डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

साने गुरुजींची पत्रकारिता

‘‘साने गुरुजींच्या पत्रकारितेची जातकुळी ही टिळक, आगरकरांच्या संयुक्त पत्रकारितेच्या जातकुळीची होती. मनाच्या उभारीच्या भांडवलावर ह्या पत्रकारितेचा उदय झाला होता. पदरी भांडवल जमा झाले आहे, आपल्याला अनुकूल अशी मानसिकता समाजात निर्माण व्हावी व आपल्या हितसंबंधांची जपणूक व्हावी, यासाठी ही पत्रकारिता जन्मली नव्हती.’’

साने गुरुजींचा पिंड खऱ्या अर्थाने पत्रकाराचा होता. ते सिद्धहस्त पत्रकार होते. पत्रकारितेतून त्यांचे साहित्य जन्माला आले आहे असे म्हटले तर त्यात यत्किंचितही अतिशयोक्ती होणार नाही. 

हस्तलिखित ‘छात्रालय’ दैनिक 
एम.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर गुरुजी 17 जून 1924 रोजी खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या अमळनेर हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुनू झाले. या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी छात्रालय चालविले जात असे. 1925 पासून या छात्रालयाची सर्व व्यवस्थाच साने गुरुजींवर सोपविण्यात आली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल या त्यांच्या निदिध्यासातूनच हस्तलिखित ‘छात्रालय’ दैनिकाचा जन्म (19 जुलै 1927) ला झाला. छात्रालय दैनिक गुरुजींनी जवळजवळ तीन वर्षे चालविले. छात्रालय दैनिकासाठी गुरुजी पहाटे चार वाजता उठत असत. सकाळच्या प्रार्थनेपूर्वी गुरुजींचा दैनिकाचा अंक लिहून तयार असे. त्याच्यासाठी वाचन आणि टिपणे काढण्यात गुरुजी रोज एक तास देत असत. 

तीन महिन्यांनी दैनिकांच्या 18/10/27च्या अंकात गुरुजींनी छात्रालय दैनिकाचा त्रैमासिक आढावा घेतला होता. त्यातील पुढे दिलेली जंत्री दैनिकाच्या स्वरूपावर पुरेसा प्रकाश टाकते. (1) चरित्रात्मक निबंध 15. (2) परिवारात्मक गोष्टी 30, (3) बोधपर व मनोरंजनपर छोट्या गोष्टी 50 हून अधिक (4) मोठ्या सुंदर गोष्टी 16, (5) निबंध 41, (6) सणांची माहिती 8, (7) टीकात्मक निषेध 14. (8) कविता विनोदी 3. गंभीर 8, (9) सुभाषिते 50च्या वर.  या लेखांत गुरुजींनी नमूद केले आहे की, 'दैनिकाचा उद्देश मनोभूमिका शुद्ध व उदात्त करण्याचा आहे. मनोरंजन, जिज्ञासा संवर्धन, माहिती पुरविणे हे त्याचे दुय्यम उद्देश आहेत. म्हणून हे दैनिक न्यूजपेपर नसून विचारसंपन्न न्यूजपेपर- ध्येयप्रवण पत्र आहे. गुरुजींच्या पत्रकारितेचा पाया खऱ्या अर्थाने छात्रालय या हस्तलिखित दैनिकाने रचला गेला होता.

'विद्यार्थी' मासिक

संस्थेचे एक आजीव सभासद श्री. हरिभाऊ मोहनी यांच्या आर्थिक आणि सर्व तऱ्हेच्या पाठबळावर 'विद्यार्थी’ मासिक (9 नोव्हेंबर 1928) होऊ शकले. त्याची संपादकीय जबाबदारी गुरुजींनी समर्थपणे सांभाळली. विद्यार्थी मासिकाचे संपादन गुरुजींनी अवघे दीड वर्षे केले. या कालावधीत विद्यार्थी मासिकाचे अठरा अंक प्रसिद्ध झाले. विद्यार्थी मासिकातील काही लेख नंतर ‘गोड निबंध’ भाग 1, 2 व 3 मधून संग्रहित करण्यात आले आहेत. 
'काँग्रेस' साप्ताहिक 1930 साली गुरुजींनी शाळा सोडून राष्ट्रीय आंदोलनात उडी घेतली. गिरणी कामगारांची वेतनवाढीची मागणी होती. सरकारने त्यासाठी समिती नियुक्त केली होती. या समितीने गिरणी कामगारांच्या वेतनात साडेबारा टक्के वाढ करण्याची शिफारस केली होती. पण गिरणी मालकांनी ही शिफारस मानली नाही. म्हणून कामगारांनी बैठा संप सुरू केला. मालक गिरण्या बंद करण्याची भाषा बोलू लागले. गुरुजी कामगारांच्या बाजूने उभे राहिले. वर्तमानपत्रांनी गिरणी मालकांची बाजू उचलून धरली होती. कामगारांची बाजू लोकांसमोर मांडून लोकमत कामगारांच्या बाजूने वळवून घेऊन लोकमताचा दबाव शासनावर आणण्यासाठी वर्तमानपत्र हवे होते. हा विचार गुरुजींना अस्वस्थ करीत असे. या जाणिवेतून 6 एप्रिल 1938 रोजी गुरुजींनी तडकाफडकी 'काँग्रेस’ साप्ताहिक सुरू केले.
काँग्रेस साप्ताहिकाच्या पहिल्याच अंकातील संपादकीयामध्ये गुरुजींनी सुरुवातीस लिहिले होते. ‘‘मजजवळ पैसाआडका नाही. दुसरा अंक कसा निघेल याची विवंचना आहे. परंतु मी आरंभ करीत आहे. मी माझे हे पत्र भिक्षेवर चालवणार आहे. जी तूट येईल ती भिक्षेतून शक्यतो भरून काढायची. भिक्षेकऱ्याचे पत्र मरत नसते. कारण त्याला अनंत हातांचा नारायण देत असतो.’’ 

या संपादकीयामध्ये साप्ताहिकाचे धोरण स्पष्ट करताना गुरुजींनी लिहिले होते. "पत्र जातिभेदाचे भूत गाडू पाहील. द्वेषाला शमवू पाहील, अहिंसा प्रचारेल, सद्धर्माच्या कल्पना फैलावील, त्यांना जाळील, दंभ दुरावतील, जीवनात निर्मळपणा आणील; प्रेम आणि कर्म आणील. खान्देशभर एक प्रकारचे नवचैतन्य हे पत्र निर्माण करू पाहील. हे पत्र निद्रितांना जागे करीत व जागृतांना कामास लावील. हे पत्र काँग्रेसप्रेमाने जनतेची हृदये उचंबलून सोडील. काँग्रसच्या भक्तीने रंगवलेले जीव ठायीठायी आहेत त्यांना जोडील. हे पत्र कोणाचे मिंधे नाही. कोणाचे बंदे नाही. एकच दैवत म्हणजे काँग्रेस संस्था. काँग्रेस संस्थेचा निर्मळ आत्मा जनतेस दाखवून त्या निर्मल आत्म्याचे उपासक व्हा, असे हे पत्र आग्रहाने व प्रेमाने सर्वांना सांगेल. काँग्रेसचे जे रूप मला दिसते, जे आवडते तेच मी दाखविणार.’’ 

या संपादकीयामध्ये ‘‘तुझी हाक ऐकून कोणी येवो न येवो, तू एकटा जा. तुझ्या हातातील दिवा टीकांच्या वाऱ्याने विझेल. पुन्हा श्रद्धेने पेटवून तू एकटा पुढे जा.’’ या कविवर्य रवीन्द्रनाथ टागोर यांच्या गीतांजतीमधील काव्यपंक्ती उद्धृत करून गुरुजींनी, ‘‘रवीन्द्रनाथांचे हे शब्द ध्यानात धरून मी हे पत्र सुरू करीत आहे.’’ या शब्दांनी काँग्रेस साप्ताहिक चालविण्याचा आपला निर्धार व्यक्त केला होता. त्यातून गुरुजींच्या पत्रकारितेचे ब्रीद व्यक्त झाले आहे. 

'काँग्रेस' साप्ताहिक गुरुजींनी जेमतेम दोन वर्षे चालविले. दुसरे महायुद्ध सुरू होताच भारतात ब्रिटिशांनी दमन नीतीचा अवलंब केला होता, 'काँग्रेस’ पत्रातील लिखाण ब्रिटिश सत्तेला सलू लागले. त्यांनी काँग्रेस पत्राकडून जबरदस्त जामीन मागितला आणि ते पत्र छापणाऱ्या छापखान्यालाही वेठीस धरले. अखेर 18 मार्च 1940 रोजी 'काँग्रेस’ साप्ताहिकाचा शेवटचा अंक वाचकास सादर करून ‘काँग्रेस' साप्ताहिकाने वाचकांचा निरोप घेतला.

'कर्तव्य' दैनिक

काँग्रेस साप्ताहिक बंद झाल्यानंतर गुरुजींचा पुढचा सात-आठ वर्षांचा काळ वैयक्तिक सत्याग्रह, बेचाळीसचे आंदोलन, मंदिरप्रवेश आंदोलन अशा धकाधकीमध्ये गेला. 1947 च्या डिसेंबरमध्ये राष्ट्र सेवा दलाच्या मेळाव्यासाठी गुरुजी मुंबईत आले होते. मुंबई महानगरपालिकेच्या त्या निवडणुकीत गुरुजींनी समाजवादी पक्षाच्या उमेदवारांचा हिरीरीने प्रचार केला. त्या वेळी गुरुजींच्या लक्षात आले की, मुंबईतील भांडवलदारांच्या वृत्तपत्रांनी समाजवादी उमेदवारांचा प्रचार कटाक्षाने टाळला होता. त्यामुळे गुरुजी अस्वस्थ झाले होते. त्यांनी ‘‘आजकाल दैनिकाशिवाय तरणोपाय नाही, एखादे दैनिक काढा,’’ असा सल्ला आपल्या तरुण समाजवादी सहकाऱ्यांना दिला. यातूनच ‘कर्तव्य’ या सायंदैनिकाची जुळवाजुळव सुरू झाली. महात्माजींच्या हत्येनंतर गुरुजींनी फेब्रुवारी 1948 पासून 21 दिवसांचे उपोषण केले. याच उपोषणाच्या काळात गुरुजींनी 11 फेब्रु 1948 रोजी 'कर्तव्य’ या सायंदैनिकाचे प्रकाशन सुरू केले होते. पहिल्या अंकात 'महात्माजींना कृतज्ञतांजली’ वाहताना गुरुजींनी म्हटले होते.

‘‘आपण सारेच एका अर्थी महात्माजींचे मारेकरी आहोत. माझ्यामध्ये जातीयतेचे लेशभरही विष नाही असे किती जणांना म्हणता येईल? तुमच्या-आमच्या हृदयात थोडेसे आहे तो दूर करणे हे आता कर्तव्यच आहे. शत्रू हृदयात आहे तेथे त्याला ठार करा... महात्माजींच्या पूज्य स्मृतीस स्मरून हे 'कर्तव्य' दैनिक या विचारांचा अखंड पाऊस पाडील. जातीय वृत्ती नष्ट करणे आणि लोकशाही समाजवाद आणणे ही दोन ध्येये माझ्यासमोर आहेत.’’ ‘कर्तव्य’ दैनिक जेमतेम चार महिने चालले आणि पुढे आर्थिक ओढाताणीमुळे बंद करावे लागते, कर्तव्य दैनिकातील लेखांची पुढे तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 'कर्तव्याची हाक' हे राजकीय लेखांचे पुस्तक, 'श्रमणारी लक्ष्मी' ह्यात लोकशाही समाजवादाची निकड स्पष्ट करणाऱ्या सत्यकथा आणि 'बापूंच्या गोड गोष्टी’चे सहा भाग.

'प्रदीप' मासिक

साने गुरुजींचे धडपडणारे तरुण मित्र श्री. शशिशेखर वेदक, प्रा. राम जोशी आणि प्रकाश मोहाडीकर यांनी 15 ऑगस्ट 1947 पासून मुंबईत ‘प्रदीप’ या नावाचे मासिक सुरू केले होते. साने गुरुजी या मासिकामध्ये नियमित लिहीत असत. 'माझी दैवते' म्हणून एक लेखमाला त्यांनी या मासिकातून लिहिली व आपल्या मानवी व मानवेतर देवतांची त्यांनी या लेखमालेतून करून दिली होती. 'मातेची विचारपूस’ नावाचे एक सदरही या मासिकातून चालविले होते. 'रोना रोलाँ', 'बरट्रांड रसेल', 'महात्मा गांधी आणि कला' असे काही गुरुजींचे अनुवादित लेख या मासिकातून प्रसिद्ध झाले आहेत. 1948च्या मार्च महिन्यापासून प्रदीप मासिकावर संपादक म्हणूनही गुरुजींचे नाव छापले जाऊ लागले होते. पण आर्थिक अडचणीमुळे अल्पावधीतच 'प्रदीप' मासिकाचाही अस्त झाला.

'साधना' साप्ताहिक

‘कर्तव्य' सायंदैनिक बंद झाल्यापासून गुरुजी बेचैन झाले होते. दैनिकाचे पुनरुज्जीवन व 'साधना' या नावाने नवीन साप्ताहिक सुरू करण्याचे त्यांच्या मनात घोळत होते. पण दोन्ही एकाच वेळी सुरू करणे अशक्य होते. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन 'साधना' साप्ताहिक आधी सुरू करावे या बाबत एकमत झाले आणि भारताच्या दुसऱ्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 1948 रोजी गुरुजींच्या संपादकत्वाखाली साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. 

'साधना' साप्ताहिकाच्या पहिल्या अंकातील संपादकीयामधून आपले मनोगत व्यक्त करताना गुरुजींनी लिहिले होते. ‘‘वैरभाव नि विषमता नष्ट करण्याची थोर साधना आपल्याला करावयाची आहे. हे ‘साधना’ साप्ताहिक या ध्येयाने जन्मत आहे. कितीतरी दिवस हे साप्ताहिक निघेल म्हणून मित्र वाट पाहत होते. मध्यंतरी सायंदैनिक ‘कर्तव्य’च क्षणभर जन्माला आले. ते बंद करून त्याचे ‘प्रातःदैनिक' करण्याची आकांक्षा होती. स्वतःचा छापखाना असल्याशिवाय दैनिक काढणे अशक्य म्हणून खटपटीला लागलो. कसाबसा छापखाना उभा केलेला आहे. परंतु आज नीट सुरू करण्याइतकी शक्ती नाही. तेव्हा सध्या साप्ताहिक 'साधना' सुरू करून समाधान मानत आहे. हे जर स्वावलंबी झाले, छापखानाही जरा वाढला-सुरळीत चालू लागला, साधनसामग्री जर वाढली तर 'कर्तव्य' दैनिक केव्हातरी सुरू करण्याची तळमळ तर आहे. तोवर मित्रांनी या साप्ताहिकालाच आधार द्यावा नि प्रभूने आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना आहे.’’ 

साधना साप्ताहिकाचे स्वरूप कसे राहील हे स्पष्ट करताना गुरुजींनी लिहिले होते, ‘‘निरनिराळ्या भाषांतील मौल्यवान प्रकार तुम्हांला येथे दिसतील. भारतातील प्रांत बंधूंची येथे प्रेमाने ओळख करून देण्यात येईल. देशातील नि जगातील नाना संस्कृतींचे रंग नि गंध दाखवण्यात येतील. नाना धर्मांतील सुंदरता, उदारता यांची भेट होईल. शेतकरी-कामगार यांच्या जगातही आपण वावरू. त्यांचे प्रश्न चर्चू, त्यांची स्थिती समीक्षू. शिक्षणाच्या क्षेत्रातही आपण जाऊ. मुलांच्या संगतीत रमू. ती आपल्याला गोष्टी, गमती सांगतील; आपण त्यांना सांगू. समाजात अनेक अज्ञात माणसे सेवा करून समाजवृक्षाला ओलावा देत असतात. त्यांच्या हकिकती येथे येत जातील. कधी प्रश्नोत्तररूप चर्चा आढळेल. गंभीर विषयांवरचे निबंध येतील. सुंदर गोष्टी वाचायला मिळतील. कधी आपण साहित्याच्या मंदिरात दर्शनाला जाऊ. कधी विज्ञानाच्या पराक्रमी कथा ऐकू. कधी निर्मल समाजवादाचे उपनिषद ऐकू. मनात कितीतरी आहे. जेवढे जमेल तेवढे करीन. ते गोड मानून घ्या. कोणी काही म्हणो. आशेने 'साधना' साप्ताहिक आज स्वातंत्र्याच्या प्रथम वाढदिवसाच्या मुहूर्ताने मी सुरू करीत आहे. जोवर शक्ती असेल तोवर साधना टिकेल, आसक्ती कशाचीच नको.’’ 

15 ऑगस्ट 1948 पासून 11 जून 1950 या निर्वाणाच्या दिवसापर्यंत 1 वर्ष 10 महिने 'साधना' साप्ताहिकाची संपादकीय धुरा गुरुजींनी समर्थपणे सांभाळती. या कालावधीत रवींद्रनाथ टागोर यांच्या गाजलेल्या 'साधना' पुस्तकाचा गोषवारा त्यांनी सादर केला. 'धडपडणारी नारी’चे मनोज्ञ दर्शन त्यांनी एका लेखनातून घडविले. आपली पुतणी सुधा हिला उद्देशून लिहिलेली 'सुंदर पत्रे' तर मुलांसाठी त्यांनी ठेवलेला अमोल ठेवाच आहे. 'साधना’ साप्ताहिक हे आंतरभारती विचारांच्या प्रसाराचे माध्यम बनले आहे. लोकशाही समाजवाद हेच स्वातंत्र्योत्तर ध्येय ठरवून गुरुजींनी साधनेतून समाजवादी विचारांचा आणि आंदोलनाचा हिरीरीने पुरस्कार केला. गुरुजींनी अल्पावधीत 'साधना' साप्ताहिकाला मराठी नियतकालिकांच्या क्षेत्रात प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.

ज्येष्ठ पत्रकार मा. यदुनाथजी थत्ते यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘‘साने गुरुजांच्या पत्रकारितेची जातकुळी ही टिळक, आगरकरांच्या संयुक्त पत्रकारितेच्या जातकुळीची होती. मनाच्या उभारीच्या भांडवलावर पत्रकारितेचा उदय झाला होता. पदरी भांडवल जमा झाले आहे. आपल्याला अनुकूल अशी मानसिकता समाजात निर्माण व्हावी व आपल्या हितसंबंधांची जपणूक व्हावी यासाठी  ही पत्रकारिता जन्माला आली नव्हती. साने गुरुजींच्या पत्रकारितेला परदास्य-विमोचनाचा एकच एक ध्यास होता. परदास्य-विमोचनाबरोबर स्वजनदास्य-विमोचनाचीही तळमळ त्यापाठीमागे होती. परदास्यविमोचन त्या मानाने सोपे असते. कारण बोलून चालून तो परच असतो. स्वजनदास्याविरुद्ध लढणे त्या मानाने अवघड. कारण स्वजनाशी लढताना अधिक तारतम्य वापरावे लागते. स्वजनाला स्वजन ठेवून त्याच्या दास्याचा अंत करावयाचा असतो. स्वजनांविरुद्ध लढताना धर्मक्षेत्रावर, कुरुक्षेत्रावर लढण्यासाठी आलेल्या अर्जुनाची समोर सगेसोयरे पाहून जी अवस्था झाली तशी अनेकांची होते. आगरकरी बाणा नसेल तर ही दुसरी लढाई होऊ शकत नाही. तिसरी याहून बिकट लढाई स्वकामनांविरुद्ध करावी लागते. टिळक-आगरकरांचा नुसता समन्वयच गांधीविचारात नाही, तर त्यातून तिसऱ्या लढाईच्या सामर्थ्याची बेगमी झाल्याचेही दिसते. ही तिसरी लढाई स्वकामनांविरुद्धही असते. साने गुरुजींच्या पत्रकारितेत ह्या तिन्ही गोष्टी एकवटलेल्या दिसून येतील.... साने गुरुजींची पत्रकारिता अनुठी नव्हती. भूतकाळातील ग्राह्यांश जतन करत, वर्तमान वास्तवाला निर्भयपणे सामोरे जात आणि भविष्यात नजर रोखून गुरुजींनी आशावाद जोपासला, कारण त्यांची आस्तिक्यभावना फार उत्कट होती. 

महाराष्ट्रात साने गुरुजीप्रेमींचा परिवार मोठा आहे. त्यामुळे साने गुरुजींच्या निर्वाणाला चार तपे लोटली, तरी त्यांच्या परिवारातील मंडळींनी साने गुरुजींनी सुरू केलेल्या ‘साधना’ची ज्योत तेवत ठेवली आहे. साने गुरुजींनी जोपासलेल्या पत्रकारितेचा वारसा 'साधना' साप्ताहिकाने पुढे चालविला आहे.
 

Tags: समाजवादी विचार साधना प्रदीप कर्तव्य काँग्रेस विद्यार्थी छात्रालय उपजत पत्रकारिता socialist thoughts ट साने गुरुजींची पत्रकारिता sadhana pradeep kartavya congress vidyarthi vhhatralay by-product journalism journalism by sane guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

जयानंद मठकर

स्वातंत्र्यसैनिक, कोकणातील समाजवादी चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते, पत्रकार, माजी आमदार, 1960 पासून सावंतवाडीहून प्रकाशित होणाऱ्या 'वैनतेय' साप्ताहिकाचे माजी संपादक, मधु दंडवते, नाथ पै यांचे निकटचे सहकारी.
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके