डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वैधव्यासह संभाव्य पोलीस केस अंगावर घ्यायची मानसिक तयारी केली आणि तिनंच वकिलांना सांगितलं की, ‘साहेब आता केसबिस कुछ नही. जे होईल ते मी निस्तरण्यास तयार आहे.’ असं सांगून ती उठली. तडक बाहेर गेली. डब्यासह उभ्या असलेल्या स्कूटीला किक मारून आपल्या कामाला निघून गेली. दोन दिवसांतच तिचा बदललेला अवतार पाहून वकिलांना धन्यता वाटली. मनोमन त्यांनी तिचं कौतुक केलं. एक उज्वला तयार झाली. अशा अनेकजणी होतील त्या वेळी परिवर्तनाची पहाट होईल.

एकेका वायरच्या पिशवीत दोन किंवा तीन कप्प्यांचे ॲल्युमिनियमचे दोन--तीन जेवणाचे डबे आणि अशा तीन-चार पिशव्या स्कूटीच्या मागे दोन्ही बाजूंना बांधून उज्वला सकाळ, संध्याकाळ गिऱ्हाईकाला त्याच्या जेवणाच्या वेळेत डबे पोचविण्यासाठी धडपड करत असायची. एके दिवशी संध्याकाळी सातच्या सुमारास तिची स्कूटी एका वकिलाच्या ऑफिससमोर थांबली. स्कूटीच्या कॅरेजला दोन्ही बाजूंना काही भरलेले तर काही रिकामे डबे होते. ते तसेच गाडीला ठेवून ती तडक वकिलाच्या ऑफिसमध्ये गेली. 

ऑफिसच्या बाहेरच्या रूममध्ये कुणीही नव्हते. म्हणून ती सरळ आत गेली. दोन रूमच्या मधल्या दरवाज्याजवळ थांबली. आत डोकावून पाहिले. वकिलांच्या समोर दोन माणसं बसली होती. त्यांची व वकिलांची काहीतरी चर्चा चालली होती. ती तिथंच थांबली. हातानेच वकिलांनी तिला बाहेरच्या रूममध्ये बसण्यासाठी खूण केली. त्याप्रमाणे ती बसली. पाच-दहा मिनिटांत आतली दोन्ही माणसं बाहेर आली आणि निघून गेली. 

उज्वला उठून मधल्या दाराजवळ गेली. वकिलांनी तिला आत यायला सांगितलं. वकिलांच्या टेबलासमोर दोन प्लॅस्टिकच्या खुर्च्या ठेवल्या होत्या, त्यांपैकी एका खुर्चीवर ती बसली. काय काम असं विचारण्यापूर्वीच आपलं नाव, गाव न सांगताच ती धाडधाड बोलायला लागली. साहेब, माझा नवरा स्वतः काहीही काम-धंदा करत नाही. एक दमडीही मिळवत नाही. माझ्या कष्टाच्या मिळकतीतून पैसे घेतो- कधी शिव्या देऊन, कधी भांडून, कधी मारहाण करून तर कधी हिसकावून. दररोज दारू पिऊन घरी येतो. मला व माझ्या दोन्ही मुलांना त्रास देतो.

झोपताना उशाला चाकू घेऊन झोपतो. पूर्वी ठार मारण्याची धमकी द्यायचा. त्या धमकीला मी घाबरत नाही हे बघितल्यावर सध्या तो आत्महत्या करण्याची धमकी देतो आहे. 

चाकूने भोकसून घेऊन नाही तर दारूतून विष पिऊन स्वतःला संपवणार आहे आणि तुझ्या वागण्याला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवणार आहे. मी मरतानासुध्दा सरळ मरणार नाही. तुला हिसका दाखवूनच मरणार आहे असं सतत बडबडत असतो.

त्यामुळे गेले आठ-पंधरा दिवस मी व माझी लहान मुलं घाबरून गेलो आहोत. साहेब, खरोखरच त्यानं असं काही स्वतःचं बरं-वाईट करून घेतलं तर मला त्रास होईल? नवऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केलं म्हणून मला पोलीस अटक करतील काय? मला शिक्षा होईल काय? त्यानं काही करण्यापूर्वी मला पोलिसात फिर्याद देता येईल काय? कोर्टात जाता येईल काय? एका मागून एक प्रश्न ती विचारत राहिली. अक्षरशः श्वास न घेताच ती धाडधाड बोलत होती. 

बरेच दिवस मनात तुंबून राहिलेलं सगळं भसाभसा बाहेर पडत होतं. तिला बोलून बोलून धाप लागली होती. तोंडाला कोरड पडली होती. ओठ सुकले होते. तीन शिट्टया दिल्यावर कुकर जसा थांबतो तशी ती थांबली. वकील तिचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होते. तिची प्रश्नाची सरबत्ती थांबल्यानंतर ते तिच्याकडे कुतूहलमिश्रित आश्चर्याने पाहतच राहिले. 

नवऱ्याच्या किंवा सासरच्या जाचाला कंटाळून महिला आत्महत्या करतात, त्यांना आत्महत्येला प्रवृत्त केले जाते. तशा चिठ्‌ठ्या ठेवून अगर कुणाला तरी सांगून त्या स्वत:ला संपवतात. त्यासाठी त्यांच्या नवऱ्यासह सासरच्यांवर पोलीस केस होते. ती बातमी पेपरात येते. कोर्टात केस चालते आणि त्यांना शिक्षा होते किंवा ते निर्दोष सुटतात. हे वकिलांना आजपर्यंत ठाऊक होतं, पण बायकोच्या वागण्याला कंटाळून आत्महत्येस तयार होणारा नवरा त्यांच्या आढळात कधी आला नव्हता. 

आत्महत्येची धमकी देऊन बायकोला पोलीस केसमध्ये अडकविण्याची भीती घालणारा हा बहाद्दर नवरा कसा असेल याबद्दल वकिलांनाही कुतूहल  वाटले.त्यांनी उज्वलाला प्रथम धीर दिला. घाबरून जाऊ नका. तुमच्या वतीनं कायदेशीर मार्ग काढू. संपूर्ण माहिती घेऊन एक-दोन दिवसांनी या असं सांगितलं. पण उज्वलाला एकदोन दिवस जास्तच वाटायला लागले. 

ती म्हणाली, ‘अहो साहेब, आज रात्रीच त्यानं काही घोटाळा केला तर मी काय करू?’ तिच्या चेहऱ्यावर तिची अगतिकता स्पष्ट दिसत होती. वकिलांनी तिला समजावून सांगितलं. म्हणाले, ‘हे बघा बाई, तुमचा नवरा असं काही करणार नाही आणि जर तसं केलंच तर तुमच्यावर केस होणार नाही. त्यातूनही तुम्हाला भीती वाटत असेल तर पोलीस स्टेशनला जा. नवऱ्याविरुद्ध त्रासाची व धमकीची तक्रार करा.’ 

वकिलांच्या या सल्ल्यानं तिला जरा धीर आला. एक दोन दिवसांनी येते असे सांगून ती निघून गेली. दोन दिवसांनी उज्वला वकिलांची फोनवर वेळ घेऊन आली. तिने तिची कर्मकहाणी सांगितली ती अक्षरशः थक्क करणारी होती. उज्वला तशी चांगल्या घरातली. शिकली सवरलेली. आई-वडील दोघेही शिकलेले. नोकरी करून खाणारे मध्यमवर्गीय. आपण, आपला संसार, दोन मुलं या पलीकडच्या जगाचा त्यांनी सहसा विचार केलेला नव्हता. तशी गरजही त्यांना नव्हती. 

उज्वलाचा एक मोठा भाऊ पदवीधर होता. एका सहकारी बँकेत नोकरीस लागला होता. उज्वला बारावीपर्यंत शिकलेली. दिसायला तशी बरी. चुणचुणीत आणि हरहुन्नरी. खाजगी इंजिनिअरिंग उद्योगात नोकरी करणाऱ्या देवेंद्रशी आई-वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं. देंवेंद्र तसा चांगला आणि होतकरू. लहानपणी त्याचे आई-वडील मयत झाल्याने त्याच्या मामानं त्याला सांभाळला. पदवीपर्यंत शिकवला. नोकरीला लावला. लग्नानंतर उज्वला व देवेंद्र यांनी सुरुवातीच्या काळात अतिशय चांगला संसार केला. 

उज्वलाच्या आई-वडिलांना मुलगी चांगल्या घरात पडल्याचं समाधान होतं. देवेंद्रच्या मामालाही आई-वडिलांचं छत्र हरवलेल्या भाच्याचा संसार पाहून आपण खाल्लेल्या खस्तांचं चीज झाल्यासारखं वाटत होतं. थोडक्यात काय तर उज्वला व देवेंद्र हे दांपत्य सुखी होते. त्याचबरोबर सासरचे आणि माहेरचे लोकही निर्धास्त होते. उज्वला व देवेंद्र नेकीने घरप्रपंच चालवत होते. त्याच्या वैवाहिक जीवनाला चांगली फळं आली होती. त्यांना प्रथम मुलगी व नंतर मुलगा अशी अपत्यप्राप्ती झाली होती. संसाराचा चौकोन पूर्ण झाला होता. कर्ज काढून का असेना त्यांनी स्वतःच्या मालकीचा फ्लॅट घेतला होता. देवेंद्र कामावर, उज्वला घर सांभाळत आणि दोन्ही मुलं शाळेत असं झकास चाललं होतं. 

अशा या आदर्श मध्यमवर्गीय जोडप्याच्या संसाराला कुणाची दृष्ट लागली कोण जाणे. देवेंद्र दारू प्यायला लागला. सुरुवातीला बायको-मुलांना काहीही कमी न पडू देता तो कधीकधी प्यायचा. नंतर हे प्रमाण हळूहळू वाढत गेलं. त्याचा परिणाम घरच्यांवर होऊ लागला. 

दारूचा खर्च वाढल्याने घरच्या खर्चात कपात व्हायला लागली. ओढाताण सुरू झाली. त्यातून नवरा-बायकोचे खटके उडू लागले. पहिल्यांदा हे खटके शाब्दिक होते. दबक्या आवाजात होते. शेजाऱ्या-पाजाऱ्यांना ऐकू जाऊ नयेत याची दक्षता दोन्ही बाजूंकडून घेतली जात होती. 

कालांतराने खटक्यांचं शाब्दिक स्वरूप बदललं. आवाज मोठा व्हायला लागला. दारं-खिडक्या सताड उघड्या ठेवून वाद व्हायला लागला. प्रसंगी व्हरांड्यात, गॅलरीत आणि रस्त्यावर भांडणं व्हायला लागली. शब्दांऐवजी शिव्यांचा सर्रास वापर सुरू झाला. एकमेकांच्या आई-वडिलांचा उद्‌धार करण्यात दोघांनीही आघाडी घेतली. 

शिव्याचं रूपांतर हाता-पायांच्या वापरात झालं. मग लाथा-बुक्क्यांनी मारामारी व्हायला लागली. चिमुरडी भेदरून जाऊ लागली. त्यांना आई-वडिलांचं बदलतं रूप अस्वस्थ करू लागलं. केविलवाणे चेहेरे करून ती दोघं हताशपणे आई-बापाची भांडणं बघू लागली. असं का होतंय, त्यांना कळत नव्हतं. 

सुरुवातीला भेदरणाऱ्या चिमुरड्यांच्या नंतरनंतर अंगवळणी पडलं. आपला बाप आईला विनाकारण त्रास देतोय हे त्यांना कळायला लागलं. पण ती बिचारी काहीही करू शकत नव्हती. संध्याकाळी जर भांडण झालं तर त्यांच्या जेवणाची आबाळ व्हायची. आईनं मार खाल्ला की ती स्वयंपाकच करायची नाही. रात्री कुणीच जेवायचं नाही.

रात्रभर बाप अधनंमधनं बरळत, शिव्या-शाप देत या कुशीवरून त्या कुशीवर व्हायचा. आई कधी गुपचूप पडून राहायची तर कधी उशीत तोंड खूपसून रडायची. कधी स्फुंदून स्फुंदून रडायची तर कधी ओक्साबोक्शी रडायची. 

बिचारी दोन चिमुरडी स्वतःचा काहीही अपराध नसताना पाणी पिऊन उपाशीपोटी अंथरुणावर पडून रहायची. कधीतरी मध्यरात्र उलटल्यानंतर त्यांचा डोळा लागायचा. असंच होत राहिलं. बरेच दिवस गेले. सगळ्यांनाच याची सवय झाली. 

देवेंद्रचं दारूचं व्यसन वाढतच गेलं. त्याची कामावर जाण्याची नियमितता डिस्टर्ब झाली. दांड्या मारण्याचे प्रमाण वाढलं. पैसे कमी पडल्यामुळे त्याने मित्र, शेजारी, पै-पाहुणे यांच्याकडून पैसे हातउसने घेण्याचा सपाटा लावला. त्या उधार उसनवारीची परतफेड होईना. देणेकरी कामाच्या ठिकाणी येऊ लागले. पैशाचा तगादा लावू लागले. देणेकऱ्यांचं तोंड चुकवायचं म्हणून मग त्याने कामावर न जाणंच पसंत केलं. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. अखेर त्याची नोकरी गेली. मग तो दिवसभर पिऊ लागला. घरातली एकेक वस्तू बाजारात मिळेल त्या किंमतीला विकू लागला. मिळालेले पैसे दारूवर खर्च करू लागला.

उज्वलाची चूल थांबली. कच्चीबच्ची भूक लागल्यावर केविलवाण्या नजरेने आईच्या तोंडाकडं बघायला लागली. उज्वलाचा नवरा मिळवायचा बंद झाला. पेन्शनीत निघालेले वडील काही मदत करू शकत नव्हते. भाऊ नोकरी करून स्वतःच्या संसार कसाबसा चालवत होता. त्याच्याकडून मदतीची अपेक्षा करणं मूर्खपणाचं होतं.

देवेंद्रचा मामा कोरड्या सहानभूतीपलीकडं काहीही करू शकत नव्हता. त्यानं स्वतः उज्वलाच्या आई-वडिलांनी, चार शहाण्या माणसांनी देवेंद्रला खूप समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण ते पालथ्या घड्यावर पाणीच ठरलं. उज्वलेचा भरलेला संसार पार इस्कटून गेला. पण तिनं धीर सोडला नाही.

एक जमेची बाजू  होती. वन बीएचके का असेना, फ्लॅट खरेदी करताना तो उज्वला व देवेंद्र या दोघांच्या नावे खरेदी केला होता. त्यामुळे तो देवेंद्रला विकता येत नव्हता. उज्वला फ्लॅटची सामाईक मालकीण होती. त्यामुळे राहण्याची गैरसोय नव्हती. प्रश्न होता तो काही ना काही उद्योग करून घर चालविण्याचा. 

उज्वलाने कंबर बांधली. नवरा मिळवणार नाही याची तिला खात्री होती. आपणच काही ना काही व्यवसाय करून घर चालवायचं असा तिनं निर्धार केला. ती विचार करायला लागली. त्यातून मार्ग सापडत चालला. ती राहत होती त्या परिसरात बरीच सरकारी ऑफिसेस, शाळा महाविद्यालयं, वसतिगृहं होती.तिने आपल्या हितचिंतकांकडून चार पैसे भांडवल म्हणून घेतले. घरीच खाणावळ सुरू केली. जेवायला बसायला घरी गिऱ्हाईकांना जागा नव्हती. त्यावर तिनं मार्ग काढला. घरी स्वयंपाक करायचा आणि डबे भरून गिऱ्हाईकाला पोचवायचे हा पर्याय निवडला.

तिनं पायाला भिंगरी बांधली. शाळा-कॉलेज, होस्टेलस्‌, ऑफिसेस सगळ्या ठिकाणी फिरून तिनं जेवणाचे डबे पोचवायला सुरुवात केली. स्वतःचा उद्योग सुरू केला. तिचा नवरा स्वतःच्या बायको मुलांना खाऊ घालू शकत नव्हता. पण ती बऱ्याच जणांची अन्नदाती झाली. स्वतःची गरज असल्याने अत्यंत चिकाटीने काम करायला लागली. 

एक सेकंडहँड स्कूटी घेतली. तिला जुन्या बाजारातलं एक कॅरेज बसवलं. बाजारातनं धान्य, भाजीपाला, तिखट-मीठ, मसाला आणून घरी स्वयंपाक करायचा. जेवणाचे डबे भरायचे. ज्याच्या त्याच्या घरी किंवा ऑफिसला ज्याच्या त्याच्या वेळेत पोहोचते करायचे. असं काम सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळ करायचं असं तिचं रूटीन सुरू झालं. ती प्रचंड धावपळ करायची. 

मुलं हळूहळू मोठी होत गेली. मुलानं बालवाडीचा आणि मुलीनं प्राथमिक शाळेचा टप्पा ओलांडला होता. त्यांच्या शाळेच्या वेळा सांभाळणं, त्यांना डबा देऊन शाळेत पाठवणं, त्यांचा अभ्यास घेणं आणि गिऱ्हाईकांचे वेळेत डबे पोचवणं ही एक मोठी तारांबळच होती. ती तारांबळ ती निमूटपणे सोसत होती. 

नवरा काहीही काम धंदा न करता निव्वळ बसून होता. आपला नवरेशाहीचा धाक दाखवून तिच्याच कमाईतून काही पैसे उकळत होता. त्यातूनच दारू पिऊन वर तिलाच डारडूर करत होता. उज्वलेला कामातून सवडच नसायची. त्यात नवऱ्याची सारखी कटकट तिला सहन व्हायची नाही. शेवटी तिनं मनाचा निर्धार केला. ऐतखाऊ दारुड्याला यापुढं दमडीही द्यायची नाही, असं तिनं ठरवलं. 

तिनं पैसे देणं बंद केल्यावर देवेंद्रनं पैसे मिळविण्याचा नवीन मार्ग शोधून काढला. त्याच्या दारूच्या गरजेने त्याला मार्ग दाखवला. उज्वला ज्यांना जेवणाचे डबे द्यायची त्यांची त्यानं माहिती घेतली. त्यांच्याकडे जाऊन त्यांना पैसे मागू लागला. 

सुरुवातीला उज्वलाच्या व गिऱ्हाईकांच्याही हे लक्षात आलं नाही. नंतरनंतर हळूहळू त्याची मखलाशी कळली. उज्वलेने गिऱ्हाईकांना देवेंद्रला पैसे न देण्याची विनंती केली. त्यानं आणलेले पैसे बिलातून वळते केले.मग देवेंद्र आसपासच्या लोकांकडून हातउसने पैसे मागू लागला. त्याची परतफेड करेना, असे लोक उज्वलेला पैसे मागू लागले. तिनं ते दिले आणि यापुढं देवेंद्रला उसने पैसे देऊ नका असं त्यांना हात जोडून सांगितलं. त्याची आवक बंद झाली. 

मग तो पिसाळलाच. ज्या भल्या गृहस्थाने उज्वलाला खाणावळ सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ दिलं होतं, त्याचा ठावठिकाणा देवेंद्रनं शोधून काढला. त्याचं नाव, गाव माहिती करून घेतलं. एके दिवशी देवेंद्रनं उज्वलाला दारूसाठी पैसे मागितले. तिनं नकार दिला, लगेचच ज्यानं तिला भांडवल दिलं होतं त्यानं ते का दिलं होतं? तुझा त्याचा संबध काय? असं विचारून तिच्या चारित्र्यावरच उघड संशय घेतला. 

या नसत्या संशयानं उज्वला पुरती खचली. तिनं परोपरीने नवऱ्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला. पैसे उसने आणले होते. ते परत केलेत असं तिनं सांगितलं पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. उज्वलाने नवऱ्याची सगळी थेरं सहन केली होती, पण आपल्या चारित्र्यावरचा आळ ती सहन करू शकत नाव्हती. त्या दिवसापासून ती नवऱ्याचा तिरस्कार करू लागली. जगातल्या सर्वच महिला सहनशील असतात. नवऱ्यानं दिलेला त्रास त्या सहन करतात, पण ज्या वेळी तिच्या चारित्र्यावर विनाकारण आळ येतो त्यावेळी कुणीही स्त्री सहन करत नसते. 

उज्वलाचं नेमकं हेच झालं. हा खोटा आळ तिच्या जिव्हारी लागला. आपण सर्व कुटुंबाची जबाबदारी पेलतोय. मरमर कष्ट करून घर चालवतोय. हा बहाद्दर काहीही न करता नुसता बसून राहतोय आणि वर दारूला पैसे दिले नाहीत म्हणून चारित्र्यावर आरोप करतोय. हे आपण सहन करायचं नाही असं तिनं ठरवलं.

धमकी देतोय त्याप्रमाणे त्यानं आत्महत्या केलीच तर वैधत्व पत्करायचा तिनं निर्धार केला. तिचं दुसरं मन तिला ‘समाज काय म्हणेल’ असं विचारू लागलं. समाजाला बायकोनं आत्महत्या केलेले चालते. नवऱ्यानं बायको टाकली तर चालते. तर मग नवऱ्यानं आत्महत्या केलेलंच का चालत नाही. बायकोनं नवरा टाकला तर का चालत नाही? स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारणाऱ्या पुस्तकी कायद्यांना आणि सरकारी ढोंगी विचारवंतांना हे का चालत नाही. 

नवरा दारू पिऊन मारत होता. चूल थंडगार पडली होती. कच्चीबच्ची भुकेनं व्याकूळ झाली होती. त्या वेळी समाजातला कोण भला माणूस मदतीला आला. त्या वेळी समाज जर डोळे झाकून पडला होता तर त्या समाजाची आता तमा का बाळगायची असाच तिनं विचार केला.

वैधव्यासह संभाव्य पोलीस केस अंगावर घ्यायची मानसिक तयारी केली आणि तिनंच वकिलांना सांगितलं की, ‘साहेब आता केसबिस कुछ नही. जे होईल ते मी निस्तरण्यास तयार आहे.’ असं सांगून ती उठली. तडक बाहेर गेली. डब्यासह उभ्या असलेल्या स्कूटीला किक मारून आपल्या कामाला निघून गेली. दोन दिवसांतच तिचा बदललेला अवतार पाहून वकिलांना धन्यता वाटली. मनोमन त्यांनी तिचं कौतुक केलं. एक उज्वला तयार झाली. अशा अनेकजणी होतील त्या वेळी परिवर्तनाची पहाट होईल. 

Tags: भुक दारू स्त्री-पुरुष समानता बायको नवरा समाज आत्महत्या appetite alcohol man and woman equality wife husband society suicide weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके