डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नोबेल पुरस्कार स्वीकारताना कैलाश सत्यार्थी यांनी केलेले भाषण

फुटबॉल तयार करताना बॉलला टाके घालणारी मुले कोण असतात? बॉल हाताळला तरी ती फुटबॉल खेळू शकत नाहीत. ती मुले आपलीच आहेत. दगडांच्या आणि खनिजांच्या खाणींमध्ये काम करणारी मुले कोणाची आहेत? तीही आपलीच आहेत. कोको फळांच्या बागेत काम करणारी, पण चॉकलेटची चव कधीही न घेतलेली मुले कोणाची? तीही आपणा सर्वांचीच आहेत.

या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रप्रमुख, राजघराण्यांतील मंडळी, देशोदेशींचे राजदूत, नॉर्वेजियन नोबेल कमिटीचे आदरणीय सदस्य, प्रिय बंधू टॉम हार्किन, माझी प्रिय कन्या मलाला, बंधूंनो आणि भगिनींनो... गौतम बुद्ध, गुरू नानक आणि महात्मा गांधी यांच्या पवित्र भूमीपासून मी येथवर प्रवास केलेला आहे. भारत आणि नॉर्वे ही जागतिक शांती आणि बंधुभाव यांची प्राचीन व आधुनिक काळातील दोन मुख्य केंद्रे राहिलेली आहेत. मित्रांनो, नोबेल कमिटीने उदारपणाने मला आपल्या सर्वांसमोर भाषण करण्यासाठी व्यासपीठावर बोलावले; पण मी नम्रपणे सांगू इच्छितो की, मी कोणतेही व्याख्यान देण्याइतका मोठा नाही. मी या ठिकाणी शांततेचा स्वर ध्वनित करण्यासाठी आलो आहे. निरागसांचा आकांत आणि अदृष्टांचा चेहरा यांचे प्रतिनिधित्व मी करत आहे. आमच्या मुलांचे आवाज आणि त्यांची स्वप्ने यांच्यामध्ये मला सहभागी व्हायचे आहे; कारण ती सर्व मुले आपलीच आहेत. मी त्यांच्या भीतिग्रस्त आणि थकलेल्या डोळ्यांत डोकावतो आहे, तेव्हा मला तिथे अनेक प्रश्न दिसतात... वीस वर्षांपूर्वी हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या प्रदेशात फिरत असताना मला एक लहानखुरा, शिडशिडीत मुलगा भेटला. त्याने मला विचारले, ‘मला खेळणी किंवा पुस्तकं देण्याऐवजी एखादे हत्यार किंवा बंदूक सक्तीनं देणारं हे जग खरोखरीच इतकं गरीब आहे काय?’ एकदा एक सुदानी बालसैनिक भेटला, त्याचे एका अतिरेकी संघटनेने अपहरण केले होते. त्याच्या प्रशिक्षणाची सुरुवातच मुळी त्याचे मित्र आणि त्याच्या कुटुंबातील माणसे यांची हत्या त्याच्याकडून करवून घेऊन झाली. त्याचा मला प्रश्न आहे, ‘माझं काय चुकलं?’ बारा वर्षांपूर्वी कोलंबियाच्या एका रस्त्यावर मला एक बाल-माता भेटली. अपहरण करून देशोदशी पाठविलेली, बलात्कारित गुलाम म्हणून विकली गेलेली. ती मला विचारत होती, ‘मी कधी स्वप्न पाहिलेलं नाही; माझ्या मुलाला तरी ते दिसेल का?’ आपल्या मुलांची स्वप्ने दुर्लक्षित करणे यासारखा दुसरा मोठा हिंसाचार नाही. माझ्या आयुष्याचे एकमेव उद्दिष्ट हेच आहे...   

  प्रत्येक मूल स्वतंत्र आहे.  वाढीसाठी आणि विकासाला सन्मुख आहे.  अन्न, झोप आणि दिवसाचा लख्ख उजेड यांचा उपभोग घेण्यास ते स्वतंत्र आहे.  हसणे व रडणे हे ते मुक्तपणे करू शकते.  मोकळेपणाने ते खेळू शकते.  शिक्षण व शालेय जीवन मुक्तपणे उपभोगू शकते आणि या सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ते स्वप्न सन्मुख आहे. जगातील सर्व धर्म आपल्याला मुलांची काळजी घेण्याचा आदेश देतात. जीझस्‌ म्हणाला होता, ‘सगळ्या मुलांना माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना अडवू नका, कारण ते देवाच्या राज्याचे मालक आहेत.’... पवित्र कुराण सांगते, ‘दारिद्र्याच्या अडचणीमुळे आपल्या मुलांना मारून टाकू नका.’ जगातील सर्व मंदिरे, मशिदी आणि प्रार्थनागृहे (चर्चेस)  आपल्या मुलांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यास असमर्थ आहेत, हे स्वीकारायला माझे मन तयार नाही. जगातील लष्करावरचा एका आठवड्याचा खर्च, सर्व मुलांना शाळेत शिकता येईल इतका आहे, त्यामुळे जग खूप गरीब आहे हे म्हणणे मला मान्य नाही. या जगातील सर्व कायदे, जगातील राष्ट्रांची संविधाने, न्यायाधीश आणि पोलीस हे मुलांना सांभाळण्यासाठी सक्षम नाहीत, यावरही माझा विश्वास नाही. स्वातंत्र्याच्या तीव्र आकांक्षेपेक्षा गुलामगिरीच्या साखळ्या मजबूत असू शकतात, यावरही मी विश्वास ठेवू शकत नाही. होय, मी वरीलपैकी कोणत्याही सबबी स्वीकारू शकत नाही. मला अनेक धाडसी सहकाऱ्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे, ते सहकारी पण वरील गोष्टी नाकारतात. आम्ही आतापर्यंत एखादी धमकी अगर आमच्यावरील हल्ला यांना घाबरून हातचे कार्य कधी सोडून दिलेले नाही आणि पुढे देणारही नाही. गेल्या दोन दशकांत आमच्या कार्यात नि:संशयपणे प्रगती झालेली आहे. शाळेत न जाणाऱ्या मुलांची संख्या निम्म्याने घटली आहे. बालमृत्यू आणि कुपोषित मुलांची संख्याही कमी झाली आहे, लाखो संभाव्य बालमृत्यू थांबवले गेले आहेत. जगातील बालकामगारांची संख्या तेहतीस टक्क्यांनी घटली आहे. तरीही मोठमोठी आव्हाने संपलेली नाहीत. मित्रांनो, सध्या मानवतेच्या दारावर सतत धक्के देणारे मोठे आव्हान असहिष्णुतेचे आहे. आपल्या मुलांना शिक्षण देण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. असे शिक्षण- जे जीवनाचा अर्थ व उद्दिष्टे समजावून देते, भविष्य सुरक्षित करते; असे शिक्षण की- जे सर्व तरुण मुलांवर जागतिक नागरिकत्वाचा संस्कार करते. मला अशी भीती वाटते की, आमच्या या अपयशाच्या एकंदरीत परिणामी, असा एक अभूतपूर्व हिंसाचार आपल्यापुढे उभा करील की, ज्यात मानवजातीचे अस्तित्वच पणाला लागेल. तरीही, मलालासारखी तरुण मुले जगात सर्वत्र वर येताना दिसत आहेत; ज्यांनी आपल्या जीवनात हिंसाचाराऐवजी शांततेची निवड केलेली आहे, अतिरेकीपणा सोडून सहिष्णुतेला प्राधान्य दिले आहे आणि भीती सोडून धैर्याचा मार्ग पकडला आहे. परिषदांमधील ठराव आणि कागदावर उतरवलेल्या उपाययोजना यांच्यामुळे प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, कारण ते प्रश्न दूर अंतरावरून पाहिलेले असतात. या प्रश्नांशी सदोदित टक्कर घेणारे लोकांचे छोटे-मोठे गट, स्थानिक संस्था यांच्यामध्ये ती उत्तरे लपलेली असतात. बाहेरच्या जगाला त्यांची ओळख किंवा अस्तित्वही क्वचितच माहीत असते. अठरा वर्षांपूर्वी १०३ राष्ट्रांतील अनेक बंधू-भगिनींनी एकूण ८०,००० किलोमीटर्सची पदयात्रा काढली होती. त्यातून बालकामगारविरोधी एका नव्या आंतरराष्ट्रीय कायद्याचा जन्म झाला. आपण त्या वेळी हे यश हस्तगत केले. तुम्ही कदाचित हे विचाराल की, एकटा माणूस यासाठी काय करू शकेल? माझ्या लहानपणी ऐकलेली आणि आता आठवलेली एक गोष्ट तुम्हाला सांगतो- एका जंगलात मोठा वणवा लागला होता. सर्व प्राणी व जनावरे त्या जंगलातून बाहेर पडण्यासाठी सैरावैरा धावत होती. त्यांमध्ये जंगलाचा राजा सिंहसुद्धा होता. सिंहाला एक लहानसा पक्षी अचानक त्या वणव्याच्या दिशेने झेपावताना दिसला. त्याने त्या पक्ष्याला विचारले, ‘तू काय करतो आहेस इथे?’ पक्षी म्हणाला, ‘मी माझ्या शक्तीनुसार ही आग विझवण्याचा प्रयत्न करतो आहे.’ त्या उत्तराने सिंह चकित झाला आणि मोठ्याने हसून त्याने पक्ष्याला म्हटले, ‘तुझ्या चोचीतल्या थेंबभर पाण्याने ती आग कशी विझणार?’ पक्षी जिद्दीचा होता. तो म्हणाला, ‘पण मला माझे लहानसे का होईना, काम केलेच पाहिजे.’ आपण सर्व सध्या वेगवान वैश्विकीकरणाच्या युगात जगत आहोत. अतिवेगवान माहितीजालाने एकमेकांशी जोडले जात आहोत. एकाच जागतिक बाजारात वस्तू आणि सेवा यांची अदलाबदल करीत आहोत. दर दिवशी पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत हजारो विमाने या गोलात संपर्क साधून देत आहेत. पण, या सर्वांत एक धागा तुटलेला आहे आणि तो म्हणजे, आंतरिक करुणेचा अभाव. व्यक्ती-व्यक्तीतील करुणेची जोपासना करून तिचे रूपांतर जागतिक आंदोलनात करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, करुणेचेही वैश्विकीकरण झाले पाहिजे; आणि ते निष्क्रिय असता कामा नये. त्यातून समाजातील न्याय, समता आणि स्वातंत्र्य यांना बळ मिळाले पाहिजे. महात्मा गांधी म्हणाले होते, ‘जगाला शांतीचे धडे द्यायचे असतील तर त्याची सुरुवात मुलांपासून करावी लागेल.’ या त्यांच्या वचनाला मी जोड देण्याचे धाडस  करतो. ‘आमच्या मुलांसाठीच्या कणवेचा बंध वापरून आपण सारे जग जोडून टाकू या.’ फुटबॉल तयार करताना बॉलला टाके घालणारी मुले कोण असतात? बॉल हाताळला तरी ती फुटबॉल खेळू शकत नाहीत. ती मुले आपलीच आहेत. दगडांच्या आणि खनिजांच्या खाणींमध्ये काम करणारी मुले कोणाची आहेत? तीही आपलीच आहेत. कोको फळांच्या बागेत काम करणारी, पण चॉकलेची चव कधीही न घेतलेली मुले कोणाची? तीही आपणा सर्वांचीच आहेत. देवळी ही पिढ्यान्‌पिढ्या कर्जबाजारी कुटुंबातील ऋणग्रस्त वेठबिगार कामगाराची मुलगी. शोधून तिची मुक्तता केल्यावर ती आठ वर्षांची मुलगी गाडीमध्ये बसल्यावर लगेच मला विचारते, ‘तुम्ही लवकर का नाही आलात?’ तिचा तो रागाने विचारलेला प्रश्न मला तर हलवून गेलाच; पण सर्व जगाला तो हलवणारा होता. तिचा हा प्रश्न आपणा सर्वांसाठीच होता. आपण तिच्या सुटकेसाठी लवकर का पोहोचू शकलो नाही? आपण कोणासाठी, कशासाठी थांबलो आहोत? आणखी किती देवळींना आम्ही सुटकेशिवाय थांबवून ठेवणार आहोत? आणखी किती मुलींना हे अपहरण, डांबून ठेवणे आणि अत्याचार यांना तोंड द्यावे लागणार आहे? देवळीसारखी जगभरची मुले आपल्या निष्क्रियतेबद्दल आपल्याला प्रश्न विचारत आहेत. आपली हालचाल लक्षपूर्वक पाहत आहेत. हे प्रश्न आपल्याला संघटितपणे आणि अतिशय तातडीने हाती घेतले पाहिजेत.

प्रत्येक मिनिट मोलाचे आहे, प्रत्येक बालक आणि प्रत्येक बालपण महत्त्वाचे आहे. आपल्या बालकांच्या संदर्भातील निष्क्रियता आणि उदासीनता यांना मी आव्हान देतो आहे. नि:शब्दतेची, तटस्थतेची ही संस्कृती मला अतिशय व्यथित करते आहे; कृतीची मागणी करते आहे. म्हणूनच, मी सर्व देशांची सरकारे, आंतरप्रशासकीय यंत्रणा, उद्योगपती, धर्मप्रसारक आणि सामाजिक संस्था या सर्वांना आवाहन करीत आहे की- मुलांच्या विरोधात होणारी हिंसक कृत्ये, गुलामगिरी, अपहरण, बालविवाह, बालमजुरी, लैंगिक अत्याचार आणि निरक्षरता समाप्तीचे आव्हान प्रयत्नपूर्वक पेलले पाहिजे. मित्रांनो, आपण हे करू शकतो. देशोदेशींच्या सरकारांनी बालकस्नेही धोरणे आखली पाहिजेत. शिवाय शिक्षण आणि तरुण यांच्या क्षेत्रात अधिक  गुंतवणूक केली पाहिजे. उद्योग-व्यवसायात कल्पक तरुणांची भागीदारी वाढीला लागेल अशी धोरणे आखली पाहिजेत. उद्योग अधिक जबाबदार व खुलेपणाने चालवले पाहिजेत.

आंतरप्रशासकीय यंत्रणांनी एकत्र काम करून कृतिशीलता वाढवावी. जागतिक नागरी सामाजिक संस्थांनी नेहमीच्या प्रमाणित उपक्रमांतून थोडे लक्ष काढून या विषयात अधिक काम करावे; कामाचा वेग वाढवावा. धार्मिक नेते व संस्था आणि आपण सर्व या आपल्या मुलांमागे ठामपणे उभे राहू या. त्यासाठी आपण धीट झाले पाहिजे. महत्त्वाकांक्षा जागृत ठेवली पाहिजे आणि प्रबळ इच्छाशक्तीने आपली वचने पूर्ण केली पाहिजेत.

पन्नास वर्षांपूर्वी मी शाळेत प्रवेश घेतला तेव्हा पहिल्याच दिवशी मला चांभाराचा एक मुलगा शाळेच्या गेटजवळ बसलेला दिसला. तो बुटांना पॉलिश करीत होता. त्याला पाहून माझ्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले. माझ्या शिक्षकांना मी विचारले, ‘तो बाहेर का काम करतो आहे? तो माझ्याबरोबर शाळेत का येत नाही?’ माझ्या शिक्षकांनी मला उत्तर दिले नाही. एके दिवशी मी सर्व धैर्य गोळा करून त्या मुलाच्या वडिलांना विचारले, तेव्हा ते म्हणाले, ‘मी त्याचा कधी विचारच केला नाही राजा! आमचा जन्म तर फक्त काम करण्यासाठीच आहे!’ त्यांच्या या उत्तराचा मला राग आला; आजही येतो. मी त्या वेळी त्या उत्तराला आव्हान दिले आणि आजही त्या व्यवस्थेला आव्हान देत आहे. मूल म्हणून माझ्यासमोर भविष्यकाळाचे एक चित्र होते. तो चांभाराचा मुलगा माझ्याबरोबर माझ्याच वर्गात शिकताना मला दिसत होता. आता त्या कालचा ‘आज’ झाला आहे. मी ‘आज’ आहे आणि तुम्हीसुद्धा ‘आज’ आहात.

प्रत्येक मुलासाठी जगण्याचा हक्क, स्वातंत्र्याचा अधिकार, आरोग्य व शिक्षण यांचा हक्क, सुरक्षेचा हक्क, प्रतिष्ठा, समानता यांचा हक्क आणि शांतपणे जगण्याचाही हक्क हे सर्व ‘आज’ मागतो आहे. अंधकारापलीकडे जाऊन ‘आज’ मी लुकलुकत्या ताऱ्यांच्या प्रकाशात आपल्या मुलांचे हसरे चेहरे पाहू शकतो. ‘आज’ प्रत्येक सागराच्या प्रत्येक लाटेवर मी आपली मुले खेळताना व नाचताना पाहतो. ‘आज’ प्रत्येक रोपट्यात, झाडावर आणि पर्वतावर तो चांभाराचा लहानसा मुलगा माझ्याबरोबर वर्गात बसला आहे, असा मला भास होतो. तुमच्यामधला हा ‘आज’ तुम्ही पाहावा आणि अनुभवावा, असे मला वाटते.

माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, मी तुम्हाला तुमचे डोळे काही क्षण बंद करून तुमचा हात तुमच्या छातीवर, हृदयाजवळ ठेवून स्तब्ध राहण्याची विनंती करतो. तुमच्या अंत:करणातील मुलाचे अस्तित्व तुम्हाला जाणवते आहे काय? त्याचे म्हणणे एकाग्रतेने ऐकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ते ऐकू शकाल. आज हजारो गांधी, मार्टिन ल्यूथर किंग आणि नेल्सन मंडेला पदयात्रेला निघाले आहेत. ते आपल्याला आवाहन करीत आहेत. मुले-मुली त्यांच्या मोहिमेत सामील होऊन चालली आहेत. मीही त्यात सामील आहे आणि तुम्हालाही तसे आवाहन करीत आहे.

ज्ञानाचे लोकशाहीकरण आपण सर्व करू या. न्यायाचे वैश्विकीकरण करू या. आमच्या मुलांसाठी आपण सर्व मिळून करुणेचे सार्वत्रिकीकरण करू या. या दालनातील आणि जगातील सर्वांना मी हाक घालीत आहेत. माझी ही हाक सर्वांनी मिळून शोषणाकडून शिक्षणाकडे जाण्यासाठी, दारिद्य्राकडून समभागी समृद्धीकडे, दास्यातून स्वातंत्र्याकडे आणि हिेंसाचाराकडून शांततेकडे जाण्यासाठी आहे; या मोर्चात आपण सर्व सहभागी होऊ या.

अनुवाद : कुमुद करकरे

Tags: शांती पुरस्कार बाल हक्क वंचित मुले नोबेल पुरस्कार कैलाश सत्यार्थी कुमुद करकरे kumud karkare child rights nobel award kailash satyarthi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

कैलाश सत्यार्थी,  विदिशा, मध्य प्रदेश

भारतीय बालहक्क चळवळकर्ते, २०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिक विजेते


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके