डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ऑर्वेलच्या ‘रोड टू विगन पीअर’ या पुस्तकात एक आत्मचरित्रात्मक प्रकरण आहे, ज्यात त्याने इंग्रज समाजातल्या वर्ग-अहंकाराविषयी विस्ताराने लिहिलंय. त्याला स्वतःला याचा प्रत्यय तो सहा वर्षांचा असल्यापासून येऊ लागला होता. ऑर्वेलच्या आईने त्याचे मित्र असलेल्या प्लंबरच्या मुलांबरोबर खेळायला त्यालामनाई केली होती. तो म्हणतो, ‘या आधी लोहार, कोळी, गवंडी ही त्याची हीरो मंडळी होती : ती त्याला आवडणारी कामं करत आणि त्यांत त्याला लुडबूड करायलाही देत.’ पण अचानक या प्रेमळ सोबत्यांपासून त्याला दूर करण्यात आलं. पांढरपेशांच्या जगात श्रमिक वर्गाविषयी- ते घाणेरडे असतात, अशुद्ध भाषा बोलतात, त्यांना वास येतो- असे समज लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवले जातात, त्यांचा ऑर्वेलच्या मनावर तो अगदी मोठा होईपर्यंत पगडा राहिला होता. 

1. पहिला ट्रॅम्प-अनुभव 

जॉर्ज ऑर्वेल बर्मातली इंडियन इंपीरियल पोलीसची नोकरी सोडून परत आल्यावर काही काळ लंडनमधल्या ट्रॅम्प्सच्या जगण्याचा अनुभव घेण्यासाठी त्यांच्यासोबत राहिला होता, हे सर्वांना माहीत आहे. पण एक आश्चर्यकारक योग म्हणजे, त्याला अशा प्रकारचा पहिला अनुभव वयाच्या 17 व्या वर्षी तो इटनमध्ये शिकत असताना घ्यावा लागला होता. तो शाळेच्या ऑफिसर्स ट्रेनिंग कॉर्प्सचं शिबिर संपवून सुट्टीसाठी घरी निघाला असताना अनपेक्षितपणे जे घडलं, त्याचा मजेदार वृत्तांत त्याने आपल्या स्टिव्हन रन्सिमन या मित्राला पत्राद्वारे कळवला आहे. 1920 च्या ऑगस्टमधल्या पत्रातला हा रोचक मजकूर : 

प्रिय रन्सिमन

आज मला थोडा मोकळा वेळ मिळालाय, तेव्हा माझ्या मनात आलं की, एक हौशी ट्रॅम्प म्हणून मी केलेल्या माझ्या पहिल्या साहसाबद्दल तुला सांगायलाच हवं. बहुतेक सर्व भटक्यांप्रमाणे, हा अनुभव माझ्यावर लादला गेला होता. मी डेव्हनशायरमधल्या सीटन जंक्शन नावाच्या त्या रद्दड स्टेशनात पोचलो, तेव्हा मिनर्स- ज्याला तिथे गाडी बदलायची होती- तो माझ्या डब्याजवळ आला आणि म्हणाला, की ज्याने मिनर्सला त्याच्या डब्यातून प्रवास करण्यासाठी छळलं होतं, तो एक मूर्ख ‘ऑपिडन’आता मला तिथे बोलवत होता.(1) मीसुद्धा तसा अनोळखी लोकांबरोबरच प्रवास करत होतो, म्हणून मी त्या डब्यात जाण्यासाठी बाहेर पडलो, तेवढ्यात गाडी सुरू झाली. आता धावती गाडी पकडायला दोन हात लागतात आणि किटबॅग, बेल्ट वगैरेमुळे माझ्याकडे एकच हात मोकळा होता. थोडक्यात सांगायचं तर, माझी गाडी सुटली. उशीर होईल म्हणून मी घरी तार पाठवली (जी दुसऱ्या दिवशी पोचली). नंतर सुमारे अडीच तासांनी मला दुसरी गाडी मिळाली. प्लिमथ, नॉर्थ रोडला आल्यावर कळलं की, लुईला जायला त्या रात्री कुठलीही गाडी नव्हती.(2) इतक्या उशिरा फोन करणंही शक्य नव्हतं, पोस्ट ऑफिसं बंद झाली होती. मग मी माझ्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. उरलेल्या प्रवासाचं भाडं सोडल्यास माझ्याकडे जास्तीचे साडेसात पेन्स होते. म्हणजे मी एक तर सहा पेन्स भाडं असलेल्या वायएमसीएमध्ये रात्र काढू शकत होतो, पण मग उपाशी राहायला लागलं असतं; किंवा काही तरी खाऊ शकत होतो, मात्र यात झोपायला जागा नव्हती.(3) मी दुसरा पर्याय निवडला. किटबॅग क्लोकरूममध्ये ठेवली आणि सहा पेन्सना बारा बनपाव विकत घेतले. रात्री साडेनऊ वाजता मी कुठल्या तरी शेतकऱ्याच्या शेतात चोरून घुसलो- तिथे काही झोपड्यांसारख्या घरांच्या रांगा होत्या आणि त्यांच्यामध्ये शेतं पसरलेली होती. त्या प्रकाशात मी माझ्या गणवेशामुळे येरझाऱ्या घालणाऱ्या एखाद्या सैनिकासारखा दिसत असेन. प्रवासात मला काही लोकांनी एवढ्यात कसं परत पाठवलं, याबद्दल विचारलंही होतं. शेवटी मी एका शेताच्या कोपऱ्यात असलेल्या एका वस्तीजवळ आसरा घेतला. मात्र मी थोडीशीही हालचाल केल्यावर आसपासचे सर्व कुत्रे भुंकायला लागले, तेव्हा मला आठवलं की, दुसऱ्याच्या शेतात झोपणाऱ्या व ‘निराधार ठरणाऱ्या’ व्यक्तींना सहसा चौदा दिवसांची सजा होते. त्या कोपऱ्यात आसरा घेण्यासाठी एक मोठं झाड होतं आणि लपून राहण्यासाठी काही झुडपं होती. पण थंडी असह्य होती आणि माझ्याकडे पांघरायला काही नव्हतं. मी टोपी उशाला घेतली, माझा लष्करी झगा अंगाभोवती आवळून घेतला आणि आडवा झालो. पण एक वाजेपर्यंत मी फक्त डुलक्या घेत होतो आणि थंडीने कुडकुडत होतो. मी जेव्हा माझ्या पोटऱ्यांवरच्या पट्ट्या पुन्हा नीट बांधून घेतल्या तेव्हा मला इतकी चांगली झोप लागली की, पहाटेची 4.20 ची पहिली गाडी एका तासाने चुकली. पुढच्या गाडीसाठी 7.45 पर्यंत वाट बघायला लागली. जागा झालो तेव्हा माझे दात थंडीने कडकड वाजत होते. मी लुईला पोचलो तेव्हा भर उन्हात मला चार मैल चालावं लागलं. या साहसाचा मला खूप अभिमान वाटतो, पण असा अनुभव पुन्हा घ्यावासा नाही वाटत. 

तुझा मित्र,
ई. ए. ब्लेअर

2. भाषांतर

नोकरी सोडून घरी परत आलेला ऑर्वेल काही काळ केवळ लेखनावर जगण्याचा प्रयत्न करून पाहत होता. त्याने लंडन-पॅरिसमधल्या अनुभवांवर पुस्तक लिहायला घेतलं होतं. ‘अडेल्फी’ नामक नियतकालिकात त्याचे लेख व परीक्षणं छापून येत होती. पण त्यातून मिळणारे पैसे उपजीविकेसाठी पुरेसे नव्हते. तेव्हा फ्रेंच कादंबऱ्यांची भाषांतरं करून काही पैसे मिळवण्याचा प्रयत्न त्याने या काळात केल्याचं त्याच्या पत्रांतून दिसून येतं. ऑर्वेलचा मित्र झालेला ‘अडेल्फी’चा संपादक रिचर्ड रीस यानेही त्याला असं काम मिळण्यासाठी मदत केलेली दिसते. 

ऑर्वेलचं या संदर्भातलं पहिलंच पत्र टी.एस. एलियटला आहे. एलियट या वेळी ‘फेबर अँड फेबर’ या प्रतिष्ठित प्रकाशनसंस्थेचा संचालक होता. दि.30 ऑक्टोबर 1931 रोजी लिहिलेल्या या पत्राची सुरुवात, ‘रिचर्ड रीस हे माझ्याबद्दल तुमच्याशी बोललेले असल्यामुळे हे पत्र वैयक्तिक पातळीवर लिहितोय,’ अशी करून ऑर्वेल पुढे म्हणतो : ‘नुकतीच मी जॅक रोबर्ती नामक लेखकाची’- la Belle de Nuit ही एक रोचक फ्रेंच कादंबरी वाचली. ही एका देहविक्रय करणाऱ्या स्त्रीची कहाणी आहे. तिच्या जगण्याचं खरंखुरं चित्रण करणारी म्हणता येईल अशी आणि अतिशय निष्ठुरपणे सांगितलेली. ती अश्लील विषयाचा केवळ धंदेवाईक उद्देशाने गैरवापर करणारी कादंबरी नाहीय. मला ती इंग्रजीत भाषांतरित होण्याच्या योग्यतेची वाटते. जर फेबर अँड फेबरला तिचं भाषांतर अजमावावंसं वाटत असेल, तर मी हे काम इतर कोणाइतकंच चांगलं करू शकेन. माझं फ्रेंच भाषेचं ज्ञान विद्वत्तापूर्ण आहे असा माझा दावा नाहीय; पण ज्या तऱ्हेच्या फ्रेंच समाजात ती घडते, त्यात वावरण्याचा मला अनुभव आहे. आणि मला फ्रेंच अशिष्ट भाषा (slang) अवगत आहे- खूप उत्तम नसली, तरी बहुतेक इंग्रजांपेक्षा चांगली. अशा प्रकारचं पुस्तक खपेल की नाही, हे मला माहीत नाही. पण मला वाटतं, एमिल झोलाच्या कादंबऱ्या इंग्लंडमध्ये जातात आणि या लेखकाचं झोलाशी थोडं फार साम्य जाणवतं. फेबर अँड फेबरला या बाबतीत पुढे जायची इच्छा आहे का, हे तुम्ही मला कळवू शकाल? त्यांना हे पुस्तक पाहायचं असल्यास मी ते पाठवू शकतो किंवा नमुना म्हणून काही पानांचं भाषांतर करू शकतो...’

एलियटने बहुदा पुस्तक बघायला होकार दिला असणार, कारण चारच दिवसांनी ऑर्वेलने त्याला एक छोटं, चार-पाच ओळींचं दुसरं पत्र लिहून पुस्तक पाठवत असल्याचं सांगितलंय. ऑर्वेलला या वेळी कामाची किती गरज वाटत होती, हे त्याने पुढे जे लिहिलंय त्यावरून लक्षात येतं : ‘फेबर अँड फेबरला कधी दुसऱ्याही कुठल्या फ्रेंच पुस्तकाचं भाषांतर करण्याची गरज भासली, तर त्यांनी मला तशी संधी दिल्यास मी अत्यंत ऋणी राहीन. मी अशा तऱ्हेचं एखादं काम करायला फार उत्सुक आहे. मी ते कुठल्याही सर्वसाधारण भाषांतरकाराइतकं चांगलं करू शकेन, असं मला वाटतं.’

या पत्रांतला आर्जवाचा सूर आणि त्यांत ऑर्वेलने कुठेही ‘मी इतर भाषांतरकारांपेक्षा जास्त चांगलं काम करू शकेन’ असं न म्हणणं, या दोन्ही गोष्टी लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. 

एलियट/फेबर यांनी ही फ्रेंच कादंबरी अत्यंत बीभत्स असल्याचं कारण देऊन नाकारली. यानंतर थोड्याच महिन्यांत एलियटने सुरुवातीला ज्याचा उल्लेख केला आहे ते ऑर्वेलचं पहिलं स्वतंत्र लेखनही नाकारलं. या लेखनाच्या सुधारित खडर्यासाठी- जो नंतर ‘डाऊन अँड आऊट इन पॅरिस अँड लंडन’ शीर्षकाने प्रसिद्ध झाला. प्रकाशक मिळावा म्हणून प्रयत्न करणाऱ्या ऑर्वेलने साहित्यिक एजंट लिओनार्ड मूर याला 26 एप्रिल 1932 रोजी जे पहिलंच पत्र पाठवलं, त्यात ऑर्वेल पुन्हा एकदा भाषांतराचं काम मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो. ‘एलियटने भाषांतरासाठी नाकारलेली फ्रेंच कादंबरी पोर्नोग्राफी नाहीय, एखादा धाडसी प्रकाशक ती छापणं शक्य आहे, तुझ्या माहितीत तसा कोणी आहे का?’ असं तो या पत्रात मूरला विचारतो. 

ऑर्वेलने या पत्रात हेही उघड केलंय की, मधल्या काळात तो ‘चॅटो अँड विंड्‌स’ या प्रकाशकाकडे एमिल झोलाच्या कादंबऱ्यांचं भाषांतर करण्याचा प्रस्ताव घेऊन गेला होता, पण त्यांनीही ऑर्वेलला दाद दिली नाही. झोलाची इंग्रजीत भाषांतरं झालीयत, पण ती भयानक आहेत, असं मत त्याने इथे व्यक्त केलंय. या पत्राच्या शेवटी तो मूरला लिहितो : ‘मी जुन्या फ्रेंचचंही भाषांतर करू शकतो, निदान इ.स. 1400 नंतरच्या.’

एवढा सारा खटाटोप करूनही त्या दिवसांत ऑर्वेलला भाषांतराचं काम काही मिळू शकलं नाही. मात्र लवकरच मूरने त्याला ‘डाऊन अँड आऊट’साठी व्हिक्टर गोलान्झ हा प्रकाशक मिळवून दिला आणि त्यानंतर ऑर्वेल त्याच्या कादंबऱ्यांत व अन्य लेखनात इतका गुंतून गेला की, कधी काळी आपल्याला भाषांतर करायचं होतं, याची पुढे बहुधा त्याला आठवणही राहिली नसेल.

3. वर्गजाणीव

ऑर्वेलच्या ‘रोड टू विगन पीअर’ या पुस्तकात एक आत्मचरित्रात्मक प्रकरण आहे, ज्यात त्याने इंग्रज समाजातल्या वर्ग-अहंकाराविषयी विस्ताराने लिहिलंय. त्याला स्वतःला याचा प्रत्यय तो सहा वर्षांचा असल्यापासून येऊ लागला होता. ऑर्वेलच्या आईने त्याचे मित्र असलेल्या प्लंबरच्या मुलांबरोबर खेळायला त्यालामनाई केली होती. तो म्हणतो, ‘या आधी लोहार, कोळी, गवंडी ही त्याची हीरो मंडळी होती : ती त्याला आवडणारी कामं करत आणि त्यांत त्याला लुडबूड करायलाही देत.’ पण अचानक या प्रेमळ सोबत्यांपासून त्याला दूर करण्यात आलं. पांढरपेशांच्या जगात श्रमिक वर्गाविषयी- ते घाणेरडे असतात, अशुद्ध भाषा बोलतात, त्यांना वास येतो- असे समज लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवले जातात, त्यांचा ऑर्वेलच्या मनावर तो अगदी मोठा होईपर्यंत पगडा राहिला होता. 

तो तेरा वर्षांचा असतानाच्या एका प्रसंगाचं वर्णन त्याने केलंय : तो रेल्वेगाडीच्या तिसऱ्या दर्जाच्या डब्यातून प्रवास करत होता आणि शेळ्या-मेंढरं आणि डुकरं विकायला गेलेल्या पशुपाळांनी डबा भरलेला होता. मधेच त्यांच्यातल्या कोणी तरी एक बिअरची बाटली काढली आणि सर्व जण ती घोट-घोट पीत पुढे सरकवायला लागले. ऑर्वेलने लिहिलंय, ‘त्या’ लोकांनी तोंड लावलेल्या बाटलीतून मला प्यायला लागलं असतं, तर मला नक्कीच ओकारी आली असती. पुढे तो म्हणतो की, आजही मला कोणी उष्ट्या केलेल्या कपातून प्यायला आवडणार नाही, पण त्यामागे वर्गभावना नसेल. नंतरच्या काळातल्या भटक्यांसोबतच्या जगण्याने आपली या वर्गजाणिवेतून सुटका झाली, असं मत त्याने व्यक्त केलं आहे. 

या प्रकरणाच्या शेवटच्या भागात, वर्गमुक्त होण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रागतिक विचाराच्या मध्यम-वर्गीयांविषयी- विशेषतः समाजवादी व कम्युनिस्ट यांच्याविषयी- ऑर्वेलने काही मनोरंजक, थोडी अन्यायकारकसुद्धा निरीक्षणं नोंदवली आहेत. तो म्हणतो : ते कितीही प्रामाणिक असले, तरी खाणंपिणं, कपडे, मित्र, पुस्तकं, संगीत या संदर्भातल्या त्यांच्या आवडी-निवडी मध्यमवर्गीयच राहतात. ते लग्नसुद्धा त्यांच्याच वर्गातल्या मुलीशी करतात. त्यांचे ‘टेबल मॅनर्स’ बदलत नाहीत! मी त्यांच्यातल्या एकालाही सूप भुरके मारून पिताना किंवा चहा बशीत ओतून पिताना पाहिलेलं नाही.

या टेबल-शिष्टाचारांच्या संदर्भातली एक मजेदार हकिगत मला बर्नार्ड क्रिक यांनी लिहिलेल्या ऑर्वेल-चरित्रात वाचायला मिळाली. ऑर्वेल बीबीसीमध्ये काम करत असताना तिथल्या जॉन मॉरिस नावाच्या सहकाऱ्याची तो अकारण चेष्टा करत असे. क्रिक यांच्या मते, मॉरिस ऑर्वेलला दिखाऊ व पोकळ वाटत असावा. ऑर्वेलच्या अशा वागण्याविषयी मॉरिसने, ‘सम आर मोअर इक्वल दॅन अदर्स’ शीर्षकाचा एक लेख लिहून ठेवलाय. बर्नार्ड क्रिकनी ही घटना त्यातून उद्‌धृत केलीय : ऑर्वेल आणि मॉरिस दोघे जण एकदा बीबीसीच्या कँटीनमध्ये एका टेबलावर बसलेले असताना ऑर्वेलने आपला चहा बशीत ओतून घेतला आणि तो सुर्र-सुर्र असा मोठा आवाज करत पिऊ लागला. मॉरिस म्हणतो, ‘मी काही न बोलता माझ्या नेहमीच्या पद्धतीने चहा पीत राहिलो, तेव्हा ऑर्वेल माझ्याकडे आव्हानात्मक नजरेने पाहत राहिला. आमच्या टेबलावर दोन द्वाररक्षक बसले होते, त्यांनाही कसं तरीच झालं आणि थोड्याच वेळात ते तिथून उठून निघून गेले!’

(‘ॲनिमल फार्म व 1984’ या दोन कादंबऱ्यांमुळे जगप्रसिद्ध झालेल्या जॉर्ज ऑर्वेल या लेखकाचा 71 स्मृतिदीन 21 जानेवारी रोजी आहे, त्यानिमित्ताने हा लेख प्रसिद्ध करीत आहोत.)

टिपा :

1. इटनमध्ये शिकणाऱ्या 1100 मुलांपैकी सत्तर ‘किंग्ज स्कॉलर्स’ असत. ऑर्वेल, मिनर्स, रन्सिमन हे असे किंग्ज स्कॉलर्स होते. इतर विद्यार्थ्यांना ‘ऑपिडन’ म्हटलं जाई. : मुळातली टीप संक्षेपाने.

2. ऑर्वेलचं कुटुंब उन्हाळ्याच्या सुट्टीत कॉर्नवॉलमधल्या लुई इथे राहायला गेलं होतं. : मुळातली टीप संक्षेपाने. 

3. त्या काळातल्या पौंड-शिलिंग-पेन्सचं कोष्टक : 1 पौंड = 20 शिलिंग, 1 शिलिंग = 12 पेन्स, अर्थात 1 पौंड = 240 पेन्स.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

जयप्रकाश सावंत
jsawant48@gmail.com

लेखक, अनुवादक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके