डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत मातीच्या फैलात दीड-दोन रुपये रोजंदारीवर काम करणारा, जुनी पुस्तकं निम्म्या किंमतीत घेणारा, अनवाणी शाळेत जाणारा, बारा वर्षे रात्रपाळी करणारा, दीडशे रुपये पगारावर नोकरी करणारा, प्राध्यापकीचं स्वप्न भंगलं तरीही परिस्थितीशी दोन हात करणारा अशोक खतपाण्याविना दगडावर उगवलेला आणि मोठा झालेला वृक्ष आहे. त्याच्या मोठं होण्यात कुणाचाही काडीचाही संबध नाही. त्याचं मोठेपण त्याने स्वत:च्या कर्तबगारीवर खेचून आणलेलं आहे. यशाच्या शिखरावर गेलेल्या अशोकने अजूनही त्याची दारिद्य्राशी असलेली नाळ तोडलेली नाही. समाजाचे आपण देणेकरी आहोत ही भावना त्यानं अजूनही जपून ठेवली आहे. गरिबांची, उपेक्षितांची कष्टकऱ्यांची बाजू मांडण्याचा घेतलेला वसा त्यानं अजून टाकलेला नाही. त्याच्या उभ्या आयुष्याचा प्रवास हा झीरोपासून सुरू होऊन हीरोपर्यंत पोहोचला आहे.  

सांगलीच्या राम मंदिर कॉर्नर जवळून मिरजेकडे वळल्याबरोबर उजव्या हाताला ‘शिव पॅव्हेलियन’ नावाची चार मजली दिमाखदार इमारत उभी आहे. त्या इमारतीच्या पहिल्या माळ्यावरच प्रशस्त असे दै. ‘सकाळ’चे कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये दैनिक सकाळच्या सांगली आवृत्तीचे चीफ रिपोर्टर श्री.अशोक घोरपडे सातत्याने काही ना काही कामात गुंतलेले असतात. त्यांच्या समोरच्या खुर्च्यांवर कुणी ना कुणी बसलेले असतातच.

कायमपणे तेथे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, नाही तर लिखाण सुरूच असते. अशोक घोरपडेंचा सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी टापूतला पाणी प्रश्न, दुष्काळ निर्मूलनाची उपाययोजना, वेगवेगळे सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्याबाबतच्या जाणिवा हा सर्वांत जिव्हाळ्याचा आणि प्रमुख विषय. एवढा मोठा सार्वजनिक आवाका असणारा हा प्रश्न गांभीर्याने आणि अव्याहतपणे हातळणारा हा माणूस. बौद्धिक परंपरा असणाऱ्या घराण्याचा वारसदार असावा असे वाटते. संगीताच्या क्षेत्रात संगीताची आणि गायनाची परंपरा असणारी काही घराणी आहेत. लिखाण, वाचन, प्रबोधन, जनजागरण, याची ही अशीच घराणी असतील. लोकांच्या समस्या वेशीवर टांगण्याचं काम परंपरेने अशा बौद्धिक घराण्यांतील वारसदारच करतात. ते ज्या समूहात जन्मतात वाढतात, वावरतात त्या समूहाचे प्रश्न ते हाताळतात. ग्रामीण कष्टकरी बहुजनांचे प्रश्न ऐरणीवर आणणारे अशोक घोरपडे यांच्या बौद्धिक पंरपरा असणाऱ्या घरातच जन्मले असावे असे वाटण्याइतपत त्यांच्यात कुवत आहे. त्यांच्या लिखाणातून ती जाणवते. वास्तव मात्र वेगळे आहे. बौद्धिक परंपरा असणाऱ्या घराण्याचा तो वारसदार नाही, परंतु अशी पंरपरा निर्माण करण्याच्या प्रयत्नशील घराण्यातील तो मूळ पुरुष आहे. ज्यांच्या बऱ्याच पिढ्यांत पूर्वजांच्या हातात खुरपं, खोरं, टिकाव, कुदळ हीच आयुधं होती त्या घरात परंपरागत आयुधांचा वापर करत करत कालांतराने ती खाली ठेवून त्यांच्याऐवजी लेखणीचा शस्त्र म्हणून प्रभावी वापर करणारा अशोक घोरपडे हा ग्रामीण मुलांचा आदर्श आहे.

अगदी अलीकडच्या काळात बागायती झालेलं, पण पूर्वीचं दुष्काळी टापूतलं मिरजेच्या लगतचं बेडग हे गाव. त्या गावच्या नैर्ऋत्येला चार किलोमीटरवर मळ्यातच वास्तव्य असणाऱ्या बाबूराव घोरपडे यांच्या कुटुंबात 16 जून 1957 ला अशोकचा जन्म झाला. दुष्काळी भागातल्या जिरायत शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेल्या पोरांचं हाल काय असतंय हे पुण्या-मुंबईतल्या एसीत बसणाऱ्या विचारवंतांना माहीत नसतं. त्यांना त्याचं वर्णनसुध्दा करता येत नाही. ते कळतंय फक्त त्या परिस्थितीतून जाणारांनाच. त्या परिस्थितीतून आलेल्या अशोकनं त्याचं बालपण उघडं-नाघडं, अर्धपोटी, अर्धनग्न अवस्थेत इतर सारीजण घालवत्यात तसं घालवलं. बेडगच्या पाटील वस्तीवर एका उसाच्या पाल्याच्या छपरात एक शाळा होती. ती पहिली ते चौथीपर्यंत होती. अशोक त्या शाळेत पहिलीच्या वर्गात दाखल झाला. पोरं म्हसरामागं पाठवण्याऐवजी शाळेत पाठवायची इतक्या माफक हेतूनं त्याला शाळेत घातला. इतर साऱ्याचं पोरांसारखं रडतखडत त्या शाळेत चौथीपर्यंत शिकला. वर्षानुवर्षे पडीक असलेली जमीन पहिल्यांदा पेराव केल्यावर जशी चांगली पिकते तसंच अशोकचंही झालं. बऱ्याच पिढ्यांतनं पहिल्यांदा शिक्षणाचा संबंध आल्यानं आख्या खानदानात शिक्षण घेणारा पहिलाच माणूस असल्यानं तो तसा इतरांपेक्षा हुशार निघाला. म्हणून आई-वडिलांनी त्याला पुढं शिकवायचं ठरवलं. वस्तीपासून चार किलोमीटरवर असलेल्या बेडग गावच्या जिल्हापरिषदेच्या शाळेत इयत्ता पाचवीत त्याचं नाव घातलं. मळ्यापासून गांवातल्या शाळेला पायी चालत जाऊन येऊन त्याचं शिक्षण सुरू झालं. त्याच मराठी मुलांच्या शाळेत तीन वर्षे त्यानं घालवली आणि एकदाचा तो सातवी पास झाला. त्या वेळी सातवीला केंद्रद्रपरीक्षा असायची. त्यानं ती पार केली.

ग्रामीण बहुजनांची पोरं शिकावीत म्हणून शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहोचवणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेची माध्यमिक शाळा कर्मवीरांच्या मृत्यूनंतर का होईना पण बेडग येथे सुरू झाली. ‘कमवा आणि शिका’ हा मंत्र कर्मवीरांनी महाराष्ट्रातील समस्त बहुजनांच्या पोरांना दिला होता, असं असलं तरी रयत प्रत्येक शाळेत लेबरस्कीम नव्हती. पण रयतमध्ये शिक्षण घेणाऱ्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी वैयक्तिक पातळीवर ‘कमवा आणि शिका’ ही योजना राबवली होती. त्यांपैकी अशोक एक होता.

आठवीला त्यानं न्यू इंग्लिश स्कूलला प्रवेश घेतला. पाचवीपासूनच मळ्यातल्या वस्तीवरनं गावातल्या शाळेपर्यंत चार किलोमीटर चालत जाण्याचं आणि येण्याचं त्याच्या अंगवळणी पडलं होतं. त्याप्रमाणे अशोक आठवी ते अकरावी अशी चार वर्षे पायपीट करत शिकत राहिला. आठवीपासूनच त्यानं त्याच्या वैयक्तिक पातळीवर स्वावलंबी शिक्षणाचं कर्मवीरांचं ब्रीद अंमलात आणलं. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पानमळ्यात माती टाकावी लागते. त्या कामांसाठी बरीच माणसं लागतात. पानमळ्याबाहेरच्या शेतातली किंवा बाहेरून आणून ठेवलेली माती पाट्यांत भरून ती पानमळ्यात नेऊन टाकावी लागते. त्यासाठी आठ-दहा पुरुष आणि दहा-पंधरा स्त्रिया, मुलं यांची टोळी एकत्रितपणे काम करते. त्या टोळीला मातीचा फैल असे म्हणतात. मातीच्या फैलाचा हंगाम हा नेमका पावसाळ्यापूर्वी म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीतच यायचा. त्यावेळी त्या फैलात शाळकरी पोरांना दरदिवशी दीड दोन रुपये हजेरी मिळायची. फैलाचं काय साधारणपणे महिना दीड महिना चालायचं. आठवीपासून अशोक मे महिन्यात मातीच्या फैलात जायला लागला. वर्षभर पुरेल इतकं शालेय साहित्य विकत घ्यायचा. शालेय साहित्य म्हणजे काय तर पुढच्या वर्गातल्या मुला-मुलीची जुनी पुस्तकं ती निम्या किंमतीत मिळायची. चार वह्या घ्यायच्या. एक खाकी चड्डी व पांढरा शर्ट घ्यायचा. तो वर्षभर वापरायचा. रविवारच्या सुट्टीत शर्ट, चड्डी धुवायची. परत आठवडाभर वापरायची. एवढ्या खरेदीला फैलातील कमाई पुरायची. त्या वेळी खेड्यातल्या पोरांना चप्पल ही चैनीची गोष्ट होती. ती अशोकला परवडणारी नव्हती. त्यामुळे चप्पल घालायची चैन त्यानं कधी केलीच नाही. अशोक वडिलाकडं पैसे कधीच मागायचा नाही. कारण काय तर त्यांच्याकडे पैसे नसायचे हे त्याला माहीतच होतं. ते पैसे देऊ शकत नाहीत मग मागायचे कशाला, असा तो विचार करायचा. गरिबीमुळं त्याला तो अकाली पोक्तपणा म्हणा किंवा समजूतदारपणा म्हणा, आला होता. असं जगत, झगडत तो अकरावी पास झाला. त्याच्या पुढच्या शिक्षणाची गावात सोय नव्हती. त्यासाठी मिरज-सांगलीसारख्या शहराला जायला लागणार होतं.

त्यावेळी अकरावीनंतर कॉलेजमध्ये प्री डिग्रीला प्रवेश घ्यावा लागत होता. कॉलेजमध्ये चड्डी-शर्ट चालत नाही. पायात चपला न घालता जाणं जरा विचित्रच वाटतं होतं. लांब असल्यानं चालत जाणंही शक्य नव्हतं. त्यामुळे शर्ट, विजार, चप्पल, सायकल हा अनाठायी खर्च करावा लागणार होता. त्या सगळ्या खर्चाची जुळणी करून अशोकनं कॉलेजला प्रवेश घ्यायचा निर्णय घेतला. मिरज शहरात नुकतंच स्वामी विवेकानंद संस्थेचं कॉलेज सुरू झालं होतं. अशोकनं त्या कॉलेजमध्ये आर्टस साईडला प्रवेश घेतला. मळ्यातनं मिरजेला त्याचं सायकलवरून येणं-जाणं सुरू झालं. पी.डी ते टी.वाय.बी.ए अशी चार वर्षं त्यानं मिरजेच्या कॉलेजमध्ये गावाकडं येऊन-जाऊन काढली. त्या कालावधीमध्ये सुट्टीत काम करणे आणि शिक्षणाच्या खर्चाचा भार घरच्यांवर न टाकणे या कामात त्यानं सातत्य ठेवलं. मिरजेच्या कॉलेजमध्ये असताना त्याला कळालं की हिंदी हा स्पेशल विषय घेणाऱ्यांना शिष्यवृत्ती मिळते. शिष्यवृत्ती म्हणजे दरमहा काही तरी रक्कम. ती रक्कम मिळावी म्हणून अशोकनं हिंदी हा विषय बी.ए.साठी निवडला. हिंदीची आवड होती आणि हिंदीत करिअर करायचं असं काही नव्हतं. फक्त आपल्याला शिष्यवृत्तीच्या रूपानं चार पैसे मिळतील. शिक्षणाला हातभार लागेल म्हणून हिंदी हा विषय निवडला. अशोक मिरजेच्या कॉलेजमधून चांगल्या मार्कानं बी.ए.पास झाला. त्यानंतर त्यानं एम.ए.ची पदवी पदरात घेतली ती आपल्याला प्रोफेसर म्हणून कुठंतरी नोकरी मिळेल असा आशावाद होता म्हणून.

बी.ए.पर्यंत गावाकडनं मिरजेला कॉलेजला सायकलवरून जाऊन-येऊन करणारा अशोक आता एम.ए.साठी सांगलीपर्यंत यायला लागला होता. त्याच वेळी त्यानं अर्थार्जनाचा नवीन मार्ग शोधून काढला. सांगलीत नवसंदेश नावाचे एक स्थानिक वर्तमानपत्र आहे. तिथं प्रूफरीडरचं काम मिळवलं. प्रुफरीडिंगचं काम सहसा दिवसा नसतं. ते काम संध्याकाळी सुरू होतं आणि मध्यरात्रीनंतर बंद होतं. अशोकला दरमहा दीडशे रुपये पगार ठरला. त्या पगारावर त्यानं एम.ए.ला असतानाच ती नोकरी पत्करली. मग त्याच्या रूटीनमध्ये बदल झाला. मग तो दुपारी चार वाजता सायकलवरून निघायचा, सहा वाजेपर्यंत ‘नव संदेश’चं ऑफिस गाठायचा. तिथं मध्यरात्रीपर्यंत काम करायचा आणि तिथंच मुक्काम करायचा. सकाळी उठून कॉलेजला जायचा. एक-दोन पीरियड अटेंड करायचा. त्यानंतर सायकलवरून गाव गाठायचा. तोवर दुपारचे बारा वाजायचे. दोन घास खाऊन शेतात इकडं-तिकडं केलं की चार वाजायचे. मग सायकलवर टांग मारायचा. एम.ए. पूर्ण करेपर्यंत अशी दोन वर्षं काढली. त्यानं एम.ए.ची पदवी पदरात पाडून घेतली ती चांगल्या मार्कांनी. त्या वेळी एम.फिल, नेट-सेट असली काय भानगड नव्हती. प्रोफेसर व्हायचं स्वप्न टप्प्यात आलं होतं. अशोक  ज्या दुष्काळी भागात जन्मला आणि वाढला त्याहीपेक्षा भयाण दुष्काळ असणाऱ्या सांगली जिल्ह्याच्या टोकाच्या अशा आटपाडी या तालुक्याच्या ठिकाणी एक कॉलेज नुसतंच सुरू झालं होतं. तेथील नोकर भरतीची जाहिरात आली. अशोकनं अर्ज केला. त्याला रीतसर मुलाखतीला बोलावलं. त्याची मुलाखत चांगली झाली. अशोकनं नोकरीसाठी हिंदी या विषयावर प्रभुत्व मिळवलं होतं. विषयतज्ज्ञांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तर देऊन त्यानं त्यांच्यावर इम्प्रेशन मारलं. परिणाम चांगला झाला, त्याचं सिलेक्शन झालं. कॉलेजनं त्याच्या घरच्या पत्त्यावर नेमणुकीचं पत्र पाठवलं. बेडगच्या उजाड माळावरचा बहुजनाचा मुलगा प्रोफेसर झाला. गडी हरखून गेला. आयुष्यात केलेल्या कष्टाचं चीज झालं होतं. त्याला आनंद झाला, पण तो आनंद फार वेळ टिकला नाही. अशोकची नेमणूक ज्या जागेवर झाली होती त्या जागेवर आदल्या वर्षी एकजण त्या शैक्षणिक वर्षाकरता तात्पुरता काम करत होता. त्याचे काम असमाधानकारक असल्याने त्यास डिस्‌कन्टिन्यू करून, परत मुलाखती घेऊन त्यात सरस ठरलेल्या अशोकला नेमणूक दिलेली होती. पूर्वी काम करणारानं, डिस्‌कन्टिन्यू केलं व नवीन माणूस घेतला म्हणून डायरेक्ट युनिव्हर्सिटी ट्रायब्यूनलकडं अपील दाखल केलं. त्यात अशोकलाही प्रतिवादी करण्यात आलं. ते अपील पुण्याला चालणार, पुण्यात वकील द्यायला लागणार, तारखांना हजर राहावं लागणार हे सगळं अशोकच्या आर्थिक आवाक्याच्या पलीकडचं होतं. त्यामुळं तो पुण्याला जाऊ शकला नाही. अपीलमध्ये आपली बाजू मांडू शकला नाही, परिणाम व्हायचा तोच झाला. त्याची नेमणूक कोर्टानं रद्द केली. हातातोंडाला आलेली प्राध्यापकी निसटली ती कायमचीच.

अशोकनं मग आटपाडी कॉलेजचा नाद सोडला. ‘नवसंदेश’मध्ये प्रूफरीडरची नोकरी करत जाहिराती वाचून अर्ज करत राहिला. पण त्याची कुठंच दाद लागली नाही. आता कॉलेजचं शिक्षण संपलं होतं. त्यानं नोकरीचा हळूहळू नाद सोडला. रात्रपाळीचं प्रूफरीडिंगचं काम संपलं की तो सायकलवर टांग मारायचा. पहाटे मळ्यात हजर. दिवसभर काही वेळ काम, काही झोप, हे अशोकच्या अंगवळणीच पडले होते. थोडेथोडके दिवस नव्हे तर तब्बल बारा वर्षे अशोक सायकलवरून बेडग ते सांगली आणि परत असा रात्रीचा प्रवास करत होता. प्रूफरीडिंगमध्ये त्याचं करिअर घडत होतं. मनापासून प्रूफरीडिंगचं काम करत असल्यामुळे त्याला त्याच्या इमानदारीचं फळ मिळालं. या कामामुळे सर्व बातम्या, अग्रलेख, लेख, स्फुटं, स्तंभ, पत्रं अशा विविध अंगांनी त्याचं वाचन होत चाललं. या वाचनानंच त्याला दिशा मिळाली. योगायोगानं संधी मिळत गेली. त्याचं असं झालं की संध्याकाळी नऊ ते दहा या वेळेत उपसंपादक जेवायला जायचे. त्या वेळी प्रेसमध्ये अशोक व त्याचे इतर सहकारी असायचे. त्या काळात कधीकधी फोन यायचे. ते फोन अशोक अंटेन्ड करायचा. फोनवरून आलेल्या बातम्या तो लिहून घ्यायचा. उपसंपादक जेवण करून परत आल्यावर त्या बातम्या तो उपसंपादकांना द्यायचा. अशोकची बातम्या लिहायची लकब, भाषा त्याचा अचूकपणा उपसंपादकांना आवडायला लागला. त्यांनी अशोकला एक दिवस बोलावून घेतले. ते म्हणाले, ‘तू बातम्या चांगल्या लिहितोस, उद्यापासून बातमीदार म्हणून काम कर’ अशा रीतीनं अशोकला प्रूफरीडर वरून बातमीदार या पदावर बढती मिळाली. तो बातमीदार म्हणून काम करायला लागला.

बातमीदार झाल्यावर त्याच्या मासिक उत्पन्नात वाढ झाली. हळूहळू त्याची रात्रपाळी पण बंद झाली. रात्री येऊन सकाळी घरी जाणारा अशोक सकाळी येऊन रात्री घरी जायला लागला. त्याचा पब्लिकशी संपर्क यायला लागला. तो वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या लोकांच्या संपर्कात येऊ लागला. लोकसंपर्काचा त्यानं पुरेपूर फायदा करून घेतला. पूर्वीपासूनच त्याला वाचनाचं वेड होतं, ते वाढत गेलं. पुस्तकाबरोबर तो माणसंही वाचू लागला. त्याची बातमीदार म्हणून चांगली ख्याती झाली. बातम्या लिहीत लिहीत तो इतर लिखाणही करू लागला. मोठमोठ्या नावाजलेल्या वर्तानपत्रांतून त्याला ऑफर येऊ लागल्या. त्याचा भाव वाढला, त्यानं ‘नवसंदेश’मधील नोकरी सोडली. कोल्हापूरहून प्रसिध्द होणाऱ्या दै.पुढारी मध्ये तो प्रथम जॉईन झाला. काही काळ तिथं काम करून अशोक चीफ रिपोर्टर म्हणून दै.सकाळ मध्ये आला. मोठ्या दैनिकाचा बातमीदार म्हणून काम करताना त्याचा हुरूप वाढला. कामाचा व्याप व आवाका वाढला. त्यानं बातमीदार म्हणून चांगला नावलौकीक मिळवला. इतकं झाल्यावर अशोकनं सायकलला विश्रांती दिली. त्यानं एक एम.एटी. गाडी घेतली. त्याचा प्रवास मग दुचाकीवरून सुरू झाला. बातमीदारीबरोबर तो बऱ्याच सामाजिक व राजकीय विषयांवर लिखाण करू लागला. त्यानं लिखाणासाठी निवडलेले सर्व विषय परिवर्तनाशी संबधित होते. वाचनामुळे त्याची वैचारिक बैठक तयार झाली होती. त्या वैचारिक बैठकीच्या जोरावर त्यानं विविधांगी लेखन केलं. त्याचं लेखन प्रभावी व दर्जेदार आहे, कारण त्यानं केलेलं लेखन हे ऑफिसात किंवा पंख्याखाली बसून कल्पनेच्या भराऱ्या घेत केलेलं नाही. तर प्रत्यक्ष भटकंती करून वास्तव डोळ्यांनी पाहून विषय मांडलेत. त्यामुळं ते प्रभावी झालं आहे. अशोकनं वर्तानपत्रातून अनेक विषय हाताळले. त्या सर्वांचा ऊहापोह करायचा झाला तर तो प्रचंड ग्रंथच होईल. म्हणून मोजक्याच विषयांचा विचार या लेखात केला आहे. अशोकच्या सर्व लिखाणातून एक गोष्ट स्पष्ट होते की, त्याचं लिखाण हे कष्टकऱ्यांच्या बाजूचं आहे. कष्टकऱ्यांच्या वेदना, दु:खं त्याने मांडली आहेत. स्वत:च दुष्काळाचे चटके सोसल्यामुळे त्यानं दुष्काळग्रस्तांच्या व्यथा अत्यंत प्रभावीपणे मांडल्या आहेत. दर तीन-चार वर्षांनी पडणाऱ्या दुष्काळनं जनतेची कशी दाणादाण उडवून दिली आहे हे आम जनतेसह प्रशासनाच्या नजरेस आणण्याचं काम त्याने आपल्या लिखाणाद्वारे चोखपणे केलं आहे. धरणग्रस्तांच्यावरचं त्यांचं लिखाण हे धरणग्रस्तांची परवड वाचकांसमोर आणणारं आहे.  धरणग्रस्त आणि दुष्काळग्रस्त यांना न्याय द्यायचा त्याने प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्याचं लिखाण अगदी पोटतिडिकीनं केलेलं आहे. एकोणीसशे नव्वदच्या दशकात सरकारनं एक एन्रॉन नावाचं भूत उठवून बसवलं होतं. महात्मा गांधीजींच्या ‘चले जाव’ चळवळीला रीव्हर्स गिअर टाकून सरकारनं एन्रॉनसह इतर परदेशी भांडवलदारांना ‘चले आव’ असा नारा दिला. सरकारी विकाऊ विचारवंतांसह भांडवलदारधार्जिण्या माध्यमांनीही त्याची तळी उचलून धरली. एन्रॉनविरोधात वीज कर्मचारी आणि पुरोगामी पक्ष संघटना सर्व ताकदीनिशी मैदानात उतरल्या. त्या सर्वांना बळ देणारं लिखाण अशोकनं केलं. एन्रॅानच्या प्रश्नाचा अत्यंत बारीकसारीक अभ्यास करून त्यानं आंदोलनाला पूरक असं लिखाण केलं. त्यात सातत्य ठेवलं. एन्रॉननं या देशातून गाशा गुंडाळला. त्यास वीजकर्मचारी आणि पुरोगामी पक्षसंघटना जेवढ्या कारणीभूत ठरल्या तेवढ्याच प्रमाणात एन्रॅानविरोधी अखंडित आणि प्रामाणिकपणे केलेलं श्री.अशोक घोरपडे यांचं लिखाणही कारणीभूत आहे. याची दखल घ्यावी लागेल.

सांगली जिल्ह्याच्या वरदायिनी म्हणून गाजावाजा झालेल्या ताकारी, म्हैसाळ, टेंभू या सिंचनयोजना कृष्णा नदीच्या पात्रात जिथं सुरू होतात त्या ठिकाणापासून ते त्यांचा प्रस्तावित शेवट जिथं होणार आहे, त्या ठिकाणापर्यंत अशोकनं एम.एटी.वरून उन्हातान्हात फिरून पाहणी केली. त्या पाणीयोजनांवर होणारा खर्च प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी असणाऱ्या भानगडी, लफडी, ढापाढापी, हाणाहाणी, निष्कृष्ट काम, नियोजनातील बोंबाबोंब या सर्वांचा पंचनामा अशोकनं आपल्या लिखानांतून केला. सरकारी खाबूगिरी आम जनतेच्या नजरेस आणली. पाणीयोजनांची लक्तरं गावागावातल्या वेशीवर टांगली. संपूर्ण महाराष्ट्रातल्या सिंचन धोरणाविरुद्ध जो काही आक्रोश सुरू झाला, अगदी श्वेतपत्रिका काढेपर्यंत प्रकरण गेलं. त्या आक्रोशात अशोकच्या लिखाणाचाही वाटा आहे. हे मान्य करावं लागेल. क्रांतिवीर कै.नागनाथआण्णा नायकवडी यांनी 1993 पासून सातारा, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांतल्या तेरा दुष्काळी तालुक्यांतील सिंचनयोजनांसाठी आटपाडी येथे पाणी परिषद घेऊन सरकारला गदागदा हलवून जाग आणली. त्या पाणीपरिषदेच्या बातम्यांना अग्रक्रम देऊन अशोकनं चळवळीतच आपली भागीदारी केली.

सांगलीचा वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाच्या गैरकर्तृत्वामुळे डबघाईस आला. कामगारांचे पगार थकले. सेवानिवृत्तांची देणी थकली. त्याचा परिणाम म्हणून कामगारांच्या चुली थांबायला लागल्या. केलेल्या कामाचे पैसे मागण्यासाठी त्यांनी विविध आंदोलनं केली. त्या आंदोलकांच्या बाजूनं लिखाण करून त्यांचा प्रश्न ऐरणीवर आणण्याचं काम अशोकनं केलं. सांगलीच्या जिल्हाधिकारी कचेरीसमोर साखर कामगार उपाशी पोटी धरणं धरून बसलेले असायचे. त्याचं वृत्तसंकलन करायला अशोक घोरपडे पण तिथं उपाशीपोटीच जात होते. तिथं दिवसभर थांबत होते. त्या आंदोलनाच्या बातम्या, त्यांचं विश्लेषण, त्यावरचे उपाय यांचं सखोल चिंतन करून त्यावर त्याने अभ्यासपूर्ण व अंतःकरणापासून लिखाण केलं अशोकमध्ये जी सहृदयता होती. ती कुठून बाहेरून आलेली नव्हती. कुणी सांगून, शिकवून आली नव्हती. उपजत असणाऱ्या दारिद्य्रानं ती त्याच्या अंगात भिनवली होती. अशोकनं सरकार आणि प्रशासन यांच्यावर सडेतोडपणे प्रहार केले, पण ते कधीच एकतर्फी केले नाहीत. सरकारवर हल्ले चढवायचे म्हणून कधीही चढवले नाहीत. याउलट शासनाची लोककल्याणाची धोरणं आणि प्रशासनानं त्यांची केलेली अंलबजावणी जर समाजभिमुख असेल तर मात्र अशोकनं त्यांच्या बाजूनं भरभरून लिहिलं. टंचाईच्या काळात पाणीप्रश्नावर कायमचा तोडगा काढण्यासाठी सांगली जिल्ह्यात जी शेततळ्यांची योजना राबवली त्यावर अशोकनं सरकारची बाजू अत्यंत चांगल्या रीतीनं मांडली. प्रशासनाचं कौतुक केलं. शेततळ्यांवर त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केलं. त्या लेखनातून शेततळी काढण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी स्फूर्ती घेतली. त्यातून दुष्काळ निवारणाचं थोडं का असेना काम झालं.

अशोकचा हा आटपिटा तसा काही वाया गेला नाही. प्रत्यक्ष जागेवर जाऊन वस्तुस्थिती जाणून घेऊन लिखाण करणे आणि ते सर्व प्रचंड अशा वाचनाने पक्क्या झालेल्या वैचारिक बैठकीवर करणे या गोष्टीची दाद परिवर्तनवाद्यांनी घेतली. अशोकला बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने दिला जाणारा पत्रकारितेचा मानाचा असा दर्पण पुरस्कार मिळाला. त्याच्या कर्तृत्वाची रास्त अशी दखल घेतली. चीफ रिपोर्टरच्या केबिनमध्ये त्याचा प्रवेश हा आपसूकपणे झालेला नाही. तिथं पोहोचण्यासाठी त्यानं अपार कष्ट सोसलेत. दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत मातीच्या फैलात दीड-दोन रुपये रोजंदारीवर काम करणारा, जुनी पुस्तकं निम्म्या किंमतीत घेणारा, अनवाणी शाळेत जाणारा, बारा वर्षे रात्रपाळी करणारा, दीडशे रुपये पगारावर नोकरी करणारा, प्राध्यापकीचं स्वप्न भंगलं तरीही परिस्थितीशी दोन हात करणारा अशोक खतपाण्याविना दगडावर उगवलेला आणि मोठा झालेला वृक्ष आहे. त्याच्या मोठं होण्यात कुणाचाही काडीचाही संबध नाही. त्याचं मोठेपण त्याने स्वत:च्या कर्तबगारीवर खेचून आणलेलं आहे. यशाच्या शिखरावर गेलेल्या अशोकने अजूनही त्याची दारिद्य्राशी असलेली नाळ तोडलेली नाही. समाजाचे आपण देणेकरी आहोत ही भावना त्यानं अजूनही जपून ठेवली आहे. गरिबांची, उपेक्षितांची कष्टकऱ्यांची बाजू मांडण्याचा घेतलेला वसा त्यानं अजून टाकलेला नाही. त्याच्या उभ्या आयुष्याचा प्रवास हा झीरोपासून सुरू होऊन हीरोपर्यंत पोहोचला आहे.

Tags: बाळशास्त्री जांभेकर के.डी.शिंदे अशोक घोरपडे कर्मवीर भाऊराव पाटील पुढारी नवसंदेश नागनाथअण्णा नायकवडी सांगली दर्पण karmvir Bhaurao Patil Pudhari Navsandesh Nagnathanna Naikwadi Sangali Darpan Balashastri Jambhekar Sakal K.D.Shinde weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात