डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गुजरात अजूनही जळतंयच!...

मागील वर्षभर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व संघ परिवारातील अन्य संघटनांनी देशभर राममंदिर निर्माण आंदोलनाच्या निमित्ताने विषारी प्रचार चालवला होता. राम मंदिर बांधण्याच्या नावाखाली समाजात मुस्लिमद्वेष पसरवणे हा खरा कार्यक्रम त्यांनी राबवला. त्यांनी परिस्थिती स्फोटक बनवली. त्यात निमित्त झाले गोध्राच्या घटनेचे. गोध्रा येथील सैतानी घटनेचा निषेध करावा तितका थोडाच आहे; पण त्या एका प्रसंगाच्या घटनेचे भांडवल करून, मागील दीड महिन्यात गुजरातमध्ये मुसलमानांची जी लांडगेतोड केली गेली, तिचे वर्णन कसे करावे? भारतीय समाजावरील प्रत्येक आपत्तीत राष्ट्र सेवा दल आपल्या शक्तीनुसार धावून जाते. त्याप्रमाणे गुजरात दंगलग्रस्तांसाठी काही मदत करावी आणि परस्पर सद्भाव वाढीला लागावा, म्हणून राष्ट्र सेवादलाच्या वतीने गुजरातमध्ये दोन कार्यकर्त्यांनी जायचे ठरवले.

गुजरातमधील दंगलग्रस्त बांधवांना मदतसाहित्य घेऊन आम्ही गेलो. सोबत मागील वर्षभर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व संघ परिवारातील अन्य संघटनांनी देशभर राममंदिर निर्माण आंदोलनाच्या निमित्ताने विषारी प्रचार चालवला होता. राम मंदिर बांधण्याच्या नावाखाली समाजात मुस्लिमद्वेष पसरवणे हा खरा कार्यक्रम त्यांनी राबवला. त्यांनी परिस्थिती स्फोटक बनवली. त्यात निमित्त झाले गोध्राच्या घटनेचे. गोध्रा येथील सैतानी घटनेचा निषेध करावा तितका थोडाच आहे; पण त्या एका प्रसंगाच्या घटनेचे भांडवल करून, मागील दीड महिन्यात गुजरातमध्ये मुसलमानांची जी लांडगेतोड केली गेली, तिचे वर्णन कसे करावे? भारतीय समाजावरील प्रत्येक आपत्तीत राष्ट्र सेवा दल आपल्या शक्तीनुसार धावून जाते. त्याप्रमाणे गुजरात दंगलग्रस्तांसाठी काही मदत करावी आणि परस्पर सद्भाव वाढीला लागावा, म्हणून राष्ट्र सेवा दलाच्या वतीने गुजरातमध्ये दोन कार्यकर्त्यांनी जायचे ठरवले.

गुजरातमधील दंगलग्रस्त बांधवांना मदतसाहित्य घेऊन आम्ही गेलो. सोबत महाराष्ट्र राष्ट्र सेवा दलाचे संघटक उमाकांत भावसार होते. प्रवासात गुजरातमधील परिस्थितीचा अंदाज घेत अहमदाबाद शहराच्या 10 कि.मी. अंतरावर आम्ही पोहोचलो. तेथे चहा घेताना धाबेवाला म्हणाला, “आज पुन्हा दंगल उसळली आहे. सगळीकडे कर्फ्यु लागला आहे. खूप माणसं मेलीत.” आम्हांला थोडा धक्का बसला. 

ज्यांचा संपर्कपत्ता आम्हाला दिला होता, त्यांना आम्ही फोन केला. त्यांच्याकडून मिळालेल्या सूचनेप्रमाणे आम्ही शहरात घुसलो. नारोळ चौकडीपासून शहर पाहात निघालो व रस्त्याच्या कडेची दुकाने, हॉटेल्स, घरे, गॅरेजे, जळलेली व काही जळताना दिसली, ते सारे पाहात साबरमती आश्रमात दाखल झालो. त्याच आवारात ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते चुनीभाई वैद्य राहतात. गुजरात दंगलग्रस्तांच्या मदतकार्यात ते सक्रिय असल्याने त्यांच्याकडे सर्व मदत साहित्य व राष्ट्र सेवादलाच्या वतीने रु. 55000/-या डी.डी. सुपूर्त केला. चहापानानंतर त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. त्यावरून सर्व परिस्थितीचा अंदाज आला. आश्रमासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने 'नरेंद्र मोदी हटाव' यासाठी चक्रीउपोषण चालू आहे. ते 16 मेपर्यंत चालणार आहे. तिथेही काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यापैकी जुने समाजवादी खासदार उत्तमभाई पटेल, मुकुल वासनिक, खासदार, बुलढाणा व बऱ्याच आजी माजी आमदारांशी चर्चा केली. नरेंद्र मोदींना हटविल्याशिवाय गुजरात स्थितीत सुधारणा होणारच नाही, असा त्या सर्वांचा सूर होता. त्या दिवशी शहरात वातावरण बरेच तापलेले होते. सगळीकडे कर्फ्यू होते. त्यामुळे आम्हाला बाहेर पडता आले नाही. सकाळी तेथील कार्यकर्त्या नीताबेन व महादेव विद्रोही यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या शासकीय आकडेवारीप्रमाणे पूर्ण दंगलग्रस्त गुजरातमधील एकूण 102 सुरक्षा कॅम्पसमधून एक लाख आठ हजार शरणार्थी आश्रयाला आहेत. पैकी 47 कॅम्पस एका अहमदाबाद शहरात आहेत. त्या 47 कॅम्पस्मधून अठावन्न हजार एक्कावन्न शरणार्थी आहेत. परवा दि. 22 पासून परत दंगल उसळल्याने त्यांत अजून भर पडत आहे. आत्तापर्यंत दंगलीत 2200 पेक्षा अधिक लोकांची हत्या झाली आहे. पण दंगलग्रस्तांसाठी मदतीचा ओघ खूप कमी आहे. भूकंपात लाखोंनी मदत करणारे हात पुढे आले, पण दंगलीत मदतीला लोक पुढे येत नाहीत. नैसर्गिक आपत्तीला जगभरातून मानवतेच्या भावनेने लोकांनी मदत केली, पण या मानवनिर्मित आपत्तीत मदतीचा ओध खूपच कमी आहे.

दुसऱ्या दिवशी काही कॅम्पस्ना भेटी देण्यासाठी आम्ही निघालो. अहमदाबादपासून 50 कि.मी. अंतरावर मंडाले नावाचे गाव आहे. तिथे 1100 लोकांचा सुरक्षा कॅम्प आहे. त्या कॅम्पला आम्ही भेटी दिल्या. तेथील कॅम्पची व्यवस्था पाहणारे 'विश्वग्राम' या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते संजय तुला व बरेच सहकारी काम करतात. त्यांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली. कॅम्पमधील लोकांशी सध्या चर्चा करू नका; सध्या ते त्या मनःस्थितीत नाहीत, असे त्यांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही ते टाळले. संजयशी चर्चा करताना तो म्हणाला की, “लोक कॅम्प सोडून जायला तयार नाहीत, कारण त्यांना त्यांच्या संरक्षणाची काळजी वाटते. गुजरात पोलिसांवर त्यांचा अजिबात विश्वास राहिलेला नाही. ते मिलिटरीचे संरक्षण मागतात.”

या साऱ्या घटनांना आता दोन महिने पूर्ण होत आहेत, तरी शासनाकडून पुनर्वसनाबाबतचा निर्णय अजून झाला नाही. दंगलग्रस्त छावणीत राहणाऱ्या बऱ्याच लोकांची पिके लोकांनी कापून नेली. त्यांचा बैलबारदाना, गुराढोरांचा पता लागत नाही. काहींनी आपली गुरंढोरं लांबच्या नातेवाईकांकडे पोहोचवली आहेत. उद्या जर त्यांनी घरी जायचं तर जायचं कुठे, आणि राहायचं कुठं? पूर्ण संसारच उद्ध्वस्त झालाय. आता नव्यानं सारं उभं करायचं, त्यासाठी लोकांनी पुढे यावं लागेल. ज्यांच्या कुटुंबातील माणसं दंगलींत मारली गेली, त्यांची मानसिकता खूपच बिघडलेली आहे. त्यांपैकी काही तरुण म्हणतात, आम्हांला 24 तास बाहेर सोडा, वाट लावू आम्ही एकेकांची... अशी सूडाची भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. पण खेड्यातील परिस्थिती आता सुधारत आहे. काहीजण शेतावर जाऊन येतात. इतर कॅम्पमधील नातेवाईकांना भेटूनपण येतात. पण अहमदाबाद शहराची स्थिती मात्र रोजच्या रोज बिघडत चालली आहे.

मंडालेहून परतताना आम्ही नंदासर गावात हॉटेलमालक अहमदभाई यांच्याशी चर्चा करत होतो. अहमदभाई म्हणाले, "आठ दिन सारे अखबार बंद करो। सब ठीक हो जायेगा। अखबारवाले पेट्रोलका काम कर रहे है।" त्यांनी आम्हाला त्या दिवशीचा दै.संदेश दाखविला. पहिल्याच पानावर बातमी होती. 'नंदासर गावमें परिस्थिती फिर बिगड गई' आणि खाली उल्लेख होता. ‘सुरक्षेसाठी पोलीस सैन्य दल रवाना’; पण त्या गावात आम्ही अर्धा तास होतो, एकही पोलीस दिसला नाही; ना सैन्याचा जवान. वातावरण व्यवस्थित होते. लोक आपापल्या कामात होते. पण पेपरात बातमी उलट, सगळ्यांत वाईट कृत्य तेथील स्थानिक वर्तमानपत्रे करत आहेत. भडक आणि खोट्या बातम्यांमुळे वातावरण रोज विधळत आहे. अशा बातम्या 'गुजरात समाचार' व 'दै, संदेश' या वर्तमानपत्रांतून दिल्या जात आहेत. महमदभाईंनी आमच्याशी खूप गप्पा मारल्या. परिस्थिती बिघडायला संघ परिवारातील राजकीय पुढारी, बजरंग दलाचे कार्यकर्ते, दुर्गा वाहिनीचे लोक कारणीभूत आहेत, असे ते म्हणाले. आम्ही तेथून एका गावात गेलो. ते गाव फिरून पाहिले. त्या गावातील जेवढी म्हणून मुस्लिम घरं आहेत ती वेचून जाळण्यात आली होती. एकही घर शिल्लक ठेवलं नाही. आज त्या गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही. सर्वजण सुरक्षा कॅम्पात राहतात. घर जाळण्याअगोदर घरं लुटली; मग जाळली, तियेही मृतांची संख्या बरीच आहे. तेथून आम्ही सुंदरपूरला गेलो, तिथेही तीच परिस्थिती. त्या गावात एकाच घरात 35 जणांना बळजबरीने घालून ते घर पेटवून दिले. वरून पेट्रोल टाकले, तो वाडाही आम्ही पाहिला. मन हेलावून टाकणाऱ्या घटना ऐकताना डोळ्यांतून आसवे येत होती. माणसेसुद्धा हैवानासारखे वागतात. हे ऐकवत नव्हते.

तेथून आम्ही अहमदाबाद शहरात आलो. तेथील कॅम्प बाहेरूनच पाहिले, त्यातही 4 ते 5 हजार लोक होते. पुढे नारोडा पाटीया भागात गेलो. अर्धा कि.मी.पर्यंत दुतर्फा घरे, दुकाने, गॅरेजेस, हॉटल्स जळून पडून बेचिराख झालेली पाहिली. एका गॅरेजसमोर दुरुस्तीला आलेली 25 वाहने पूर्णपणे जळाली होती. फक्त करपलेले सांगाडे बघायला मिळाले. बापू नगरात दंगल चालूच होती. कर्फ्यू असूनही घरे जळत होती. अग्निशामक दलाच्या गाड्या दिवे, सायरन लावून धावत होत्याच. पोलिसांची व सेनादलाची पळापळ चालू होती. हवेत गोळीबार चालू होता. जखमींना व मृतांना घेऊन अॅम्ब्युलन्स धावत होत्या. तेथून गोमतीपूर, रखीयाल, सरसपूर, चमनापूरा, इदगाह चौक, दर्यापूर दरवाजा, प्रेमदरवाजा, दिल्ली दरवाजा हा सारा जळालेला भाग पाहिला. वाटेवरील बऱ्याच लोकांशी, सैन्यदलाच्या जवानांशी पण चर्चा केली. ज्या गाडीतून आम्ही फिरत होतो, त्या गाडीचा चालक व चुनीभाई वैद्यांचा कार्यकर्ता नानजीभाई यांनी आम्हाला खूप माहिती दिली. जेवढी जेवढी म्हणून जळाली ती फक्त ठरवून, मुसलमानांची मालमत्ता वेचून जाळली गेली. जाळण्याअगोदर लुटली आणि मग जाळली. दुकानमालक पुढे आल्यानंतर त्याला भोसकून मारले. 24 तास लुटालूट जाळपोळ चालली होती, पण त्यावर गुजरात पोलीस निर्वत्रण करू शकले नाहीत. बघत उभे होते. काही पोलीस धान्य, कपडे पळवायला दंगेखोरांना मदत करीत होते. दंगलीत पोलीस हत्यार फक्त मुसलमानांवरच चालवत होते. या दंगलीत पोलीस गोळीबारात मेलेले हिंदू बोटावर मोजण्याइतकेच आहेत. आणि विशेष म्हणजे बजरंग दलात 50 ते 60% दलित युवक आहेत. त्यांच्यात हिंदुत्वाची बीजे इतकी कशी रुजली गेली, हेच कळत नाही. हे उच्चवर्णीय ज्यांनी दंगे घडवले ते स्वतः या कृत्यात नव्हतेच, ते पैसे देऊन करवून घेणारे. बरेच दंगेखोर बाहेरून मागवलेले होते. शहर पाहात आम्ही साबरमतीचा पूल पार करत होतो. पुलाच्या बाजूला शहापूरचा झोपडपट्टीचा भाग. भर दुपारी त्या वस्तीत बॉम्बस्फोट झाला, लोक जीव वाचवायला नदीकडे पळत होते. लोकांची खूप गर्दी ते बघायला झाली होती. पोलिसांनी आम्हाला जायला सांगितलं. आम्ही पुढे सटकलो, तेथून पुढे आलो व ती गुलमोहर सोसायटी पाहिली. तिच्यात काँग्रेसच्या खासदारासह 27 जणांची हत्या झाली होती.

दि. 2 रोजी एका पोलिसाची हत्या झाली. म्हणून पोलिसांनी मशिदीतून नमाज पढून बाहेर येणाऱ्या 19 जणांवर गोळ्या झाडून हत्या केली, त्यांत कॉलेजवरून घरी येणारी एम.ए.ची तरुण मुस्लिम विद्यार्थिनी, तिच्या कपाळावर गोळ्या घालून तिचीही हत्या करण्यात आली. तेथील पोलीस अधिकारी राजकीय पुढाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे चालतात. त्यांचे न ऐकणारा अधिकारी तिथे राहूच शकत नाही. 75% पोलीस अधिकारी दंगेखोरांना मदत करतात. म्हणून तेथील मुस्लिम त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. सैन्यदलाला आमच्या संरक्षणासाठी पाठवा व शहराला काही दिवस सैन्याच्या ताब्यात द्या, अशी मागणी तेथील सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम नेते करत आहेत. मुस्लिमांनी पोलिसांवर हल्ला केला, अशा दणदणीत बातम्या वर्तमानपत्रांतून आल्या, पण त्या पोलिसांची हत्या का झाली, हे मात्र कोणत्याच वर्तमानपत्राने छापले नाही. त्या पोलिसांनी त्या दंगलींचा फायदा घेऊन 36 ते 37 मुसलमानांची हत्या केली होती. त्याचा राग त्या लोकांच्या मनात होता. तो राग त्यांनी काढला. त्यानंतर पोलिसांनी 19 जणांची हत्या केली. असा तो प्रकार झाला, पण प्रसिद्धीमाध्यमांमध्ये चुकीचे वृत्त येते. फक्त मुस्लिमांनाच दोष देण्याचे कार्य वर्तमानपत्रे करतात. ज्यांच्या घरांतील माणसांना त्यांच्यासमोर पेट्रोल ओतून जाळले; त्यांची निघृण हत्या केली; ते ज्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले त्यांच्या मनात तिरस्काराची भावना असणार, हे साहजिकच आहे, नानजीभाई म्हणाले की, “अशी एकेकाची निघृण हत्या केली, ते बघवत नव्हतं. आम्ही हा सारा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत होतो. पण आम्ही काहीही करू शकत नव्हतो.”

एक विधवा म्हातारी वेड्यासारखी फिरत होती. तिची आम्ही चौकशी केली तेव्हा माहिती मिळाली ती अशी, की 1967-68 च्या दंगलीत नवरा गेला. एका मुलाला घेऊन त्या म्हातारीने दिवस काढले होते. आणि आता या दंगलीत त्या मुलाचीही हत्या त्या म्हातारीसमोर झाली. त्यामुळे म्हातारी वेडी झाली. तिची मानसिकता काय झाली असेल, ती कल्पना करवत नाही. त्या म्हातारीने आता कुणाच्या आधारावर जगायचं? ही दुर्दैवी घटना, ती म्हातारी कशी सहन करणार? मला आत्ताही त्या म्हातारीचा चेहरा सारखा दिसतोय. त्या सर्व लोकांच्या पुनर्वसनाबाबत या घटनेला दोन महिने होऊनसुद्धा शासन अजून निर्णय घेत नाही. त्यातसुद्धा पुन्हा अडचण अशी आहे, ज्यांची नोंद महानगरपालिकेत आहे, त्यांचंच पुनर्वसन होईल, ज्यांच्या नावे घर नाही, जे अनधिकृत जागेत झोपडीतून पत्र्याच्या शेडमधून राहतात, हातगाडीवर व्यापार करून उदरनिर्वाह करतात, त्यांचं तर काहीच राहिलं नाही, त्यांच्या नोंदी कुठंच नाहीत. त्यांची संख्या मोठी आहे. त्यांचा प्रश्न कसा सुटेल. त्याच भागातील शेतकरी भीतीपोटी शरणार्थी कम्पमध्ये आहेत; त्यांचं उभं पीक गेलं. तो बिचारा हताश झाला आहे. वर्ष कसं गाठायचं या चिंतेत तो आहे. परिस्थिती पाहताना डोळ्यांतून आसवं यायची. जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या गांधीबाबाच्या देशातील माणसं एवढी निर्दयी कशी झाली; एवढी कशी राक्षसी प्रवृत्ती माणसांमध्ये निर्माण झाली? दि. 23 ला शहराची परिस्थिती पार बिघडली. शहरात पुन्हा सगळीकडे कर्फ्यू जारी होणार. तोवर आम्ही आश्रमात परतलो. 23 ला सायंकाळी जड अंतःकरणाने शहराबाहेर पडलो. डोळ्यांत आसवं घेऊन परतलो. आत्ताही तेच दृश्य मला सारखं दिसतंय.

Tags: नरेंद्र मोदी राम मंदिर निर्माण आंदोलन संघ परिवार बजरंग दल विश्व हिंदू परिषद गुजरात दंगल कैलास मा.ई. Narendra Modi Ram temple construction movement RSS Bajrang Dal Vishva Hindu Parishad Gujarat riots Kailash M. E. weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

कैलास मा. ई.

(व्यवस्थापक) 'आपलं घर'


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके