दिलीपकुमार, देव आनंद, सुनील दत्त या साऱ्यांनी फाळणीचे दु:ख भोगले होते. कृष्णा सोबती यांची ‘सिक्का बदल गया’ ही फाळणी विषयावरील गाजलेली कथा. सच्चिदानंद वात्सायन संपादक असलेल्या ‘प्रतीक’ मासिकामध्ये ही कथा छापून आली होती. या कथेनेच त्यांना व्यावसायिक लेखक होण्याचा आत्मविेशास दिला. बौद्ध भिक्षुकांच्या जीवनमार्गावरील ‘लामा’ आणि पाकिस्तानी, हिंदुस्तानी, पंजाबी महिलांच्या भावविश्वातत डोकावणारी ‘नफिसा’ हे त्यांचे सुरुवातीचे कथासंग्रह वाचकांना त्यांच्या आगमनाची वर्दी देणारे होते.

भारत-पाक फाळणी, स्त्री-पुरुष संबंध, भारतीय समाजाची व्यामिश्रता आणि गतिमानता, ऱ्हास पावत चाललेली मानवी मूल्ये या गोष्टी त्यांच्या लिखाणाचा मुख्य आशय असतात. जेव्हा बायकांच्या इच्छांविषयी, जगण्याविषयी इतर लेखक लिहायला कचरत होते; तेव्हा सोबतींची नायिका स्वायत्त, स्वतंत्र, खंबीर, बेधडक अगदी लैंगिकतेबाबत बोलत होती. कृष्णा सोबतींची सर्वाधिक वाचली गेलेली आणि गाजलेली कादंबरी म्हणजे ‘मित्रो मरजानी’. राजस्थानमधल्या डुंगर प्रांतांतील ‘मित्रो’ या महिलेचे भावविश्व आणि तिचे अस्सल प्रामाणिक मन समजून घेण्यासाठी ही कादंबरी वाचायलाच हवी.

या कादंबरीने अनेकांना भुरळ पाडलेली आहे. गोविंद नामदेव, सीमा विश्वास, हिमानी शिवपुरी ही नावे आणि चेहरे आता हिंदी सिनेमांमुळे प्रेक्षकांना परिचयाचे झालेले आहेत. यांच्यासोबत 21 कलाकारांना घेऊन ‘मित्रो’चा प्रयोग बी.एम. शहा यांनी एन.एस.डी.च्या ‘रंगमंडल’च्या माध्यमातून 1988 मध्ये केला होता. पुढे त्यांनीच दिल्ली  ‘आर्ट थिएटर’च्या माध्यमातून ‘मित्रो’चे काही प्रयोग केले. ‘मित्रो’ अनेक दिग्दर्शकांनी करून पाहिले. अगदी ‘सबा जैदी’ या वेगळ्या धाटणीच्या दिग्दर्शिकेनेसुद्धा.

‘मित्रो मरजानी’ हे पुस्तक नरेंद्र श्रीवास्तव यांच्या ‘टायपोग्राफिक’ सादरीकरणातून वेगळ्या धाटणीत राजकमल प्रकाशनने छापले. या पुस्तकातील एनएसडीच्या सौजन्याने छापलेली चित्रे व संवादात्मक टायपोग्राफी ही वाचकांना नाटकामध्ये आढळणारी गती, संवाद, मौन या साऱ्याच नाट्यछटांचा प्रत्यय वाचकांना देत राहते. मराठी वाचकांनी ही राजकमल प्रकाशनची ‘मित्रो’ची प्रत आवर्जून वाचावी आणि ‘मित्रो’चा हुंकार, आर्तता अनुभवावी इतके ते प्रत्ययकारी आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ‘मित्रो’बाबत होणारे हे सारे प्रयोग लेखिकेने नावाप्रमाणेच ‘सोबती’ने कुतूहलाने पाहिले आणि इतरांना आपल्या कलाकृतीवरचे प्रयोग स्वतंत्रपणे, खुलेपणाने करू दिले.

स्त्रीवादी असल्याचा शिक्का या कादंबरीवर अनेकांनी मारला. आपण महिला लेखिका आहोत, हा किताब सोबतींनी सदैवच नाकारला. मी स्त्रीवादी लेखिका नसून निर्मितिशील लेखिका आहे, असे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. सोबतींच्या नायिका या अत्याचाराच्या बळी कधीच दिसल्या नाहीत. त्यांच्या नायिका दु:ख आणि अभाव हे धैर्याने, हसतमुखाने स्वीकारताना आढळतात. सोबतींचा सहवास लाभलेले आशुतोष भारद्वाज यांच्या मते सोबतींच्या स्वभावात दु:ख, पश्चात्ताप, रितेपण अशा गोष्टी नसतात.

आता प्रौढांच्या सहजीवनाच्या स्वीकारार्हतेकडे भारतीय समाजमनाचा लंबक झुकत आहे. समाजात या भावना रुजण्यासाठी काही लोकांना जगरहाटीविरुद्ध जावे लागते. कृष्णा सोबती यांनीही ते अनेकदा ओलांडले. झाले असे की- त्यांना राहण्याच्या जागेबाबत काही समस्या आल्या होत्या, म्हणून त्या डोंगरी भाषेचे लेखक शिवनाथ यांच्या घरी राहायला गेल्या. पुढे त्यांच्यात अनुबंध निर्माण होऊन कृष्णा सोबतींनी वयाच्या 70 व्या वर्षी शिवनाथांशी लग्न केले. मयूर विहारमध्ये सायंकाळी या दोघा लेखक पती-पत्नींना चालताना पाहून अनेकांची मने मोहरून जायची. आता शिवनाथांच्या निर्वाणानंतर कृष्णा सोबतीने एकट्या आहेत. मात्र त्यांचे वाचन- मनन, लिखाण सुरूच असते. त्यांच्या मयूर विहारच्या घरामध्ये किती तरी अप्रकाशित कागद, हस्तलिखिते आहेत; ज्यामधून अनेक पुस्तके आकाराला येऊ शकतात. कृष्णा सोबती, कृष्ण बलदेव वैद, महादेवी वर्मा या लेखकांनी हिंदी साहित्याची अनेक दशके गाजवलेली आहेत; प्रभावित केलेली आहेत. ही लेखकमंडळी वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या निमित्ताने एकत्र भेटायची; जेवण, गप्पा-गोष्टी, चेष्टामस्करी आणि अधून-मधून पेयपानही करायची.

हिमाचल प्रदेशामध्ये सिमल्याला ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज’ नावाची विख्यात आणि नितांत सुंदर संस्था आहे. याच संस्थेच्या आवारात ‘ऑब्झरव्हेटरी हिल’ नावाची एक नयनरम्य इमारत आहे. मोठे लेखक, संशोधक, अभ्यासक या संस्थेमध्ये येऊन आपले लिखाण करतात. वाचन-मनन करतात. (नेमाडेंनी ‘हिंदू’चे काही खर्डे इथेच रेखाटले.) या संस्थेच्या तत्कालीन संचालिका मृणाल मिरी यांनी 1990 च्या शेवटाला कृष्ण बलदेव वैद म्हणजेच खासगीमधले के.बी. आणि कृष्णा सोबती या दोघांना एकत्र आणून कला, साहित्य आणि जीवनानुभवांवर गप्पा मारायला भाग पाडले होते. या गप्पा त्यांनी रेकार्ड करून ठेवल्या आहेत. पुढे या गप्पा एवढ्या रंगल्या आणि सुंदर झाल्या की, त्यातून ‘सोबतीवैद संवाद’ हे एक चिंतनपर पुस्तक वाचकांच्या नशिबी आले.

Tags: ‘मित्रो मरजानी’ ‘जिंदगीनामा : जिंदा रुख’ ‘चन्ना’ ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार कृष्णा सोबती jagdish jadhav Mitro Marjani Zindaginama: Zinda rukh Channa Jnanpith Award Krishna Sobti weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

जगदीश जाधव
jagdishjadhav20@gmail.com

लेखक राजस्थान केंद्रीय विश्वविद्यालय, अजमेर, राजस्थान येथे समाजकार्य विषयाचे अध्यापन करतात.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके