डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दुपारी फडात आलेल्या आठदहा कार्यकर्त्यांसह आणखी पंधरावीस माणसं एकदमच मोटार सायकलवरून उसाच्या बैलगाडीच्या आणि ट्रॅक्टरला आडवी आली. रस्त्यावर आडव्यातिडव्या मोटारसायकली लावल्या. मोठमोठ्यानं घोषणा द्यायला लागली. ट्रॅक्टर बंद करायला लावला. ड्रायव्हरला खाली उतरून घेतला. बैलगाड्या जागच्या जागी उभ्या राहिल्या. युवानेता, कारखान्याचे कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यावर धावून गेले. त्यांनीही बाह्या सरसावल्या. एकमेकांवर तोंडसुख घ्यायला लागले. बाचाबाची झाली. एकमेकांना बघून घेण्याची भाषा झाली. बैलगाडीवान हे सर्व मख्खपणे बघत होते. प्रत्यक्ष हाणामारी मात्र झालीच नाही. नुसत्याच तोंडाच्या वाफा झाल्या.

‘सायब म्या गरिबानं काय केलंय. मी जगाय आलोय. पोटासाठी बायका-मुलासकट कोयता घेतलाय. गावाकडं एक म्हातारी ठेवलीया. बाकी सारं गबाळं घेऊनच आलोय. आईशपत कालपास्नं जनावरांना वैरण नाही. लेकराबाळांना दुध नाही. कसंबसं खोपाट घातलंय. मुकादामानं उचलबी बेताचीच दिल्या. म्या जगायचा कसा. गाडी कारखान्याची हाय. फकस्तं बैलं माझी हाईत. गाडीचं भाडं माझ्या अंगावर बसतंय. रोजगार न्हाई ते न्हाई निदान वाडं ईकून तरी चूल पेटंल म्हणतोय, तर तुम्ही आलासा छातीवर बिल्लं लावून आणि म्हणताय कसं तर माझ्याच कोयत्यानं माझ्याच गाडीचं टायर फोडणार. सायब तुम्हीच सांगा माझा या दराच्या उचलीच्या भांडणाशी काय संबध हाय काय? कारखान्याचं चेअरमन, डायरेक्टर, एम.डी ही सगळी मोठी माणसं. तुम्ही शेतकऱ्यांचं पुढारी. तुम्ही बी मोठं. तुमचं मोठ्यांचं भांडाण, आरं मग हाणाकी एकमेकांसनी. आमा गरिबांवर का गुरकावताय. ’

शरणाप्पा आंधळे मु.पो.आंधळेवाडी ता.केज जि.बीड या ऊसतोड मजुरानं शेतकरी संघटनेच्या पुढाऱ्याला भगवान पाटलाच्या ऊसाच्या फडातच विचारलं.

त्याला बी ते पटलं.

तो विचार करायला लागला. थोडा वेळ गपगारचं उभा राहिला. एवढ्यात पांढरी धोट कापडं घातलेली, दाढ्या वाढवलेली आणि छातीवर तांबडं बिल्लं लावलेली आठदहा तरणीबांड पोरं मोटारसायकलच्या पुंगळ्या काढून टाकून जोरात आवाज करत आली. एकेका गाडीवर दोघंतिघं बसलेली होती.

भगवान पाटलाच्या उसाच्या फडाजवळ कचाचा ब्रेक लावून गाड्या थांबविल्या. उभ्याउभ्याच गाडीचं स्टँड लाऊन पोरांनी गाड्यावरून टणाणा उड्या मारल्या. पळतच ऊसाच्या फडात गेले. त्यांनी फडकऱ्यांना घेरलंच. ‘आरं ये गबाळ्यांनो, मस्ती आली काय? तुम्हाला माहीत नाही काय, संघटनेचं आंदोलन सुरू आहे. पहिली उचल आम्ही म्हणतो एवढी जाहीर झाल्याशिवाय उसाला कोयता लावायचा नाही, असं ठरलंय आणि तुम्ही खुशाल ऊस तोडताय. ऊस तोडायचा थांबवा नाहीतर एकेकाचं तंगड तोडू. ’

असं काय बाय बडबडतच त्यांनी फडात प्रवेश केला. फडकऱ्यांच्या बायका घाबरल्या. पोरंबाळं भेदरली. शेरडं-कोकरं ओरडू लागली. उसालाच काय, उसाच्या वाड्यालाही हात लावायची त्यांच्यात धमक उरली नाही. सारी अगतिक झाली.

त्यांच्यातलाच एक तरुण फडकरी शरणाप्पा याने त्या आठदहा पोरांना आणि त्यांच्या म्होरक्याला सांगायचा प्रयत्न केला. त्यांनी आपली अगतिकता आणि व्यथा बोलून दाखविली.

तो म्हणाला, ‘दर द्यायचं काय आमच्या हातात हाय काय? ऊस तुमचा, कारखाना तुमचा, साखर तुमची, त्या साखरेचं पैसं तुमचं, कारखान्याचं चेअरमन तुमचं, आमदार तुमचं, मंत्री तुमचं. तुम्ही मालक. आमी रोजगारी. आम्ही फकस्त ऊस तोडायचा. त्याचा रोजगार घ्यायचा आणि आमच्या मुलकात जायाचं. हे सारं तुमास्नी ठावं असूनबी तुम्ही आमच्या मागं का भुणभुण लावलीया. आमी काय आमाला हौस हाय म्हणून ऊस तोडायला आलो नाही. आमी बी जमीनदारच हाय. पण करतुया काय? दुष्काळी टापूत जलमलो हा काय आमचा गुन्हा हाय? आमच्या मुलकात पाऊसमान कमी. त्यात सरकारनंबी समद्या नद्या आडवून तुमासनीच पाणी दिलंय. आमच्या मुलकात अशीच कृष्णा- कोयना-वारणा असती तर आमी कशाला झक मारायला हिकडं आलो असतो. भोंड्या माळावर ठणाणा करत बसलो तर खाणार काय. पोटाची खळगी भरायची, जित्राबं जगवायची, म्हणून तर आमच्या मुलकातनं या ऊसपट्‌ट्यात तोडीसाठी आलोय. उन्हातान्हात, थंडी वाऱ्यात मुला-लेकरांसकट उसाच्या फडात पाल्यात आणि कुशीत पडायची आमाला काय हौस नाही. आमचं हे टीचभर पोटच आमाला हिकडं घिऊन आलंय. बाबांनो, तुम्हांला दर मिळायला आमची काय हारकत असायचं कारण नाही. तुम्ही मोठं झाला. तुमची बागयती वाढली तर आमाला ऊस तोडायचा रोजगार तरी मिळंल, तो मिळावा असंच आमालाबी वाटतंय. राजाला राज आलं तरच परटिणीला धुणं मिळतंया हे आमाला ठावं हाय. आम्ही म्हणतो, तुम्ही आमच्या मागं का लागलायसा?

साखर कारखान्यानं ऊसतोडीचा करार केलाय आमच्या मुकादमाबरोबर. त्याने कारखान्याकडून उचल घेतली. त्यातली निम्मीअर्धी त्यानं ठिऊन घेतली. निम्मीअर्धी कोयतावाल्यांना दिली. गबाळं घेऊन इथं आलो. स्लीपबॉयनं चिठ्ठी दिली. म्हणून ऊसाच्या फडात आलो. फडमालक गावातला मोठा माणूस. त्याला विचारलं ऊस कसा तोडायचा? संघटनेचे लोक गाड्याच्या टायरी फोडत्यात. आम्ही काय करू ते तुम्हीच सांगा. तर फडमालक म्हणाले, ऊस माझा हाय. टायरी फोडणाऱ्यांच्या बापाचा नाही. त्यांचं काय बी ऐकू नका. तुम्ही फक्त ऊस तोडा. कोण आडवतोय ते बघतोच. त्याचं ऐकलं आणि आम्ही ऊस तोडायला तयार झालो. तुम्ही थांबवा म्हणताय तर मग थांबवतो. ’

शरणाप्पाचं हे म्हणणं ऐकून संघटनावाल्यांचा फडकऱ्यांवरचा राग कमी झाला. उगाचच आपण या गुळकऱ्यांना बोललो असं त्यांना वाटलं आणि त्यांनी त्यांचा मोर्चा फडमालक भगवानराव पाटील यांच्याकडं वळवला.

फडकऱ्यांसमोर मोठमोठ्या गप्पा मारणारे आणि शेतकरी संघटनेला दूषणं देणारा भगवानराव ही सताठ तरणी पोरं बघून कुठं गायबच झाला. भगवानराव तसा बेरकी होता. उगवत्या सूर्याला नमस्कार करणारा. त्याला शेतकरी संघटनेचंही आणि कारखानदारांचंही पटायचं.

भगवानरावचा हा दुक्कलपणा गावातल्या पोरांना माहीत होता. कार्यकर्त्यांनी त्याला सगळीकडं शोधला. शेतात, मळ्यात, घरात, गावात सगळीकडे चाळण लावून त्याला हूडकून काढला. त्याला समजावून सांगितलं. म्हणाले, ‘बाबा रे शेतकऱ्याला सरकार आणि साखर कारखानदार लुटत्यात. बाबळीच्या वाळल्या लाकडापेक्षा उसाला दर कमी हाय. वरीस सव्वा वरीस जिवाचं रान करून पिकविलेला ऊस फुका पासरी देऊ नका.

ऊसतोड थांबवा. कारखानदारांचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही.’

भगवानरावाला कार्यकर्त्याचं म्हणणं पटलं, तो ऊसतोड बंद करायला तयार झाला. कार्यकर्त्यांनी त्याला फडकऱ्यांच्या पुढं आणला. ऊसतोड बंद करायचं ठरलं. संघटनेच्या कार्यकर्त्यांत गड जिंकल्याचा उत्साह आला. ते मोटार सायकली उडवत पुढच्या फडाकडं रवाना झाले.

शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची पाठ फिरते न फिरते तोच साखर कारखान्याचे कामगार आणि कायमपणे चेअरमनसाहेबाच्या आवती-भवती फिरणारे काही तरुण कार्यकर्ते अशी दहाबारा जणं भगवानराव पाटलाच्या उसाच्या फडात आली. त्यातली काहीजणं टाटा सुमोतनं तर काहीजणं मोटार सायकलनं आली होती.

त्यात एक युवानेता होता. पांढरीधोट कापडं, डोळ्यावर गॉगल, रुबाबदार केशरचना, गुळगुळीत दाढी केलेला, तोंडात माव्याचा तोबरा भरलेला युवानेता टाटा सुमोतनं उतरला. बांधावर आला. पाचकन्‌ तोंडातला मावा थुंकला. तोंड मोकळं केलं. मिशीवरनं हात फिरवला आणि फडकऱ्यांवरच गुरगुरायला लागला.

म्हणाला, ‘आरं ये गुळकऱ्यांनो, तुम्हांला काय फडात उभं राहायला आणलंय काय? ऊस कुणी तुमच्या बापानं तोडायचा काय? निवांत कोयतं टाकून उभं राहायला लाज वाटत नाही काय? बायकांपोरासकट राणीच्या बागेत फिरायला आल्यासारखं हिकडं तिकडं फिरताय. तुम्हांला कशाला झक मारायला उचल दिली काय? अंगावर पैसे देऊन तुम्हांला काय फडाची शोभा वाढवायला आणलेलं नाही. आटपा लवकर. दिवस मावळाच्या आत खेप झाली पाहिजे.’

युवानेत्याचं फर्मान ऐकून कोयतेवाले एकमेकांच्या तोंडाकडं बघत उभे राहिले. कुणी बोलायचं म्हणून एकमेकांकडे टकामका बघायला लागले. जो तो शरणाप्पाला डोळ्यानंच खुणवून बोलायला सांगू लागला.

धाडस करून शरणाप्पा म्हणाला. सायब आत्ताच शेतकरी संघटनेवाले सातआठ जण आले होते. त्यांनी तोड बंद पाडलीया. आम्ही तरी काय करणार.

त्यावर युवानेता उसळून म्हणाला. तोड बंद पाडणारे ते कोण? तुम्हांला उचल कुणी दिली? आम्ही. त्यांनी नव्हे. तर ज्याचं पैसे अंगावर त्याचं ऐकायचं. छातीवर बिल्ला लावून ते कायबी सांगतील. त्यांचं ऐकायचं कारण नाही. ते ऐकून शरणाप्पा म्हणाला, ‘सायब अगुदर फड मालकानंबी असंच सांगितलं होतं. तेचं ऐकूनच तोड सुरू केली होती. पण संघटनावाले आल्यावर फडमालक ढुंगणाला पाय लावून पळाला आणि आम्ही शिव्या खाल्या. त्यांनी फडमालकाला हुडकून आणला. आमच्यापुढं उभा केला. त्यांच्यासमोर फडमालकांनीच शेपूट घातली. आमच्यापुढं वाघासारखं डरकाळी फोडत होता. संघटनावाले आल्यावर त्या वाघाची शेळीच झाली. आम्ही तरी काय करणार?’

शरणाप्पाचं हे बोलणं ऐकून तो युवानेता चांगलाच तापला. त्यानं त्याच्या चेल्यांना हुकूम केला. म्हणाला, ‘आणा त्या भडव्याला हिकडं. आमच्याजवळचा म्हणून मुद्दाम तोड दिली. खाल्ल्या मिठाला जागंल असंच चेअरमन साहेब म्हणाले होते. पण ह्यो भगवान खातोय आमचं आणि गातोय शेतकरी संघटनेचं. त्याला त्याची जागा दाखविली पाहिजे. त्याला धडा शिकवलाच पाहिजे.’

युवानेत्याच्या सवंगड्यांनी का गवंड्यांनी भगवानराव पाटलाला घटकाभरातच त्याच्यासमोर हजर केला.

युवानेता : उसाचा फड डोलतोय तो कुणाच्या इरिगेशनवर?

भगवानराव : चेअरमन सायबांच्या.

युवानेता : उसाला लागवड मिळतीया ती कुणाच्या सोसायटीतून?

भगवानराव : चेअरमन सायबाच्या.

युवानेता : पोरगं इंजिनिअरिंग शिकतंय ते कुणाच्या कॉलेजात?

भगवानराव : चेअरमन सायबाच्या.

युवानेता : तुम्ही ट्रॅक्टर घेतला तो कुणाच्या बँकेच्या कर्जातून?

भगवानराव : चेअरमन सायबाच्या.

युवानेता : दोन वेळा सरपंच आणि तीन वेळ सोसायटीचा चेअरमन कुणाच्या पुण्याईनं झाला?

भगवानराव : चेअरमन सायबांच्या.

युवानेता : मग तुम्ही ऐकणार कुणाचं?

भगवानराव : चेअरमन सायबांचं.

युवानेता : ऊस तोडायला फडकरी कोण कुणी पाठविले?

भगवानराव : चेअरमन सायबांनी.

युवानेता : ऊसतोड बंद का केली?

भगवानराव 302 मधल्या आरोपीसारखा जागच्या जागी थिजून उभा राहिला. त्याला खालतं वरतं कळंना.

युवानेता कडाडला. भडव्या, संघटनावाल्यांचं ऐकतोस. तोड बंद करतोस. ज्यांच्या जिवावर खातोस त्यांच्याशी गद्दारी करतोस. मुकाट्यानं तोड सुरू कर. भगवानरावांचा नाइलाज झाला. तोड सुरू करायला तयार झाला.

फडकऱ्यांना म्हणाला, ‘तोडा रं आता’ पण ऊस तोडायला फडकरी तयार होईनात.

त्यांनी युवानेत्याला हात जोडलं आणि म्हणाले, ‘आमच्या टायरी फोडणाऱ्यापासनं आमाला वाचवा. आमचं कोयतं हिसकावून घेणाऱ्यापासनं आमाला वाचवा. आमच्या टायरी फोडल्या तर कारखाना व फडालक दोघंबी हात वर करत्यात. तुम्हा बड्यांच्या भांडणात आम्हा गरिबांचा जीव जातोय.’

मग त्या युवानेत्यानं नवीनच शक्कल लढविली. कारखान्याच्याच कार्यक्षेत्रातील हंबीरराव जाधवाला चेअरमन सायबाच्याच बँकेतनं कर्ज देऊन ट्रॅक्टर घ्यायला लावला होता. त्यानं कारखान्याबरोबर वाहतुकीचा करार केला होता. मोबाईलवर फोन करून हंबीरराव जाधवाला भगवानराव पाटलाच्या फडातच बोलवून घेतला.

त्याला विचारलं- ट्रॅक्टर कुठाय?

तो म्हणाला - दारातच उभा आहे.

त्यावर युवानेता म्हणाला, ‘आरं दारात टॅक्टर उभा करून कर्ज कसं फिटायचं. तुझं कर्ज फिटावं म्हणून तर वाहतुकीचा करार केलाय. दारात टॅक्टर उभा करून तू काय पूजा करणार आहेस? खंडीपूजा दसऱ्याच्या आधीच झालीया. अवजाराबरोबर टॅक्टरही पूजलायस. आता ताबडतोब घरी जा. अर्ध्या तासाच्या आत टॅक्टर भगवानरावाच्या फडात पाहिजे.

हंबीररावानं गाडीला किक मारली. तडक घर गाठलं. त्याच्या ट्रॅक्टरवर कानडी मुलखातला एक ड्रायव्हर होता. त्याला भगवान पाटलाच्या उसाच्या फडात जायला सांगितलं. तसा तो गेला. टोळी तयारच होती.  भगवानराव पाटलाच्या उसाची तोड दुपारी तीन वाजता धूम धडाक्यात सुरू झाली. टोळीवाल्याने टॅक्टर भरला. बैलगाडीवाल्यांनी आपापल्या गाड्या भरल्या.

स्वतः भगवानराव पाटील, कारखान्याचे आठदहा कामगार, युवानेता व त्याचे सवंगडी फडाच्या भोवताली उभारले. त्यांनी ऊसतोड कामगारांना, आम्ही आहोत भिऊ नका, असा आदेशच दिला होता. दिवस मावळायच्या आत उसानं भरलेल्या बैलगाड्या आणि हंबीरराव जाधवाचा ट्रॅक्टर फडातनं बाहेर काढला. डांबरी रोडवर सारी भरलेली वाहनं उभी केली. धावत जाऊन भगवानरावांनी नारळ आणला. युवानेत्यांच्या हस्ते नारळ वाढवला. एक ट्रॅक्टर आणि दहा बैलगाड्या साखर कारखान्याच्या दिशेने निघाल्या.

कष्टकऱ्यांच्या मोर्च्याला कलेक्टर कचेरीजवळ पोलीस जसं कडं करत्यात तसं कडं कारखान्याच्या कामगारांनी आणि चेअरमन सायबाच्या माणसांनी त्या वाहनांना केलं होतं. काहीजण पुढं काहीजण मागं तर काहीजण मागं-पुढं फिरतीवर मोटार सायकली घेऊन चालले होते. गाडीवानांनाही त्यांचा आधार होता. ते निर्धास्त होते. गाड्यांचा हा ताफा दोनतीन किलोमीटर गेला असंल नसंल. दिवस मावळून गेला. अंधार पडायला लागला.

कुणी कशी बातमी शेतकरी संघटनावाल्यांना दिली कोण जाणे. दुपारी फडात आलेल्या आठदहा कार्यकर्त्यांसह आणखी पंधरावीस माणसं एकदमच मोटार सायकलवरून उसाच्या बैलगाडीच्या आणि ट्रॅक्टरला आडवी आली. रस्त्यावर आडव्यातिडव्या मोटारसायकली लावल्या. मोठमोठ्यानं घोषणा द्यायला लागली. ट्रॅक्टर बंद करायला लावला. ड्रायव्हरला खाली उतरून घेतला. बैलगाड्या जागच्या जागी उभ्या राहिल्या.

युवानेता, कारखान्याचे कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यावर धावून गेले. त्यांनीही बाह्या सरसावल्या. एकमेकांवर तोंडसुख घ्यायला लागले. बाचाबाची झाली. एकमेकांना बघून घेण्याची भाषा झाली. बैलगाडीवान हे सर्व मख्खपणे बघत होते. प्रत्यक्ष हाणामारी मात्र झालीच नाही. नुसत्याच तोंडाच्या वाफा झाल्या.

शेतकरी संघटनेची कुमक वाढली. आपलं काही खरं नाही. असं कारखान्याच्या पगारी कामगारांना व त्यांच्याबरोबर आलेल्यांना वाटलं. त्यांनी मोटारसायकलला किका मारल्या आणि निघून गेले.

संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या तावडीत बिचारा ट्रॅक्टरवाला आणि बैलगाडीवाले सापडले. त्यांनी त्यांचे काम केले. फटाफट टायरी फोडल्या आणि तडक निघून गेले.

अर्ध्या तासानं पेपरवाले, टी.व्ही.वाले फोटोग्राफर आले. फुटलेल्या टायरीसह ऊसतोड मजुरांच्या फुटलेल्या नशिबाचेही फोटो काढले. निघून गेले.

शरणाप्पा आणि इतर फडकऱ्यांनी बैलं सोडली. गाड्यांच्या मागं आणि पुढं जाळ केला. रस्त्यावरच्या वाहनांनी उभा राहिलेल्या गाड्यांना, बैलांना, ट्रॅक्टरला आणि माणसांना धडकू नये म्हणून रात्रभर आळीपाळीनं जाळ करत बसले. ना जेवणाचा पत्ता ना पाण्याचा. रात रस्त्यावरच काढायची होती.

हंबीरराव जाधवाचा ड्रायव्हर जरी कानडी मुलखातला असला तरी तो बरीच वर्षं इथं राहिला होता. त्याला कारखानदारांची, शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांची खडान्‌खडा माहिती होती. बैलगाडीवाल्यांना त्यातली माहिती नव्हती.

इतक्यात एक ट्रॅक्टर उसाच्या दोन ट्रॉल्या घेऊन त्याच रस्त्यावरनं गेला. त्याला कुणाचं संरक्षण नव्हतं. त्याला कुणी अडवलं नाही. त्याच्या टायरी फोडल्या नाहीत.

ही काय भानगड, असं गाडीवानांनी ट्रॅक्टर ड्रायव्हरला विचारलं. मग ट्रॅक्टर ड्रायव्हरनं आंदोलनातील सत्य सांगायला सुरुवात केली.

तो म्हणाला, ‘हे बघा इथं शेतकरी संघटना आहेत दोन-तीन. एकेका संघटनेला एका एका कारखानदाराने गाठलंय. खरं तर कारखानदारांनी त्यांना गाठलंय का त्यांनीच कारखानदाराना गाठलंय हे कळायला मार्ग नाही. राजकारण आणि आंदोलन करायला कारखानदार त्या त्या संघटनेला मदत करत्यात. त्यामुळे ज्याचं मिंद हायत त्या कारखान्याविरुद्ध हे बिल्लंवाले बोलत नाहीत. जो कारखानदार यांना जवळ येऊ देत नाही त्याच्याविरुद्ध हे लोक दिवाळीत फटाके फोडल्यासारखे तुमच्याआमच्या टायऱ्या फोडत्यात. साखर कारखानदार लई बेरकी हायत. त्यांनी अशी एकएक संघटना धरूनच ठेवलीय. अशा धराधरीमुळं तरी एकाच्या तीन संघटना झाल्यात. ही टायरी फोडणारी आत्ता आल्यात. याच्या आगोदर शेतकरी संघटनेच्या नावानं चांगभलं करून जे दोनचार पुढारी आंदोलन करीत होते त्यांनी आता स्वतःच कारखाने काढल्यात. तवापासनं ती गपगारचं हाईत.

ही गोम कळल्यावर शरणाप्पाचं डोकं सणकलंच. आधीच रातभर उपाशी, जागरण, बायकांपोरांसकट रस्त्यावर पडलेला. बैलं तिथंच आणि वर हे असलं राजकारण ऐकल्यावर तो म्हणाला, ‘या जगात गरिबाचं काय खरं नाही. बागायतदार असो, कारखानदार असो, पगारदार. शेतकऱ्यांच्या नाही तर कामगारांच्या संघटना असो, सर्वजण जपतात आपापल्या आर्थिक भावकीला. आपापल्या जमातीला, वर्गालाच. आमचं हातावरचं पोट. आमाला जपायला कोणच नाही. हा वर्गलढा हाय. कोण लढवत नाही, वर्षानुवर्षं नुसतंच राबणाऱ्यांबद्दल कळवळ दावत्यात. करत काहीच नाहीत.

दुसऱ्या दिवशी पेपरात बातम्या आल्या. त्यांनी पहिल्या पानावर ठळक छापलं- ऊसदराचे आंदोलन भडकले. रातभर शरणाप्पा बरोबरच्या फडकऱ्यांच्या, त्यांच्या बायकापोरांच्या पोटात उडालेला भुकेचा भडका कुणी छापलाच नाही. ऊसदराची कोंडी फुटल्याचं जोरात छापलं पण गरिबाच्या गाडीचं टायर फुटल्याचं कुणी छापलं नाही. कुणी छापणारही नाही, कारण छापणारे तर कुठं कष्टकऱ्यांच्या बाजूचे आहेत.

Tags: के. डी. शिंदे साखर कारखाना ट्रॅक्टर ऊसतोड k. d. shinde bullock cart tractor sugarcane sugar factory weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके