डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दवे निघून गेले, परंतु माथूरसाहेबांची अस्वस्थता वाढत चालली. त्यांना त्यांच्या तारुण्यातील दिवस आठवले. ह्याच आदर्शाची जपणूक करण्याची शपथ त्यांनी घेतली होती. परंतु पैशाच्या लालचीने त्यांच्या डोळ्यांना जणू झापड बांधली होती. आज त्यांच्याजवळ मोटार, बंगला सर्व सुखसोयी होत्या, नव्हती ती मात्र मानसिक शांती. एक मुलगा स्मगलिंगमध्ये सापडला होता. दुसरा सदैव दारूच्या नशेत. त्यांची व्यथा वाटून घेईल, अशी पत्नीची परिस्थिती नव्हती. कदाचित अशा मिसळ असलेल्या औषधांचा तर परिणाम ती भोगत नसेल, असाही विचार त्यांच्या मनाला स्पर्श करून गेला. मनातल्या मनात त्यांनी ईश्वराजवळ प्रार्थना केली.

आज सकाळपासूनच आकाशात ढग गर्दी करू लागले होते. सर्व वातावरण जणू काही खग्रास ग्रहण लागण्याआधी जसे उदासीन होते, तसे झाले होते. रोज, सतत वाहणारा अवखळ वारा जणू दडी मारून कुठेतरी लपला होता. पाने, फुले सर्व काही जणू अडग झाल्याने फुलपाखरे सुद्धा तिकडे फिरायला तयार नव्हती.

अगरवाल फार्मास्युटिकल्सच्या लॅबोरेटरीमध्ये जगदीश दवे आपल्या कामात मग्न होते. केमिकल अ‍ॅनेलेसिस करताना त्यांचे भाव बदलत होते. कधी दोन भुवया ताणून ते बघत होते, तर कधी हताश होऊन खुर्चीमागे रेलून दोन हात वर करून थकवा घालविण्यासाठी आळस देत होते. ह्या कंपनीत ते नुकतेच अनॅलिटिकल केमिस्ट म्हणून लागले होते. तसे नव्या वातावरणात आपण कसे रमणार याबद्दल त्यांना थोडी शंका होतीच. एवढ्यात वर डोके करून त्यांनी शिंपायाकडून हजारीमल ह्या बड्या कॉन्ट्रॅक्टरला आत बोलावून घेतले.

"माफ करा महाशय, आपण दिलेला माल शुद्ध नाही. त्यात भेसळ आहे. त्याच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र मी देऊ शकणार नाही. तीस टक्के माल म्हणजे नुसती माती आहे." 

हजारीमल शेठकडे तिरस्काराने बघत दवेसाहेब म्हणाले. त्यांच्या डोळ्यांतून जणू आग ओतत होती.

"मी हा माल तीन, तीन वेळा लॅबमध्ये तपासला आहे. माझ्या कंपनीत असली भेसळ असलेली वस्तू मी कदापीही स्वीकारणार नाही." दवे हजारीमलकडे न बघता म्हणाले.

 “आजकाल कुठला माल शुद्ध मिळतो आहे, दवेसाहेब? हे असेच चालत आलेले आहे, थोडे प्रॅक्टिकल बना.”

"हे बघा हजारीमल, ह्या औषधाच्या कंपनीत बनलेला माल हजारो लोकांना जीवनदान देतो. लॅबमध्ये गुणवत्तेप्रमाणे पास होणारा मालच येथे घेण्यात येतो. गिऱ्हाइकांचे त्यातच हित आहे. समजलात." दवेसाहेबांच्या आवाजात जरब होती.

जगदीश दवे कंपनीत नुकताच केमिस्ट म्हणून नवा नवा नेमला गेला होता. हजारीमलसारख्या माणसांशी त्याचा हा पहिलाच परिचय होता. "हे बघा मिस्टर दवे, आपण मागून समजून घेऊ. सध्या तर हा माल घेऊन टाका. प्रत्येक किलोमागे मी तुम्हांला एक रुपया कमिशन देईन. बघा विचार करून. मालेमाल होऊन जाल, दवेसाहेब." असे म्हणून हजारीमल मोठ्याने हसत सुटला. त्या हसण्यात एक प्रकारची अरेरावी होती, ती सहन झाली नाही, तरीसुद्धा जगदीश दवे शांत स्वरात म्हणाले,

"म्हणजे स्वतःचे खिसे भरण्यासाठी ह्या मालात माती मिसळून हजारो निरपराध जीवांशी तुम्ही खेळ खेळत आहात."

"आता कसे बरे समजलात! अहो, साहेब, तुमच्या कंपनीच्या लोकांचे खिसे भरले की, अशुद्ध माल शुद्ध होऊन जातो. ही, ही, ही." त्या हसण्याची जगदीश दवेला आता किळस आली होती.

“आणि हे जेव्हा गिऱ्हाइकांना समजेल, तेव्हा कंपनीच्या प्रतिष्ठेचे काय, ह्याचा कधी विचार केला आहे तुम्ही?"

"हे पाहा मि. दवे, ह्या थोड्याशा भेसळीमुळे मालाच्या गुणवत्तेत काही फरक पडणार नाही. परंतु तुमच्या आयुष्यात मात्र नक्कीच पडेल." दव्यांनी भुवया उंच करून विचारले, "मला समजले नाही!" 

"साहेब, तुम्हाला मिळणाऱ्या पगारात सर्व आयुष्यभर पैशाला पैसा जोडून सुद्धा एवढी रक्कम तुम्ही मागे टाकू शकणार नाही. पाच वर्षांत ह्या एका खोलीतून मी तुम्हांला मोठ्या फ्लॅटमध्ये घेऊन जाईन. फ्रीज, टी. व्ही, बघा तर खरे."

"तुम्ही जाऊ शकता, मि. हजारीमल, आणि एक गोष्ट ऐकून घ्या. तुमचा अशुद्ध माल मी कुठल्याही प्रलोभनामुळे स्वीकारणार नाही. नाऊ गेट लॉस्ट."

हजारीमलने असा अव्यवहारी माणूस आजपर्यंत पाहिला नव्हता. पैशाच्या प्रलोभनाने स्वतःला विकणारे अनेक अधिकारी त्याने पाहिले होते. परंतु जगदीश दवेसारख्या निःस्पृह माणसापुढे हे शस्त्र अपुरे पडत होते. 

“तीन टन माल जर ह्या कंपनीत घुसवता आला नाही व हे असेच चालले, तर नादार व्हावे लागेल. या मूर्ख माणसाला आपले हित समजत नाही. लक्ष्मी कुंकू लावायला आली आहे आणि हा घराचे दरवाजे बंद करीत आहे. ठीक आहे. ह्याने हे असेच चालू ठेवले तर अगरवालशेठला सांगून त्याला सरकवावे लागेल,” असा विचार करीत हजारीमल म्हणाला.

“ठीक आहे साहेब, आपली मर्जी, परंतु विचार करून ठेवा, मी पुन्हा येईन."

जगदीश दवे शांतपणे पुन्हा आपल्या लॅबमध्ये कामाला लागला. ह्या कंपनीत त्यांची नुकतीच नेमणूक झाली होती आणि अॅनॅलिटिकल केमिस्ट म्हणून कच्च्या मालाची गुणवत्ता ठरविण्याचे काम त्यांच्या विभागाकडे होते आज त्यांना एक आंतरिक प्रसन्नता वाटत होती. खोटे काम करण्यास प्रवृत्त करणाऱ्या सर्व प्रलोभनांना त्यांनी नकार दिला होता. याचे समाधान त्यांच्या चेहऱ्याच्या प्रसन्नतेवरून दिसत होते.

“तुम्हांला माथुरसाहेब बोलावताहेत”, शिपायाने साहेबांचा निरोप दिला. माथुरसाहेब, कंपनीचे प्रॉडक्शन मॅनेजर होते.

"ही रिअ‍ॅक्शन पूर्ण होण्यास दहा मिनिटे बाकी आहेत, ती बघून मी आलोच." 

पुन्हा मनात विचारचक्र सुरू झाले. माथुरसाहेबांनी का बरे बोलावले असेल? तसा माथुरसाहेबांचा व त्यांचा परिचय कामापुरताच होता. थोड्या वेळाने ते माथुरसाहेबांच्या केबिनमध्ये दाखल झाले.

"या, या, मि. दवे. मी तुमचीच वाट पहात होतो."

"का साहेब, माझे काय काम पडले?"

"नुकतेच हजारीमल येऊन गेले. त्यांच्या केमिकल्सबद्दल म्हणे, तुम्ही काही आक्षेप घेतलेत?"

"होय साहेब, त्यांच्या केमिकल्समध्ये तीस टक्के माती आहे. मी तीन, तीन वेळा टेस्ट करून पाहिले व नंतरच तसे त्यांना सांगितले." जगदीश दवे म्हणाले.

"तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल. आपल्या कंपनीला आजपर्यंत त्यांनी अनेक रसायने दिली आहेत. ह्या पूर्वी कधी अशी तक्रार आली नव्हती. त्यांतून तुम्हांला माहीत आहे की, हजारीमल आणि आपले अगरवाल शेठ यांचा घरोबा आहे."

"असतील त्यांचे घरचे संबंध. जोपर्यंत माझ्या कंपनीचा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे तोपर्यंत हा माल मी कदापि स्वीकारणार नाही." दव्यांच्या शब्दांत स्पष्टपणा होता.

"तुम्हांला कल्पना आहे, मि. दवे. कंपनीची प्रतिष्ठा आपली दोघांची नोकरी वाचवू शकणार नाही."

नोकरी शब्द ऐकून दवे चमकले. माथुरसाहेबांच्या नजरेतून ही गोष्ट चुकली नाही. ही संधी साधून ते म्हणाले,

"हे बघा दवेसाहेब, हा हजारीमल कॉन्ट्रॅक्टर मोठा धूर्त माणूस आहे. तुम्हाला त्याने लाच देण्याचे नाकारले म्हणून तुम्ही हा माल नापास केला, असा कावा शेठकडे करून तो तुमची नोकरी धोक्यात आणू शकतो."

“पण सर, लाखो लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. माती वापरलेली औषधे घेऊन हजारो लोकांना किडनीचे रोग होऊ शकतात. ह्या जनसंहाराला आपण जबाबदार व्हावयाचे?"

"लोकांची गोष्ट तुम्ही सांगू नका, असेही ते मरतच आहेत. सर्वच कंपन्या भेसळ करीत आहेत. हे एक वादळ आहे, मि. दवे, त्यासमोर आपण वाकलो नाही, तर मुळासकट उखडले जाऊ. अडीअडचणीला पैसा नसेल तर कुत्राही विचारणार नाही."

“पैसा मिळवण्याच्या ह्या हीन मार्गाचे तुम्ही समर्थन करता आहात साहेब? मला तुमची कीव येते आहे. निरपराध मानवाच्या हत्येचे पातक मस्तकी घेऊन आपण कुठली सुखशांती मिळवणार आहोत, मिस्टर माथूर?" दव्यांच्या बोलण्यात आता माथूरसाहेबांऐवजी मि. माथूर असे संबोधन येऊ लागले.

ह्या स्पष्ट विधानाने मात्र माथुरसाहेब थोडे अस्वस्थ झाले. आतून बाहेरून त्यांना कोणीतरी हलवीत आहे, असा भास झाला. स्वतःला भेडसावीत असलेल्या ब्लडप्रेशर, डायबिटीसची जाणीव झाली. गेली दहा वर्षे हृदय विकाराने पथारीवश असलेल्या आपल्या पत्नीची कृश मूर्ती त्यांच्या नजरेसमोरून हलेना. ह्या तरुणाच्या निष्ठेला ते जणू मनोमनी दाद देत होते. स्वार्थी हिशोबी वृत्तीच्या जागी जणू वात्सल्य भाव जागृत होऊ लागला. असले आदर्श घेऊन जगण्याचे. स्वप्न कोणे एके काळी त्यांनी सुद्धा बघितले होते. काही तरी विचारायचे म्हणून त्यांनी विचारले,

"तुम्ही मुंबईत कुठे राहता?" 

"माटुंग्यात", जगदीश दवे उत्तरले.

"ठीक आहे. तुमच्या आयुष्याची अजून सुरुवात आहे. येतील अनुभव, पण मित्र म्हणून सांगतो, हजारीमल देईल, ती रक्कम घ्या. आयुष्यभर कष्ट करून सुद्धा एवढी रक्कम जमवता येणार नाही. त्यातून कुटुंबाच्या भविष्याची तरतूद करत चला", हे सांगताना मात्र त्यांचा आवाज पडला होता, हे दव्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहिले नाही.

“आम्ही आज संध्याकाळी तुमच्या माटुंग्याच्या घरी येत आहोत" माथूर म्हणाले.

"एवढ्याचसाठी येणार असाल, तर येण्याची गरज नाही. हे काम माझ्याकडून अजिबात होणार नाही", दवे म्हणाले.

दवे निघून गेले, परंतु माथूरसाहेबांची अस्वस्थता वाढत चालली. त्यांना त्यांच्या तारुण्यातील दिवस आठवले. ह्याच आदर्शाची जपणूक करण्याची शपथ त्यांनी घेतली होती. परंतु पैशाच्या लालचीने त्यांच्या डोळ्यांना जणू झापड बांधली होती. आज त्यांच्याजवळ मोटार, बंगला सर्व सुखसोयी होत्या, नव्हती ती मात्र मानसिक शांती. एक मुलगा स्मगलिंगमध्ये सापडला होता. दुसरा सदैव दारूच्या नशेत. त्यांची व्यथा वाटून घेईल, अशी पत्नीची परिस्थिती नव्हती. कदाचित अशा मिसळ असलेल्या औषधांचा तर परिणाम ती भोगत नसेल, असाही विचार त्यांच्या मनाला स्पर्श करून गेला. मनातल्या मनात त्यांनी ईश्वराजवळ प्रार्थना केली.

"परमेश्वरा, ह्या तरुणाला त्याच्या आदर्शांना सदैव जपण्याचे बळ दे."

आज जगदीश दवे खुप अस्वस्थ होते. घरी आल्यावर सुद्धा घरात त्यांचे लक्ष नव्हते. "वावा, वावा" म्हणून त्यांच्या मागे लागणाऱ्या त्यांच्या शर्वरीकडे आज त्यांनी बघितले, परंतु मनात मात्र द्वंद होते. असत्य आणि अन्यायी मार्गाचा अवलंब केल्यास त्याचा दंड मानवास भोगावा लागतो, हे माहीत होते. 

परंतु न्यायनीतीने व प्रामाणिकपणे केलेल्या, करीत असलेल्या कामाबद्दल नोकरी जाण्यापर्यंत शिक्षा?

"आज तुम्हांला झाले आहे तरी काय?" सुधाबेननी त्यांची उदासीनता ध्यानात घेऊन विचारले. जगदीश दव्यांनी सर्व हकीकत सांगितली.

"बस एवढेच? ह्यामुळे तुम्ही इतके अस्वस्थ झालात? पैसे घेतले नाही, तर नोकरी जाईल एवढेच ना? हात्तिच्या. नोकरी तर काय दुसरी मिळेल. मी सुद्धा थोड्या जास्त ट्यूशन्स करीन. काही खर्च कमी करून वेळ निभावता येईल. पण लाच न घेण्याच्या तुमच्या निर्णयाला माझी सदैव साथ राहील. तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? तुमचे आदर्श माझे नाहीत का?"

सुधाबेनच्या सहज भाषेमध्ये आपल्या पतीबद्दल नितांत आदर व्यक्त होत होता. जगदीश दवेच्या डोक्यावरचा भार एकदम हलका झाला. चकित होऊन सुधाबेनकडे ते बघतच राहिले. इतकी मोठी समस्या चटकन दूर झाली. एवढा तणाव तिच्या चार वाक्यांत पार विरून गेला. शर्वरीला घेऊन तिघेही महादेवाच्या दर्शनाला घराबाहेर पडले. 

घरी येऊन बघतात, तो त्यांच्या अपार्टमेंटच्या बाहेर हजारीमल आणि माथूरसाहेब उभे होते.

"ही माझी पत्नी सुधा, नमस्कार, हे आमचे प्रॉडक्शन मॅनेजर माथूरसाहेब आणि हे कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर हजारीमल."

घराचे दार उघडून सर्व मंडळी घरात गेली. एक खोली व स्वयंपाकघर. त्यात चार खुर्च्या, एक दिवाण, वर पंखा. सर्व काही साधे परंतु कसे नीटनेटके. वातावरणातच प्रसन्नता भासत होती. साधेपणा होता, परंतु दारिद्र्याचा कुठेही लवलेश नव्हता. दोघांनाही आदराने बसवून सुधाबेनने पाणी आणले.

"आपण काय घेणार?"

“काही नाही, उगीच तसदी घेऊ नका."

“आज प्रथमच तुम्ही आमच्या घरी आला आहात. तुमचा आदरसत्कार तर केलाच पाहिजे."

सुधाबेनने गरमागरम ढोकळे आणि मसाला घातलेला चहा थोड्याच वेळात तयार करून आणला.

"मग काय विचार केलात, मि. दवे?" हजारीमलने मूळ विषयाला हात घातला. तेवढ्यात सुधाबेन दारात येऊन म्हणाल्या,

"त्यात विचार करण्यासारखे काय आहे साहेब? त्यांच्या कामाच्या मोबदल्यात पगार मिळत आहे. असा हजारो लोकांचे तळतळाट घेऊन येणारा अनीतीचा पैसा का कोणाला सुख देऊ शकेल? तो न आलेलाच बरा. माझे वडील अग्निहोत्री आहेत. लहानपणापासूनच आपल्या कष्टाने मिळविलेले धनच घेण्याचा आग्रह आम्हाला शिकविण्यात आला आहे."

दव्यांना निदान नोकरीची तरी चिंता होती, पण सुधाबेनची उंची त्याहूनही वर वाटली. माथूरसाहेब भूतकाळात जात होते. सुरुवातीलाच त्यांच्या पत्नीने जर त्यांना विरोध केला असता, तर आजची परिस्थिती आली नसती. प्रत्येक वस्तु आपल्या घरी हवी, शेजाऱ्याच्या घरातील वस्तू बघून वाढणाऱ्या तिच्या मागण्या, सतत संताप आणि असंतुष्टता यांमुळे आपण कसे दुःखाच्या खाईत पडलो आहोत, ह्याची त्यांना जाणीव होत होती.

"हे बघा साहेब" सुधाबेनच्या आवाजाने माथूर एकदम भानावर आले. "ह्यांनी मला सर्व काही सांगितले आहे. नोकरी गेल्याची आम्हांला चिंता नाही. ती काय पुन्हा दुसरी मिळेल. आम्ही दोघेही ट्यूशन्स करून घर चालवू, परंतु असा पैसा घेऊन मौजमजा करणे मनाला पटत नाही. आमच्या शर्वरीच्या चेहऱ्यावर प्रामाणिक आणि सत्याचरणाने फुलून येणारे स्मित सदैव आम्हांला हवे."

हजारीमलचा आवाज पडला होता. जमिनीकडे नजर ठेवून तो अजिजीने म्हणाला, “बेन, पुरे वीस हजार आहेत. कामाला येतील." त्याने बॅग शर्वरीकडे देऊन म्हटले, "बाळ, ही घे खूप खेळणी." शर्वरीने तोंड फिरवले आणि ती सुधाबेनला बिलगली.

"साहेब हे पैसे परत घेऊन जा आणि ह्यांचा राजीनामा सुद्धा. तुम्हांला दुसरा केमिस्ट मिळेल, त्याला पैसे द्या आणि असंख्य लोकांच्या दुःख आणि यातनांचे धनी होऊन पैशाचा ढीग घरात करा. मग तुम्हाला खूप सुख लाभेल. तुम्ही जाऊ शकता."

दोघेही माना खाली घालून बाहेर पडले. माथूरसाहेब मात्र खूप विचार करीत होते. सुधाबेनचा खणखणीत जवाब, त्यामागची निखालसता त्यांच्या हृदयाला भिडली होती. दव्यांच्या घरातील प्रसन्नता बघून त्यांच्या डोळ्यांसमोर आपला समग्र जीवनपट क्षणात सरकून गेला. अभिनंदन, ह्या दंपतीला! अभिनंदन त्यांच्या अढळ श्रद्धैला!! कोणे एके काळी त्यांना सुद्धा, असे आयुष्य जगायचे होते. काही खुपल्याचा बहाणा करून त्यांनी डोळ्याला रुमाल लावला.

त्या रात्री मात्र जगदीश दव्यांना आपल्या शरीरात एका चैतन्याचा भास झाला. आज घडलेल्या सर्व घटनांबद्दल ते विचार करीत होते. आपणामध्ये नाही म्हणण्याची आलेली प्रचंड शक्ती. नोकरी गेली तरी चालेल, त्यात काय, दुसरी मिळेल हा आत्मविश्वास, पत्नीच्या बोलण्या, वागण्यातून प्रकट होणारे अध्यात्म, ह्या सर्व गोष्टींच्या परिणामाने त्यांचे मन प्रसन्न होते. पत्नीचे आपल्यावरील प्रेम बघून आज त्यांना खरोखरच वाटले, 'क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा', शेजारी पत्नी व शर्वरी गाढ झोपल्या होत्या. खिडकीतून येणाऱ्या चांदण्याच्या प्रकाशात सुधाबेनच्या चेहऱ्यावर त्यांना जणू नवप्रभाताचे स्मित झळकत आहे, असे वाटले. थोड्या वेळाने गायत्रीचा जप करता करता त्यांचा डोळा लागला.

दुसऱ्या दिवशी सकाळी ते ऑफिसात गेले व लॅबमध्ये कामाला लागले. एवढ्यात, "आज मोठे शेठ आले आहेत. त्यांनी तुम्हांला केबिनमध्ये बोलावले आहे" असा शिपायाने निरोप दिला. त्याच्या चेहऱ्यावर का कोण जाणे आपल्याबद्दल कीव असल्याचा भाव दिसला. मान ताठ ठेवून त्यांनी केबिनमध्ये प्रवेश केला. खिशात राजीनामा आहे, हे त्यांनी बघून घेतले. 

एका मोठ्या टेबलामागे स्थूल शरीराचे अगरवाल शेठ बसले होते. कपाळावर लाल उभ्या गंधाची रेषा स्पष्ट होती. ह्यापूर्वी फक्त इंटरव्यूच्या वेळी दव्यांनी शेठना बघितले होते. केबिनमध्ये चंदनाच्या उदबत्तीचा वास दरवळत होता.

"या मि. दवे, नमस्कार," 

“नमस्कार."

"शेठ साहेब, हा माझा राजीनामा." खिशातून पाकीट काढून त्यांच्या समोर ठेवत दवे म्हणाले.

"का बुवा, दुसरी जास्त पगाराची नोकरी मिळाली की काय?"

"मी अजून त्याचा तपास केलेला नाही. इथे तर फार त्रास आहे." 

"हा त्रास तर दूर करण्यासाठी मला तुमच्यासारख्या उमद्या माणसांची जरूर आहे. द्या तो राजीनामा इकडे."

पाकीट न उघडता शेठनी तो पाकिटासकट फाडून टाकला, एक कागद दव्यांच्या हातात देत शेठ म्हणाले, "आजपासून तुम्ही ह्या कंपनीचे चीफ केमिस्ट नेमले गेला आहात. कित्येक दिवसांपासून तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसाची मला गरज होती. ह्या कंपनीच्या प्रतिष्ठेसमोर तुम्ही सर्व प्रलोभने झिडकारली, याबद्दल माथूरसाहेबांनी सर्व हकीकत सांगितली. तुमच्याबद्दल मला आदर वाटत आहे. धन्य तुमची पत्नी आणि धन्य तुमचे मातापिता."

संध्याकाळी घरी येताना बागेजवळ थांबून दवे सूर्यास्त बघत होते. हवेत गारवा आला होता. आजचा सूर्यास्त त्यांना काही आगळा वेगळा वाटला.  त्यातील तांबड्या रंगामध्ये त्यांना जणू नवजीवनाची चेतना दिसू लागली. पान आणि फूल एकमेकांशी हितगुज करत असताना एक फुलपाखरू इकडून तिकडे बागडत होते, त्यांच्या प्रसन्न मनासारखे.

(अनुवाद: वि. अ. महाजन)

Tags: वि. अ. महाजन ज्योती थानकी पुरस्कार रा. वि. भुस्कुटे सरकारी जागेतील घरे Vs. A. Mahajan Jyoti Thanki Award weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके