डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तुका बुरुड आणि मालू आपापल्या धंद्याकडं वळली. आता नामदेवराव आबा त्यांच्याकडं फिरकायचे बंद झाले. नव्या पॅनेलची सत्ता येऊन वर्षसहा महिने झाले असतील- नसतील तोवर गेल्या पंचवार्षिकचं ग्रामपंचायतीचं ऑडिट सुरू झालं. त्यात बऱ्याच भानगडी बाहेर येऊ लागल्या. मागासवर्गीय घरकुल योजनेत घोटाळा झाला होता. एका गटारीच्या कामाची दोनदोन बिलं काढली होती. जवाहर रोजगार योजनेत आफरातफर होती. बरीच खोटी व बनावट व्हाऊचर्स होती. या सगळ्याचं सरकारी ऑडिट झालं आणि पंचायत समितीच्या बीडीओंनी पोलिसांत फिर्याद दिली. आरोपी कोण तर मालन तुका बुरुड- माजी सरपंच आणि ग्रामसेवक बाळू रामा कांबळे, दोघांनाही पोलिसांनी अटक केली. तुका बुरुड धावत नामदेवराव आबाच्या घराकडं गेला. आबानं हात वर केले.  

तुका बुरुड आणि त्याची बायको मालू दोन मुलांसह राबून खात होते. गावातच बुरुड गल्लीत दोन आकणी माळवदी घर. घराच्या समोरच्या अंगणात काट्या, वेळू, बांबू, चिवाट्या असं बरचं मटेरिअल पडलेलं असायचं. दिवसभर दोघंबी कामात असायची. त्यांच्याकडं कुठलं सामान मिळत नव्हतं असं नव्हतंच. पाट्या, बुट्‌ट्या, टोपल्या, सुपं, दुरड्या, हारं, कणगी, शेळ्यांची पिल्लं कोंडायच्या मोठ्या टोपल्या, शिड्या इ.पासून ते गुढीपाडव्याला लागणाऱ्या गुढीच्या काठ्यापर्यंत सर्व काही मिळत होतं.  नुसतं गावातलंच नाही तर आसपासच्या तीन-चार खेड्यातली आणि वाड्यावस्तीवरची झाडून सगळी माणसं त्याची कायमची गिऱ्हायकं होती. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी गुढीच्या काठ्या खरेदीसाठी त्याच्याकडं झुंबडच असायची. सुपं, दुरड्या, पाट्या, बुट्ट्यासाठी आठवडा बाजारादिवशी बायाबापड्या गर्दी करायच्या. लग्नसराईत तर त्याच्याकडं रीघच लागायची. मोठे शेतकरी आणि बडे बागाईतदार यांचा व्यवहार बलुतेदारीवर चालायचा, तर इतरांचा रोखीचा असायचा.

तुका बुरुड एक साधा सरळ व्यवहारी माणूस. कधी कुणाला मोठ्या आवाजातसुद्धा बोलायचा नाही. आपण भलं आपलं काम भलं असं त्याचं जगणं होतं. तुकानं कधी कुणाला त्रास दिला नाही. कुणाशी भांडण-तंटा केला नाही. जो येईल त्याला रामराम करायचा आणि पुढं बघून आपलं काम करायचा. त्याची बायको मालू हीसुद्धा त्याला त्याच्या कामात मदत करायची. चार साक्या म्हाक्या गोळा करून कुचाळक्या करत टाईमपास करायला तिच्याकडं वेळच नसायचा. सकाळी घरातलं स्वयंपाकपाणी, धुणी-भांडी, झाडलोट ही काम केली की लगेचच ती काट्यांच्या व चिवाट्याच्या ढिगाऱ्यात बसून कामाला सुरुवात करायची. गिऱ्हाइकांशी अदबीनंच बोलायची. होणाऱ्या मिळकतीत जिकिरीनं संसार करायची. दोन्ही पोरं शाळेत जायची. 

एकूण काय तर तुका बुरडाचं कुटुंब कष्टाळू होतं आणि म्हणूनच ते खाऊन-पिऊन सुखी होतं. हे सुख म्हणजे कुठल्या परमेश्वराची कृपा अगर मेहरबानी नव्हती तर त्यांच्या कष्टाचं फळ होतं. त्याची राहणीही साधीच होती. तुकाला कधी गावात चौकात जाऊन गप्पा ठोकायला वेळच मिळायचा नाही. चारचौघात जाऊन तुका कधी पान खात, नाही तर तंबाखू मळत बसलाय असं कधी झालंच नाही. तो पान खात होता पण आपलं काम करत करत. आपल्या अंगणात बसूनच. येणाऱ्या गिऱ्हाईकाशी बोलणी-, गप्पा-गोष्टी, पान--तंबाखू हे काम करत करतच करायचा. 

गावच्या राजकारणाचा आणि त्याचा काडीचाही संबध नव्हता. ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत निवडणुकांत गावातला कुणीतरी पुढारी सांगतोय म्हणून मतदानाला जायचं. त्यानं सांगितलेल्या चित्रावर शिक्का मारायचा नाही तर बटण दाबून रिकामं व्हायचं. त्याचं पुढं काय झालं याची कधी त्यानं वास्तपुस्तच केली नाही. त्याच्या बायकोचं नाव जरी मालू असलं तरी गावातल्या सगळ्या बाया-बापड्या आणि बापयसुद्धा तिला मालीच म्हणायचे. ती नाकासमोर चालणारी बाई. आपण, आपला नवरा, दोन पोरं आणि चिवाट्याचा ढीग या पलीकडं तिला काहीही माहीत नव्हतं. 

असं हे जोडपं कुणाच्या अध्यात नाही आणि मध्यात नाही असा संसार करत होतं. मनगटाच्या जोरावर कष्ट करून खाणाऱ्या तुका बुरुडाच्या संसाराला दृष्ट लागली ती आरक्षणाची. सगळ्या गावावर ज्याची हुकूमत चालायची अशा नामदेवराव आबांच्या राजकारणानं या कष्टकऱ्यांची पार फरफट केली. तो अलीकडंच आबा झाला होता. त्याआधी लोक त्याला नामाच म्हणायचे. तो एका बागायतदाराचा मुलगा. गावात हायस्कूलपर्यंत शाळा होती तोवर गावात शिकला. त्यानंतर बापानं त्याला कॉलेजसाठी तालुक्याच्या ठिकाणी ठेवला.

शहरात गेल्यावर नामाचा नामदेव झाला. तालुक्याच्या ठिकाणी एक खोली घेतली. मोटारसायकल होतीच. खाणावळीत जेवायचा. कॉलेजला जायचा. पोरगं कॉलेजला जातंय म्हणून बापानं त्याला कायबी कमी पडू दिलं नाही. आसपासच्या चार-पाच खेड्यातल्या पोरांच्या नामदेवच्या ओळखी झाल्या. कॉलेजमध्ये विद्यापीठ प्रतिनिधीच्या निवडणुका व्हायच्या. त्यात नामदेव उतरला. त्याच्याकडं नेतृत्वगुण होतेच. जवळ पैसा असला आणि तो आडवातिडवा खर्च करायची ताकत असली की नेतृत्वाचे गुण येतातच. नव्हे यालाच नेतृत्वगुण म्हणतात. 

त्याच्याभोवती पोरं गोळा झाली. त्यानं खेड्यातून आलेली पोरं गाठली. प्रतिनिधी खेड्यातलाच पाहिजे असं त्यांना सांगितलं. सर्वांनी त्याची आयडिया उचलून धरली. नामदेव निवडून आला. विद्यापीठ प्रतिनिधी झाला. निवडणुकीचा नाद लागल्यानं त्याचं अभ्यासाकडं मनच लागेना. दोन-तीन वर्षं कसंबसं कॉलेज केलं. शिक्षण अर्धवट सोडलं. शिक्षणाला अखेरचा सलाम करून नामदेव गावाकडं आला. गावाच्या राजकारणात बापाचं बस्तान पूर्वीपासून बसलेलं होतं. नामदेव थेट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उतरला. त्याला पहिल्याच निवडणुकीत यश आलं. तो ग्रामपंचायतीचा सदस्य झाला. तरुण आहे, चार बुकं शिकलेला आहे, म्हणून गावानं त्याला सरपंच केला. सरपंच झाल्यावर तो नामदेवचा नामदेवराव झाला. तो पाच वर्षं सरपंच होता. त्यानं अख्ख्या गावावर आपली पकड मजबूत केली. 

त्याचं तालुक्याला, जिल्ह्याला जाणं-येणं वाढलं. मोठ्या पुढाऱ्यांच्यात उठबस सुरू झाली आणि बघताबघता तो नामदेवराव आबा झाला. पाच वर्षं गेली. पुढच्या निवडणुकीचा कार्यक्रम लागला. मतदार याद्या तयार झाल्या. कलेक्टर कचेरीत आरक्षणाच्या सोडती निघाल्या. गावचं सरपंचपद ओ.बी.सी. महिला राखीव झालं. आबाचं डोस्कंच फिरलं. आरक्षणानं सरपंचपद हातचं गेलं. आपणाला होता येत नाही म्हणून बायकोला करावं म्हटलं तर तेबी गेलं. घराण्याचं राजकारणच गोत्यात आलं. 

आबानं यातनं एक मार्ग काढला. तसा तो पक्का राजकारणी आणि भलता धोरणी माणूस. राजकारण अंगात मुरल्यालंच होतं. त्यानं वॉर्डावॉर्डात चाचपणी सुरू केली. त्या चाचपणीबरोबरच आपल्या पॅनेलची जुळणी करू लागला. आपलं ऐकणारी, आपल्याला डोईजड न होणारी, आपण बस म्हटलं की बसणारी आणि ऊठ म्हटंलं की उठणारी ओ.बी.सी. महिला कोण आहे का याचा शोध तो घेऊ लागला. आपल्या चार- दोन संवगड्यांना त्यानं या मोहिमेवर पाठवलं. या शोधमोहिमेला आठवडाभरातच यश आलं. आबाकडं कायमचे पडीक म्हणून असणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्याला बुरडाच्या मालीचं नाव सुचवलं. आबा एकदम खूश झाला. इतकी साधी सरळ गरीब ओबीसी महिला सरपंच केली तर कारभार तिच्या नावावर आपणच करायचा, असंच त्यानं ठरविलं. 

एके दिवशी दुपारी नामदेवराव आबा आणि चारपाच म्होरके कार्यकर्ते तुका बुरडाच्या घरी गेले. गावची मोठी आणि प्रतिष्ठित माणसं आली म्हटल्यावर तुकानं अंगणात घोंगडं टाकलं. त्यांना बसायला सांगितलं. मालीला चहा करायला सांगितला. तिनं लगबगीनं दोनतीन तांबे पाणी आणि चहा आणला. सगळ्यांनी चहा संपविला. कोण सुपारी कातरू लागले. कोण पानाला चुना लावू लागले. कोण काय बोलेचना. तुकाला ही सगळी का आल्यात हे कळेना. शेवटी नामदेवराव आबा तुकाला म्हणाले, ‘हे बघ, तुकोबा, ग्रामपंचायतीच्या निवडणुका जवळ आल्यात. तुमच्या वॉर्डात एक सीट ओबीसी महिला राखीव आहे. सरपंचपदही ओबीसी महिला राखीवच आहे. आम्ही आमच्या पॅनेलमधून तुमच्या मंडळीना उभं करू. निवडून आणू आणि सरपंच करू.’  नामदेवराव आबाचं हे बोलणं ऐकून तुका बुरुडाला गुदमरल्यासारखं झालं. 

तो म्हणाला, ‘अहो मालक, का गरिबाची थट्टा करताय. आम्ही राबून खातोय. आमचं हातावरचं पोट. राजकारण तुमावाणी मोठ्यानी करायचं असतं. आम्हा गरिबांना का उगीच त्या दगदगीत ढकलतायसा. आमचं आमाला पुढं बघून काम करू द्या.’ त्यावर सगळीच माणसं तुकाला गळ घालायला लागली. सगळ्यांचा सूर एकच. तुम्ही फक्त मालूचा अर्ज भरायचा. बाकी सगळं नामदेवराव आबा बघत्यात. खर्चाला एक गिन्नीबी द्यायची नाही. आपले आबा सांगतील तिथं फकस्त सह्या करायच्या. कशाचीच तोशिस लागणार नाही. 

आरं सरकारनं कायदा करून तुम्हा ओबीसींना कारभार करायची संधी दिलेय. तुम्ही नको का म्हणताय. ‘दैव आलं द्यायला आणि पदर नाही घ्यायला’ असं काही करू नको. सरपंचपद चालून आलंय. नाही म्हणू नको. मग सर्वांनी मालूला विचारलं. तिला काय कळेचना. ती गप्पच बसली. आपण निवडणुकीला उभं राहायचं, सरपंच व्हायचं हे ऐकून ती घाबरूनच गेली. ते आपल्याला जमणार नाही, असाच तिनं ठेका धरला. नामदेवराव आबा तसा लई पोचल्याला. त्यानं आपलं कसब पणाला लावलं. तुका आणि मालू दोघंबी व्हय म्हणेपर्यंत त्यानं त्यांना सोडलंच नाही. शेवटी तुकाबी तयार झाला आणि मालूबी तयार झाली. मोहीम फत्ते करूनच नामदेवराव आबा उठले. वॉर्ड नं.3 मधून, नामदेव आबाच्या विकास पॅनेलमधून मालूचा अर्ज भरला. उभं गाव तिला बुरडाची माली म्हणत होतं. 

नुसती निवडणुकीला उभी राहिली म्हटल्याबरोबर तिला मालन म्हणू लागले. विरोधी परिवर्तन पॅनेलमधून गणा सुताराची चंपी उभी राहिली. मग तिलाबी लोक चंपाबाई म्हणायला लागले. तशा त्या दोघीही नामधारीच होत्या. खरी निवडणूक विकास पॅनेलचे  नामदेवराव आबा आणि विरोधी परिवर्तनचे विलासराव बापू यांच्यातच होती. मालन आणि चंपाबाई दोघीबी त्यांच्या हातातल्या बाहुल्या होत्या. निवडणूक आणि सभा यांचा धुमधडाका सुरू झाला. त्या सर्वांना मालन हजर असायची. हा लोकांना दिसणारा प्रचार होता. पण त्यानंतरच्या जेवणं, पाटर्या, धाब्यावरची कुपनं यातलं तिला काईच माहीत नव्हतं. ते सर्व पॅनेलप्रमुखच सांभाळत होते. दिवसभर पांढरी धोट कापडं घालून गावातल्या प्रत्येकाच्या दारात जाऊन मत मागणारे अंधार पडला की आपला रंगच बदलायचे. 

झाडून सारे कार्यकर्ते आपापल्या गोटात गोळा व्हायचे. विश्वासू माणसाकडं कुपनं असायची. त्याचं गुपचूप वाटप व्हायचं. बरीच माणसं दोन्हीकडचीबी कुपनं घ्यायची. त्यांच्यावर लक्ष ठेवायला खास कार्यकर्ते असायचे. दोन्हीकडंची कुपनं घेणारा सापडला तर त्याला सरळ ठोकायचाच. असं सात-आठ दिवस चाललं. निम्माशिम्मा गाव एका हातात दारूची बाटली आणि दुसऱ्या हातात मटणाची थाटली घेऊनच निवडणुकीचा आस्वाद घेऊ लागला. अखेर निवडणूक झाली. मतमोजणी झाली. नामदेवराव आबाचे पॅनेल निवडून आले. तुका बुरुडाची माली निवडून आली. मग सुताराची चंपी पडली. 

निवडून आल्यामुळे लोक मालीला आता मालनताई म्हणायला लागले. निवडणुकीच्या काळात चंपाबाई म्हणून जिला हाक मरत होते ती निवडणुकीत पडल्यामुळे परत तिला चंपीच म्हणायला लागले. मालनताई गावच्या सरपंच झाल्या. वर्तमानपत्रात मालनताईचा आणि नामदेवराव आबांचा जोडीनं फोटो छापून आला. गावात उनाडक्या करणारे जे टगे होते त्यांनी पेपर तुका बुरुडाला दाखवला. एक जण म्हणाला, ‘अरं तुका, जोडीचा फोटो किती चांगला आलाय बघ.’  बाकीचे सगळे जण हसायला लागले. ती का हसत्यात ते तुकाला कळलंच नाही.  सरपंच झाल्यावर नामदेवराव आबा मालनताईला राजकारणाचे धडे देऊ लागले. त्याही हळूहळू बदलू लागल्या. मालनताईचा गावात जंगी सत्कार झाला. तालुक्यातून आणि जिल्ह्यातून मोठ मोठे पुढारी आले. सत्कार समारंभ दोनतीन तास चालला. सत्कारात एक हार मालनताईला घातला. बाकीचे सगळेच हार नामदेवराव आबांच्या गळ्यात पडले. 

जो तो पुढारी आबांच्या कुशल नेतृत्वाचे गुणगान गायला लागला. मालनताईचा शिल्पकार म्हणून त्याचा उल्लेख व्हायला लागला. संपूर्ण सत्कारात खच्चून चार-दोन वाक्येच मालनताईच्या वाट्याला आली. बाकी सर्व कौतुक आबाचंच. जंगी कार्यक्रम झाला. अख्खं गाव गोळा झालं होतं. परिसर घोषणांनी आणि जयजयकारांनी दणाणून गेला. तुका बुरुड हा कार्यक्रम एका कोपऱ्यात बसून बघत होता. कार्यक्रम संपला. नेते धुरळा उडवत मोटारीतून निघून गेले. गावकरीही पांगले. या जंगी कार्यक्रमामुळे विरोधी विलासराव बापू गट बऱ्यापैकी डिवचला गेला. त्यांनी चारदोन पोरांना दारू पाजली. ती पोरं थेट तुका बुरडाच्या घरावरच चाल करून गेली. 

कार्यक्रम बघून तुका नुकताच अंगणात येऊन टेकला होता. आलेल्या पोरांनी तुकाला शिवीगाळ केली. ‘भडव्या, बायको आबाच्या जोडीनं स्टेजवर खुर्चीला खुर्ची लावून खेटून बसत्यात आणि तू इथं चिवाट्या विणत बसत्ये. तुला लाजबीज काय हाय का नाहीच.’ असं म्हणत त्याचे बांबू, चिवाट्या, वेळू, काट्या यांची नासधूस केली. सगळंच इस्कटून टाकलं. तुकाला कळायचं बंद झालं. उभ्या आयुष्यात शेंबड्या पोराला तुकानं दुखावलं नव्हतं. पण बायको सरपंच झाल्यानं निम्माअर्धा गावच तुकानं दुखावला. गणा सुतार तर त्याचा हाडवैरीच झाला. तुका बुरडाच्या अंगणात धुडगूस घालणाऱ्यांमध्ये गणाही होताच. 

ताबडतोब गावात गवगवा झाला. तुका बुरडाच्या घरासमोर गणानंच दारू पिऊन धिंगाना घातला अशी आवई उठली. ती आबाच्या कानावर गेली. आबानंही दहावीस तरणीबांड पोरं गणा सुताराच्या घराकडं पाठवली. त्यांनी गणाच्या घरासमोर जाऊन डरकाळ्या फोडल्या. त्याचंही लाकडं आणि इतर सामान इस्कटून टाकलं. माणसं म्हणायला लागली, ‘निवडणूक आबा आणि बापूची. त्यांना कसलीच तोशीस नाही. इस्कटाइस्कटी मात्र गणा सुताराच्या आणि तुका बुरडाच्या लाकूड फाट्याची आणि चिवाट्या काट्यांची.’

राजकीय आरक्षणाचा हा असाही एक पैलू आहे. मालनताई सरपंच झाल्यानंतर प्रथम त्यांनी आपल्या वेषभूषेत बदल केला. त्यांच्या अंगावरच्या ओबडधोबड लुगड्याची जागा जरीकाठाच्या साडीनं घेतली. मालनच्या हातातली वायरची पिशवी गायब झाली. त्याऐवजी दिमाखदार अशी पर्स आली. ती येताना हातात आलीच नाही. डायरेक्ट खांद्यावरच लटकायला लागली. हात रिकामेच राहिले. ग्रामपंचायतीच्या कारभारासारखीच पारदर्शकता तिच्या पाठीवर आली. तिने पाठभर वस्त्र वापरणे बंदच केले. निम्मीअर्धी पाठ उघडी टाकूनच ती वावरू लागली. पायातल्या चपला कुठल्या कुठं गायब झाल्या. त्यांची जागा सँडलनं घेतली. गालावर वगळ येईपर्यंत केसाला तेल चोपडून चापूनचोपून केस विंचारणे तिने बंद केले. त्या ऐवजी बिनतेलाचे तिचे केस डोईवर फरफरू लागले. मालनताई अधूनमधून ब्यूटी पार्लरमध्ये जाऊ लागल्या. भुवयाही कोरू लागल्या. पर्समध्ये पावडर, लिपस्टिक, छोटा आरसा आला. दिमाखदार मोबाईल सेट आला. कुंकवाच्या टिळ्याच्या जागी टिकल्या आल्या. टिकल्यांचे रंगही आणि आकारही बदलू लागले. 

या सगळ्या बदलाचा खर्च आबाच करीत होते. सरपंचपदाला शोभेल इतक्या त्या मॉडर्न झाल्या. कधी मीटिंगसाठी तर कधी पंचायत समितीत निधी आणण्यासाठी सरपंचांना तालुक्याच्या ठिकाणी जायला लागायचं. त्या एकट्या जाणं शक्य नव्हतं, त्यांना ते जमतही नव्हतं. त्यांचं शिक्षण तसं यथातथाच होतं. त्या कधी आबांच्या चारचाकीतून तर कधी हिरो  होंडावरून जात-येत होत्या. गावातली टवाळखोर पोरं भलतीच चर्चा करू लागली. त्याकडं दुर्लक्ष करून मालनताई काम करू लागल्या. आबा सांगतील तिथं सह्या करू लागल्या. त्यांचा स्वतःचा असा खर्च होतच नव्हता. खर्चाची सगळी बाजू आबाच सांभाळत होते.

सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या नावावर बँकेत संयुक्त खातं होतं. ग्रामपंचायतीला बराच निधी यायचा. आश्वासित योजना, जवाहर रोजगार योजना, इंदिरा आवास योजना, घरकुल योजना, गटर बांधकाम, रस्ते दुरुस्ती, पाणी पुरवठा, हागणदारी मुक्त गाव... अशा एक ना अनेक योजनांवर निधी यायचा. अण्णासाहेब म्हणजे ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या सहीनं चेक निघायचे. मालनताईचा संबंध फक्त चेकवर सही करण्यापुरताच. बाकी सर्व व्यवहार नामदेवराव आबाच करायचे. तो पैसा कसा खर्च करायचा, कुणाला कंत्राटं द्यायची, बिलं कशी पास करायची. यातलं मालनताईला शेवटपर्यंत काय कळलंच नाही. 

महिला सरपंचांना पुढे करून सगळा कारभार नामदेवराव आबाच करायचे.  मालनताईच्या सरपंचपदाच्या कारकिर्दीत विरोधी विलासराव बापूंचा गट कमालीचा अस्वस्थ होता. त्यांच्या गटाच्या लोकांनी अनेक वावड्या उठवावयाला सुरुवात केली. मालनताई व नामदेवराव आबा जोडीनं गाडीनं फिरतात, तालुक्याला -जिल्ह्याला जात्यात, दिवसभर तिकडंच असत्यात, कधीकधी मुक्कामबी तिकडंच करत्यात अशी चर्चा गावभर व्हायला लागली.

ही चर्चा तुका बुरडाच्या कानापर्यंत गेली. बायकोच्या चारित्र्यावरील चर्चेमुळे साक्षात प्रभू रामचंद्रसुद्धा चलबिचल झाले होते. लोकापवाद टाळण्यासाठी त्यांनी सीतामाईचाही त्याग केला होता. पण तुका बुरुड प्रभू रामचंद्रासारखा फाटक्या कानाचा नव्हता. विरोधकांनी उठविलेल्या वावड्यांचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. त्याचा मालूवर ठाम विश्वास होता. 

अशी जरी परिस्थिती असली तरी तुका आतून अस्वस्थ होताच. त्याला चर्चेचा उबग आला होता. त्याची घालमेल होत होती. निवडणुकीच्या भानगडीत पडून आपण चूक केली असं त्याला वाटायचं. ही अस्वस्थता टाळण्यासाठी तुकाची पावलं नको तिकडं वळली. शांत झोप लागावी म्हणून तुका न चुकता गावातल्या देशी दारूच्या दुकानात हजरी लावू लागला.

गणा सुतार तर पूर्वीपासून दारूड्या होता. दोघांची अधनंमधनं भेट व्हायला लागली. एकमेकाकडं बघून त्यांना भांडायची खुमखुमी यायला लागली. कधीकधी बोलाचाली, कधीकधी वाद तर कधीकधी ढकलाढकली व्हायला लागली. सरपंचपदाची पाच वर्षं संपत आली. पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीची चाहूल लागली. सरपंचपदाच्या आरक्षणची सोडत निघाली. सरपंचपद महिला राखीव झालं, पण ते सर्वसाधारण गटातील. बघताबघता आचारसंहिता लागली. निर्णय घेण्यावर निर्बंध आले. आबांची लुडबूड थांबली. परत पारंपरिक राजकीय विरोधक आपापली पॅनेल उभी करून तयारीला लागले. दोघांनीही सरपंचपदाचे उमेदवार बाहेर कुठं शोधत बसण्यापेक्षा आपापल्या बायकोला निवडणुकीत उतरविले. 

पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा उडाला आणि खाली बसला. या निवडणुकीत मालन कुठंच उमेदवार नव्हती. निवडणूक अटीतटीची झाली. गेल्या पाच वर्षांत आबा मालनला घेऊन कसाकसा फिरत होता, हा विषयच निवडणुकीचा मुद्दा बनला. अखेर निवडणूक झाली. नामदेवराव आबांचं पॅनेल पडले. विलासरावबापूंचे पॅनेल निवडून आलं. लोकांनी तुका बुरडाच्या अंगणात फटाक्याची माळ लावली. गुलाल उधळला, त्याच्या चिवट्याही इस्कटल्या. विलासराव बापूंची मंडळी सरपंच झाली. तुका बुरुड आणि मालू आपापल्या धंद्याकडं वळली. आता नामदेवराव आबा त्यांच्याकडं फिरकायचे बंद झाले. 

नव्या पॅनेलची सत्ता येऊन वर्षसहा महिने झाले असतील-नसतील तोवर गेल्या पंचवार्षिकचं ग्रामपंचायतीचं ऑडिट सुरू झालं. त्यात बऱ्याच भानगडी बाहेर येऊ लागल्या. मागासवर्गीय घरकुल योजनेत घोटाळा झाला होता. एका गटारीच्या कामाची दोनदोन बिलं काढली होती. जवाहर रोजगार योजनेत आफरातफर होती. बरीच खोटी व बनावट व्हाऊचर्स होती. या सगळ्याचं सरकारी ऑडिट झालं आणि पंचायत समितीच्या बीडीओंनी पोलिसांत फिर्याद दिली. आरोपी कोण तर मालन तुका बुरुड. माजी सरपंच आणि ग्रामसेवक बाळू रामा कांबळे दोघांनाही पोलिसांनी अटक केली. 

तुका बुरुड धावत नामदेवराव आबाच्या घराकडं गेला. आबानं हात वर केले. जामीन देऊन मालूला सोडवायलाही मदत केली नाही. मग तुका तालुक्याला गेला. एका वकिलाला भेटला. त्यानं आपलाच एक धंदेवाईक जामीन दिला. मालनची जामिनावर सुटका झाली.  पेपरात आरोपीचे फोटो छापून आले. मालन निवडून आली त्या वेळी आबा बरोबरचा फोटो आणि केस झाल्यावर ग्रामसेवकाबरोबर तिचा फोटो. गाव सारं फिदी फिदी हसू लागलं. मालू आणि तुका बुरुड कोर्टाचे हेलपाटे मारू लागले. आता तिला लोक मालनताई किंवा मालू म्हणत नव्हते. परत एकदा तिला तुका बुरुडाची मालीच म्हणू लागले.

तुका आबाच्या हातापाया पडला पण काही उपयोग झाला नाही. तुका बुरुडाचं दारूचं व्यसन वाढतचं चाललं. तुका बुरुड आणि गणा सुतार यांची भांडणं, शिवीगाळ, वादावादी आणि मारामारी आता दररोजचं झालं. पहिल्या पहिल्यांदा लोक भांडणं सोडवत होते. नंतरनंतर त्यांची भांडणं सोडवायला कुणी पुढं येईना. ते दोघं दारू पिऊन भांडायचे आणि उभं गाव फुकटचा तमाशा बघायचं. हे आता लोकांच्या अंगवळणी पडलं होतं. तुका बुरुडाला आणि गणा सुतारालाही त्याची आता सवय झाली होती. 

Tags: ग्रामसेवक सरपंच पोलिस पंचायत समिती जवाहर रोजगार योजना Gramsevak Sarpanch Police Panchayat Samiti - Jawahar Rojgar Yojana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके