डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मराठीतील सिद्धहस्त लेखक श्री. राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या ‘मित्राय नमः' या पुस्तकास न्या. मू. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी लिहिलेल्या रसील्या प्रस्तावनेतील काही भाग.

राजाभाऊंचं मूळ नाव वसंत नारायण मंगळवेढेकर! जन्म दात्री आई ते आठ-दहा महिन्यांचे असतानाच त्यांना सोडून गेली. त्यापूर्वीही ती आजारीच असे. त्यामुळे राजाभाऊंचा संभाळ 'आईहूनही आई' अशा त्यांच्या जिजीनं केला. जिजी ही त्यांच्या वडिलांची नात्यानं दूरची, पण विधवा बहीण. बिजीला वैधव्य लहानपणीच प्राप्त झालेलं, त्यामुळे स्वतःचं अपत्य नव्हतं. राजाभाऊंचा जन्मही चारचौघांसारखा नव्हता. जन्मले तेव्हा म्हणे राजाभाऊ रडलेच नाहीत. मग जिजीनं माळवदावर जाऊन पेंढीभर गवत उपडून आणलं. त्याचा जाळ केला. त्या उबेदर राजाभाऊंना हातावर धरलं आणि ती ऊब लागताच ते खऱ्या अर्थानं जन्माला आले अर्थात ती ऊब पेंढीच्या जाळाची नव्हती, तर ज्या हातांनी जिजीनं त्यांना जाळावर धरलं होतं, त्या हातांची होती. देवकीचा पुत्र यशोदेनं जोपासला, वाढवला म्हणून भजनं व गाणी गाणाऱ्या बायकांना जिजीनं दाखवून दिलं, की यशोदा एकटीच नव्हती, ते एक प्रतीक होतं, आणि मातृत्व हा नैसर्गिक अपघात नाही, तर तो मनाचा गुण आहे.

राजाभाऊंची दुसरी माऊली म्हणजे ‘साने गुरुजी‘. जन्मदात्री माता, भारतमाता व विश्वमाता यांच्या सेवामय निदिध्यासातून त्यांच्या ठायीच्या मातृत्वालाही एक अनोखं सहजपण लाभलं होतं. त्याचा लाभ राजाभाऊंनाही झाला आणि त्या माऊलीच्या धडपडणाऱ्या मुळांत राजाभाऊंनाही स्थान मिळालं.

मातृत्वाचा असा अनमोल वारसा लाभलेल्या राजाभाऊंना स्वायत अशा पितृत्वाचाही लाभ झाला. तसं पाहिलं तर राजाभाऊ हे आमच्याच बिरादरीतले. पू. दादांच्या स्वायत्त पुत्रांपैकी एक. आमच्यासारख दादाचं पितृत्व त्यांना नैसर्गिक अपघातानं लाभलं नव्हत, ती त्यांची स्वतःची कमाई! दादांचं वर्णन राजाभाऊंनी! लेकुरवाळे दादा' या शब्दांनी केलं आहे. त्यांच्या मते दादांच पितृत्व विशाल व्यापक, अगदी आभाळासारखं होतं. त्यांच्या घराला भिंतीही नव्हत्या. खांब-तुळ्यांनी तोललेलं छप्परही नव्हतं. कुलाभिमान किंवा रक्तसंबंधाच्या मर्यादाही नव्हत्या. त्यामुळे देशभर दादांची स्वायत्त अशी स्नेहाची विश्रामस्थानं व घरं होती. त्यांतील एक घर राजाभाऊंचंही होतं. दादा तसे ‘खानाबदोश' होते. ज्याचं घरं नेहमी पाठीवर असतं त्याला खानाबदोश म्हणतात. कौटुंबिक भावनेचा विस्तार करीत असताना कुटुंबाच्या लांबी-रुंदीपेक्षा खोलीची चाड दादांना अधिक होती आणि हाही वारसा राजाभाऊंना लाभला. अशा विशाल मातृत्व व पितृत्वाचा वारसा ज्याला लाभला त्याचं नांव ‘राजा'च असू शकतं आणि म्हणूनच त्यांचं मूळनाव गळून पडलं व 'राजाभाऊ' या नावानंच ते ओळखले जाऊ लागले. 

या नावाच्या राजानं गरिबी व दुःखंही केवळ बघितली नाहीत, तर अनुभवलीही आहेत. ते रेल्वे कामगार संघटनेत काम करीत होते, हे किती लोकांना ठाऊक आहे ? श्रमिकांची व गरिबांची दुःखे यांनी कुंपणावर बसून नुसती बघितली नाहीत, तर ते त्यांत सामील झालेत. अशाश्वती व गरिबी त्यांनी उपभोगली आहे. त्यांचा विश्वास कोऱ्या बांधिलकीवर नाही, तर त्यांना या बाबतची ‘सामीलकी’ अधिक मोलाची वाटते. 'आंतरभारती' हे गुरुजींनी त्यांच्या आयुष्याच्या सायंकाळी उराशी बाळगलेलं महान् मंगळ स्वप्न होतं. त्या स्वप्नाचेही राजाभाऊ साक्षेपी साक्षीदार आहेत. आम्ही भारतात जन्मली, भारतीय राज्यघटना मान्य करतो, म्हणून आम्ही भारतीय आहोत, अशी आमची 'भारतीय' या शब्दाची साधी सोपी व्याख्या. परंतु या पलीकडे जाऊन भारताचा ‘आत्मा’ म्हणून काही वस्तू आहे, याची जाणीव आपल्यापैकी फार थोड्यांना आहे. गुरुजींना ध्यास होता तो या भारतीय आत्म्याचा. हीच दृष्टी प्रत्यक्षात उतरविण्यासाठी राजाभाऊंनी देशभर भ्रमण केलं. सर्व प्रदेशाला भेटी दिल्या. येथील शहरांत खेडयांत जाऊन तेथील भाषेतील साहित्यिक ठेवा, प्रादेशिक इतिहास, भूगोल, लोकजीवन व चालीरीती यांचा अभ्यास केला. त्या विशिष्ट प्रदेशातील शहीद, संत, स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास यांची माहिती गोळा केली. 'एक हृदय हो भारत जननी' या भावनेतून भिन्नतेतून अभिन्नता वेचून काढली व ‘आपला भारत’ या नावानं 20 पुस्तकांची माला लिहून काढून स्वीकारलेल्या व्रताची सांगता केली. 'साने गुरुजींची जीवनगाथा' ही लिहून काढली.

पण राजाभाऊ खरे रंगले ते मुलांसाठी गोष्टी लिहिण्यात व कथाकथनात. यासाठी त्यांनी कथा आणि कथाकथन' नावाचा प्रबंध लिहिला. बालकांच्या जीवन विश्वासंबंधी राजाभाऊंचं स्वप्नही तितकंच लोकविलक्षण आहे. त्यांना वाटतं की, ‘एखादी स्टेशन बॅगनसारखी गाडी असावी. तिच्यांत खूपशी बालकांच्या उपयोगाची पुस्तके असावीत. फिल्म प्रोजेक्टर असावा; नाटुकली, गाणी, नृत्य इत्यादी करून दाखविणारं छोटंसं कलापथकही असावं; रंग, ब्रश, खडू, कागद भरपूर बसावेत. पक्षी वाणि निसर्गाच्या निरीक्षणासाठी दुर्बिणीही असाव्यात. आणि ही सारी साधनं घेऊन लांबवरच्या खेडयापाडयांतून जावं. गावाबाहेर तंबू ठोकावा. वाटल्यास मोकळ्या मैदानावरच खेडयांतील मुलांना गोळा करावं. त्यांना ही साधनं मुक्तपणे हाताळू द्यावीत. नृत्य, नाट्य, चित्रपट दाखवावेत. खेळ शिकवावेत, शिकावेत. गोष्टी सांगाव्या व ऐकाव्या. गाणी म्हणावी. झाडाझुडपांची पक्षांची माहिती द्यावी व घ्यावी. सारा आसमंत ढवळून काढावा’... राजाभाऊंचं हे स्वप्न मुलांना खूप आवडलं. म्हणूनच त्यांना बालकुमारसाहित्य संमेलनाच अध्यक्ष करून मुलांनी आपली त्यांच्या स्वप्नातील सामोलकी जाहीर केली. राजाभाऊंनीही बालकांपासून निष्पाप मन, निरागस वृत्तो व जिज्ञासा हे गुण उचलले. 

ही सारी स्वप्न बघताना व जगताना, ज्या मित्रांनी त्यांना साथ दिली, प्रेरणा दिली, त्यांना नमन करण्याकरता राजाभाऊंनी वेळो वेळी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा संग्रह म्हणजे 'मित्राय नमः हे पुस्तक. खऱ्या अर्थानं मैत्री' हे सर्वांत श्रेष्ठ असं आध्यात्मिक मूल्य आहे. मैत्रीला रक्तसंबंधाची चाड नाही. गरजही नाही ती निरपेक्ष असते, कारण तो एकतर्फी असते. दुसऱ्याकडून त्यात मैत्रीशिवाय कशाचीच अपेक्षाच नसते, 'दे सीम टु टेक अवे सनशाइन फ्रॉम लाईट, हू टेक अवे फ्रेंडशिप' अशा अर्थाचं प्रसिद्ध वाक्य इंग्रजीत आहे. जीवनातून मैत्रीभावना हिसकावून घेणारे जणू सूर्यापासून प्रकाशच हिसकावून घेतात, अशी भावना या वाक्यात व्यक्त करण्यात आलेली आहे.
कराविव शरीरस्य नेत्रयोरिय पक्ष्मणी । 
अविचायं प्रियं कुर्यात्तन्मित्रं मित्रमुच्यते ॥

हात जसा शरीराला, पापण्या अशा डोळयांना नकळत जातात, तशा सहजतेनं हितकर गोष्टी करीत असतो त्याला मित्र म्हणावं, असं एक संस्कृत वचन आहे, तसं-
पापान्निवारियति योजयते हिताय
गुह्यानि गृहति गुणान्प्रकटी करोति । 
आपद्गतंच न जहाति ददाति-काले 
सन्मित्रलक्षणमिदं प्रवदन्ति सन्तः ॥  

जो पापापासून निवारण करतो, हितकर मार्ग दाखवितो, जो आपलं गुह्य आपल्याजवळ गुप्त ठेवतो आणि आमचे गुणच प्रकट करतो, जो संकटात सोडून जात नाही आणि प्रसंगी सर्वतोपरी साहाय्य करतो, यालाच संतांनी सन्मित्र म्हटलं आहे. राजाभाऊंच्या अशा सुहृदांची ही व्यक्तिचित्रे, 'खऱ्या अर्थाने इतिहास नावाची वस्तू नसतेच. असते ती लोकांची आत्मकथाच!' अशा अर्थांचं प्रसिद्ध इंग्रजी लेखक इमर्सन यांचे वाक्य आहे. ज्यानं समाजाचं मानस तयार करण्यास चालना दिली, मदत केली, त्यांचं चरित्रय कुठल्याही प्रदेशाचा अगर देशाचा इतिहास बनत असतो. आणि हा इतिहासही सामान्य माणसांच्या डोळ्यांतच वाचावा लागतो, असं आम्ही ऐकत आलो. आजकाल माझ्या पिढीला, माता-पित्यांना मुलांवर चांगले संस्कार होत नाहीत याची फार काळजी वाटते आहे. याही बाबतीत राजाभाऊंची एक विशिष्ट भूमिका आहे. मुलांवर संस्कार करणं म्हणजे ठराविक ठशाची बालक निर्माण करणं नव्हे. ठोकळेबाज प्रयत्नामुळे मुलांचं निर्मल, सुंदर बाल्यच हरपून जाईल. बालपणही कोमेजून जाईल. कातरकाम केलेल्या दिखाऊ कागदी फुलांसारखी ती निर्जीव, निःसत्व, निर्गंध बनतील. ठोकळेबाजपणा कुठल्याही प्रकारच्या विकासाला घातक ठरतो असं त्यांचं मत! 

शेवटी विकास म्हणजे नित्य उमलणं, फुलणं. यासाठी सभोवतालच्या रंगीबेरंगी, सुंदर व विशाल सृष्टीच्या मांडीवर मुलांना खेळता-बागडता आलं पाहिजे. सृष्टीशी एकरूप होऊन निसर्गाशी दोस्ती करता आली पाहिजे. या सहजीवनातून त्यांना जीवन अनुभवता आलं पाहिजे व जे आवडते मुक्तपणे व्यक्त करण्याचे स्वातंत्र्यही त्यांना मिळालं पाहिजे. थोरा-मोठयांनी आपल्या जुनाट कल्पना, आकांक्षा ध्येयं त्यांच्यावर लादू नयेत. आपल्या आकांक्षाच्या पूर्तीचं साधन म्हणून मुलं वापरली जाणार नाहीत, याची काळजी घ्यावयास हवी असं राजाभाऊंना वाटतं. पाश्चिमात्य दार्शनिक खलील जिब्रानच्या मताशी मिळतीजुळती अशी ही मतं आहेत. जिव्रान म्हणतो- "बालकरूपी चैतन्यमय बाण सोडण्याची तुम्ही फक्त धनुष्यं आहात. ती तुमच्याद्वारा जन्माला आली तरी तुम्ही निमित्त आहात. तेव्हा त्यांना आपले प्रेम द्या, पण आपले विचार त्यांच्यावर लादू नका. त्यांच्या शरीरासाठी त्यांना घर बांधून द्या पण, त्यांच्या आत्म्याकरिता मात्र ती देऊ नका. त्यांच्यासारखे बनण्याचा तुम्ही खुशाल प्रयत्न करा पण त्यांनी तुमच्यासारखे बनावं याचा खटाटोप करू नका. कारण जीवन माघारी परतत नाही आणि भूतकाळाबरोबर रेंगाळतही नाही.’ परंतु आम्हांला तर आमची मुलं आमची ‘कार्बन कॉपी’ किंवा ‘पॉकेट एडिशन’ व्हावीत असं सारखं वाटतं आणि हीच खरी जनरेशन गॅप आहे.

आमचा आणखी एक गैरसमज आहे. आमच्या काळी लोकांवर संस्कार घडवू शकतील अशी आदर्श माणसं होती. पुढारी होते. आता तसे आदर्शच समाजजीवनात उपलब्ध नाहीत. हा गैरसमय दूर करण्यासाठी हे पुस्तक वाचावं. म्हणजे आपणास उमजेल, की अशा व्यक्तींची कमतरता नाही. फक्त दृष्टी हवी. संस्कार करावे लागत नाहीत. ते होत असतात. हे खरं आहे की लोकसंख्या भरमसाट आजच्या आधुनिक बागांत फुलांची संख्या खूप वाढलेली आहे. पण सुगंधित फुलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. अशा वेळी समाजजीवनातील सुगंधित फुलं एका गुच्छात एकत्रित करून राजाभाऊंनी हा गुच्छ ‘मित्राय नमः' या पुस्तकाच्या रूपानं प्रस्तुत केला आहे. फक्त आपल्याजवळ हा सुगंध अनुभवता येईल असं संवेदनाशील नाक व मन हवं! (पृष्ठ 14 वरून)

श्री. रावसाहेब पटवर्धनांना ‘राजहंसाची’ उपमा देऊन त्यांनी खऱ्या अर्थानं रावसाहेबांना आपल्यासमोर उभं केलं आहे. रावसाहेबांना ज्यांनी बघितलं असेल, त्यांच भाषण ऐकण्याची. पर्वणी ज्यांना साधली असेल, त्यांना हे बेमालूम उभं केलेलं चित्र तर आवडेलच । पण ज्या पामरांना ही संधी मिळाली नसेल, त्यांनाही रावसाहेब म्हणजे काय माणूस होता याची कल्पना येऊ शकेल. त्यावेळी भारतीय राष्ट्रीय जीवनात जी जी दिव्य तत्वं होती; जे जे कल्याणकारी भाव होते, जे पावित्र्ययुक्त माधुर्य होतं, त्यांची कल्पना या पुस्तकातील लेखांनी येईल.

माणसाचं वर्णन एका वाक्यात अगर शब्दात करण्याची किमया राजाभाऊंना छान साधलेली आहे. या पुस्तकातील प्रत्येकच लेखाबद्दल लिहिता येईल, पण मग ही प्रस्तावनाच ग्रंथाचे रूप धारण करील, अशी भीती वाटते. म्हणून खूप लिहिण्यासारखं असतानाही मी मोह आवरत आहे. यातील काही व्यक्ती माझ्याही ओळखीच्या आहेत. त्यामुळं आपण जे अनुभवलं ते राजाभाऊंना कसं कळलं, याबद्दल आश्चर्य वाटलं. काही लेखांतून महाराष्ट्रांतील सामाजिक चळवळींचं दर्शन घडतं. मी तर असं म्हणेन की, ज्याला कुणाला महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींची अगर जाणिवांची माहिती करून घ्यावयाची असेल त्याला हे लेख वाचल्याशिवाय पर्याय नाही. राजाभाऊंनी ‘घागर में सामर' मरून ती आपल्या हातात दिली आहे.

ह्यातील पानं म्हणजे केवळ पुस्तकांची पानं नाहीत. ती त्या त्या व्यक्तींच्या जीवनाची पृष्ठं आहेत. हे सारं त्यांना लवकर समजू शकेल, ज्यांनी आपल्या जीवनात आलेली वादळ आपल्या शरीरावर लीलया झेलली आहेत आणि ज्यांच्या हातांची ताकद त्यांच्या संवेदनशील हृदयापासून मिळत असते.

राजाभाऊ आता साठ वर्षांचे झालेत असं मी ऐकलं आहे. यावर कुणाचा विश्वास बसेना म्हणून त्यांचा त्यानिमित्ताने सत्कार करण्यात आला. परंतु शेवटी एका उर्दू उक्तीप्रमाणे ‘साठ साल जवानीचा बुढापा असला, तरी बुढाप्याची मात्र जवानी' आहे. त्यामुळे राजाभाऊंनी आता दुसऱ्या यौवनात पदार्पण केलं आहे. तारूण्य व वृद्धावस्थेचं वर्णन महाकवी दिनकर यांनी फार सुरेख केलं आहे. ते म्हणतात ‘जवानीकी आंखों में ज्वाला, बुढापेकी आँखो में प्रकाश, जवानीकी बाहों में पृथ्वी, बुढापेकी मिट्टी में आकाश होता है । जवानी संचय करती है, बुढापा दान; जवानी सुंदर है, बुढापा महान’

राजाभाऊंना या दोन्ही अवस्थांतील चांगलं तेवढंच आजही लागू पडतं. त्यांची भ्रमंती व स्नेहसंग्रह आजही सुरूच आहे. हनुमानसारखं अद्वितीय हृदयही त्यांना लाभलं आहे. त्यांनी मनात आणलं तर स्वतःचं हृदय छेदून आत लपलेल्या मित्रांचं दर्शन ते आजही घडवू शकतात. त्यांनी ते घडवावं, एवढीच विनंती आहे.

Tags: माणसाचं वर्णन आध्यात्मिक मूल्य मैत्री' ‘मित्राय नमः' श्री. राजाभाऊ मंगळवेढेकर न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी आचमन Description of Man Spiritual Values ‘Friendship’ ‘Mitray Namah’ Shri. Rajabhau Mangalvedhekar * Justice. Chandrasekhar Dharmadhikari #Achaman weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

चंद्रशेखर धर्माधिकारी

(1927 - 2019)

मराठी वकील, न्यायाधीश, लेखक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक. ते मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके