Diwali_4 मुबाशिर हसन : पाकिस्तानचा जाणता राजा
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

मुबाशिर हसन : पाकिस्तानचा जाणता राजा

मला मुबाशिर हसन नेहमी एस. एम. जोशी यांच्यासारखे वाटत आले.  त्यांच्यात मला एस.एम. दिसायचे. मुबाशिर हसनचा स्वभाव देखील एस.एम. सारखा मृदू  पण विचारांशी कधी तडजोड न करणारा. दिसायला पण त्यांच्यासारखे सडपातळ. दंगली असो किंवा इतर काही, मुबाशिर  हसन घरी बसून  राहत नसत. अशा माणसांच्या जाण्यामुळे समाजाचे प्रचंड नुकसान होते. एस. एम. प्रमाणे मुबाशिर हसन यांच्या वाटेने चालणारे तरुण मोठ्या संख्येत पाकिस्तानात आढळतात.

‘पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस एन्ड डेमोक्रसी’चे आणि ‘ह्यूमन राइट्‌स कमिशन ऑफ पाकिस्तान’चे त्यांच्या जाण्याने प्रचंड नुकसान झाले आहे. दोन्ही देशातील शांतताप्रेमी आणि मानवाधिकारावर विश्वास असणाऱ्यानी एक सच्चा मित्र गमावला आहे.

डॉक्टर मुबाशिर हसन हे पाकिस्तानातील एक मोठं नाव. 14 मार्च रोजी वयाच्या 98 व्या वर्षी लाहोरच्या राहत्या घरी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूने पाकिस्तानने त्यांचा ‘जाणता राजा’ गमावलेला आहे. पाकिस्तानच्या सामाजिक-राजकीय आंदोलनात ते नेहमी पुढे असत. गेली जवळपास तीस वर्षं भारत आणि पाकिस्तानात कायमस्वरूपाची मैत्री व्हावी यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली. त्यांच्या मृत्यूने भारत, पाकिस्तानने ‘अमन का फरिश्ता’ गमावलेला आहे.

भारत-पाकिस्तानात मैत्रीसाठी प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस एन्ड डेमोक्रॅसीचे ते संस्थापक सदस्य होते. 01 डिसेंबर 1967 रोजी पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)ची स्थापना त्यांच्या लाहोरच्या घरी झाली होती. झुल्फिकार अली भुत्तो यांच्यासोबत ते देखील पीपीपीचे संस्थापक सदस्य होते. मानवाधिकाराच्या प्रश्नावर काम करणाऱ्या ह्यूमन राइट्‌स कमिशन ऑफ पाकिस्तान या संस्थेचे देखील ते संस्थापक सदस्य होते. त्यांच्यासोबत अस्मा जहांगिर, न्यायमूर्ती दोराब पटेल, आय. ए.  रेहमान इत्यादी देखील स्थापनेत सहभागी होते. पाकिस्तानातील मानवाधिकाराचा एकही प्रश्न असा नसेल, ज्याविषयी कमिशनने उघड भूमिका घेतली नाही.

1964 च्या दरम्यान मुबाशिर हसन मित्रांसोबत लाहोर येथे काम करायचे. वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा करायचे. त्यातल्या बहुतेकांवर डाव्या विचारांचा प्रभाव होता. त्या चर्चांतून त्यांनी  ‘ए डिक्लेरेशन ऑफ युनिटी ऑफ पीपल’ नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्या जाहीरनाम्यावर खूप चर्चा झाली. त्याचे त्या काळात ‘क्रांतिकारी जाहीरनामा’ असे वर्णन केले गेले. त्यात ल़ोकशाही समाजवादाची मांडणी होती.

हस्तीदंताच्या मनोऱ्यात राहणारे मुबाशिर हसन मात्र सामान्य माणसांच्या हिताचा विचार करत असत. सुरुवातीला भुत्तोबद्दल त्यांना सहानभूती नव्हती कारण भुत्तो  लष्करशहा अयुब यांच्या सरकारात मंत्री होते. नंतर भुत्तो आणि अयुब यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. भुत्तो  सरकारातून बाहेर पडले. त्यांच्या मनात नवीन पक्ष बनवायचे होते.  1966 मधे एका कार्यक्रमात ते दोघे  भेटले. तेव्हा मुबाशिर हसननी त्यांना’ तुमच्या मनात उजव्या विचारसरणीचा पक्ष काढायचा आहे की डाव्या...’ असा सरळ प्रश्न विचारला. ‘नक्कीच डावा’, असे उत्तर भुत्तोनी दिले. नंतर त्या दोघांनी मिळून पक्ष वाढविला. भुत्तो यांचा सिंध प्रांतात प्रभाव होता आणि नॉर्थ-वेस्ट फ्रंटीअर प्रोव्हिएन्स (एनडब्लयूएफपी) मध्ये त्यांच्या ओळखी होत्या. पंजाबात त्यांना उच्च शिक्षित आणि समाजवादी विचारसरणीचे मुबाशिर हसन भेटले. तो काळ पाकिस्तानसाठी कठीण होता.

1970 मध्ये झालेल्या निवडणुकीत पूर्व पाकिस्तानातील मुजीब उर रहमान यांच्या अवामी लीगला स्पष्ट बहुमत मिळाले पण पश्चिम पाकिस्तानातील सत्ताधाऱ्यांना ते मान्य नव्हते. पूर्व पाकिस्तानात प्रचंड अत्याचार करण्यात आले. शेवटी पूर्व पाकिस्तानचा बांगलादेश झाला. दुसरीकडे, भुत्तो पाकिस्तानचे पंतप्रधान झाले आणि मुबाशिर हसन अर्थमंत्री. त्याकाळात काही महत्त्वाच्या उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.  या काळात जमात-ए-इस्लामी आणि काही कट्टर इस्लामिक संघटनांनी एहमदिया समाज मुस्लिम नसल्याचे जाहीर करण्याची मागणी केली. भूत्तोंवर  दबाव वाढत होता. शेवटी भूत्तोंनी एहमदिया मुस्लिम नसल्याचे जाहीर केले. याबाबत मुबाशिर हसन यांचे भूत्तोंसोबत मतभेद होते. पाकिस्तानचे पहिले परराष्ट्रमंत्री सर झफर उल्ला खान एहमदिया होते. पाकिस्तानचे पहिले नोबेल पुरस्कार विजेते डॉक्टर अब्दुस सलाम सुद्धा एहमदिया होते.

ज्या घरात पीपीपीची स्थापना झाली होती त्याच घरात मुबाशिर हसन यांचे निधन झाले. तेव्हा पीपीपीला स्थापना  सभेसाठी लाहोरमध्ये कोणी हॉटेल किंवा सभागृह देत नव्हते. अयुब खान तेव्हा पाकिस्तानचे सर्वेसर्वा होते. पाकिस्तानच्या राजकारणात पंजाब प्रांताला विशेष महत्त्व असल्यामुळे भुत्तो यांच्या मनात पक्षाची स्थापना लाहोरला करायची असे होती. मुबाशिर हसन श्रीमंत घराण्यातले असल्याने शेवटी त्यांच्याच घरात 30 नोव्हेंबर आणि 01 डिसेंबर 1967 रोजी पक्षाच्या स्थापनेसाठी बैठका घेण्यात आल्या. स्वाभाविकच, मुबाशिर हसन यांना पक्षात दुसऱ्या नंबरचे स्थान मिळाले. अयुब खान यांनी भुत्तोंना 13 नोव्हेंबर 1968 रोजी मुबाशिर हसन यांच्या घरातून अटक केली. नंतर, मुबाशिर हसन यांनाही पकडण्यात आले.

मुबाशिर हसन यांच्याकडे एक जुनी ऐतिहासिक कार होती. त्यांना ती अत्यंत प्रिय होती. आपल्या जुन्या विंटेज कारमध्ये लाहोरमधून ते फिरत असत. लांबून कार पाहिली की लोक डॉक्टर साब आले असे म्हणायचे.

मुबाशिर हसन यांना मी पहिल्यांदा 2003 मध्ये कराचीला भेटलो. नंतर अनेकदा त्यांना भेटण्याचा योग आला. भारतात ते अनेक वेळा येत असत. त्यांचा जन्म  ब्रिटिश भारतात 1922 साली पानिपतला झालेला. नंतर त्यांचे कुटुंब लाहोरला स्थायिक झाले.  प्रतिष्ठित कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट पदवी घेतली. ते सामान्य माणसांसाठी रस्त्यावर उतरणारे होते. मला आठवते 2003 साली पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस एन्ड डेमोक्रेसीच्या अधिवेशनात हसन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कराची स्टेशनवर आमचे केलेले जंगी स्वागत. भारतातून आम्ही दोनशेहून अधिक जण गेलो होतो. लाहोरहून आम्ही कराची ट्रेन पकडलेली. कराचीत आणि आधी लाहोर येथे जंगी स्वागत करण्यात आले. कराचीला तर लोकांनी स्टेशनच सजवलेले. गुलाबाच्या पाकळ्या आम्हा सर्वांवर टाकल्या. नंतर एकदा आम्ही त्यांना मुंबईत बोलावले होते. त्यांचे म्हणणे ते एकदम सोप्या भाषेत मांडायचे.

बेनझीर भुत्तो 2007 रोजी पाकिस्तानात परतल्या. परवेझ मुशर्रफ तेव्हा पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते. बेनझीर यांचे  पाकिस्तानच्या अवामने कराची येथे अभुतपुर्व स्वागत केले. बेनझीर यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा होत्या. बेनझीर यांना तेव्हा मुबाशिर हसन यांनी काही सल्ला देण्याचा प्रयत्न केला. झुल्फिकारची मुलगी असल्याने बेनझीरविषयी मुबाशिर यांना विशेष आपुलकी होती. पण त्यानंतर काही महिन्यांनी बेनझीर यांची दहशतवाद्यांनी रावळपिंडी येथे हत्या केली.

ल़ोकशाही समाजवादावर त्यांचा विश्वास असल्याने राजकीय पक्षांचे महत्त्व आणि भूमिका त्यांना महत्त्वाची वाटत असे. पीपीपीची विचारसरणी बदलत चालली होती हे त्यांच्या लक्षात येत होते. पक्ष तडजोड करत होता. धार्मिक कट्टरतेबद्दल मवाळ भूमिका घेत होता. समाजवादाचा विचार जवळपास सोडलेला होता. अशा परिस्थितीत ते पक्षाच्या बाहेर पडले. घिनवा भुत्तो यांच्या नेतृत्वाखाली ‘शहीद भुत्तो’ या पक्षात सहभागी झाले. घिनवा या बेनझीर यांचा भाऊ मुर्तझाची पत्नी. बेनझीर पंतप्रधान असताना मुर्तझाची त्याच्या कराची येथील राहत्या घराच्या बाहेर हत्या करण्यात आली होती. वयामुळे दोन वर्षांपूर्वी मुबाशिर यांनी पक्षाचे पंजाब प्रांताचे अध्यक्ष या पदावरून राजीनामा दिला होता.

मला मुबाशिर हसन नेहमी एस. एम. जोशी यांच्यासारखे वाटत आले.  त्यांच्यात मला एस.एम. दिसायचे. मुबाशिर हसनचा स्वभाव देखील एस.एम. सारखा मृदू  पण विचारांशी कधी तडजोड न करणारा. दिसायला पण त्यांच्यासारखे सडपातळ. दंगली असो किंवा इतर काही, मुबाशिर  हसन घरी बसून  राहत नसत. अशा माणसांच्या जाण्यामुळे समाजाचे प्रचंड नुकसान होते. एस. एम. प्रमाणे मुबाशिर हसन यांच्या वाटेने चालणारे तरुण मोठ्या संख्येत पाकिस्तानात आढळतात.

‘पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस एन्ड डेमोक्रसी’चे आणि ‘ह्यूमन राइट्‌स कमिशन ऑफ पाकिस्तान’चे त्यांच्या जाण्याने प्रचंड नुकसान झाले आहे. दोन्ही देशातील शांतताप्रेमी आणि मानवाधिकारावर विश्वास असणाऱ्यानी एक सच्चा मित्र गमावला आहे.

Tags: मुबाशीर हसन पाकिस्तान जतीन देसाई pakistan mubashir hasan jatin desai weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात