डिजिटल अर्काईव्ह

क्रिस्टल - नाथ पै यांची सहचारिणी

विख्यात भारतीय संसदपटू स्व. बॅ. नाथ पै यांची 75 वी जयंती 25 सप्टेंबर 1996 रोजी आहे. त्यांच्या निर्वाणालाही या वर्षी 25 वर्षे झाली आहेत. त्यानिमित्ताने नाथ पै यांच्या धावपळीच्या जीवनात सावलीप्रमाणे नाथला साथ देणाऱ्या त्याच्या सहधर्मचारिणीचे 'क्रिस्टल' चे नाथच्या एका निकटवर्त्ती सहकाऱ्याने घडविलेले हे दर्शन.

नाथ पै बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी ब्रिटनला गेले असता ब्रिटनमधील लेबर पार्टीच्या कार्यात आणि कामगार चळवळीत भाग घेत असत. 

ब्रिटनमधील या वास्तव्यात नाथ पै यांना कामगार चळवळीचा अभ्यास करण्यासाठी ऑस्ट्रियन सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. त्यामुळे त्यांना ऑस्ट्रियाच्या राजधानीचे शहर असलेल्या व्हिएन्नामध्ये काही काळ मुक्काम करावा लागला होता. युरोपातील एक सुंदर शहर अशी व्हिएन्नाची ख्याती आहे. 

नाथचा पिंड राजकारणी असला तरी सौंदर्य, कला, संगीत आणि साहित्य याचाही नाथ मोठा षौकीन होता. नाथला आवडले ते व्हिएन्नाचे संगीत. 'म्युझिक कॅपिटल ऑफ दि वर्ल्ड' ही संज्ञा सर्वार्थाने या शहराला शोभून दिसते असे नाथचे मत होते. याच शहराने नाथला एक अमोल रत्न दिले. या रत्नाचे नाव होते 'क्रिस्टल मुशेल'.

'क्रिस्टल मुशेल' ही ऑस्ट्रियन सरकारच्या सचिवांची एकुलती एक कन्या. क्रिस्टलचा आणि नाथचा व्हिएन्नाच्या मुक्कामात परिचय झाला. क्रिस्टलला एक भाऊ होता, पण तो दुसऱ्या महायुद्धात मारला गेला होता. नाथच्या व्यक्तिमत्त्वाचा क्रिस्टलवर प्रभाव पडला आणि क्रिस्टलच्या स्वभावामुळे नाथला क्रिस्टलची ओढ लागली. परिचयाची परिणती पुढे प्रेमात झाली आणि ती दोघे विवाहबद्ध झाली. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा विलोभनीय संगम त्यांच्या जीवनात घडून आलेला पाहायला मिळतो.

नाथने परदेशी मुलीशी विवाह केला म्हणून त्याच्या मतदारसंघातील काही मंडळी थोडीशी नाराज झाली. नाथला भारतात विवाहयोग्य युवती कुणी सापडली नसती काय? हा विवाह यशस्वी होणार आहे काय? अशी कुजबुज पाठीमागून चालायची.. पण कुणाही भारतीय नारीपेक्षा आपण यत्किंचितही कमी नाही हे क्रिस्टलने कृतीने सिद्ध केले. नाथच्या जीवनाशी क्रिस्टल सर्वार्थाने एकरूप झाली होती.

हृदयविकार हा पै घराण्याला मिळालेला शाप होता. नाथही याला अपवाद ठरला नाही. चाळिशी उलटल्यावर नाथलाही हृदयविकाराच्या व्याधीने गाठले. क्रिस्टलची जबाबदारी खूपच वाढली. नाथला जरा बरे वाटले की त्याची धावपळ सुरू व्हायची. थोड्याशा हट्टी स्वभावामुळे त्याला आवर घालणे अवघड व्हायचे. नाथच्या आजारपणात खुप चढउतार होत असे. पण क्रिस्टलने कधी धीर सोडला नाही. नाथची प्रकृति ढासळली की क्रिस्टल अस्वस्थ होत असे. पण चित्त विचलित होऊ न देता स्थिर मनाने ती नाथची सेवा करी.

नाथच्या प्रकृतीप्रमाणेच घरची इतर कामेही त्या जबाबदारीने सांभाळीत. 'दिलीप' आणि 'आनंद' या आपल्या मुलांना सांभाळणे, त्यांना वेळच्या वेळी शाळेत पोहोचविणे, त्यांच्या अभ्यासावर लक्ष ठेवणे ही कामेही तितक्याच तत्परतेने करीत. कामात कधी कुचराई नाही की कामाचा कंटाळा नाही. कामे करताना त्यांच्या कपाळावर कधी आठी दिसली नाही की त्यांनी कधी नाराजी व्यक्त केली नाही. धीरोदात्त आणि सेवापरायण वृत्तीने संसारातील सर्व जबाबदाऱ्या त्या सांभाळीत. 

त्या उत्तम गृहिणी होत्या. तशाच नाथच्या खऱ्या अर्थाने सहचारिणी होत्या. नाथची सेक्रेटरी म्हणूनही त्या काम पाहात असत. नाथचा पत्रव्यवहार पाहाणे, रोजच्या वर्तमानपत्रातील महत्त्वाची कात्रणे काढणे, फायलिंग करणे आणि नाथची पत्रे टाईप करून रवाना करणे ही सारी कामे त्या न कंटाळता वेळच्या वेळी समर्थपणे करीत असत. नाथच्या धावपळीच्या जीवनात क्रिस्टलचा मोठाच आधार नाथला लाभला होता.

सगळी कामे सांभाळून त्या बागकामही करीत. बागकामाची त्यांना मनापासून आवड होती. नाथलाही फुलांची आवड होती. नाथचा संसार त्यांनी भारतीय नारीपेक्षाही अधिक कुशलतेने आणि उत्तमप्रकारे म्हणजे दृष्ट लागण्याजोगा केला. घरात नेहमी स्वच्छता आणि टापटीप ठेवण्याची त्या सदैव दक्षता घेत. कारण नाथची वृत्ती प्रसन्न ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे, याची त्यांना जाणीव होती. त्यांना आळस अजिबात माहीत नव्हता. 

नाथ चिडला अगर खूप मोठ्याने बोलू लागला की, त्या लगेच येऊन नाथला आवरत. त्या म्हणत, "Nath, it is enough now." ["नाथ, आता पुरे"] पण क्रिस्टलचे हे एकच वाक्य नाथला आवरायला पुरे पडत असे.

लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर लालबहादूर शास्त्री यांच्या जागेवर त्यांची पत्नी श्रीमती ललितादेवी यांना उभे करण्याचे ठरत होते. पण ललितादेवींनी त्याला साफ नकार दिला. त्यामुळे नाथ पैंचा ललितादेवींबद्दलचा आदर दुणावला. नाथ पै क्रिस्टलला बरोबर घेऊन ललितादेवींना भेटायला गेले. उभयतांनी ललितादेवींनी घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. 

मृत पतीच्या जागेवर त्यांच्या पत्नीला उभे करण्याची प्रथा नाथला मान्य नव्हती. क्रिस्टलला पण आपल्या मृत्यूनंतर लोकसभेसाठी उभे राहण्याचा आग्रह केला तर जपून निर्णय घेण्याचा सल्ला याप्रसंगी त्यांनी दिला होता आणि घडलेही तसेच. 

नाथ पै यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर क्रिस्टलला उभे करावे असा विचार काही मित्रमंडळींनी क्रिस्टलसमोर मांडला असता क्रिस्टलने त्याला साफ नकार दिला. "जी गोष्ट नाथला कदापि आवडली नसती, ती गोष्ट तुम्ही मला का करायला सांगता", असा प्रश्न तिने या संदर्भात भेटायला गेलेल्या मंडळींना केला.

नाथचे निधन झाले त्या वेळी क्रिस्टल त्यांच्याजवळ नव्हती. नाथच्या अंत्यदर्शनासाठी त्या आल्या, तो प्रसंग त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या अनेकांच्या स्मरणात असेल. स्थिर नजरेने त्या नाथकडे पाहात बसल्या होत्या. जणू काही कायमची दृष्टिआड होणारी नाथची मूर्ती त्या आपल्या डोळ्यांत साठवून ठेवीत असाव्यात. त्यांचा खिन्न चेहरा, "नाथ, अखेर तू आम्हाला चकवलेस ना?" असा भाव व्यक्त करीत होता. नाथच्या निर्वाणाचा धक्का त्यांनी मोठ्या धीरोदात्त वृत्तीने सोसला.

क्रिस्टलच्या मनाचा मोठेपणा नाथच्या मृत्यूनंतर दिसून आला. नाथच्या निधनानंतर घरात दहा हजार रुपये असलेले पाकीट क्रिस्टलला सापडले. त्या पाकिटावर नाथने निवडणूक खर्चासाठी असे लिहून ठेवले होते. नाथच्या एका चाहत्याने नाथला निवडणूक खर्चासाठी दिलेली ती रक्कम क्रिस्टलने नाथ पै यांच्या जागी पक्षाने उभे केलेले उमेदवार प्रा. मधु दंडवते यांच्या स्वाधीन केली. 

प्रा. मधु दंडवते यांनी ती रक्कम स्वीकारण्यास नकार दिला असता, "निवडणूक निधीसाठी पक्षाला दिलेली ती रक्कम मी घरात वापरली तर नाथच्या आत्म्याला काय वाटेल", असा प्रश्न करून क्रिस्टलने ती रक्कम दंडवतेना स्वीकारायला लावली. ती रक्कम कुणाला न सांगता घरात वापरली असती तर कुणी काही विचारले नसते. पण नाथच्या सहवासात झालेल्या संस्कारांनी तिला तसे करू दिले नाही. केवढी ही मनाची उदारता! ही शिकवण तिला नाथपासून मिळाली होती. नाथच्या जीवनाशी क्रिस्टल किती एकरूप झाली होती त्याचे दर्शन या घटनेने घडवले आहे. 

नाथ पै यांच्या निर्वाणानंतर त्यांच्या समाजवादी मित्रमंडळींनी नाथच्या मुलांच्या शिक्षणासाठी काही रक्कम बँकेत ठेव करून ती क्रिस्टलच्या स्वाधीन करायचे ठरविले होते. क्रिस्टलला ही गोष्ट समजताच तिने या गोष्टीला हरकत घेतली. नाथच्या मुलांचे संगोपन व शिक्षण करायला त्यांची आई म्हणून आपण समर्थ असल्याचे त्यांनी नाथच्या मित्रमंडळींना सांगितले व त्यांनी दिलेला मदतीचा हात स्वाभिमानाने पण नम्रपणाने नाकारला. ही प्रेरणाही त्यांना नाथच्या सहवासातून व पै कुटुंबाकडून मिळाली होती. नाथचे वडील लहानपणी वारल्यावर नाथचे व नाथच्या भावंडांचे संगोपन नाथच्या मातोश्रींनी खडतर परिस्थितीतून केले होते.

नाथच्या मृत्यूनंतर क्रिस्टलने स्वतः नोकरी करून आपल्या मुलांचे संगोपन व शिक्षण समर्थपणे केले आहे. क्रिस्टलच्या वृद्ध मातोश्री एकट्याच असल्याने त्यांना आधार देण्यासाठी त्यांनी आपल्या मुलांसह ऑस्ट्रियाला प्रयाण केले. ऑस्ट्रियाला गेल्या तरी अधूनमधून भारताला भेट देऊन सासरच्या माणसांची विचारपूस करण्याची प्रथा त्यांनी कटाक्षाने पाळली आहे. आस्ट्रियात दीर्घ काळ वास्तव्य करूनही त्यांनी तेथील नागरिकत्व स्वीकारलेले नाही. भारतीय नागरिक म्हणूनच त्या तेथे रहात आहेत.

युरोपियन संस्कृतीत वाढलेल्या क्रिस्टलने नाथच्या सहवासात भारतीय संस्कृतीमधील शिष्टाचार व प्रथा आत्मसात करून आर्य स्त्रीपेक्षा आपण कंकणभरही कमी नसल्याचे कृतीने आणि कर्तृत्वाने सिद्ध केले आहे. नाथच्या जीवनातील क्रिस्टलचा सहवास नाथला सुखावह झाला होता. सहधर्मचारिणी म्हणून नाथने क्रिस्टलची केलेली निवड सर्वतोपरी सुयोग्य ठरली आहे. 

पतिनिधनानंतर भारतीय स्त्रीच्या वाट्याला येणारे दुःखही क्रिस्टलला सोसावे लागले आहे. कुठल्याही प्रकारची कुरकूर न करता क्रिस्टलने सारे कष्ट सोसले आहेत. यातच तिचा मोठेपणा दिसून आला आहे. नाथला समजून घेऊन त्याचे सारे करणारी क्रिस्टलसारखी सहधर्मचारिणी नाथला लाभली हे नाथचे भाग्यच होय.

Tags: व्हिएन्ना ऑस्ट्रिया लालबहादूर शास्त्री मधु दंडवते क्रिस्टल मुशेल     नाथ पै Vienna Austria Lal Bahadur Shastri Madhu Dandwate Crystal Mushel Nath Pai weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

जयानंद मठकर ( 56 लेख )

स्वातंत्र्यसैनिक, कोकणातील समाजवादी चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते, पत्रकार, माजी आमदार, 1960 पासून सावंतवाडीहून प्रकाशित होणाऱ्या 'वैनतेय' साप्ताहिकाचे माजी संपादक, मधु दंडवते, नाथ पै यांचे निकटचे सहकारी.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी