डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)


उर्दू व हिंदी या दोन्ही भाषांमधून कथा,  कादंबरी व नाटक हे तिन्ही साहित्यप्रकार हाताळणाऱ्या कृष्ण चंदर यांनी ‘जामून का पेड’ ही हिंदी कथा 1960 च्या दशकात लिहिली. आपल्या नोकरशाहीच्या कारभारावर उपरोध, उपहास व वक्रोक्ती यांच्या माध्यमातून दृष्टिक्षेप टाकणारी ही कथा आहे. 2015 पासून केंद्रीय शाळांच्या इयत्ता दहावीच्या हिंदी भाषेच्या पाठ्यपुस्तकात ही कथा आहे. मात्र सहा महिन्यांपूर्वी शिक्षण खात्याकडून असा आदेश आलेला आहे की, 2020 व 21 या वर्षी ही कथा विद्यार्थ्यांना शिकवण्यात येऊ नये, तिच्यावर परीक्षेसाठी प्रश्नही विचारले जाऊ नयेत. थोडक्यात, ही कथा अभ्यासक्रमातून मागे घेण्यात आली आहे. याचाच अर्थ पुढील वर्षी पाठ्यपुस्तके नव्याने छापली जातील तेव्हा त्यातून ही कथा वगळली गेलेली असेल. शिक्षण विभागाने या निर्णयाचे स्पष्टीकरण दिलेले नाही, कारणमीमांसा केलेली नाही. इथे त्या कथेचा अनुवाद प्रसिद्ध करीत आहोत, साधनाच्या वाचकांनी आपापले अंदाज लढवून त्या निर्णयाची कारणे शोधावीत अशी अपेक्षा आहे..!
... संपादक
 

रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वारा सुटला. सचिवालयाच्या लॉनवरील जांभळाचे एक झाड उन्मळून पडले. सकाळी जेव्हा माळ्याने ते पाहिले, तेव्हा त्या झाडाखाली एक माणूस दबला गेला आहे, असे त्याच्या लक्षात आले.

माळी पळत-पळत शिपायाकडे आला. शिपाई पळत-पळत लिपिकाकडे गेला. लिपिक पळत-पळत अधीक्षकाकडे गेला. अधीक्षक धावत-धावत लॉनवर आला आणि मग उन्मळून पडलेल्या त्या झाडाखाली दबलेल्या माणसाभोवती काही मिनिटांत गर्दी जमा झाली.

बिचारा! जांभळाचे झाड किती बहरलेले होते. एक लिपिक म्हणाला. ‘‘याची जांभळं किती रसदार होती!’’

दुसरा लिपिक म्हणाला. ‘‘मी फळांच्या मोसमामध्ये पिशवी भरून घेऊन जात असे... माझी मुलं या झाडाची जांभळं मोठ्या आनंदाने खात असत.’’

तिसऱ्या लिपिकाने डोळ्यात अश्रू आणत म्हटले, ‘‘पण हा माणूस...?’’ माळ्याने झाडाखाली दबलेल्या माणसाकडे बघत म्हटले,

‘‘अरे हो, हा माणूस!’’

अधीक्षक विचारात पडला.

‘‘माहिती नाही, तो जिवंत आहे की मेला आहे!’’ एका शिपायाने म्हटले.

‘‘मेला असणार. इतके मोठे झाड अंगावर पडल्यावर तो कसा वाचणार?’’ दुसरा शिपाई म्हणाला.

‘‘नाही, मी जिवंत आहे!’’ दबलेल्या माणसाने मोठ्या मुश्किलीने कण्हत-कण्हत म्हटले.

‘‘हा जिवंत आहे!’’ एका लिपिकाने आश्चर्याने म्हटले.

‘‘झाड बाजूला हटवून याला बाहेर काढायला हवे.’’ माळ्याने सल्ला दिला.

‘‘मला अवघड वाटते आहे.’’ एक नवा कर्मचारी म्हणाला, ‘‘झाडाचे खोड खूप मोठे आणि वजनदार आहे.’’

‘‘त्यात अवघड काय आहे?’’ माळी म्हणाला. ‘‘जर अधीक्षकसाहेबांनी हुकूम दिला, तर आत्ता आपण पंधरा-वीसजणं जोर लावून झाडाच्या खाली दबलेल्या माणसाला काढू शकतो.’’

‘‘माळी बरोबर बोलतो आहे.’’ बरेचसे लिपिक एकसाथ म्हणाले. ‘‘लावा जोर, आम्ही तयार आहोत.’’

एकदम खूप जणं झाड कापायला तयार झाले.

‘‘थांबा!’’ अधीक्षक म्हणाले. ‘‘मी अवर सचिवसाहेबांशी चर्चा करतो.’’

अधीक्षक अवर सचिवसाहेबांकडे गेले. अवर सचिव उपसचिवांकडे गेले. उपसचिव सहसचिवांकडे गेले. सहसचिव मुख्य सचिवांकडे गेले.

मुख्य सचिवासह सचिवाला काही म्हणाले, सहसचिव उपसचिवाला काही म्हणाले, उपसचिव अवर सचिव यांना काही म्हणाले. एक फाईल तयार झाली.

फाईल हलू लागली. फाईल पुढे-पुढे जात राहिली. यात अर्धा दिवस निघून गेला. लंच टाइमनंतर त्या झाडाखाली दबलेल्या माणसाभोवती खूप गर्दी जमा झाली होती. लोक वाट्टेल ते बोलत होते. काही धीट लिपिक पुढे झाले. त्यांनी या बाबतीत पुढाकार घ्यायचे ठरवले.

ते हुकमाची वाट न पाहता ते झाड हटवायची तयारी करू लागले होते. इतक्यात अधीक्षक फाईल घेऊन धावत-धावत आले. म्हणाले, ‘‘आपण स्वतः हे झाड इथून हलवू शकत नाही. आपण वाणिज्य विभागाशी संबंधित आहोत आणि हे झाड कृषी विभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे मी ही फाईल शेरा लिहून कृषी विभागाकडे पाठवतो आहे. तिथून उत्तर येताच हे झाड हटवण्यात येईल.’’

दुसऱ्या दिवशी कृषी विभागाकडून उत्तर आले की, झाड हटवण्याची जबाबदारी वाणिज्य  विभागाची आहे. हे वाचून  वाणिज्य विभागाला राग आला. त्यांनी ताबडतोब लिहिले की, झाड हटवण्याची किंवा न हटवण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. वाणिज्य विभागाचा याच्याशी काही संबंध नाही.

दुसऱ्या दिवशीदेखील फाईल चालत राहिली. संध्याकाळी उत्तरदेखील आले. आम्ही ही केस फलोद्यान विभागाकडे सोपवत आहोत, कारण ही केस फळझाडाची आहे. आणि कृषी विभाग फक्त धान्य आणि शेती यासंबंधी निर्णय करू शकते. तेवढाच अधिकार त्यांना आहे. जांभळाचे झाड हे फळझाड आहे. त्यामुळे हे झाड फलोद्यान विभागाच्या अधिकारक्षेत्रात येते.’

अर्थात लॉनच्या चारही बाजूला पोलीस पहारा होता. लोकांनी कायदा हातात घेऊन झाड हटवायचा प्रयत्न करू नये, हाच यामागचा उद्देश होता. पण एका पोलीस कॉन्स्टेबलला दया आली आणि त्याने माळ्याला त्या झाडाखाली अडकलेल्या माणसाला खाऊ घालायची परवानगी दिली. रात्री माळ्याने त्या झाडाखाली दबलेल्या माणसाला  वरण-भात खाऊ घातला.

माळ्याने त्या दबलेल्या माणसाला म्हटले, ‘‘तुझी फाईल चालली आहे. आशा आहे की, उद्यापर्यंत निर्णय होईल.’’

यावर दबलेला माणूस काही बोलला नाही.

माळ्याने झाडाच्या खोडाकडे पाहून म्हटले. ‘‘बरं झालं,  झाड तुझ्या कुल्ल्यावर पडले. कमरेवर पडले असते, तर तुझा कणाच मोडला असता.’’

दबलेला माणूस यावरदेखील काही बोलला नाही.

माळी पुन्हा म्हणाला, ‘‘इथे तुझा कुणी वारस असेल तर मला त्याचा पत्ता सांगून ठेव. मी त्याच्यापर्यंत ही बातमी पोहोचवण्याची व्यवस्था करतो.’’

‘‘मी अनाथ आहे.’’ दबलेल्या माणसाने मोठ्या मुश्किलीने सांगितले.

माळी दु:ख व्यक्त करून तिथून निघून गेला.

तिसऱ्या दिवशी फलोद्यान विभागाकडून उत्तर आले. उत्तर कडक आणि उपहासपूर्ण होते. फलोद्यान विभागाचे सचिव शिष्टाचार पाळणारे होते.

त्यांनी लिहिले : आश्चर्य आहे. या वेळी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही मोहीम सुरू आहे आणि आमचे काही अधिकारी मात्र झाड कापण्याचा सल्ला देत आहेत- तेही एक फळझाड तोडण्याचा. तोही जांभळाचे झाड तोडण्याचा सल्ला दिला जातोय, ज्याची फळं लोक मोठ्या चवीने खातात. आमचा विभाग हे झाड तोडण्याची परवानगी कधीही देणार नाही.

‘‘आता काय करणार?’’ एका धीट माणसाने विचारले.

‘‘जर हे झाड तोडता येत नसेल, तर या माणसाला कापून बाहेर काढावे. हे पाहा, तो माणूसही खुणेने हेच सांगतो आहे. या माणसाला मधून कापले, तर आर्धा माणूस या बाजूने निघेल आणि अर्धा माणूस दुसऱ्या बाजूने निघेल. मग झाड जागच्याजागी तसेच राहील.’’

‘‘पण अशा पद्धतीने तर मी मारून जाईन!’’ दबलेल्या माणसाने काळजीने सांगण्याचा प्रयत्न केला.

‘‘याचे म्हणणे बरोबरच आहे.’’ एक लिपिक म्हणाला.

माणसाला कापून बाहेर काढण्याचा प्रस्ताव मांडणाऱ्याने तो प्रस्ताव पुढे रेटायला सुरवात केली. ‘‘तुम्हाला माहिती नाही, आजकाल कापलेल्या माणसाला प्लॅस्टिक सर्जरीने पुन्हा जोडले जाऊ शकते.’’

आता ती फाईल वैद्यकीय विभागाकडे पाठवण्यात आली. वैद्यकीय विभागाने त्यावर लगेचच कार्यवाही केली आणि ज्या दिवशी फाईल मिळाली, त्याच दिवशी त्या विभागातील सगळ्यात यशस्वी प्लॅस्टिक सर्जनला चौकशी करण्यासाठी पाठवून दिले.

सर्जनने दबलेल्या माणसाचे चहू बाजूने निरीक्षण केले. त्याची प्रकृती पाहून, रक्तदाब-नाडी-हृदयाची तपासणी करून रिपोर्ट पाठवला. ‘या माणसाची प्लॅस्टिक सर्जरी   होऊ शकते आणि ऑपरेशनदेखील  यशस्वी होऊ शकते, पण माणूस मारून जाईल.’

त्यामुळे हा विचारही सोडून देण्यात आला.

रात्री माळ्याने त्या दबलेल्या माणसाच्या तोंडात खिचडीचे घास भरवत त्याला  सांगितले, ‘‘आता हा मामला वर गेला आहे. असं ऐकलंय की, साऱ्या सचिवांची मीटिंग होणार आहे. त्यात तुझ्या केसवर चर्चा केली जाईल. आशा आहे की, सगळं काही ठीक होईल.’’’

दबलेल्या माणसाने उसासा सोडत म्हटले, ‘‘हमने माना कि तगाफुल न करोगे। लेकिन ख़ाक हो जाएंगे हम, तुमको खबर होने तक!’’

माळ्याने  आश्चर्याने तोंडात बोटं घातली. तो म्हणाला, ‘‘तू शायर आहेस?’’

दबलेल्या माणसाने मान हलवली.

दुसऱ्या दिवशी माळ्याने शिपायाला सांगितलं. शिपायाने लिपिकाला. लिपिकाने मुख्य लिपिकाला. थोड्या वेळातच ही गोष्ट सचिवालयापर्यंत पोहोचली की, झाडाखाली दबलेला माणूस शायर आहे.

बस, मग काय... लोक झुंडीने शायरला बघायला येऊ लागले. याची बातमी शहरात पसरली. संध्याकाळपर्यंत गल्ली-बोळातून शायर जमायला सुरुवात झाली. सचिवालायाचे लॉन शायरांनी भरून गेले. सचिवालयामधील किती तरी लिपिक आणि अवर सचिव यांना शायरी आवडत होती. तेही थांबले.

काही शायर त्या दबलेल्या माणसाला आपली शायरी ऐकवू लागले. काही लिपिकांनी आपल्या काव्यातील चुका विचारायला सुरुवात केली.

जेव्हा समजले की, दबलेला माणूस शायर आहे- तेव्हा सचिवालयाच्या उपसमितीने  निर्णय घेतला की, हा माणूस शायर असल्याने या माणसाचा संबंध कृषी विभागाशी नाही की फलोद्यान विभागाशी नाही, तर फक्त सांस्कृतिक विभागाशी आहे.

सांस्कृतिक विभागाला विनंती करण्यात आली की, लवकरात लवकर या प्रकरणाचा निकाल लावून त्या शायराला त्या सावली देणाऱ्या झाडापासून मुक्ती देण्यात यावी.

ती फाईल सांस्कृतिक विभागात अनेक टेबलांवर फिरून सचिवाकडे पोहोचली. बिचारा सचिव या वेळी आपल्या गाडीतून सचिवालयामध्ये पोहोचला आणि दबलेल्या माणसाची मुलाखत घेऊ लागला.

‘‘तू शायर आहेस?’’ त्याने विचारले.

‘‘जी हाँ.’’ त्या दबलेल्या माणसाने उत्तर दिले.

‘‘कोणत्या नावाने लिहितोस?’’

‘‘अवस.’’

‘‘अवस!’’ सचिव किंचाळलाच. ‘‘कायऽऽ तू तोच आहेस का, ज्याचा कवितासंग्रह ‘अवस के फूल’ अलीकडेच प्रकाशित झाला आहे?’’

दबलेल्या शायरने या गोष्टीवर फक्त मान हलवली.

‘‘तू आमच्या अकादमीचा मेंबर आहेस?’’ सचिवाने विचारले.

‘‘नाही.’’

‘‘आश्चर्य आहे!’’ सचिव किंचाळलाच.  ‘‘अवस के फूलचा कवी आणि आमच्या अकादमीचा मेंबर नाही? चूक झाली आमच्याकडून. किती मोठा शायर आणि कुणाला माहितीदेखील नाही!’’

‘‘सध्या मी या झाडाखाली दबलो आहे... कृपा करून मला या झाडाखालून बाहेर काढा.’’

‘‘आत्ता व्यवस्था करतो’’ सचिव म्हणाला. आणि त्याने आपल्या विभागात जाऊन घाईघाईने अहवाल सादर केला.

दुसऱ्या दिवशी सचिव पळत-पळत त्या शायराकडे आला आणि म्हणाला, ‘‘मुबारक हो. मिठाई खाऊ घाल. आमच्या सरकारी अकादमीने तुला केंद्रीय समितीचा सदस्य म्हणून निवडले आहे! हे घे निवड झाल्याचे पत्र.’’

‘‘पण तुम्ही मला या झाडाखालून बाहेर काढा.’’ त्या दबलेल्या माणसाने कण्हत-कण्हत म्हटले. त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याच्या डोळ्यांवरून वाटत होते की, त्याला खूप त्रास होतो आहे.

‘‘हे आम्ही करू शकत नाही.’’ सचिव म्हणाले. ‘‘जे आम्ही करू शकत होतो, ते आम्ही केले. आम्ही हेदेखील करू शकतो की, जर तू मेलास तर तुझ्या पत्नीला नुकसानभरपाई देऊ शकतो.’’

‘‘पण मी जिवंत आहे.’’ शायर थांबत-थांबत म्हणाला.  ‘‘मला जिवंत ठेवा.’’

‘‘हे अडचणीचे आहे.’’ सरकारी अकादमीचा सचिव हात चोळत म्हणाला. ‘‘आमचा विभाग फक्त सांस्कृतिक बाबींशी संबंधित आहे. यासाठी आम्ही वन विभागाला लिहिले आहे.’’

संध्याकाळी माळ्याने येऊन त्याला सांगितले, ‘‘उद्या वन विभागाची माणसे येऊन हे झाड कापतील आणि तुझी सुटका होईल.’’

माळी खूप खूश होता. पण त्या दबलेल्या माणसाची अवस्था बिकट होत चालली होती. तो जीवनाची लढाई लढत होता. त्याला उद्या सकाळपर्यंत कसे तरी जिवंत राहायचे होते.

दुसऱ्या दिवशी वन विभागाची माणसे करवती आणि कुऱ्हाडी घेऊन झाड तोडण्यासाठी आली, तेव्हा त्यांना अडवण्यात आले. विदेश विभागाकडून तसा आदेश आला होता.

त्याचे कारण असे होते की, दहा वर्षांपूर्वी हे झाड पिटोनियाच्या पंतप्रधानांनी ते भारत भेटीवर आले तेव्हा लावलेले होते. आता जर हे झाड कापले गेले तर, त्यांचे आणि आपले संबंध कायमचे बिघडण्याची शक्यता होती.

‘‘पण एका माणसाच्या प्राणाचा प्रश्न आहे!’’ एक लिपिक रागाने ओरडला.

‘‘दुसऱ्या बाजूला दोन देशांतील संबंधांचा प्रश्न आहे.’’ दुसऱ्या लिपिकाने पहिल्याला समजावले. ‘‘आणि हे तर लक्षात घे की, आपल्या देशाला त्यांच्याकडून किती तरी निधी मिळतो. मग आपण या मैत्रीसाठी एका माणसाच्या प्राणाची आहुती देऊ शकत नाही?’’

‘‘शायरने मरणे आवश्यक आहे?’’

‘‘हो.’’

अवर सचिवाने अधीक्षकांना सांगितले, ‘आज पंतप्रधान बाहेरच्या देशाच्या दौऱ्यावरून परत आले आहेत. ‘‘आज विदेश विभाग ती फाईल त्यांच्यासमोर सादर करेल. ते जो निर्णय घेतील, तो सगळ्यांना मंजूर असेल.’’

संध्याकाळी पाच वाजता स्वतः अधीक्षक शायरची फाईल घेऊन त्याच्याजवळ आले. ‘‘ऐकलंस का?’’ येताच फाईल हलवत आनंदाने किंचाळले. ‘‘माननीय पंतप्रधानानी झाड कापायला मंजुरी दिली आहे आणि या घटनेची सगळी आंतरराष्ट्रीय जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आहे. उद्या हे झाड कापले जाईल आणि तुझी या संकटातून सुटका होईल. ऐकलंस का? आज तुझ्या फाईलवर निर्णय झाला!’’

अधीक्षकांनी  शायरच्या दंडाला स्पर्श करून म्हटले. पण शायरचा हात थंड पडला होता, डोळे निर्जीव झाले होते. मुंग्यांची एक मोठी रांग त्याच्या तोंडात जात होती.

त्याच्या जीवनाची फाईलदेखील तयार झाली होती.

(मराठी अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ)

 

कृष्ण चंदर (1914-77)

कृष्ण चंदर यांचा जन्म व सुरुवातीचा कालखंड आताच्या पाकिस्तानात गेला. त्यानंतर कथा-कादंबरी व नाटक हे तीनही साहित्यप्रकार त्यांनी विपुल प्रमाणात हाताळले. काही चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या. त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानितकेले होते. ‘सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कारा’ने गौरविण्यात आले होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपली लेखणी सोडली नाही. दि.8 मार्च 1977 रोजी त्यांचे मुंबईमध्ये निधन झाले, त्या वेळी त्यांच्या हातात लेखणी होती. मृत्यूच्या वेळी ते एक व्यंग्य लिहीत होते. त्यांनी फक्त एक ओळ लिहिली होती, त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. शेवटच्या दिवसांत ते आत्मकथेवर काम करीत होते, पण ती त्यांच्या हातून पूर्ण झाली नाही. त्यानंतर त्यांची पत्नी सलमा सिद्दिकी यांनी ती पूर्ण केली. ते आयुष्यभर मानवतावादी राहिले. त्यांनी लेखनातून हिंदू-मुस्लिम यांच्यातील संघर्षाला नेहमी विरोध केला. समाजातील दलित-शोषित वर्गाच्या हक्कांसाठी त्यांची लेखणी नेहमी आग ओकत राहिली. आपले भावपूर्ण लेखन, जमिनीशी जोडली गेलेली पात्रं आणि ‘सर्वहारा वर्गा’चे सजीव चित्रण यासाठी ते वाचकांच्या मनात नेहमी जिवंत राहतील.

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

कृष्ण चंदर

(1914 - 1977) हिंदी व उर्दू लेखक 


Comments

  1. Shailesh Arvind Joshi- 20 Jun 2020

    Beautiful short story

    save

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके